दिलदार कजरी - 23 Nitin More द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • आर्या... ( भाग ५ )

         श्वेता पहाटे सहा ला उठते . आर्या आणि अनुराग छान गाढ झोप...

  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

श्रेणी
शेयर करा

दिलदार कजरी - 23

२३.

कजरीचे निशा दर्शन!

हरिनामपुरात आज सकाळ सकाळीच गडबड दिसत होती. एरवी अजगरासारख्या सुस्त असलेल्या गावात काहीतरी गजबज दिसत होती. मातीचे रस्ते होते पण ते झाडलोट करून स्वच्छ केलेले दिसत होते. जागोजागी पोलिसांची गस्त दिसत होती. ते पाहून समशेर सावध झाला.

"दिलदार, मागच्या रस्त्याने जाऊ. काहीतरी गडबड दिसतेय .." तो म्हणाला नि दोघांनी रस्ता बदलला. मास्तरांच्या घराजवळ जाणारा एक पाठचा रस्ता त्यांनी पकडला. त्यांच्या घराजवळ आले तर तिथेच गाड्यांचा ताफा उभा होता. मास्तरांच्या घरात कुणीतरी आलेले दिसत होते.

"बहुतेक सरकारी गाडी आहे. गुरूजींकडे कशी?"

"पोलिस बघ किती आहेत.. त्या खिडकीतून बघ.. हळूच. कोण कोण आहेत..?"

समशेर जवळच्या झाडावर चढून वरच्या खिडकीतून आत पाहू लागला. त्याचा विश्वास बसेना.. मास्तर आणि अजून दोघे पांढऱ्या कडक इस्त्रीच्या कपड्यातील कोणी होते नि त्यांच्याबरोबर होता तो चक्क सरदार संतोकसिंग ..

समशेर खाली उतरला..

"दिलदार, सरदार आहेत आत. सरदार संतोकसिंग."

"काय सांगतोस?"

"खरंच. गुरूजींकडे काय काम असेल?"

"कोणास ठाऊक."

"आणि ते पांढऱ्या कपड्यातले लोक. मंत्री वगैरे कुणीतरी असणार. काय करत असतील?"

"मी सांगू, गुरूजी नक्कीच काहीतरी प्रयत्नात असणार. निवडणुकीची वेळ जवळ येतेय. मला म्हणालेले, राजकारणाचा उपयोग करून घेऊ.. म्हणजे डाकूंच्या टोळीची दहशत संपवता येईल.. नक्कीच काहीतरी शिजतेय.."

"शिजतेय? खिचडी? मग आपण थांबूया की निघूया? काहीतरी शिजतेय म्हणालास.. खाऊनच जाऊया."

"तुला अशावेळी गंमत सुचतेय.. इथे जीवनमरणाचा प्रश्न आहे .."

"भातवरणाचा नाही? जीवनमरणाचा? असं म्हणतोस? मग निघूया. हे सारे गेले ना तरी लोकांचे लक्ष गुरूजींच्या घराकडे असणार. त्यात आपण आलो हे कोणाला कळले तर उगाच गोंधळ .. विशेषतः सरदारांना. आपण नंतर येऊ."

दोघे परत निघाले. कजरीच्या गावाला वळसा घालून समशेर निघू पाहात होता ..

"आता त्याची गरज नाही समशेर. किल्ला आधीच सर केला आहे मी. आता जाता येता ती दिसली तर बरे वाटेल. की गुरुदासपुरावरून जाऊया.. बोल."

"कसलं काय रे. तुझे बरेय. तुला माझ्यासारखे दोस्त मिळाले, कोणाकोणाला पळवून आणायला. माझे तसे नाही ना.."

दिलदार यावर काही बोलणार तोच समशेर पुढे म्हणाला,

"दिलदार, मला वाटतेय गुरूजी सरदारांना थेट सांगत असणार शरणागती बद्दल. ते जे कोण मोठे पुढारी होते बरोबर, त्यांच्याशी बोलणे झाले असणार. निवडणुका म्हटले की माणूस नरम पडतो."

"लोखंड गरम झाले की कसे नरमते तसे. तोवरच त्यावर घाव घातला तर हवा तसा आकार देता येतो. गुरूजी भेटतील ना तेव्हा काय ते समजेल. असे असेल तर बरेच होईल. म्हणजे कजरी आणि मी.."

"इकडे सगळ्यांचा जीवनमरणाचा प्रश्न आहे नि तू रघुपति राघव कजरी कजरी जपत बसलायस.."

"माझ्यासाठी तोच आहे जीवनमरणाचा प्रश्न. तू नाही समजणार. अजून तुला गीताभाभी भेटली नाहीए ना. भेटेल तेव्हा कळेल.."

"तुला ते कळण्यासाठी मेहनत मात्र आम्ही घेतलीय.."

"हुं. खरंय ते. पण तरीही या गोष्टींसाठी एक हुशारी लागते बरं. एखादीवर आपली छाप सोडणे नि तिला आपण आवडणे.. कोणाला पळवून आणण्याइतके सोपे नाही.."

"कृतघ्न आहेस रे.. अजूनही तुझ्या प्रकरणात, नव्हे प्रेमप्रकरणात कितीतरी धडे लिहिणे बाकी आहे. आता ये तर मदत मागायला .."

"एक करूया.. तुझ्या गीता प्रकरणावर बोलूया. म्हणजे हा तुझा राग निघून जाईल.."

गुरूजींशी बोलणे झाले नाही, पण कजरीशी झालेले बोलणे दिलदार मनात परत परत आठवत होता. तो आणि त्याची आई. त्या जंगलात ती रहायची, पण तिला फक्त दिलदारची काळजी होती. ती खूप बोलायची आणि खूप काही सांगत नि शिकवत असायची. एकदा म्हणालेली,

"दिलदार, बाळा तुझं नाव ठेवलं ना या जंगलात तेव्हा मला खूप वाटत होतं.. तुला श्रीकृष्णाचे नाव ठेवावे म्हणून."

"श्रीकृष्णाचे?"

"होय.. हरिलाल किंवा हरिशरण. पण सगळे म्हणाले अशी नावे नसतात आपल्याकडे. देवादिकांची नावे वगैरे घ्यायला ठीक पण आपल्या नावात कसा जोर असला पाहिजे. एक भारदस्तपणा पाहिजे. मग सगळ्या टोळीतील लोकांनी तुझं नाव दिलदार ठेवलं. दिलदारसिंग."

"तुला नाही आवडत?"

"मला? मला तू आहेस तसा आवडतोस. एक तूच तर आहेस जो मला आवडतो.. माझा बाळ तू.."

असे म्हणत शिकवायची ती.. संतोकसिंग मोहिमेवर निघाला की लपवून ठेवलेली पाटीपेन्सिल नि गोष्टींची पुस्तके बाहेर काढायची. तिला राजस्थानच्या गावातून पळवून आणलेले म्हणे. मध्ये कधीतरी कोणी गावातून चुकून भेटायला येणार होता तर ही पुस्तके तिने मागवून घेतलेली. संतोकसिंगाचा डोळा चुकवून ती दिलदारला गोष्टी सांगायची. नदीवर दिलदारला घासूनपुसून अंघोळ घालून आणले की दिलदार गोंडस दिसायचा. अशावेळी संतोकसिंग चिडायचा. डाकूच्या पोराने कसे रगेल आणि रंगेल दिसायला हवे. शहरी बाबूसारखे रूपडे काय कामाचे? पण आईला त्याने संतोकसिंगशी कधीच वाद घालताना पाहिले नव्हते, तो मोहिमेवर गेला की आपल्याला हवे ते ती करायची. तो काळ असा की टोळी ऐन भरात होती. संतोकसिंगचा पाय एका ठिकाणी टिकत नसे. दहशतीचे नवे नवे मार्ग तो शोधत असायचा, त्यात त्याला आपल्या तंबूत रहायला वेळ कसला मिळायला. तो गेला की त्याची आई गाणं गुणगुणत दिलदारला अभ्यासाला बसवे. लपवलेली पुस्तके बाहेर काढे. तिने त्याला प्रार्थना शिकवलेल्या. लिहायला शिकवलेले. दिलदारलाही ते शिकणे आवडायचे. अर्थात आई होती तोवरच. ती गेली नि दिलदार संतोकसिंगच्या कलाने वाढू लागला. उगाच पक्ष्याप्राण्यांच्या शिकारी करू लागला. कोणाचा तरी जीव जाताना त्याला तडफडताना पाहणे बहुधा डाकू प्रशिक्षणाचा भाग असावा. संतोकसिंग त्या दिलदारातून एक डाकू दिलदार घडवू पाहात होता. आईला हे कळत असावे. या जंगलात नि संतोकसिंगच्या मनमानी दहशतीत दिलदारचे डाकू होणे ती टाळू शकत नव्हती हे तिच्या ध्यानात आले असावे. म्हणून असेल, पण दिलदारला जेवढे काही आठवत होते, त्यात त्याला आईने 'मोठा हो.. खूप शिक' असले काही कधीच सांगितले नव्हते. त्यानेच तिच्या मनाची इच्छा ओळखलेली नि हे डाकूपण सोडायची प्रतिज्ञा घेतलेली. शिकण्याचा प्रश्न तर नव्हताच. आज आईची एवढी आठवण त्याला येत होती. वाटत होते ती जर खरेच आता असती तर तिला काय वाटले असते? संतोकसिंगशी ती दिलदारच्या बाजूने उभी राहून भांडली असती?

रात्रीच्या अंधारात कातर मनाने दिलदार रात्र सरण्याची वाट पाहात होता. आई राजस्थानातील एका गावात शाळेत शिकवायची म्हणे. टोळीने तिकडे डाका घातला. आपल्या मनमानीपणाने संतोकसिंगने तिला उचलून पळवून आणले. तेव्हा टोळी तिकडे कुठेतरी डोंगरदऱ्यात दडून असायची. त्या राज्यात पोलिस मागे लागले. मग तिकडून इकडे रामगढजवळ आली. गेली काही वर्षे एकाच ठिकाणी दहशतीचे साम्राज्य जमवून राहिली. आता या टोळीचा अंत जवळ येणार की काय? गुरूजी इतके मोठे कुणी आहेत की थेट कुणी मंत्री संत्री त्यांना भेटायला यावा? त्याबरोबर कुणाला न जुमानणारा सरदार संतोकसिंगही?

रात्रभर दिलदार टक्क जागा होता. कजरीची भेट होणे हा एकच उपाय होता मनाला चैन मिळण्यासाठी. पण कजरी अशा अवेळी भेटावी कशी? प्रेमी जिवाच्या आतले मन मात्र जरा वेगळे असते. कजरीची ओढ मनी दाटून आली.. किर्र अंधार सगळीकडे पसरलेला. त्यात तो उठून बाहेर पडला. सायकलीवर स्वार कजरीच्या गावाकडे निघाला. कजरी जवळ नसेल तरी तिच्या घराजवळ तरी बसावे .. किंवा ती त्या कवाडात बसून वाट पाहात असेल का?

दिलदार पोहोचला तेव्हा कजरीचे घर अंधारात बुडालेले. खाली मंदिरात देवीसमोरील दिवा जळत होता फक्त. त्याच्या बरोबर वर तो झरोका ज्यातून कजरी दिलदारचा दीदार करण्यासाठी बसून राहायची.. त्याबाजूने गेलेली आंब्याच्या झाडाची मोठी फांदी. मागचा पुढचा विचार न करता दिलदार झाडावरून सरसर चढला.. नि उघड्या खिडकीतून कजरीच्या खोलीत अलगद उतरला. कुणी पाहिले तर काय होईल.. कदाचित त्याच्या प्रेमकहाणीचा अंतिम क्षण हाच असेल.. कजरीवर कसला प्रसंग येईल.. कसलाच विचार त्याच्या अधीर मनाला पडला नाही.. त्याने हलकेच हाक मारली..

"कजरी.. मी.. मी आहे.. दिलदार."

गाढ झोपेतल्या कजरीला हे स्वप्न वाटणे साहजिक होते.. ती झोपेत खुदकन हसली..

"तुला भेटायला आलो बघ. राहवले नाही मला.."

"हुं.."

"आता कशी शांत झोप येईल मला. आज भेटली नाहीस. मलाच उशीर झाला.. गुरुजींकडून यायला. तू वाट पाहिली असशील ना?"

"हुं.."

"मी इथे कसा आलो असेन ओळख तर पाहू.. चोरासारखा खिडकीतून घुसलो.."

"हुं.."

"तुला आश्चर्य नाही वाटले?"

"हुं.."

"तू नुसती हुं हुं काय करतेस? तुला भेटलो.. आता मी जाऊ?"

"हुं.."

"असं म्हणतेस? कुणी बघण्याच्या आत निघतो मी.. आलो तसा जाईन खिडकीतून.. खिडकी अशीच उघडी ठेवत जा.."

"हुं.."

कजरीचे जमेल तसे निशा दर्शन घेऊन दिलदार मागे फिरला. हलकेच झाडावरून खाली उतरला.. एका धुंदीत तो तंबूत परतला तेव्हा पहाट झाली होती. सकाळी सकाळी डोळा लागला त्याचा, जाग आली तेव्हा सगळे टोळीकर एका जागी जमा झालेले. सरदार संतोकसिंग मधोमध उभा.. समशेर त्याच्या बाजूला.. नक्कीच काहीतरी घडतेय.. की नव्या कुठल्या गावास लुटण्याची तयारी सुरू आहे? दिलदार पाठीमागे उभा राहून ऐकू लागला.