बॅग पॅक टूर टू कर्नाटका... - भाग 5 Dr.Swati More द्वारा प्रवास विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

बॅग पॅक टूर टू कर्नाटका... - भाग 5

भगवान शंकराचा वरदहस्त लाभलेले "मुरुडेश्वर" आपल्याला "याची देही याची डोळा!!" पाहायला मिळते याहून अधिक भाग्याची गोष्ट कोणती असावी..

रात्रभर शांत झोप लागल्याने सकाळी लवकरच जाग आली.. आजचा दिवस तसा धावपळीचा नसल्याने थोडा वेळ आरामात बेडवर लोळत राहिले.. तेवढ्यात आमचे साहेब , "मी तयार आहे.तू ही उठ आणि तयार हो.. नाहीतर नंतर बीचवर ऊन लागेल आणि फोटो चांगले येणार नाहीत तुझे!"

साहेबांना माझा वीक पॉईंट बरोब्बर माहीत आहे..😁

आता अंथरुणातून उठून तयार होण्याशिवाय पर्याय नव्हता..

तयार होऊन गेस्ट हाऊसच्या समोरचं असलेल्या बीचवर गेलो..

भरतीची वेळ असल्याने समुद्राच्या लाटा किनाऱ्यावरील दगडांवर येऊन आपटत होत्या.

फेसाळता समुद्र आपल्याचं तालात गुंग होता.. आजपर्यंत अनेक सागरकिनारे बघितले आहेत.. पण प्रत्येक ठिकाणचा सागर वेगळा भासतो..
त्याच्या किनाऱ्यावरील मऊ लुसलुशीत वाळू, त्या वाळूचे वेगवेगळे रंग, तिचा पायाला होणारा स्पर्श..

कुठं खडकाळ किनारा तर कुठं माडा पोफळीच्या बागा...

जर नीट कान देऊन ऐकलत तर त्याच्या लाटांचा आवाजही भिन्न भिन्न असतो हे उमगेल.. कुठं शांत, धीर ,गंभीर तर कुठं फेसाळनारा पृथ्वी पादाक्रांत करण्यासाठी गर्जत येणारा सागर!!

आणि ह्याच गर्जनाऱ्या सागराला जेंव्हा ओहोटीच्या वेळी मागे मागे सरकावं लागतं तेंव्हा त्याच्या व्याकुळतेची कल्पना न केलेलीच बरी!!

सागरकिनारा कोणताही असो... माझ्या मनाला नेहमीच भुरळ घालतो..

मनसोक्त फोटो काढून आम्ही किनाऱ्यावरून मंदिराकडे जाण्यासाठी निघालो..
दर्शन रात्रीच घेतलं असल्याने आम्हाला घाई नव्हती..
आज मंदिर आणि त्याचा परिसर शांतपणे फिरुया असं ठरवलं..

भारतातील अनेक प्राचीन मंदिरांचा स्वतंत्र असा इतिहास आहे. त्यासोबत काही कथाही जोडल्या आहेत. रामायणातील अशाच एका गोष्टीचा उल्लेख असलेले स्थळ म्हणजे कर्नाटकमधील मुरुडेश्वर मंदिर . दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यातील "मुरुडेश्वर" येथे हे मंदिर आहे.

मुरुडेश्वर म्हणजे भगवान शंकर !

भगवान शंकराची जगातील दुसरी सर्वात उंच मूर्ती येथे विराजमान आहे. तब्बल 123 फूट उंच असणारी ही मुर्ती अरबी समुद्रात दुरूनही पाहता येते.
मंदिर आणि २० मजली राजगोपुरम हे मंदिर परिसराचा भाग आहेत.
पर्यटकांना लिफ्टने राजगोपुरमच्या अठराव्या मजल्यावरून आजूबाजूचा परिसर आणि भगवान शंकराची भव्य मूर्ती असे विहंगम दृश्य पाहता येते..

मुरुडेश्वर मंदिर आणि राजगोपुरम किंवा गर्भगृह वगळता मंदिराचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे

मंदिराचा आकार चौकोनी गर्भगृहासारखा आहे.

महाकाव्य रामायण आणि महाभारतातील दृश्यांचे चित्रण करणारी अनेक शिल्पे मंदिरात आढळून येतात.
सूर्य रथ, अर्जुन आणि भगवान कृष्ण यांची शिल्पे इथे आहेत.
मंदिराचे प्रवेशद्वार दोन भव्य हत्तींच्या मूर्तींनी संरक्षित आहे. अलीकडेच त्याचा जीर्णोद्धार केल्यामुळे मंदिराला समकालीन स्वरूप आले आहे..
मुरुडेश्वर मंदिर सुंदर कोरीव कामांनी सजलेले आहे

समुद्राच्या काठावर वसलेले हे नितांत सुंदर मंदिर!!
टेकडीवर असलेले मुरुडेश्वर मंदिर तीन बाजूंनी पाण्याने वेढलेले आहे. येथे भगवान शिवाचे आत्मलिंग स्थापित आहे. याबाबतची कथा थेट रामायणाच्या काळातील आहे.

भगवान शंकराच्या दर्शनाबरोबरच इथले नैसर्गिक सौदर्य बघण्यासाठी हजारो भाविक या मुरुडेश्वर मंदिराला आणि परिसराला भेट देतात

मुरुडेश्वर समुद्रकिनारा कर्नाटकातील सर्वात सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. एकीकडे या धार्मिक स्थळाचे दर्शन घडते. तसेच स्वच्छ आणि सुंदर समुद्र किनाऱ्याचीही मजा घेता येते..
या परिसराचा पर्यटनाच्या माध्यमातूनही मोठा विकास झाला आहे.

सकाळी सहा ते दुपारी बारा आणि दुपारी साडेतीन ते आठ दरम्यान कोणत्याही दिवशी मुरुडेश्वर मंदिराला भेट देऊ शकता.

सकाळचे अकरा साडेअकरा होत आले होते.. नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी उन्हाचा चटका लागत होता..

आम्ही दोघं परत रूमवर आलो आणि थोडा वेळ आराम केला..

दुपारी जेवून मुंबईसाठी निघायचे होते..

दोन दिवस कसे गेले समजलेच नाही.. आमचा सगळा ग्रुप अतिशय मनमिळावू होता.. पहिल्यांदा भेटतोय असं अजिबात जाणवलं नाही..
मयुरेश आणि प्रसाद यांनी टूरचे प्लॅनिंग तर अतिशय उत्तम केलं होतं..अगदी ट्रेनच्या तिकीटीपासून ते राहण्या-खाण्याची सगळी व्यवस्था अतिशय चोख होती..

दुपारी पुन्हा 'नाईक फिशलँड' मध्ये भरपेट जेवून आम्ही स्टेशनकडे रवाना झालो..

ट्रेन आली..जागेवर बसलो.. याही वेळी एकही खालची साईड बर्थ कोणाचीच नव्हती..
पण माझी साईड अप्पर बर्थ होती आणि साईड लोअर बर्थ वर अजून कोणी आलं नव्हतं.. तेवढ्यात टी. सी. आला..
अनिलने पटकन विचारलं , " या खालच्या बर्थवर कोणत्या स्टेशनला येणार आहेत.."

" कुडाळ..."

हे ऐकलं अन् आम्ही दोघं असले खुश झालो.. कुडाळ रात्री साडेनऊ वाजता येणार असल्याने अख्खी साईड लोअर सीट आपल्याच मालकीची ना बप्पा!!😁😁

बाकीच्या ग्रूपने पत्ते काढले आणि हळू हळू त्यांचा डावही रंगात आला..

मी परत एकदा खिडकीबाहेरचा निसर्ग बघण्यात मग्न झाले..