बायको माझी प्रेमाची! - 1 Nagesh S Shewalkar द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

बायको माझी प्रेमाची! - 1

१)

नवरा- बायको अत्यंत जिव्हाळ्याचे, प्रेमाचे आणि तितकेच नाजूक नाते! व्यक्त- अव्यक्त प्रेमाची एक घट्ट वीण असलेले नाते. रुसवेफुगवे, हसणे-खेळणे, वादविवाद, सुसंवाद, लटका राग, प्रसंगी संताप, चिडचिड इत्यादी अनेक भावभावनांचे पदर गुंफलेले नाते म्हणजे पतीपत्नी! दोघेही एकमेकांची हौसमौज, आवड-निवड जपताना, काळजी आणि चिंता वाहताना एकमेकांना सांभाळून घेण्याचा वसा घेतलेले आणि जीवापाड जपणारे असे नाते म्हणजे पतीपत्नी! अशाच एका नवराबायकोच्या आगळ्यावेगळ्या प्रेमाची गोष्ट एका नवऱ्याच्या तोंडूनच ऐकूया...

त्यादिवशी सकाळी मी झक्कास आळस देऊन उठलो. समाधानाची एक अनुभूती शरीरात संचारली असताना मला काही तरी आठवले आणि माझे लक्ष समोरच्या घड्याळावर गेले.

'बाप रे! आठ वाजून गेले. किती वेळ झोपलो मी? जाग कशी आली नाही? बरे, मला जाग आली नाही तर आली नाही पण हिने उठवले कसे नाही? रोज बरोबर सातच्या ठोक्याला मला उठवते आणि आज काय झाले?' असा विचार मनात येताच मी शेजारी बघितलं आणि मला प्रचंड धक्का बसला. मला नेहमीच झोपेत स्वप्नं पडतात. हेही स्वप्नच असेल का कारण असे म्हणतात की, जे मनी वसे ते स्वप्नी दिसे, अनेक वर्षांपासून मी जी जागेपणी स्वप्नं पाहत होतो ते प्रत्यक्षात माझ्या शेजारी तर येऊन पहुडले नाही ना, या विचारात मी स्वतःला चिमटा घेतला. त्या अवस्थेत चिमटा जरासा जोरात घेतल्यामुळे मी जोराने विव्हळलो. पुन्हा शेजारी बघत डोळे चोळले आणि मनाशीच म्हणालो,

'ही अजून उठली नाही? कसं शक्य आहे? दररोज पाच-साडेपाचला ही उठते. मी जागा होईपर्यंत हिचे सारे आटोपलेले असते आणि आज? हे काय? हिचा असा अवतार? कमरेच्या खाली येणाऱ्या वेण्यांचा बॉबकट? साडीऐवजी गाऊन? हे दोन्ही बदल रात्रीतून? रात्री तर लांबसडक केस होते.

आयुष्यात कधीच पालथी न झोपणारी बायको आज पालथी झोपली? ही-ही माझी बायको असूच शकत नाही. मग ही कोण? क... क... कोण आहे ही? आहे सौंदर्यवती पण माझ्यासाठी अवदसा तर ठरणार नाही ना?' असे मनाशीच बोलत बोलत मी पलंग सोडला. घरभर सर्वत्र अगदी न्हाणी, शौचायलामध्येही डोकावले परंतु हिचा कुठेही पत्ता नव्हता. दार उघडले. अंगण झाडले नव्हते. सडाही टाकलेला दिसत नव्हता. काल सकाळी काढलेल्या रांगोळीचे रंग फिके पडले होते. तसाच माझ्याही चेहऱ्याचा रंग उडालाच असणार. कारण माझ्या शयनगृहात, माझ्या शेजारी पहुडली ती स्त्री कोण आहे यापेक्षा गहन प्रश्न मला भेडसावत होता तो म्हणजे माझी पत्नी मला न सांगता गेली कुठे?  मी पुन्हा शयनगृहामध्ये आलो. तिथे पलंगावर ती स्त्री तशीच पसरलेली होती. गाऊन बराच वर सरकला होता. गाऊनमधून तिच्या शरीराचा आकार, उकार, ऱ्हस्व, दीर्घ सारे स्पष्ट होत होते. माझी बायको लघुआकाराची असताना दीर्घाकार माझ्या पलंगावर चक्क घोरत होता. मला उठल्याबरोबर चहा लागतो. हे माझ्या पत्नीला सवयीने पाठ झाले होते. मी ब्रश करायला गेलो, की चहा करणे हा जणू तिचा नित्यपाठच! त्यात कधी खंड पडणे सोडा एक सेकंदही इकडे तिकडे होत नसायचा. तिच्या रक्तातच ते भिनले होते त्यामुळे हातातली इतर कामे बाजूला सारून ती पाण्याचा प्याला आणि चहाची कपबशी घेवून हजर असे. तिचे सुस्नान रूप दररोज पाहून शरीरात उत्साह, स्फूर्ती संचारत असे. सुरवातीला भान विसरून अनेक वेळा मी तिला जवळ घ्यायचा प्रयत्न केला परंतु तिने तो यशस्वी होवू दिला नाही. ती त्यावेळी म्हणायची,

"राजेसाहेब, आता लाडात यायचे काही एक कारण नाही. माझे स्नान झाले आहे. पूजा बाकी आहे. तुमचा नाष्टा, डब्बा करावा लागेल ना? ते सोडून इथे तुमची इच्छापूर्ती करीत बसले तर मग सर्वच कामांना उशीर होईल क्का नाही. चहा घ्या नि शहाण्या माणसासारखे पटापट आवरून घ्या..." असे म्हणत कधी मला अंगठा दाखवत, कधी जीभ दाखवून वेडावत ती निघून जात असे.

"अहो...अहो..." मी आवाज दिले परंतु काहीही फरक पडला नाही. त्या बाईने साध्या बोटाचीही हालचाल केली नाही. ती बाई लवकर उठणे माझ्यासाठी अत्यंत गरजेचे होते कारण बायको काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेली असली आणि ती परत येताच ह्या साडेसातीला तिने अशा अवस्थेत पाहिले तर माझे काही खरे नव्हते. ही काय नसती आफत आली म्हणावी असे म्हणत मी पुन्हा स्वयंपाकघरात आलो. कसा तरी चहा उकळून घेतला. दररोज मिळणारा बायकोच्या हातचा चहा आणि 'आपला हात जगन्नाथ' कंपनीचा मी केलेला चहा यांच्यामधील विसंगती लगेचच जाणवत होती. पहिल्याच घोटात चहाच्या चवीतील स्वर्ग आणि नरक हा भेदही लक्षात आला. बायकोच्या हातच्या पहिल्या चहानंतर दिवसभर चहा नाही मिळाला तरी चालेल अशी माझी धारणा झालेली त्यामुळे तिच्या हातच्या चहाची एवढी सवय लागली, की पाहुण्यांकडे मुक्कामाला गेलो तरी सुरवातीला माझी चहाची तल्लफ भागायची नाही. मग हिनेच पाहुण्यांच्या घरी माझ्यासाठी चहा करायला सुरवात केली.अनेक पाहुण्यांना ती गोष्ट माहिती झाली होती मात्र नवीन ठिकाणी जाताच पंचाईत होत असे. चहाचे एक दोन घोट गळ्याखाली जाताच मला अचानक आठवले...

चहाचा कप तसाच खाली ठेवून मी भ्रमणध्वनी उचलला. स्पीड डायलमधील हिचा क्रमांक ०१ दाबला काही क्षणात हिचा गोड आवाज आला,

"गुड मॉर्निंग ! उठलात की उठवले? तुम्हाला रोज उठवावे लागते ना म्हणून विचारले हो."

"ते जाऊ दे ग. इथे वेगळाच प्रसंग उभा राहिला आहे. तू कुठे आहेस? ती-ती पलंगावर कोण आहे?"

"ती.. ती.. कोण? आणि पलंगावर? अहो, ते तुम्हाला माहिती असणार ना? माझ्या पश्चात माझ्या पलंगावर, माझ्या नवऱ्याच्या शेजारी कोण बाई आली ते मला कसे माहिती असणार?"

"हे बघ, मला काहीही माहिती नाही. ती ईथे कशी आली? तू कुठे गेलीस? तेही मला न सांगता..."

"अहो, अहो जरा दमाने. एका पाठोपाठ एक किती प्रश्न विचारता? ती माझी मैत्रीण सरोज आहे."

"तू कुठे आहेस? मला न सांगता तू गेलीस कशी.... का? ती सरोज का कोण इथे आलीच कशी? कशाला?"

"कशाला आली म्हणजे? तुम्हाला कधीच न मिळालेला स्वर्गीय आनंद द्यायला आलीय ती. अहो, जशी ती माझ्या घरी तशीच मी तिच्या घरी!"

"काऽय? हा काय प्रकार आहे?"

"जस्ट फॉर चेंज! तुम्ही नव्हते का नेहमी म्हणत, की माझं सगळं ओव्हर असते. नेहमी इतर बायकांचे उदाहरण देऊन तुम्ही मला सतत टोमणे मारता की नाही? कुणाच्या सौंदर्यावरून, कुणाच्या राहण्यावरून, ती बाई कशी फ्री आहे म्हणून. शिवाय तुमची 'स्वाद' बदलण्याची वारंवार प्रदर्शित होणारी इच्छा मीच पुढाकार घेऊन पुरवावी म्हटलं. उगीचच त्या इच्छेपायी इकडेतिकडे तोंड घालाल आणि जन्माचा रोग घेवून बसाल....."

"अग पण..."

"म्हणून आम्ही दोघींनी ठरवलं पाहूया नवरे बदलून! एक दिवस नवऱ्यांची आणि पर्यायाने बायकांची अदलाबदली करून पहावी म्हणून! आज सकाळीच आम्ही दोघींनी चार वाजता घरांची म्हणजे नवऱ्यांची अदलाबदल केली. कसे वाटते? ती सरोज ना फ्री आहे, बोल्ड आहे नि हँडसम आहे. तुमच्या भाषेतच सांगायचं तर सेक्सी आहे."

"डोंबलं! अजून चहा मिळाला नाही."

"चहा? काय हे? स्वप्नपूर्तीचा आनंद घ्यायचा सोडून तुम्ही हे काय बोलता? अरेरे! काय तुमचे नशीब हो. शेजारी एवढे पंचपक्वान्नाचे ताट वाढलेले असताना त्यावर ताव मारायचा सोडून तुम्ही चहाची आराधना करताय? म्हणतात ना तहान लागल्यावर तळ्यावर कुणीही नेईल हो पण शेवटी पाणी तर त्या तहानलेल्या हलगटालाच प्यावे लागेल. अहो, इथे कि नी सरोजच्या नवऱ्याने मला सकाळी साडेपाचला चहा घ्यायची सवय आहे म्हणून झक्कास चहा बनवून दिलाय. अहो, एवढा सुंदर चहा बनवला त्यांनी की विचारू नका. तीस वर्षाच्या जीवनात असा फक्कड बेड टी प्रथम पिलाय. ऐका तर... हे बघा माझ्यासमोर त्यांनी गरमागरम शिरा पोहे आणून ठेवलेत. व्वा! काय सुंदर घमघम वास येतोय हो. मोबाईलमधून आवाजाप्रमाणे शिऱ्याचा सुवास पाठविता आला असता तर? एक मिनिट हं...जरा चव बघते... व्वा! काय टेस्टी पोहे केलेत म्हणता! व्वा! व्वा! आणि शिरा तर काय चविष्ट केलाय म्हणता. अगदी मला गोड चिट्ट लागतो तसा. नाही तर आपल्या घरी तुम्हाला गोड आवडत नाही म्हणून सारेच पदार्थ सपकसार नि अळणी करावे लागतात. कधीच स्वतःला आवडते असे जेवण करता आले नाही. सदा न कदा तुमच्या आवडी निवडी जपण्यात जन्म गेला. असं वाटते आज जन्माचे सार्थक झाले....."

"ए थांब....थांब..."

"आलं लक्षात. त्या सरोजला की नाही कामाची बिल्कूल सवय नाही. तिचे मिस्टर की नाही तिला इकडचा प्याला तिकडे करू देत नाहीत. सारी कामे...अगदी स्वयंपाकसुध्दा तेच करतात हो. सरोज अगदी महाराणीप्रमाणे दिवसभर बसून असते. तिचा नवरा सकाळी कार्यालयात जाण्यापूर्वी दिवसभराची सारी कामे आटोपून जातो. शिवाय तो दुपारचं मध्यंतर न घेता चार वाजता घरी येतो कारण सरोजला बरोबर चारच्या ठोक्याला चहा करून द्यावा लागतो... अगदी तुमच्याप्रमाणे! चार वाजता आल्याबरोबर त्यांची कामे सुरू होतात. सरोज दिवसभर खाना-पिना-टिव्ही देखना और सोना या चतुःसुत्रीमध्ये अडकलेली असते. ऑफिसमधून आल्यावरही सुधीर सारी कामे करून जेवणाचं आयतं ताट सरोजपुढे ठेवतो. अगदी रात्री अंथरूणाची साफसफाई करून तिला अंगावर पांघरूण घ्यायचेही कष्ट पडू देत नाही. एवढी कामे करून पुन्हा त्याला सरोजवास..."

"सरोजवास? हा कोणता वास?"

"म्हणजे सासुरवासाप्रमाणे पत्नीवास म्हणूया. म्हणजे सरोजचे बोलणे घालूनपाडून, टोमणे आणि प्रसंगी चिमटे, कानपिळणीही सहन करावी लागते. बिच्चारा सुधीर! सारे निमुटपणे सहन करून तिच्या सेवेमध्ये हजर. एखाद्या वेटर प्रमाणे !.."

"म्हणजे आज मला सुधीरप्रमाणे..."

"चहा-नाष्टा आणि जेवणासह सारी कामे तुम्हालाच करावी लागणार. बरे, ठेवते आता. शिरा-पोहे गरमागरम खाण्यात मजा असते, असे तुम्हीच म्हणता ना मग जरा घेते टेस्ट-गरमागरम! जीवनात प्रथमच अशी संधी मिळतेय तेंव्हा......बाय !.....गुड डे !"

"अग....अग..." मी म्हणत असताना तिकडून फोन कट झाला. मी शॉक लागलेल्या अवस्थेत बसलो असताना अचानक तोफ गरजावी तसा आवाज आला,

"हे काय, अजून चहा नाही? मला बेड टी लागतो. अच्छा! म्हणजे तुम्हाला शीला सारे अलगद, आयते देते, हो ना? पण आजचा दिवस ते विसरा. मला ब्रेकफास्ट नि चहा लवकर द्या..."

मी तिच्याकडे, तिच्या अवताराकडे पहातच राहिलो. झोपेतून उठलेला तो अस्ताव्यस्त अवतार खरे तर मी अतिशय आनंदाने निरखून बघायला हवा होता. शीलाने एक दिवसासाठी का होईना पण वाढून ठेवलेल्या पंचपक्वान्नाचा आस्वाद घ्यावा असा विचारही मनात यायला संधी मिळत नव्हती. म्हणतात ना 'मनातले मांडे आणि वास्तवातले भांडे' यामघ्ये जमीन-अस्मानचा फरक असतो. 'जस्ट फॉर चेंज' ही सातत्याने मनात घोळणारी कल्पना प्रत्यक्षात अवतरलेली, बेडवर पसरलेली असतानाही प्रत्यक्ष कृती करण्यासाठी मी गर्भगळीत होत होतो कारण त्या अवतारातला तो आवाज ऐकून मी खरेच भयभीत झालो होतो. तितक्यात पुन्हा सरोज कडाडली,

"असा पाहातोस काय? काय विचार आहे? आले लक्षात त्या शीलीला तू अशा अवस्थेत कधी पाहिले नसेल ना? ती म्हणे सकाळी पाचलाच उठते. शिवाय त्या शीलापेक्षा मी लाखपटीने सुंदर, फिगरवाली आहे. पण एक लक्षात ठेव, हातचे अंतर राखून ठेवणे हे तुझ्याच हिताचे आहे. मी स्नानाला चाललेय."

सरोज स्नानगृह मध्ये जाता क्षणी मी फोनची डायरी काढली. माझ्या त्या संकुलामध्ये खालच्या तळामध्ये एक हॉटेल होते. तो क्रमांक शोधून मी फोन लावला. तेही उघडले असेल का नाही या विचारात असताना आवाज आला,

"बोला."

"मालक, जरा वरती नाष्टा पाठवता?"

"वरती? स्वर्गात? नाव-गाव, सदनिका क्रमांक काही आहे का नाही?" त्यांनी प्रश्न विचारताच मी नाव, फ्लॅट क्रमांक सांगताच तो म्हणाला,

"का हो, वहिनी माहेरी गेल्यात का? भांडून तर गेल्या नाहीत ना? तसं नाही पण तुम्ही हॉटेलच्या उद्घाटनालाच आला होता त्यावेळी फुकटात जेवण होते म्हणून! वर्षात पहिली ऑर्डर देताय, पाठवतो हो..." असे म्हणत त्याने फोन बंद केला...

००००