२.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी परतलो. दरवाजा उघडाच होता. आतून कुणी बाहेर यायचे चिन्ह दिसेना. झोपाळा रिकामाच होता. मी बेल वाजवली तशी ती बाहेर आली. छानच दिसत होती. मी आत शिरणार तोच म्हणाली, "सॉरी. बाबांना अर्जंट जावे लागले गावी. त्यांच्या काकाचा मुलगा एकाएकी वारला. कालच गेले ते. एवढ्या तडकाफडकी जावे लागले ना की त्यांच्याशी पेपर्स बद्दल काही बोलूही नाही शकली ताई. तुम्ही ही फाईल तुमच्याकडेच ठेवा. सॉरी हां.. काल घाईत तुमचा नंबरही नाही घेतला तिने. उगाच खेप पडली तुम्हाला."
उगाच खेपेचे काही नाही. तिला बघायला मी दररोज यायला तयार होतो. पण ही अशी का ती आणि तिने म्हणतेय?
"चांगला तरणाताठा हो.. अचानक गेला. ताई आणि बाबा गेलेत.. सांगितलेय मला ही फाईल द्यायला."
तो गेलेला 'तो' असाच की पॉलिसी घेऊन गेला? मी विचारणार होतो. जातिवंत विमा एजंटाला असे प्रश्न पडतातच! आणि ते पडल्याशिवाय कंपनी कामावर घेत नसावी!
"तुमचा नंबर देता का?"
मी माझे कार्ड दिले तिला. न बघता बाजूला ठेवत म्हणाली, "आले परत की फोन करते. सॉरी परत एकदा."
"इट्स ओके.."
मी पुढे मॅडम बोलणार होतो चुकून.
मी तीन माळे उतरून निघालो. आजचा मेनू.. हवा! ती खात निघालो. तिच्या त्या बोलण्याचे आश्चर्य करीत. हिचे नाव काय असावे? सुहानी सहानी? की सावनी सहानी? हिची ताई कोण? असे बोलतेय जणू तिच्या ताईला मी ओळखतो.. आणि काल ही नव्हतीच? मग वो कौन थी? काल प्रेमाने वडे खाऊ घालणारी.. सहानींच्या घरात शुद्ध मराठी एखादी कन्या बोलत असेल.. म्हणजे ती कालची. पण आजपण ती छानच बोलत होती. म्हणजे ही कालची आणि आजची एकच.. अचानक तो त्या घरातला झोपाळा आठवला. मी गेलो तेव्हा हलत नव्हता आपोआप एवढे नक्की. पण काही भुताटकी तर नाही? चालता चालता माझ्या लक्षात आले, ही सारी किमया माझ्या रिकाम्या पोटाची आहे. खायला मिळेल अशा आशेने दुपारी नीट जेवलो ही नव्हतो. भूक सहन होत नाही मला. त्यामुळे तिच्या बोलण्याचे भलभलते निघताहेत अर्थ! काही खायला हवे! नुसती हवा खाऊन चालायचे नाही! जवळपास हॉटेल नव्हते. पोटातले कावळे कालच्या बटाटावड्याची वाट पाहात कोकलत होते. तसाच निघालो पुढे तंद्रीत मी तर समोर अविनाश.
अविनाश म्हणजे अवि.. माझा जुना दोस्त. कित्येक वर्षे आमची दोस्ती टिकून आहे ती आमच्या खाण्याच्या आवडीमुळे. उगाच मैत्री तुटेल म्हणून त्याला मी पॉलिसी काढण्याबद्दल अजूनही विचारलेले नाही. म्हणजे आमची मैत्री किती पक्की आहे ते समजेल. दर रविवारी आम्ही इडली डोसा नाहीतर मेदूवडा वगैरे दाक्षिणात्य पदार्थ खातो एकत्र. अवि त्याच्या सवयीनुसार त्यावर गाणे गातो.. उडप्यासाठी.. 'एक इडली तू मुझको उधार दे दे.. बदले में इसको काम पे ले ले!' इसको म्हणजे मला! उधार इडलीच्या बदल्यात मी त्याची इडलीपात्रे नि डोशाचे तवे घासावेत असा त्याच्या प्रतिभेचा कल्पनाविलास! अविची ती सवयच आहे. कुठलेही गाणे आपल्याला हवे तसे बदलून म्हणत असतो. कधीकधी वात आणतो तो.
तर आमच्या या साप्ताहिक बैठकीत खात खात आम्ही आठवड्याचा आढावा घेतो. आणि पुढच्या आठवड्याचे प्लॅन्स बनवतो.
गेल्या काही महिन्यांत अवि खूपच बिझी होता. नाही म्हणजे कामात नव्हे. त्याचे आणि त्याच्या मैत्रिणीचे जुळत आलेले.
'मी लाजून विचारले.. तिने बिनधास्त हो म्हटले..' ही स्टेज बाकी होती. हा मूळ काव्य बदल अर्थातच त्यानेच केलेला. पण कुणाचे कितीही जुळले तरी आमची रविवारीय भेट चुकवायची नाही हा आमचा करार. त्या जुळण्याच्या क्षेत्रात मी मागेच पडलेलो. त्याने प्रगती साधलेली. आमच्या भेटींमुळे मला तसे अपडेट होतेच. त्यात हा असा रस्त्यात मध्येच भेटावा? त्याच्या मैत्रिणीला मी अजून पाहिले नव्हते पण अविची एकूण आवडनिवड पाहता ती कशी असावी याचा अंदाज बांधला होता मी. तो या रविवारी दाखवणार होता तिचा फोटो.
"अव्या.. साल्या इथे कुठे?"
"कुठे? तू इथे कुठे?"
"अरे क्लाएंट. कामाचा माणूस मी. तू इकडे?"
"असाच.."
"तू आणि असाच? दाल में कुछ काला है यार.. बोल. बोलून टाक.. आय विल गेस.. तू लपवतोयस म्हणजे नक्कीच तुझ्या जीएफ ची भानगड असणार!"
"हुशार रे तू.. चल खाऊ काहीतरी.."
"खाऊ. पण तू भाव खाऊ नकोस.."
जवळच्या उडप्याकडे बसलो आम्ही. पोटात कावळे कोकलताहेत. या उडप्याची ऑर्डर म्हणजे 'संथ वाहते कृष्णामाई.' तशी आम्हाला घाई नव्हतीच. फक्त पापी पोट थोडा निषेध करीत होते त्या विलंबाबद्दल. डोश्याची ऑर्डर येईपर्यंत आम्ही शांत होतो. मसाला डोश्याच्या पोटातली भाजी अविच्या पोटात गेली थोडी नि त्यानंतर त्याला कंठ फुटला..
"अरे.. ते गाणे आहे ना.. जाने क्यूं लोग मोहब्बत किया करते हैं.. तसे झाले"
"म्हणजे?"
"अरे ती आज भेटणार होती."
"इथे?"
"जवळच राहते ती. मी तिला म्हटले.. तुझ्या या बिल्डिंगच्या पाठी थांब तू गडे जराशी.. आम्ही नेहमी भेटतो तिथे.."
"मग.. आज माशी स्नीझ्ड?
"तिला जावे लागले बाहेर. काहीतरी झाले आणि अर्जंट. त्यामुळे मी असा देवदास बनून फिरतोय."
"शेवटचा कधी भेटलेलास तिला? देवदास? नाही म्हणजे दाढी तितकीशी वाढलेली दिसत नाही म्हणून विचारतोय.."
"वाढेल रे.. बढती का नाम दाढी.. कालच तर भेटलेली ती. आज फिर मिलनेकी तमन्ना थी.. आणि तीच नाही!"
"बापरे.. तब्बल बारा पंधरा तासांच्या विरहाने झाली तुझी ही अवस्था?"
"ये प्यार क्या होता है.. तुम क्या जानो.. सुधीर बाबू!"
माझे नाव सुधीर नाही. पण डायलॉगच्या सोयीसाठी ते नामकरण तसे करायला अविला काही वाटत नाही.
"चल तुला माझी कालची गंमत सांगतो. म्हणजे तुला जरा बरे वाटेल.." मी त्याला कालच्या बटाटेवड्याची आणि ते बनवणारीणीची गोष्ट सांगणार होतो.
"ये जुल्मी प्यार.. न चैन से जीने देगा.. न खाने देगा!" अवि दुसऱ्या डोश्याची ऑर्डर देता देता म्हणाला. "तरी पण ऐकतो तुझी कहाणी.. बोल."
"अरे.. काल एका क्लाएंटने भरपेट खाऊ घातले बटाटेवडे! सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते बनवणारी सुगरण फारच सुंदर होती रे."
"परत कधी भेटेल ती?"
"ठाऊक नाही! त्यामुळे तसा आज मीही थोडाफार देवदासच आहे!"
"देवदास.. थोडा? देव किंवा दास? नहीं.. या तो वो पूरा होता है या नहीं. देवदास कभी आधा होता है लल्लू? आधा देवदास.. कधी ऐकलेय कुणी? अर्धामुर्धा देवदास म्हणे!"
"अरे, मला आज तिलाच भेटायला जायचे होते.. आणि ती पण.. भेटली पण. नाही पण भेटली."
"तू ठीक आहेस ना? कोड्यात बोलू नकोस.. एक ऑनियन उत्तप्पा.. डबल चटणी.."
हे शेवटचे वेटरला उद्देशून. अन्न गोड न लागणारा हा देवदास इतके खातो.. गोड लागले तर.. मुळापासून खाईल?
"चटणी! किती छान होती ती.."
"काय चटणी?"
"यस्स.. चटणी पण आणि ती बनवणारी पण. अरे झाले एवढेच की मी गेलो होतो पण सहानी लोक गावी गेलेत. ती होती, पण म्हणाली नंतर या. सकाळपासून भुकेला आहे रे मी!"
बोलता बोलता माझ्या तिसऱ्या इडली प्लेटीतली पहिली इडली मी सांबाराच्या दुसऱ्या वाटीत बुडवली.
"मग.. ये प्यार की भूख है दोस्त.. नुसती भेटलेली ती.. पुढे काही नाही.. तर ही अवस्था. तर मेरा क्या होता होगा कालिया. विचार केलायस कधी?"
"हुं.. म्हणजे वुई आर सेलिंग इन सेम बोट?"
"सेम बोट माहिती नाही.. पण वुई आर इटिंग इन सेम प्लेट.." मी त्याच्या प्लेटीतल्या उत्तप्प्याचा तुकडा तोडत होतो त्याकडे बोट दाखवत अवि म्हणाला.
एरवी आम्ही इकडतिकडच्या गप्पा मारतो पण आज दोघेही दुसरे काही सुचण्याच्या मनस्थितीत नव्हतो. बारा तासांच्या विरहाने अवि व्याकूळ आणि कशाला कशाचा पत्ता नसताना मी!
"चल.. दे बिल.." त्याने ऑर्डर सोडली..
"मी का? रविवारी मीच भरलेले.."
"अरे.. माझी अवस्था बघ.. तोळामासा. पूर्ण देवदास. तू अजूनही अर्धामुर्धा देवदास! विरहवेदनेत व्याकूळ मी. माझी स्थिती तरी आहे का बिल भरण्यासारखी? तर मी दिल देतो.. तू बिल देके देखो.. बिल देके देखो जी!"
मी निमूटपणे बिल भरले. अवि आपल्या कामाला निघून गेला. मी पण रमतगमत निघालो. कालच्या बटाटेवड्यापुढे इडली न डोसा.. उगाच तुलना करत निघालो.
पुढे काय? कसले काय! वाट पाहाणे आणि काय! पुढे काही दिवस त्या बटाटेवड्यांची चव आठवण्यात गेले. चटणी किती चविष्ट होती. आणि ते बनवणाऱ्या हातांची मालकीण.. कधी ग येशील तू? खरेतर कधी गं बोलावशील तू?