अध्याय 5
अगस्ती ऋषींकडून श्रीरामास अस्त्रप्राप्ती
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
ताबडतोब आजच जाण्याचा पदेश :
श्रीराम म्हणे महामती । तुझ्या जेष्ठ बंधु अगस्ती ।
तयाचिया दर्शनार्थी । तुम्हांप्रती मी आलों ॥ १ ॥
करावया ज्येष्ठाचें दर्शन । अति उदति माझें मन ।
कोणें मार्गें करावें गमन । कृपा करोनि सांगावें ॥ २ ॥
यदि बुद्धिः कृता राम द्रष्टुं तं मुनिपुंगवम् ।
अद्यैव गमने बुद्धिं रोचयस्व महामते॥ १ ॥
जरी अगस्तीचें दर्शन । करावया वांछी तुझें मन ।
तरी आजचि करावें गमन । विलंबव्यवधान न करावें ॥ ३ ॥
आश्रमातील देवस्थाने :
जे मार्गी करितां गमन । सर्वथा न चुकिजे आपण ।
तैसें सांगेन मार्गचिन्ह । सावधान अवधारा ॥ ४ ॥
जे चालतां निजपंथ । सीता श्रीराम सुखी होत ।
सौमित्राचें सुखावें चित्त । तो पंथ संकेतें अवधारा ॥ ५ ॥
अगस्त्याश्रम अति पावन । शिवादि देवीं निर्मूनि भुवन ।
करिताती अनुष्ठान । नित्य श्रवण श्रीरामकथा ॥ ६ ॥
देवांचे भूमीं न लागती पाये । अगस्त्याश्रमीं तेहीं पाहें ।
बैसोनियां देवसमुदाये । श्रवण होताहे श्रीरामकथा ॥ ७ ॥
पावन श्रीरामायणी कथा । श्रीअगस्ति अति रसाळ वक्ता ।
देव बैसोनि तत्वतां । श्रीरामकथा परिसती ॥ ८ ॥
अगस्त्याश्रमीं देवस्थानें । उभविलीं आहेति कोण कोणें ।
तेहीं ऐका सावधानें । मार्गचिन्ह लक्षावया ॥ ९ ॥
स तत्र ब्राह्मणः स्थानं शिवस्थानं तथैव च ।
अग्नेः स्थानं महेन्द्रस्य स्थानं चैव विवस्वतः ॥ २ ॥
स्थानं धातुर्विधातुश्च वायुस्थानं तथैव च ।
कार्तिकेयस्य च स्थानं धर्मस्थानं तथैव च ॥ ३ ॥
मार्ग सुचिन्ह नित्य निर्विघ्न । त्या मार्गाची ऐका खूण ।
सौब्रह्मण्य ब्रह्मस्थान । शिवस्थान शिवशक्ति ॥ १० ॥
इंद्रचंद्रकुबेरस्थान । अग्निस्थान भृगुस्थान ।
यमस्थान धर्मस्थान । नित्य सावधान श्रवणार्थीं ॥ ११ ॥
धाता विधाता आपण । रामायण सुखसंपन्न ।
वायु सांडोनि चंचळपण । अति तल्लीन श्रवणार्थीं ॥ १२ ॥
स्वामिकार्तिक शिवसुत । तोही तेथें नित्य वसत ।
ऋषीस परमार्थ पुसत । ऋषि सांगत स्वानंदें ॥ १३ ॥
कासीखंड केदारखंड । सांगितलें श्रीशैलखंड ।
श्रीरामायणकथा अति गोड । सुख सुरवाड सर्वांसी ॥ १४ ॥
अनागतभाष्य रामायण । ते कथेचें करावें श्रवण ।
आश्रमीं वसती देवब्राह्मण । रम्य रामायण परिसावया ॥ १५ ॥
अगस्त्याश्रममहिमान । देव दानव द्विज पावन ।
श्रीरामा शीघ्र करीं गमन । मार्ग सुचिन्ह लक्षोनी ॥ १६ ॥
ततस्तव्दचनं श्रुत्वा सह भ्रात्राभिवाद्यच ।
प्रतस्थेऽगस्त्यमुद्दिश्य सानुजःसह सीतया ॥ ४ ॥
ऐकोनि ऋषीचें वचन । श्रीराम झाला सुखसंपन्न ।
अगस्त्याश्रम अति पावन । स्वानंदें गमन करुं रिघे ॥ १७ ॥
अगस्तींकडून स्वागत :
श्रीराम सीता लक्ष्मण । अगस्त्यानुजा वंदोनि जाण ।
सन्मार्गाचें लक्षोनि चिन्ह । शीघ्र गमन तिहीं केलें ॥ १८ ॥
अगस्ति ज्ञानें अति समर्थ । स्वानंदे शिष्यांसी सांगत ।
आता येईल श्रीरघुनाथ । सीतासहित सौमित्र ॥ १९ ॥
गुढिया मखरें आश्रमांत । ऋषि उभवी आल्हादयुक्त ।
परब्रह्म मूर्तिमंत । आतां येथे येईल ॥ २० ॥
माझ्या भाग्याच्या फळल्या कोडी । आजी श्रीराम देखेन आवडीं ।
उभवावया श्रीरामराज्याची गुढी । वना तांतडी आलासे ॥ २१ ॥
मारोनि राक्षसांच्या कोडी । तोडावया नवग्रहांची बेडी ।
फेडावया देवांची बांधवडी । वना तांतडी आलासे ॥ २२ ॥
निजधर्माचें संरक्षण । करावया दुष्टनिर्दळण ।
श्रीराम अवतार परिपूर्ण । कृपेनें आपण येथें आला ॥ २३ ॥
आजि मी सभाग्य त्रिजगतीं । जो वेदशास्त्रां नव्हे व्यक्ती ।
तो राम केवळ कृपामूर्ती । सीतापति कृपाळु ॥ २४ ॥
माझें भाग्य बापुडें किती । श्रीराम केवळ कृपामूर्ती ।
आश्रमा आला श्रीरघुपती । कृपामूर्ति श्रीराम ॥ २५ ॥
ततःशिष्यैः परिवृतो निश्चक्राम महामुनिः ।
तं ददर्शाग्रतो रामो भ्रातरं चेदमव्रवीत् ॥ ५ ॥
बहिर्लक्ष्मण निष्कामत्यगरस्त्यो भगवानृपिः ।
औदार्येणागवच्छामि निधानं तप्सामिदम् ॥ ६ ॥
एवमुक्त्वा महाबाहुरगस्त्यं सूर्यवर्चसम् ।
अभिवाद्य तु धर्मात्मा तस्थौ राम कृतांजलिः ॥ ७ ॥
श्रीरामांचे साष्टांग वंदन :
ऐसी करोनि रामस्तुती । मेळवोनि ऋषींच्या पक्ती ।
शिष्यसमुदायेसीं अगस्ती । आला अति प्रीतीं सामोरा ॥ २६ ॥
येतां देखोनियां ऋषी । श्रीराम म्हणे लक्ष्मणासी ।
अगस्ति तपस्तेजोराशी । येतो आम्हांसी सामोरा ॥ २७ ॥
समुद्र शोषिला आचमनीं तो हा जाण अगस्तिमुनी ।
कृपाळु कैसा आम्हांलागोनी । येतो धांवोनी सामोरा ॥ २८ ॥
ऐसें बोलोनि आपण । श्रीरामें घातलें लोटांगण ।
मस्तकीं धरिलें दृढ चरण । दिधलें अलिंगन ऋषीनें रामा ॥ २९ ॥
विदेहतनया लक्ष्मण । नमस्कारिती मुमिचरण ।
तिघे जण सावधान । कर जोडोन राहिलीं ॥ ३० ॥
देखोनियां श्रीरामचंद्र । ऋषीस आल्हाद अपार ।
आश्रमा आणिता गजर । जयजयकार ऋषिमंत्रीं ॥ ३१ ॥
अगस्ति ऋषि स्वयें सज्ञान । ब्रह्ममूर्ति श्रीरघुनंदन ।
केले मधुपर्कें पूजन । दिधलीं गोदानें शतसंख्य ॥ ३२ ॥
श्रीराम म्हणे मी नीच सेवक । तुझ्या शिष्याचे रंकाचा रंक ।
येवढी पूजा अलोलिक । योग्य् देख मज नोहे ॥ ३३ ॥
अगस्त्य उवाच –
राजा सर्वस्य लोकस्य धर्मचारी दृढव्रतः ।
पूजनीयश्च मान्यश्च भवान्प्राप्तः प्रियातिथिः ॥ ८ ॥
ऋषींकडून रामस्तुती व महिमावर्णन :
ऐकोनि श्रीरामाचें वचन । अगस्ति बोले उल्हासोन ।
श्रीराघवा तुझें निजमहिमान । अगम्य जाण वेदशास्त्रां ॥ ३४ ॥
वेदशास्त्रांच्या निजयुक्ती । त्या परतल्या नेति नेति ।
श्रीराम केवळ ब्रह्ममूर्ती । त्रिजगतीं निजपूज्य ॥ ३५ ॥
जें कां परब्रह्म अक्षर । तें तूं श्रीराम साचार ।
भक्तकृपाळू होसी साकार । भाग्य थोर आजि माझें ॥ ३६ ॥
वरकड राजे ते भूपती । श्रीरामराजा त्रिजगतीं ।
तुझेनि भूतें वाहे क्षिती । शशिसूर्यां गति तुझेनि ॥ ३७ ॥
तुझी आज्ञा अति दुर्धर । मर्यादा नुल्लंघीच सागर ।
इंद्रादिक तुझे किंकर । तुझेनि भूभार शेष वाहे ॥ ३८ ॥
काळ आज्ञा वंदी शिसीं । प्रळयो करी मर्यादेसीं ।
भूतें भूतात्मा तूं होसी । पूज्य सर्वांसी श्रीरामा ॥ ३९ ॥
अवतार जाले उत्तमोत्तम । त्यांमाजी तूं आत्माराम ।
तूं तंव केवळ परब्रह्म । पूज्य परम परमार्थी ॥ ४० ॥
ऐसी निजस्थिति तुजपासीं । तो तूं धर्मव्रत चालविसी ।
पित्राज्ञा प्रतिपाळिसी । निर्दाळिसी दृष्टातें ॥ ४१ ॥
माता पिता गुरु देवता । त्यांहूनि पूज्य तूं श्रीरघुनाथा ।
ब्रह्मादि देवांहीवरता । परम पूज्यता श्रीरामा ॥ ४२ ॥
चारी देव तुज वर्णिती । शास्त्रें चरण येती ।
शिव विरिंचि पायां लागती । पूज्य परमार्थी श्रीरामा ॥ ४३ ॥
तुज द्यावा जो जो मान । तो तो तुजलांगीं होय न्यून ।
तुझें अगाध महिमान । मानापमान तुजं नाहीं ॥ ४४ ॥
श्रीरामा तुझें निजमहिमान । वानितां वेदां पडिलें मौन ।
तो तूं आलासी कृपा करुन । आजि मी धन्य स्वाश्रमेंसीं ॥ ४५ ॥
कांहीएक तुझी पूजा । मी करीन रघुराजा ।
ते अंगीकारीं अधोक्षजा । राक्षससमाजवधार्थीं ॥ ४६ ॥
तूं आत्माराम प्रिय अतिथी । आश्रमा आलासी कृपामूर्ती ।
तुझी पूजा जे न करिती । ते अधःपाती अभाग्य ॥ ४७ ॥
विमुख होतांचि अतिथी । गृहस्था कोटिपापप्राप्ती ।
अतिथी ने पुण्यसंपत्ती । उरे अधोगति यजमाना ॥ ४८ ॥
यालांगीं श्रीरघुराजा । करावी अतिथीची पूजा ।
तूं केवळ आत्मा माझा । माझी निजपूजा अंगीकारीं ॥ ४९ ॥
अमृतोपम फळमूळें । पुष्पें आणोनि सुपरिमळें ।
मधुपर्कविधान – बळें । श्रीराम सुखमेळें पूजिला ॥ ५० ॥
जयजयकाराच्या गजरीं । वेदोक्त महामंत्रीं ।
श्रीराम पूजिला ऋषीश्वरीं चराचरीं परमात्मा ॥ ५१ ॥
अगस्ति म्हणे श्रीरघुराजा । पुढतीं करीन तुझी पूजा ।
दिव्यायुधीं अधोक्षजा । शत्रुसमाजा निवटावया ॥ ५२ ॥
इदं दिव्यं मह्च्चापं तृणी चाक्षय्यसायकौ ।
इदं च मे तनुत्राणमभेद्यं भगवान्ददौ ॥ ९ ॥
अमोघः सूर्यसंकाशो ब्रह्मदत्तः शरौ मम ।
महाराजतकोशोऽयमसिर्हेमविभूषितः ॥ १० ॥
अनेन धनुपा राम हत्वा संख्ये महासुरान् ।
आजहार श्रियं दिप्तां पुरा विष्णूर्दिवौकसाम् ॥ ११ ॥
एवमुवत्वा महातेजाः समस्तं तव्दरायुधम् ।
दत्वा रामाय भगवानगस्त्यःपुनरव्रवीत् ॥ १२ ॥
रामप्रीतोऽस्मि भद्रं ते परितुष्टोऽस्मि लक्ष्मण ।
अभिवादयितुं यन्मां प्राप्तौ स्थःसह सीतया ॥ १३ ॥
दिव्य, अक्षर असे धनुष्य, भाते, कवच अर्पण :
दिव्य चाप अक्षयी भाते । अनिवार शर पूर्ण तेथें ।
सुवर्णसंनाह खङगातें । रणीं शत्रूंतें निवटावया ॥ ५३ ॥
शस्त्रास्त्रीं अभेद्य पूर्ण । सूर्यतेजें विराजमान ।
तें घेई गां अंगत्राण । देदीप्यमान तेजस्वी ॥ ५४ ॥
कवच लेल्यासी हे विश्रांती । शत्रुसंतापी निजतेजोदीप्ती ।
ऐसी हे कवचाची गती । रिपुदळणार्थीं अंगीकारीं ॥ ५५ ॥
रणीं मर्दावया लंकानाथ । रथापेक्षा करील चित्त ।
ते काळीं इंद्राचा रथ । मातलि त्वरित आणील ॥ ५६ ॥
ऋषीचें ऐकोनि वचन । श्रीरामें सौमित्रें केलें नमन ।
ऋषीनें दिधलें आलिंगन । सुप्रसन्न ऋषि जाला ॥ ५७ ॥
संतोषोनि श्रीरामासी । रणीं निर्दाळावया राक्षसांसी ।
उल्हासोनि अगस्ति ऋषी । दिव्यायुधांसी अर्पीलें ॥ ५८ ॥
देवोनियां दिव्यायुधें । ऋषि म्हणे अति आल्हादें ।
रणीं राक्षसांची कबंधें । शत्रसंबंधें नाचविसी ॥ ५९ ॥
ऐकोनि ऋषीच्या वरदासी । श्रीराम संतोषला मानसीं ।
तव लोपामुद्रेनें सीतेसी । अति उल्हासीं पूजिलें ॥ ६० ॥
लोपामुद्रेकडून सीतेचे कौतुक :
लक्षोनियां श्रीरघुनंदन । चरणचाली वनाभिगमन ।
तूं पतिव्रता धन्य धन्य । आम्ही पावन तुझेनि ॥ ६१ ॥
तंव श्रीराम म्हणे अगस्तीसी । दंडकारण्य या वनासी ।
कां म्हणताती महाऋषी । तें मजपासी सांगावें ॥ ६२ ॥
मग अगस्ति म्हणे श्रीरामासी । दंडक राजा या प्रदेशीं ।
अति गर्विष्ठ अहर्निशीं । राज्यमदेंशीं उन्मत्त ॥ ६३ ॥
पारधी करितां दंडकासी । भृगुवंशींचा च्यवन ऋषी ।
अपमानिला अतिशयेंसीं । तेणें त्यासी शापिलें ॥ ६४ ॥
दण्डकेन परित्यक्तःस्वयं देशो महात्मना ।
भार्गवस्य तु शापेन निर्मुनुष्यो मृगोऽभवत्॥ १४ ॥
योजनानांसहस्त्रे तु विन्ध्यपादप्रदक्षिणम् ।
नाति वर्शति पर्जन्यो न च वाति सुखोऽनिलः॥ १५ ॥
दंडकारण्य कथा :
शाप दिधला कोपेंसीं । भस्म होय स्वराज्येसीं ।
ऐसें बोलतांची ऋषी । स्वदशेंसीं भस्म जाला ॥ ६५ ॥
विंध्याद्रिदक्षिणभागेंसीं । जंव पाविजे सेतुबंधासी ।
तंव दंडकारन्य नाम यासी । ऋषिशापेंसीं भस्म जालें ॥ ६६ ॥
राजा भस्म जाला ससैन्य । भस्म जाले मनुष्यगण ।
भस्म जाले वृक्ष तृण । पशु पक्षी पूर्ण भस्म जाले ॥ ६७ ॥
भस्म जालीं सरितातडांग । भस्म जालें मृग पन्नग ।
भस्म जालें तद्देशी जग । दुर्धर राग ऋषीचा ॥ ६८ ॥
शापवाणीने प्रदेश ओसाड :
दंडकाचेनि शापें जाण । असंख्य अब्दें ओस वन ।
यालागीं म्हणती दंडकारण्य । नामाभिधान राजशापे ॥ ६९ ॥
भार्गवाच्या शापभयेंसी । पर्जन्य वर्षेना तया देशीं ।
प्रकाशे ना सूर्य शशी । अहर्निशीं अंधकार ॥ ७० ॥
ऐसेनि अंधकारेंसीं । लोतल्या वर्षानुवर्षी ।
पुढती वस्ती झाली कैसी । श्रीराम ऋषीसी पूसत ॥ ७१ ॥
अगस्ति सांगे श्रीरामासी । वसावया दंडकारण्यासी ।
नारदें विंध्याद्रीपासीं । महामेरुसी विनविलें ॥ ७२ ॥
चराचरासी आधारु । स्वयें जाला महामेरु ।
मेरुहूनि सधरु । पर्वत थोरुं असेना ॥ ७३ ॥
मेरु व विध्याद्री यांची स्पर्धा :
ऐकोनियां नारदोक्ती । मेरुचिया स्पर्धास्थितीं ।
खुंटली शशिसूर्याची गती । विंध्याद्रि ऊर्ध्वपंथीं वाढला ॥ ७४ ॥
राहिले स्वाहास्वधाकार । राहिले स्वधर्मकर्माचार ।
राहिले जपतपोविचार । रविचंद्र नुगवती ॥ ७५ ॥
लोपले स्वाहास्वधाकार । मरों टेकले देव पितर ।
भुकें तळमळती ऋषीश्वर । संध्येवीण आहार सेवूं नये ॥ ७६ ॥
विंध्याद्री उंच उंच वाढल्यामुळे सूर्यचंद्राची गती बंद, म्हणून सर्व कर्मे थंडावली :
गोधनें राना न वचती । वत्सें हंबरडा हाणिती ।
आकांत मांडला त्रिजगतीं । विंध्याद्रि गभस्ती उगवों नेदी ॥ ७७ ॥
मग ऋषीश्वर ब्रह्मयाप्रती । अवघे गार्हाणे सांगती ।
तेव्हां तिन्ही देव विचारिती । जे दक्षिणे अगस्ती धाडवा ॥ ७८ ॥
अगस्तींना देवांची विनंती :
देव सांगती अगस्तीसी । त्यजोनियां वाराणसीसी ।
नेमावया विंध्याद्रीसी । शीघ्र दक्षिणेसी तुम्हीं जावें ॥ ७९ ॥
नेमोनियां विंध्याद्री । तो निजवावा पृथ्वीवरी ।
अहोरात्रें वाहतीं करीं । शशिसूर्यां करीं मोकळा मार्ग ॥ ८० ॥
थोर पुण्य होईल ऋषी । देव पितर पावती तृप्तीसीं ।
ब्राह्मण चालविती स्वधर्मासी । हें तुजपासीं सामर्थ्य ॥ ८१ ॥
तुझें सामर्थ्य वानावें किती । आचमनें प्राशिला अपांपती ।
विंध्याद्रि बापुडें तें किती । परोपकारार्थी तवां जावें ॥ ८२ ॥
पुढतीं न करी उत्थान । तैसा विंध्याद्रि नेमून ।
संस्थापावया देवब्राह्मण । दक्षिणे गमन तुवां कीजे ॥ ८३ ॥
अगस्तीचे दक्षिणेला प्रयाण :
ऐकोनि देवांचें वचन । म्यां जाणोनि नारदाचें मन ।
वसवावया दंडकारण्य । माझें आगमन दक्षिणेसी ॥ ८४ ॥
ऐकें बापा श्रीरघुपती । माझें आगमन या रीतीं ।
आलों कोणकोण्या स्थिती । तेहीं तुजप्रती सांगेन ॥ ८५ ॥
कस्यचित्वथ कालस्य दैवयोगादहं नृप ।
वाराणसीं परित्यज्य इह प्राप्तोऽस्मि मानद ॥१६॥
मी पर्जन्योदकेंशीं मेघ । आलों घेवोनि अमोघ ।
सुरकार्य साधावया चांग । आलों सवेग विंध्याद्री ॥ ८६ ॥
विंध्याद्रीचे वंदन व त्याला आज्ञा :
ऐकें राजचूडामणी । मज येतां तेणें देखोनी ।
विंध्याद्रि आला लोटांगणीं । यथोक्तपूजनीं पुसता होय ॥ ८७ ॥
कोण पां वार्ता उत्तरेसीं । ते मज सांगा जी महाऋषी ।
तूं येथोनि केउतां जासी । तेंही मजपासीं सांगावें ॥ ८८ ॥
कोणते धरोनि अपेक्षेसी । तूं आलासी मजपासीं ।
ते म्यां दिधलें निश्चयेंसीं । भाक मजपासीं दिधली ॥ ८९ ॥
त्यासी उत्तरेची वार्ता । म्यां सांगितली श्रीरघुनाथा ।
तेहीं तुज मी सांगेन आतां । यथार्थता अनुवादु ॥ ९० ॥
विंध्याद्रि तुझा प्रताप । देखोनी मेरुसी महाकंप ।
सुरासुरां महासंताप । तुझें स्वरुप अति श्रेष्ठ ॥ ९१ ॥
पाहतां या पृथ्वीमाझारीं। विंध्याद्रि तुझी थोरी ।
वानिजै गा सुरासुरीं । तुझी सरी मेरु न पवे ॥ ९२ ॥
ऐसें ऐकोनियां वचन । विंध्याद्रि उल्लासला आपण ।
पुढतीं घालोनि लोटांगण । मस्तकीं चरण दृढ वंदिले ॥ ९३ ॥
तूं आलासी भाग्येकरीं । तुझें गमन कोठवरी ।
तें मज सांगावें जी निर्धारीं । तेणें अत्यादरीं पूसिलें ॥ ९४ ॥
दक्षिणतीर्थयात्राविधान । करावया करितों गमन।
मज द्यावें मार्गदान । अधरशयन करोनियां ॥ ९५ ॥
तुझी निर्धारिता थोरी । वाढी चंद्रसूर्यांउपरी ।
मज वेंघवेना तेथवेना तेथवरी । शयन करीं गमनार्थ ॥ ९६ ॥
माझें ऐकोनियां वचन । विंध्याद्रीनें केले शयन ।
म्यां केलिया दक्षिणे गमन । तुवां उत्थान न करावें ॥ ९७ ॥
तिर्थे करोनी मम यें मागुता । तंववरी त्वां नुठावें पर्वता ।
भाष्यबंधे नियामकता । करोनि रघुनाथा मी आलों ॥ ९८ ॥
विंध्याद्रीला नमविल्यामुळे मार्ग मोकळा :
रविचंद्रां मोकळी वाट । द्विजदेवांचे चुकले कष्ट ।
दिनमान वाहे स्पष्ट । दिधली वाट विंध्याद्री ॥ ९९ ॥
माझें होतांचि आगमन । भृगुशाप गेला पळून ।
देशीं वर्षला पर्जन्य । तृण वृक्ष धान्य वाढलें ॥ १०० ॥
महामेरुच्या वृक्षांसी । म्यां चिंतितां निजमानसीं ।
तेही वाढले ये देशीं । फळभारेंसीं सफळित ॥ १ ॥
वाहती सरितांचे ओघ । पद्मपुष्पीं पूर्ण तडाग ।
नाना पक्षिगण अनेग । गज सिंह मृग क्रीडती ॥ २ ॥
मजसवें येवोनियां ऋषी । जाहले दंडकारण्यवासी ।
कोणी राजा नाहीं या देशीं । म्हणोनि राक्षसीं व्यापिलें ॥ ३ ॥
दंडकशापें दंडकारण्य । ते करावया अति पावन ।
तूं आलासी श्रीरघुनंदन । राक्षसघ्न प्रतापी ॥ ४ ॥
तुझें जालिया आगमन । राक्षस निर्दाळसी संपूर्ण ।
येथोनि आतां वस्ती जाण । वचन पावन श्रीरामें ॥ ५ ॥
श्रीरामक्षेत्र दंडकारण्य । ऐसें गर्जेल पुराण ।
हाचि प्रयोग ब्राह्मण । अति सज्ञान पढतील ॥ ६ ॥
राक्षसनिर्दळणीं विचित्र । श्रीराम करील दुर्धर क्षेत्र ।
यालागीं म्हणती श्रीरामक्षेत्र । पुराणवित्र श्रीरामें ॥ ७ ॥
ऐसी ऐकतांचि कथा । परमाश्चर्य श्रीरघुनाथा ।
ऋषिचरणीं ठेविला माथा । होय पुसता वनस्पती ॥ ८ ॥
अगस्तींच्या सूचनेवरुन दंडकारण्यात पंचवटीत आश्रमाची स्थापना :
दंडकारण्यवनीं वसतां । सौमित्रासहित सीता ।
म्यां वसावें कोठें आतां । तेंही तत्वतां मज सांगें ॥ ९ ॥
तुझें वचन ब्रह्मलिखित । तें म्यां करणें निश्चित ।
ऐसें पुसतां श्रीरघुनाथ । कृपायुक्त ऋषि बोले ॥ ११० ॥
गंगातीराचे निकटीं । अति पावन पंचवटी ।
तेथें बांधोनि पर्णकुटी । सुखसंतुष्टीं वसावें ॥ ११ ॥
पंचवटी गंगातटीं । ऐकतां उल्हास सीतेच्या पोटीं ।
श्रीरामासी सुखसंतुष्टी । पंचवटी ऐकोनी ॥ १२ ॥
पंचवटीं करितां वस्ती । त्रैलोक्यपावन निजकीर्ती ।
तूं पावसी गा रघुपती । जाणें निश्चितीं मद्वाक्यें ॥ १३ ॥
ऐकोनि अगस्तीची गोष्टी । श्रीरामें बांधिली शकुनगाठी ।
लक्षोनियां पंचवटी । उठाउठीं निघाले ॥ १४ ॥
श्रीरामें केलें नमन । ऋषीनें दिधलें आलिंगन ।
सीतासहित लक्ष्मण । अगस्ति वंदोन निगाले ॥ १५ ॥
आश्रम करावया पंचवटीं । उल्लास लक्ष्मणाचे पोटीं ।
वेगीं निघाला जगजेठी । श्रीराम दृष्टीं लक्षोनी ॥ १६ ॥
एकाजनार्दना शरण । अगस्तीपासोनि शस्त्रास्त्रग्रहण ।
श्रीरामें केलें आपण । वनीं निर्दळण राक्षसां ॥ १७ ॥
इति श्रीभावार्थरामायणे अरण्यकांडे एकाकारटीकायां
अगस्तिश्रीरामदर्शनं अस्त्रग्रहणं नाम पंचमोऽध्यायः ॥ ५ ॥
॥ ओंव्या ११७ ॥ श्लोक १६ ॥ एवं १३३ ॥