लग्नाअगोदर आणि लग्नानंतर - भाग १ Dr.Swati More द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

लग्नाअगोदर आणि लग्नानंतर - भाग १

खूप दिवसांनी , नाही नाही खूप वर्षांनी आम्हा मैत्रिणींची चांडाळ-चौकडी आज भेटली होती. कॉलेजपासूनची आमची चौघींची मैत्री.त्यावेळच्या आमच्या उचापती बघून आम्हाला चांडाळ-चौकडी हे नाव पडलं होतं.. धम्माल करायचो आम्ही कॉलेज मध्ये असताना..

कॉलेज विश्व संपलं आणि प्रत्येकीचा मार्गही बददला.. भेटणं खूपचं कमी झालं.पण आम्ही फोन वरती आणि व्हिडिओ कॉल्सवरती नेहमी एकमेकींच्या संपर्कात असायचो.त्या फोनरुपी भेटीला समोरासमोर मारलेल्या गप्पांची सर थोडीच येणार ! तरीही आम्ही दुधाची तहान ताकावर भागवून घ्यायचो..

एक दिवस मात्र नीलाचा फोन आला.." स्वाती मी ,राधा आणि मीनाला फोन करून सांगितलं आहे की आपण पुढच्या महिन्यात दोन दिवस वेळ काढून भेटतोय. त्यांनी अगोदर थोडे आढेवेढे घेतले पण मी कोणाचंही ऐकलं नाही.."

"अरे यार ! किती वर्षे आपली भेट नाही आणि मी तुम्हाला महिनाभर आधी सांगतेय.मला काही कारणं सांगू नका. आपण नक्की भेटतोय.." शेवटी नीलाच ती.. मीही हसत हसत ओके म्हणून ग्रीन सिग्नल दिला..

अगदी ठरल्याप्रमाणे सगळ्याजणी लोणावळ्याला दोन दिवसांसाठी गेलो.. खूप भारी वाटत होतं..
पण एक गोष्ट मात्र मला खटकत होती की...मस्तीखोर , खट्याळ, बोलकी असणारी आमची नीला मध्येच कुठंतरी हरवल्यासारखी वाटायची.

नंतर विचार केला, बहुतेक तिला सतिशची आठवण येत असेल .. आमच्या ग्रुपमध्ये तिचचं तेवढं लव्ह मॅरेज झालेलं..
मी तिला थोडं चिडवलं. तिनेही हसून काहीतरी जुजबी उत्तर देऊन वेळ मारून नेली..
दिवस मस्त एन्जॉय करण्यात गेला.. रात्री आम्ही जेवणं उरकून गप्पा मारायला बसलो..

"नीला कुठे आहे.."

"ती बघ बाल्कनीमध्ये , फोनवरती सतीशशी बोलतेय.जा तिला बोलवं " राधा म्हणाली..

मी गेले तर , "खुश असशील ना आज तू , मी नाही आहे तर , अजून घरी पण नाही गेलास . तरी बरं , मी प्राजुला आईकडे ठेऊन आले.. " इती......

मी तशीच पाठी फिरले..

थोड्या वेळने नीला पण आम्हाला जॉईन झाली.. मस्त गप्पांचा फड रंगला..

रात्री उशिरा झोपायला गेलो..मी आणि नीला एकाच बेडरूम मध्ये होतो..
तिची अस्वस्थता मला जाणवत होती..पण सुरवात कशी करू मलाच समजतं नव्हतं...

"नीला झोपली नाहीस अजून.."

"नाही गं. झोपचं येत नाहीये.."

"सतीशची आठवण येतेय का?.." मी मिश्किलतेने विचारलं..

तर भडकलीचं माझ्यावर...

"मी काही त्याच्या शिवाय राहू शकत नाही का ? तो मला टाळू शकतो , मला वेळ देऊ शकत नाही तर मीही तसं करू शकते . शकते काय,आजपासूनचं मी सुरवात केली आहे. चांगला धडाच शिकवते त्याला.."

मी अवाक् होऊन पहात राहिले..तिच्या लक्षात आलं की तिने नकळतपणे तिच्या मनातली भडास बाहेर काढली..

मी 'सॉरी' म्हणून गप्प झाले..

"स्वाती..रागवू नको गं,मी तुझ्यावर असं चिडायला नको होतं...मी कोणत्या परिस्थितीतून जातेय तुला माहित नाही.."

"मग सांग ना ,मी तुझी मैत्रीण आहे ना, आता पर्यंत किती तरी गोष्टी तू निर्धास्तपणाने माझ्याशी शेअर केल्यास मग आजचं का असं ?"

माझ्या या बोलण्याचा तिच्यावर काही अंशी परिणाम झाला..

"स्वाती , तुला तर माहीतच आहे. माझा नी सतीशचा प्रेमविवाह झाला . आपल्या कॉलेजमध्ये तर आम्हाला 'लव्ह बर्ड्स' , 'मेड फॉर एच अदर' म्हणायचे..
किती जपायचा तो मला. हॉस्टेलला असूनही आईबाबांची उणीव त्याने मला कधी भासू दिली नाही.. पैशाने गरीब होता पण मनाने श्रीमंत..

त्यामुळेच तर माझ्या घरच्यांचा विरोध पत्करून मी त्याच्याशी लग्न केलं.. कारण मला विश्वास होता की तो नक्कीचं मला सुखात ठेवणार..

लग्नानंतरचे दिवस तर खूप स्वप्नवतं गेले.. जरी आम्ही दोघं आपआपल्या नोकरीत स्ट्रगल करत असलो तरी घरी आलो की सगळं विसरून जायचो.. सुरवातीला खूप ऐशोआरामात नाही जगलो पण आयुष्यात प्रेम मात्र नक्कीचं होतं ..

रविवारी एक कप एकत्र घेतलेला चहा आणि जगजीतच्या गझल हे तर आमच्यासाठी स्वर्गसुखचं..

हळू हळू दिवस जात होते..मी प्रेग्नंट राहिले.. तुला सांगू किती खुश झाला होता सतीश!!
आमच्या संसाराच्या वेलीला नवीन फुल उमलणार होतं.. दोघंही खुश होतो पण काही जबाबदाऱ्या होत्या.नुकतंच नवीन घर घेतलं होतं. त्याचा कर्जाचा हप्ता जात होता. हा सगळा विचार करून मी जमेल तेवढे दिवस नोकरी चालू ठेवली.. नंतर मात्र बाळाला काही त्रास होऊ नये म्हणून हक्काची रजा घेतली.. प्राजूच्या येण्याने आनंद तर झालाचं. त्याबरोबर जबाबदारीही वाढली..

त्यात काही कारणांमुळे मला नोकरी सोडावी लागली.. तेंव्हा सतीशने खूप धीर दिला.. खूप काम करायचा तो त्या दिवसांत.मलाही त्याचे कष्ट दिसत होते.

काही वर्षांनी आमची आर्थिक घडी नीट बसू लागली.. प्राजुही मोठी झाली.. मी परत नोकरी करू लागले.

पण आमच्यात एक प्रकारचा दुरावा निर्माण झाला.
आमच्यातलं प्रेम कुठं तरी हरवल्यासारखं झालं..
सतीशचा खूप वेळ ऑफिसमध्ये जात होता आणि
सुट्टीच्या दिवशी तो मित्रांकडे जायचा..

मी त्याची वाट बघत बसायचे. रागवायचे.मला वाटायचं, तो मला पाहिल्यासारखं समजावेल, मला मिठीत घेईल.माझा राग घालवण्यासाठी लग्नाअगोदर काय काय करायचा तो. तसचं काही ना काही करून माझा राग घालवेल.. सुरवातीला थोडे दिवस केलंही त्याने पण आता मात्र मी रागवले की तो गप्प जेवून झोपून जातो किंवा मुद्दाम उशिराचं घरी येतो..

कधी कधी माझं शरीर त्याच्या बाहुपाशात जाण्यासाठी तळमळत असतं..
आम्ही शरीराने जवळ येतो , नाही असं नाही, पण पहिल्यासारखं त्यात इंटीमेट होणं आता कुठेतरी हरवलं आहे . कधी कधी हा कालावधीही खूप लांबतो.मी एवढी दिसायला सुंदर असूनही कसा तो माझ्यापासून असा दूर राहू शकतो??..

बरं.. बाहेर दुसऱ्या स्त्रीमध्ये गुंतला असेल असंही मला कधी वाटलं नाही.. कारण हा नेहमी घर आणि ऑफिस किंवा याचे काही जिवलग मित्र येथेच असतो.. फोनही कधी लॉक नसतो..

त्याचं असं वागणं.. अचानक त्याच्यात आलेली विरक्ती, खूप त्रास होतो गं मला..
मग माझी अशी चीड चीड होते. माझ्या मनाची होणारी तगमग कुणाशी बोलूही शकत नाही..

सांग स्वाती काय करू मी ??
कुणाचं चुकतं. माझं की त्याचं. हेही कळत नाही गं..मग रागाच्या भरात मगाशी जे बोलले तसं काही बाही बोलून जाते..

मी शांतपणे तिचं ऐकून घेतलं.. तिला सांगितलं, आता तू झोप. छान एन्जॉय कर दोन दिवस. यातून नक्कीच मार्ग निघेल.माझ्यावर विश्वास ठेव.

तिलाही काय वाटलं माहित नाही.. बहुतेक बुडत्यास काडीचा आधार मिळाला असावा.माझा हात हातात घेऊन छान हसली.. पण ती झोपल्यावर मात्र माझं विचारचक्र सुरू झालं.