अध्याय 15
श्रीराम-भरतभेट
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
भरताचे चित्रकूटाकडे प्रयाण :
देखोनि चित्रकूट पर्वत । अत्यंत हरखिला भरत ।
देखावया श्रीरघुनाथ । उल्हास अद्भुत सर्वांसी ॥१॥
सेन शृंगारिली मनोहर । वीरीं केले नाना शृंगार ।
गर्जत घेवोनि गजभार । भरत सत्वर चालिला ॥२॥
कोईते कातिया कुर्हा्डे । वन छेदिती सैन्यापुढें ।
वेगीं भूमि सज्जिती मातियेडे । गज रथ घोडे चालावया ॥३॥
अश्वगजांचा कडकडाट । रथ चालिले घडघडाट ।
सैन्य चालतां न पुरे वाट । रजें वैकुंठ व्यापिलें ॥४॥
चरणरज अति उभ्दट । लोकलोकांतर त्यजोनि स्पष्ट ।
ठाकोनि जावें वैकुंठ । हा नेटपाट रजाचा ॥५॥
गज गर्जती गहिरे । वारूं हिंसती एकसरें ।
तुरें वाजती अपारें । गिरा गंभीर वीर गर्जती ॥६॥
निशाण भेरी वाजंतरें । डोल ढमके बुरंगे घोरें ।
तडक फुटलें एकसरें । गिरिकंदरें दुमदुमिली ॥७॥
अथ रामे तदासीने लक्ष्मणे चाभिवीक्ष्यति ।
तस्य सैन्यस्य महतो रौद्र आसीन्महास्वन ॥१॥
तेन शब्देन महता वर्धता विप्रबोधिताः ।
गुहां सत्यज्य वै व्याघ्रा निलिल्युर्बिलवाससि ॥२॥
ऋक्षाश्चोंत्ससृजुर्वृक्षान्प्रेतुर्हरयो गुहाम् ।
खमुत्पेतुः खगास्तत्र मृगाश्चापि विदुदुवः ॥३॥
सैन्याच्या गजबजाटाने, घडाघडाने त्या परिसरांतील वनचर व रहिवांशाची धांदल :
ऐकतां श्रीराम सौमित्र । भरतसेनेचा नाद थोर ।
दुमदुमिलें गिरिकंदर । श्वापदें क्रूर गजबजिलीं ॥८॥
नाद न समायें गगनीं । नादें कंपायमान अवनी ।
श्वापदें पळती जीव घेवोनि । पक्षी त्रासोनी कलकलिती ॥९॥
व्याघ्र पळाले सांडोनि जाळी । वराह दडाले महीबिळीं ।
सर्प रिघाले वारुळीं । दडी पाताळीं तिहीं दिधली ॥१०॥
तरस तरग मृग मुंगसें । धाकें पळती अपैसें ।
जळींचें खळबळिले मासे । भूतें आक्रोशें धुगधुगिती ॥११॥
ऐकतां धाकाची दणदण । आस्वलें विसरली गुणगुण ।
तींही पळालीं जीव घेवोन । कंदरारण्य टाकिलें ॥१२॥
धाकें पळती नरवानर । पळती वनराजांचे भार ।
सिंहासी धाक लागला थोर । मारूं कुंजर विसरले ॥१३॥
धाकें पळती रानम्हैसे । पळतां मागें पुढे न दिसे ।
रानगाई पळती आक्रोशें । हाणिती वत्सें हंबरडे ॥१४॥
विलीना विविशुर्भीताः स्ववस्तिषु द्विजातयः ।
विद्याधराः खमत्पेतुः किन्नरा भेजिरे दिशः ॥४॥
तमभ्यासमनुप्राप्तं तस्य देशस्य लक्ष्मणः ।
सैन्यस्य चागतं शब्दमिति रामे न्यवेदयेत् ॥५॥
वनौकें कांपती चळचळीं । वडवाघुळें रिघती ढोलीं ।
वृक्ष उन्मळूती समूळीं । देती आरोळी भयाची ॥१५॥
द्विजवरांचे शिष्य बहुत । धाकें चळावळां कांपत ।
धोत्रामध्ये मुतत । एका अधोवात होंसरले ॥१६॥
धाक घेतला उभ्दट । दांत वाजती खटखट ।
एकांचे धाकें फुंगलें पोट । एकांचे कंठ शोकले ॥१७॥
ब्राह्मण शांतिपाठ जपती । तरी धीर धरूं न शकती चित्तीं ।
सांडोनियां श्रीरघुनाथाप्रती । पळाले समस्त गुहेमाजी ॥१८॥
विद्याधर आणि किन्नर । धाके लंघिती दिशांचे पार ।
नादे त्रासिले दुर्धर । वनींचे वनचर पळाले ॥१९॥
नादें भिल्ल पळाले धाकेंसीं । ते सांगती श्रीरामासी ।
वेगीं पळवा सीतेसी । आलें वनासी परचक्र ॥२०॥
जानकी देखोनि सुंदरी । हिरोनि नेतील क्षणामाझारीं ।
इसी तुम्हीं धरोनि करीं । गिरीकंदरीं रिघावें ॥२१॥
तुम्ही अवघे दोघे जण । जरी आहेती धनुष्यबाण ।
तरी कितीक कराल आंगवण । सैन्य दारुण आलेंसे ॥२२॥
हंत लक्ष्मण पश्येह सुमित्रा सुप्रजास्त्वया ।
भीमस्तनितगंभीरं तुमुलः श्रूयते स्वप्न ॥६॥
कोणाचे सैन्य आहे त्याचा शोध घेण्याचा लक्ष्मणाला आदेश :
श्रीराम म्हणे गा लक्ष्मणा । कोण्या रायाची हे सेना ।
करीत आलीसे गर्जना । आणोनि मना मज सांगे ॥२३॥
चतुरा सुमित्रानंदना । तूं ओळखिसी राजचिन्हां ।
कोण राव आला वना । आणुनि मना मज सांगें ॥२४॥
ये वनीं वाल्मीकाश्रमासी । राजे भेटों येती त्यासी ।
अथवा आले पारधीसी । आणोनि मनासी मज सांगें ॥२५॥
ऎकोनि श्रीरामाच्या वचना । वंदोनिया त्याचे चरणा ।
सवेग पाहूं आला सेना । राजचिन्हां लक्षित ॥२६॥
ध्वजपताकांवरुन अयोध्येची सेना आली म्हणून लक्ष्मणाचा संताप व लढाईची सज्जता :
देखो ध्वजांकीं दशरथ । हे तंव राघवसेना समस्त ।
वनीं वधावया रघुनाथ । सेनेसीं भरत आलासे ॥२७॥
कैसा राज्यलोभाचा स्वार्थ । सखा बंधु जो आमुचा आप्त ।
तो वैराकारा पेटला भरत । वनीं रघुनाथ वधूं आला ॥२८॥
पहिलें श्रीरामीं दावी प्रेम । डोळा आंसूं अंगी रोम ।
तोचि मारावया श्रीराम । वना अधम स्वयें आला ॥२९॥
श्रीरामाचा अनन्य भक्त । मी जीवें असतां पैं जीत ।
कैसेनि मारील रघुनाथ । ससैन्य भरत निवटीन ॥३०॥
आजी माझे तिखट बाणीं । धडमुंडाकित करीन धरणी ।
भरत शत्रुघ्न हे दोनी । अर्धक्षणी मारीन ॥३१॥
श्रीरामाचा निजघातकी । तो बंधु मारितां नव्हें पातकी ।
यश मिरवेल तिहीं लोकीं । मनी निष्कट नेम केला ॥३२॥
रागें धनुष्या वाहिला गुण । आरोळी देवोनि लक्ष्मण ।
सैन्यासन्मुख आला आपण । निर्वाणबाण सज्जोनि ॥३३॥
सौमित्राचेनि गिरागजरें । दुमदुमिलीं गिरिकंदरें ।
डळमळलीं मेरुशिखरें । धरा भारें कांपत ॥३४॥
आधींच शेषाचा अवतार । श्रीरामविरहें कोपला थोर ।
नेत्री ज्वाळा निघती दुर्धर । तंव सुरनर कांपती ॥३५॥
सन्मुख देखोनि सौमित्रासी । सेनासैनिक कासाविसी ।
परस्परें बोलती येरयेरांसी । हाही आम्हासी स्वामी होय ॥३६॥
जैसे भरत आणि शत्रुघ्न । तैसेचि श्रीराम आणि लक्ष्मण ।
येथें कोणासी झुंजेल कोण । विषम पूर्ण ओढवलें ॥३७॥
पुढें झुंजतां स्वामी संपूर्ण । मागें पळतां उणेपण ।
सौमित्रें सज्जिला धनुष्यबाण । काय आपण करावें ॥३८॥
राहिली श्रीरामाची भेटी । युद्ध मांडले उठाउठीं ।
सरली संग्रामाची गोष्टी । शस्त्रें पोटीं घालावीं ॥३९॥
सन्मुख झुंजता स्वामीसीं तुटी । संग्रामी देवो नये पाटीं ।
क्षात्रधर्माची अटक मोठी । शस्त्रें पोटी घालावीं ॥४०॥
आतां श्रीराम न दिसे दृष्टी । विचाराची खुंटली गोष्टी ।
क्षात्रधर्माची अटक मोठी । शस्त्रें पोटी घालावीं ॥४१॥
ऎकोनि सौमित्राचा सिंहनाद । श्रीराम जाला सन्नद्ध ।
दारुण मांडिलेंसे युद्ध । म्हणोनि सक्रोध चालिला ॥४२॥
श्रीराम योद्धा निरीक्षी नयना । तंव देखे दशरथसेना ।
मग तो म्हणे गा लक्ष्मणा । आप आपणा युद्ध केंवी ॥४३॥
आमची सेना आमचे प्रधान । आमचे बंधु भरत शत्रुघ्न ।
तुज युद्धासी काय कारण । निर्वाणबाण कां घेसी ॥४४॥
संपन्न राज्यामिच्छंस्तु व्यक्तं राज्याभिषेचनं ।
आवां हंतुं समभ्येति कैकेया भरत सुतः ॥७॥
सौमित्र म्हणे रघुनंदना । सन्नद्ध बाहे करोनियां सेना ।
भरत आला असे वना । आम्हां दोघांजणां मारावया ॥४५॥
माझ्या रुक्मपुंखबाणीं । मारीन वीरांच्या श्रेणी ।
भरत शत्रुघ्न पाडीन रणीं । रुधिरें ध्रणी न्हाणीन ॥४६॥
जो श्रीरामादी दे संताप । तो बंधु मारतां नाहीं पाप ।
श्रीरामाकार्याथं साटोप । पाहें प्रताप रणरंगी ॥४७॥
मी तंव तुझा अनन्य भृत्य । जवळीं असतां जीवें जित ।
कैसेनि तुज मारील भरत । करीन घात समस्तांचा ॥४८॥
ऎसें बोलोनि लक्ष्मण । करुं निघाला युद्धकंदन ।
तंव श्रीरामें धरिला धांवोन । म्हणे ऎसे आपण करु नये ॥४९॥
त्यांचे युद्धासी आले कोण । नाहीं तिहीं सोशिला बाण ।
तंववरी जाण आपण । युद्ध दारुण करु नये ॥५०॥
सुसंरब्धं तु भरत लक्ष्मणं क्रोधमूच्छितं ।
रामस्तु परिसांत्व्याथ वचनं चेदमब्रीवीत ॥८॥
किमत्रं धनुषा कार्य्मसिना वा सचर्मणा ।
महाबले महोत्साहे भरते स्वयमागते ॥९॥
विप्रियं कृतपूर्वं ते भरतेन कदा नु किं ।
“ईद” वा भयं तेऽद्य रतं यद्विशंकसे ॥१०॥
नहि ते निष्ठुरं वाच्यो भरतो नाप्रियं वचः ।
अहं ह्यप्रियमुक्तः स्यां भरतस्याप्रिये कृते ॥११॥
रामाने केलेली लक्ष्मणाची कान उघडणी :
लक्ष्मणा तुजला काय जालें । कैंचें भय सांगसी बोलें ।
भरत आमुचें तान्हुलें । सैन्य आलें तें आमचेंचि ॥५१॥
येथें पारखें आहे कोण । कोणाचा घेऊं पाहसी प्राण ।
युद्ध करीन म्हणसी दारुण । हें मूर्खपण क्रोधाचें ॥५२॥
भरत आम्हांसी पूर्वीपासूनी । विरुद्ध वदला नाही स्वप्नीं ।
तो वधील वना येवोनी । हे मिथ्या वाणी जल्पसी ॥५३॥
येथे काय धरिसी धनुष्याबाण । कोणावरी घेतोसी खर्गवोढण ।
भरत माझा जीवप्राण । त्यावरी निर्वाण करूं नको ॥५४॥
सैन्य आमचें अंकित । त्याचा तूं करूं नये घात ।
क्रोध सांडोनि होईल शांत । ऎक वचनार्थ पैं माझा ॥५५॥
भरत वधील आम्हांलागूनी । हा भयसंकोच तुझे मनीं ।
भरतापासूनि विरुद्ध करणी । जागृती स्वप्नीं घडेना ॥५६॥
लक्ष्मणा तुज नाहीं ज्ञान । म्हणोनि होसी क्रोधायमान ।
तुज मी सांगेन मुळींची खूण । ते सावधान अवधारीं ॥५७॥
रामचंद्रानी वर्णलेले सापिंड्य त्याचा प्रभाव :
एक पिंडाचे नित्यदभूत । भरत आणि मी रघुनाथ ।
तुवां भरताचा करितां घात । मजही अनर्थ होऊं पाहे ॥५८॥
आम्हां दोघांचा एक प्राण । यालागीं गा विरुद्ध वचन ।
भरता न बोलावें आपण । माझी शिकवण मानावी ॥५९॥
विरुद्ध जें बोलसी भरता । तें चढेल माझिया माथां ।
ऎसें जाणोनि तत्वतां । विरुद्ध वार्ता न वदावी ॥६०॥
याचिपरी गा सज्ञान । भूतीं देखतां गा भगवान ।
विरुद्ध न बोलती वचन । समाधान तेणें त्यांसी ॥६१॥
आणिक एक आहे चिन्ह । आम्हां चवघांचा एक प्राण ।
तेहीं सांगेन लक्ष्मण । सावधान अवधारी ॥६२॥
पुत्रेष्टियाग करी दशरथ । ऋष्यशृंग कर्ता तेथ ।
एक ताट पायसमुक्त । दिधलें निश्चित अग्निपुरुषें ॥६३॥
त्याचे केले चारी भाग । अका पिंडाचे आम्ही दोघ ।
सापत्नभागाचा विभाग । विकल्प दोघां आम्हां नाहीं ॥६४॥
प्रथम पायसाचे तीन भाग । घारीनें नेला कैकेयीचा भाग ।
दो भागांचे केले चार भाग । ते आम्ही चवघे एकपिंडी ॥६४॥
पांचवा भाग घारी नेत । तेणें ती जाली शापमुक्त ।
तिसी अंजनीजन्म प्राप्त । भाग उदरांत तियेच्या ॥६६॥
त्या भागाचा जाण निश्चित । जन्म पावला हनुमंत ।
यालागी म्हणती अंजनीसुत । वायुसुत तोही एकें ॥६७॥
अंजनीउदरीं भाग संपूर्ण । यज्ञपुरुष जाण आपण ।
तिसीं विचरला त्याचा प्राण । वायुनंदन या हेतू ॥६८॥
अर्धभागें आम्हा जन्म प्राप्त । सगळ्या भागाचा हनुमंत ।
यालागीं तो बळे अदभूत । तिहीं लोकांत आतुर्बळी ॥६९॥
हा एक पिंडीचा पांचवा कां । सौमित्रा तुज असावा ठाउका ।
पुढें भेटेल पांचवा सखा । हनुमंत देखा सहाकारी ॥७०॥
पिंडभागांचें गुह्य ज्ञान । तें मी जाणें श्रीरघुनंदन ।
वेदशास्त्रां अटक पूर्ण । म्यां हें कथन सांगितलें ॥७१॥
तथोक्तो धर्मशीलेन भ्रात्रा तस्य हिते रतः ।
लक्ष्मणः प्रविवेशेव स्वानि गात्राणि लज्जया ॥१२॥
इति संभाष्यमाणस्तु रामः सौमित्रिणा सह ।
तां चमूं हर्षसंपूर्णां ददर्श सहसा तथा ॥१३॥
अवतीर्य धनुर्बाणं लक्ष्मणो लज्जयान्वितः ।
रामस्य पार्श्वमीये य परितस्थावधोमुखः ॥१४॥
लक्ष्मणाचा विस्मय :
ऎकोनि श्रीरामाचें वचन । लक्ष्मण जाला विस्मयापन्न ।
म्हणे आम्हां चौघांचा एक प्राण । भरत शत्रुघ्न भिन्न नव्हेती ॥७२॥
ऎसें विचारितां आपण । लक्ष्मण जाला लज्जयमान ।
युद्धक्रोध अति दारुण । हें कृपण पैं माझें ॥७३॥
एवं अति लज्जयमान । उतरोनियां धनुष्याचा गुण ।
वंदोनि श्रीरामाचे चरण । जाला लक्ष्मण अति शांत ॥७४॥
विचार करी आपणा आपण । केवढें माझें मूर्खपण ।
भरत शत्रुघ्न आमचा प्राण । त्यांसी म्यां रण कां साधावें ॥७५॥
धन्य धन्य श्रीरामाचें ज्ञान । जाणे भूत भविष्य वर्तमान ।
माझें निरसोनि अज्ञान । समाधान मज दिधलें ॥७६॥
विरुद्ध कर्माचें अति दुःख । सांडोनि क्रोध निःशेख ।
श्रीरामाचे पाठीसीं देख । अधोमुख राहिला ॥७७॥
सैन्यातून श्रीरामांचा जयजयकार :
श्रीरामें वारिला सौमित्र । सेनेनें देखोनि साचार ।
अवघीं केला जयजयकार । हर्षनिर्भर सैन्यासी ॥७८॥
आम्ही न करितों रण । मागें न वचों परतोन ।
साहोनि सौमित्राचे बाण । त्यजितों प्राण क्षात्रधर्मै ॥७९॥
येवढा आमचा अनर्थ । चुकवावया राम समर्थ ।
स्वधर्म रक्षी श्रीरघुनाथ । कृपावंत दीनांचा ॥८०॥
युद्धे स्वामिद्रोही समस्त । मागें पळतां नरकपात ।
क्षात्रधर्माचा अनर्थ । रामें निश्चित चुकविला ॥८१॥
करितां रामनामाचें स्मरण । सद्यः अनर्थासी निर्दळण ।
तो राम देखिलिया जाण । जन्ममरण आम्हां नाहीं ॥८२॥
ऎसें सैनिक बोलती । श्रीरामाची करुनि स्तुती ।
अवघे आनंदे नाचती । श्रीरघुपति कृपाळु ॥८३॥
भरत भेटों आला वना । हर्ष सीतेचिया मना ।
देखोनियां निजसेना । तिसीं चौगुणा आल्हाद ॥८४॥
येथें भेटोनियां भरत । श्रीरामा नेईल अयोध्येआंत ।
स्वराज्य पावेल रघुनाथ । हा भावार्थ सीतेचा ॥८५॥
निविष्टायां तु सेनायामागतो भरतस्तदा ।
ददर्श भ्रातरं हृष्टं शत्रुघ्नसहितो विभुः ॥१५॥
रामदर्शनाची भरताची उत्सुकता :
आला ऎकोनि रघुनाथ । सैन्य राहवोनि समस्त ।
रथ सांडोनियां भरत । पायीं धांवत अनवाणी ॥८६॥
धनालागीं जेवीं कृपण । दुकाळियालागीं मिष्टान्न ।
देखावया श्रीरामदर्शन । तैसें मन भरताचें ॥८७॥
चकोरा जैसें चंद्रकिरण । जीवनालागीं जैसा मीन ।
देखावया रघुनंदन । तैसें मन भरताचें ॥८८॥
चुकलिया निजबाळ । मातेसी भेटीची कळवळ ।
श्रीराम भेटावया तत्काळ । तैसी तळमळ भरतासी ॥८९॥
बहुकाळें आलिया भर्ता । आल्हादें भेटे पतिव्रता ।
तैसें भेटावया रघुनाथा । उल्हास चित्ता भरताचे ॥९०॥
वानरा आवडती चणे । गट करोनि गाली भरणें ।
तैसेंचि निजप्रेमें संपूर्णें । भेटे धावोम श्रीरामा ॥९१॥
देखोनियां सोलीव केळें । वानर उडी घाली तक्ताळें ।
तैसा आनंदकल्लोळें । सप्रेम आला भरत ॥९२॥
जीवासवें जैसा प्राण । तैसा भरतासवें शत्रुघ्न ।
भेटावया श्रीरघुनंदन । उदित मन दोघांचे ॥९३॥
साकरेंसवें जेवी गोडपण । सुमनासवें सुवास संपूर्ण ।
तैसा भरतासवें शत्रुघ्न । रघुनंदन पहावया ॥९४॥
उदकासवें जैसें शीतपण । चंद्रासवें प्रभा पूर्ण ।
तेंवी भरतासवे शत्रुघ्न । रघुनंदन पहावया ॥९५॥
अथोपविष्टमासीनं सीतया लक्ष्मणेन च ।
ददर्श भरतः श्रीरान्दुखंशोकभयप्लुतः ॥१६॥
पादावप्राप्य रामस्य पपात भरतस्तदा ।
शत्रुघ्नश्चैव रामस्य ववंदे चरणे गुरुं ॥१७॥
नावुभौ च समलिंग्य रामोऽप्यश्रूण्यवर्तयत ॥
सर्वाच्या भेटी व भावनाविष्कार :
श्रीराम सौमित्र आणि सीता । भरत जालासे देखता ।
उल्हास न संडे निजचित्ता । प्रेमावस्था नावरे ॥९६॥
धांवोनि धरिले दृढ चरण । सवेंचि घातलें लोटांगण ।
अश्रुधारा स्रवती नयन । प्रेमें शत्रुघ्न लागला पायीं ॥९७॥
त्या दोघांचे गळती नयन । श्रीरामाचे स्रवती लोचन ।
तिघां पडिलें आलिंगन । त्रिवेणी पूर्ण होऊं सरली ॥९८॥
राम पूर्ण स्वयें गंगाजीवन । भरत यमुना अति पावन ।
सरस्वती तो शत्रुघ्न । त्रिणी पूर्ण होऊं सरली ॥९९॥
संगमीं दिसे त्रिवेणीरुप । पुढें गंगोदक निष्पाप ।
भरतशत्रुघ्न निर्विकल्प । श्रीरामरुप तेविं जाले ॥१००॥
लवणजळा जाली भेटी । तैसी खेंवा पडली मिठी ।
विरोनि तें येरयेरांच्या पोटीं । ऎक्यसंतुष्टी सुखरुप ॥१॥
अग्निकर्पूरा आलिंगन । परम प्रेमें देदीप्यमान ।
सवेंचि दोनी हरपोन । होती गमन निर्विकारी ॥२॥
तैसे भरत आणि शत्रुघ्न । श्रीरामा देतां आलिंगन ।
दोघा नाठवे दोनीपण । जाले परिपूर्ण श्रीरामें ॥३॥
अग्निसी काष्ठें खव देती । तींही अग्निरुप स्वयें होती ।
भरतशत्रुघ्नांची तैसी स्थिती । स्वयें होती श्रीराम ॥४॥
त्यांचें देखोनि आलिंगन । सीता आणि आणि लक्ष्मण ।
ऎक्यें पडिलें आलिंगन । भिन्नपण दिसेना ॥६॥
एक पिंडे जन्मले सृष्टीं । त्यांसी खेवा पडीली मिठी ।
विसरोनियां दुःखकोटी । सुखसंतुष्टी श्रीरामें ॥७॥
जवळी असतां रघुकुळटिळक । पूर्वी हेळणा स्वाभाविक ।
वियोगसंगमाचें सुख । द्वंद्वदुःख विसरले ॥८॥
नित्य निकट असतां जाण । स्वभावे उपजे हेळण ।
हेळणासवें दोषगुण । सहजें संपूर्ण देखती ॥९॥
अतिपरिचयादवज्ञा संततगमनादनादरो भवति ।
मलये भिल्लपुरंधी चंदनतरुकाष्ठमिंधनं कुरुते ॥१८॥
चंदनासभोवती समस्त । आरीबोरी चंदन होत ।
त्यांसी द्विज देव माथां वंदित । घेती श्रीमंत बहु मोलें ॥११०॥
येवढा चंदनी अति प्रेमा । द्वीपोद्वीपीं अगाध महिमा ।
त्यांसी भिल्लांगना अति अधमा । आणित अधर्मा कोळसा करुनी ॥११॥
तो मुख्य चंदन मलयाद्री । तेथें भिल्लांच्या अधमा नारी ।
त्यासी जाळोनि अग्निमाझारीं । रांधिती त्यावरी कांजी भाजी ॥१२॥
निकट वासें उबग आला । सुवास हेळसोनि सांडिला ।
विषय साधावया आपुला । चंदन जाळिला विषयार्थीं ॥१३॥
चंदनाचा गुण कैसा । जाळित्याही दे सुवासा ।
तो नयेचि भिल्लीच्या मानसा । त्याचेनि काष्ठीं शिजवी कांजी ॥१४॥
तैसें साधूपासीं एक आहेती । गुण देखिला तो हेळसिती ।
मग आपुले विषयस्वार्थीं । जाळू जैं धांवती वर्मस्पर्शै ॥१५॥
अहोरात्रीं असोनि संगती । जे साधूचा दोष न देखती ।
ते ते धन्य त्रिजगतीं । त्यांतें वंदिती शिवचक्र ॥१६॥
साधुसंगती अहर्निश । असोनि न देखती गुणदोष ।
त्यापासीं अवतारपुरुष । घ्यावया उपदेश स्वयें येती ॥१७॥
अवतारमूर्ति श्रीवामन । त्यासी कश्यप उपदेशी ज्ञान ।
अगाध साधूचें महिमान । पूज्य सज्जन तिहीं लोकीं ॥१८॥
याचि श्रीरामायणाआंत । वसिष्ठापासीं श्रीरघुनाथ ।
विनीतता उपदेश घेत । साधु संत अति पूज्य ॥१९॥
जावया गुणदोपहेळणासी । वियोग जालिया साधूसीं ।
त्याचा अनुताप दोष निरसी । पुढें भेटीपासीं स्वानंद ॥१२०॥
राम त्यजोनि मातुळीं भरत । वियोगातुतापें तो सुस्नात ।
पुढती भेटतांचि श्रीरघुनाथ । सद्यः सुख प्राप्ती भरतासी ॥२१॥
वियोगाचा जो संयोग । पापभंगे होय सुखभोग ।
भरत सुखी जाला सांग । निवालें सर्वांग शत्रुघ्नाचें ॥२२॥
श्रीराम भरत आणि शत्रुघ्न । ऎक्यें पडिलें आलिंगन ।
खेंवामाजी सुखसंपन्न । स्वानंदघन श्रीराम ॥२३॥
दीप्तीं अनेक दीप लावितीं । सकळ दीपीं एकचि दीपीं ।
भरत शत्रुघ्न ऎशा रीतीं । अभिन्नस्थितीं भिन्न जाले ॥२४॥
जें सुख जालें श्रीरामभेटी । तें सुख बोलतां न ये गोष्टीं ।
एकाजनार्दनीं पडिली मिठी । सुखसंतुष्टी श्रीराम ॥२५॥
भरतश्रीरामअनुवाद । संवादें ओसंडेल परमानंद ।
एकाजनार्दनी निजबोध । कथानुवाद सुखसेव्य ॥२६॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे अयोध्याकांडे एकाकारटीकायां
श्रीरामभरतशत्रुघ्नसंयोगो नाम पंचदशोऽध्यायः ॥ १५ ॥
॥ ओव्यां १२६ ॥ श्लोक १८ ॥ एवं १४४ ॥