Raktkand - 3 books and stories free download online pdf in Marathi

रक्तकांड - 3

प्रकरण-३

रूपा कॉलेजला सुट्टी असल्याने सोफ्यावर बसून टी.व्ही. बघत होती. परंतु रूपाचे मन टी.व्ही. बघण्यात लागत नव्हते. म्हणून चॅनल वर चॅनल फिरवत बसली होती. तिचे मन काही स्थिर रहात नव्हते. मनात असंख्य विचार घुमत होते. या वैशालीपुढे आपला टिकाव लागतो कि नाही.या गोष्टीचे तिला खूप टेन्शन आले होते.परंतु आपण काही झाले तरी माघार घ्यायची नाही. काय करू म्हणजे मी वैशालीला हरवू शकते---? हे मोठे प्रश्न चिन्ह रुपाला पडले होते. विचारामध्ये रूपाची बोटं टी.व्ही. रिमोटवर फिरत होती आणि एक एक चॅनल पुढे मागे सरकत होते. परंतु रूपाचे मन एकही चॅनलवर स्थिर होत नव्हते.

" अगं रूपा, तुला टी.व्ही. जर बघायचा नाही तर बंद करून टाक नं---कसल्या एवढ्या विचारात गर्क झाली आहेस---?केव्हाची तुला मी हाक मारते आहे---? पण तुझं लक्षच नाही. कॉलेजला सुट्टी आहे तर अभ्यासाचे पुस्तक तरी उघड---उगाच वेळ का फुकट घालवतेस---अभ्यास केलास तर निदान काहीतरी सत्कारणी लागेल---हा टी.व्ही. बघत बसलीस तर काहीही हाती येणार नाही---" रूपाची आई रागानेच बोलत होती.

रूपा मात्र ऐकलं नं ऐकल्यासारखे करून टी.व्ही. चॅनल चेंज करत राहिली आणि क्राईम पेट्रोल चॅनलवर थांबली. बघता बघता रूपा एका सिरियलवर स्थिर झाली. एका मुलाने आपला अपमान केलेल्या एका मुलीवर ऍसिड फेकून तिचा कसा सूड घेतला---? एका पतीने आपल्या पत्नीवर संशय घेऊन तिची चाकू मारून कशी हत्या केली---? अशा दोन तीन सिरियल्स बघून रुपाला अशा थ्रिलर कथा बघण्यात इंटरेस्ट येऊ लागला होता. त्यामुळे आईचे काही नं ऐकता रूपा टी.व्ही. बघत राहिली. तिच्या मनात अनेक शंका येऊ लागल्या होत्या. माणूस आपल्या इच्छा पूर्तीसाठी काहीही कसे करू शकतो---? एक अपमान तसेच एक सूड यासाठी माणूस एवढ्या थराला कसा जाऊ शकतो---? अशा प्रश्नांनी रुपाला गंभीर करून टाकले होते. रूपाने घाबरून लगेच टी.व्ही. बंद करून थोड्यावेळ आपले डोळे बंद करून स्तब्ध बसून राहिली.

तेवढ्यात दारावरची बेल वाजली आणि बेलच्या आवाजाने रूपा भानावर आली. रूपाने दार उघडले तर समोर स्मिता व साधना दोघी उभ्या होत्या.

"अगं, आत तर घेशील कि नाही---? कि बाहेरूनच आम्हाला परत फिरवशील---? "स्मिता हसत हसत म्हणाली.

"अगं, ये नं---मी जरा टाईमपास म्हणून टी.व्ही.वर क्राईम पेट्रोल बघत होते नं तर जरा त्याच विचारात होते. भयानक सत्यातल्या घटना बघून खरंच किती थरकाप होतो नं---? हत्या करणाऱ्याचे मन किती दगडासारखे कठीण असेल---? रूपा स्मिता व साधना कडे बघून म्हणाली.

" हो , तुझं म्हणणं बरोबर आहे. आपण त्याचा विचारच करू शकत नाही---" साधना म्हणाली.

" रूपा, हे क्राईम पेट्रोल बघत जाऊ नकोस. मी सुद्धा आधी क्राईम पेट्रोल खूप बघायची. परंतु ते बघून बघून मला रात्री झोप सुद्धा यायची नाही. स्वप्नात सुद्धा तेच सिन दिसायचे आणि माझी घाबरगुंडी उडायची. मग काय--आईला मिठी मारून झोपायची----शेवटी आईचा ओरडा खाऊन खाऊन मी अशा प्रकारच्या सिरियल्स बघायचे सोडून दिले. तू सुद्धा बघत जाऊ नकोस. उगाच आपल्या मनावर त्याचा विपरीत परिणाम होतो---" स्मिता म्हणाली.

" अगं, हे सगळं पैशाचा हव्यास, एक दुसऱ्याच्या प्रति द्वेष, काम वासना, आपली इच्छापूर्ती त्यातूनच होणारे अत्याचार म्हणजेच आहे क्राईम प्रेट्रोल. आजकाल तर किती लहान लहान बालिका तसेच वृद्ध महिलांवर भर दिवसा सुद्धा बलात्कार होतात. नुसते बलात्कार होत नाही तर बलात्कार करून सर्व पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांची निष्ठुरपणे क्रूरतेने दगडाने ठेचुन ठेचून नाहीतर चाकूचे वार करून हत्या केली जाते. हे सगळं बघूनच जीवाचा नुसता थरकाप होऊन जातो. माणसाच्या आपल्या ईच्छेच्या मनोग्रहातून उत्पन्न होणारी एक मानसिक विकृती, त्यावेळी माणसाला आपण काय करतो या गोष्टीचे भान रहात नाही. आपला मनोग्रह पूर्ण करण्यासाठी माणूस त्याच त्याच विचारात राहून शेवटी मनोविकृतीतून एक हत्यारा बनून जातो---" म्हणून म्हणते रूपा, या अशा सिरियल्स बघत जाऊ नकोस---" साधना रुपाला समजावून सांगत होती.

" आता हे सर्व सोडून दे आणि तुमचं इथे येणं कसं काय झाले ते सांगा मला---" रूपा विषयाला बदलण्याचा प्रयत्न करत म्हणाली.

" काही नाही गं, परवाच्या दिवशी मी व साधना कॉलेजला आलो नव्हतो नं तेव्हा आम्हाला नोट्स हव्या होत्या---" स्मिता म्हणाली.

" का आलात नाही कॉलेजला---? कुठे फिरायला गेल्या होत्या का---? " रूपा म्हणाली.

" काही नाही गं--साधनाची तब्येत बरोबर नव्हती म्हणून साधना कॉलेजला आली नव्हती तर मी रुपेश बरोबर पिक्चरला गेले होते. त्यामुळे लेक्चर अटेंड करू शकले नाही. म्हणून जरा तुझी आम्हाला नोट-बुक दे---" स्मिता म्हणाली.

स्मिता आणि रुपेश पिक्चरला गेले होते हे ऐकून रूपाच्या मनात मत्सर जागृत झाला. रुपेश आणि स्मिता दोघे एकत्र पिक्चरला जातात हि गोष्ट रुपाला हजम होत नव्हती. रुपेशने फक्त माझ्या पाठी पाठी राहावे आणि मी त्याला झिडकारत राहावे असा मनोग्रह रूपाने करून घेतला होता.

" स्मिता, तू रुपेश पासून जरा सांभाळून रहा---तो कितीही स्पोर्ट्स चॅम्पियन असला तरी मुलींची छेड काढण्याची, त्यांच्या पाठी पाठी रुळत राहण्याची त्याची हि वाईट सवय आहे. कधी तुला तो धोका देईल सांगता येणार नाही. त्याला काय सुंदर मुलगी दिसली कि तो तिच्या पाठी पाठी घेर करून राहतो---रूपा स्मिताला रुपेशपासून दूर करण्याच्या उद्देशाने बोलत होती.

" नाही गं, आता रुपेश शाळेतला राहिला नाही. कॉलेजमध्ये आल्यापासून तो खूप सुधारला आहे. तू त्याला प्रिन्सिपॉल सरांकडून थोबाडीत मारून घेतलेस नं, तेव्हा पासून तो खूप सुधारला आहे---स्मिता आपली बाजू सावरत बोलत होती.

" तुला असं वाटत असेल तर ठीक आहे. परंतु नंतर पश्चाताप करत बसू नकोस---असे म्हणून रूपा आपल्या बॅगेतून स्मिता व साधनाला हवी असलेली नोट-बुक काढून देऊ लागली. तेढ्यात रूपाची आई स्वयंपाक खोलीतून बाहेर आली. " स्मिता, साधना तुम्ही कधी आलात---? बरेच दिवसांनी बघते तुम्हाला---आमच्या रूपाशी काही अबोला तर नाही नं---? तशी आमची रूपा आहेच भांडखोर---कधी सरळ वागेल तर कधी वाकडी. माझं आणि हीच तर कधीच पटत नाही. मी काहीही सांगितले तर ऐकलं नं ऐकल्यासारखे करते. आता तर कॉलेजमध्ये जायला लागल्यापासून तर तिला शिंग फुटायला लागली आहेत. बरं झालं तुम्ही आलात---हल्ली आमच्या रुपाला काय झाले आहे---? तिचं चिन्ह मला काही ठीक दिसत नाही---कॉलेजला तरी रोज येते नं---धड अभ्यास नाही कि धड जेवण नाही. तिचं मन काही मला स्थिर दिसत नाही. कॉलेजमध्ये तरी ती नीट वागते नं---? लेक्चरला तरी नीट बसते कां---? ब्युटीक्वीन स्पर्धेत भाग घेतल्या पासून अभ्यासाचे नाव नाही. आता मार्च मध्ये परीक्षा आहे. या मुलीचे कसे होणार आहे हे माझं मला काही कळत नाही---? हिचे बाबा होते तेव्हा हि सरळ होती. परंतु बाबा गेल्यापासून हि बिथरत चालली आहे, हिला तिच्या बाबांचा निदान धाक तरी होता. परंतु माझ्या ओरडण्याला काही दाद लावून देत नाही---तुम्हीच सांभाळा तुमच्या मैत्रिणीला---" रूपाची आई रागामध्ये एका दमात रुपावरचा राग काढत होती.

" आमच्या आईचे काही ऐकू नका. ती तिच्या जमान्याच्या गोष्टी करते. आता जग कुठे गेले याची तिला काही माहिती नाही. म्हणून ती माझ्या विषयी तुमच्याकडे तक्रार करते---कॉलेज म्हणजे नुसता अभ्यास नाही हे तिला मी कसे समजून देणार---? मगाशी तुम्ही मला समजावत होत्या नं , तसेच आता तुम्ही माझ्या आईला समजावून द्या---" रूपा म्हणाली.

" जाऊ दे गं रूपा---ती तुझी आई आहे. तुझ्या चांगल्यासाठीच बोलते नं---तुझ्याकडून तिच्या काही अपेक्षा आहेत. एकतर दोन वर्षांपूर्वी तुझे बाबा निधन पावले. ती एकटी बिचारी तुझा सांभाळ करते.तिला तुझी काळजी वाटणं साहजिकच आहे---" स्मिता म्हणाली.

" आता तुम्ही दोघी बस करा.उगाच मला तत्वज्ञान शिकवू नका---रूपा रागातच बोलत होती.

" ए रूपा चल, मला आता खूप उशीर झाला आहे. आईने मला भाजी आणायला पाठवले होते आणि मी इथेच बसून राहिले. उद्या भेटूच आपण कॉलेजमध्ये---" असे म्हणून रूपा व साधना निघून गेल्या.

दुसऱ्या दिवशी आम्ही म्हणजे वैशाली, स्मिता, रूपा, साधना आणि मी असे एकत्र आलो.

" हाय रूपा, काय म्हणतेस---? कुठपर्यंत आली ब्युटीक्वीनची तयारी---? " वैशाली हसत हसत रुपाला म्हणाली.

"नाही गं, तयारी काय करायची---? तू तर आहेसच पहिला नंबर पटकावणारी---बरोबर नं वंदना---? " रूपा म्हणाली.

" कोण नंबर पटकावणार हे आम्ही कसे ठरवणार---? ठरवणारे तर जजेस आहेत---" मी म्हणाले.

" मी तर म्हणते कि स्मिता तू सुद्धा भाग घ्यायला हवा---स्मिता सुद्धा काय कमी नाही, उगाच कां तिला रुपेशने निवडली---? " साधना हसत हसत म्हणाली.

" या वेळेला स्पर्धक नेहमी पेक्षा जास्त आहेत. माझ्याच क्लास मधून तीन मुली आहेत. शिवाय दुसऱ्या कॉलेजच्या पाच मुली येणार आहेत. तसेच आपल्या कॉलेजच्या लास्ट इयरच्या दोन मुली आणि आपण दोघी---, अजून किती कमी होतील आणि किती वाढतील हे माहित नाही---कदाचित दोन ग्रुप बनविले जातील---" वैशाली रूपा कडे बघून म्हणाली.

" चला आता , कँटीन मध्ये जाऊन आपण कॉफी पिऊन येऊ---" स्मिता म्हणाली.

" स्मिता, मी येत नाही हं---मी हल्ली चहा कॉफी सोडून दिली आहे---" रूपा म्हणाली.

" अगं, चहा कॉफी पीत नाही तर काहीतरी नाश्ता तरी कर---" मी तिचा हात पकडून तिला ओढून घेतले.

कँटीन मध्ये गेल्यावर समोरच रुपेश आपल्या मित्रांबरोबर कॉफी पीत होता. समोरून वैशालीला येताना बघताच " हाय वैशाली, आज तू इथे आलीस म्हणजे मला फ्रीमध्ये कॉफी प्यायला मिळणार तर---?" रुपेश हसत हसत म्हणाला.

" तुला काय वाटले मी घाबरून जाईन कां---? तुलाच काय --तुझ्या या ग्रुपला सुद्धा कॉफी फ्री मध्ये देईन---तुझ्या सारखी मी कंजूस नाही---तू म्हणजे एक नंबरचा कंजूस मारवाडी---" वैशाली रुपेशला प्रतिउत्तर देत हसली.

" नाही गं , मी सहज तुझी गम्मत केली. माझा नाश्ताही झाला आणि कॉफी पिऊनही झाली. काय म्हणतेस---? स्पर्धेची तयारी कुठपर्यंत आली---? या वर्षी सुद्धा जिंकणार आहेस नं---? तू जिंकलीस म्हणजे मी खुश होणार---" रुपेशने हळूच रुपाकडे बघून टॉन्ट मारला. तेवढ्यात रूपा म्हणाली मी निघते. मी कॉफी पीत नाही आणि मला नाश्ताही नको आहे. रूपा समजून गेली कि मी आता इथे राहिली कि हा रुपेश उगाचाच टॉन्ट मारत राहणार. त्यापेक्षा इथून सटकलेले बरे.परंतु वैशालीने रुपाला थांबवून घेतले. या लोकांना आपण कंपनी तर द्यायला हवी नं---" वैशाली रूपाचा हात पकडून बोलत होती.

" वैशाली, कॉफी प्यायल्याने फिगर खराब होते कां---? बहुतेक सुंदर असणाऱ्या मुली कॉफी पीत नाही असे मी नोटीस केले आहे---" असे म्हणून रुपेशने पुन्हा चोरटा कटाक्ष रुपाकडे टाकला. वैशालीच्या हे लक्षात आले. त्यानुसार वैशाली समजून गेली कि रुपेश आणि रूपा मध्ये क्रॉसिंग आहे असे दिसते. परंतु रुपेश अजूनपर्यंत या विषयी माझ्याकडे काहीच कसे बोलला नाही---? तसे बघितले तर रुपेश मला प्रत्येक गोष्ट शेअर करतो. मग हि गोष्ट त्याने कां लपवली---? " रुपेशला या विषयी विचारायलाच हवे. परंतु दोघांना बोलते करण्यासाठी एक दिवस कुठे बाहेर फिरायला जाण्याचा बेत रचायला हवा---" या विचारात असताना तेवढ्यात रुपेश ओरडला---

" काय वैशू, कुठल्या विचारात गुंग झालीस---? सुंदर मुली कॉफी पीत नाही अशा माझ्या बोलण्यावर विचार करत होतीस कां कि या मुलाला काय उत्तर द्यावे---?"

" रुपेश, तुझ्या पूढे बोलायला अद्याप कोणी जिंकले आहे कां---? " वैशाली दोन्ही हात जुळवून नमस्कार करत म्हणाली.

" आता कसं बरोबर बोललीस---या रुपेशला हरवणाऱ्याला अजून जन्म घ्यायचा आहे---या रुपेशशी जो कोणी पंगा घेईल त्याची हार निश्चित आहे---"

" आता बस झालं तुझं तत्वज्ञान---आता निघ तू---उगाच भांडण लावू नकोस---" वैशाली म्हणाली.

" चल वैशू, बाय स्मिता, बाय वंदना, बाय साधना---मी निघतो, माझे बोलणे कोणी मनावर घेऊ नका---मी अशीच तुमची गम्मत करत होतो, बस एक टाईमपास---" असे म्हणून रुपेश निघून गेला.

परंतु रुपेशच्या बोलण्याचा रोख आपल्याकडे आहे हे रूपा समजून होती. मला टॉन्ट मारून या रुपेशला काय मिळते---? आता तर याला मी हरवूनच दाखवीन---म्हणे माझ्याशी पंगा जो कोणी घेईल त्याची निश्चित हार आहे----या ब्युटीक्वीन स्पर्धेत मी जिंकून नाही दाखवले तर माझे नाव रूपा नाही---स्वतःला काय समजतो---? याच्यासारखा दुसरा कोणी स्पोर्ट्स चॅम्पियन नाहीच आहे असे त्याला वाटते नं---तर मी सुद्धा माझ्यासारखी ब्युटीक्वीन दुसरी कोणी नाही---हे पारितोषिक मलाच मिळणार आहे आणि ते मी जिंकून दाखवीन---" रूपाचा मनातून जळफळाट होत होता. रूपा चुपचाप झालेली बघून स्मिता लगेच म्हणाली " रूपा रुपेशचे बोलणे एवढे सिरीयस नको घेऊ---त्याला मुलींची खोड काढायची सवयच आहे---त्याला कुठे काय बोलायचे काही कळत नाही. तू मनावर घेऊ नकोस. मी त्याला समजावते---" असे म्हणून स्मिताने रूपाची समजूत काढली. स्मिता समजून होती कि रुपेशने मुद्दामहून रुपाला हे सारे ऐकवले आहे.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED