सफर विजयनगर साम्राज्याची... - भाग २ Dr.Swati More द्वारा प्रवास विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सफर विजयनगर साम्राज्याची... - भाग २

मुंबईहून निघताना ट्रेन प्रवास सोयीस्कर वाटत नसल्याने ग्रुप लीडर्सनी वातानुकूलित स्लीपर बसची तिकीटे काढली..
ही बस साधारण दुपारी तीनच्या दरम्यान बोरिवलीवरून सुटते आणि मुंबई, पुणे, कोल्हापूर, हुबळी , गदग,हॉस्पेट असा प्रवास करून सकाळी 8 वाजता हॉस्पेटला पोहचते. तिथून रिक्षाने हंपीला जाण्यास अर्धा तास लागतो..

नशिबाने आमची बस अगदी वेळेवर हॉस्पेटला पोहचली.. यदा कदाचित जर बस उशिरा पोहचली तर आपला दिवसाचा सर्व कार्यक्रम बिघडू शकतो..अर्थात हे आपल्या हातात नसते म्हणा..🤪

आमचे रिक्षावाले अगोदरच हॉस्पेटला येऊन थांबले होते. आठ जणांसाठी दोन रिक्षा पुरेशा होत्या. एका रिक्षात पाठी तीन आणि ड्रायव्हर शेजारी पुढं एकजण.. इथे मुंबईची आठवण आली.( मुंबईच्या चाकरमान्यांना अशा चौथ्या सीटवर बसून प्रवास करणे नवीन नाही,रिक्षा काय किंवा ट्रेन काय!!😁😁 )..

वातावरण ढगाळ वाटत होते.. मध्येच वरुण राजाने आपले अस्तित्वही दाखवले.. आता आली का पंचाईत!! आम्ही कोणीही पावसाच्या तयारीने आलो नव्हतो.

आमच्या मनाची अवस्था वरुण देवाला समजली बहुतेक, त्यानेही आपला अवकाळी बरसण्याचा हट्ट सोडून,सूर्यदेवाला सलाम केला आणि त्याच काम करून दिलं. वातावरण निवळले हे बघून आम्हीही खुश झालो.

"I am Bobby boy in this Hampi world"असं आमच्या रिक्षात छोटा बोर्ड होता.. ते वाचून मनात आलं की या रिक्षावाल्यासाठी हंपी हेच जग आहे .. किती आनंदी आहे तो या जगात.. जसा या छोट्याशा जगाचा तोच अनभिषिक्त सम्राट !!

आपण हम्पीच्या हद्दीत प्रवेश केला आहे हे रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या दगडी अवशेषांवरून लक्षात येते.. मोठमोठे दगड , त्या निर्जीव दगडांमधून जिवंतपणा दाखवणारी हिरवळ, भग्न दगडी अवशेष, नारळ पोफळीची झाडे, स्वच्छ रस्ते,भव्य दगडी कमानी बघत बघत आपण हंपीत प्रवेश करतो..

आमची राहण्याची सोय "रंजना होम स्टे " मध्ये केली होती..
प्रथमदर्शनीच मी या होम स्टेच्या प्रेमात पडले ..

Simple,neat, clean still Elegant and beautiful ❤️😍

खाली मालक स्वतः राहतात आणि वरच्या मजल्यावर पाच खोल्या बांधल्या आहेत.सर्व खोल्या नीटनेटक्या आणि स्वच्छ आहेत.
प्रत्येक खोलीसमोर बसायला प्रशस्त मोकळी जागा.. कडेने ठेवलेल्या हिरव्यागार झाडांच्या कुंड्या..
आणि सगळ्यात महत्त्वाचं, तिथून समोरच दिसणारे भगवान विरूपाक्षाचे मंदिर आणि एका बाजूला हम्पीची बाजारपेठ..
अहाहा!! म्या पामराला अजून काय हवं..

चला, टूरची सुरवात तर अतिशय उत्तम झाली.

आम्हाला आज बरीच स्थळदर्शने करायची असल्याने विलंब न लावता आम्ही सगळे पटापट तयार होऊन नाश्त्यासाठी खाली उतरलो.

मयुरेशने ( टूर लीडर) अगोदरच कुठं कुठं काय बेस्ट मिळत याची माहिती काढून ठेवली होती..
नाश्त्यासाठी त्याने आम्हाला बाजारपेठेत "विकास नाष्टा सेंटर" मध्ये आणलं..
तिथली गर्दी बघताच लक्षात आलं.. नक्कीच काहीतरी खास असणार इथल्या नाश्त्यात.. गर्दी असल्याने थोडावेळ बाहेर ताटकळत उभे राहिलो. पण माझी नजर इतर लोकं काय काय खात आहेत यावर वारंवार जात होती..

केळीच्या पानावर वाढलेल्या गरम गरम इडल्या, खरपूस भाजलेले आप्पे, जाळीदार डोसा, बेसनात खमंग तळून काढलेल्या मिरच्या आणि सोबत कर्नाटकची प्रसिद्ध कॉफी..
तोंडातली लाळ आता खाली पडेल की काय असं वाटायला लागलं
मेरा नंबर कब आयेगा अशी परिस्थिती होती..
मला तर अजिबात धीर धरवत नव्हता..मौके के फायदा उठाके मी एक जागा बघून चक्क आत घुसले आणि तिथं अजून थोडी जागा करून अनिललाही बोलावून घेतले..

"अम्मा, एक प्लेट आप्पे औंर एक प्लेट इडली देना!"

अम्माने लगेच आप्पे आणून दिले.. सोबतीला दोन तळलेल्या मिरच्या..

अनिलची इडली यायची होती अजून..फारच प्रेमाचा पुळका येऊन मी त्याला तो पर्यंत माझ्या प्लेटमधील आप्पे खाण्यास सांगितले..
आप्पे खूपच टेस्टी होते. बघता बघता अनिलही नुसतं चवीपुरते आप्पे न खाता एक एक करत आप्पे गटकवू लागला..
हे बघून या वयातही, एखाद्या लहान मुलासारखं मी त्याच्यावर चिडले..

"तुला आप्पे खायचे आहेत तर तू इडली का मागवली.. तू तुझी इडली खा, मला माझे आप्पे खाऊदे. मला इडली आवडत नाही.."
बरं येवढं बोलून गप्प राहीन तर ती स्वाती कुठली! मी हळूच माझी प्लेट माझ्याकडे सरकवून गपागप राहिलेले आप्पे खाण्यास सुरवात केली 😂😂😂😂

अनिल गालातल्या गालात हसत, हळूच माझ्या प्लेट मध्ये डल्ला मारण्याचा प्रयत्न करत होता पण मी काही त्याच्या ताकास तूर लागू दिला नाही..

बिच्याऱ्याने मग स्वतःसाठी आप्पे मागवले शेवटी..
मीही त्यात हात मारला हे वेगळं सांगायला नको. 😁😁

असा पोटभर नाष्टा आणि गरमा गरम कॉफी पिऊन आम्ही हंपी बघण्यासाठी रिक्षात बसलो..