धुस कुटुस Prabodh Kumar Govil द्वारा क्लासिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

धुस कुटुस


आणि खळबळ उडाली.
'विश्व विद्यानिकेतन' चा सुवर्ण जयंती समारंभ थाटामाटात साजरा केला जाणार असल्याच्या घोषणे बरोबरच डॉक्टर लीली पुटियन यांच्या नियुक्तीची खुशखबरही त्याच वेळी संस्थे ला मिळाली होती; हा तर दुग्धशर्करा योगच होता. 

आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या या इन्स्टिट्यूटच्या पन्नास वर्षांच्या इतिहासात प्रथमच, त्याच संस्थेच्या माजी विद्यार्थ्याला डायरेक्टर पदाकरिता नियुक्त करण्यात आले होते. लीली पुटियन यांचा बायोडेटा बघताक्षणीच बोर्ड ऑफ मॅनेजमेंटने एक मताने त्यांच्या नियुक्तीच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले.

गेल्या अनेक वर्षांपासून डॉक्टर लीली पुटियन ओमान येथील एका कॉलेजमध्ये डीन पदावर होते पण कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांचे नाव इथेही दुमदुमत होते. ते इथल्या 'माजी विद्यार्थी संघटनेचे ' सदस्य सुद्धा होते आणि बऱ्याच वर्षांपूर्वी असोसिएशन ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात हजेरी लावून गेले होते.

तसे त्यांचे कुटुंबीय मूळचे भारताच्या केरळमधील एका छोट्याशा गावातील, पण  वडील राजस्थानमध्ये येऊन स्थायिक झाल्यामुळे यांचे लहानपण येथेच गेले. कुटुंबाच्या स्थलांतराबद्दल अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत चित्रविचित्र गोष्टी सांगितल्या जायच्या.

लोकांचा असा अंदाज होता की ते बहुतेक कन्व्हरटेड ख्रिश्चन होते, जे नंतर आपलं गाव सोडून दुसऱ्या प्रदेशात जाऊन वसले.

काही लोकांचं असंही म्हणणं होतं की त्यांचे वडील तरुणपणी गावात बकऱ्या चरायला नेण्याचे काम करायचे आणि याच काळात त्यांचं तिथल्या एका श्रीमंत घराण्यातील मुलीवर प्रेम बसलं.
पण त्यांची लाडकी मुलगी एका गुराख्याच्या जाळ्यात फसली हे त्या प्रतिष्ठित जमीनदार खानदानी लोकांना अजिबात मंजूर नव्हते. त्यामुळे बऱ्याच धमक्या आणि थोडे पैसे देऊन त्यांच्या कुटुंबियांना तिथून हाकलून देण्यात आलं आणि हे लोक फिरत लपत- छपत इथे राजस्थानच्या वेशीवरील एका गावात येऊन राहू लागले.

इथे आल्यावर त्यांचा विवाह झाला. लवकरच दोन बहिणींच्या नंतर कुटुंबात छोट्या लीलाधरन यांचा जन्म झाला आणि एका छोट्याशा दुकानात नोकरी करता करता वडिलांनी तन-मन-धन पणाला लावून त्याला चांगलं शिक्षण दिले. ग्रामीण विद्यालयातील एकमेव शिक्षकांनी जेव्हा बघितलं की या छोट्याशा वस्तीत दोन लीलाधरन आहेत तेव्हा त्यांनी या मुलाचे नाव त्याच्या अंगकाठी कडे बघत लिलिपुटियन असं लिहिलं आणि सरकारी दप्तरात केरळचा हा लीलाधरन कायम करीता राजस्थानचा लिली पुटियन बनला.

मुलगा सुरुवातीपासूनच अभ्यासात अतिशय हुशार होता. चार इयत्ता थोडं इंग्रजी शिकल्यानंतर आपल्या नावाचा उच्चार तो स्वतः च लीली पुटीयन असा करू लागला
आणि याच संस्थेमध्ये एक दिवस प्रथम क्रमांकाने पास होऊन पुढील शिक्षणाकरिता लंडनला गेला.

पुढे अनेक देशांमध्ये राहिल्यानंतर एका प्रसिद्ध कॉलेजच्या डीन पदापर्यंत पोहोचला. पण हा सगळा पूर्व इतिहास होता.

 आता इथलं सगळं काही बदलून गेलं होतं आणि काही दशके लोटल्यानंतर आता तर याबद्दल माहिती असलेली एकही व्यक्ती इथे राहिली नव्हती.

हे नवे डायरेक्टर साहेब मुळात भारतीय असल्याची कोणतीही खूण कुठेच अस्तित्वात नव्हती.

लोकांना माहिती होते ते इतकेच की  यावेळेसचे डायरेक्टर साहेब परदेशातून येत आहेत. ओमान देशातून.

कोणास ठाऊक ते कसे असतील, कसे बोलत असतील, त्यांच्या कुटुंबात कोण कोण असेल, त्यांना भारत कसा वाटेल, इत्यादी इत्यादी

अशातच जेव्हापासून मीडिया मध्ये ही बातमी पसरली की ही लोकप्रिय आंतरराष्ट्रीय ख्याती ची संस्था आपली सुवर्णजयंती वेगळ्या प्रकाराने साजरी करणार आहे तेव्हापासूनच या संस्थेशी संबंधित अजून एक बातमी लोकांच्या चर्चेचा विषय बनली होती.

ही बातमी इथे दर वर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या युवा समारंभाच्या नावाबद्दल होती. या शानदार रंगीबेरंगी कार्यक्रमाचे नाव गेली कित्येक वर्षे लोकांच्या आकर्षणाचा विषय बनला होता - 'धुस कुटुस'.

हे नाव का ठेवलं गेलं आहे आणि याचा अर्थ काय हे कोणालाच माहीत नव्हतं; ना या विचित्र नावाचा संबंध या सांस्कृतिक कार्यक्रमाशी कसा आणि का जोडला गेला ते. हे नाव अनेक वर्षांपासून दिलं जात होतं आणि सर्व विद्यार्थी आणि संस्थेमधील कर्मचारी या नावाला स्वीकारून उत्साहाने हा कार्यक्रम साजरा करत आले होते.

अजून एक मजेशीर गोष्ट ही होती की या नावाचा चा शोध घेण्याचा, तपास करण्याचा प्रयत्न खूप वर्षांपासून चालू होता. इतका की गुगल सर्च मध्ये सुद्धा या नावाला शोधलं गेलं होतं पण याचा कुठेच कोणालाच कोणताच अर्थ सापडत नव्हता. विशेष गोष्ट ही होती की यावेळी सुवर्ण जयंती महोत्सव असल्याकारणाने हा कार्यक्रम नेहेमीच्या पेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात आणि धामधुमी ने साजरा करण्यात येणार होता. याची तयारी  आत्तापासूनच सुरू झाली होती. अजून एक योगायोग हा होता की नवीन डायरेक्टर साहेब इथे येऊन जॉईन झाल्यानंतर पंधरवड्यातच हा समारंभ होणार होता. समारंभाचं नाव बदललं जावं का? याची चर्चा कार्यकारिणीच्या सदस्यांमध्ये वेळोवेळी होऊ लागली होती.
परदेशातून येणाऱ्या डायरेक्टर साहेबांचे प्रथमदर्शनी संस्थेबद्दल काय मत होईल, जेव्हा अगदी थाटामाटात साजरा केल्या जाणाऱ्या उत्सवाच्या नावाचा अर्थच त्यांना कोणी सांगू शकणार नाही. त्यांना काय वाटेल? त्यांच्यावर कसे इंप्रेशन पडेल? एक अतिशय नामांकीत शिक्षण संस्था वर्षानुवर्ष एका अशा कार्यक्रमाचे ओझे डोक्यावर वाहते, ज्या कार्यक्रमाच्या नावाचा अर्थ सुद्धा इथल्या कोणाला माहिती नाही.
डायरेक्टर साहेब सगळ्यांना जुन्या विचारसरणीचे समजतील. त्यांच्यावर पहिली छाप पण नीट पडणार नाही.
आणि जर समारंभाच्या आधी आयोजित केल्या गेलेल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये मिडीयाने त्यांनाच कार्यक्रमाच्या नावाचा अर्थ विचारला तर? तर त्यांना किती लाजिरवाणं वाटेल! सगळे लोक एकमेकांकडे बघू लागतील.
इतक्या मोठ्या आंतरराष्ट्रीय इन्स्टिट्यूटचे जगभरात किती हसं होईल? सुवर्ण जयंती महोत्सव असल्यामुळे सारे शहर जमा झाले असेल. देश-विदेशात ही चर्चा केली जाईल की ही संस्था नावाचा अर्थही न जाणता एक भव्य कार्यक्रम आयोजित करते. 
गंभीर चर्चा आणि विचारविनिमयानंतर  संस्थेच्या या वार्षिक युवा कार्यक्रमाचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. नव्या नावात चा शोध जारीने घेण्यास सुरुवात झाली.
पण यात एक अडचण होती.
वर्षांपासून साजरा केल्या जाणाऱ्या या धुस्- कुटुस समारंभाच्या संबंधित सर्व प्रचार साहित्य, पोस्टर्स, बॅनर्स, स्टेशनरी इत्यादी सगळे याच नावाने होते. कार्यक्रमाच्या अधिकृत बोधचिन्हात सुध्दा हेच नाव मध्यवर्ती होते.
अशा परिस्थितीत सर्व काही अचानक बदलणे यातायातीचे आणि जिकिरीचे तर होतेच पण बरेच खर्चिक पण होते.
मग शेवटी बऱ्याच विचारविनिमयानंतर नाव बदलण्याची योजना बासनात गुंडाळून ठेवली गेली. वेळ अतिशय थोडका होता, बघता बघता संपून गेला आणि नव्या डायरेक्टर साहेबांचे येथे आगमन झाले. अतिशय उत्साहात त्यांचे स्वागत करण्यात आले.
एका परदेशी विद्वान माणूस आपला नवा प्रमुख आहे या विचारांनी सर्व लोक प्रभावित झाले होते. लवकरच संस्थेच्या सुवर्ण जयंती समारंभाची तयारी सुरू झाली. विद्यार्थी आपल्या आपल्या उपक्रमात मग्न झाले तर संस्था आपल्या तयारीत. 
अतिशय उत्साहाने आणि तडफेने नवीन डायरेक्टर साहेबांच्या पहिल्या वहिल्या कार्यक्रमाला नव्या मोठ्या नेत्याला उद्घाटना करिता बोलवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. सर्व वृत्तपत्रे, टिव्ही चॅनल्स आणि इतर प्रसार माध्यमातील लोकांना बोलावून एका भव्य प्रेस कॉन्फरन्स चे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये सर्वांना डायरेक्टर साहेबांचा रीतसर परिचयही करून देण्यात आला.
आणि शेवटी तेच घडलं ज्याचे भय होते! देशातील सगळ्यात मोठ्या न्यूज चैनल च्या एका झुंजार पत्रकाराने डायरेक्टर साहेबांना हा कटु प्रश्न विचारलाच की संस्थेच्या सुवर्ण जयंती महोत्सवामध्ये जो संस्कृतिक समारंभ सादर केला जाणार आहे त्याच्या नावाचा काय अर्थ आहे? यावर लाखो रुपये खर्च करण्यामागे कारण तरी काय आहे? धुस् कुटूस म्हणजे नक्की आहे तरी काय ?
सर्व लोकांमध्ये निःशब्द शांतता / सन्नाटा पसरला. Pin drop silence!
सर्व जण एकमेकांकडे बघू लागले. Senior प्रोफेसरांचा श्वास घशातच अडकला. सर्वांना वाटले आता डायरेक्टर साहेब त्यांना याचे उत्तर विचारतील. जो तो नजर चुकवू लागला. याचीच तर भिती होती सर्वांना.
आता नवीन डायरेक्टररांच्या  समोर अप्रतिष्ठा तर होईलच पण सार्‍या कॉलेजची जगामध्ये थट्टा केली जाईल ते निराळंच. आता हा सारा मामला उद्या सर्व वृत्तपत्रांमध्ये छापून येईल. कोणाला काही सुचेना. सर्व पत्रकार आता अजूनच उत्साहात आले.

हा प्रश्न विचारणारे पत्रकार महाशय आपली नजर रोखत पुन्हा तोच प्रश्न विचारण्या करिता उठायला लागले. परंतु तितक्यात कपाळावर एक बारीकशी आठी असूनही चेहऱ्यावर स्मितहास्य आणून डायरेक्टर साहेबांनी माइक थोडा आपल्याजवळ सरकवला. 
त्यांनी कोणाला काहीच विचारलं नाही आणि अगदी सहजतेने म्हणाले, ' gentleman, there is a very interesting story behind it..... या नावाच्या मागे एक अतिशय मनोरंजक कथा आहे. ती मी तुम्हाला सांगतो'. असं म्हणून डायरेक्टर साहेब पाच पन्नास वर्ष जुन्या कुठल्यातरी घटनेमध्ये जणू काही हरवून गेले. म्हणाले, आजपासून बरोबर पन्नास वर्षांपूर्वी मी सुध्दा या संस्थेचा एक विद्यार्थी होतो. दक्षिण भारतातून आल्यामुळे हिंदी भाषा जाणत नव्हतो. परंतु मी गाणं खूप छान गायचो. मला सिनेमातील गाण्यांचे बोल पूर्णपणे लक्षात रहायचे नाहीत पण मी चाल अगदी हुबेहूब लक्षात ठेवून गाणं म्हणायचो आणि बरोबरीच्या सगळ्यांना ते आवडायचं सुद्धा. एक दिवस मी स्टेजवर गाणं म्हणत होतो, गाण्याचे शब्द होते , ' आओ ट्विस्ट करें, जिंदगी है यही... गा उठा मौसम '. मी अगदी जोशात येऊन गाणे म्हणत होतो आणि मुलं टाळ्या शिट्ट्यांचा पाऊस पाडत होती. पण मध्येच मी गाण्यातील शब्द विसरून गेलो आणि मी म्हणालो, ' आओ ट्विस्ट करें, जिंदगी है यही... धुस- कुटुस मौसम...'
प्रेस कॉन्फरन्स चा सगळा हॉल टाळ्यांच्या कडकडाटाने दणाणून सोडला. सर्वचजण अवाक झाले होते आणि डायरेक्टर साहेबांच्या डोळ्यांच्या कडा हसता-हसता पाणावल्या होत्या.
(मूल लेखक: प्रबोध कुमार गोविल, मराठी अनुवाद: प्राजक्ता सोमण )