पचका शुभा. द्वारा हास्य कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पचका


पचकाsssss...
कधी कधी काहींच्या विचित्र स्वभावामुळे चार चौघात त्यांची जी फजिती होते..त्याचीच कथा आहे ही पचकाss...

लग्नाच्या पंगतीत किंवा कुठल्या कार्यक्रमाला गेल्यावर तुमच्या पैकी बऱ्याच जनांनी गुलाबजामुन, रसमलाई ,रबडीवर आडवा हात मारला असेलच, काहींनी तर अगदी पोट फुटेस्तोवर... पण एवढे तर चालते हो .!..होना..? सर्वच जण करतात.. !!

अगदी पन्नास रुपयाची नोट पाकिटात घालून घरातले ,आजूबाजूचे सगळे जेवतात ,हेही ठीक आहे.. पण काहींचे एवढ्यापुरतेच मर्यादित राहत नाही. ते लोकं जिथे शक्य असेल तिथे धूम करतात ...मग ते काहीही असो . आता उदाहरण द्यायचे म्हटले अश्या व्यक्ती जेव्हा रेस्टॉरंटमध्ये जेवायला जातात तर ..तेथे टेबलवर असणारे टिशू पेपर,शोप ..संपलीच म्हणून समजा !.... एका टिशू पेपरने काम चालणार असेल तर ते तीन चार टिशू वापरून फेकतात.. शोपचे बकाणेच बकाणे भरतात... आणि जर ते लॉज,हॉटेलमध्ये गेले तर तेथे भेटणारा शांपू डोक्याला चारचारदा चोळून लावतात, भले केसांचे काही होवो... काही काही तर तिथल्या साबणाच्या वड्याही सोबत घेऊन येतात, त्या साबणाची कॉलीटी कितीही खराब का असेना ....पैसे वसूल व्हायला पाहिजे फक्त..बस्स..!.... असतो एकेकाचा स्वभाव जो जा म्हटल्या जात नाही असो..तर

अश्याच स्वभावाची होती रत्नमाला ..!! नावाचा आणि तिच्या दिसण्याचा काडी मात्र संबंध नव्हता.पण कुठेही वसुली करण्यात ती तर गोलमाल मधल्या वसुलीभाईलाही मागे टाकेल अशीच होती. कसं तर बघा , ह्या रत्नमाला सोबत जर तुम्ही एखाद्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जेवायला गेले तर तुम्हाला दिसेल की तिने ताटात भरपूर वाढून घेतलेले..आणि सोबत असणाऱ्यांच्या प्लेटमध्येही तसचं जबरजस्तीने वाढायला लावणारी... अगदी दोन तीन जणांचे .... कोणी खरचं तेवढे खाणार असेल तर ठीक ...म्हणजे अगदी तुमचं पोट भरेस्तोवर खात असाल तर काही हरकत नाही ...पण थोडेफार खाऊन बाकीचे फेकून द्यायचे..?? आश्र्चर्य वाटले ना...! काहींना तर रागही आला असेल.. तिच्या अश्या करण्यामागचे कारण काय..." तर पैसे दिले आहेत आणि थोडंसंच खा...?? " मग ते वाया गेलं तरीही चालतं..! पण कार्यक्रमात जेवढी रक्कम भेट म्हणून दिली असेल ,त्यापेक्षा जास्त वसूल करायचीच..!! नियमच तो तिचा. ..एवढच नाही एखाद्या मॉलमध्ये वॉशरूमला जर ती गेली, तर तिथल्या सुगंधी हँडवॉशने चार पाच वेळा हात धुणार आणि उरलेलं सांडणार सुद्धा..!कारण काय तर या मॉलमध्ये वस्तू खूप महागात भेटतात आणि त्या वस्तूंची किंमती इथे मिळणाऱ्या सुविधांमुळे जास्त असते .. मग आपण त्या सुविधा वापरून त्या वसूल नको करायला...!! घ्या ...!!! पण तिच्या अश्याच स्वभावामुळे एकदा तिचा चांगलाच पचका झालेला ,सांगते सांगते थांबा ..! तीच कथा इथे सांगणार आहे..

तेव्हा ती बारावीला होती, तर बायोलॉजीच्या लँबमध्ये ल्बडशुगर हा टॉपिक सुरू होता ,अर्थातच ब्लड मधली शुगरची टेस्ट कशी करायची ह्या विषयावर सर लेक्चर देत होते. आणि प्रॅक्टिकल होतं ग्लुकोज युरिन टेस्ट ...तर झालं असं कि त्यादिवशी मॅडम उशिरा आलेल्या... म्हणजे सरांनी सर्व प्रॅक्टिकल समजवून दिलेलं आता फक्त मुलांनी रिझल्ट काय येतो ते सांगायचे होते...

तर रत्नमाला मॅडम उशिरा आलेल्या त्यांच्या सोबत अजून एक दोन मुले होती. सरांनी त्यांचं राहून नको जायला म्हणून फाडफाड इंग्लिश मध्ये पटकन दोन मिनिटात टेस्ट कशी करायची सांगून टाकले. आता दहावीपर्यंत मराठी मिडीयम अकरावी, बारावी इंग्रजीत , त्यात यथा तथा शैक्षणिक प्रगती ....आता तर फाडफाड ईग्रजीत..! सर जे बोलले..ते मॅडमच्या डोक्यावरून गेलेले पण आव तर असा कि सर्व झटक्यात समजले ...
चला समजले सर्वांना..! असा समज करून सर सुद्धा मुलांच्या फाईल घेऊन तपासत बसले. आणि सर्वजण टेबलावर आपापली टेस्टट्युब घेवून प्रयोगाला सज्ज .. .रत्नमाला मॅडमही तिची बॅग खाली ठेवून टेबल जवळ उभी राहिली, शेजारच्या मुलीला परत एकदा मराठीत विचारले.

"काय सांगितलं सरांनी काय करायचंय..??"

"हे बघ हे दोन काचेचे जार ठेवले आहेत ना ..तर त्यातलं वेगवेगळ्या टेस्टट्युबमध्ये थोडे थोडे घे.. हे दुसऱ्या बॉटलमधले लिक्विड ..! त्याच्यामध्ये टाकून चेक करायचे ...त्याचा कलर चेंज झाला की नाही झाला बस ..! एवढंचं बघायचं आहे आपल्याला..." शेजारच्या मुलींने थोडक्यात सांगितले.

रत्नमाला मॅडमने उचलल्या दोन टेस्टट्युब स्टँड मधून.. दोन काचेच्या फ्लास्कमध्ये दोन वेगळे लिक्विड होते ,एकात थोड ट्रान्सुलंट म्हणजे थोडं भुरकट पारदर्शक दिसणार पाणी ...आणि दुसऱ्यात तसच पण जरास पिवळट.. रत्नमाला च्या मते बाकीचे मुर्ख मुलं मुली टेस्टट्युब मध्ये ड्रॉपरने थोड थोड ते पाणी घेत होते तर मॅडमने तो जारच हातात घेतला.

"काय विषारी नाही ना हे.!"

" नाही .." शेजारचीही तिच्या प्रयोगात मग्न होती.

रत्नमालाने ते पांढरट दिसणारे पाणी टेस्टट्यूबमध्ये ओतले बर्‍यापैकी टेस्टट्युब भरली. त्यानंतर छोट्याशा बाटलीतल्या एका लिक्वीडचे एक-दोन थेंबाच्या ऐवजी चांगले दहा-बारा थेंब टाकले टेस्टट्युबमध्ये तिने ...ते थोडेसे पांढरट दिसणारे पाणी तिच्या हातावरही सांडले , पण विषारी नाही म्हटल्यावर तिने त्याकडे दुर्लक्ष केलं. टेस्टट्युब मधल्या त्या पाण्याचा रंग बदलला , तसा तिचा आनंद द्विगुणीत झाला ,काहीतरी मिळाल्याचा आनंद आणि त्याच आनंदात तिने आजूबाजूच्या दोघी मुलींना गदागदा हलवून ते सांगितलेही... बिचाऱ्यांच्या टेस्टट्युब मधले लिक्विड सांडता सांडता राहिले, मुळातच त्यांनी ड्रॉपरने घेतले होते त्यामुळे ते अगदी तळाशी असल्याने नाही सांडले गेले.

आता रत्नमाला मॅडम दुसऱ्या जारकडे वळल्या. ज्याच्यात थोडेसे पिवळ्या रंगाचे पारदर्शक पाणी होते. त्या पाण्याला किंचितसा वासही होता पण तिने त्याच्याकडेही दुर्लक्ष केलं. आणि दुसरी टेस्टट्युब भरली.. अगदी फुल्ल..!! बरेचसे तर तिच्या हातावरही सांडले... पण समोरचे लिक्विड फ्री आहे... आपण शाळेची फी भरतो म्हणून फी आणि फ्रि गणित जुळवून मॅडमने ति फुल भरली ,पण आता त्यात ते छोट्या बॉटल मधले केमिकल टाकायला जागा नाही, म्हणून तिने ती पूर्ण ची पूर्ण टेस्टट्युब बेसीनमध्ये उलटली. तेव्हाही ते पिवळं पाणी तिच्या हातावर सांडले , ती परत टेबलापाशी आली , टेस्टट्युब यावेळेसही अर्ध्यापेक्षा जास्त भरली तिने ...काही जणांचे तिच्याकडे लक्ष होते पण कुणीच काही बोलले नाही. तिने आजूबाजूला नजर टाकली बाकीचे सर्वजण अगदी थोडं एक दोन एम एल लिक्विड त्यांच्या टेस्टट्युब मध्ये टाकत होते, तिने सर्वांकडे एक विचित्र नजरेने हसत बघितले. तिच्या मते तिथले सर्व मुलं-मुली मूर्ख होते आणि त्यांच्या मते ..? ..

सर्व जण तिच्याकडे बघत होते ,काहीजण तर एकमेकांशी तिच्याकडे बघून कुजबुजत होते. पण रत्नमाला आपल्या प्रयोगात मग्न... कोणीही तिला सांगत नव्हते ,नेमकी ती काय हाताळत आहे ते.. पण क्लासमध्ये अजूनही इतर महाभाग होतेच त्यातल्या एकीला कळले की रत्नमाला चे हात कशाने माखलेले... तिचं हसू फुटलं....अगदी एखादा लोंगी फटाका सुरसुर करत फुटतो तसं..!... शेवटी जरा मोठा आवाज झाला ,ती मुलगी जोर जोरात हसायला लागली. त्या चिरक्या आवाजाने फाईल चेक करणाऱ्या सरांची सूद्धा समाधी भंगली...

" हेमा पांढरे.. एवढे दात काढायला काय झालं..??"

" सर.. सर.. सर हि रत्नमाला त्या युरीनने हात धुतेय..! हाहाहा "

सरांचही लक्ष तिच्या टेस्टट्युबकडे गेलं जी बऱ्यापैकी भरलेले होती आणि तिचे हात ही ओले जाणवत होते. त्यांचेही हसू फुटले ,जसे सरांचे हसू फुटले तसा पूर्ण वर्ग हसायला लागला. तशी न कळल्यागत टकमक ती सर्वांकडे बघत होती.

हसतांना हेमाकडून युरीन शब्द नीट उच्चारला गेलेला नव्हता, त्यामुळे अजूनही तिच्या डोक्यात घट्ट काळोखच...तिने शेजारची कडे प्रश्नार्थक नजरेने बघितले.

" रत्नमाला त्या जारवर बघ काय लिहिलंय ...येडे लघवी आहे ती कुणाची तरी ...!"त्यामुलीने पिवळट दिसणाऱ्या पाण्याकडे बोट केले.

"काय ..!!! जोरात ओरडली आणि तोच लघवीचा माखलेला हात तिच्या तोंडावर गेला. नाकाजवळ हाताचा वास जानवला ,तसा परत तिने हात झटकला, जो शेजारचीच्या तोंडावर बसला, तिनेही शिवी देत तो झटकला, ज्याच्यामुळे रत्नमाला च्या दुसऱ्या हातातली टेस्टट्युब हलली,आधीच जास्त भरलेली.. दुसराही हात त्या पिवळट द्रव्याने माखला. पूर्ण लँबमध्ये परत हशा पिकली. सर्वजण खो-खो करत तिच्यावर हसत होते.

" रत्नमाला तो दगडू शिपाई देऊन गेला होता हे भांड ......!! " एकजण मुद्दामहुन हसू दाबत तिच्या कानात कुजबुजले. दगडू शिपाई म्हणजे एकदम गबाळा ,गचाळ तोंडात तंबाखू भरलेला.. कळकट कपडे घातलेला शिपाई... ! तिला आता चक्कर यायचीच बाकी होती, आतून खूप मळमळ व्हायला लागली , हाताने तोंड दाबूही शकत नव्हती ती... तशीच बेसिन कडे पळत गेली. भडभड उलटी झाली, हात तर दहा पंधरा वेळा साबणाने धुतले असतील तिने.. मी तर एकलं पुढचे काही दिवस तिने त्या हाताने जेवण पण केलं नाही, चमच्याने खात होती त्यासाठी घरी आईचा ओरडा ही बसला पण सांगणार काय..!

वाटलं होतं ह्या घटनेनंतर तरी तिला शिकायला भेटले असेल... की फ्री मध्ये भेटलेल्या गोष्टी पाहिजे तश्या वापरायच्या नाहीत... पण त्याचं काही महिनाभरानंतर ती तिच्या मैत्रिणींसोबत सिनेमा हॉल मध्ये चित्रपट बघायला गेली होती..आपला मुव्ही हो....तर... चिप्सचे रॅपर ,पिलेल्या कॉफीचा मग.. पिक्चर संपल्यावर तिने तिथेच फेकून दिला खुर्चीच्याखाली... कारण काय तर तिकिटासाठी खूप पैसे मोजले तिने .. ! साफ करेल तो हॉलवाला......!!

जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही या म्हणीचा खरा अर्थ शिकवणारी रत्नमाला..!!.... आजही.. वसुली काम तसेच सुरू आहे..

आपल्यापैकी बर्‍याच जणांना अशी रत्‍नमाला आयुष्यात एकदा तरी भेटलेली असेलच... तर त्या रत्नमाला चा किस्सा मलाही ऐकायला आवडेल बरं का...!!वेळ असेल तर नक्की सांगा...

पहीलीच कथा,म्हणून आज लघुकथा प्रकाशित करत आहे,लवकरच एक प्रेम कथेवर आधारित सुंदर कादंबरी प्रकाशित करेल. बाईटस् मध्ये तुम्हाला दिसेलच कादंबरी कश्याशी संबंधित आहे.

तोपर्यंत धन्यवाद.
©®शुभा.

All rights reserved.