Wachalas ressss wachalas! - 5 books and stories free download online pdf in Marathi

वाचलास रेsssss वाचलास ! - 5

'काल रात्री बन्याच्या टपरीला भेट देऊन आल्यापासून रक्षाच्या डोक्यात सतत काही ना काही वाईट विचार येत होते. अभिमन्यू ज्या विश्वासाने तिला तिथे घेऊन गेला होता, त्या नुसार काहीही माहिती हाती लागली नाही. उलट तिथे बन्या नावाचा कोणीही टपरीवाला दिसला नाही. जी एक टपरी त्याच जागेवर उभी होती, ती कुण्या जग्या नावाच्या बिहारी माणसाची होती. तो तर म्हणाला कि, ' त्याने दोन दिवसापूर्वीच नवीन टपरी चालू केली आहे, त्याआधी तिथे काहीही नव्हते. अगदी निर्जन अशी ती जागा...' कोणाच खरं आणि कोणाच खोटं? तिला काही समजेना.' काय करावं? याच विचारात ती असताना बाजूचा फोन खणाणला. अपेक्षित होत, त्याप्रमाणे पलीकडून अभिमन्यूचा आवाज आला.


" रक्षा, एक सांगायचं राहील, ती कथा, मी ज्या डायरीमध्ये लिहीत होतो ना, ती डायरी माझ्या फटफटीच्या डिक्कीत राहिली आहे." फोन उचलल्या उचलल्या तो पटकन बोलू लागला.

" अच्छा, मग त्याचं काय? "

" ती गाडी अजूनही त्याच घाटात आहे, जखनीची वाडी आहे तिथे. "

" तुला काय करायची आहे ती गाडी, आणि ती डायरी? जाऊदे ना. का फिरून-फिरून परत तिथेच जातोस? "

" ऐकतेस का? जर मी लिहितो ते खरं होत असेल, तर मीच माझ्या या कथेचा शेवट करून मोकळा होतो ना. म्हणजे ही कहाणी कायमची दि एन्ड होईल. "

" म्हणजे तू तुझ्या कथेच्या पुढील भागात ती जी कोण बाई होती तिचा शेवट लिहिलास तर ती कहाणी संपेल? आणि...." आत्ता रक्षाला त्याचा मुद्दा समजू लागला होता.

" आणि या दृष्टचक्रातून माझी सुटका निश्चित... माझ्या सोबत त्या सलीमची ही सुटका." तो अतिउत्साहाने बोलून गेला.

" अभि, तुला वाटत असं होईल? शक्य आहे? "

" सध्या याव्यतिरिक्त दुसरं काहीही माझ्या हातात नाहीय. प्रयत्न तरी करून बघतो. काय म्हणतेस?"

" होय, बरोबर आहे तुझं. कर ना मग, आजच सुरुवात कर."

" होय, पण त्या डायरीसाठी ती माझी फटफटी परत इकडे घेऊन यावी लागेल. " त्याचा आवाज किंचित चिंताजनक होता.

" दुसऱ्या डायरीत लिहू शकतोस ना? " रक्षा आश्चर्याने म्हणाली.

" नाही. जे जिथून सुरु होत तिथेच येऊन संपत. ती कथा अजून क्रमश आहे, तिला पूर्णविराम मिळाल्यानंतरच तिचा शेवट होईल. वेगळ्या डायरीमध्ये सुरु करून नाही चालणार. "

" काय बडबडतोयस? आज सकाळ सकाळ बाटली घेऊन बसलायस ना ? "

" तुला नाही समजणार. सांगेन पुन्हा केव्हा तरी. "

" मरणाच्या दारातून तू परत आलास, पुन्हा तिथेच जायचं म्हणतोस. वेड लागलाय का तुला. "

" प्लिज, तुझ लेक्चर पुन्हा चालू करू नको. आणि मला तुझी मदत हवी... शेवटची समज. पुन्हा नाही त्रास देणार."


" नाही. मी तिथे येणार नाहीय. आणि तुला सुद्धा जाऊ देणार नाही. नको ती डायरी आणि मारो तुझी अर्धवट कथा. " रक्षा जवळजवळ ओरडलीच. आणि तिने लागलीच फोन कट केला.

' रक्षा एक पोलीस अधिकारी, सहसा कोणावर विश्वास ठेवत नाही. मग त्या ठिकाणी जायला ती स्पष्टपणे नकार का देते? याचाच अर्थ तिला त्या ठिकाण बद्दल काहीतरी धागेदोरे सापडलेत.' चाणाक्ष अभिमन्यूच्या हे लगेच लक्षात आले. घडलेली घटना पुन्हा-पुन्हा क्रमाने उजळणी करत तो त्याचावर तर्क-वितर्क लावत बसला.

*****

'कडे रक्षा अगदी पहाटे ५ च्या सुमारास वेष बदलून निघाली. कारणही तसेच होत. अभिमन्यूने सांगितलेल्या त्या घटनेवरून शोध घेताना, बरीच माहिती हाती लागली होती. सात वर्षापूर्वी त्याच गावात त्या स्टेशनवर एक मालगाडी उलटून पन्नास एक कामगारलोक जागीच ठार झाले होते, मालगाडी स्टेशनच्या इमारतीवर कोसळली आणि स्टेशन देखील नेस्तनाबूत झाले. रुग्णालयात दाखल झालेले कामगार आणि अधिकारी अक्षरशः वेडे झाले होते. त्याच्यावर कोणतेही उपचार लागू पडत नव्हते. बरं, ती मालगाडी का उलटी झाली? याचे कारण देखील अद्यापही कोणाला समजले नाही. तेव्हापासून ते स्टेशन कायमचे बंद आहे. सात वर्षात तिथें एकही ट्रेन ये-जा करत नाही. तसही तो गाव कमी लोकवस्तीचा, त्यामुळे स्टेशनची आवश्यकता नाहीच, पण त्याकाळी तिथे निवडून आलेल्या नेत्याने आग्रहाने ते स्टेशन बांधून घेतले होते. आता एवढी वर्ष ते बंद आहे.'

'ज्यामुळे रक्षाची झोप उडाली होती. ती सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे, अभिमन्यूने त्याच्या कथेत लिहिलं कि त्यादिवशी तिथून शेवटची १२:४० लोकल निघाली. आणि ती तरुणी त्याच लोकल ने आली होती. म्हणजे मृतआत्मे सुद्धा ट्रेनने प्रवास करतात ? की रिकाम्या ओसाड ठिकाणावर त्यांचे साम्राज्य असते? आणि याने निव्वळ कथा लिहिली म्हणून तिथून लोकल आलेली त्याला दिसली? कारण मागील काही दिवसात तरी कोणत्याही वृत्तपत्रात तिथे पुन्हा स्टेशन सुरु झाल्याची बातमी आलेली नाही. हा काय प्रकार आहे. हे तिच्याही डोक्यात येईना. '

' या तपासामध्ये तिच्या हाती अजून एक माहिती लागली होती. ती म्हणजे, गेली सात वर्षे ते ठिकाण, स्टेशन ते तो नदीघाट, हे हॉंटेड म्हणून घोषित करण्यात आले होते. नेट वरती त्याचे बरेच किस्से विख्यात होते. रात्री १२ नंतर त्याठिकाणी कोणीही जात नसे. आणि चुकून त्या रस्त्याने प्रवास करणारे तिथेच गायब होऊन जातात. बऱ्याच लोकांनी यावर लेख, ब्लॉग्स वगैरे लिहिले होते. तिथे नक्की काय आहे, आणि त्याचा अभिमन्यूशी काय संबंध, याचा छडा लावण्यासाठी ती तयार झाली होती. त्याआधी एकदा सलीम आणि अभिमन्यूला भेटणे अनिवार्य होते. म्हणून तयारी करून ती बाहेर पडली.'

*****

क्रमश:
©सर्व हक्क लेखिकेस्वाधिन
https://siddhic.blogspot.com

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED