पाऊसः आंबट-गोड! - 1 Nagesh S Shewalkar द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पाऊसः आंबट-गोड! - 1

(१)

आषाढ महिन्याची सुरवात झाली होती. पहिल्याच दिवशी सकाळपासूनच रिमझिम पाऊस सुरु झाला होता. मस्त थंडगार, हवेहवेसे वातावरण होते. मी भिंतीवरच्या घड्याळात पाहिले. चार वाजत होते.सेवानिवृत्त माणसाला दुपारच्या चारचे एक वेगळे आकर्षण असते ते म्हणजे चहा! कुणासाठी प्राणप्रिय, कुणासाठी अमृततुल्य तर बहुतांश लोकांना हवाहवासा असा! त्यातच जर वातावरण पावसाळी असेल तर मग हमखास चहा हवाच असतो. त्यामुळे जसजसा काटा चार या अंकाकडे सरकत होता तसतशी माझी तगमग, अस्वस्थता, चुळबूळ वाढत होती कारण अजूनही सौभाग्यवतीने स्वयंपाक घरात प्रवेश केला असल्याचे जाणवत नव्हते. कदाचित वातावरणाचा परिणाम असल्यामुळे त्यांचा शयनगृहातील मुक्काम काही मिनिटांसाठी वाढला असण्याची दाट शक्यता होती. ही शक्यताच मला बेचैन करत होती. जसा 'बुडत्याला काडीचा आधार..' तसा 'बेचैन निवृत्त मानवाला टीव्हीचा आधार' याप्रमाणे मी टीव्ही सुरु केला आणि माझी गाण्याची आवडती वाहिनी सुरु केली. वाहिनीवर माझे आवडते गाणे लागले होते. तेही त्या वातावरणाला साजेसे असेच होते. पावसात चिंब भिजलेल्या अवस्थेत झिनत अमान गात होती...
          तेरी दो टकियों के नोकरी मे
          मेरा लाखों का सावन जाए
          हाय हाय ए मजबुरी।
मी मंत्रमुग्ध होऊन, देहभान विसरून ते गाणे ऐकत होतो, पहात होतो. महाविद्यालयीन जीवनापासून हे गाणे माझ्या अत्यंत आवडीचे होते. कितीही कामात असलो तरीही ते काम बाजूला सारुन मी हे गाणे ऐकत असे. काही क्षणातच गाणे संपले आणि मी एक उसासा टाकत असताना सौभाग्यवतीचे आगमन झाले.
"काय बाई पाऊस पडतोय, सकाळपासून दम नाही."
"अग, आषाढ महिना म्हणजे भर पावसाळी महिना! पाऊस तर पडणारच ना.पण खरे सांगू का, वातावरण किती मस्त तयार झाले आहे ना, अशा वातावरणात ना चहासोबत..."
"काही नाही. फक्त चहाच मिळेल. गरमागरम भज्यांचा सोस आता पुरे झाला. काल डॉक्टर काय म्हणाले ते माहिती आहे ना?"
"अग, डॉक्टर पथ्य पाळा, अवपथ्य करु नका असेच सांगणार ना? ते थोडीच वर्ज्य असलेले खायला सांगणार... मी काय म्हणतो एखाद्या वेळी थोडे अचरबचर खाल्ले तर काही आभाळ कोसळणार नाही..." मी बोलत असताना बाहेरून आवाज आला,
"आहेत का कविवर्य?" शेजारच्या तात्यांचा आवाज ऐकून मी म्हणालो,
"या. या. तात्या या."
आत येत तात्यांनी विचारले, "मी अयोग्य वेळी तर आलो नाही ना?"
"तात्या, वेळ कधीच अयोग्य, चुकीची नसते. उलट तुम्ही अगदी वेळेवर आलात..."
"म्हणजे? बरे, आधी आषाढ दिनाच्या एक कवी म्हणून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा! आलो याच कारणासाठी आणि विसरलो तर जाईन तसाच निघून. ती तुमची योग्य वेळ काय ते आता सांगा..."
"अहो, आषाढ मास आज सुरु झालाय, बाहेर रिमझिम पाऊस पडतोय, त्यात तुमचे आगमन झाले म्हणजे..." असे म्हणत मी सहेतुक पत्नीकडे पाहिले. तशी ती हसतच म्हणाली,
"आज कालिदास दिन म्हणजे कविमहाशयांना गरमागरम भज्याची मेजवानी द्यावीच लागेल..."
"आणि त्यात अशा मोसमात तात्यांची साथ असल्यावर भजे तो बनते ही है।..." असे म्हणत मी तात्यांच्या दिशेने हात पुढे केला. तात्यांनी लगेच टाळी दिली. तशी बायको हसतच आत गेली...
"असा मोसम म्हटला की, अगदी बालपणाच्या आठवणी दाटून येतात..."
"अशा कोणत्या आठवणी ताज्या होतात तात्या?"
"एक आहेत का सांगायला? ते म्हणतात ना, पहिले प्रेम विसरल्या जात नाहीत..."
"अच्छा! म्हणजे पहिल्या प्रेमाच्या आठवणी जाग्या होतात का?"
"अहो, तसे काही नाही. तुम्ही कवी मनाची माणसं. शब्दात पकडायला भारी. मला असे म्हणायचे होते की, पहिल्या प्रेमाप्रमाणे बालपणीच्या आठवणी कायम घर करून असतात हो. माझे वडील शिक्षक होते. आम्ही दोघे भाऊ! बाबा नोकरी करीत असलेली  शाळा तालुक्याच्या ठिकाणापासून बारा किलोमीटर अंतरावर होती. बाबा दररोज पायी जाणे-येणे करीत..."
"तात्या, दररोज चोवीस किलोमीटर पायी चालणे म्हणजे ज्योक नाही बरे."
"हो ना. त्यामुळे बाबा घरी असले की आमची मजा असे. पावसाळा सुरू असला आणि रात्री जोरदार पाऊस झाला की बाबा शाळेला जात त्या रस्त्यावर दोन तीन ओढे होते ते भरुन वाहायचे त्यामुळे बाबांना शाळेत जाताच येत नसे..."
"अहो, तात्या जातानाचे ठीक आहे. घरी राहता येईल परंतु बाबा शाळेत पोहोचल्यावर पाऊस आला की मग कसे होई?" मी विचारले.
"मग शाळेतच मुक्काम करावा लागे..."
"अवघडच होते म्हणायचे सारे."
"हो ना. सकाळी सकाळी पाऊस सुरु झाला की त्या आवाजाने आम्ही जागे होत असू परंतु गारवा असल्यामुळे उठावे वाटायचे नाही. मग आई म्हणायची, अरे, उठा. बघा तर कसा मस्त पाऊस पडतोय. असे ऐकले की, आम्ही ताडकन उठून दारात येत असू. आमच्या घरासमोर असलेले मैदान पाण्याने भरुन गेलेले असे. कधी कधी जोरात पाऊस पडत असे. तितक्यात बाबा म्हणायचे, अरे, पावसात जाऊ नका. बाबांचा आवाज ऐकला की आम्हाला खूप आनंद होई.बाबा पांघरुण घेऊन बसलेले असत. आम्हीही पळत जाऊन त्यांच्या पांघरुणात जाऊन दडी मारत असू..."
"खरेच. खूप छान अनुभूती आहे."
"आम्हाला अचानक आठवण येई आणि आम्ही परीक्षा झाली की, फाडून ठेवलेले वह्यांचे कागद आणून बाबांना देत असू. बाबा त्या कागदांपासून छान होड्या बनवून देत. मग आम्ही पळत जाऊन त्या होड्या पाण्यात नेऊन सोडत असू. त्या होड्या हेलकावे जात असल्याचे पाहून खूप खूप आनंद होई. होड्या दूर गेलेल्या दिसताच पुन्हा घरात येऊन बाबांकडून पुन्हा होड्या घेऊन बाहेर येत असू. असे एक-दोन वेळा झाले की, मैदानात शेजारची मुले खेळायला यायची मग आम्ही होड्या पाण्यात फेकून पळत जात असू. तिथे मग काय धम्मालच धम्माल! एकमेकांच्या अंगावर पाणी उडवणे काय, चिखल फेकणे काय सारी मज्जाच मज्जा! नखशिखांत भिजलेल्या, चिखलाने भरलेल्या अवस्थेत कुस्ती, कबड्डी असे खेळही खेळत असू. थोड्या वेळाने आईचे एकामागोमाग एक आवाज येत असत. मग नाइलाजाने घरी जावे लागे. कधी रागाने, कधी त्रागा करीत, कधी रुसून घरी परतले की मात्र सारे काही रफूचक्कर होत असे..."
"का बरे? असे काय होत असे?"
"भजे! गरमागरम भजे!! आई, बाबांना अर्थात आम्हालाही गरमागरम भजी आवडायची. पहिला पाऊस सुरू असताना भजे ठरलेलेच असत. त्यामुळे पुन्हा बाबांच्या मांडीवर बसून भजे खाताना येणारी मजा अवर्णनीय!"
"खरे आहे तात्या! आमच्याकडे इतकी मजा नसायची कारण माझे बाबा कारकून असल्याने आम्हाला शहरात आणि त्यातल्या त्यात फ्लॅटमध्ये राहावे लागले. त्यामुळे तुमच्यासारखी मस्ती करायला मिळाली नाही."
"फार मजा येत असे. पाऊस थांबला नि मैदानावरील पावसाचे पाणी वाहून गेले की, पुन्हा चिखलात खेळायची मजा न्यारीच असे. बाहेर जाऊन पाहिले की, पाणी वाहत जाताना एक मोठी भेग पडलेली असे आणि दोन्ही बाजूला चिखल, वाळू साचलेली असे. ते सारे एकमेकांच्या अंगावर उडवताना खूप मजा येत असे."
"खरे आहे. बालपणी अशी मजा करणे भाग्याचेच..." असे म्हणत मी टीव्ही सुरु केला. टीव्हीवर चोवीस तास सुरु असलेल्या एका वाहिनीवर 'मोहरा' चित्रपटातील रविनाने गाजवलेले गाणे लागलेले होते...
        टिप टिप बरसा पानी
       पानी ने आग लगाई।
"व्वा! कविराज, काय गाणे लागलेय हो. या गाण्याने तेव्हा कहर माजवला होता. असली गाणी फार आवडायची बघा. पण आता..."
"तात्या, 'पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा...' अहो, मानवाचे मन नेहमी हिरवे असते बघा. असा निराशावाद का बरे?..." मी बोलत असताना आमच्या बायकोबाई गरमागरम भज्यांच्या प्लेट घेऊन आल्या नि आमच्या चर्चेला विराम मिळाला. वाहिन्यांच्या भाषेत एक कमर्शिअल ब्रेक!
"व्वा! व्वा!! वहिनी, काय खमंग भज्यांची मेजवानी केलीत हो. खरे सांगू का, तुम्ही भजे तळत असताना येणारा घमघमाट न खाताही भज्यांची चव सांगत होता. कविराज, भाग्यवान हो तुम्ही!"
"तात्या, भाग्यवान म्हणा की काही म्हणा पण अशा खमंग, चमचमीत खाण्यामुळे अनेक आजार मुक्कामाला आलेत हो. पण खरेच आमच्या मंडळीच्या हातचा कोणताही पदार्थ एकदम चविष्ट. आजार होण्यासाठी ती नाही तर मी जवाबदार आहे. चांगले झाले म्हणून कितीही खायला नको होते हो..." मी बोलत असताना पुन्हा सौ. भजे घेऊन आलेली पाहताच तात्या म्हणाले,
"वहिनी, मोसम चांगला असला, भजे किंवा जेवण कितीही चविष्ट झाले असले तरीही पोट सांभाळायला हवे नाही तर मग त्याचा आकार बदलतो."
"घ्या. भाऊजी, चार पाच घ्या.." असे म्हणत तात्यांच्या प्लेटमध्ये सहा-सात भजे टाकून सौभाग्यवती माझ्याकडे बघत हसत हसत आत जायला निघाली तसे आम्ही दोघे हसत सुटलो. बाहेर पुन्हा पावसाने 'मुसळधार' रुप धारण केले होते…

००००