अध्याय 9
खर – दूषणांशी युद्ध
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
विद्रूप शूर्पणखा पद्मपुरीला जाते :
घेवोनि लक्ष्मणाचा दरारा । शूर्पणखा आली पद्मपुरा ।
निर्नासिकी विरुपाकारा । रुधिरधारा लागलिया ॥ १ ॥
राक्षससभेचिये मेळीं । शूर्पणखा अतुर्बळी ।
ते सरकटली समूळीं । राक्षसकुळीं गाजिली ॥ २ ॥
शूर्पणखा अती दुर्धर । तीतें विटंबिलें तो महावीर ।
राक्षसां धाक लागला थोर । निशाचर चळीं कांपती ॥ ३ ॥
शूर्पणखेचें विरुपकरण । देखोनिय़ां खर दूषण ।
कोपा चढले अति दारुण । क्रोधें गर्जोन पूसत ॥ ४ ॥
तां तथा पतितां दृष्टवा विरुपां शोणितोक्षिताम् ।
भगिनीं क्रोधसंतप्तः खरः पप्रच्छ राक्षसः ॥१॥
बलविक्रमसंपन्ना कामगा कामरुपिणी ।
इमामवस्थां नीता त्वं केनांतकसमागता ॥२॥
खर-दूषण राक्षसास निवेदन व त्यांचा संताप :
शूर्पणखा शंख करुन । दुःखे पडली मूर्च्छापन्न ।
तिचें देखोनि विरुपकरण । खर आपण विस्मित ॥ ५ ॥
सओष्ठ नासिका छेदोनि मुळीं । उघडी पाडिली दांताळी ।
ऐसा कोण बळियां बळीं । रक्ते न्हाणिली शूर्पणखा ॥ ६ ॥
बळियां बळी शूर्पणखा । इचा चळकांप इंद्रादिकां ।
इचा धाक अंतका । हे तिहीं लोकां दुर्धर ॥ ७ ॥
ऐसी हे अति बळिष्ठ । कामरुपी कपटें वरिष्ठ ।
इचें केले सरसपाट । ऐसा वीर उद्भट कोण आहे ॥ ८ ॥
इति भ्रातुर्वचः श्रुत्वा क्रुद्धस्य च विशेषतः।
ततः शूर्पणखा वाक्यं सबाष्पामिदमब्रवीत्॥ ३ ॥
तरुणौ रुपसंपन्नौ सुकुमारों महाबलौ ।
पुडरीकविशालाक्षौ चीरकृष्णाजिनांबरौ ॥ ४ ॥
शूपर्णखेकडून रामस्वरुपवर्णन व वृतांतकथनः
भगिनीचेनि कैवाडें । खर बंधु पुसे वाडेंकोडें ।
तंव ते सक्रोध रडे । तापसीं गाढें गांजिले ॥ ९ ॥
तरी ते तापसी नव्हती ब्राह्मण । क्षत्रिय नव्हेति साधारण ।
वैश्य शूद्र नव्हेति जाण । योद्धे दारुण महावीर ॥ १० ॥
दोघे दारुण राजकुमर । गौर श्यम अति सुंदर ।
चीरकृष्णजिनांबर । राजीवनेत्र राजस ॥ ११ ॥
ज्येष्ठा नांव रघुनंदन । कनिष्ठा नांव लक्ष्मण ।
अति सुंदर ते दोघे जण । त्यांऐसा आन असेना ॥ १२ ॥
इंद्रादि देव मदनमूर्त । श्रीरामापुढें ते खद्योत ।
दानव मानव मशक तेथ । शोभा अदभुत श्रीरामीं ॥ १३ ॥
ज्येष्ठा श्रीरामाची नारी । लावण्यराशी सीता सुंदरी ।
रमा न पवे तिची सरी । तीऐसी दुसी असेना ॥ १४ ॥
होतां सीतेचें दर्शन । निवालें माझे दोनी नयन ।
देखतांचि श्रीरघुनंदन । काया वाचा मन निवालें ॥ १५ ॥
देखतां श्रीरालक्ष्मण । मी पावलें समाधान ।
पुत्रद्वेषें त्यांसी आपण । कपटे छळण करुं गेलें ॥ १६ ॥
तिच्या कपटामुळे ती विद्रूप होते :
त्यांसी न चले कपटाचा छळ । त्यांसी न चले क्रोध सबळ ।
सिद्धि न पवेचि माझें सळ । तिहीं तत्काळ विटंबिलें ॥ १७ ॥
पाय देवोनि उरासीं । लक्ष्मणें छेदिलें नासिकेसी ।
जया सांगे म्हणे बळियापासीं । ते मीं तुम्हांपासीं सांगूं आलें ॥ १७ ॥
तिचा आक्रोश व सूडबुद्धी :
यापरी गांजिलें तापसीं । करा माझ्या कुडाव्यांसी ।
म्हणोनि लागली पायांसी । उकसाबुकसीं स्फुंदत ॥ १९ ॥
त्यांसी तूं पाडिसी रणीं । त्यांचे नळीं मी बैसोनी ।
घटघटां रुधिरप्राशनीं । नवस मनीं दृढ केला ॥ २० ॥
ऐकोनि भगिनीचें वचन । कोपा चढले खर दूषण ।
निधडे राक्षस चौदा जण । अति दारुण धाडिले ॥ २१ ॥
तुम्हीं पंचवटीं जाउनी । श्रीराम लक्ष्मण मारोनी ।
सीता आणावी धरोनी । रुधिर प्राशनीं शूर्पणखे ॥ २२ ॥
चौदा दूतास रवाना केले :
शूर्पणखेचें मनोगत । त्या दोघांचें प्राशवें रक्त ।
तें ईस द्यावया आतृप्त । दूत त्वरित पाठविले ॥ २३ ॥
राक्षस सत्राणें गर्जत । दोघांवरी चवदा दूत ।
बापुडें कायसें रघुनाथ । निमेषार्धात माराया ॥ २४ ॥
रुधिर प्राशावया देखा । सवें दिधली शूर्पणखा ।
तिणें दाखविली पंचवटिका । रघुकुळटिळकासमवेत ॥ २५ ॥
कातिया त्रिशूळ तोमर । झेलिती शस्त्रांचें संभार ।
चवदा राक्षस अति दुर्धर । श्रीरामासमोर लोतलें ॥ २६ ॥
एक म्हणे श्रीरामासी । मी मारीन मुग्दलेंसीं ।
एक म्हणे मी लक्ष्मणासी । पट्टिशेंसीं मारीन ॥ २७ ॥
एक म्हणे मी दोघांसी । शस्त्रेंसहित गिळीन त्यांसी ।
एक म्हणे तूंची खासी । वांटा आम्हांसी पाहिजे ॥ २८ ॥
एक म्हणे हे मारोनि वीर । शूर्पणखा प्राशील रुधिर ।
मांस विभागून समग्र । अति अरुवार आरोगूं ॥ २९ ॥
एक म्हणे या दोघांसी । धरोनि नेईन खरापासीं ।
तो रक्त देईल भगिनीसी । मांस त्यासी भोजना ॥ ३० ॥
ते दोघे आम्ही बहुत । विचार कायसा येथ ।
म्हणोनि राक्षस पिलंगत । आश्रमांत निघाले ॥ ३१ ॥
त्या चौदा जणांना श्रीरामांचा पश्न :
श्रीराम सीता लक्ष्मण । आश्रमीं नित्य सावधान ।
तंव चवदा राक्षस देखोन । श्रीरघुनंदन हांसिला ॥ ३२ ॥
श्रीराम म्हणे रे लक्ष्मणा । राक्षस आले चवदा जण ।
एकेंचि बाणे घेइन प्राण । धनुष्यबाण दे वेगीं ॥ ३३ ॥
माझ्या बाणाचा महामारु । तुम्ह दोघें पहा सादरु ।
म्हणोनि उठिला श्रीरघुवीरु । धनुष्यीं शरु सज्जिला ॥ ३४ ॥
श्रीराम म्हणे राक्षसांसी । आम्ही गंगातीरीं तापसी ।
तुम्ही कां आलेति मरायासी । कोणें तुम्हांसी धाडिलें ॥ ३५ ॥
दूतांचे प्रत्युत्तर व श्रीरामबाणांनी त्यांचा नाश :
अरे तुम्ही दोघे जणीं । विटंबिली खराची भगिनी ।
तापसी म्हणोनि करिता ग्लानी । तुम्हांसी कोणी सोडीना ॥ ३६ ॥
तापसी आणि धनुष्यबाण । स्त्रियेचें करावें विटंबन ।
धन्य धन्य तुमचें तापसपण । आपणा आपण लाजाना ॥ ३७ ॥
ऐसें बोलोनि समस्तीं । शस्त्रें सांडिलीं नेणों किती ।
बाण धनुर्वाडा श्रीरघुपती । हातींचे हातीं छेदिलीं ॥ ३८ ॥
श्रीरामबाणाच्या कडाडीं । राक्षसां वळली मरकुंडी ।
डोळ्यांपडली झांपडी । केलीं बापुडीं क्षणामाजी ॥ ३९ ॥
हाटकपत्रीं घेवोनि बाण । चतुर्दशविधींचे विधान ।
अभिमंत्रोनि सोडितां बाण । घेतला प्राण चवदांचा ॥ ४० ॥
आर्तुबळें सोडिला शर । भेदोनि चवदांचें शरीर ।
धरणीं पाडिले महवीर । श्रीरामचंद्र निजविजयी ॥ ४१ ॥
भेदोनि चवदांचें शरीर । गगनीं परिभ्रमें शर ।
केउता त्रिशिरा दूषण खर । तेही सत्वर वधावया ॥ ४२ ॥
खर दूषण नाढळतां । बाण रिघाला श्रीरामभातां ।
हस्तलाघव श्रीरघुनाथा । देखोनि सीता विस्मित ॥ ४३ ॥
विस्मय करिती खेचर । श्रीराम स्वयें रणरंगधीर ।
एकांगवीर श्रीराम ॥ ४४ ॥ तंव चवदा जणांचे पाठीसीं ।
देखिलें नकटे शूर्पणखेसी । लक्ष्मण धांवला मारावयासी ।
तंव ते अति आक्रोशीं पळाली ॥ ४५ ॥
लक्ष्मण क्रोधाने शूपर्णखेचा वध करण्यास प्रवृत्त :
हा कां पडला माझे हटीं । मारुं धांवे देखतां दृष्टीं ।
धाकें पळतां उठाउठीं । धाक पोतीं न माये ॥ ४६ ॥
नकटें मुख घेवोनि येथ । प्राशं आमचे आली रक्त ।
बाणें करतां तिचा घात । धरिला हात श्रीरामें ॥ ४७ ॥
स्त्रीवध निषिद्ध म्हणून श्रीरामांनी प्रतिबंध केला :
करुं नये स्त्रियेचा घात । हा तंव मुख्यत्वें शास्त्रार्थ ।
आणीक एक आहे वृत्तांत । सावचित्त अवधारीं ॥ ४८ ॥
जैसा सांडस भात्याजवळीं । तापला घाली घायातळीं ।
तैसी शूर्पणखा कंकाळीं । राक्षसकुळीं घातकी ॥ ४९ ॥
इचेनि योगें जाण । वधिजेति रावण कुंभकर्ण ।
ईस न मारावें आपण । राक्षसदळण इचेनि ॥ ५० ॥
जेंवी दळणारी जांत्यापासीं । वैरण घाली घांसोघांसी ।
तेंवी शूर्पणखा आम्हांपासीं । राक्षसांसी वैरील ॥ ५१ ॥
पहिलें वैरण खर दूषण । दुसरें लंकेशप्रधान ।
तिसरें वैरण कुंभकर्ण । चवथें जाण इंदजित ॥ ५२ ॥
पांचवें वैरण जाण । सपुत्र सैन्येंसीं रावण ।
यासी शूर्पणखा कारण । सत्य जाण सौमित्रा ॥ ५३ ॥
ऐकोनि श्रीरामाचें वचन । सौमित्रें ठेविलें धनुष्यबाण ।
मस्तकीं वंदिले श्रीरामचरण । ज्ञान विज्ञान श्रीराम ॥ ५४ ॥
चवदा विद्यांसीं अविद्याच्छेद । करोनि चवदाही परमानंद ।
श्रीरामाचा बाणबोध । परमात्मबोध । परमात्मबोध प्रबोधी ॥ ५५ ॥
श्रीरामबाणाने चौदा राक्षसांना उत्तम गती प्राप्त :
श्रीरामाचा निजबाण । देह छेदी हें नवल कोण ।
छेदोनियां जरा जन्म मरण । चवदाही जण सुखी केले ॥ ५६ ॥
संकल्पविकल्पेसीं मन । छेदिलें चित्ता चिंतन ।
छेदोनियां मानभिमान । चवदाही जण सुखी केले ॥ ५७ ॥
छेदोनियां विषयज्ञान । छेदोनियां भवभान ।
छेदोनियां देहबंधन । चवदा जण सुखी केलें ॥ ५८ ॥
छेदोनियां कर्माकर्मबंधन । छेदोनियां कार्य कारण ।
छेदोनियां मीतूंपण ॥ चवदाही जण सुखी केलें ॥ ५९ ॥
शूर्पणखेचें अभाग्य पूर्ण । नव्हेचि श्रीरामबाणें मरण ।
पळाली देहलोभा भेण । शंखस्फुरण करीतचि ॥ ६० ॥
श्रीराम मोक्षाचें भरित । वैरी मारोनि करी मुक्त ।
नामें जडजीव उद्धरत । स्मरणें निर्मुक्त श्वपचादि ॥ ६१ ॥
एकाजनार्दना शरण । यापरी मारिले चवदा जण ।
शूपर्णखा पळाली आपण । खर दूषण वधावया ॥ ६२ ॥
खरोक्ति –
स पुनः पतितां दृष्ट्वा क्रोधाच्छूर्पणखां खरः ।
उवाच व्य्क्तया वाचा भगिनीं पुनरागताम् ॥६॥
मया त्विदानीं शूरास्ते राक्षसा रुधिराशिनः ।
त्वात्प्रियार्थ विनिर्दिष्टाः किमर्थ रुद्यते पुनः॥७॥
शूर्पणखेने वृत्तांत सांगितला, रामप्रतापाचा परिणाम :
शंखस्फुरणें मारितां हाका । पळोनि आली शूर्पणखा ।
आड पडली खरादिकां । अधिकाधिक गांगिलें ॥ ६३ ॥
खरासी आला अति आवेश । चवदा अर्तुबळी राक्षस ।
रणरगडे रणकर्कश । तुज साह्यास म्यां दिधले ॥ ६४ ॥
कोपलिया चवदा जणीं । सुरनर कांपती चवदा भुवनीं ।
ते न येती माझ्या वचनीं । त्यांलोगोनि तूं रडसी ॥ ६५ ॥
सांगतां चवदांचें गार्हाणें । पुढती रडणें आड पडणें ।
तूं का रडसी मज कारणें । येरी सांगे वृत्तांत ॥ ६६ ॥
तुझे चवदांही राक्षस । अर्तुबळी अति कर्कश ।
कातिया त्रिशूळ झेलिती फरश । घेवोनि पट्टिश चालिले ॥ ६७ ॥
एक म्हणती गिळूं रामासी । एक म्हणती मारुं लक्ष्मणासी ।
एक मांसासी एक रुधिरासी । एक दोघांची गिळूं पाहाती ॥ ६८ ॥
म्हणती शूर्पणखेसी । पांजूं दोघांच्या रुधिरासी ।
मग भक्षावें मांसासी । ऐसा राक्षसी विवादू ॥ ६९ ॥
राहें साहें धीर वीर । घाय साहें परम शूर ।
ऐसा करिती गिरागजर । निशाचर लोटले ॥ ७० ॥
राक्षसां देखोनियां दिठीं । श्रीराम उठिला जगजेठी ।
धनुष्य वाहोनियां मुष्टीं । बाण गुणीं साज्जिला ॥ ७१ ॥
निर्दाळावया नक्षत्रांसी । सूर्य उगवे आकाशीं ।
तैसा चालिला सूर्यवंशी । राक्षसांसी निवटावया ॥ ७२ ॥
आम्ही बहुत श्रीराम एकला । क्षणार्धे मारुं रंकाला ।
ऐसें बोलोनि एक हेळां । श्रीरामसन्मुख लोटले ॥ ७३ ॥
श्रीराम देखोनि सबळ । शस्त्रें सोडिली प्रबळ ।
श्रीरामें छेदिलीं तत्काळ । केले सकळ निःशस्त्री ॥ ७४ ॥
विकट देखोनियां हाक । विक्राळ पसरोनियां मुख ।
श्रीरामा गिळावया देख । अवघे सन्मुख धांवले ॥ ७५ ॥
श्रीराम धनुर्धरशिरोमणी । एक बाण लावोनि गुणीं ।
चवदाही ओंविले बाणीं । न मागतां पाणी निमाले ॥ ७६ ॥
लक्ष्मण पडिला माझे हठीं । द्वंद्व चाळवूं आली नकटी ।
शस्त्र घेवोनि लागला पाठीं । आलें संकटीं पळोनी ॥ ७७ ॥
बाप लाघवी श्रीरघुनाथ । जिणोनि सकळ तुम्ही समस्त ।
तुचा करोनियां घात । घेईल निश्चित जनस्थान ॥ ७८ ॥
श्रीरामाचा बाणक्रम । करील राक्षसांचें भस्म ।
तुमचे वाढिवेचा भ्रम । करील निर्भ्रम श्रीराम ॥ ७९ ॥
ऐसें ऐकतांचि९ वचन । खर दुर्धर कोपायमान ।
पाचारोनियां दूषण । रणनिशाण त्राहाटिलें ॥ ८० ॥
अति उद्भट निशाचर । सेनासंख्या चवदा सहस्र ।
रथीं बैसोनियां खर । अति सत्वर युद्धार्थी ॥ ८१ ॥
दक्षिणबाहूसीं दूषण । त्रिशिरा वामबाहूसीं जाण ।
खरापुढें चवघे जण । रणप्रवीण महायोद्धे ॥ ८२ ॥
चवदा सहस्र् निशाचरां । माजी निधडे वीर बारा ।
ज्यांचा सुरासुरां दरारा । इंद्र थरथरां ज्यांसी कापें ॥ ८३ ॥
चौदा हजार सैन्यासह खर, दूषण व त्रिशिरा यांचे प्रयाण :
जे भयासुरत्वें जग दाटित । क्रोधदृष्टीं वीर आटित ।
लोहेंसीं मांस जे घोंटित । अवाळी चाटित रक्तपाना ॥ ८४ ॥
हाकें कांपती लोकालोक । विक्राळ दाढा विकट मुख ।
जे भयानका भयानक । तिन्ही लोक गिळूं पाहती ॥ ८५ ॥
ऐसें दुर्धर्ष दारुण । रणवेताळ रणप्रवीण ।
अवघियांपुढें बारा जण । कोण कोण ते ऐका ॥ ८६ ॥
दुर्गगामी पृथुबलो यज्ञशत्रुर्महाविषः ।
दुर्जयः परविरघ्नः पुरुष कालकार्मुकः ॥ ८ ॥
मेघमाली महाबाहुर्महास्यो लोहितांबरः ।
द्वादशैते महावीराः प्रतस्थुरभितः खरम् ॥ ९ ॥
पहिला दुर्गगामी तत्वतां । पृथुबळ आणि यज्ञभोक्ता ।
महाविष नामें चवथा । दुर्जय तो पांचवा ॥ ८७ ॥
परवीरघ्न आणि पुरुष । मेघमाली आणि काळकार्मुक ।
महाबाहु देख दोघे अलोलिक महायोद्धे ॥ ८८ ॥
महास्य आणि लोहिताबर । दुःसह दुर्धर जुंझार वीर ।
यांचेनि बळें खर दुर्धर । सुरासुर गणीना ॥ ८९ ॥
यांचा भरंवसा खरासी । हे खराचे अति विश्वासी ।
यांचेनि बळें रावणासी । खर दृष्टींसीं आणीना ॥ ९० ॥
श्रीरामें मारिलें चवदा जणांसी । त्यांचे घ्यावया सुडासी ।
बाराही जण अति आवेशीं । युद्ध श्रीरामासीं करुं पाहती ॥ ९१ ॥
नराचें अंग खराचें मुख । यालागीं खर म्हणती देख ।
नाक पांढरें निःशेख । तेणें आवश्यक दूषण म्हणती ॥ ९२ ॥
दुषणाचे दुष्ट सांगाती । चौघे युद्धार्थी अनिवर्ती ।
दूर पाहती दूराकृती । विश्वासघाती ते ऐका ॥ ९३ ॥
महाकपालः स्थूलाक्षः प्रमाथस्त्रिशिरास्तथा ।
चत्वार एते सेनाग्रे दूषणं पृष्ठतोऽन्व्युः ॥१०॥
महाकपाल स्थूलनयन । प्रमाथी आणि त्रिदशार्दन ।
हे दूषणाचे जीवप्राण । चौघे जण विश्वासी ॥ ९४ ॥
यांचेनि बळें संपूर्ण । यमासी दृष्टी नाणी दूषण ।
घातपातीं रणप्रवीण । चौघे जण चालिले ॥ ९५ ॥
तिघे पुत्र एक समस्येसी । जन्मावे आपुले कुशीं ।
एक वाण दिधलें तिघींसी । त्रिशिरा तिसी पुत्र जाला ॥ ९६ ॥
एवं त्रिशिरा खर आणि दूषण । एकत्र मिळोनि तिघे जण ।
श्रीरामासी करावया रण । रथ संपूर्ण सज्जिलें ॥ ९७ ॥
सेनासंख्या चवदा सहस्र । त्यांत अनावर बारा वीर ।
चौघे रणघाती अति दुस्तर। भार दुर्धर चालिला ॥ ९८ ॥
निशाणें त्राहाटिल्या भेरी । चोडकीं काहळा रणमोहरी ।
बुरंगांचे नादगजरीं । केला वीरीं सिंहनाद ॥ ९९ ॥
हयकार थयकार जयकार । भाट गर्जती कैवार ।
खरासी उल्लास अपार । रथ सत्वर प्रेरिला ॥ १०० ॥
अपशकून :
सुभूमीसी समस्थळीं । घोडे अडखळले महाबळी ।
नेटें वळलीं भूतळीं । सारथी तळीं उलंडले ॥ १ ॥
तंव त्याच गजबजेमाझारीं । दिवाभीत ध्वजस्तंभावरी ।
बैसोनियां घूं घूं करी । हांकितां वरी उडेना ॥ २ ॥
अपशकुन आत्यंतिक । खर जाला साशंक ।
दचकलें त्याचे कटक । अवघे लोक गजबजिले ॥ ३ ॥
ध्वजींचे उलूकें झडपोनि तेथ । खराचे कपाळीं केले क्षत ।
भूकंप भूस्फोट उल्कापात । अशनिघात होंसारला ॥ ४ ॥
ऐसा जाला चमत्कार । निशाचरीं केला हाहाकार ।
एकाएकीं चिंतातुर । जाले समग्र एकभूत ॥ ५ ॥
खर होवोनि सावचित्त । सांवरोनियां निजरथ ।
आपुला पुरुषार्थ बोलत । महोत्पात मज मिथ्या ॥ ६ ॥
तानेवौत्पातिकानसमः सह भ्रात्रा ददर्श ह् ।
महोत्पातानिमान्घोरानुत्थितान्घोरदर्शनान् ॥११॥
अपशकुनांबद्दल तुच्छता व शूर्पणखेला आश्वासन :
अपशकुन देखोनि दृष्टीं । मागें सरो दों मनुष्यांसाठी ।
हे सर्वथा बुद्धि खोटी । आम्ही जगजेठी दृढ योद्धे ॥ ७ ॥
नांही परचक्र दारुण । रामकुमार दोघे जण ।
त्यांसाठी अपशकुन । मानी कोण आम्हांमाजी ॥ ८ ॥
ऐसें बोलोनियां खर । रथ प्रेरिला सत्वर ।
उल्लासले निशाचर । भार दुर्धर चालिला ॥ ९ ॥
शूर्पणखेसी म्हणे खर । श्रीरामलक्ष्मणाचें रुधिर ।
तुज मी पाजीन अपार । हर्षे निर्भर ते जाली ॥ ११० ॥
द्वंद्व साधावयाच्या कैवाडें । अशुद्ध प्राशावयाचे चाडें ।
शूर्पणखा बंधुलडिवाडें । अवघियांपुढें निघाली ॥ ११ ॥
देखोनियां पंचवटी । राक्षसवीर जगजेठी ।
शस्त्रें सज्जोनियां मुष्टीं । सक्रोधदृष्टी चालिलें ॥ १२ ॥
भीतीमुळे ऋषींचे पलायन :
श्रीरामासवें ऋषिजन । वनवासी तपोधन ।
राक्षसभयें गेले पळोन । जाले सुलीन गुंफेमाजी ॥ १३ ॥
मग श्रीराम म्हणे लक्ष्मणासी । सावधान राहें सीतेपासीं ।
मी वधीन राक्षसांसी । बाण सपिच्छी भेदून ॥ १४ ॥
माझें सुटलिया कुर्हाडें । राक्षस पळतील कवणीकडे ।
घायें विभांडीन बापुडें । रणीं रोकडे पाडीन ॥ १५ ॥
वायु अनुकूळ आम्हांसी । प्रतिकूल राक्षसांसी ।
शिवा सन्मुख भुंकती त्यांसी । जयो आम्हांसी वदताती ॥ १६ ॥
श्रीराम एकटेच राक्षससैन्याशी लढतात :
ऐसें बोलोनियां जाण । वेगीं धनुष्यीं वाहिला गुण ।
सन्मुख होवोनि आपण । सीती बाण सज्जिला ॥ १७ ॥
विदारावया गजगण । एकला उठे पंचानन ।
तैसें विध्वंसावया राक्षससैन्य । श्रीरघुनंदन चालिला ॥ १८ ॥
निर्दळावया खद्योतासी । सूर्य उगवे आकाशीं ।
तैसा श्रीराम सूर्यवंशीं । राक्षसांसी अंतक ॥ १९ ॥
सूर्योदयीं खद्योत मावळती । शशीं चंद्र नक्षत्रें अस्ता जाती ।
तेंवी सेना निर्दळिता श्रीरघुपती । रणीं निमती खरादिक ॥ १२० ॥
श्रीरामांच्या शौर्यामुळे सीतेला आनंद व अभिमान :
सीता पाहे श्रीरामझुंज । तिचें लक्ष्मणासी चोज ।
चढविली श्रीरामसेज । रणसमाज देखावया ॥ २१ ॥
कवित्वमुद्रा अनारिसी । सीता सौमित्र धाडिलीं गुंफेसी ।
श्रीराम न भी राक्षसांसी । तो कां तियेसी लपवील ॥ २२ ॥
श्रीराम बाण ओढितां ओढी । राक्षससेना ते हडबडी ।
एकामागें एक दडी । देवोनि बापुडीं राहिलीं ॥ २३ ॥
श्रीराम देखतांचि दृष्टी । थरकांप सुटला पोटीं ।
मूत्रप्रवाह तळवटीं । शस्त्रे मुष्टीहूनि गळती ॥ २४ ॥
व्याघ्र देखोनियां डोळां । भयें अजा होती गोळा ।
तैसे जालें राक्षसां सकळां । श्रीराम मरगळा देखोनी ॥ २५ ॥
सैन्यं तु स्थितमालोक्य निश्चलं पर्वतोपमम् ।
पार्श्वस्थं दूषणं कुद्धं खरो वचनमब्रवीत् ॥१२॥
खराचे दूषणाला प्रोत्साहनः
राक्षससैन्य दुर्धर प्रबळ । राहिलें देखोनि निश्चळ ।
खरासी कोप आला प्रबळ । बोले तत्काळ दूषणासी ॥ २६ ॥
आमचा सैन्यसंभार । निश्चळ दिसे पर्वताकार ।
पुढें न दिसतां दुस्तर । सैन्य एकत्र कां जालें ॥ २७ ॥
सावज देखोनियां दृष्टीं । जेवी अजा होती एकवटी ।
तेवीं सैन्य थोकलें प्रुष्ठीं । पुढें वाट कां फुतेना ॥ २८ ॥
ऐसें खरवचन ऐकोनि स्पष्ट । मग दूषण चालिला घडघडाट ।
त्याच्या रथासी न फुटे वाट । सैन्य सकत कोंदलें ॥ २९ ॥
रथीं वीर गर्जती पूर्ण । परी पुढे न चालती गेलिया प्राण ।
सेनामुखीं येतां दूषण । तंव श्रीरघुनंदन देखिला ॥ १३० ॥
राक्षसांना श्रीराम कसे दिसले ? :
मुकुट कुंडलें रत्नमेखळा । टिळक रेखिला पिंपळा ।
अजानुबाहु घनसांवळा । कमळमाळा शोभती ॥ ३१ ॥
तडित्प्राय कांस गोमटी । अंगी चंदनाची उटी ।
धनुष्यबाण सज्जोनि मुष्टीं । उभा जगजेठी रणरंगीं ॥ ३२ ॥
पाउलें आरक्त सुकुमार । वांकी अंगुवांचा गजर ।
नांदे कापती सुरासुर । त्यासमोर कोण राहे ॥ ३३ ॥
देखतां चळीं कांपे दुषण । सुटलिया श्रीरामाचा बाण ।
अवश्य घेईल माझा प्राण । आला पळोन खरापासीं ॥ ३४ ॥
सेनामुखीं श्रीरघुनाथ । जैसा कोपला कृतांत ।
सैन्य चळचळां कांपत । त्यांसी पुरुषार्थ चालेना ॥ ३५ ॥
प्रळयाग्नीच्या जैशा शिखा । तैसे त्याचे बान देखा ।
दृष्टीनें जाळूं पाहे कटका । श्रीराम नेटका झुंजार ॥ ३६ ॥
दृष्टीनें देखतांचि जाण । जीवासी जीवें मारी संपूर्ण ।
त्यापुढें राहील कोण । अरिमर्दन श्रीराम ॥ ३७ ॥
श्रीराम देखतांचि जाण । आपभयें पळे प्राण ।
मग तेथें केउती आंगवण । रणगर्जन श्रीराम ॥ ३८ ॥
ऐकोनि दूषणाची मात । पहावया श्रीरघुनाथ ।
खरें प्रेरिला पैं रथ । अति गर्वित युद्धार्थी ॥ ३९ ॥
एकाजनार्दना शरण । श्रीरामराक्षसां घोर रण ।
राम करील राक्षसकंदन । श्रोतीं अवधान मज द्यावें ॥ १४० ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे अरण्यकांडे एकाकारटीकायां
खरदूषण श्रीरामयुद्धप्रारंभो नाम नवमोऽध्यायः ॥ ९ ॥
॥ ओंव्या १४० ॥ श्लोक १२ ॥ एवं १५२ ॥