श्रीकांत आणि माझं लग्न अरेंज मॅरेज .. आम्ही दोघं लग्नाच्या निर्णयापर्यंत पोहचण्याअगोदर एकदा भेटलोही.. मला त्या भेटीत, त्याला नकार द्यावा असं त्याच्या स्वभावात काहीच वावगं वाटलं नाही, मी कॉम्प्युटर इंजिनियर आणि श्रीकांत मेक्यानिकल इंजिनीयर , तो एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये उच्च पदावर कार्यरत होता, त्याच्या घरची सगळी सुशिक्षित आणि सुसंस्कृत वाटली. माझ्या घरच्यांनाही हे स्थळ खूप आवडलं. फायनली आम्ही लग्न करण्याच्या निर्णयापर्यंत आलो. तसं पाहिलं तर श्रीकांतला खूप श्रीमंत मुली सहज मिळाल्या असत्या. तरीसुद्धा माझ्यासारख्या गरीब मुलीला त्याने आणि त्याच्या घरच्यांनी पसंत केले म्हणून सगळे त्याचं कौतुकच करत होते.
त्यांनी लग्नात पण खूप समजूतदारपणा दाखविला.. मुलीकडचे आहेत म्हणून आमची कुठेही अडवणूक केली नाही.. खर्चही अर्धा अर्धा केला..
लग्नानंतरचे नवलाईचे नऊ दिवस कसे गेले समजलंही नाही.मी खूप खूष होते. आमच्या लग्नाला एक वर्ष झालं.
एक दिवस मी श्रीकांतला, "माझ्यासाठी आता मी नोकरी शोधायला सुरवात करू का ? "असं विचारलं
" काय गरज आहे तुला नोकरी करायची! माझी एवढी चांगली नोकरी आहे, आपली घरची आर्थिक परिस्थितीही चांगली आहे, गाडी, नोकर-चाकर सगळ आहे, तुला कशाची कमी नाही, मग नोकरी कशाला?"
त्याचा हा परतवार माझ्यासाठी खूपच अनपेक्षित होता.. मी त्याला माझ्यापरीने समजवण्याचा प्रयत्न केला पण तो काही ऐकायला तयारच नाही. मीही मग उगाच जास्त वाद नको म्हणून गप्प राहिले.. हळू हळू माझ्या लक्षात काही गोष्टी येऊ लागल्या. या घरात स्त्रियांचे मत अजिबातचं विचारात घेतलं जात नाही आणि याचा प्रत्यय मला पावलोपावली येऊ लागला. माझ्या सासूबाई जास्त का बोलत नाहीत हे मला समजू लागले. पण त्यांनी गप्प राहून ही परिस्थिती स्वीकारली होती.
त्यांचीही घुसमट होत असणार , पण नवऱ्याच्या सुखात त्यांनी आपलं सुख मानलं होतं. मला मात्र हे तितकसं रुचल नाही. बहुतेक हा त्यांच्या आणि माझ्या पिढीतील फरक असावा किंवा शिक्षणाने माझी बदललेली विचारसरणी ...
थोड्या दिवसातच मला दिवस गेले..मी आई होणार या विचाराने , माझे हे दुःख तेवढ्यापुरत का होईना विसरून गेले..
अर्णव झाला, त्याच्या येण्याने आमचा संसार अजून फुलला.. बघता बघता दिवस, महिने, वर्षे सरली आणि अर्णव पाच वर्षाचा झाला..
परत माझ्या मनात नोकरी करण्याविषयी विचार येऊ लागले.. एक दिवस श्रीकांतचा मुड बघून मी परत विषय काढला.
एवढ्या वर्षांनीही त्याचे विचार बदलले नव्हते.. तो त्याच्या मतावर ठाम होता.. आता मात्र मला त्याचं वागणं खटकायला लागलं. माझ्या शिक्षणाचा काहीच उपयोग होणार नाही का ? या विचाराने डोकं बधीर झालं..
आई बाबांशी बोलले तर त्यांनीही श्रीकांतचीच बाजू घेतली..
"कशाला हवी एवढी धावपळ , घरी मस्त रहा की.. नवरा आहे ना कमावता. खरं तर तू स्वतःला नशीबवान समजायला हवंस . तुला एवढा श्रीमंत आणि प्रेमळ नवरा मिळाला "
त्यांची प्रेमाची व्याख्या किती संकुचित होती......
आता तर माझी घुसमट जास्त वाढली..
मी सगळ्यांना समजवण्याचा अटोकाट प्रयत्न केला..मी घर आणि नोकरी याचा समतोल साधण्याचा प्रयत्न करेन..
'हवं तर मी सुरवातीला पार्टटाइम नोकरी करते म्हणजे अर्णवकडे दुर्लक्ष नाही होणार.,'असंही सुचवलं ...
पण मला मी घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग करु द्या. पैसा कमवणे हे एकच माझं ध्येय नाही..मला स्वतः चा आत्मविश्वास वाढवण्यासाठी नोकरी करायची आहे.. या जगात मला माझं स्थान निर्माण करायचय...
पण.. एक ना दोन काही उपयोग झाला नाही...
श्रीकांत, त्याच्या नि माझ्या घरचे जी कारणं देत होते तिचं मुळी मला पटत नव्हती. मला लग्नाअगोदरचे दिवस आठवले. मला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मिळालेली अनेक बक्षिसं, वेळीवेळी माझ्या शिक्षकांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास.. पण आता त्याचा काहीच उपयोग होणार नाही, या विचाराने मला खूप अस्वस्थ वाटू लागलं...
माझ्यातील स्त्री हार मानायला तयार नव्हती.अर्णवचा विचार मनात येऊन आपण करतोय ते योग्य आहे ना असं किती तरी वेळा माझ्या मनात आलं पण आता जर ठाम निर्णय घेतला नाही तर परत कधीच हे शक्य होणार नाही हे मला पटलं.. मनातल्या मनात याविषयी बरीच द्वंद झाली आणि शेवटी घटस्फोट घेण्याच्या निर्णयास आले..
"आता तुम्हीच सांगा.. काय चुकलं माझं.."
मी फक्त हसून तिच्या पाठीवर हात ठेवला.. तिला धीर दिला पण ती चूक की बरोबर यावर त्या क्षणाला भाष्य टाळले..
एकदा श्रीकांतलाही भेटून त्यांची बाजू ऐकायची मनात ठरवलं.