दिलदार कजरी - 21 Nitin More द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

दिलदार कजरी - 21

२१.

कजरी कथा

कजरीने हरिकथा कथन करण्

त्या दिवशीची गोष्ट. त्या संध्याकाळी हरिनाथ गुरूजी घरी आले. मी एकटीच होते. सगळे बाहेर कुठे गेलेले. गुरूजी चालत आलेले. थकून गेलेले. गावाबाहेर बस येते तिकडून पायी आलेले तर थकणारच ना.

"गुरूजी तुम्ही? किती वर्षे झाली.."

"हो पोरी. कामच तसे निघाले म्हणून आलो."

"काम? आणि या गावात?"

"गावात नव्हे पोरी."

"मग?"

"तुमच्या घरी."

"पण सगळे बाहेर गेलेत गुरूजी. रात्री पर्यंतच येतील."

"बरे झाले. काम तुझ्याकडेच आहे."

"माझ्याकडे?"

"ऐक. नीट लक्ष देऊन ऐक."

"होय गुरूजी."

"मी कालच सुटलो.. तिकडून सुटलो नि तडक इकडे आलो."

"सुटलात? कुठून गुरूजी?"

"त्या बाजूला तुला ठाऊक आहे. रामगढ गाव आहे. सारा डोंगरदऱ्याचा प्रदेश. नि तिथे राज्य आहे ते संतोकसिंग टोळीचे. सारी गावे त्याच्या नावानेही चळाचळा कापतात."

"ऐकून आहे गुरूजी. गावातील सारेच घाबरतात त्या डाकूंना."

"त्याच टोळीने मला पळवून नेले. अपहरण. ते ही माझ्यासारख्या एका मास्तराचे."

"बाप रे! मग? आता बरे आहात तुम्ही?"

"मी धडधाकट आहे. मला काहीच झाले नाही .. म्हणजे त्यांनी काहीच केले नाही."

"मग ते अपहरण?"

"खरे सांगतो, मला त्यांनी काहीच केले नाही. उलट एखाद्या पाव्हण्यासारखी बडदास्त ठेवली.."

"त्या डाकूंनी?"

"नाही. त्यातील दोघांनी. एक संतोकसिंगाचा मुलगा, दिलदारसिंग. आणि दुसरा समशेरसिंग."

"मग कशाला ते पळवून नेले .."

"तेच सांगायला आलोय पोरी."

"मला?"

"ऐकशील तेव्हा सारा उलगडा होईल बेटी. ती संतोकसिंगाची टोळी म्हणजे जहाल नि खूंखार डाकू अगदी. दहशत आणि भीती चोहीकडे पसरवावी नि बंदुकीच्या नळीच्या जोरावर राज्य करावे. पण त्यात हा दिलदार नामक दिलदार पोरगा सापडला मला.."

"संतोकसिंग डाकूचा मुलगा .. आणि दिलदार?"

"तीच खरी गोष्ट आहे पोरी. दिलदार त्या टोळीत राहतो कारण तो तिथेच जन्मला. तो नावाप्रमाणेच दिलदार आहे. ह्या डाक्यादरोड्यांत तो भाग घेत नाही. म्हणजे समशेर तसा दरोडे आखतो.. बंदुका घेऊन फिरतो. पण हा दिलदार नाही. दिलदारने मला स्वतःच सांगितले, त्याने आईला तसे वचन दिले, ते ही मनातल्या मनात .. ती मरणाला टेकलेली असताना. टोळीतील कोणाला सांगितले नाही त्याने, पण तो वचन पाळतो. अगदी पक्ष्यापाखराचीही शिकार बघवत नाही त्याला."

"पण मग तो डाकूंच्या टोळीत?"

"तिकडून तो कुठे जाणार बेटी? आजवर वीस बावीस वर्षे तिथेच गेली. आता कुठे जाणार नि कसा जाणार?"

"पण तुमचे अपहरण .. त्याच्याशी याचा संबंध?"

"आहे. संबंध आहे. अगदी जवळून आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे तुझ्याशीही आहे.."

"माझा संबंध आणि डाकूंच्या टोळीशी?"

"ऐक. हा दिलदार गावोगावी भटकत असतो. त्यात त्याला एकदा तू दिसलीस. प्रथम दर्शने प्रेमपात: म्हणजे तुझ्या प्रेमात पडून प्रेमात वेडा झालाय दिलदार."

"मग?"

"पण तुझ्यापर्यंत पोहोचणार कसा?"

"कसा?"

"त्यासाठी सारा खटाटोप.."

"म्हणजे काय गुरूजी?"

"त्यासाठी एकामागून एक डोक्यात कल्पना आल्या त्याच्या डोक्यात. आणि त्यासाठीच माझे अपहरण .."

"तुमचे अपहरण? त्यासाठी? हा गुंता काही कळत नाही गुरूजी .."

"अगं, तुझ्यापर्यंत पोहोचायचे म्हणून तो पोस्टमन बनून येणार आहे. पत्र देण्याच्या बहाण्याने. पोस्टमन म्हटले तर कोणी हाकलून देणार नाही."

"मग?"

"पण पोस्टमनला कमीत कमी लिहिणे वाचणे तर यायला हवे. जंगलात सारे एकजात निरक्षर. त्यांना शिकवण्यासाठी कोण? म्हणून मग मला गावातून उचलले. सायकलीसकट. लिहिण्यावाचण्या बरोबर सायकल ही शिकला कारण डाकिया सायकलीवर येतो नि डाकू घोड्यावर! तर मी महिनाभर त्याला शिकवले ते लिहिणे वाचणे आणि सायकल चालवणे."

"बापरे!"

"बापरे काही नाही. पोरगा तसा हुशार आहे. महत्वाचे म्हणजे मनाने निर्मळ आहे. आणि सध्या मात्र कामातून गेला आहे.."

"कामातून गेलेला?"

"अगदी. तुझ्या पायी वेडा झालाय तो. हे वयच वेडं असते पोरी."

"बापरे! मला पळवून नेणार की काय? म्हणून सावध करायला आलात?"

"नाही पोरी. तो तसा नाही. मला म्हणाला, काही झाले तरी इतरांसारखे कोणालाही पळवून आणणार नाही. तुझे मन जिंकले तर ठीक. नाहीतर इलाज नाही. पण त्यासाठी हवे ते प्रयत्न करणार तो.."

"म्हणजे?"

"म्हणजे? अगं तो उद्या परवा कधीतरी येईल. पोस्टमन बनून.."

"मग?"

"काही नाही. समजून घे, तो डाकिया डाकू दिलदारच असणार आहे.. डाकू खरेतर नाहीच तो. मुलगा खरोखरीच चांगला आहे. उद्या आला तर पारखून घे.."

"मी? म्हणजे?"

"तुला आवडला तर पुढे जा. नाहीच आवडला तर सोडून दे."

"हुं."

"पण एक ध्यानात घे.. तो आवडला तुला तर तुझेच नाही त्याचेही सारे जीवन बदलून जाणार आहे."

"हुं..'

"त्यातून शक्य झाले तर संतोकसिंगाच्या टोळीस शरण आणता येईल, म्हणजे इथला आतंक संपवता येईल हा अजून एक फायदा.. आणि एक ध्यानात घे. आपल्या सारख्यांच्या घरी शंभरात पंचाण्णव तरी साधीसरळ मुले निघतात. का? कारण तसे संस्कार मिळतात. आईबापांस पाहून मुले शिकतात. त्या बंदुकीच्या राज्यात राहूनही दिलदार मनाने असा राहिला.. प्रत्यक्ष त्याचा बाप सरदार आहे टोळीचा. आणि हा असा. हे जास्तच कौतुकास्पद नाही का? त्याला थोडी कोणी मदत केली त्याची बाजू समजून तर अख्खे एक आयुष्य बदलून जाईल. पण हे सर्व तुला तो आवडला नि मान्य असेल तर आणि तरच. तुझ्या इच्छेविरूद्ध नाही. तू तुझी आवड निवड सोडून बलिदान म्हणून त्याची निवड करावीस असे बिलकूल नाही. फक्त दिलदारच्या पार्श्वभूमीची माहिती आधीपासून असावी तुला म्हणून सांगायला मुद्दाम आलो. दोन्ही पोरांनी जंगलात सांभाळले मला. परत सोडताना डोळ्यांत पाणी आले त्यांच्या. माया नि प्रेम काय असते आजवर पाहिलेच नाही त्यांनी. त्याला जमले तर प्रेम दे."

"गुरूजी, तुम्ही सांगता म्हणजे त्यात काहीतरी अर्थ जरूर असणार. मी तुमच्या मुलीसारखी. इतक्या लांबवर तुम्ही आलात ते कोणाची तरी आयुष्ये सुधारावीत म्हणूनच ना. मी उघड्या डोळ्यांनी पाहेन सारे. आणि त्याची पारख करेन."

"कर बेटा. तू हुशार आहेसच. समजदार ही आहेस. आता यापुढे काय होईल ते सांगू शकत नाही मी. पण मार्ग कठीण आहे. दिलदार तुला आवडला तर खरे प्रश्न सुरू होतील. पण शुद्ध प्रेमापोटी नि हेतू निर्मळ असेल तर.. मार्ग तर निघणारच. प्रेमाची गंगा वाहत सुटेल तर सारे अडथळे आपोआप पार होत जातील. त्यात काही आयुष्ये उजळून निघतील."

"पण गुरूजी माझ्या घरचे..?"

"तो पुढचा प्रश्न पोरी. त्या आधी सोडवण्याचे कितीतरी प्रश्न आहेत. तू काही दिवसांनी मला तुझा निर्णय कळव. लक्षात घे, येणारा पोस्टमन हा डाकिया नसून डाकू असेल. सारे समजून उमजून निर्णय घे. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तसा मी दिलदारच्या पाठीशीही राहणार आहे. एक आयुष्य बिघडण्याऐवजी घडले तर आयुष्यात पुण्य गाठीशी बांधले जाईल."

"गुरूजी, तुमच्याकडेच शिकलेय मी. तुमची शिकवण अशी सहज विसरणार नाही. मी तुमच्या बरोबर आहे.."

कजरीची हरिनाथ मास्तरांची कथा ऐकवून झाली.. कजरी दिलदार कडे पाहात होती. दिलदार आनंदी दिसण्याऐवजी त्याच्या डोळ्यांत पाणी होते. गुरूजींसारखे कोणी पाठीवर हात ठेऊन उभे आहे.. कळत्या वयातला असा अनुभव पहिलाच. नि सारे समजून उमजून साथ द्यायला तयार असणारी ही वेडी कजरी.. एकाएकी त्याला आपल्या जबाबदारीची जाणीव झाली. आजवर त्याला हवी होती ती कजरी त्याला साथ द्यायला तयार होती. आता तिच्यासाठी त्याला बदलावे लागणार होते. नवीन आयुष्य सुरू करावे लागेल. ते सोपे नाहीच. त्यात संघर्ष मोठा. पण तो करणे भाग आहे. ते ही एकवेळ पार पडेल, पण त्याहूनही कठीण म्हणजे पूर्ण संतोकसिंग टोळीची शरणागती. आणि पोटापाण्याचा नवीन व्यवसाय .. पोस्टमनची नोकरी खरोखरीची मिळणार नाही .. मास्तरांना भेटायला हवे.. पुढे काय? फक्त शुद्ध बीज आहे, प्रेम निखळ आहे, त्या पोटी येणारी फळे रसाळ आणि गोमटीच असणार! प्रत्यक्ष गुरूजींचे सांगणे आहे हे!