माझे आणि केशवचे मागील पाच वर्षांपासूचे नाते आज लग्नबंधनात अडकताना मला खूप आनंद होत आहे. या मागील पाच वर्षांत त्याने माझं मनच नाही तर, मला सुद्धा कुठल्याही दुःखाविना सांभाळलं. आता मला इथून पुढे त्याच्या कुटुंबीयांना सांभाळुन स्वतःला सिद्ध करत, माझ्यावर असणाऱ्या त्याच्या निःस्वार्थ प्रेमाची बरोबरी करायची आहे.
केशव, माझ्या मामाच्या गावी शेती करणारा एक सर्वसाधारण मुलगा! मी उच्चशिक्षित म्हणून, घरच्यांचा आधी आमच्या नात्याला विरोध होता. मात्र, माझ्या ठाम निर्णयापुढे त्यांची तोकडी विचारसरणी नाईलाजास्तव झुकली आणि आमच्या लग्नाचा शुभमुहूर्त शेवटी निघालाच.
माझ्या भावाने मात्र या माझ्या निर्णयामुळे माझ्याशी नातं तोडलं! का? तर, मी एका शेतकरी मुलाला माझा आयुष्याचा साथीदार म्हणून निवडला होता.
माझ्या भावाच्या कुचकामी विचारानुसार, लोकं त्यांच्या आवडी-निवडी वरून स्वतःची लायकी ठरवत असतात. म्हणजे, तुम्ही किती खालच्या प्रतीचा (अर्थात तो हे त्यांच्या कामावरूनच ठरवतो) माणूस तुमच्या जिवन प्रवासात निवडला आहे ह्यावरून तुमची लायकी तो ठरवणार! आहे ना लाजिरवाणी, अशोभनीय अशीच ही बाब!
केशव सारख्या सर्वसाधारण मुलाची, मी माझा नवरा म्हणून अभिमानाने निवड केली. केवळ या एका गोष्टीवरून त्याने माझी लायकी ठरवली! तो एका शासकीय कार्यालयात कार्यरत आहे. त्यामुळे त्याचा डोलारा नेहमीच न झुकणारा! त्याच्या मते, "मी एक शासकीय अधिकारी मग लोकं माझ्या बहिणीच्या शेतकरी नवऱ्याला बघून माझ्यावर हसणार!" या "अतिशय कुचकामी विचारसरणी" पुढे त्याचं उच्चशिक्षित व्यक्तिमत्त्व हरलं! असंच मी म्हणेल.
मला भावासोबत नातं तोडताना काहीच वाटलं नाही! वाटणार ही कसं? कारण, एका उच्चशिक्षित पण, माणुसकीच्या बाबतीत अशिक्षित व्यक्तिसोबत संबंध ठेवण्यापेक्षा मी, एका कमी शिकलेल्या पण, माणसांची किंमत असणाऱ्या आणि मनाने तितक्याच मोठ्या व्यक्तिसोबत राहणं कधीही पसंत करेल.
भाऊ "सरकारी नोकरदार" आणि त्याच्याच विरोधात जाऊन मी माझा स्वतंत्र निर्णय कसा काय घेऊ शकते? या कारणावरून आमच्या नातेवाईकांनी सुद्धा भावाची बाजू घेतली. लग्ना नंतर त्यांनी माझ्याशी कुठलंही नातं ठेवणं पसंत केलं नाही. पण, मला अशा लोकांची माझ्या आयुष्यात उणीव नक्कीच जाणवणार नाही. इतका माझा स्वतःवर विश्वास नेहमीच असेल.
कारण, दहा चुकीची माणसं आयुष्यात असण्यापेक्षा, एकच खरा माणूस असणं कधीही चांगलं.
तर, अशा या नकारात्मक विचारांना बाजूला सारून आम्ही आमचा राजा - राणीचा संसार शेवटी थाटलाच! घरी शेती हा एकमेव उत्पन्नाचा स्त्रोत. त्यामुळे आम्ही सगळेच मिळून शेतात राबायचो. चांगल्या घरची, त्यातल्या - त्यात शिकलेली पोर आणि शेतात कामाला जाताना बघून लोकं तोंडावर हात ठेवत, विषयाचा बाऊ करायची! पण, मी त्यात कधीच कमीपणा मानला नाही. आपल्या कुटुंबाच्या भरण - पोषणासाठी झटण हे आम्हा दोघांसाठी ही तितकंच महत्त्वाचं!
कारण, जेव्हा महिला सशक्तीकरण हा मुद्दा आपण उचलून धरतो तेव्हा, त्यात एक बाब अधोरेखित करावी वाटते ती म्हणजे, कुटुंब सांभाळताना स्त्रिया सुद्धा मागे राहायला नको.
एकदा आमच्या गावात हुंडा दिला नाही म्हणून, कमला निंबकर हिचं लग्न जुळत नव्हतं. मी याविषयी तिच्या घरच्यांना समजवायला गेले होते. पण, त्यांनी उलट - सुलट बोलून माझीच इज्जत काढली! कुठून तरी मोठी रक्कम गोळा करून, एका वर्ग ३ सरकारी कर्मचाऱ्यासोबत त्यांनी कमलाचं लग्न लावून दिलं. २४००/-₹ ग्रेट पे म्हणून, २४ लाख हुंडा मागताना त्याला लाज ही वाटली नव्हती! पुरोगामी विचारसरणी असणाऱ्यांसाठी ही अतिशय लाजिरवाणी बाब!
कमलाचं लग्न झाल्यावर काहीच दिवस ती नांदली असेल! लगेच तिला काही महिन्या नंतर तिच्या सासरच्या मंडळींनी माहेरी आणून टाकली. त्यांची मागणी दिवसेंदवस वाढतच चालली होती. याच जाचाला कंटाळून एक दिवस कमलाने आत्महत्या केली! नंतर तिच्या घरच्यांनी सासरच्या मंडळींवर कायदेशीर कार्यवाही करायची तर, इथे मात्र उलटच घडले! त्यांच्याच नातेवाईकांनी संपूर्ण कुटुंबाला त्यांच्या समाजाचा गुन्हेगार ठरवले. "हुंडा दिला नाही म्हणून, मुलीचा जीव गेला" असं बोलून त्यांचा शाब्दिक अपमान केला गेला! आधीच जर हुंड्याला त्यांनी विरोध केला असता तर, कमलाला ते वाचवू शकले असते. पण, हा विचार न करता उलट हुंडा दिला असता तर, कमला आज जिवंत असती असाच समज तिच्या कुटुंबियांचा आज ही ऐकायला मिळतो.
त्यानंतर सुद्धा अशाच किती तरी कमला स्वतःचा जीव गमावून बसल्या. मात्र, या कुप्रथेला अजूनही कोणी थांबवण्याचा प्रयत्न केला नाही! मी समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण, मलाच अपमानित करून हाकलून दिलं जायचं. केशव या पूर्ण भानगडीत माझ्या सोबत ठामपणे उभा होता. त्यामुळे मी हे धाडस बिनधास्त करू शकत होते.
एक दिवस, आमच्या घरी काही बायका येऊन बसल्या होत्या. मी शेतातून आले आणि त्यांच्यासाठी चहा करायला घेतला. त्यांच्यातलीच एक बाई जेमतेम लग्न होऊन गावात आली होती. शिक्षण बारावी त्यामुळे थोडीफार इंग्रजी येत असल्याने नेहमीच तोऱ्यात! पळून जाण्याच्या भीतीने तिच्या घरच्यांनी तिला, गावातल्याच एका पन्नास ऐकर शेत असणाऱ्या, न शिकलेल्या आणि दिवसभर उनाडक्या करणाऱ्या मुलाच्या गळ्यात बांधली होती. मात्र, ती नेहमीच तिचं शहाणपण दाखवण्यात, दुसऱ्यांना कमी लेखण्यात स्वतःचा वेळ आणि ऊर्जा वाया घालवायची. तो तिचा स्वभावच होता. त्या दिवशी सुद्धा ती सर्वांना तिथं घेऊन आलेली ते ही फक्त त्यांचा अपमान करण्यासाठीच!
शिकवणी घ्यायच्या नावाखाली ती बायकांना गोळा करून आमच्या घरी घेऊन आली होती. दुपारी मी आणि केशव शेतात कामाला जात असायचो. माझ्या सासू बाई विरंगुळा म्हणून, गावातल्या बायकांना सोबत घेऊन बसायच्या. पण, आज काही तरी वेगळाच प्रकार मी अनुभवणार असल्याचं जाणवलं!
आमच्या सासूबाईंना त्या बाईने एक वाक्य वाचायला सांगीतले. त्यांना वाचन येत नाही हे तिला माहिती होते. तरी, मी उच्चशिक्षित म्हणून ती माझा राग करायची! त्याचाच राग तिने माझ्या सासुंना कमीपणा दाखवून काढायचे ठरवले होते.
ती : "मावशे, हे इतं काय लीवलं हाय, सांग बर व?"
सासू बाई : "पोरी आमाले वाचता आलं असतं त का पा लागत होतं. इतं रायलो असतो का? तूच शिकिव आमाले आतं."
ती : "बाप्पा, तुई सून त मोटी मटकते व. चांगली सतरावी शिकून आली मनते, असं आयकलं हाय मिनं."
हे बोलताना मात्र तिचे हावभाव माझ्याप्रती तुच्छ वाटले. तिला टाळत असल्याचं समजताच मला उकसवायला म्हणून, नंतर तिनं टोमणे मारायला सुरुवात केली.
ती : "हो व, तू त खूप शानपना दाकवते न. सिकव थोडसी आपल्या सासुले बी मंग."
बाकीच्या बायका तिच्या बोलण्यावर हसू लागल्या. मी मात्र शांतपणे तिला उत्तर द्यायचं ठरवून हातात चहाचा ट्रे घेऊन आले. सर्वांना चहा दिला आणि चहाचा ट्रे ठेवत, तिथेच एका कोपऱ्यात बसले.
मी : "काय म्हणालीस रमा? मी सतरावी! नाही का? तर, तुझ्या माहितीस्तव सांगते, त्याला आमच्या भाषेत पोस्ट ग्रॅज्यूएट म्हणतात. आणि राहिली गोष्ट माझ्या शहाणपणा असणाऱ्या स्वभावाची तर, मी माहिती अभावी किंवा दुसऱ्यांना कमीपणा वाटावा म्हणून, कधीच काही बोलत नाही. आता तू म्हणतेस तर, मी माझ्या सासूंना शिकवायचं मनावर घेतलं असं समज. तसं तू बोललीस, ते एक बरंच केलंस म्हणा! आता तू बघच, आमच्या सासू बाईंना नाही ह्या येत्या महिन्याभरात गावच्या येणाऱ्या साक्षरता घरोघरी स्पर्धेत पहिला नंबर मिळवून दिला!"
ती : "आली मोटी. जा सिकव त्या तुया अनपड सासुले. आमी बी पायतोच. कसं सिकवते तू ते. पइला का तिसरा नंबर आनुन दाकव. नायी मी टकला केलो त माया वाला."
ती माझ्यावरचा राग म्हणून, सगळ्यांसमोर उत्साहाच्या भरात काय बोलून गेली, त्याचं तिलाच भान नव्हतं. मला तर खूप वाईट वाटतं अशा लोकांचं जी लोकं दुसऱ्यांचा अपमान करण्याच्या प्रयत्नात स्वतःसाठीच पुढे जाऊन अपमानास्पद परिस्थीती निर्माण करून बसतात.
मी : "तयार रहायला सांगा शामाबाई तुमच्या साहेबांना. त्यांच्याकडे पहील्यांदाच एक बाई टक्कल करायला येणार म्हणावं!"
सगळ्या तिच्यावर हसायला लागल्या तेव्हा, ती रागातच पाय आपटत निघून गेली. तेवढ्यात केशव शेतातून घरी आला. त्याला बघून सगळ्या बायका कुजबुज करत आपापल्या घरी निघून गेल्या.
केशव : "काय चाललंय?"
सासू बाई : "काई नाई पोरा, आज आपल्या सूनेनं या अनपड बाईले सिकवाचं जाइर करून टाकलं!"
केशव : "काय???????"
केशवचा त्याच्या कानावर विश्वासच बसत नव्हता. कारण, त्याच्या आईला अक्षर ओळख नव्हती आणि आजवर कोणीच त्यांना शिकवण्याचं धाडस केलं नव्हतं. केशवला तर हे कर्मकठीण काम वाटत होतं. पण, आता त्यासाठीच मी माझ्या मनाला पुर्ण विश्वासाने तयार केले आणि ते पुर्ण करण्यासाठी वाटेल ते करायला तयार होते.
मी : "हो, मी शिकवणार! आणि बघाच नाही तुमचा पहिला नंबर आणून दाखवला."
केशव : "अग पण!!!!"
मी : "केशव, तू फक्त एक करायचंय. मी आईंचा पहिला नंबर आणून दाखवल्यानंतर, मला पूर्ण गावातून बैलगाडीने रुबाबात एक चक्कर मारून आणायला तयार रहायचं. बाकी सगळं काही माझ्यावर सोपव."
केशव माझं ऐकून बाहेर जात असता, आमच्या सासू बाई गोंधळल्या.
सासू बाई : "अरे, पोरा जेवून घे. आलास आनि तसाच कुटं चाललास?"
केशव : "बैलगाडी दुरुस्त करायला देऊन येतो. चाक वगैरे बसवून तयारीत असलं पाहिजे ना! शेवटी तुझ्या सून बाईंना मिरवायचं आहे त्यातून."
यावर मात्र, आम्ही सगळेच खळखळून हसलो.
आजपासूनच मिशन साक्षरता माझ्या घरी सुरू होणार म्हटल्यावर, सगळी व्यवस्था बघायला नको का? म्हणून, प्रोजेक्टर, स्क्रीन प्ले सगळं बसवून घेतलंय. जरी आम्ही शेतकरी असलो ना तरी, सगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आम्ही करतो. सगळं तांत्रिक व्यवस्थापन माझ्याच अखत्यारीत आहे. एखाद्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याप्रमाणेच मी सर्व सांभाळते आणि म्हणूनच, केशव मला घरची "कृषी तांत्रिक अधिकारी" म्हणतो.
खरंच, मला इथे आवर्जून सांगावं वाटतंय "जीवनात एक जरी जीवापाड प्रेम करणारा माणूस असला ना की, बस! बाकी आपल्याला कोणाचीच फिकीर नसते."
मला केशवच्या रूपाने तो जीवापाड प्रेम करणारा माणूस भेटला. त्यासाठी मी देवाचे वेळोवेळी आभार मानते.
मिशन साक्षरता जोरात सुरू होतं. मी माझ्या सासू बाईंना वाटेल ती पद्धत वापरून शिकवायला रात्रंदिवस तत्पर होते. त्या सुद्धा अगदी सहज सर्व सूचना पाळायच्या. बाकीच्यांनी मन विचलित करण्याचा त्यांच्या परीने खूप प्रयत्न केला. मात्र, आमचा निश्चय आणि निर्धार पक्का असल्याने कोणीही आमचं मनोबल हलवू शकलं नाही.
केशव त्या दिवसांत घरची सगळी कामं करून नंतर शेतातली कामं सांभाळायचा. आमच्या मिशनमध्ये त्याचा सिंहाचा वाटा होता.
पुढे प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात असेच दिवस निघून गेले.
एका महिन्यानंतर.
आज शेवटी तो दिवस एकदाचा उजाडलाच. जेव्हा, खऱ्या अर्थाने माझ्या प्रयत्नांची पराकाष्ठा सार्थक होणार की, नाही! हे ठरणार होते.
सगळे गावकरी ग्रामसभेच्या पटांगणात जमले होते. मी, केशव आणि आमच्या सासू बाई तिथं पोहचलो. सर्व उमेवारांना प्रश्नपत्रिकांचे वाटप करण्यात आले.
ही स्पर्धा साधारण चाळिशीच्या पुढच्या निरक्षर लोकांच्या साक्षरतेवर भर देऊन, गावातल्या उर्वरित प्रत्येकाला, साक्षर करण्यासाठीचं स्वप्न साकार व्हावं, या एकमेव उद्देशाने आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे त्यात विशेषतः अक्षर ओळख आणि एक - दोन वाक्यांचा अर्थ समजून उमेदवाराने उत्तर द्यावं अशा पद्धतीने प्रश्पत्रिकेचे स्वरूप तयार करण्यात आले होते.
दोन तास मी माझ्या पदराचा शेंडा हातात घेऊन वेगळ्याच चिंतेत ऊभे होते. केशव मला धीर देत सोबतच उभा होता. मात्र, माझे प्रयत्न कितपत खरे हे आज सासू बाईंच्या कामगिरीने पुर्ण गाव बघणार होते.
दोन तासानंतर!
शेवटी प्रतीक्षा संपली आणि पुढच्या अर्ध्या तासाने निकाल जाहीर करण्यात येईल असं संगाण्यात आलं. ही स्पर्धा माझ्यासाठी फक्त एक स्पर्धा नव्हती. ही माझ्या अस्तित्वाला बळ देणारी एक अशी ऊर्जा होती जी, मला आज पुन्हा अभिमानाने वर मान करून जगायला प्रोत्साहित करणार होती.
या निकालाची एक विशेषता होती ती म्हणजे, निकाल जाहीर करणारे स्वतः आदरणीय व्यक्तीमत्व तानाजी भोईटे "उपजिल्हाधिकारी" पदावर कार्यरत. त्यांच्याच प्रयत्नांतून जिल्ह्यातील सर्व गावात फिरत्या पद्धतीने "साक्षरता घरोघरी" स्पर्धेची सुरुवात करण्यात आली होती. हे सर्व बघून मला त्यांच्या विषयी खूप अभिमान वाटला. त्यांची कामगिरी खरंच खूप कौतुकास्पद होती.
निकालाची प्रतिक्षा संपली. जो उत्सुकतेने निकालाची वाट पाहत बसून होता तो प्रत्येकच जण आता कुतूहलापोटी उभा राहिला. त्यातल्या - त्यात मी! कारण, खऱ्या अर्थाने आज माझ्या प्रयत्नांचं सार्थक होणार की, नाही हे ठरणार होतं. पुढच्या काहीच वेळात निकाल जाहीर करण्यात आला.
उत्सुकता शिगेला पोहोचली होतीच त्यात अजून भर म्हणून, निकाल उतरत्या क्रमाने जाहीर करणार असल्याचं ठरलं आणि क्रमांक ०३, आधी जाहीर करण्यात आला.
क्रमांक ०३. श्रीमती देवकी निराजी रावते.
माझ्या हृदयाची धडधड वाढत होती. मी केशवचा उजवा हात घट्ट पकडून ठेवला होता.
क्रमांक ०२. श्यामजी पालूजी शेंडे.
आता तर माझ्या डोळ्यांत अश्रू अनावर झाले होते. केशवने मला धीर देत कवटाळले. पुढच्या क्षणीच नाव ऐकून माझे डोळे अश्रूंनी नाहून गेले. नाव होतं आमच्या सासू बाईंचं.
क्रमांक ०१. श्रीमती सावित्री कमल आग्रे.
आज माझ्या आनंदाला पारावार उरला नव्हता. मी केशवाला तिथेच सर्वांसमोर मिठी मारली. सगळ्यांच्या नजरा माझ्यावरच होत्या. त्यांनाही कदाचित माझा अभिमान वाटत असावा! नंतर जाऊन मी माझ्या सासू बाईंच्या पाया पडले. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात आमचे अभिवादन केले. उपजिल्हाधिकारी साहेबांनी सुद्धा त्यांच्या मौल्यवान शब्दांनी माझ्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
तानाजी भोईटे : "तर माझ्या लाडक्या गावकऱ्यांनो. आज, या गावात येण्याचा मान आपण सर्वांनी मला देऊ केलात. त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. खरं तर, ईथं येणं हे पुण्यच लाभलं म्हणायचं. कारण, आज पर्यंत इतक्या स्पर्धा मी घेत आलोय. त्यातल्या - त्यात ही स्पर्धा माझ्या जीवनातली अविस्मरणीय स्पर्धा ठरली आहे. शिकलेल्यांनी स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावणं मी बघितलं होतं. मात्र, आज आपल्या निरक्षर सासूला महिन्या भराच्या प्रयत्नाअंती अक्षर ओळख शिकवून, या स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवून देणारी प्रतिभा सारखी सून मी पहील्यांदाच पाहिली. त्यामुळे आज मी इथे आपल्या सर्वांच्या साक्षीने असं जाहीर करू इच्छितो की, श्रीमती प्रतिभाताई केशव आग्रे आपण आपल्या नावाप्रमाणेच या गावाची सुद्धा प्रतीभा जपावी. थोडक्यात काय तर, मी आज आपल्यावर उर्वरित संपूर्ण गाव साक्षर करण्याची जबाबदारी टाकतो आहे."
हे ऐकल्यानंतर माझ्या तोंडून शब्द ही पडत नव्हता. मला कधीच वाटले नव्हते की, निरक्षर सासूला साक्षर करतानाचा हा प्रवास, साक्षर गावासाठीचा प्रस्ताव माझ्यासमोर घेऊन येईल आणि तो माझ्या अस्तित्वाला उभारी देणारा ठरेल.
स्पर्धेनंतर मला उपिल्हाधिकारी साहेबांनी पुढची दिशा काय असावी हे थोडक्यात सांगीतले. सर्व गावकऱ्यांच्या साक्षीने आज मी श्रीमती प्रतिभाताई केशव आग्रे, या गावची एक कर्तव्यदक्ष शिक्षिका बनले होते.
उपजल्हाधिकारी साहेब निघून गेल्यावर जो - तो माझं कौतुक करण्यासाठी माझ्या जवळ येत होता. कोणी कौतुकाने माझा चेहरा ओंजळीत पकडून गोंजारत होता तर, कोणी माझ्या डोक्यावरून हात फिरवत मला भविष्याच्या कामगिरीसाठी शुभेच्छा देत होता.
एक व्यक्ती मात्र, अजूनही लांबूनच हे सर्व पाहत होती. कदाचित मला अभिवादन करावं की, नाही या संभ्रमात ती असावी? मी तिला स्वतःकडे बोलावत हात वर भिरकावला तेव्हा, सगळे त्या दिशेने बघू लागले आणि ती घाबरली!
मी : "रमा, अग घाबरतेस कशाला? ये सगळी आपलीच माणसं ना!"
ती घाबरतच माझ्याजवळ येऊन पोहचली.
ती : "मले माफ कर प्रतिभा. मी चुकलो. तुया वर मी हासलो. तुया सासू वर हासलो. माफ कर."
मी : "अग माफी कसली यात? उलट, मला तर तुझे आभार मानले पाहिजे. खरंच तू माझ्यावर तेव्हा हसली नसतीस तर, आज मी जे काही मिळवलं ते कधीच मिळवू शकले नसते. तू तर माझी एक प्रकारे मदतच केलीस. तुझेच आभार मानते मी आज."
रमा : "मनजे मले टकला नाही न कराव लागनार!?"
सगळे : "एक टक्कल माफ!"
यावर सगळेच खळखळून हसायला लागले.
ही घटना रमा साठी एक शिकवण ठरली, "कोणाचा इतका द्वेष करू नये की, रागाच्या भरात आपण त्याला बोललेले शब्द आपल्याच जीवावर उठतील!"
सगळे गावकरी माझ्याकडे अभिमानाने बघतच राहिले. मागून मोठ्याने आवाज ऐकू आला आणि मी पटकन मागे वळून पाहिले.
केशव : "चलायचं का मास्तरीन बाई?"
मी हसून जायला निघाले तेव्हा, सासू बाईंनी मला थांबवून बोटं मोडून दुष्ट काढली.
सासू बाई : "पोरी, घराण्यालाच नाही तर, तू आज पुर्ण गावचीच लक्ष्मी शोभते आहेस. साक्षरतेची लक्ष्मी."
ज्यावेळी माझ्या सासू बाई असं बोलल्या त्या क्षणी मला सगळं जिंकल्यासारखं वाटलं. कारण, आपल्यासोबत राहणारे स्वार्थापोटी कधी तरी आपल्या विषयी चांगलं बोलतात! मात्र, नव्याने जोडली गेलेली माणसं जेव्हा आपल्या विषयी चांगलं बोलतात तेव्हा ते आपल्यावरील असणाऱ्या दृढ विश्वासाने आणि तितक्याच निःस्वार्थ भावाने बोलत असतात.
केशव आणि मी रुबाबात पुर्ण गावातून एक फेरी मारून आलो.
असेच दिवसामागून दिवस - गेले आणि तब्बल दोन वर्षांनी पुर्ण जिल्ह्यातून आमच्या गावाने "पहिला साक्षर गाव" हा बहुमान पटकावला.
उपजल्हाधिकारी साहेबांच्या हस्ते माझा सत्कार करण्यात आला.
समाप्त.