दिलदार कजरी - 19 Nitin More द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • आर्या... ( भाग ५ )

         श्वेता पहाटे सहा ला उठते . आर्या आणि अनुराग छान गाढ झोप...

  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

श्रेणी
शेयर करा

दिलदार कजरी - 19

१९.

दिलदारचे नवे पत्र

दिलदारने अधीरतेने पत्र उघडले. चिठ्ठीत काय असेल? आयुष्यात आलेले हे पहिलेच पत्र. तेही प्रेमपत्र. कजरीने काय लिहिले असणार? कजरीने दिलदारच्या चार शब्दांचे उत्तर.. चार शब्दांतच दिलेले! मजकूर इतकाच.. 'आज तिकडे भेटायला ये..' इतकेच! तिलाही ते दिलदारचे पहिले पत्र वाचून असेच वाटले असेल.. बास? इतकेच? परतल्यावर त्याने समशेरला चिठ्ठी दाखवली.. समशेर कागद उलटापालटा करत म्हणाला,"काला अक्षर भैंस बराबर. आणि अशी दुसऱ्यांची प्रेमपत्रे वाचण्याची पद्धत नाही माझी!"

दिलदार विचार करत होता.. एका दिवसात किती गोष्टी घडाव्यात.. गुरूजींशी भेट.. त्यात शरणागतीबद्दल बोललेले.. मग कजरीशी भेट नि तिचे पहिलेवहिले प्रेमपत्र.. तिला प्रत्यक्ष दिलदार म्हणून भेटायचे.. सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लवकरच लागणार..

"समशेर यार, आज तुझ्याशी खूप महत्त्वाचे बोलायचे आहे."

"अंदाज आहे मला. कजरीच्या पोलिस ठाण्यावर डाकू दिलदारसिंग यास नि:शस्त्र बोलावले आहे. तेव्हा तेथे जाण्याचे धैर्य एकवटण्यासाठी समशेर हवा! पण हे सारे करताना कुठे गेली होती अक्कल? तेव्हा विचारले नाहीस. दिल है की मानता नहीं म्हणे. मी म्हणतो, दिलदार है की मानता नहीं."

"समशेर तू म्हणतोस ते सगळे खरे. पण मला सांगायचे ते अजून काहीतरी वेगळे आहे.."

"काय? तिच्या पुजारी बापास पळवून आणू? इकडे आणून समजावून सांगू. साबुदाणा आणि केळी वगैरे सात्विक आहार खाऊ घालू. आणि जावई आणि सासऱ्याची एकत्र बिदाई करू?"

"तशी कल्पना चांगली आहे.. पण सध्या सांगायचे ते वेगळे आहे.. आणि त्याचा धक्का तुला नि सगळ्यांना बसणार आहे.."

"काय? तुम्ही एकमेकांच्या गळ्यात हार घालून लग्न उरकून घेतले आहे? आता भाभीला रहायची व्यवस्था करायची आहे?"

"ही पण कल्पना चांगलीच आहे. पण सांगायचे ते वेगळे काही आहे.. तुझा अंदाज लावू नकोस अजून. ऐकून घे नीट.."

मास्तरांनी सांगितलेले सांगावे कसे नि समशेरच्या गळी उतरवावे कसे? पण कठीण झाले तरी करणे भाग होते.

"एक शेवटचा अंदाज.. तुला सद्बुद्धी झालीय आणि तू हे सारे इथेच संपवून आता नवीन कुणाला शोधणार आहेस.. जिच्यासाठी इतके सारे करायला लागणार नाही .. काय आहे शेवटी डोक्यात प्रकाश पडणे महत्त्वाचे. म्हणजे माझी सुटका झाली म्हणायची .."

"तुझी सुटका? ऐक. आज गुरूजींनी बोलावलेले. मी जाऊन आलो.. ते काय म्हणाले ते तुला सांगायचे आहे. आता तुझे अंदाज बांधणे बंद आणि गुरूजींचे म्हणणे ऐक. आणि हे कठीण काम तुलाच पार पाडायचे आहे.."

"म्हणजे कजरीभाभी तुला मिळणार नि वरातीत मी नाचणार.. बेगानी शादी में समशेरा दीवाना? त्यासाठी सारा खटाटोप मी करावा .. "

"गुरूजी म्हणाले हे सगळे सोडून देऊन नवीन आयुष्य सुरू करा.."

"शाबास! गुरूजी पण हेच म्हणाले ना? विसरून जा कजरीला.. सोडून दे.."

"चुप. गुरूजी म्हणाले डाकूगिरी सोडून द्या.."

"कोणी?"

"आपण सगळेच. सरदार निवडणुकीच्या कामात आहेत.. त्यांना यावेळी जास्त बोलता येणार नाही. आपली सगळी टोळी शस्त्रे टाकून शरण गेली .."

"तुझे प्रेमप्रकरण इथवर पोहोचले.. की आपल्या पोटावर गदा यावी?"

"गुरूजी म्हणाले, हे सगळे सोडून नवीन जीवन सुरू करा. सध्या सरदारांचा हात दगडाखाली आहे तोवर. तुझ्यावर त्यांचा खूप भरवसा आहे. म्हणाले, टोळीतले लोक तुझे ऐकतील. एकदा शरण आलो की या भागातील दहशत संपेल. लोकांची भीतीने गाळण उडते ती बंद होईल. गुरूजी यासाठी सर्व मदत करतील. फक्त तेवढी हिंमत आपल्याला दाखवणे गरजेचे आहे.. गुरूजी म्हणतात, याहून दुसऱ्या कुठल्या पद्धतीने जगता येते हेच आपल्याला ठाऊक नाही. बंदुकीच्या जोरावर दहशत कमावता येईल. प्रेम नाही. गुरूजी म्हणाले, समशेरला हे कळेल, हवे तर समशेर, तू पण गुरूजींना एकदा भेट. म्हणजे तुला कळेल ते काय सांगत आहेत ते."

"गुरूजी म्हणतात ते खरे रे. पण आपण पोट भरावे कसे? शरण यावे.. सन्मानाने जगावे.. सगळे खरे पण हे घडणार कसे. एक गोष्ट मात्र खरीच, मी गुरूजींना मानतो.. त्यांना शक्य होते की आपल्याला पकडून द्यायचे. पण त्यांनी तसे काही केले नाहीच. पण आपण हत्यारे टाकली की काय पुढे .."

"हे बघ, याचा संबंध कजरीशी नाही.. म्हणजे तसा आहे. पण यात गुरूजींचा स्वतःचा फायदा नाही. त्यांना आपण सरळ मार्गावर आलेले पहायचेय. मला तर वाटतेय.. माझा उपयोग ते त्यासाठी करून घेताहेत. त्यात फायदा त्यांचा असा नाही, पण आपला नक्की आहे.."

"तू म्हणतोस ते खरेय. पटतेय. पण नुसता समशेर म्हणतो म्हणून सगळे ऐकतील?"

"गुरूजी काय म्हणाले ठाऊक आहे, आधी स्वतःला पटले तरच आपण दुसऱ्यांना पटवून देऊ शकतो. ह्या डोंगरदऱ्यात आजवर आयुष्य गेले. आयुष्यात काय काय मिळाले? पैसाअडका आहे पण तो लुटून आणलेला. आपल्याला घर असे नाही. आई माझी कशीबशी माझ्यासाठी या जंगलात जगली. तशा सगळ्यांच्याच आया कुठून कुठून पळवून आणलेल्या. आईची माया पोटचा गोळा म्हणून मिळते पण त्याबदल्यात आपण त्यांना काय देतो? हे सगळे बदलायला नको का?"

"टोळीतील लोक ऐकतील? आणि पोलिस? असे सहज सोडतील? "

"आपण गुरूजींशी बोलू. पण केव्हातरी हे संपायला हवे. गुरूजी म्हणाले, ते आपल्याला शेतीसाठी जमीन मिळवून देतील.. सन्मानाने जगायचे तर मेहनत लागेल. ती आपण तर करतोच. डाके नि दरोडे यांत मेहनत कमी थोडीच आहे? पण ती हव्या त्या ठिकाणी वापरू.. धोका तर पावलोपावली आहे. पण माझे येथे कोणी ऐकणार नाही. तुझे ऐकतील.."

"तसे गुरूजी म्हणतात ते खरे आहे.. ते मदत करतील तर हे बदलेल.."

"आणि गुरुदासपूरची गीता पण मिळेल बक्षीस म्हणून.."

समशेरच्या डोक्यात एक कीडा सोडून दिलदार दुसऱ्या दिवशीच्या तयारीला लागला. टोळीला शरण यायला लावणे ही फार मोठी गोष्ट होतीच. पण सध्या त्याहून मोठी गोष्ट होती ती कजरी सगळे समजल्यावर कशी काय वागते ते पाहाणे.. विचार करून करून तो उठला तो भर मध्यरात्री. आताच तिला काय ते सारे सांगणे गरजेचे. आजवरच्या चार शब्दी चिठ्ठ्यांची पद्धत मोडून तो सारे सविस्तर लिहायला बसला. सारे काही समजावून सांगितले की त्यानंतर कजरीने नाकारले तरी चालेल. पण खोटपणाच्या पायावर प्रेमाची इमारत नि इमारतीवरचे मजले चढवायचे नाहीत. त्यानंतर जे होईल त्याचा स्वीकार करायचा. कजरी मिळो न मिळो.. टोळीच्या शरणागतीचा प्रयत्न सोडायचा नाही..

चिठ्ठीत सारे लिहून झाले नि मन हलके होऊन दिलदार झोपला.. आज मनी वसे ते स्वप्नी दिसायची जागेपणी आठवण ही न झालेली, तरी स्वप्न पडलेच .. त्यात खुद्द संतोकसिंग कजरीच्या घरी आलेला. पुजारीबुवा कजरीचा हात दिलदारच्या हाती देत होते नि संतोकसिंग हवेत बंदुकीचे बार उडवत होता.. समशेर आणि बाकी टोळीकर शांतपणे हात जोडून बाजूला उभे राहून पाहात होते.. गुरूजी एकीकडे उभे राहून सगळे पाहात होते. बाजूला सगळ्यांच्या बंदुका जमिनीवर पडलेल्या.. स्वप्नच ते! त्यात काय दिसावे यावर कोणाचे बंधन तर नाहीच.

नदीकिनारी कजरी आज लवकरच येऊन बसली. पत्रलेखक कोण आणि पत्रदाता कोण? सगळे समोर घडणार होते. नक्की काय नि कसे घडणार याचीच तिला उत्सुकता होती..

दिलदार आज सायकलीवर पोहोचला..

"तुम्ही? एकटेच? नाही म्हणजे तो नाही आला?"

"आलाय.."

"कुठे आहे?"

"तुमच्या समोर कजरीदेवी.."

"तुम्हीच? तुम्ही पोस्टमन .."

"आणि 'तो' सुद्धा."

"म्हणजे? तुम्हीच पत्रलेखक?"

"हुं.."

"माझा अंदाज खरा होता.. असे कोण कोणाचे पत्र अशा खेपा मारत देईल .."

"हो ना.. मग तुमचा.. तुझा काय विचार आहे?"

"माझा विचार? बरे विचारलेस तू.. मी मात्र नंतर सांगेन .."

"नंतर म्हणजे?"

"म्हणजे नंतर.. सध्या मी फक्त तुझे ऐकणार आहे. तुझ्या त्या चार शब्दी चिठ्ठ्या मी एक एक करून वाचतेय. कसे जमते तुला लिहायला? म्हणजे सगळी एकामागून एक वाचली की एक अख्खे पत्र तयार होईल .. तुझ्या हरिनामपुरात मागे आलेले मी. गुरूजींना भेटायला. गुरूजी सांगत होते तुझ्याबद्दल.."

"काय?" दिलदारच्या आवाजातला कंप जाणवण्यासारखा होता.

"घाबरतोस कशाला? पोस्टमनच्या आयुष्याबद्दल वाईट सांगण्यासारखे काय असणार? तू काय कोणी चंबळच्या खोऱ्यातला डाकू आहेस की दरोडेखोर की तुझ्याबद्दल काही ऐकून मी घाबरून जावे?"

हाच तो क्षण. दिलदारला वाटले याच त्या क्षणी सारे उलगडून सांगावे .. अगदी सगळे. मग सारे त्या क्षणी संपले तरी चालेल. पण नकोच.. आज चिठ्ठी वाचेलच ती.. त्यानंतर पुढचे पुढे. तेवढाच एक दिवस तिची स्वप्ने पाहायला मिळेल..

"मी इथे लहानाची मोठी झाले. आई गेली. मावशी माझी आई सारखी आहे. तुला तर ठाऊक आहे ना ती.."

"मला?"

"मग? पहिल्यांदा पत्र द्यायला आलास तेव्हा मावशीने बोलावले होते.."

"तुझ्या अजून लक्षात आहे?"

"अर्थात. तुझ्या चेहेऱ्यावरच्या रेषा काही लपू देत नाहीत. मित्राची चिठ्ठी म्हणे. तुला काय वाटले? इतके दिवस मी अशीच भेटायला येत होते तुला? सायकलीवरचा पोस्टमन आवडला मला.. पण त्या बावळटाला वाटले मला काहीच कळत नाही! मागे म्हणाले ना.. बुद्धू आहेस तू.. साधासुधा नाही नंबर एकचा बुद्धू .. तुझे नाव मी बुद्धू राम ठेवणार आहे.. आणि तू अजून तुझे नाव तर सांगितलेच नाहीस?"

"उद्या सांगतो.. आज ही चिठ्ठी वाच.."

"चार शब्दी?"

"नाही काही. मोठे पत्र आहे.. वाच. मग उद्या विचार माझे नाव.."

दिलदारने पत्र तिच्या हाती दिले.

"हे बघ.. पत्रात काहीही असले ना तरी मी तुला उद्या भेटायला येईन.. अगदी काहीही असले तरी. तेव्हा मात्र तुझे नाव सांगशील ना.. स्वतः?"

"होय. पण उद्या येच .."

कजरी मनाशी हसली. पत्रात काय असावे तिला अंदाज होताच.. पण किती प्रामाणिकपणे सगळे लिहिले असावे याची उत्सुकता मात्र होती.

दिलदारचा आजचा उरलेला दिवस आणि आजची रात्र .. एवढी मोठी रात्र त्याने कधीच अनुभवली नव्हती.