रामायण - अध्याय 2 - अयोध्याकाण्ड - 5 MB (Official) द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रामायण - अध्याय 2 - अयोध्याकाण्ड - 5

अध्याय 5

दशरथभवनात श्रीरामांचे आगमन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

प्रभाते शर्वरीं दृष्टवा चंद्रनक्षत्रमंडिताम् ।
ततः सूतो यथाकालं पार्थिवस्य निवेशनम् ॥१॥
प्रविवेश प्रबोधार्थं सुमंतो मतिसत्तमः॥२॥

प्रातःकाळी सुमंत दशरथास उठविण्यास गेला :

अभिषेकावया श्रीरघुनाथ । प्रातःकाळीं सुमुहुर्त ।
चंद्र देखोनि गुरुपुष्ययुक्त । वेगीं सुमंत ऊठिला ॥१॥
सुमंत प्रधान बुद्धिमंत । प्रबोधावया श्रीदशरथ ।
आला राजभवनांत । कैकेयीयुक्त नृप जेथें ॥२॥

दशरथाची काळजी :

अभिषेकावया रघुनंदन । राया होई सावधान ।
ऐकोनी प्रधानाचे वचन । मूर्च्छापन्न दशरथ ॥३॥
राम जाईल वनांत । कोणते तोंडी बोलूं मात ।
हातींचा जाईल रघुनाथ । दुःखे मूर्च्छित दशरथ ॥४॥
वना धाडीतो दशरथ । ऐसी ऐकताचि मात ।
वचन नुल्लंघीच रघुनाथ । जाईल वनांत तत्काळ ॥५॥
रामासी नाहीं राज्यचाड । नाहीं विषयांचे कोड ।
माझें वाक्य अति गोड । घेईल ओढ वनवासा ॥६॥
वना धाडितों ऐसी गोष्टी । काना वचना होतां भेटी ।
वना निघेल तो उठाउठीं । जगजेठी श्रीराम ॥७॥
वनवासाची हे कथा । कानीं ऎकता रघुनाथा ।
वना निघेल तत्वतां । त्यासी मी आतां काय करुं ॥८॥
विशेषें माझी भाक । मिथ्या न करील रघुकुळटिळक ।
वना जाईल आवश्यक । दुःखशोक दशरथा ॥९॥
कैकेयी तवं आहे खोती । ह्ट्टें विस्तारील हे गोष्टी ।
पाडील श्रीरामासीं तुटी । दुःखे सृष्टी मूर्च्छित ॥१०॥

रामास बोलावण्याविषयी कैकेयीची सुमंतास आज्ञा :

कैकेयी म्हणे सुमंताप्रती । रायासी लागली सुषुप्ती ।
वेगीं आणावा रघुपती । आज्ञा मजप्रति रायाची ॥११॥
ऎसी कैसी हे सुषुप्ती । क्षितितळीं भूपती ।
मिथ्या मानोनियां चित्तीं । निघे मागुती सुमंत ॥१२॥
तंव अभिषेकसामग्री । सभामंडपाच्या द्वारीं ।
स्वये वसिष्ठ विस्तारी । नानापरी उपचार ॥१३॥

अभिषेकाची सर्व तयारी करण्याची वसिष्ठांची सुमंताला अनुज्ञा :

वसिष्ठ म्हणे सुमंतासी । सर्व सामग्री सागें रायापासी ।
वेगीं बोलवीं तयासी । अभिषेकासी सुमुहुर्त ॥१४॥
सदाफळी औदुंबर । त्याचे भद्रपीठ मनोहर ।
केलें असे अतिं सुंदर । श्रीरामचंद्राभिषेका ॥१५॥
भद्रीं व्याघ्रचर्म अहत । समग्रही नखपुच्छ्युक्त ।
सिंहासनीं विराजित । वरासनार्थ श्रीराम ॥१६॥
सुवर्णकुंभ शतानुशत । दीर्घ वसंडे वृषभ श्वेत ।
सुवर्णशुंगी क्षीरयुक्त । वस्त्रें अहत अति शुद्ध ॥१७॥
सिंधुसंगम सुधासंगम । गंगायमुनात्रिवेणीसंगम ।
जळें आणिलीं पवित्र परम । रघूत्तमभिषेका ॥१८॥
सप्त कुश सप्त मृत्तिका । सप्त ऋषी आणिले देखा ।
चतुःसमुद्रींच्या उदका । अभिषेका आणिलें ॥१९॥
श्वेताशार्दुळ रथ । चंद्रोपम छत्र श्वेत ।
श्वेत चामरें रत्‍नजडीत । सुशोभित व्यजनें ॥२०॥
गोरोचनहरिद्रागौरव । क्षीरचूतपल्लव पद्मपल्लव ।
तोरणें बांधिलीं अति अपुर्वं । राजे सर्व तिष्ठती ॥२१॥
दधिमधुघृताक्षतयुक्त । पूर्ण कलश सालंकृत ।
अष्टकन्या दानार्थ । उभ्या तिष्ठती ॥२२॥
मुकुट कुंडलें रत्‍नमेखळा । बाहुअंगदें कंठमाळा ।
सिद्धसामग्री या सकळा । ब्राम्हमेळा तिष्टतसे ॥२३॥
बाहेरी येवोनि आपण । अभिषेकाव रघुनंदन ।
हे वसिष्ठाची आज्ञा पूर्ण । केलें नमन सुमंतें ॥२४॥
ऎकोनि वसिष्ठाचें वचन । राजा जाला अति उद्विग्न ।
केवीं दावूं काळें वदन । मूर्छापन्न अति दुःखी ॥२५॥

कैकेयी सुमंताला वरांचा वृत्तांत सांगते :

देखोनि रायाची अवस्था । कंप सुटला सुमंता ।
कैकेयी सांगे समुळे वार्ता । म्हणे राव कां वृथा दुःख मानी ॥२६॥
पूर्वी दिधलें मज भाकेसी । भरता राज्य राम वनवासी ।
तेंचि मागतां रायायी । अति दुःखासी कां मानी ॥२७॥
निश्चय जाण तूं सुमंता । राज्यपत मझिया भरता ।
दंडकारण्य श्रीरघुनाथा । भाक अन्यथा मी न करीं ॥२८॥

सुमंताकडून धिक्कार :

ऐकतां कैकेयीची वाणी । सुमंत मूर्च्छित पडे धरणीं ।
कपाळ पिटी आक्रंदोनी । काय पापिणी वदलीस ॥२९॥
राम परम प्रिय समस्तां । जीवाहूनि आवडता ।
त्या तुज द्वेषिता रघुनाथा । अभाग्यता पैं आली ॥३०॥
इचें वचन अति अनर्थं । इसी रायें करावा घात ।
वना दवडितां रघुनाथ । अति आकांत होईल ॥३१॥
येरी म्हणे पूर्वीची भाक । न देतां रायासी होय नरक ।
सुमंता ओढवलें अति दुःख । अधोमुख विलपत ॥३२॥
तयासी संबोखी दशरथ । म्हणे हें बाहेर कळों नेदीं मात ।
वेगीं पाचारीं श्रीरघुनाथ । मग वृत्तांत कळेल ॥३३॥

सुमंताचे रामभवनात आगमन, भवनवर्णनः

सुमंत वेगें राजाज्ञेसी । आला श्रीरामभवनासी ।
शोभा शोभे वैकुंठासी । लाजे त्यासी कैलास ॥३४॥
भवनी मयूर नृत्य करिती । तेणें तांडव विसरे उमापती ।
मधुर पारवे घुमघुमती । चमके चित्तीं सामवेद ॥३५॥
पारव्यांच्या पीयूषवाणी । गंधर्व ठेले वेडावोनी ।
चारी वेद जाले मौनी । श्रीरामभवनीं आल्हाद ॥३६॥
श्रीरामच्या भवनाप्रती । शुक सुभाषित बोलती ।
वेदांत वेडावले किती । रस सेविती उपनिषदें ॥३७॥
सारिका गोड बोलती । तेणें लाजे सरस्वती ।
विस्मयो मानी बृहस्पती । पक्षी पक्षार्थी परमार्थी ॥३८॥
रस स्त्रवती द्राक्षघड । तो रस सर्वाहूनी गोड ।
सचाड तेणें होय निचाड । पुरें कोड मुमुक्षूंचें ॥३९॥
रामागणींच्या कमळिणी । कमळा लाजें त्यात देखोनी ।
माझा रहिवास चरणीं । हृदयाभरणी शोभती ॥४०॥
श्रीरामभवनींचें सुमन । सुवासें होय मन उन्मन ।
तेणें सुवासें पांगुळे पवन । राहे मिळोन चिद्रूपीं ॥४१॥
पताका श्रीराममंदिरीं । झळकताती चिदंबरीं ।
जो कां लक्षी त्यांची थोरी । चराचरीं तो धन्य ॥४२॥
चूतवृक्ष राजभवनांत । अवघे जाले जी अच्युत ।
सफळ जाले अति विनीत । फळें त्यागीत परिपाकें ॥४३॥
पारिजात स्वर्गसुवासें । पायीं लोळती कोणी न पुसे ।
श्रीराममंदिराची माणसें । अवघीं उदासें तयांसीं ॥४४॥
सप्तावरण सप्त दारवंठे । द्वारपाळ सज्ञान मोठे ।
कळिकाळातें मारिती सोटे । ऎसे लाठे प्रतापी ॥४५॥
देखोनि द्वारपाळाचा वेत । कृतांत चळ्चळां कांपत ।
काळ कामरा पैं होत । श्रीरघुनाथ सेवावया ॥४६॥
श्रीराममंदिर देखतां देख । सुमंतासी परम हरिख ।
मागील विसरला दुःख । परम सुख पावला ॥४७॥

सप्तद्वाराचे पारमार्थिक रूपक :

रथ सांडोनि पहिले द्वारीं । छत्रचामरें दुसरें द्वारीं ।
(पादत्राण तिसरे द्वारीं । त्यजोनि नरीं जाईये ॥
पादत्राणादि सामोग्री । तिसरे द्वारी पैं राहे ॥४८॥
चौथे द्वारीं सांडित अर्थ । पांवचें द्वारीं निःशेष स्वार्थ ।
सहावे द्वारीं साधनें समस्त । स्वयें राहती सर्वही ॥४९॥
सांडोनि मीतूपणाचा सांगात । रिघावें द्वाराआंत ।
तैंचि भेटे श्रीरघुनाथ । मुख्य परमार्थ या नांव ॥५०॥
भावार्थ तें राजभवन । प्रथम दारवंटा ते श्रवण ।
दुसरे द्वारीं ते साधन । नित्यानित्य ज्ञान तें तिजें ॥५१॥
चौथा दारवंटा तें मनन । पांचवा तो निदिध्यासन ।
सहावा तो वैराग्य पूर्ण । सातवा तो जाण साक्षात्कार ॥५२॥
याचि मार्गाचे परिपाटी । श्रीरामासीं होय भेटी ।
भरलिया जीवां आव्हाटी । वाजती पाठीं यमदंड ॥५३॥

श्रीरामस्वरूपवर्णन :

असो अतिशयें हा कवितार्थ । पुढें चालवावा ग्रंथ ।
पाचारावया श्रीरघुनाथ । आला सुमंत सवेग ॥५४॥
अंतरशुद्ध तो सुमंत । आला सातवे द्वाराआंत ।
तेणें देखिला श्रीरघुनाथ । स्वरूपार्थ अनुपम्य ॥५५॥
राजीवलोचन घनसांवळा । आजानुबाहु अति विशाळा ।
मुकुटकुंडलें विचित्रमाळा । अनर्घ्य गळां निजपदक ॥५६॥
वीज लागोनि कांसेसी । जावों विसरली अस्तासी ।
तैसा पीतांबर तेजेंसी । कटिप्रदेशीं लखलखित ॥५७॥
सांवळे अंगी सुगंधी उटी । बाहुभूषणें बाहुवटीं ।
टिळक पिंवळा ललाटीं । देखतां दृष्टीं मन निवे ॥५८॥
पीतांबर परिधान । कंठीं मेखळा विराजमान ।
देखतां हरे भूकतहान । आनंदघन श्रीराम ॥५९॥
वांकी अदुवांचा गजर । चरणीं गर्जती तोडर ।
सुवर्णपर्यंकीं श्रीरघुवीर । आल्हाद थोर सुमंता ॥६०॥
सौंदर्यांची निःसीम सीमा । सीता सेवी श्रीरामा ।
लक्ष्मीकांता जैसा रमा । तैसा प्रतिमा शोभत ॥६१॥

दशरथाच्या बोलण्यावरून त्याच्याकडे श्रीरामांचे जाणे, परिवारवर्णन :

ऎसा देखोनि रघुवीर । सुमंतें केला नमस्कार ।
तुझे भेटीसी नृपवर । अति सादर एकांतीं ॥६२॥
ऎकोनि सुमंताचें वचन । सीता बोले सुहास्यवदन ।
करावया राज्याभिषिंचन । रायें प्रधान पाठविला ॥६३॥
ऐकोनि पितयांचें आज्ञावचन । शीघ्र उठिला रघुनंदन ।
सीतेनें करोनियां नमन । निराजन त्यासी केलें ॥६४॥
श्रीराम द्वारांतरीं येत । सुमंतें शीघ्र आणिला रथ ।
त्यावरी बैसविला रघुनाथ । जैसा भास्कर तेजस्वी ॥६५॥
लक्ष्मण जाला छ्त्रधारी । चामरें सुमंताचे करीं ।
श्रीराम निघाला बाहेरी । जयजयकार घन गर्जे ॥६६॥
पुढं वीर वेत्रपानी । लागल्या वाजंत्र्यांच्या ध्वनी ।
राजें जे का मुकुटमणी । लागती चरणी श्रीरामाचे ॥६७॥
पाठीशी रथांचे घडघडाट । वरी युवराजे श्रेष्ठ श्रेष्ठ ।
दोहीं बाहीं कुंजरथाट । पुढें उभ्दत महावीर ॥६८॥
असिवारांचे पैं थवे । वारु नाचती अति लाघवें ।
महामांडलीकांचे यावे । जयजयकारें गर्जती ॥६९॥
अश्वगजरथांचें भार । चालती पायांचे मोगर ।
हैकार थैकार जयजयकार । सेनासंभार चतुरंग ॥७०॥
ध्वजा पताका अपार । डोलती श्रीगिरीसंभार ।
सिंहनाद करिती वीर । भाट कैवार वानिती ॥७१॥
नगरनागरिक लोक । हर्षें बोलती सकळिक ।
रायें श्रीराम पाचारिला देख । राज्याभिषेक करावया ॥७२॥
हेचि वार्ता घरोघरीं । स्वयें बोलती नरनारी ।
राम जातो निजनगरीं । राज्याधिकारी व्हावया ॥७३॥
मार्ग शिंपिले सुगंधें । तोरणें मखरें नानाविधें ।
नगर शृंगारिलें विनोदें । परमानंदे आल्हाद ॥७४॥
मुंदपघसणि होत भारी । एक चधले माडियागोपुरीं ।
एक पाहाती गवाक्षद्वारीं । आवडी भारी श्रीरामी ॥७५॥
आल्हाद नगरामाझारीं । गुढियां उभाविल्या घरोघरीं ।
सदीप बलिदानें करीं । नरनारी ओवाळिती ॥७६॥
पाहतां श्रीरामाचें मुख । परमानंदें होतसे सुख ।
डोळिया लागली टकमक । नावडे आणिक दृष्टीसी ॥७७॥
लवों विसरलीं नेत्रपातीं । प्राण पांगुळ झाला निजगती ।
सर्व इंद्रियां एकवृत्ती । श्रीराममूर्ती देखोनि ॥७८॥
सादरें पाहतां रघुपती । आनंदे कोंदली त्रिजगती ।
नाठवे देहगेहस्फूर्ती । श्रीराममूर्ती देखोनी ॥७९॥
देखतां श्रीरामाचें मुख । निःशेष निमाले पें दुःख ।
तिहीं लोकीं न माये सुख । हर्षें हरिख कोंदाते ॥८०॥
देखोनिया श्रीरामवदन । जीवविसरे भूकतहान ।
आनम्दे निवती नयन । रघुनंदन देखोनी ॥८१॥
पाहतां श्रीरामस्वरूप । नाम निरसी पुण्यपाप ।
तक्ताळ जातीं त्रिविध ताप । सुखस्वरूप श्रीराम ॥८२॥

श्रीरामांना आलेले पाहून राजाची अवस्था :

नाना ध्वनींची वाजंतरीं । श्रीराम येतां निजनगरीं ।
ऎकोनि राजा रुदन करी । म्हणे कैसेपरी मुख दावूं ॥८३॥
जगासी श्रीरामाचें सुख । तेणें दशरथा परम दुःख ।
त्याचें पाहूं न शके मुख । पाडिली अटक कैकेयीयें ॥८४॥
श्रीराम निनवी सर्वांसी । तेणें अति ताप दशरथासी ।
कैकेयीनें पाडिलें अति भ्रांतीसी । निजभाकेसी गोंवोनि ॥८५॥
स्त्रीचरित्र अगम्य सृष्टीं । निजवरदाचे नेटपाटीं ।
पित्यापुत्रां पाडीली तुटीं । उठाउठी कैकेयीयें ॥८६॥
दारूण स्त्रियांचें विंदान । श्रीरामासी वनप्रयान ।
तेंचि दशथासी मरण । नाडिली आपण वैधव्यें ॥८७॥
ऎसें जाणोनि दशरथ । अतिशयेंसींविलपत ।
तंव तेथें पातला श्रीरामरघुनाथ । समवेत सौमित्र ॥८८॥

श्रीरामांनी येताच दशरथ-कैकेयीला प्रणिपात :

नमस्कारोनि दशरथा । कैकेयीचरणीं ठेविला माथा ।
म्हने विजयी होई बा रघुनाथा । वाग्देवता सत्य वदे ॥८९॥
कैकेयीआशीर्वादगोष्टी । रामें बांधिली शकुनगांठी ।
विजयी जालों मी सृष्टीं । बाहे थापटी स्वानंदें ॥९०॥
उल्लास देखोनि रघुनाथा । दारूण मूर्छा आली दशरथा ।
श्रीरामवियोगाची अवस्था । काहीं सर्वथा बोलवेना ॥९१॥
छेदावया दशकंठ । मुहुर्त सांगे वसिष्ठ ।
अयोध्याराज्य तें कनिष्ठ । रामराज्य श्रेष्ठ तिहीं लोकीं ॥९२॥
श्रीरामासी संभाषण । रायास न करवे जाण ।
कैकेयीयें केलें मुखमुद्रण । वनाभिगमन न सांगवे ॥९३॥
न बोलवे येथें राहें । न बोलवे वनासी जायें ।
देखोनि श्रीरामाचे पायें । दुःखी होये अति दुःखें ॥९४॥
बाष्पें रोधिला निजकंठ । घोर वाजे घरघराट ।
टंवकारिले नेत्रवाट । व्यथा उभ्दट रायासी ॥९५॥

रामाची कैकेयीला प्रार्थना :

राजा देखोनि व्यथाभूत । कैकेयीसी पुसे रघुनाथ ।
कैसेनि ताप जाला अद्‌भुत । किंवा भूतसंचारू ॥९६॥
अथवा माझी अपराधता । घडली असे मज नकळतां ।
कीं कांहीं भरते धाडिली वार्ता । की शत्रुघ्नें बोलतां अन्याय केला ॥९७॥
तरी नव्हे देह्तापाची निष्ठा । नव्हे भूतसंचाराचा ताठा ।
नव्हें त्रिदोषाचा फांटा । नृपवरिष्ठा कोण व्यथा ॥९८॥
दैविक दैहिक किंवा मानसिक । अथवा काहीं आहे अलौकिक ।
रायासी कवणेपरी दुःख । तुज सम्यक पुसतों ॥९९॥
धाडोनि सुमंत प्रधान । रायें बोलाविलें जाण ।
त्या मज कोण आज्ञापन । तेंही आपण पुसावें ॥१००॥

रामांच्या क्रोधाबददल कैकेयीस भय :

कैकेयी म्हणे रघुनाथा । तुझेनि रायसी पूर्ण व्यथा ।
तेही तुज सागेन आतां । कोप सर्वथा न करावा ॥१॥
माझें एकतांची वचन । तुज कोप येईल पूर्ण ।
यालागीं धाके माझें मन । पूर्वकथन सांगावया ॥२॥
ऐकोनि कैकेयीचें वचन । रामें तिचे धरिले चरण ।
ऐसा महापापी कोण । जो मातृवचनविरोधी ॥३॥
त्रिसत्य सत्य हें जाण । तुझें वचन मज प्रमाण ।
वाहतों वसिष्ठाची आण । विकल्प पूर्ण सांडि माये ॥४॥
ऐकोनि श्रीरामाचें निर्वाण । कैकेयी उल्ल्हासली आपण ।
रामें करावया वनप्रयाण । धर्म वचन उब्दोधी ॥५॥
कैकेयीची युक्ती कैसी । राम करावा वनवासी ।
धर्मवचनाचे पाशीं । श्रीरामासी दृढ बांधावे ॥६॥
दृढ वराचें वरबंधन । जेणें दशरथासी दुःख संपूर्ण ।
तें निवारील रघुनंदन । प्रतिज्ञा प्रमाण वनवासा ॥७॥
राज्य सांडोनि वना जातां । दुःख नाहीं श्रीरघुनाथा ।
वनाभिगमन उल्हासता । लंकानाथवधार्थी ॥८॥
एकाजनार्दना शरण । जालें श्रीरामागमन ।
पुढां करावया वनाभिगमन । सावधान अवधारा ॥१०९॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणें अयोध्याकांडे एकाकारटीकायां
श्रीरामागमनं नाम पंचमोऽध्यायः ॥ ५ ॥
॥ ओंव्या १०९ ॥ श्लोक २ ॥ एवं १११ ॥