दिलदार कजरी - 30 Nitin More द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

दिलदार कजरी - 30

३०.

भैरवलाल!

"या या. भैरवलाल."

पुजारीबुवांनी स्वागत केले नि दिलदारच्या काळजाचा ठोका चुकला. भैरवलाल! मागे कोणीतरी म्हणालेले, या जन्मातील पापांचे फळ या जन्मीच भोगावे लागते.. ते खरे होणार की काय? समशेर ह्याला भेटलाच नाही की काय? या भैरू पैलवानासमोर बचाव कसा करावा? तो या अवतारात ओळखेल? नाही ओळखले तर काम सोपे, पण तो ओळखल्यावाचून रहायचा नाही. तरीही त्याने ओळखले की नाही ओळखले हे दिलदार कसा ओळखणार होता?

मौर्या गुरूजी तोंडभरून स्वागत करत म्हणाले,

"काय योगायोग भैरवलाल पंडित. तुमचे गुरूजी ही इथेच आहेत.."

भैरवलाल दिलदारला त्या अवतारात पाहून थबकला, मग घाबरला. काही महिन्यांपूर्वी डाकूंच्या टोळीने केलेले अपहरण आठवून त्याला घाम फुटला. हिंमतलालची करामत अशी कामाला येत आहे नि ह्या दिलदारने अशा कुठल्या योजनेसाठी आपले अपहरण करवले.. काही असो, इथून प्रथम बाहेर पडणे महत्त्वाचे.

"आओ, आओ भैरवलाल. हमारे सर्वोत्तम शिष्य. गुरुदासपूर का बडा ज्योतिषी है. हमें पहचाना की नहीं?"

"असे कसे म्हणता आचार्य? शिष्यास कधी गुरूचा विसर पडेल का? हो की नाही पंडित भैरवलाल?" पुजारीबुवा म्हणाले. भैरवलालच्या तोंडाला कोरड पडलेली. कसाबसा म्हणाला, "हो ना. प्रणाम गुरूदेव. प्रणाम!"

दिलदारने त्याला हाताने धरून आपल्या बाजूला उभे केले. न जाणो काही बोलला भैरवलाल, तर त्याला तिथेच थांबवता येईल.

"प्रणाम. भैरवलाल, बडे अरसेके बाद मिल रहे हैं. मौर्यागुरूजी, बडा होनहार और मेहनती है छात्र हमारा. भैरव यहां आनेवाला है मालूम होता तो हम आते नहीं. मतलब हमारे आनेकी जरूरत नहीं थी."

"असे कसे आचार्य? तुम्ही मोठे, तुमच्या ज्ञानाचा आवाका मोठा. हो की नाही भैरवलाल पंडित?"

"अर्थात. मोठ्या लोकांसमोर आपण काय बोलणार?"

"अरे भैरव, वैसा नहीं. मैं यहां इन दोनों कन्याओंके विवाह के सिलसिले में आया था. बडी सुशील और सुंदर हैं दोनों. उसके बारे में सलाह मशवरा करने आया था."

"गुरूजी, आता एकदा आचार्यांनी पाहिले, आता माझे काम काय उरले? मला वाटते मी निघतो."

भैरवलाल तिकडून काढता पाय घेता येईल तर बरे ह्या विचाराने म्हणाला, पण पुजारी बुवा इतक्यात कसले सोडणार होते? आचार्यांनी सांगितले ते अजून एकदा पडताळून पाहता आले तर बरेच.. अर्थात ते आचार्यांसमोर कसे विचारणार? पण दिलदारला विचार कळला असावा. भैरवच्या पाठीवरून खांद्यावर हात ठेवून त्याने तो दाबला. भैरव समजायचे ते समजला. आधीच घाबरलेला तो.. आता घाम फुटायचा बाकी होता.

"क्या है भैरव, इन कन्याओंकी हस्तरेषाएं पढी मैंने, चेहरा पढा, इनके भावी पतियोंकी जानकारी दी.. तुम भी एकबार देख लेना तो मौर्यागुरूजी का समाधान हो जाएगा. आओ बेटीयों.. भैरवलालजी को हाथ दिखाना .."

"मैं तो कुंडली देखता हूं.." हे वाक्य संपेतोवर परत भैरवलालचा खांदा दाबला गेला..

"वैसे तो मैं कुंडली देखता हूं.. पण आचार्यांनी शिकवलेले हस्तसामुद्रिक .. पाहू तुमचा हात.."

थोडा वेळ गेला नि भैरवलाल काही बोलण्याच्या आत दिलदार म्हणाला,

"देखो भैरव.. इस चंद्र को और गुरू को देखो. सूर्यकी शीतल छाया है इनपर.. अच्छा मौर्याजी, सूर्यकी दो तरह की छायाएं होती हैं, शीतल और उष्ण. लीलाबेटीपर शीतल छाया है. मैंने कहा था, क अक्षरसे पति मिलेगा. सुख ही सुख लिखा हुवा है.."

"जी आचार्यजी.."

"अब कजरीबेटी का हाथ देखना.."

बेटी म्हणताना दिलदारने नजर दुसरीकडे वळवली. कजरीने रूमालामागे हसू दाबले..

"इसकी हथेली देखिए. चेहराभी मैंने गौरसे देखा है. सुशील और भाग्यशाली कन्या. हांलाकि मैंने देखा है भैरव, की इसका विवाह एक होनहार और सरल मार्गी डाकूपुत्र से होगा.. यह होना तय है.."

इथे भैरवलालच्या डोक्यात प्रकाश पडला. या डाकूंच्या फंदात पडणे असे ही धोकादायक.. विचार केल्यासारखा दाखवत म्हणाला,

"गुरूजी, आचार्य म्हणतात ते अगदी बरोबर आहे. हे विवाह होणार म्हणजे होणारच. त्यात कोणताही बदल संभवत नाही."

"और मैंने यह भी देखा है भैरव, बेटीका भाग्य बहुत ही जोरोंपर है.. डाकूपुत्र होने के बावजूद लडका होनहार होगा. यह शुक्र और शनि का मिलाप वही कह रहा है. देखो भैरव, भालरेषा को पहचानो.." मग हळूच त्याला म्हणाला,"अपनी भालरेषा और आयुष्यरेषा संभालो.."

"बिलकुल आचार्यजी. गुरूजी आजवर एखादी गोष्ट आचार्य म्हणाले तशी झाली नाही असे झाले आहे का? ते म्हणतात तर तसेच होईल. त्यांचे ज्ञान अगाध आहे. सूर्यांची शीतल छाया आज मला त्यांच्याकडून शिकायला मिळाली. धन्य आहे आचार्यजी."

"आम्ही नशीबवान खरे, असे काही घडणारच आहे, तर त्याची पूर्वसूचना मिळाली की पुढील तयारी करता येते. या लीलाचे काही नाही, पण या कजरीचा विवाह डाकूशी .. नाही म्हटले तरी बापाचे हृदय कळवळते ना.."

दिलदारच्या हाताची बोटे भैरवच्या खांद्यात परत रूतली.. चावी दिलेले खेळणे चालावे तसा भैरव परत बोलायला लागला,

"गुरूजी, तुम्ही बिलकुल चिंता करू नका. बेटीच्या आयुष्यात सुखच सुख आहे. फक्त आधी थोडे कठीण वाटेल तुम्हाला, पण मुलगा अत्यंत चांगला नि प्रेमळ असेल.. आचार्य स्वतः सांगताहेत ना.. त्यांना सगळेच ठाऊक आहे.."

"म्हणजे..?"

"आचार्यांना सगळेच भविष्यातले दिसते.."

"वह तो भगवान की देन है. लेकिन हम सिर्फ देवीके आदेशपर काम करते हैं. देवीका संदेसा आया तो ही यह भविष्य. अन्यथा हरिनाम..!"

"आता तुम्ही दोघे मोठे ज्योतिषी सांगता आहात तर तसेच होईल. कजरीला मागणी घालायला तो मुलगा स्वतः येईल.. मी तयार आहे."

"देवाजीचीच इच्छा आहे तशी. तर दुसरे काय करणार? पण देवाने काहीतरी विचार करून ठरवले असणार. आणि या गाठी वरून बांधून येतात. आपण त्यात काय करणार?" रसीलाबेनने खूप वेळाने तोंड उघडले.

"सही बात है रसीलाबेन. होनी को कौन टाल सकता है?"

"गुरूजी, तुम्ही मनात किंचितही किंतु आणू नका. आचार्य सांगताहेत तसे करा. यातच सर्वांचे भले आहे.." भैरवने आपल्या भल्याची निश्चिती केली!

शेवटचा हिरवा कंदील मिळाला नि दिलदारला आपले काम फत्ते झाल्याचे जाणवले.

"तो अब हम चलते हैं.. चलो भैरवलाल. बहुत दिनोंके बाद मुलाकात हो रही है.. निकलते हैं."

"जेवून जा आचार्य.. पंडित भैरवलाल.."

"नहीं नहीं. वापस आएंगे.."

"कधी?"

"आचार्यजी तर येतीलच परत.." भैरव म्हणाला नि त्याने जीभ चावली. दिलदारच्या चेहेऱ्याकडे पाहात म्हणाला, "आता आम्ही निघतो. जेवणासाठी परत कधीतरी .."

"हां. हमें नया संदेसा आ गया देवी का. हम निकलेंगे. चलो मेरे प्रिय छात्र भैरव.."

"असं म्हणता?"

"बस थोडा पानी पिला देना.. फिर हम प्रस्थान करते हैं.."

"जरूर. कजरीबेटा पाणी आण तर.."

समोर पाण्याचा ग्लास हातात घेऊन कजरी उभी. पाणी पिता पिता ठसका लागून त्यातील थोडे पांढऱ्या दाढीवर सांडले..

"जपून आचार्य.."

"क्या करे.. दाढी की आदत जो नहीं.." दिलदार बोलून गेला. मग एकाएकी जीभ चावत म्हणाला,"हमें आदत जो नहीं है ग्लास से पानी पीनेकी.. कमंडलूसे ही जलप्राशन करते हैं ना.."

काहीतरी सावरून घेत दिलदार म्हणाला.

"आता लग्नाला तरी या आचार्यजी. म्हणजे पोरींच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात असला म्हणजे .."

"नाही हो. आचार्य लग्नाला कसे येऊ शकतील? म्हणजे येतील पण येणार कसे?" बोलता बोलता भैरव चपापला.

"खरं आहे. लग्नाला कसा येणार आचार्य?" हळूच दिलदार म्हणाला .. मग प्रकट म्हणाला, "देवी का आदेश! देवी का आदेश हो तो आऊंगा. नहीं तो कैसे आ सकता हूं.."

नमस्कार करत दिलदार बाहेर पडला. भैरवलाल सुटका झाल्यासारखा अधिकच जोरात निघाला ..

रस्त्यात भैरवलाल होता होईतो पुढे चालण्याचा प्रयत्न करत होता..

"भैरवलाल, समशेर भेटला नाही का?" दिलदारने थोडे दूर गेल्यावर विचारले.

"नाही. गुरूजींनी बोलावले. मी आलो. मला नव्हते ठाऊक .. पण मी आळीमिळी गुप्प चिळी. एक शब्द सांगणार नाही कोणाला .."

"ते तू सांगणार नाहीस ठाऊक आहेच.. तुझी बिदागी तुला मिळेल. उद्या मी स्वतः आणून देईन."

"ठीक आहे. द्या किंवा नका देऊ.. पण माझी छोटी बालबच्ची आहेत. मला यातून दूर ठेवा.."

"भैरवलाल.. चिंता करू नकोस. फक्त यातील कोठे बाहेर बोलू नकोस.."

"नाही. नाही बोलणार. मनातल्या मनात पण नाही

मला बाकी काही नको.. मी निघतो पुढे .."

भैरवलाल जवळजवळ धावत पुढे निघाला. दूरवरून दिलदारने मागे पाहिले. वाड्याच्या वरच्या मजल्यावरील खिडकीत त्या दोघांना बघत उभ्या असलेल्या कजरीची आकृती दिसत होती.