अश्रुतपुर्व - 1 Supriya Joshi द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

अश्रुतपुर्व - 1

बाबा माझ्यासाठी जेवणाचे ताट घेऊन आले, पाणी विसरले म्हणून ताट तिथेच ठेवून पाणी आणायला गेले आणि नेमका हेमंत आत आला. त्याला बघितले ....

ताट हातात घेऊन त्याला जोरात फेकून मारले. हेमंतचा जोरात ओरडण्याचा आणि ताट पडल्याचा आवाज ऐकून सगळेच आत धावत आले. हेमंतला कपाळाला खोच आलेली बघून काकू एकदम पिसाळल्या,"एकतर काही बोलत नाहीये. घुम्यासारखी बसून राहिली आहे, वर हेमंतला ताट फेकून मारते...." त्यांना जास्त बोलू न देता काकूंच्या हाताला धरून आज्जी त्यांना बाहेर घेऊन गेल्या. इतकावेळ स्तब्ध होऊन उभा राहिलेला हेमंतपण लगेच बाहेर पळाला. आईबाबा माझ्या जवळ येऊन बसले नि माझा सगळा बांध सुटला. मी जोरजोरात रडायला लागले. रडताना नेहमी शांत करणारे बाबा ह्यावेळी मात्र थोडे आनंदी झाले होते. खूपवेळ रडून मी हळूहळू शांत झाले. हळूहळू  गोळीचा असर होऊन मी झोपी गेले. थोड्यावेळाने जाग आली आणि मला माझा भूतकाळ डोळ्यासमोर आला. 

पणजोबांनी विचार करून पुढच्या पिढीला वेगळे राहूनपण  एकत्र राहता येईल ह्याप्रमाणे खूप मोठे घरं बांधले होते. त्यामुळे एकत्र कुटुंबात असूनही आम्ही वेगळे राहत होतो. सगळ्या सणासुदीला मात्र एकत्र  जमून खूप धमाल करायचो, जेवणपण एकत्र व्हायची. साधे हळदीकुंकू असले तरीही घरातलेच ४० जण असायचे. खूप मज्जा यायची. थोडेफार वाद, मानापमानपण व्हायचे पण तरीही मज्जा जास्त यायची. त्यामुळे तशी तडजोड करायची व सगळ्यांच्यात सामावून राहायची सवय होती.

 

तन्मयनंतर ४ वर्षांनी माझा जन्म झाला.  घरी अगोदर भरपूर भावंडं असल्यामुळे सगळ्यांना मुलगा किंवा मुलगी काहीही चालले असते. बाबांनामात्र  मुलीची खूप आवड. तन्मय झाला तेव्हा बाबा थोडे नाराजच झाले होते. ह्यावेळेस मुलगीच होणार ही बाबांना खात्री होती आणि देवाने त्यांची इच्छापण पूर्ण केली होती. मी झाल्यानंतर घरी आनंदीआनंद झाला होता. बाबांनी स्वतःहून सगळ्यांना बर्फी वाटली होती.

 

तिसऱ्या महिन्यात बारसे होणार असताना सगळ्यांनी भरपूर नावे सुचवली, आईतर एवढी नावे ऐकून गोंधळूनच गेली. सगळ्यांनी स्वतःला आवडणारी नावे एका चिट्ठीत लिहून द्यायची व तन्मय जी चिट्ठी उचलेल ते नाव ठेवायचे असे ठरले. पणजीपणजोबांच्या घरी हा कार्यक्रम पार पडणार होता त्यामुळे सगळेजण तिथेच जमले होते. पूर्ण घर भरल्यामुळे मी थोडी घाबरेन म्हणून मला घेऊन न जाता बाबांना घरी माझ्याबरोबर थांबायचे होते पण आईने त्यांचे काहीही न ऐकून घेता बाळाला आत्तापासून ह्या सगळ्याची सवय हवी म्हणून मला घेऊन जायचे हे ठरवले. एकच घर असल्याने २ मिनिटात तिथे पोहचलो तर सगळे आमची वाटच बघत होते. सगळ्यांनी आपापल्या चिट्ठ्या काढून खाली ठेवल्या, जवळपास पन्नास एक चिट्ठ्या झाल्या होत्या. हे बघून सगळेच हसू लागले. घरात मी सगळ्यात लहान होते त्यामुळे मोठ्या भावंडानी पण नावं लिहून आणली होती. अगदी तन्मयनेपण आईच्या मदतीने २-३ नावं लिहून त्याच्या चिट्ठ्या केल्या होत्या. सगळेजण खूपच आनंदी होते. आज्जीने अगोदर चहापाणी करून मग चिट्ठी उचलूयात असे सुचवले पण सगळ्यांनी त्याला नकार देऊन अगोदर नाव ठरवायचे नंतर सगळे, असे     सांगून तिला तिथे बसायला भाग पाडले. मीपण त्यादिवशी खूप खुश होते. प्रत्येकाला मला घ्यायचे होते त्यामुळे मी सगळ्यांकडे फिरत होते पण अजिबात रडले नाही की कुरकुर केली नाही उलट छान हसून मीपण  सगळ्यांशी खेळत होते. आईने बाबांकडे पाहून मला दाखवले तेव्हा बाबांनीपण लेक कोणाची आहे म्हणून कॉलर ताठ करून घेतली. प्रत्येकाला चिट्ठी काढायची घाई असल्याने तन्मयला बोलवून एक चिट्ठी काढायला सांगितली आणि प्रत्येकजण ती घेऊ लागल्यावर पणजोबांनी तन्मयला चिट्ठी त्यांच्याकडे आणून द्यायला सांगितले व नाव वाचले तर त्यावर 'सई' म्हणून नाव आले. तन्मय, श्रीराम काका, मीना मावशी, अर्पिता ताई आणि पणजोबा ह्यांनी त्याच नावाची चिट्ठी लिहिल्याने ते एकदम खुश झाले. बाकीच्यांनी मात्र तन्मय आता तुला आज चक्कर नाही मारणार गाडीवरून म्हणून त्याला अगदी रडू येईपर्यंत खूप चिडवले. शेवटी पणजोबांनी सगळ्यांना ओरडून तन्मयला मांडीवर घेऊन त्याला आवडणारे साखरफुटाणे देऊन शांत केले. 

क्रमशः