रामायण - अध्याय 3 - अरण्यकाण्ड - 17 MB (Official) द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रामायण - अध्याय 3 - अरण्यकाण्ड - 17

अध्याय 17

जटायु-रावण युद्ध

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

सीतेला रथात बसवून रावणाचे प्रयाण :

रावण करोनि सीताहरण । सवेग निघाला आपण ।
ते काळींचें गमनलक्षण । सावधान अवधारा ॥ १ ॥

वामेन सीतां पद्माक्षीं मूर्धजेषु करेण सः ।
ऊर्वोस्तु दक्षिणेनैव परिजग्राह पाणिना ॥ १ ॥
ततस्तां परुषैर्वाक्यैरभितर्ज्य महास्वनः ।
अंकेनादाय वैदेहीं रथमारोहयत्तदा ॥ २ ॥

सीता बैसवितां रथासीं । आंग टाकिलें भूमीसीं ।
रावणें धरोनियां केशीं । वाहोनि अंकासी बैसे रथीं ॥ २ ॥
अंकीं बैसवितां पद्माश्री । तेणें रावण जाला सुखी ।
सीता जाली परम दुःखी । धांवा पोखी आक्रंदें ॥ ३ ॥

सीतेचा विलाप, आक्रंदन व लक्ष्मणाबद्दल अनुताप :

धांव पाव गां श्रीरघुवीरा । सवेग धांवे गा सौमित्रा ।
धांवे गा सौमित्रा । रावणें हरुनि भिक्षाद्वारा । लंकापुरा मज नेतो ॥ ४ ॥
केउता राम केउता रावण । कैसें केलें माझें हरण ।
म्यां अभिशापिला लक्ष्मण । तें पाप पूर्ण मज फळलें ॥ ५ ॥
सौमित्र निष्पाप हरिदास । तो म्यां छळिला अति संत्रास ।
आतां कायसी रामाआस । माझी निरास म्यां केली ॥ ६ ॥
सौमित्रा रामीं अनन्यभक्ती । तो म्यां छळिला अति वक्रोक्तीं ।
त्या पापाची सद्यःप्रचीती । रावणाहातीं आतुडलें ॥ ७ ॥
श्रीरामाज्ञासंरक्षण । सौमित्र दवडिला म्यां छळून ।
तेणें पापें मज रावण झोंटीं धरोन नेतसे ॥ ८ ॥
लक्ष्मण मज मानी जननी । मी त्यासी म्हणें करिसी पत्‍नी ।
तेणे पापें फुते अवनी । महापापिणी मी एक ॥ ९ ॥
लक्ष्मणीं मिथ्या अभिशाप । तें मज माझें फळलें पाप ।
मज म्यां दिधला संताप । दुःख अमूप मज माझें ॥ १० ॥
जें पुढिलांसी करी छळण । तेणें छळें छळें आपण ।
तें मज फळलें संपूर्ण । जें केशाकर्षण रावणें ॥ ११ ॥
छळणाची शीघ्र गती । सौमित्र पावला श्रीरघुपती ।
मी तंव पडलें रावणाचे हातीं । बंधप्राप्ती पावलें ॥ १२ ॥
छळछद्मवक्रदृष्टी । महापापिनी मी ये सृष्टीं ।
आतां कैची श्रीरामभेटी । दुखःकोटी मज माझी ॥ १३ ॥
आतां नव्हे श्रीरामभेटी । श्रीराम न देखें दृष्टी ।
सौमित्रछळणासाठीं । दुःखकोटी मज माझ्या ॥ १४ ॥
छळवाद्याचें निजमुख । श्रीराम न पाहे निःशेख ।
मज म्यां दिधलें अति दुःख । ऐसी अधोमुख विलपत ॥ १५ ॥
महापाप्या परम गती । श्रीरामनाम जपतां अंतीं ।
त्याची करिसी तूं निर्मुक्ती । तैशिया गतीं मज पावें ॥ १६ ॥
लक्ष्मणाच्या छळवादीं । होणारासारिखी घडली बुद्धी ।
तेणें लागलीसे आधी । कृपानिधे कृपा करीं ॥ १७ ॥
मी तंव श्रीरामाची दासी । मजही गांगिलें राक्षसीं ।
आपलीं ब्रीदें सत्य करावयासी । धांव धांवण्या श्रीरामा ॥ १८ ॥
लक्ष्मणा तुझे चरणीं माथा । जरी तूं मज मानिसील माता ।
तरी माझ्या छळणोक्ती समस्ता । क्षमा सर्वथा कराव्या ॥ १९ ॥
श्रीरामभक्त तूं निष्पाप । तुज माजी नाहीं गा कोप ।
माझ्या छळणाचा संताप । कृपानुरुप सांडावा ॥ २० ॥

हा लक्ष्मण महाबाहो गुरुचित्तप्रसादक ।
ह्रियमायां न जानासि रक्षसा पापकर्मणा ॥ ३ ॥
जीवितं सुखमर्थं च धर्महेतोः परित्यजन् ।
ह्रियमाणामधर्मेण मां राघव न पश्यसि ॥ ४ ॥

लक्ष्मणाचा धावा :

लक्ष्मणा वेगीं धांव पाव । सवें घेवोनि श्रीराघव ।
रावणाचा हरुनि गर्व । छेदीं सर्व प्रातापें ॥ २१ ॥
तूं कां मजवरी रुसलासी । तुझे चरण झाडीन केशीं ।
थोर गांगिलें राक्षसीं । कवणापासीं मी सांगों ॥ २२ ॥
नेणें परपुरुषाची मात । त्या मज रावणें लाविला हात ।
दुःखें करीं आकांत । का रघुनाथ विसरला ॥ २३ ॥
छळोनि दवडिलासी दुरी । तो कोप सांडोनि जिव्हारीं ।
ऐसिये आकांतावसरीं । पावें झडकरीं सौमित्रा ॥ २४ ॥
तूं जनक तूंचि जननी । सखा सांगाती जिवलग वनीं ।
वेगीं पावें कळवळोनी । मजलागोनि सोडवावया ॥ २५ ॥
विराध वधिला जिये बाणीं । तोचि बान लावोनि गुणीं ।
प्रातापतेजें यावें गर्जोनी । मजलागोनी सोडवावया ॥ २६ ॥

रामाचा धावा करुन, त्यांना मृगासाठी पाठविल्याबद्दल मनस्ताप :

पाप आहे माझे माथां । म्हणोनी नुपेक्षीं श्रीरघुनाथा ।
तुझें श्रीरामनाम स्मरतां । पाप सर्वथा मज नाहीं ॥ २७ ॥
महापापाच्या पर्वतकोडी । श्रीरामनाम क्षणें विभांडी ।
येवोनि कृपेनें तांतडीं । माझी बांदवडी सोडवीं ॥ २८ ॥
सोडावया देवांची बांदवडी । वना आलासी निजप्रौढीं ।
माझी फेडावया सांकडीं । घाली उडी श्रीरामा ॥ २९ ॥
म्यां पाठविलें मृगापाठीं । हेचि माझी बुद्धि खोटी ।
श्रीरामेंसीं पडली तुटी । दुःखकोटी मज माझ्या ॥ ३० ॥
मागतां मृगांची कांचोळी । सर्व सुखाची जाली होळी ।
श्रीराम अंतरला महाबळी । धांवण्यार्थ छळीं सौमित्रा ॥ ३१ ॥

स्त्रियांनी पतिजवळ मागणे करु नयेः

भ्रतारापासीं जें मागणें । तें स्त्रियेचें निद्य जिणें ।
मागण्यानिमित्त मज रावणें । आकर्षणें निजबंदीं ॥ ३२ ॥
भ्रतात जें दे संतोषोन । तें स्त्रियेसी अति पावन ।
स्वमुखें मागतां आपण । दुःख दारुण पावलें ॥ ३३ ॥
माझ्या मागण्याची कथा । माझी मजचि आली घाता ।
बंदीं पडलें लंकानाथा । श्रीरघुनाथा अंतरलें ॥ ३४ ॥

सीतेचा अनुताप :

ऐसी अतुतापें संतप्ता । आपली आपण अपराधता ।
स्वयें अनुवादे सीता । दुःखार्थ अति दुःखी ॥ ३५ ॥
दूरी अंतरला रघुनंदन । त्यापासीं गेला लक्ष्मण ।
माझें अत्यंत आक्रंदन । दोघे जण नायकती ॥ ३६ ॥
माझें उत्तर पडतें कानीं । दोघे येते अति गर्जोनी ।
रावणा बाणीं निर्दळोनी । अर्धक्षणीं सोडविते ॥ ३७ ॥
निरोप धाडावया श्रीरामासी । सीता पाहे द्विजशिष्यांसी।
ब्राह्मण पळाले धाकेंसीं । निजपल्यांसी घेवोनी ॥ ३८ ॥
ते वेळीं सीता पाहे आपण । वृक्षवल्लींस रिघे शरन ।
श्रीरामा सांगावें आपन । मज रावण नेतसे ॥ ३९ ॥

आमंत्रये जनस्थानं कर्णिकारांश्च पुष्पितान् ।
नमस्करोम्यहं तेभ्यो भर्तुः शंसत मां हृताम्॥ ५ ॥
यानि कानिचिदप्यत्र सत्वानि विविधानि च ।
सर्वाणि शरणं यामि मृगपक्षिगणानपि ॥ ६ ॥
दैवतानि च यान्सस्मिन्वने विविधपादपे ।
क्षिप्रं रामाय शंसध्वं सीतां हरति रावणः ॥ ७ ॥
विदित्वा तु महाबाहुरमुत्रापि महाबलः ।
आनेष्यति पराक्रम्य वैवस्वतहृतामपि ॥ ८ ॥

पंचवटीतील सर्व चराचर सृष्टीला सीतेचा संदेशः

जनस्थानीचे जन वन । त्यांसीं घालितें मी लोटांगण ।
श्रीरामा सांगावें आपण । केलें सीताहरण रावणें ॥ ४० ॥
कर्णिकारादि बिल्व आम्र । समस्त वृक्षां नमस्कार ।
श्रीरामा सांगावें शीघ्र । सीता दशवक्र नेतसे ॥ ४१ ॥
गुल्म लता तृण पाषाण । दैवतें श्वापदें पक्षिगण ।
त्यांसी माझें लोटांगण । सांगावे आपण श्रीरामा ॥ ४२ ॥
सिंह व्याघ्रादि श्वापदें क्रूर । त्यांसी माझा नमस्कार ।
धांवण्या धाडावा श्रीरघुवीर । दशशिर वधावया ॥ ४३ ॥
काग बक कारंडक । हंस मयूर चातक शुक ।
श्रीरामा सांगावें आवश्यक । सीता दशमुख नेतसे ॥ ४४ ॥
जळदेवता वनदेवता । आकाशींच्या गुप्त देवता ।
तुम्हीं सांगावें श्रीरघुनाथा । रावण सीता नेतसे ॥ ४५ ॥
श्रीरामा सांगावया जाण । वाचा पावोत तृण पाषाण ।
तिहीं सांगावें संपूर्न । सीता रावन नेतसे ॥ ४६ ॥
विनवीतसें पंचभूतां । तुम्ही सांगावें श्रीरघुनाथा ।
धांवण्या धाडावा शीघ्रता । लंकानाथा वधावया ॥ ४७ ॥

रामांना समजल्याबरोबर ते मागोमाग येतीलच असा तिला विश्वास :

न भेटेतां जनकबाळी । स्वर्ग मृत्य़ु आणि पाताळीं ।
श्रीराम घेवोनि घरधांडोळी । मज तत्काळीं आणील ॥ ४८ ॥
माझें ऐकतां हरण । सवेग येवोनि लक्ष्मण ।
रागें निर्दाळील रावन । अर्ध क्षण न लागतां ॥ ४९ ॥
रामें ऐकतां माझें हरन । जेथींचा तेथें सोडोनि बान ।
घायीं रावणाचा घेईल प्राण । सोडवण तेणें माझी करील ॥ ५० ॥
लोकालोककुळाचळीं । लपविल्याही जनकबाळी ।
राम राक्षसां करील होळी । मज तत्काळीं सोडविल ॥ ५१ ॥
रावणें माझा केलीया घात । ऐसा प्रतापी श्रीरघुनथ ।
पाडोनियां यमाचे दांत । मज निश्चित आणील ॥ ५२ ॥
माझिया प्रेमाचे आवडीं । श्रीराम काळाची मुरडील नरडी ।
तेथें राक्षसें कोण बापुडीं । बाणीं रोकडी निर्दळील ॥ ५३ ॥
ऐसिया प्रतापी श्रीरघुनाथा । माझिया दुस्तर आकांता ।
कां पां न पवसीच तत्वतां । म्हणोनि सीता विलपत ॥ ५४ ॥
सीता स्वयें येचि अर्थीं । ज्या त्या येतसे काकुळती ।
सुद्धि सांगावी श्रीरघुपती । रावणवधार्थी शीघ्र यावें ॥ ५५ ॥
धांव पाव श्रीरामचंद्रा । वेगीं यावें श्रीसौमित्रा ।
मज गांजिलें राक्षसेंद्रा । कृपासमुद्रा कां न पावसी ॥ ५६ ॥
मरमर पापिया अदृष्टा । दुःखें फळलेंसी दुष्टा ।
वंचोनि श्रीरामवरिष्ठा । वश्य दुष्टा मज केलें ॥ ५७ ॥
मी जनकबाळा जानकी । श्रीरामाची निजसेवकी ।
रावणें दुष्टे केलें दुःखी । दशमुखी निर्बंध ॥ ५८ ॥
श्रीरामा तुझी अगाध थोरी । तुझें देहागार फोडिलें चोरीं ।
चोरोनि नेली तुझी अंतुरी । हे चराचरीं तुझ लाज ॥ ५९ ॥
आपले लाजेकारणें । माझें करावें धांवणें ।
ऐसें सीतेचें आक्रंदणें । दीर्घस्वरें विलपत ॥ ६० ॥
ऐकतां सीताविलपन । व्याघ्रसिंहादि करिती रुदन ।
वृक्ष स्रवती संपूर्ण । गळती लोचन पक्ष्यांचें ॥ ६१ ॥
दुःखें फुटों पाहे अवनी । दुःखे द्रव आला पाषाणीं ।
दुःख न समाये गगनीं । ऋषिजनीं आकांत ॥ ६२ ॥

सीतेचा धावा ऐकून रावण घाबरला व तो आकाशमार्गाने जाऊ लागला :

ऐकोनि सीतेचें रुदन । रावण झाला कंपायमान ।
वेगें आलिया रघुनंदन । माझा प्राण घेईल ॥ ६३ ॥
जेणें मारिले खर दूषण । मारीच मारीला विंधोनि बाण ।
विराध मारिला संपूर्ण । अर्धक्षण लागेना ॥ ६४ ॥
ताटका सुबाहु मारिला जांण । विराध मारिला संपूर्ण ।
तो श्रीराम माझा घेईल प्राण । ऐसी रावणा धुकधुकी ॥ ६५ ॥
सीता करील दीर्घ रुदन । तिसीं देवोनि आलिंगन ।
रथीं बैसोनि रावण । लंघी गगन अति धाकें ॥ ६६ ॥
रावणाची शक्ति केसी । सीता धरोनि पोटासीं ।
रथ चालवी आकाशीं । येरी आक्रोशीं आक्रंदें ॥ ६७ ॥
ऐकोनि आक्रंदतां सीता । तंव जटायु आला सकोपता ।
माझिया स्वामीची हे कांता । तिये गांजिता तूं कोण ॥ ६८ ॥

ततः पर्वतकूताभस्तीक्ष्णतुंडः खगोत्तमः ।
वनस्पतिगतः श्रीरामान्व्याजहार शुभां गिरम् ॥ ९ ॥
दशग्रीवः स्थितो धर्मे पुराणे सत्यसंश्रवः ।
भ्रातस्त्वं निदितं कर्म कर्तुं नार्हसि सांप्रतम् ॥ १० ॥
राजा सर्वस्य लोकस्य रामो दशरथात्मजः ।
तस्यैषा लोकनाथस्ये धर्मपत्‍नी यशस्विनी ॥ ११ ॥
सीता नाम वरारोहा यां त्वं हर्तुमिहेच्छसि ।
कथं राजा स्थितो धर्मे परदारान्परामृशेत् ॥ १२ ॥

मार्गांत जटायूचे आगमन :

रावणें सीता हरितां । तंव जतायु वनक्रीडे गेला होता ।
ऐकोनि जानकी आक्रंदतां । सवेगता तो आला ॥ ६९ ॥
त्रैलोक्यराजा श्रीरघुनाथ । मी जटायु श्रीरामभक्त ।
तूं रावणा अति उन्मत्त । सीतेसी हात लाविता॥ ७० ॥
पर्वतप्राय महाबळी । मी असतां ये वनस्थळीं ।
केवी नेसील जनकबाळी । रणरांगोळी मी करीन ॥ ७१ ॥
पंचवटीं आश्रमानिकट । बैसलें असतां माझें मेट ।
तुज कैसेनि फुसेनि फुटेल वाट । महानष्ट तूं परद्वारी ॥ ७२ ॥
श्रीरामारायाची अंतुरी । नेऊं पाहसी करोनि चोरी ।
चोरासी मी जीवें मारीं । तुझी उरी उरों नेदीं ॥ ७३ ॥
चोरापासीं वस्तुजात । सोडवोनि करीं घात ।
तेंवी सीता सोडवोनि येथ । तुझा निःपात करीन मी ॥ ७४ ॥
चौदा चौकड्यांचें राज्य शिरीं । शेखीं करों धांवसी चोरी ।
जळो रावणा तुझी थोरी । पापी परद्वारी महानष्ट ॥ ७५ ॥

यस्य त्वं लोकनाथस्य हत्वा भार्यां गमिष्यसि ।
वृंतादिव फलं त्वां तु पातयेयं रथोत्तमात् ॥ १३ ॥

त्रैलोक्यस्वामी श्रीरघुनाथ । त्याची चोरोनि नेतां कांता ।
तुझ्या करीन निःपाता । जेंवी सदेंठ वृंताक ॥ ७६ ॥
जैसीं कां परिपक्क फळें । सदेंठ झडती वायुबळें ।
तैसीं तुझीं कंठनाळें । दाही शिरकमळे छेदीन ॥ ७७ ॥

जटायूने आपल्या पंखांच्या तडाख्याने रावणाचा रथ थांबवून त्याला युद्धाचे आव्हान :

जटायुपक्षवात दुर्धर । न चले रावणाचा रहंवर ।
मागें ओसरले रथाचे खर । तंव दशशिर क्षोभला ॥ ७८ ॥
धनुष्या वाहोनियां गुण । जटायु लक्षोनियां पूर्ण ।
नाळीकनाराचांचे वर्षे बाण । युद्ध दारुण मांडिलें ॥ ७९ ॥
तुझ्या शस्त्रांचा कडकडाट । नखीं पाखीं करीन पीठ ।
माझी चंचु अति तिखट । दाही कंठ छेदीन ॥ ८० ॥
अरे मी जटायु न भेटतां । रावणा तुझी प्रतापता ।
हिरोनि नेतां श्रीरामकांता । तुज मी आतां मारीन ॥ ८१ ॥
रावण कायसें बापुडें । दाहा तोंडांचें जड किडें ।
हाणोनियां चंचुवाडें । सवक्त्र हाडे फोडीन ॥ ८२ ॥
चोरितां श्रीरामाची कांता । किर्ति पळाली अपकिर्तिता ।
पापें शक्ति गेली लंकानाथा । तुज मारितां क्षण न लागे ॥ ८३ ॥
पापें जालासी निर्वीर्य । तुज युद्धीं कैंचें धैर्य ।
मारोनियां राक्षस सर्व । श्रीरामकार्य साधीन ॥ ८४ ॥

रावण-जटायू युद्ध :

रावण वर्षे दुर्धर बाण । जटायु पांखीं उडवी पूर्ण ।
बाणप्रताप जाला क्षीण । रागें रावण क्षोभला ॥ ८५ ॥
जटायुपांखांच्या झडाडीं । विसां हातां वळें वेंगडी ।
दाही शिरें कांपती गढीं । धनुष्य ओढी न ओढवे ॥ ८६ ॥
जटायुपक्षांच्या आवर्ता । आवर्ती पाडीले लंकानाथा ।
पुढें ढळों नेदी रथा । अति विघाता पेटला ॥ ८७ ॥

युद्धामुळे मार्गात विलंब होऊअ लागल्यामुळे रावणाला राम येण्याची भीती :

रावण पावला आकांता । जटायु ढळों नेदी रथा ।
मागोनि आलिया श्रीरघुनाथा । माझ्या घाता तो करील ॥ ८८ ॥
मारीच बोलला सत्य वचन । करुं जाता सीताहरण ।
आम्ही दोघे पावों मरण । तें प्रमाण दिसताहे ॥ ८९ ॥
नाहीं इंद्रजित कुंभकर्ण । नाहीं साह्य सैन्य प्रधान ।
मज मारितां राखेल कोण । अति उद्विग्न लंकानाथ ॥ ९० ॥
अति प्रायासें सीता आली हाता । हे पावल्या लंकेआंतौता ।
तेथें येवों न शके रघुनाथा । दुर्घट पंथा क्रमेना ॥ ९१ ॥
लंकादुर्ग आणि गूढ । भोवता समुद्राचा अगड ।
श्रीराम मानवी अति जड । मार्ग अवघड कंठेना ॥ ९२ ॥
परी प्रस्तुत जटायु दारुण । दृढ ओढवलें विघ्न ।
हें शंकरें करावें निवारण । लंकाभुवन तो पाववो ॥ ९३ ॥
पुढें जटायु मार्गरोधन । मागोनि आलिया श्रीरघुनंदन ।
माझा घेईल तो प्राण । धाकें रावण धुकधुकी ॥ ९४ ॥
एकेचि वेळें शतबाण । जटायूतें विंधी रावण ।
येरें चुकविलें तळपोन । आला कोपोन झडपित ॥ ९५ ॥

ततोऽस्य सशरं चापं मुक्तामणिविभूषितम् ।
पक्षाभ्यां स महातेजा बभंज पतगेश्वरः ॥ १४ ॥
सारथिं सस्थोपस्थं स जघान नखांकुरैः ।
कांचनोरश्छदान्दिव्यान्पिशाचवदनान्खरान् ॥ १५ ॥
पुर्णचंद्रप्रतीकाशं छत्रं च व्यंजनैः सह ।
पातयामास वेगेन ग्राहिभी राक्षसैः सह ॥ १६ ॥

रावणबाणाविषयी जतायू निर्भय, रावणाचे धनुष्य मोडून, मुकुट पाडून शरीरावर हल्ला :

रावणाच्या धनुष्यावरी । मुक्ताफळांच्या झालरी ।
सुवर्णबद्ध मणिमय मंजरी । घेवोनि करीं विंधित ॥ ९६ ॥
जटायूने सवेग पांखीं । रावण झडपिला दाही मुखीं ।
चाप छेदोनि सांडिलें नखीं । मुकुट मस्तकींचा पाडिला ॥ ९७ ॥
सवेंचि ध्वज छेदिला चांग । शशांकछत्राचा केला भंग ।
रावणाचें अंगप्रत्यंग । नखीं सवेग विदारी ॥ ९८ ॥
जटायुपक्षवातावर्त । रावण चळचळां कापत ।
चंचूनें धरोनियां रथ । गगनाआंत उचलिया ॥ ९९ ॥
मग सीता धरोनि पोटासीं । रावण उडी टाकी वेगेंसीं ।
पिशाचवदन खर रथासीं । नखाग्रेंसीं मारिले ॥ १०० ॥

रावणाचा रथ, घोडे, सारथी यांचा विध्वंस :

तेथोनि टाकिता रहंवर । सारथी वारुवेसीं शतचूर ।
दणकां दुमदुमलें अंबर । दशशिर चळीं कांपे ॥ १ ॥
मुहूर्ती केला छत्रपात । भंगिले चाप भंगिला रथ ।
रावण केला हताहत । धन्य पुरुषार्थ जटायूचा ॥ २ ॥
देखोनि जटायु साटोप । स्वर्गी देव वानिती प्रताप ।
धन्य धन्य जटायूचें तप । केला प्रताप रामकाजीं ॥ ३ ॥
रावण विचारी निजचित्ता । जटायु आलिया न जिरे सीता ।
इसी सांडोनियां जातां । आली कघुता तिहीं लोकीं ॥ ४ ॥
सहित पार्वतीमहेश । म्यां आंदोळिला गिरि कैलास ।
आणी जिंकोनि कुबेरास । विमानास हरितलें ॥ ५ ॥
देवांचिया अमित कोडी । अद्यापि माझे बांदवडीं ।
त्याहीं माझी गर्वझाडी । केलीं रोकडी येणें पक्षें ॥ ६ ॥
जटायुचंचु अति तिखट । शस्त्रसमुदाय केला सपाट ।
यापोसोनि न फुटे वाट । परम कष्ट रावणा ॥ ७ ॥

स भग्नधन्वा विरथो हताश्वो हातसारथिः ।
अंकेनादाय वैदेहीं पपात भुवि रावणः ॥ १७ ॥

भंगिलें धनुष्य भंगिला रथ । सारथि वारुवां केला घात ।
विरथी पदाती लंकानाथ । मग कपटार्थ मांडिला ॥ ८ ॥

रावण गुप्तरुपाने आकाशमार्गाने जातो :

राक्षसाची गुप्तस्थिती । कडिये घेवोनि सीता सती ।
रावण निघे खेचरगती । गगनपंथीं अति गुप्त ॥ ९ ॥
परी जटायूसी अरुणभेटी । त्यास सहज दिव्यदृष्टी ।
तेणें सीता नेतां देखोनि दृष्टीं । रावणापाठीं लागला ॥ ११० ॥

स विदार्य नखैस्तीक्ष्णैस्तस्य पृष्ठं समंतः ।
केशांश्चोत्पाटयामास नखपक्षमुखायुधः ॥ १८ ॥
स तदा गृध्रराजेन किश्यमानो मुहुर्मुहुः ।
ततः क्रोढाद्दशग्रीवः सीतामुत्सृज्य वीर्यवान् ॥ १९ ॥

तरीही जटायूने त्याला मार्गात गाठून घायाळ केले :

जटायु धांवला सरोखीं । सबळ बळें निजपांखीं ।
रावण झडपिला दाही मुखी । विदारी नखीं सर्वांग ॥ ११ ॥
तिखत नखें दशशिरा । सर्वांगीं लागल्या रुधिरधारा ।
देहांत मांडला दशशिरा । साह्य दुसरा नाहीं कोणी ॥ १२ ॥
नखें पाखें चंचु तीक्ष्ण । घायीं घायवटला रावण ।
आतां माझे न वांचिती प्राण । योद्धा दारुण जटायु ॥ १३ ॥
जटायु तळपोनि आकाशीं । केंस उत्पाटी दाढी मिशी ।
भेणें रावण कासाविसी । जीविता शेंसी सांडिले ॥ १४ ॥

सीतेला सोडून रावण पळाला :

मारिचवाक्य सत्यभाषण । करितां जानकीचें हरण ।
अवश्य पावसील मरण । तें प्रमाण दिसताहे ॥ १५ ॥
रावण म्हणे जानकी नेतां । जटायु करील माझ्या घाता ।
भेणें सांडोनियां सीता । होय पळतां लंकानाथ ॥ १६ ॥
जटायूनें गांजिलें वनी । वेगीं धांवा पावा कोणी ।
ऐसा रावण आक्रंदोनी । सीता सांडोनि पळाला ॥ १७ ॥

सीता मुक्त झाल्यावर जटायूचे तिला अभयवचन :

तंव जटायु म्हणे लंकानाथा । जरी तुवां सांडिली सीता ।
तरी तुज न मारीं सर्वथा । जिवदान तुज दिधलें ॥ १८ ॥
रावणापासोनि जानकी । सुटोनि जाली अति सुखी ।
जटायु दाटुगा तिहीं लोकीं । केवळ पक्षी म्हणों नये ॥ १९ ॥
सीताहरण महापाप्यासी । उपडोनि दाढ्या मिशांसी ।
प्रायश्चित दिधलें रावणासी । जटाय ऋषि धर्मात्मा ॥ २० ॥

स्वर्गस्थ देवांना चिंता :

जटायु सोडवितां सीतेसी । तंव स्वर्गी हडबड देवांसी ।
बंधनिर्मुक्त नव्हे आम्हांसी । सीता लंकेसी न वचतां ॥ २१ ॥

रावणाने परत येऊन जटायूला द्वंद्वंयुद्धाचे आव्हान दिले, पुन्हा रावणाचा पराजयः

ऐसें देवांचें मनोगत । तंव रावण जाला सावचित्त ।
मग होवोनियां निजयुद्धार्थ । पाचारित जटायूसी ॥ २२ ॥
सीता होती मजपासीं । तेणें त्वां केलें कासाविसी ।
आतां युद्ध सावकासीं । पुरुषार्थेसीं करुं दोघे ॥ २३ ॥
गुंफेसीं नसतां श्रीरामलक्ष्मण । शून्य मंदिरीं रिघे श्वान ।
तेंवी तुंवा सीता चोरुन । पलायमान भयभीत ॥ २४ ॥
तुज कैचे दांदुलेपण । वेगीं पळसी रामाभेण ।
मजसीं करुं पाहसी रण । तरी आंगवण पाहों तुझी ॥ २५ ॥

तर्योर्महति संग्रामें बभूवातुलविक्रमः ।
राक्ष्सांना च मुख्यस्य पक्षिणां प्रवरस्य च ॥२०॥

दहा शिरें वीस भूजा । राक्षसांचा मुख्य राजा ।
पक्षी पावला युद्धा पैजा । बळसमाजां वरिष्ठ ॥ २६ ॥
रावणाचें शस्त्र शर । पूर्वी जटायूनें केलें चूर ।
आतां निजांगें दशशिर । मुष्टिप्रहार हाणों धांवे ॥ २७ ॥
ऐसा अति क्रोधें दशशिर । बळें हाणिता करप्रहार ।
तंव नखें विदारिला कर । वेगें दुर्धर जटायु ॥ २८ ॥
रागें हाणितां दृढ लात । तंव चंचुघातें करोति घात ।
रावण केला अस्ताव्यस्त । मग लंकानाथ गजबजिला ॥ २९ ॥
तळपोनियां गगनीं भरे । झडपा हाणोनी दाही शिरें ।
मस्तक भेदी चंचुचक्रें । मुखें नखाग्रें विदारी ॥ ३० ॥
नखीं पांखी चंचुधारें । रावणा लागलें घायवारें ।
धाकें धाकें जिकडे सरे । तिकडे नखाग्रें मारिजे ॥ ३१ ॥
जटायुपक्षांचा आघात । रावण उडविला नभाआंत ।
गगनीं भोवंडोनि आवर्त । पाडिला मूर्च्छित अधोमुख ॥ ३२ ॥
येथोनि पुरे पुरे रण । रावण दांतीं धरी तृण ।
अकाली ओढवलें मरण । जटायु प्राणघातक ॥ ३३ ॥
मी म्हणें हें पाखरुं । परी हा धीर वीर महाशूरु ।
विसां बुजांचा केला चूरु । अति दुर्धरु जटायु ॥ ३४ ॥
जटायुनें लाविली सीक । दाही मुखेसीं विमुख ।
रावण पाडिला अधोमुख । जीवा संकट मांडलें ॥ ३५ ॥
न चलेबळाची आंगवण । परम दुःखी जाला रावण ।
मग करावया जटायुछळण । कपट पूर्ण मांडिलें ॥ ३६ ॥
मग रावण म्हणे लवला हीं । दोघे झुंजों उसिणाघायीं ।
तंव जटायु म्हणे तुज शक्तीच नाहीं । उसिणें कैं फेडशील ॥ ३७ ॥
घाय आणितां ( हाणिता ) सवर्म । न पळे न ढळे तो योद्धा परम ।
तूं नेणसी युद्धधर्म । व्यर्थ आक्रम बळाचा ॥ ३८ ॥

रावणाचे कपटी वर्तन. परस्परांचे मरण कशात आहे ते सांगावे, जटायूला रामांची शपथ :

घालोनि श्रीरामाची आण । जटायूसी पुसे रावण ।
तुझें कोणें ठायी मरण । सत्य संपूर्ण मज सांगें ॥ ३९ ॥
पडलिया अति आकांती । ओढवल्याही अंतगती ।
हरिभक्त असत्य न बोलती । जाण निश्चिती पक्षिनाथ ॥ ४० ॥
भावार्थ दावोनि उदंड । मधुर शब्दीं असत्य लंड ।
त्याचें मुख नरकुंड ( नरककुंड ) । काळें तोड तयाचें ॥ ४१ ॥
जटायु म्हणे रावणासी । जरी तूं निजमृत्यु सांगसी ।
तरी मी सांगेन तुजपासीं । येरयेरांसी नेम जाला ॥ ४२ ॥

त्याप्रमाणे जटायू खरे व रावण खोटे सांगतो :

घातली श्रीरामाची आण । तरी असत्य न बोलें गेलिया प्राण ।
दोहीं पाखीं माझें मरण । सत्य संपूर्ण वदे पक्षी ॥ ४३ ॥
रावण छळवादी पातकी । मृत्यु सांगे ।
वामांगुष्ठनखीं । जटायु सांगे दोही पाखीं । युद्धसात्विकी सत्यवादी ॥ ४४ ॥

जटायूच्या मर्मावर रावणाचा आघात, अवंढापट्टा येथे रावणाचा अंगठा पडतोः

जटायु तळपोनियां देख । छेदिलें वामागुष्ठनख ।
तव हातातहीं आले पांख । येरें निःशंक उपडिले ॥४५ ॥
रावणाचा छदिला आगोठा । तेथे जाला अवंढापट्टा ।
त्रिंबकीच्या निकट घाटा । अवंढापट्टा प्रसिद्ध ॥ ४६ ॥
जटायूस येतां मरण । पडल्या करीत श्रीरामस्मरण ।
नष्ट रावणें केलें छळण । कुळ निर्दळण देखसी ॥ ४७ ॥
छळवादी अति दुष्ट । परम पापी क्रियानष्ट ।
परदारी अति पापिष्ट । भोगिसी कष्ट छळणाचें ॥ ४८ ॥
छळणाच्या कपटनिष्ठीं । जटायु मूर्च्छित पडला सृष्टीं ।
श्रीरामाच्या निजभेटीं । आत्मा कंठीं धरिलासे ॥ ४९ ॥
मुखीं श्रीरामनामस्मरण । चित्तीं श्रीरामचिंतन ।
नयनीं श्रीरामावलोकन । हृदयीं ध्यान श्रीरामाचें ॥ १५० ॥

जटायू श्रीरामदर्शनाची वाट पाहात नमस्कार करीत राहातो :

श्रीरामरुप देखे पाषाण । श्रीरामरुप देखे तृण ।
वृक्ष वल्ली वन उपवन । देखें संपूर्ण श्रीराम ॥ ५१ ॥
श्रीरामकाजीं वेंचितां प्राण । श्रीराम कृपाळु आपण ।
सर्वरुपें स्वयें संपूर्ण । आला वोरसोन भेटीसी ॥ ५२ ॥
जटायूचें निजपोटीं । अंतीं श्रीराम देखावा दृष्टीं ।
देह पडतां स्वयें सृष्टीं । आला भेटी निजभक्ता ॥ ५३ ॥
रावण नव्हे माझा वैरी । तो तंव परमार्था साह्यकारी ।
श्रीराम भेटविला चराचरीं । सुखसागरीं सुखी केलें ॥ ५४ ॥
निजभक्तांचें मनोगत । पुरवूं जाणे श्रीरघुनाथ ।
जटायु जन्ममरणातीत । आनंदभरित सुखी केला ॥ ५५ ॥
एकाजनार्दना शरण । जटायु छळणें वधी रावण ।
पुनरपि तो सीताहरण । करील आपण तें ऐका ॥ १५६ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे अरण्यकांडे एकाकारटीकायां
जटायुच्छनवधो नाम सप्तदशोध्यायः ॥ १७ ॥
॥ ओव्या १५६ ॥ श्लोक २० ॥ एवं १७६ ॥