रामायण - अध्याय 3 - अरण्यकाण्ड - 7 MB (Official) द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रामायण - अध्याय 3 - अरण्यकाण्ड - 7

अध्याय 7

जटायूसह श्रीरामांचे पंचवटीत आगमन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

अमृतरक्षणासाठी घेतलेली दक्षता :

अच्युत नाम धरोनि मानसीं । गरुड निघाला अमृतासी ।
भावें वंदितां कश्यपासी । साह्य् सप्तऋषी त्यासी जाले ॥ १ ॥
गरुडें अतिक्रमोनि गगन । सूक्ष्मरुप धरोनि जाण ।
परमामृत लक्षितां पूर्ण । तव बहु रक्षण अमृतासी ॥ २ ॥
प्रथम सर्पांचें संपूर्ण । दुसरें रक्षण वरुण ।
तिसरें जाण यक्षगण । मरुद्गण तें चवथें ॥ ३ ॥
पांचवें रक्षण यमदूत । सहावे रक्षण शिवदूत ।
सातवे रक्षण विष्णुदूत । सावचित्त सर्वदा ॥ ४ ॥

योग्य वेळी गरुडाचे आक्रमण :

गरुडें साधोनयां सवडी । कुंडीं घालोनियां उडी ।
अमृत शोपोनियां तातडीं । अति झडाडी निघाला ॥ ५ ॥
तंव झाला हाहाकार । पक्षी नव्हे हा अमृतचोर ।
क्रधें उठीले विखार । शस्त्रसंभार सूटले ॥ ६ ॥
गरुडपंखांच्या झडाडीं । राखणीं मूर्च्छित बापुडीं ।
शस्त्रें पडती उबडी । सर्प कडाडी धाविन्नलें ॥ ७ ॥
रागें क्षोभता विखारीं नखाग्रघायीं त्यां विदारी ।
नकुळ पावला साहाकारी । सर्प माझारीं छेदित ॥ ८ ॥
व वरुणें घालोनि पाशांसी । गरुड आकळिला पक्षेंसीं ।
नकूळें करांडूनि पाशांसी । केलें गरुडासी निर्मुक्त ॥ ९ ॥

गरुडाने वाटेत येणार्‍या देवांना स्वसामर्थ्याने पराभूत केले :

गरुडें झडपोनियां वरुणासी । उडविला तो आकाशीं ।
भोंवडोनि दाही दिशीं । पडे पृथ्वीसीं मूर्च्छित ॥१० ॥
राखणाईत आपापरीं । विदारले नखाग्री ।
नकुळ केवळ सर्पारी । नानापरी छेदिले ॥ ११ ॥
ऐसें करोनि रणकंदन । गरुड वळंघला सर्प गगन ।
करोनियां अमृतपान । बळवाहन चालिला ॥ १२ ॥
हाक वाजिन्नली वैकुंठीं । कोपें चालिला धूर्जटी ।
देवांच्या कोट्यनुकोटी। अमृतासाठीं धांविन्नल्या ॥ १३ ॥
वेगीं बैसोनि सुरगजासीं । इंद्र धांविन्नला वेगेंसीं ।
वज्र हाणितलें गरुडासीं । येरें वज्रासी गिळिलें ॥ १४ ॥
गरुडपंखांच्या झडाडीं । इंद्राची वळली मुरकुंडी ।
गज पळाले कडाडीं । देवांच्या कोडी पळाल्या ॥ १५ ॥
गरुडपंखांचा पवन । देवां नाठवे निजस्थान ।
वाहुटुळीमाजी रजःकण । तैसे सुरगण भ्रमचक्रीं ॥ १६ ॥
यम धांविन्नला कोपेंशीं । दंडें हाणितलें गरुडासी ।
तेणें गिळिलें यमदंडासी । मग यमासी दंडिलें ॥ १७ ॥
यमें जाचिलें बहुतांसी । गरुडें गाजिलें यमासी ।
करोनियां कासाविसी । यम धुळीसीं मेळविला ॥ १८ ॥
यम गांजला नानापरी । कोण धांवेना कैवारी ।
देखोनि कुबेर पळे दूरी । सौजन्य करी गरुडासीं ॥ १९ ॥
बंधमोचन मातेसी । अमृत द्यावया कद्रूसी ।
धाडीन मणिमय कलशासी । अमृतासी सांठवण ॥ २० ॥
गरुडपंखांचे झडाडीं । दिग्गजें रानीं पळालीं बापुडीं ।
सुरासरांचिया कोडी । देशोधडी केलिया ॥ २१ ॥
दैत्य दानव महाबळी । तेही मारिले रणकल्लोळी ।
धाकें सर्प गेले पाताळीं । आतुर्बळी विनतात्मक ॥ २२ ॥
मंत्रपूतजळशक्ती । युद्धा आला प्रजापती ।
तंव कमंडलु हिरोनि हातीं । अच्युतशक्ति गिळियेला ॥ २३ ॥
पित्याच्या पित्याचा पिता । भीड राखिली धर्मार्था ।
येरवीं गरुड घोळसिता । घडी न लगतां ब्रह्मयासी ॥ २४ ॥
महादेवें क्रोधानळीं । गरुड हाणितला त्रिशूळीं ।
गरुड त्रिशूळातें गिळीं । शिव ते वेळीं विस्मित ॥ २५ ॥
त्रिशूळ गिळावयाची शक्ती । हें कैंची या गरुडाप्रती ।
सदाशिव पाहे निश्चिंतीं । हृदयस्थित श्रीराम ॥ २६ ॥
श्रीरामनामाच्या निजस्थितीं । गरुडें जिंतिली त्रिजगती ।
त्रिशूळ गिळावया ती शक्ती । जाली निश्चितीं श्रीरामनामें ॥ २७ ॥
हृदयीं अमृत मुखीं रामनाम । त्यासीं कोण करी संग्राम ।
खुंटला शिवाचा पराक्रम । श्रीरामनाम परिसोन ॥ २८ ॥
ऐकतां श्रीरामाचें नाम । सदाशिवासई आलें प्रेम ।
मूर्च्छित पावला विश्राम । युद्धसंग्राम विसरला ॥ २९ ॥
गरुडें कश्यपाच्या उपदेशीं । नामें जिंतिलें सदाशिवासी ।
कळिकाळाची गति कायसी । हरिभक्तांसी बाधावया ॥ ३० ॥
निजभक्तासी द्यावयाचा भेटी । विष्णू पावला उठाउठीं ।
चक्र हातवसूनियां मुष्टीं । कृपादृष्टि पैं आल ॥ ३१ ॥

श्रीमहाविष्णूचे आगमन :

लौकिकी दावी युद्धक्रम । परी भक्ताचे आवडे प्रेम ।
गरुड स्मरे नित्य नाम । पुरुषोत्तम तुष्टला ॥ ३२ ॥
जो सप्रेम स्मरे नाम । त्या अधीन पुरुषोत्तम ।
नामें संतुष्ट आत्माराम । भक्तकाम कृपाळु ॥ ३३ ॥

श्रद्धया हेलया नाम स्मरंति मम जंतवः ।
तेषां नाम सदा पार्थ वर्तते हृदये मम ॥ १ ॥

श्रद्धें हेलया जो स्मरे नाम । त्याचें मी हृदयीं नाम ।
नामनिष्ठाचे पुरवीं काम । नामें सुगम मत्प्राप्ति ॥ ३४ ॥
अमृत सोडवावया बळी । चक्र मोकली वनमाळी ।
गरुड चक्रांतेहीं गिळी । विस्मय सकळीं मानिजे ॥ ३५ ॥
दैत्यदानवमंडळीं । विष्णुचक्र सगळें गिळी ।
ऐसा कोणी नाहीं बळी । आतुर्बळी हा गरुड ॥ ३६ ॥
विष्णुचक्राचा महामार । घायें निर्दाळीत असुर ।
चक्र त्रैलोक्यीं दुर्धर । गरुडें तें चक्र गट्ट केलें ॥ ३७ ॥
स्मरतां राम हरि गोविंद । नामापासीं परमानंद ।
त्यासी बाधूं न शके द्वंद्व । द्वंद्व निर्द्वंद्व हरिनामे ॥ ३८ ॥
नित्य नामाचा निजगजर । त्याअधीन चक्रधर ।
भक्तां बांधू न शके चक्र । हरि साचार त्यांपासीं ॥ ३९ ॥
नाम स्मरतां निरंतर । तयापासीं अहोरात्र ।
घरटी करी विष्णुचक्र । विघ्न दुर्धर निवटावया ॥ ४० ॥

गरुडाचा पराक्रम पाहून त्याला वर देण्याचे वचन :

देवा भक्ता नाहीं अंतर । त्यांपासीं तो निरंतर ।
यालागीं बाधूं न शके चक्र । चक्र दुर्धर अभक्तां ॥ ४१ ॥
माझें निजचक्र गिळोन । गरुडा विजयी तूं संपूर्ण ।
विष्णु म्हणे मि सुप्रसन्न । माग वरदान वेगेंसीं ॥ ४२ ॥
ज्या ज्या वरदाना मागसी । तें तें देईन अति उल्हासीं ।
ऐकोनी हासें आलें गरुडासी । काय विष्णूसी बोलत ॥ ४३ ॥
तुवां जिंतिलें नाहीं मातें । वर देसी कोण्या अर्थे ।
मीच प्रसन्न जालों तूतें । मागसी तें देईन मी ॥ ४४ ॥
कश्यपगुरुचा हात माथां । तुझें अच्युत नाम नित्य स्मरतां ।
मज काय आहे अपूर्णता । मागसी आतां तें देईन मी ॥ ४५ ॥
ऐसें ऐकोनि गरुडवचन । भाष्यबंधेईसीं गोंवून ।
विष्णु मागे वरदान । सावधान अवधारा ॥ ४६ ॥
तरी गरुडा होई माझें वाहन । नुल्लंघावें माझे वचन ।
नित्य व्हावें मजअधीन । हे वरदान मज देईं । ४७ ॥
ऐकतां विष्णूचें मागणें । गरुड विचारी निजमनें।
भाष्य देवोनियां न देणें । निंद्य जिणें तिहीं लोकीं ॥ ४८ ॥
मिथ्या करितांचि भाक । देव पितर नित्य विमुख ।
ऐहिकीं परत्रीं काळें मुख । नरकदुःख मिथ्यात्वें ॥ ४९ ॥
मिथ्या बोलती वितंड । नरका वचती ते षंढ ।
त्यांचें मुखचि नरककुंड । पाहों नये तोंड तयांचे ॥ ५० ॥
मिथ्या अनुवादाची घाणी । तिहीं लोकीं उठे पोहणी ।
पितर विमुख मुख देखोनी । मिथ्या वाणी तो नरक ॥ ५१ ॥
ऐसिऐसिया उपपत्ती । गरुडें विचारोनि चित्तीं ।
जिवित्य द्यावें विष्णूच्या हातीं । केवळ निश्चितीं निर्धारु ॥ ५२ ॥
शरीर विष्णूचें वाहन जीवें । नुल्लंघी विष्णुवचन ।
काया वाचा मनें विष्णुअधीन । तेणें पावन तिहीं लोकीं ॥ ५३ ॥
ऐसा करितां निर्धारु । हृदयीं प्रगटला सद्गुरु ।
विवक प्रकाशिला सधरु । कृपाळु गुरु तो ऐका ॥ ५४ ॥
स्मरतां कश्यपाचें वचन । विष्णू परमात्मा ब्रह्म पूर्ण ।
हे गरुडासी बाणली खूण । समधान गरुवाक्यें ॥ ५५ ॥
गुरुवाक्यबोधस्थितीं । सकळ भयांची निवृत्ती ।
गुरुवाक्यें यशकीर्तीं । विजयाप्राप्ति गुरुवाक्यें ॥ ५६ ॥
तें गुरुवाक्य निर्धारितां । विष्णु चालकु निजचित्ता ।
विष्णु इंद्रियांतें नेमिता । सर्व सत्ता विषूची ॥ ५७ ॥
जगीं विष्णूचि एकात्मता । तेथे मी देता तो मागता ।
हें तंव न घडे तत्वतां । सर्व सत्ता विष्णूची ॥ ५८ ॥
ऐसें विचारोनि चित्ता । विष्णुचरणीं ठेविला माथा ।
मज अर्पितां । तुज अधीनता सर्वस्वें ॥ ५९ ॥
माझें सत्व तत्त्व तूं आपण । माझें जीवन तूं परिपूर्ण ।
माझें जे कां मीपण । तेंही तूं संपूर्ण महाविष्णु ॥ ६० ॥
गिडी साखर दोनी एक । तैसा तूं स्वामी मी सेवक ।
मज तुज नाहीं वेगळिक । भिन्नत्व देख वर्ततां ॥ ६१ ॥
श्रीविष्णूचा निजसेवक । म्हणतां गरुडासी परम हरिख ।
मज तुझे सेवेचें परम सुख । दृष्टिसन्मुख मज राखावें ॥ ६२ ॥
पाहतां तुझें श्रीमुख । फिकें होय समाधिसुख ।
चरणीं ठेविला मस्तक । दृष्टिसन्मुख मज ठेवीं ॥ ६३ ॥
ऐकोनि गरुडाचें वचन । विष्णु झाला संतुष्टमान ।
दृष्टीपुढें नित्यस्थान । दिधलें नेमून गरुडासी ॥ ६४ ॥
गरुडें पृष्टी दिधली देवासी । देवें दृष्टी दिधली गरुडासी ।
उल्हास देवभक्तांसी । गरुड हरिसेवेसी विनटला ॥ ६५ ॥
गरुड विनटोनि श्रीहरीं । काया वाच मनेंकरीं ।
जाला विष्णूचा आज्ञाधारी । जोडिल्या करीं तिष्ठत ॥ ६६ ॥
देवा भक्तां जालें युद्ध । युद्ध नव्हें तो महाबोध ।
एकाजनार्दनी विनोद । परमानंद रणरंगीं ॥ ६७ ॥
विष्णु म्हणे खगेश्वर । तूं माझा आज्ञाधार ।
तरी गिळिला जो शस्त्रसंभार । तो द्यावा सत्वर शिवादिकां ॥ ६८ ॥
जीं शस्त्रें त्रैलोक्यीं दुर्धर । राहूं न शकती सुरसुर ।
काळ कांपें अहोरात्र । तीं त्वां समग्र गिळियेलीं ॥ ६९ ॥
दंड त्रिशूळ वज्र चक्र । शस्त्रें गिळिलीं अति दुर्धर ।
जाले यशाचे डोंगर । कीर्तिसागर त्वां भरिले ॥ ७० ॥
शूर वीर तूं धैर्यलाठा । श्रेष्ठ यश तुझा वांटा ।
त्याही यशाच्या बांधल्या मोठा । सुरवरिष्ठां देई शस्त्रें ॥ ७१ ॥
उभय पक्षांचा आक्रम । तुझ शस्त्रांचे नाहीं काम ।
अदट दाटुगा पराक्रम । शस्त्रें सुरोत्तम गौरवीं ॥ ७२ ॥
यशःकिर्तीच्या उत्तरीं । गरुड गौरविला श्रीहरीं ।
तेणें तो लोळें पायांवरी । आज्ञा शिरीं वंदिली ॥ ७३ ॥
यमासि दंड इंद्रासी वज्र । त्रिशूळें पूजिला श्रीशंकर ।
चक्रें पूजिला चक्रधर । गरुडें समग्र सुखी केले ॥ ७४ ॥
पाचारोनियां प्रजापती । कंमडलु दिधला त्याचे हतीं ।
अवघे जयजयकार करिती । आलिंगिती गरुडातें ॥ ७५ ॥
पुढील अमृताची कथा । इंद्र सांगे विव्हला ।
सर्पां अमृत पाजितां । होईल तत्वतां तें विष ॥ ७६ ॥
सर्पांसी पाजिलिया पीयूष । तेंही परतें होय विष ।
अमृतावांचोनियां देख । निःशेख मरतील ॥ ७७ ॥
सुखरांची हरावया भूक । देवें निर्माण केलें पीयूख ।
तें सर्पामुखीं होतांचि विष । अमर निःशेष मरतील ॥ ७८ ॥
अमृत दिधलिया सर्पांसी । स्वर्गस्थ मरतील उपवासीं ।
यालागीं युद्ध केलें गरुडासीं । बळें अमृतासी हरावया ॥ ७९ ॥
तंव येणें उभयपक्षमेळीं । मर्दोनि सुरासुरांची फळी ।
शस्त्रें गिळोनियां सगळीं । निघे तत्काळीं अमृतासी ॥ ८० ॥
तंव विष्णु सुबुद्धि तत्वतां । युद्धी गरुड न जिंकितां ।
त्यासीं केली दृढ आप्तता । सुरकार्यार्था सधावया ॥ ८१ ॥
विष्णूनें थोर ख्याति केली । गरुड जो कां आतुबळीं ।
तो आकळोनि निजबोलीं । शस्त्रें देवविली आम्हांसी ॥ ८२ ॥
घालागीं बोलावया निश्चितीं । आम्हांसी जाली उपपत्ती ।
तोचि श्रीविष्णु अमृतार्थी । सांगेल युक्ती गरुडासी ॥ ८३ ॥
अमृतावांचोनि निश्चितीं । अमर मरणातें पावती ।
तेव्हां गरुडाची यशःकीर्ति । तेचि अपकिर्ति होईल ॥ ८४ ॥
ऐकोनि इंद्राच्या वचनासी । विष्णु बद्धि सांगे गरुडासी ।
जेणें साधे दोन्हीं कार्यांसी । तें तुजपासी सांगेन ॥ ८५ ॥
मातेचें व्हावया बंधमोचन । सर्पा न घडे अमृतपान ।
तैसें सांगेन विंदान । सावधान अवधारीं ॥ ८६ ॥
सर्पांसी कळों न देतां । कद्रूसी द्यावें अमृता ।
अशुचिदोषें होईल गुप्तता । होवोनि सुस्नाता अमृत घेईं ॥ ८७ ॥
अमृतकल गंगातीरीं । म्यां ठेविलासें दूर्वांकुरीं ।
मातृबंधमोचन करीं । भावें नमस्कारीं कद्रूतें ॥ ८८ ॥
तुवां करितांचि नमन । कद्रु सवेचि संतोषोन ।
करील मातेचें बंधमोचन । उत्तीर्ण म्हणोन तूं जाईं ॥ ८९ ॥
पुढें सर्पासी अमृतपान । करुं न देती सुरगण ।
काकस्वरुपें झडपोन । नेती आपण अमृतकुंभा ॥ ९० ॥
ऐसी विष्णूची युक्ती । गरुडासी सांगे दैवी गती ।
तेचि गरुडें धरोनि चित्तीं । कद्रूप्रती पैं आला ॥ ९१ ॥
कुबेर दे रत्‍नकुंभासी । अमृतें भरोनियां त्यासी ।
गरुड आला कद्रूपासी । कद्रु गरुडासीं तुष्टली ॥ ९२ ॥
गरुडें पाचोरोनि माता । कद्रूपासीं अमृत देतां ।
बंधनिर्मुक्त विनता । उल्हासतां तरी कद्रू ॥ ९३ ॥
म्हणे धन्य विनतेसी । गरुड जन्मला तुझिये कुशीं ।
घेवोनि आला अमृतासी । मुक्त मातेसही येणें केलें ॥ ९४ ॥
ऐकोनि कद्रूचें वचन । गरुड सांष्टागें करी नमन ।
कद्रूनें गरुडा आलिंगन । आशीर्वचन निजविजयी ॥ ९५ ॥
अशुचि स्पर्शतां हे अमृत । जेथींचें तेथें होय गुप्त ।
यालागी होवोनि सुस्नात । स्वीकारा समस्त अमृतातें ॥ ९६ ॥
अमृतकुंभ गंगातीरी । मीं ठेविला दुर्वांकरीं ।
स्नान करोनियां समग्रीं । अमृताहारीं बैसावें ॥ ९७ ॥
अमृतकलश ठेवून । गरुडें आक्रमिलें गगन ।
विनता निर्मुक्त होवोन । आली आपण निजधामा ॥ ९८ ॥
अमृत सेवावया प्रीतीं । सर्प आल्हादें स्नानें करिती ।
तंव कावळे अमृतार्थी । नेणों किती मिळाले ॥ ९९ ॥
इंद्रासी अमृताचा कळवळा। होवोनि आला डोमकावळा ।
अमृतकलश झडपोनि नेला । सर्पीं केला हाहाकार ॥ १०० ॥
अमृत नेतां झडकरीं । तें सांडलें दूर्वांकुरीं ।
तेणें दूर्वा अमर महीवरी । अद्यापिवरी टवटविती ॥ १ ॥
अमृत नेतां पैं डोमकावळा । सर्प सोडिती विषाच्या गरळा ।
नकुळ सुरसाह्या पावला । सर्पां केला महामार ॥ २ ॥
गरुडगति ते आकाशीं । नकुळगति ते विवरासीं ।
वेगीं येवोनि सर्पांपासीं । युद्धकंदनासी मांडिलें ॥ ३ ॥
सविख उभारोनि फडा । सर्प धांविती अमृतचाडा ।
गरुडें नकुळ धाडिला गाढा । सर्पासीं झगडा तेणें केला ॥ ४ ॥
केलें दुखंड तिखंड पंचखंड । एक सर्प केले नवखंड ।
जे जे आतुर्बळी प्रचंड । ते ते शतखंड नकुळें केले ॥ ५ ॥
सर्पीं कवळोनि चौपासीं । मारु जाती नकुळासी ।
गरुड पाठिराखा आकाशीं। तेणे तो सर्पांसी नाटोपे ॥ ६ ॥
घारी गीध गरुडाची सेना । सर्पां झडपोनि नेती गगना ।
एवं पन्नग पावोनि कंदना । अमृतपानातें मुकले ॥ ७ ॥
नकुळ मार करी भूतळीं । गरुड गीध घारी अंतराळीं ।
रणीं सर्पा केली खंदळी । भेणें पाताळीं रिघाले ॥ ८ ॥
गरुडें कैसी केली युक्ती । साधोनि मातेची निर्मुक्ती ।
आम्हां मारविलें नकुळाहातीं । अमृप्राप्ती कागासी ॥ ९ ॥
काग नव्हेति ते सुरवर । यालागीं गरुडें केला कैवार ।
नकुळें केला महामार । अति दुर्धर सर्पांसी ॥ ११० ॥
दर्भीं सांडलें अमृत उदंड । सर्प चाटिती लावोनि तोंड ।
दर्भे जिव्हा जाल्या दुखंड । दुःख प्रचंड तेणें त्यांसी ॥ ११ ॥
अमृतस्वादाचिये भुली । दर्भ चाटितां जिव्हा चिरिली ।
शेखी काकुळती उरली । शीख लाविली निजकपटें ॥ १२ ॥
पितृभक्ति मातृभक्ती । तेणें गरुडासी अमृतप्राप्ती ।
कद्रुकपटाचिये गतीं । सर्पं पावती अति दुःख ॥ १३ ॥
सद्भावें भगवत्प्राप्ति । असद्भावें अधोगति ।
भगवद्भक्तां सुखप्राप्ति । दुःखप्राप्ति अभक्तां ॥ १४ ॥
सर्पांपासोनि परमामृत । गरुडाचेनि देवां प्राप्त ।
इंद्रादि देव समस्त । गरुडें निश्चित सुखी केले ॥ १५ ॥
देव पावोनि परमामृत । कुंडें भरलीं पाताळगत ।
राखण ठेवोनि इत्थंभूत । सूर समस्त सुखी केले ॥ १६ ॥
त्रैलोक्यविजयी महावीर । धीर शूर अति उदार ।
हा गरुडाचा बडिवार । सविस्तर सांगितला ॥ १७ ॥
गरुडें सुखी कश्यप पिता । सुखी केली विनता माता ।
सुखी केलें सुरां समस्तां । विष्णुही तत्वतां सुखी केला ॥ १८ ॥
ऐसी गरुडाची ख्याती । तो पितृव्य मजला श्रीरघुपती ।
आणि आम्ही अरुणाची संतती । जटायु संपाती दोघे बंधु ॥ १९ ॥

द्वौ पुत्रौ विनतायास्तु कथितौ गरुडारुणौ ।
तस्माज्जातोऽहमरुणात्संपाती च ममाग्रजः ॥ २ ॥
जटायुरिति मां विद्धि श्येनीपुत्रमरिंदम ।
सीतां च तात रक्षिष्ये त्वयि याते सलक्ष्मणे ॥ ३ ॥

जटायूचे स्ववंशवर्णन व रामास आश्वासन :

विनतेचे गरुड अरुण । त्याचें सांगितलें कथन ।
अरुणाचें आम्ही दोघे जण । जटायु आणि संपाती ॥ १२० ॥
अरुणा पित्याची आज्ञा चोख । सूर्यवंशीं व्हावें सेवक ।
तेथें जन्मले रघुकुळटिळक । विश्वतारक जगद्वंद्य ॥ २१ ॥
याचिलागीं सूर्यवंशीं । सख्य केलें दशरथासीं ।
त्याचा तूं श्रीराम भेटलासी । आजि भाग्यासी सभाग्यता ॥ २२ ॥
ऐसें बोलोनियां जाण । जटायु घाली लोटांगण ।
श्रीरामें दिधलें आलिंगन । समाधान तेणें त्यासी ॥ २३ ॥
तुज पंचवटीं वसतां । सेवा सांगावी श्रीरघुनाथा ।
म्हणोनि चरणीं ठेविला माथा । निजसेवकता मज द्यावी ॥ २४ ॥
पंचवटीस सीता ठेवून । श्रीराम आणि लक्ष्मण ।
मृग मारुं गेलिया दोघे जण । सीतासंरक्षण मी कर्ता ॥ २५ ॥
श्रीराम असतां नसतां । मी रक्षीन नित्य सीता ।
तेथें राक्षसभयाची कथा वार्ता । मज असतां जे कैंची ॥ २६ ॥
माझिया पराक्रमापुढें । राक्षसबळ तें बापुडें ।
कोण पाहील आश्रमाकडे । चहूंकडे मी रक्षीन ॥ २७ ॥
मी तराळ आश्रमापासीं । घरटीं करीन अहर्निशीं ।
सुखें राहावे आश्रमासी । मी विघ्नासी नेदीं रिघों ॥ २८ ॥
करिता श्रीरामनामस्मरण । विघ्न तेंचि होय निर्विघ्न ।
तेथें मी काय रक्षीन दीन । सेवा करीन सद्भावें ॥ २९ ॥
पंचवटीस जावें आवश्यक । मार्गद्रष्टा मी सेवक ।
सीता सौमित्र रघुकुळटिळक । आल्हादें देख नेईन ॥ १३० ॥
ऐसी ऐकोनि जटायूची गोष्टी । श्रीराम चालिला जगजेठी ।
मग तिघें जणें उठाउठीं । पंचवटीं पावलीं ॥ ३१ ॥
गंगाजळतटनिकटीं । देखोनियां पंचवटी ।
आल्हाद तिघांचिया पोटीं । गंगातटीं बसावया ॥ ३२ ॥
श्रीरामें वसविली पंचवटी । श्रीरामासन्मुख दृष्टी ।
जटायु राहे पर्वतपृष्ठी । करीत घरटी अहर्निशीं ॥ ३३ ॥
एकाजनार्दना शरण । श्रीराम सीता लक्ष्मण ।
केलें पंचवटिके आगमन । राक्षसदळण येथोनि ॥ ३४ ॥
राक्षस वधावया बोहणी । श्रीराम करील येथूनी ।
सुरस कथा रामायणी । श्रोतीं सज्जनीं परिसावी ॥ १३५ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे अरण्यकांडे एकाकारटीकायां
श्रीरामसीतालक्ष्मणजटायुपंचवट्यागमनं नाम सप्तमोध्यायः ॥ ७ ॥
॥ ओंव्या १३५ ॥ श्लोक ३ ॥ एवं ॥ १३८ ॥