प्रेमा तुझा रंग कसा ? - 2 Vrushali द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रेमा तुझा रंग कसा ? - 2

दुसऱ्या दिवशी प्रथमला ऑफिसला जायचं जीवावर आलेलं, अविकचा मूड कसा असेल काय माहित...? एकतर तो फारसा रागावत नाही आणि रागावला कि मग बस्स..... कसबस मनाची तयारी करत थोडं लेटच पोचला तो ऑफिसला...प्रथमला असं शांत येताना बघून वॉचमन पण अचंबित झाला.



"प्रथमभाऊ, आज गप्प गप्प...?" वॉचमनचा प्रश्न. सिक्युरिटी गेटपासून ते बॉसपर्यंत सगळ्यांचाच आवडता होता तो. असं उतरलेल्या चेहऱ्याचा प्रथम प्रथमच पाहत होते सगळे.



"काही नाही."  त्याने पडक्या चेहऱ्याने उत्तर दिल आणि मान हलवत एंट्रन्सच्या दिशेने निघाला.



कडू चेहरा आणि खांदे पाडूनच तो आपल्या डेस्कवर पोचला. त्याला काहीच प्रसन्न वाटत नव्हतं. अविकच्या सीटवर पाहिलं तर अजून आला नव्हता तो. फोन टिवटिवला बघितलं तर ऑफिसच्या ग्रुपवर धडाधड मेसेज धडकत होते. डोक्यात धोक्याची घंटा वाजली कि आज चांगलीच लागणार आहे आपली.



"हे प्रथम, वॉट्सअप डूड.." प्रमेयने मागून येत त्याच्या पाठीत जोराची बुक्की घातली. प्रथम ढिम्मच.... प्रथमचा रिप्लाय नाही बघून तोपण आश्चर्यचकित झाला. 'काहीतरी बिनसलं असावं त्याच...नॉर्मल झालं कि सांगेल' असं विचार करत प्रमेय कामाला लागला. त्याचा पण फोन टिवटिवत होता.



प्रथमला पीसी पण स्टार्ट करावासा वाटेना पण ग्रुपवर बॉसने कामाची 'लॉन्ग'लचक लिस्ट दिलेली. आणि सगळे टास्क आजच कम्प्लिट करायचे होते. अविकचा विचार बॅकग्राउंडला चालू ठेवून त्याने टास्कचा फडशा पडायला सुरुवात केली. सकाळपासून कमीत कमी शंभरवेळा तरी अविकच्या सीटकडे बघून झालेलं पण अविकच्या डोक्यातला राग उतरेल   तर शप्पथ.... एकवेळ गर्लफ्रेंड ऐकेल पण ह्या अव्याचे नखरे तर पोरींपेक्षा जास्त... त्याने मनोमन शिव्यांची फुल वाहिलीच.



"प्रत्या...." प्रथम दचकला. आवाज ओळखीचा वाटतोय म्हणून गर्रकन मागे फिरला. च्यायला...अव्या नॉर्मल झाला. त्याने डोळे चोळून पुन्हा बघितलं. खरंच अविक त्याला हाक मारत होता.



"अव्या..."  तो तोंड उघडून बघतच राहिला.



"चल आता... जेवायचं नाही का रे भुकड्या..." अविकने￰ एक जोरदार धपाटा घातला त्याच्या पाठीत.



"अं.....हं.... अव्या.... म्हणजे तू बोलतोयस... म्हणजे खरंच बोलतोयस..."



"डोक्यावर पडला का आज येताना....?" अविकने वैतागून त्याला टपली मारली.



" नाही म्हणजे रागावलेला ना तू काल." डोक्याला हाताने चोळत तो अविकच्या मागे मागे चालत होता. अविकने मारलेली टपली बऱ्यापैकी लागलेली.



"रात गयी...बात गयी...सोड ना भावा.."



"ओह्ह्...माय अव्या इज ब्याक..."  चार वर्षात आज पहिल्यान्दा असं झालेलं कि अविक एका रात्रीत नॉर्मल झाला. नाहीतर श्रेया आयुष्यातून  गेल्यानंतरचा अविक त्याच्या त्या झोन मधून बाहेर पडणं मुश्किल असायचं. अविक तर नॉर्मल झाला आता प्रथमची मस्ती पुन्हा चालू झाली. जाता जाता त्याने प्रमेयच्या पाठीत बुक्की घातली. 'रिटर्न्ड विथ इंटरेस्ट' असं म्हणत टपली पण दिली.
"साल्या बघून घेईन तुला..." प्रमेयने कागदाचा बोळा फेकत धमकी दिली.



जेवण आटोपल्यावर अर्थात प्रथमचा 'सुट्टा'  टाइम होता. टपरीपर्यंत पोचेपर्यंत त्यांची मस्ती चालूच होती. अविक नॉर्मल झाल्यामुळे प्रथम तर हवेतच होता. रोजचीच सिगारेट, रोजच्याच  गप्पा अर्थात पैसे आजपण अविकनेच दिले पण आज अविकची नजर त्या गर्दीत काहीतरी शोधत होती. काहीतरी हरवलेलं धुंडाळतात तस. त्याची भिरभिरती नजर अडली ती बार्बी डॉलवर. भर दुपारच्या कडकडीत उन्हात तिचा ब्लॅक ड्रेस लगेच सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होता. ती आजही तशीच निर्विकारपणे स्मोक करत होती. तिचे डोळे अगदी कालसारखेच भावनाशून्य.....काय असावं तिच्या कोरड्या डोळ्यामागचं रहस्य.. कोणी इतकं भावना रहित कस असू शकत..... अगदीच नाही तर निदान  ह्या उन्हावरची चिडचिड तरी तिच्या डोळ्यात दिसावी?? अविक मनाशीच विचार करू लागला. तेवढ्यात प्रथम त्याच्या कानाशी खुसपुसला,"ती बघ तुझी रोबोट आलीय." ￰प्रथमकडे बघत त्याने चेहरा वेडावाकडा केला "शट अप".



सिगारेट संपवून ते क्युबिकलमध्ये आले. उरलेला दिवस अविक तिचाच विचार करत होता. कसबस आपलं काम संपवत होता तो. पण पीसी स्क्रीन वर फाईलऐवजी तिचे डोळे दिसत होते. त्या डोळ्यात खोलवर तो कितीतरी वेळ पाहत बसला. कॉफी मगच्या चटक्याने तो भानावर आला....... प्रथमचा एक टास्क अर्धवट होता आणि पूर्ण केल्याशिवाय त्याला घरी जायला मिळणार नव्हते. आणि टास्क पूर्ण करायला बराच वेळ लागणार होता म्हणून अविक घरी निघाला.


आता ऑफिस पूर्ण रिकामं होत. फक्त भिंतीवरच्या वेगवेगळ्या देशांच्या घड्याळांची टिकटिक तीच काय ती सोबतीला होती. अश्या रिकाम्या ऑफिस मध्ये बसायचं प्रथमच्या जीवावर आलेलं पण काय करणार ना ? टास्क कम्प्लिट झाल्याशिवाय तर निघू शकत नाही.आणि टाईमपाससाठी पण सोबत कोणीच नाही....  मग स्वतःशीच बोलत बसला तो.
"काय प्रथमराव कस वाटतंय...MNC मध्ये काम करायचंय का अजून.... टास्क... डेड़लाईन्स... कधी आयुष्यात फॉलो केलेलं का... ?? मस्ती.... अंगातली मस्ती तुमच्या.... आता भोगा आपल्या कर्माची फळ... "



कसाबसा ओढून ताणून रडत रडत त्याने टास्क फिनिश केला. घोड्याच्या डबल स्पीडने बॉसला मेल करून लगेच तो पळाला पण.... लिफ्टची वाट बघत उगाचच लिफ्टच बटन पुन्हा पुन्हा प्रेस करत होता. लिफ्ट पण आरामात सगळ्यांना पोचवत त्याच्या फ्लोअरला आली. लिफ्टला कोपऱ्यापासून हाथ जोडत धन्यवाद देत तो लिफ्टमध्ये शिरला.



पार्किंग मधून गाडी काढत मस्त दीर्घ श्वास घेतला. एव्हाना रात्रीचे नऊ वाजलेले. अंधाराने  पांघरून घेतलेलं. बाहेर स्ट्रीटलाईटचा प्रकाश पसरलेला होता. त्यांच्या ऑफिसच्या परिसरात पब्लिक ट्रान्सपोर्ट तसा कमीच एखाद दुसरी गाडी रस्त्यावरून जायची. नाईट शिफ्ट हा प्रकार नसल्यामुळे आठ पर्यंत ऑफिस खाली व्हायचं. त्यात आजूबाजूला काहीच कन्स्ट्रक्शन  नसल्याने अगदीच शांत आणि सुनसान एरिया.


आताही बरच सुनसान होत सगळं. इतकी शांतता त्याला आवडायची नाही. कधी एकदाचा पळत घरी जाऊन बेडवर अंग टाकतो असं झालेलं त्याला.....घाई घाईत निघाला पण तो. इथून मेनरोडला पोचेपर्यंत सगळंच शुकशुकाट असणार होता. नाही म्हणायला लाईट्स होत्या पण माणूस काही दृष्टीस पडायचा नाही. नेहमीच्या त्या वाटेत एका बस स्टॉप वर त्याला एक ओळखीचा चेहरा अंधुक लाईटच्या प्रकाशात ओझरता दिसला. ऑफिस पासून जवळच्या अंतरावर असलेल्या त्या परिसरातला सर्वात दुर्लक्षित बस स्टॉप होता तो. क्वचितच एखाद दुसरी बस यायची तिथे. आठ नंतर तर साधी रिक्षा पण जवळपास नाही फिरकायची. आणि आता तर नऊ वाजलेले. अशा वेळी, अश्या बस स्टॉप वर कोण तरुणी बसची वाट बघत उभी असेल.....म्हणून तो परत बस स्टॉपच्या दिशेने वळला.



" एक्सक्यूज मी...."  त्याने हळू आवाजात त्या तरुणीला आवाज द्यायचा प्रयत्न केला. पण तिने काही प्रतिसाद दिला नाही.



कदाचित तिने ऐकलं नसावं म्हणून तो पुन्हा जोराने बोलला, " एक्सक्यूज मी...."



त्यावर तिने त्याच्याकडे बघून पण दुर्लक्ष केलं. आता त्याला राग आला. काय बाई आहे ऐकूनच घेत नाही. तो पुन्हा ओरडला,"अहो मॅडम, आठ नंतर इथे कोणतीही बस नाहीतर ऑटो काहीच येत नाही. इथे जास्त वेळ थांबू नका." तिने वळून पाहिलं त्याच्याकडे. चेहऱ्यावर अर्धवट स्कार्फ बांधलेल्या अवस्थेत कोणीतरी उभी होती. साधारण डोळे त्याला पाहिल्यासारखे वाटले. च्यायला हि तर आपली रोबोट बार्बी. तो मनातच खुश झाला. "अ....मॅडम... पुढे एक बस स्टॉप आहे तुम्हाला तिथून वाहन मिळेल."  तिच्या प्रतिक्रियेची वाट पण न पाहता तो अखंड बोलत होता. अंधुक प्रकाशात आणि स्कार्फ मध्ये बंद चेहऱ्यावरचे तिचे एक्सप्रेशन्स कळत नव्हते. ती काही बोलत पण नव्हती. न राहवून प्रथमच बोलला,"पाहिजे तर सोडू का तुम्हाला..." आता मात्र ती त्याच्या दिशेने चालत आली. प्रथमने बाईकला किक मारली आणि क्षणार्धात त्याच्या खाडकन कानाखाली बसली. त्याला काही समजलच नाही.



"कोई और तरीका फाईंड आउट करो लडकी छेडने का..." ती भडकलेली.



"बघा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मला तुम्हाला छेडण्यामध्ये काही इंटरेस्ट नाहीये. कदाचित माहित नसेल तुम्हाला म्हणून एक सुज्ञ नागरिक ह्या कर्तव्याने सांगतोय कि इथे थांबू नका. इथे कोणतही वाहन नाही मिळणार तुम्हाला. आणि जरी तुम्ही कोणाची वाट बघत असाल तरी ह्या सुनसान परिसरात थांबणं इट्स नॉट सेफ... पुढे एक बस स्टॉप आहे पाहिजे तर तिथे आरामात रात्रभर बसू शकता."  प्रथम पण आवाज चढवत बोलला.



तिलापण आतापर्यंत कदाचित समजलं असावं कि त्या परिसरात थांबणं योग्य नाहीये. परंतु प्रथमकडे न बघताच ती रस्त्यावर चालत निघाली. बस स्टॉप बरच बराच लांब होता. पण रस्त्यावर स्ट्रीटलाईट्स असल्याने चालायला काही अडथळा नव्हता. प्रथम हळू हळू बाईक चालवत,थांबत तिला अप्रत्यक्षपणे सोबत करत होता. जशी ती पोचली तसा तो सुसाट वेगात निघाला.तिच्याकडे साधी बघायची पण तसदी नाही घेतली त्याने.



रागच आला होता त्याला त्या बार्बी डॉलचा. 'मी बोललो तर लगेच कानाखाली मारली. आणि इतका वेळ मुर्खासारखी त्या सुनसान जागी उभी होती काही झालं असत तर..... ह्या पोरींना ना डोकंच नसत. गुढग्यात पण नसतो वाटत त्यांचा मेंदू..... जाऊदे आपल्याला काय.... माझच माणुसकी दाखवणं नडत मला... च्यायला तिच्या.... असल्या जोराने मारलाय ना.... जळतोय माझा गाल... अव्याला पण नाही सांगू शकत यार... बिनडोक बेअक्कल पोरगी कुठली.... खरंच रोबोट आहे ती.... साधी माणुसकीची भावना नाही तिच्यात... बार्बी डॉल कसली.. ऍनाबेल आहे...भूतनी ' प्रथमच्या डोक्यातून तिचा राग काही जाईना.



आज त्याला बेडवर पडल्या पडल्या काही झोप येईना. ह्या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत होता. छे..!!  तरीही काही झोप येईना. शेवटी उठून तो विंडोमध्ये जाऊन उभा राहिला. विंडोबाहेर जेवढी शांतता होती त्यापेक्षा त्याच्या मनात खळबळ चालू होती. कशाबद्द्ल ते समजत नव्हतं. बाहेर मस्त गार वारा सुटला होता. त्या वाऱ्यावर झाड पण डोलत होती. हिरवगार पसरलेल्या गवताची तर त्या वाऱ्यावर  स्वार होण्यासाठी चढाओढ चाललेली. आकाशाच्या त्या पटांगणात चंद्र ढगाच्या आड लपत आपल्या चांदण्यांसोबत लपाछपी खेळत होता. ह्या आधी चंद्र कधीच इतका लोभसवाणा   दिसला नव्हता. तो एकटक ते दृश्य बघत होता.  एकाएकी चंद्राच्या आकारात अजून काहीतरी आकार उमटायला लागले. तो चेहरा आहे का.... हो.... ती.... उफफ्फ.... प्रथमने आपले डोळे बंद केले. बंद पापणीआड त्याला तोच चेहरा दिसत होता. मगाच्या तळमळीचं कारण सापडलं त्याला. तो पुन्हा बेड वर आडवा झाला. आता डोळ्यावर निद्रादेवीने फुंकर तर घातली. पण त्या झोपेतही तो चेहरा त्याला छळत होता. गाढ झोपलेल्या त्याच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल उमटली.



क्रमशः