Bella - Mine Owner books and stories free download online pdf in Marathi

बेला - खाण मालकीण

वरच्या लगेज बाॅक्समध्ये सामान ठेऊन मी माझ्या खिडकी शेजारील आसनावर स्थानापन्न झालो. वास्तविक, विमानप्रवासात मला कडेचे , गॅंगवे शेजारचे आसन आवडते. तीथे उन्मेष बसला होता. विनंती करून मी आसनांची अदलाबदल करून घेतली. आता दोघांच्या मधे गोपी होता. मी आणि उन्मेष पुण्याहून ,व गोपी मुंबई हून दिल्लीत आलो होतो. आम्ही आता कझाकस्तान ची राजधानी अस्ताना. (आताचे नांव: नूर सुलतान) येथे निघालो होतो.
उन्मेष हा चाळीशीचा उमदा उद्योजक होता. स्वतः च्या व्यवसायाचे विस्तारिकरण आणि विवीधिकरण यासाठी पूर्ण जोमाने प्रयत्न करतोय. त्याच संदर्भात, गोपीच्या मध्यस्थीने त्याला कझाकस्तान मध्ये एक, सध्या बंद असलेली, सुवर्णखाण विकत अथवा चालविण्यासाठी घ्यावयाची आहे. हा व्यवहार पूर्ण करण्यापूर्वी,ही खाण व परिसर निदान एकदातरी , एखाद्या भूवैज्ञानिकास दाखविणे त्याला योग्य वाटले म्हणून हा आमचा दौरा होता .
वेळ बराच असल्याने, उन्मेष माझ्या शेजारी येऊन बसला. त्या सुवर्ण खाणीची, त्याला असलेली माहिती त्यानं सांगायला सुरुवात केली. ही खाण, कझाकस्तान च्या राजकीय पक्षातील उच्चपदस्थाची होती. १९९१ मध्ये, रशियापासून स्वतंत्र होताना या गॄहस्थानं ह्या खाणीसह, अनेक खनिज संपन्न भूभाग स्वतः च्या नावावर अथवा दिर्घ मुदतीच्या भाडेकराराने करून घेतले होते. त्याच्या मॄत्यूनंतर ही सर्व मालमत्ता त्याची सहचरणी , बेला कडे आली होती. आता तिच्यावर असलेल्या कर्जापोटी, बॅंक ही खाण ताब्यात घेणार होती. त्यामुळे, खाण विकून अंगावरील कर्ज फेडण्याचा बेला चा विचार होता.
नंतर सुमारे अर्ध्या-पाऊण तासाने विमान अस्ताना विमान तळावर उतरले व आम्ही टॅक्सीने आमच्या हॉटेलवर एक वाजेपर्यंत पोहचलो. तीन वाजता आम्ही तिघेही हॉटेल मधून बाहेर पडलो आणि जवळच असलेल्या भारतीय वाणिज्य दूतावासात पोहोचलो. मला स्वागतकक्षात बसवून, गोपी आणि उन्मेष एका कक्षात गेले . सुमारे दहा-बारा मिनिटांनी ते परत आले आणि त्यांच्या बरोबर एक उमदा तरुण होता . हा मधुसूदन, आमचा दुभाष्या. सुवर्ण खाणीचे कार्यालय जवळच असल्याने आम्ही पायीच निघालो.
बेला चे कार्यालय बरेच मोठे होते. बेलाची मोठी केबिन होती तिथे पोहोचलो. स्थानापन्न झालो, चहा; बिन दुधाचा ,आला .सोबत बिस्किटे होती. त्यानंतर मधुसूदन नं माझा परिचय करून दिला. मी प्रथम खाण बघायला आवडेल असं सांगितलं. त्यावर, बेला म्हणाली, " खाण दूर आहे. आज जावून तेथे मुक्काम करावा लागेल. उद्या सकाळी लवकर निघालो तर चालेल ना?" सर्व संभाषण दुभाष्या मार्फतच सुरू होते. मी खाणींचे नकाशे मागितले, पण ते खाणी वरच असल्याचे समजले. मी खनिज उत्खनना चे नोंद पुस्तक (रजिस्टर) मागवले. पहिल्या च पानावर लक्षात आले कि सर्व रकान्यांचे शिर्षक कझाकी भाषेत आहे. मधुसूदन ला त्यांची इंग्रजी नावे लिहून देण्यास सांगितले. खालील आकडेवारी इंग्रजी तून होती. नोंदी तपासताना , मागील तीन वर्षांच्या नोंदीच नसल्याचे जाणवले. कारण समजले. खाण मालकाचं निधन , मालकिणीचे आजारपण इत्यादी.
खनिजांची चोरी रोखण्यासाठी, संपूर्ण भूयारी खाण, पावसाचे पाण्यानं तुडुंब भरून ठेवण्यात आली. तेथील पाणी उपसण्याची प्रणाली तात्पुरती हटविण्यात आली. मात्र, उन्मेष बरोबर व्यवहाराची बोलणी सुरु होताच, ही प्रणाली पुन्हा प्रस्थापित करण्यात आली होती. अन्य नोंदींची पुस्तके कार्यालयात नसल्याने आजचं काम संपल्यातच जमा होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी सातच्या सुमारास निघण्याचे ठरवून आम्ही बाहेर पडलो.
आता रस्त्यावर बरीच रहदारी जाणवत होती. येथील रस्ते बरेच रुंद, सुरेख होते. आसपासच्या ईमारती युरोपियन रूप दर्शवीत होत्या. आम्ही रमत गमत होटलवर पोहचलो. उन्मेष आणि गोपी त्यांच्या अन्य कामांसाठी बाहेर जाऊन ८ वाजेपर्यंत परत येणार होते. मधुसूदन स्वत:च थांबतो म्हणाला. काॅफीची आर्डर देवून मी मधुसूदन सह खोलीत गेलो. दोघेही स्वच्छतागृह वापरुन ताजेतवाने झालो.काॅफी व टोस्ट आले. त्याचा आस्वाद घेता घेता , हळूहळू मधुसूदन बोलू लागला. त्याच्या बोलण्यात मोकळेपणा जाणवत होता. तसा तोही पुण्याहून च पदवीधर झाला होता. पुण्याची बरीच माहिती त्याला होती. बरीच विचारपूस करून मला शक्य तितके जाणण्याचा त्याचा प्रयत्न दिसला. मी अत्यंत मोकळेपणाने संभाषण करित होतो. यामुळे तोही खुलला. येथे एकटाच रहात होता. त्याची आई तीन महिने राहून नुकतीच भारतात , रत्नागिरी ला परतली होती.
तो एका कझाकी मुलीच्या, नताल्या च्या, प्रेमात पडला होता. नताल्या ची आई रशियन व वडील कझाकी होते. नताल्या अकरा वर्षांची असताना, वडिलांनी त्या दोघींना सोडून, एका कझाकी महिलेशी विवाह केला होता. तिच्या आईने , स्वतः छोटी मोठी कामे करून तिचे थोडेफार शिक्षण केले होते. त्यानंतर, नताल्यानं स्वतःच नोकरी करीत इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवले होते. त्या कौशल्यावर, पाच वर्षांपूर्वी तीला भारताच्या वाणिज्य दूतावासात दुभाष्या ची नोकरी मिळाली होती. तिथेच या दोघांचा परिचय झाला व सहवास वाढला. दोघेही प्रेमात पडले. घरच्या परिस्थितीमुळे व स्वत:च्या आवडीमुळे तिनं अधिक पगाराची ,एअर होस्टेस ची नोकरी स्वीकारली. सुरवातीला, तिच्या ट्रेनिंग च्या काळात, रोजच तिचा फोन यायचा. शनि- रविवारी भेटणं व्हायचं. पुढं, तीला प्रत्यक्ष विमानात कामासाठी जाणं क्रमप्राप्त झाले. त्यामुळे फोन व भेटी कमीकमी होत गेल्या.
त्यानंतर सुमारे सहासात महिन्यानंतर नताल्या चा फोन आला, तीनं अगदी शांतपणे मधुसूदनला सांगितले की तिच्या आईच्या आग्रहास्तव, ती तिच्याच कंपनीतील एका वैमानिकाशी उद्या विवाहबद्ध होत आहे. हा वैमानिक तिच्यापेक्षा वयानं सुमारे दहा वर्षे मोठा होता. अर्थातच या सोहळ्याला , तिचे निमंत्रण असूनही, मी अनुपस्थित राहिलो . पुढे माझं कामात लक्ष लागेनासे झाले व मन:स्वास्थ्य बिघडू लागले. त्या सुमारास आई ईकडे आली म्हणून फार चांगले झाले. तिनं मला उभारी दिली. स्वतः ला सांभाळायला लावले. तो बराचवेळ बोलत होता. तितक्यात उन्मेष आला व जेवायला येणार ना म्हणाला. तसा, मधुसूदन उठला व " सर, उद्या सकाळी सात वाजता बेला मॅडम येणार आहेत, मीही येतो, आपणही तयार राहावे". असे म्हणत त्यानं माझा व उन्मेषचा निरोप घेतला.
ठरल्याप्रमाणे बेला दोन एस् यू व्ही कार घेऊन हॉटेलच्या दारात आली. आम्ही तिघेही तयारच होतो. मी व मधुसूदन बेलाच्या गाडीत बसलो आणि उन्मेष मागच्या गाडीत बसला . आम्ही राष्ट्रीय महामार्गाने निघालो . हा रस्ता अतिशय रुंद म्हणजे आठ पदरी होता व त्याचा पृष्ठभाग अतिशय सपाट होता. त्यामुळे दोन्ही गाड्या सुमारे दीडशे ते पावणे दोनशे किलोमीटर वेगानं धावत होत्या . आमची गाडी सोफिया, म्हणजे बेलाची मुलगी चालवत होती. सोफिया हाॅंगकाॅंग मध्ये एम बी बी एस च्या अखेरच्या वर्षाला शिकत होती. काही दिवस सुट्टी असल्यामुळे , ती आईकडे आली होती . तिचं ड्रायव्हिंग कसब वाखाणण्याजोगे होते. आम्ही साधारण दोन तासात नियोजित स्थळी पोहोचणार होतो , परंतु आमची गाडी एका गावात शिरली. गांव तसे बरे वाटले. माझ्या प्रश्र्नार्थक चेहऱ्याकडे बघत मधुसूदन पुटपुटला," हे खाणी चे कार्यालय आणि उपहारगॄह आहे. येथे नाष्टा करून पुढे जायचयं".
भुयारी खाणींचे कार्यालयाचे बांधकाम व रचना चांगली होती. तेथून प्रथम खाणीच्या परिसराचा भूवैज्ञानिक नकाशा , तसंच खाणीच्या सर्व पातळ्यांवरील उत्खनन दाखविणारे नकाशे घेतले. गाडी त ठेवलेले आवश्यक सामान घेवून मी माझ्या सर्वेक्षणाचे कामास आरंभ केला. उन्मेष आणि बेला, थोडे अंतर ठेवून , माझ्या मागोमाग चालू लागले . मी काय करतो आहे हे त्यांना जाणून घ्यायचे होते. थोड्या वेळाने तेही कार्यालयात जाऊन बसले. खाणीच्या उत्तर दिशेकडून मी माझ्या सर्वेक्षणाला सुरुवात केली. अपेक्षेप्रमाणे, बऱ्याच भूवैज्ञानिक खुणा आढळू लागल्या. काही वेगळ्याच वनस्पती ठराविक भागात व ठराविक दिशेने आपले अस्तित्व दाखवत होत्या. प्रत्येक गोष्ट मी नकाशावर व माझ्या नोंद वहीत लिहित होतो. बराच वेळ निरिक्षण करत मी, जेथे निरूपयोगी खडक व मातीचे ढीग होते तेथे पोहचलो. मनात काही संदेह असल्याने मी , त्या ढिगाऱ्यातून दोन नमुने गोळा केले. अशाच प्रकारे संपूर्ण क्षेत्र नजरेखालून घालत, काही खडकांचे नमुने गोळा केले. सुमारे तीन तास हे काम करून मी कार्यालयात परतलो. समोरच, एका तात्पुरत्या तंबूत मधुसूदन आणि सोफिया गप्पा मारत बसलेले दिसले.
जेवण करून आम्ही, खाणीत आंत जायला निघालो. सोबत , खाणींचे अभियंता ही होते. खाण दोन तीन वर्षे बंद होती त्यामुळे अस्तित्वातील सर्व प्रणाली सुद्धा बंद होत्या. नव्यानं सुरू केलेल्या प्रणालीची विश्र्वासार्हता तशी कमीच असते. त्यामुळे खाणीच्या लिफ्टमध्ये बसताना मन साशंक होते. आम्ही चौघे लिफ्ट मध्ये शिरताना, उन्मेष चा फोन वाजला. त्यामुळे तो मागे फिरला. मी, बेला आणि त्यांचा खाण इंजिनिअर असे तिघेच खाली जावू लागलो. लिफ्ट थोडे थोडे धक्के खात ,धडामधुडूम आवाज करीत पाच मिनिटे खाली खाली जात, अखेरीस तळातील स्तरावर पोहचली. या सर्वात खालच्या बोगद्यात, उजेडासाठी विद्युत दिवे होते, पण उजेड तसा कमीच होता. उन्मेषला खाली आणण्यासाठी,इंजिनिअरला लिफ्ट सह वर पाठवावे लागले. दोघेही खाली आल्यावर आमचे काम सुरू झाले. इंजिनिअर कडून आवश्यक माहिती घेणे फारच जिकिरीचे झाले. त्याला इंग्रजी व मला कझाकि भाषा येत नव्हती. त्यामुळे, मिळेल तेव्हढी भूवैज्ञानिक माहिती गोळा करीत होतो. इंजिनिअर ने एका तिरक्या बोगद्यात नेवून क्वार्ट्झ व्हेन दाखविली. त्या मध्ये सुमारे तीन इंच रुंद व पाच इंच लांब, चकाकणारे सोनं होते. त्या शिवाय अन्य ठिकाणी सुवर्ण ठिपकेही दिसत होते. तेथील अंधूक प्रकाशांत शक्य असणारी निरिक्षणे करून, सुमारे दीड तासाने आम्ही वर भुपॄष्ठावर आलो.
अस्थाना ला परतीच्या प्रवासात, बेला नं आज रात्री नाईट क्लबमध्ये जावूया असा प्रस्ताव दिला. उन्मेष ला अन्य काम असल्याने त्यानं विनम्र नकार दिला. मी यापूर्वी कधीही नाईट क्लब बघितलेला नाही , त्यामुळे संकोच वाटतो असे सांगितले. त्यावर, बेला नं ,"मग बघाच आज " असे सांगून, एका नाईट क्लबमध्ये टेबल आरक्षित केले. गाडीतून उतरताना उन्मेष माझ्या जवळ येवून हळू आवाजात बोलला," त्या फारच चलाख आहेत, तुमच्या निरीक्षणांबद्दल काही बोलू नका."
बरोबर साडे आठ वाजता, बेला व सोफिया पार्टी ड्रेसमध्ये हजर झाल्या.दोघीही खूपच आकर्षक दिसत होत्या. मधुसूदन पुढे , सोफिया शेजारी बसला. मी मागच्या सीटवर, बेला सह बसलो. तिने सुंदर स्मित करून स्वागत केले. गाडीत, एक मंद सुगंध जाणवत होता. दहा मिनिटांनी आम्ही एका भव्य नाईट क्लबच्या आवारात शिरलो. क्लब प्रचंड मोठा होता. आतली सजावट खूपच विलोभनीय होती. मध्यभागी दोन नॄत्य कक्ष होते, एक खूप मोठा व दुसरा लहान. आम्ही दोन्ही कक्षांच्या मध्यास, परंतु बाजूच्या मोकळ्या पट्ट्यातील एका टेबलाजवळ बसलो. मी व बेला नं व्हिस्की भागविली. सोफिया आणि मधुसूदन नं वाईन. मधुसूदन मार्फतच माझे बेलाशी संभाषण सुरू होते. सोफिया मात्र इंग्रजी तून संभाषण करीत होती. माझ्याकडे बघत, बेला नं माझ्या भूविज्ञानाचे अनुभवाची माहिती करून घेतली. तिच्याकडे असा एखादा भूवैज्ञानिक असायलाच हवा असे तिचे मत तिने मांडले. तू येथे का रहात नाहीस? असा सरळ प्रश्न तिनं केला. तेव्हड्यात, संगीत सुरू झाले. माझा व्हिस्की चा एक पेग संपेपर्यंत, बेला नं दोन पेग संपविले होते. माझ्यापुढे आपला हात करीत तिनं मला नॄत्य करायला येण्याचे सुचविले. मी असमर्थता दर्शवित, पूर्वी कधीच नॄत्य केले नसल्याचे सांगितले. "चल मी शिकवते "म्हणून तिनं मला जवळजवळ ओढलेच. आम्ही लहान नॄत्य कक्षात आलो. हा कक्ष, बहुतेक नॄत्य शिकणाऱ्यांसाठीच असावा. माझा उजवा हात तिनं स्वत:च्या कंबर व पाठीचे मध्ये ठेवला. तिचा डाव्या हाताचा पंजा माझ्या उजव्या खांद्यावर टेकवला. उजव्या हातानं माझा डावा पंजा अलगद धरून खांद्याच्या उंचीपर्यंत उचलून दूर धरला . मला प्रथम, पुढे टाकावयाच्या स्टेप्स व नंतर मागं टाकावयाच्या स्टेप्स दाखवून, करायला लावल्या. तीन-चार प्रयत्नांती मला स्टेप्स जमायला लागल्या. आता तिनं संगीत ऐकत पदन्यास करायला सुचविले. अवघड जात होते, त्यामुळे अत्यंत धीम्या गतीने माझा पदन्यास सुरू झाला. बेला फारच सफाईने पदन्यास करीत होती. हळूहळू मी संगीताच्या लयीत पदन्यास करू लागलो. ते जाणवल्यावर, बेलाच्या चेहऱ्यावर स्मितहास्य पसरलं. तिचा चेहरा खुलला . बहुतेक स्वत:च्या नॄत्य शिकवण्याची शैली आणि कसब यावर ती खुश झाली असावी. थोड्या वेळाने तिनं, "यू स्टे कझाकस्तान" असे हसत हसत सुचविले. मला उन्मेषचं वाक्य आठवलं. मी फक्त स्मितहास्य केले. असेच आणखी पाच-सहा मिनिटे गेली असतील, संगीत थांबले. ही संधी साधून मी तिला आपल्या टेबल कडे चलण्याचे सुचविले.
आम्ही स्थानापन्न होत असताना, बेला नं, सोफिया व मधुसूदन ला नॄत्य करण्यासाठी सुचविले.दोघेही अत्यंत आनंदाने मोठ्या नॄत्य कक्षात दाखल झाले. आताचं संगीत जरा जलदगतीचे जाणवले. ते दोघेही आनंदात व खूपच सहजतेने नॄत्य करू लागले. त्या दोघांचे भोजन झाल्याचे जाणवत होते. माझ्यासाठी, मधुसूदन ने राजमाचा एक पदार्थ व कझाकि ब्रेड मागविला होता. बेला नं, बहुतेक नाॅन्वेज मागविले असणार. साधारण दहा-बारा मिनिटांनी मधुसूदन व सोफिया, बऱ्यापैकी घामाघूम होऊन परतले. दोघांचे चेहऱ्यावर आनंद व स्मितहास्य झळकत होते. आईस्क्रीम खाताना बेला मधुसूदन शी काही बोलली. त्यानं हसत मला अनुवादित वाक्य ऐकविले. बेला सांगत होती, " मोअर आय सी हिम, मोअर आय लाईक हिम. आय वांट हिम टू स्टे हिअर इन कझाकस्तान". बेला खेरीज आम्ही तिघेही हसलो.
आम्हाला होटलवर सोडून दोघीही परतल्या. निघताना, बेला मधुसूदन शी बराचवेळ बोलत होती. कळत काहीच नव्हते, पण तिच्या डोळ्यांत मला आर्जवे जाणवले. त्या दोघी गेल्यानंतर, मधुसूदन नं उलगडा केला. बेला कडे बऱ्याच खनीज धारक जमिनी भाडेकरारावर आहेत. तिला भूवैज्ञानिकाची निकड आहे व मी येथे राहून तिचे काम स्विकारावे अशी तिची मनापासून इच्छा आहे. मी फक्त स्मितहास्य केले.
उद्या मला भारतात परतायचे होते. खाणी संदर्भातील नोंदी पूर्ण करून मी निद्राधीन झालो.
सकाळी उठून, नाष्टा घेतांना उन्मेष शी चर्चा झाली. त्याच्याकडून, विमानाचे परतीचे तिकीट ताब्यात घेतले. ते दोघेही अन्य कामांसाठी थांबणार होते. विमान दुपारचे असल्याने, सर्व कामे आरामात केली. बॅग भरली. तिकिट , कोटाचे खिशात जपून ठेवले व कोट कपाटात अडकवला. जेवण उरकून जवळचे पुस्तक वाचत बसलो. थोड्या वेळात मधुसूदन आला. मला एअरपोर्टवर सोडायची जबाबदारी त्यानं घेतली होती. आम्ही टॅक्सीने निघालो. काहीतरी बोलायचं म्हणून मी कालच्या त्यांच्या नॄत्याला दाद दिली. तो किंचितसा ओशाळला व हसलाही. काही वेळाने एअरपोर्टवर पोहोचलो. उतरून सामान घेतले. मधुसूदन चा निरोप घेत असताना, तिकडून एक कार भरधाव आली व करकचून ब्रेक लावत आमच्या जवळ येवून थांबली. मी अवाक झालो, गाडीतून बेला उतरली . माझ्याजवळ येत तिनं हात हातात घेतला व म्हणाली," प्लीज, कम कझाकस्तान. नीड यू". तिनं मधुसूदन कडे बघितले, त्यानं होकारार्थी मान हलवत," मी त्यांना सांगितले आहे" म्हणाला. माझ्या लक्षात आले. मधुसूदन कडे बघत मी म्हणालो, " मला तिची निकड समजली. शक्य तो, कुणी अनुभवी भूवैज्ञानिक मिळत असेल तर पाठवतो." ते समजल्यावर बेला हिरमुसली. माझ्या कडे अन्य पर्याय नव्हताच. त्या दोघांचा निरोप घेवून मी वळलो व मागं न बघताच लाऊंजमधे शिरलो.

इतर रसदार पर्याय