रामायण - अध्याय 1 - बालकाण्ड - 21 MB (Official) द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रामायण - अध्याय 1 - बालकाण्ड - 21

अध्याय 21

दशरथाचे मिथिलेस आगमन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

रामसीतेचे पाणिग्रहण :

सीतेचें रामासीं लग्न । वचन ऐकोनि रावण ।
न दाखवीच काळें वदन । गेला निघोन अधोमुखें ॥ १ ॥
देखोनि श्रीरामप्रताप । राजे जाले सकंप ।
तिहीं सांडोनियां दर्प । गेले नृप निजनगरा ॥ २ ॥
यापरी राजे राक्शस अनेक । समप्रतापें केले विमुख ।
तेणें जनकासी अत्यंत सुख । परम हरिख लग्नाचा ॥ ३ ॥
राजा म्हणे विश्वामित्रासी । शीघ्र आणावया दशरथासी ।
मी धाडितों प्रधानासी । परी तो त्यासी मानीना ॥ ४ ॥

जनक उवाच –
भवतोऽनुमतेर्ब्रह्मन् शीघ्रं गच्छंतु मंत्रिणं ।
मम कौशिक भद्रं ते त्वयोध्यां त्वरिता रथैः ॥ १ ॥
जनकेन समादिष्टा दूतास्ते शीघ्रवाहनाः ।
त्रिरात्रमुषिता मार्गे तेऽयोध्यां प्राविषन्पुरीम् ॥ २ ॥

जनकाच्या विनंतीवरून विश्वामित्र अयोध्येत दूत पाठवितात :

ऐक ऋषिवर्या कौशिका । तुझी नसतां पत्रिका ।
दशरथ न मानी ब्रह्मादिकाअं । तेथे या मशका कोण पुसे ॥ ५ ॥
तुझी न लभतां संज्ञा । वसिष्ठ कदा न ये लग्ना ।
ऐसें जाणोनि सर्वज्ञा । द्यावी अनुज्ञा पत्रेंसी ॥ ६ ॥
आमच्या तुमच्या एकात्मता । पत्र लिहावें विनीतता ।
सीता देऊं केली रघुनाथा । अति पुरुषार्था देखोनी ॥ ७ ॥
रामप्रतापें अतिश्रेष्ठ । पत्र लिहावें अति स्पष्ट ।
जेणें सुखावे श्रीवसिष्ठ । नृप संतुष्ट अजात्मक सुखें ॥ ८ ॥
ऐकोनि जनकाचें वचन । विश्वामित्र सुखसंपन्न ।
पाचारोनियां प्रधान । अनुज्ञानपत्रिका ॥ ९ ॥
आणिकांचे तें निर्जीव पत्र । येथें सचिव तोचि सजीव पत्र ।
लिहिता वरिष्ठ विश्वामित्र । परम पवित्र त्याचेनि ॥ १० ॥
क्षराक्षराहूनि परती । श्रीरामाची निजमूर्तीं ।
करोनि पत्रिकासमाप्ती । प्रधानाहातीं दिधली ॥ ११ ॥
पत्रिकेचा अर्थ श्रेष्ठ । वाचूं जाणे एक वसिष्ठ ।
आणिकां आकळितां अति कष्ट । होईल स्पष्ट अयोध्येसीं ॥ १२ ॥
प्रेमकुंकमें अति प्रीतीं । पत्रिका शोभे शोभनस्थितीं ।
ज्याचेम् प्राधान्य त्रिजगतीं । त्या प्रधानाहातीं दिधली ॥ १३ ॥

अयोध्येत जनकदूतांचे आगमन :

बैसला मनोरथरथीं । चारी वारू चहूं पुरुषार्थीं ।
मनासी ज्याचेनि निजगती । तोचि सारथी दुरेसी ॥ १४ ॥
ऐसिया सन्नद्ध निजस्थितीं । पाठविला शीघ्रजगीं ।
तो पावला तिसरे वस्ती । वस्तीची स्थिती अवधारा ॥ १५ ॥
प्रथम वस्ती श्रवणमननपुरीं । दुजीं निदिध्यासनगरीं ।
तिसरी वस्ती साक्षात्कारीं । अयोध्यापुरीं पावला ॥ १६ ॥
अयोध्या प्रथममोक्षपुरी । अजाचा पुत्र राज्य करी ।
ते श्रीरामाची निजनगरी । प्रधान तेथवरी पावला ॥ १७ ॥

सभेत प्रधानाचे निवेदन :

दशरथसभा वसिष्ठें गाढी । ती पुढें इंद्रसभा बापुडी ।
प्रधानें देखोनि आवडीं उभविली गुढी विजयाची ॥ १८ ॥
सीता अत्यंत सुम्दरी । हरचापभंगें श्रीरामावरी ।
प्रधान वाधावा फोकारीं । घरोघरीं आल्हाद ॥ १९ ॥
हरधनुष्य न पुरे ओढी । ओढितां भंगलें कडाकडीं ।
धाकें रावण पडिला बुडीं । सभा बापुडी मूर्च्छित ॥ २० ॥
धनुष्याची कडाडी । मूर्च्छित रायांचिया कोडी कोडी ।
कृतांताची वळली मुरकुंडी । धाके पोटीं कळिकाळ ॥ २१ ॥
सद्‌गुरू कौशिकें अभ्यासिले । रामलक्ष्मण सुविद्य भले ।
दादुल्याचे ते दादुले । यश पावले तिहीं लोकीं ॥ २२ ॥
जनकनेम अति प्रबळ । सीतेचे लग्नीं शिवचापबळ ।
जो कोणी सज्जील सबळ । त्यासी जानकी माळ घालील ॥ २३ ॥
त्याही जनकाच्या नेमातें । सिद्धि पावविलें त्या समर्थें ।
सभेसी गांजोनि समस्तांतें । सीता रघुनाथें जिंकिली ॥ २४ ॥

दशरथाअ व त्याच्या प्रजेस आनंद :

प्रधानाचे सुखोत्तरीं । सभा गर्जे जयजयाकारीं ।
त्राहाटिल्या निशाणभेरी । मंगळतुरीं आल्हाद ॥ २५ ॥
गुढिया उभविती घरोघरी ।परमानंदे बोलती नरनारी ।
श्रीरामें जनकाच्या स्वयंवरी । सीता सुंदर पर्णियेली ॥ २६ ॥
सांगोनि श्रीरामाची ख्याती । वर्णूनी श्रीरामाची कीर्ती ।
प्रधानें त्या सभेप्रती । घातलें क्षितीं लोटांगण ॥ २७ ॥
अति आल्हाद दशरथासी । सन्मानिलें प्रधानासी ।
मुकुट कुंडलें देवोनि त्यासी । वसिष्ठापासीं बैसविला ॥ २८ ॥
रायें फोडोनियां भांडारें । दाने देतो उदार करें ।
दिधलीं गाईचीं खिल्लारें । कणकोठारें द्विजांसी ॥ २९ ॥
राजा निमग्न परमानंदी । वसिष्ठ सुखावला त्रिशुद्धी ।
प्रधान अत्यंत सुबुद्धी । पत्र ते संधीं ओपिलें ॥ ३० ॥
विश्वामित्राची निजयुक्ती । सर्व सिद्धींच्या सिद्धर्थीं ।
आधीं सद्‌गुरूसी विनंती । मग भूपतिकार्यार्थ ॥ ३१ ॥

विश्वामित्रांची निमंत्रपत्रिका पाहून वसिष्ठांना आनंद :

वसिष्ठ वाचितां पत्र । रामप्रताप अतिविचित्र ।
तेणें सजल झाले नेत्र । धन्य विश्वामित्र तो म्हणे ॥ ३२ ॥
धन्य दशरथाचें भाग्य । आम्ही भाग्याचे सभाग्य ।
धन्य जानकीचें अष्टांग । राम अर्धांग पावली ॥ ३३ ॥
पूर्ण अवतार बाळलीला । बाळपणीं प्तराप आगळा ।
धन्य जानकी जनकबाळा । ब्रह्मपुतळा निजकांत ॥ ३४ ॥
ऐसी पत्रिकेची स्तुती । वसिष्ठें केली अति प्रीतीं ।
काय लिहिलेंसे पत्रार्थी । सावधान श्रोतीं परिसावें ॥ ३५ ॥
ॐ नमो स्वामी वसिष्ठा । निजज्ञानें ज्ञानश्रेष्ठा ।
परमानंदें अति प्रतिष्ठा । विनंती वरिष्ठा अवधारीं ॥ ३६ ॥
तुझी आल्हादें व्हावी भेटी । हे जनकाची उत्कंठा मोठी ।
वोहरें पहावीं कृपादृष्टीं । लग्नसंतुष्टी तुझेनि ॥ ३७ ॥
सीता श्रीरामें धनुर्वेधीं । स्वयंवरीं जिंकिली त्रिशुद्धी ।
तूं आलिया कृपानिधी । लग्नसिद्धी होईल ॥ ३८ ॥
प्रकृतिपुरुषां पाणिग्रहण । तुझेनि होतसे संपूर्ण ।
तूं कारणा निजकारण । लग्न सुलग्न तुझेनि ॥ ३९ ॥
दशेंद्रियदशरथा । तूंचि कर्ता तूंचि नियंतां ।
पाणिग्रहणीं रामसीता । तूं मुख्य कर्ता कुळगुरू ॥ ४० ॥
तुझी आज्ञा अतिसमर्थ । गगनी छाटी वंदी आदित्य ।
तुझेनि रघुवंश सनाथ । लग्न समाप्त तुझेनि ॥ ४१ ॥
यापरी वसिष्ठासि विनंती । विश्वामित्रें लिहिली स्वस्थिती ।
जनक दशरथ भूपती । पत्रयुक्ती< प्रार्थित ॥ ४२ ॥
स्वस्ति श्रीअजात्मजा । सूर्यवंशवंशध्वजा ।
दशरथा महाराजा । श्रीराम तुझा निजविजयी ॥ ४२ ॥
श्रीराम प्रतापें आगळा । स्वयंवरीं वरिली जनकबाळा ।
त्यांच्या लग्नाचा सोहळा । यावें भूपाळा पहावया ॥ ४४ ॥
श्रीरामाच्या निजनयनी । आणाव्या सुखासनीं ।
भरत शत्रुघ्न पैं दोन्ही । गजारोहिणी आणावे ॥ ४५ ॥
सेवक सुहृद लहानथोर । सेनापति सहपरिवार ।
सोयरे आणावे समग्र । सोहळा स्वयंवर पहावया ॥ ४६ ॥
देखोनि जनकाचे मूळपत्र । दशरथासी आल्हाद थोर ।
प्रधान प्रेरिला सत्वर । रथ कुंजर शृंगारावया ॥ ४७ ॥
धनुअ सद्गु्रु विश्वामित्र । धनुर्विद्या अति विचित्र ।
त्याचेनि प्रतापें रघुवीर । कृतोपकार आम्हीं केलों ॥ ४८ ॥
ताटिका वधिली अति दुस्तर । यागीं मारिलें राक्षस घोर ।
चापभंगें सीता सुंदर । वरी रामचंद्र गुरुविद्या ॥ ४९ ॥
यापरी प्रतापी रघुनाथा । विश्वामित्रें सुविद्यता ।
ऋषीची आज्ञा यावें लग्नार्था । आम्हां सर्वथा तेथें जाणें ॥ ५० ॥

ततो राज्यां व्यतीतीयां सोपाध्यायः सबांधवाः ।
राजा दशरतो हृष्टः सुमंत्रं इदमब्रवीत् ॥ ३ ॥
अद्य सर्वे धनाध्यक्षा । धनमादाय पुष्कलम् ।
व्रजंतग्रे सुविहिता नानार्तत्नरसमन्विताः ॥ ४ ॥

दशरथाची मिथिला नगरीस जाण्याची तयारी :

रायें नगरीं क्रमोनि निशी । सांगे सुमंत प्रधानासी ।
श्रीरामसीतेच्या लग्नासी । जाणें मिथिलेसी अति शीघ्र ॥ ५१ ॥
भांडारें उघडावी उठाउठीं । काढाव्या द्रव्याच्या कोट्यनुकोटी ।
भरावें गजवाजींच्या पृष्ठीं । उरलें शकटीं भरावें ॥ ५२ ॥
मुकुट कुंडलें अलंकार । रत्न मुक्ताफळें संभार ।
सूत्र पटसूत्र रोमसूत्र । वस्त्रें विचित्र सवें घावीं ॥ ५३ ॥
राजपत्न्याे आणिसुकुमार । सुखासिनीं सालंकार ।
वस्त्रें गजर पालवछत्रें । अति शीघ्र चालों देईं ॥ ५४ ॥
रायासी आल्हाद फार । भरत शत्रुघ्न निजकुमार ।
सालंकृत मनोहर । रथीं सत्वर बैसविले ॥ ५५ ॥
सेनापति वीरें वीर । शृंगारिले सैन्यसंभार ।
टकेपताकानिजगजर । रथ कुंजर घडघडिले ॥ ५६ ॥
सेना चालिली एकसरें । वाजती नानापरींची तुरें ।
गज गर्जती गहिरे । भाट गजरें गर्जती ॥ ५७ ॥
वीरीं दिधली आरोळी । सिंहनादें पिटिली टाळी ।
पर्णावया जनकक्बाळी राजकुळी चालिली ॥ ५८ ॥
आणोनि उत्तम रथांसी । रथीं बैसविले महाऋषी ।
वसिष्ठ वामदेव कश्यपासी । मार्कंडेय ऋषि जाबाली ॥ ५९ ॥
कात्यायनादि ऋषिश्वर । रायापासीं जे निरंतर ।
रथीं बैसविलें अपार । ज्ञानगंभीर निजनिष्ठा ॥ ६० ॥
ज्यांच्या वचनाचेनि पडिपाडें । कळिकाळ तोही पायां पडे ।
ऐसे ऋषिवर्य निधडे । रामवर्‍हाडा तेही आले ॥ ६१ ॥
ऐसे दोन्हीं भागी ऋषीश्वर । मध्ये राजा सहितकुमर ।
पृष्ठभागीं सैन्यसंभार । आले सत्वर मिथिलेसी ॥ ६२ ॥
नामकीर्ति विरक्ती भक्ती । इहीं तीन पेणां वस्ती ।चौ
थेपेणें रघुपती । निजात्मप्रीतीं भेटले ॥ ६३ ॥
अहंसोहंकोहंगती । त्याचि तिहीं पेणा तीन वस्ती ।
तेथवरी ज्याची स्थिती । त्यासी राम निश्चिती भेटेल ॥ ६४ ॥
दृष्य द्रष्टा दर्शनस्थिती । या तिहीं पेणां तीन वस्ती ।
तीन्ही क्रमोनियां चौथी । राम निश्चितीं भेटेल ॥ ६५ ॥
विदेहनगरी विदेहगती । राम राहिलासे सहजस्थ्रितीं ।
तेथवरी ज्याची वस्ती । राम निश्चितीं भेटेल ॥ ६६ ॥
विदेह श्रीराम भेटेल सत्वर । साधनचतुष्टय शृंगार ।
चारी पुरुषार्थ अलंकार । निधडे वीर लेइले ॥ ६७ ॥
यापरी पेणोपेणीं सत्वर । ठाकिलें विदेहाचे नगर ।
अति सत्वर मनोहर । नगरी सुंदर शोभत ॥ ६८ ॥
मुळींचें पदीं वस्ती चार्हीर । करोनि पावले विदेहपुरी ।
तेंचि म्यां वर्णिलें ग्रंथाधारीं । श्रोतीं कुसरी न करावी ॥ ६९ ॥
दशरथा जनकासी भेटी । जानकी कन्या ज्याची गोमटी ।
दोघांचे भेटीची गोड गोष्टी । सुखसंतुष्ती आल्हाद ॥ ७० ॥
रामायणाचें निजसार । तें हे सीतास्वयंवर ।
प्रकृति पुरुषां एकाकार । होती साचार सुलग्नीं ॥ ७१ ॥
जयाचेनि पावन पृथ्वी नवखंड । जयाचेनि पावन पिंडब्रह्मांड ।
त्याचिया लग्नाचें पैं कोड । कथा अतिगोड निरूपणीं ॥ ७२ ॥
एकाजनार्दना शरण । प्रकृतिपुरुषा पाणिग्रहण ।
श्रीरामसेतेचें लग्न । समाधान जीवशिवां ॥ ७३ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे बालकांडे एकाकारटीकायां
दशरथागमनं नाम एकविंशतितमोऽध्यायः ॥ २१ ॥
॥ ओव्या ७३ ॥ श्लोक ४ ॥ एवं ७७ ॥