अध्याय 4
वाली सुग्रीवाच्या वैराची मूळ कथा
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
दोघा बंधूंच्या कलहाच्या कारणासंबंधी श्रीरामांचा प्रश्न :
निर्दळोनियां वाळीसी । सदार राज्य सुग्रीवासी ।
द्यावया श्रीराम उल्लासी । मित्रकार्यासी अवंचक ॥१॥
स्वकार्य सांडोनियां मागें । मित्र-मित्रकार्यार्थ लगवेगें ।
श्रीरघुनाथ धांवे अंगें । साह्य सर्वेस्वें शरणागता ॥२॥
श्रीराम विचार करी शुद्धु । हे तंव दोघे सखे बंधु ।
कां पडला द्वेषसंबंधु । द्वेषसंबंधु पुसत ॥३॥
किंनिमित्तं महद्वैरं श्रोतुमिच्छामि तत्वतः ।
अनंतरं वधिष्यामि संप्रधार्य बलाबलम् ॥१॥
तुम्ही दोघे बंधु सहोदर । तुम्हां दोघांत कां पडिलें वैर ।
तेंही अतिशयेंसी दुर्धर । येरयेरां घातक ॥४॥
सुग्रीवाकडून निवेदन :
या वैराचें मूळ कारण । समूळ सांगावें संपूर्ण ।
ऐकोनिया श्रीरामभाषण । सांगे आपण सुग्रीव ॥५॥
लोभाचा प्रभाव :
पितापुत्रां सख्य सहोदरां । वैरासी मूळ द्रव्य दारा ।
सुहृद पेटती वैराकारा । द्रव्यदारदेहलोभें ॥६॥
द्रव्य दारा या लोभापासीं । अहंकार सदा मुसमुसी ।
तो वैर पाडी सहृदांसी । आह्मां दोघांसी वैर लोभें ॥७॥
कैसा लोभ वैर कवण । त्याही वैराचें निजकारण ।
समूळ सांगेन लक्षण । सावधान अवधारीं ॥८॥
श्रूयतां राम तेनाहं राज्यात्स्वादवरोपितः ।
परुषाणि संश्राव्य निर्धूतोऽस्मि बलीयसा ॥२॥
पिताजींच्या निधनानंतर बंधूंचे सख्य :
आमच्या वैराची थोरी । श्रीराम सावध अवधारीं ।
स्रीराज्यलोभाचारीं । वाळीनें बाहेरीं घातलें मज ॥९॥
पिता राज्यीं असतां जाण । वाळीस यौवराज्य संपूर्ण ।
मज दिधलें सैन्याधिपतिपण । समसमान एकात्मता ॥१०॥
पिता निमालियावरी जाण । समस्त मिळोनि प्रधान ।
ज्येष्ठा वाळीस राज्यासन । यौवराज्य पूर्ण मज दिधलें ॥११॥
शांत दांत सुबुद्धि प्रबळ । सेना राखों जाणे अविकळ ।
तो सेनानी केला नीळ । सबळ दळ त्याचेनि ॥१२॥
दोघे बंधू एकात्मता । येरयेरां अवंचकता ।
उदक पिणें नाहीं तत्वतां । भोगभोन्नता मग कैंची ॥१३॥
एकत्र आसन शयन । दोघा एकत्र भोजन ।
येरयेरांलागीं वेंचिती प्राण । दोघां संपूर्ण एकात्मता ॥१४॥
ऐसे दोघे एकात्मता । अविकल्प राज्य करितां ।
पुढें आली विक्षेपता । तेही श्रीरघुनाथा अवधारीं ॥१५॥
मायावी नाम तेजस्वी पूर्वजो दुंदुभेः सुतः ।
तेन तस्य महद्वैरं वालिनः स्वीकृतं पुरा ॥३॥
स तु सुप्ते जने रात्रौ किष्किन्धाद्वारमागतः ।
नर्दति स्म सुसंरब्धो वालिनं चाह्वद्रणे ॥४॥
दुंदुभीचा पुत्र मयासुर याचें युद्धास आव्हान :
दुदुंभीचा ज्येष्ठ कुमर । मयनामा महासुर ।
पितृवैरें वैराकार । वाळी वानर वधूं इच्छी ॥१६॥
विभांडूनिया किष्किंधा गड । वाळी मारीन हे मानसी होड ।
घेईन दुंदुभीचा सूड । गर्वारूढ होवोनि आला ॥१७॥
किष्किंधेच्या महाद्वारीं । मय आला मध्यरात्रीं ।
गर्जत घर्घरस्वरीं । गिरिदरी दुमदुमिल्या ॥१८॥
ऐकोनि त्याचा गिरागज । भयभीत झाले सबळ वानर ।
अवघें कांपती थरथर । रहावया धीर न धरवे ॥१९॥
वानरांचा राजा वाळी । येथें कोण आहे महाबळी ।
मजसीं युद्ध करावया रणफळीं । वीरश्रीनें येथें यावें ॥२०॥
वाली व मी बाहेर आलो :
असुरासीं युद्धा निघतां वाळी । बंधुस्नेहाच्या कळवळीं ।
मीही आलों ते काळीं । बंधूजवळी साह्यार्थ ॥२१॥
दुंदुभि मारिला माझा पिता । त्याचा सूड मी घेईन आतां ।
ऐसें वाळीनें ऐकतां । सकोपता चालिला ॥२२॥
वाळीनें देतांचि आरोळी । दुंदुभिपुत्राची बैसली टाळी ।
आम्हां दोघां देखतां बळीं । धाकें तत्काळीं पळाला ॥२३॥
मयासुर पळून गुहेत गेला :
मी एकला हे दोघे जण । घाये माझा घेतील प्राण ।
येणें भयें तो आपण । पलायमान भयभीत ॥२४॥
वाळी म्हणे यासी न मारितां । नगरा न वेचें मी रिता ।
त्याच्या करावया जीवघाता । पाठी लागतां सोडीना ॥२५॥
किष्किंधा सांडोनि दुरी । मय पळे गिरिकंदरीं ।
येवोनियां निजविवरीं । बिलद्वारीं प्रवेशला ॥२६॥
स तृणैरावृतं दुर्गं धरण्यां विवरं महत् ।
प्रविवेशासुरो वेगादावामासाद्य विष्ठितौ ॥५॥
मामुवाच तदा वाली वचनं क्षुभितेंद्रियः ।
इह त्वं तिष्ठ सुग्रीव बिलद्वारि समाहितः ॥६॥
यावदत्र प्रविश्याहं निहन्मि समरे रिपुम् ।
स्थापयित्वा त मां तत्र प्रविवेश बिलं ततः ॥७॥
सुग्रीवाला दारावरच राहण्यास सांगून वाली स्वतः गेला :
अतर्क्य बिळ तें सर्वांसी । असुर त्या बिळीं बिळवासी ।
आम्हीं अंधारीं लक्षोनि त्यासीं । बिळापासीं दोघे आलों ॥२७॥
अंधाराचे निजनेटी । दैत्य रिघे बिळ संकटीं ।
आम्ही त्याची न सोडूं पाठी । बिळानिकटीं आलों दोघे ॥२८॥
वाळी मजला आज्ञा करी । सावध राहें बिलद्वारीं ।
मी रिघेन बिळाभीतरी । जंव यें वैरी मारोनीं ॥२९॥
मी म्हणें सवें येईन साह्यासी । वाळी म्हणे त्या मयकासी ।
मारावया काय साह्य येंसी । बैस द्वारासीं सावधान ॥३०॥
बिळी प्रवेशतां वाळी । दुंदुभीसुतें नेला पातळीं ।
तेथें दानव कोट्यनुकोटी बळी । युद्धवंदळी मांडिली ॥३१॥
युद्ध देखोनि दारुण । वाळी जाला सावधान ।
वरद विजयमाला पूर्ण । पाहे आपण ते काळीं ॥३२॥
अथ वाली सुसंक्रुद्धो मालां गुह्य च कांचनीम् ।
पूर्वदत्तां महेंद्रेण या युद्धाय प्रतिश्रुता ॥८॥
कश्यपविजयवरदमाळा । इंद्रें दिधली कृपानुमेळां ।
वाळी सांभाळोनि गळां । मग परदळीं मिसळला ॥३३॥
कंठी माळा आल्या देख । अवश्य वैरी होती विमुख ।
युद्धा आलिया सन्मुख । रणीं निःशेष निमावे ॥३४॥
निराहारीं निरुदकीं । युद्ध करितां वर्षे अनेकीं ।
बाधो न शके तहान भुकीं । श्रमबाधा नव्हे वरदें ॥३५॥
वरदमाळा असतां जवळ । वाली वानर आतुर्बळी ।
मर्दोनि दानवांची फळी । रणकल्लोळीं गर्जत ॥३६॥
सप्रधान ससैन्य सकुमर । दानव मारिले अपार ।
मुख्य धुरा थोर थोर । वाहती पूर रुधिराचे ॥३७॥
दानव मारिले अमित । उरले ते पळाले समस्त ।
दुंदुभिपुत्र येवोनि तेथ । युद्ध करी वाळीसीं ॥३८॥
निरुदक निराहारेंसी । अविश्रम रण एकवीसमासीं ।
त्याचेनि हातें मृत्यु पावसी । मयासुरासी शिववरद ॥३९॥
वाळी मारावया निभ्रांत । वरदबळें युद्ध करित ।
वाळी निजमाळें समर्थ । श्रमरहित रणयोद्धा ॥४०॥
पंधरा मास रण दुर्धर । मयासुरासीं सुटलें रुधिर ।
अशुद्धें पूर्ण जालें विवर । बाहेरी पूरप्रवाह ॥४१॥
तस्य प्रविष्टस्य बिलं साग्रः संवत्सरो गतः ।
स्थितस्य मे बिलद्वारि स कालो व्यत्यवर्तत ॥९॥
नर्दतामसुराणां च ध्वनिर्मे श्रोत्रमागतः ।
निरस्तय च संग्रामे क्रोशतोऽपि स्वनो महान् ॥१०॥
अथ दीर्घस्य कालस्य बिलद्वाराद्विनिःसूतम् ।
सफेनं रुधिरं द्दष्ट्वा ततोऽहं भृशदुःखितः ॥११॥
पंधरा महिने मी बाहेरच वाट पहात बसलो :
मी बैसलों बिलद्वारीं । काय वर्तलें भीतरीं ।
तें मी नेणेंचि बाहेरी । सवा वर्षवरी तिष्ठलों ॥४२॥
नंतर आतून आरोळ्या ऐकू आल्या व रक्ताचा प्रवाह आला :
तंव वीरांचा रणक्रोध । भीमावेशें गर्जत शब्द ।
नोकूनपणाचें सुबद्ध । अति विरुद्ध ऐकिलें ॥४३॥
राहें साहें वीर शूर । पळों नको धरीं धीर ।
घाय वाजती निष्ठुर । घायें वीर हुंबती ॥४४॥
एक रडत एक पडत । एक कण्हत एक कुंथत ।
ऐसे वीर विकळित । म्यां हें समस्त ऐकलें ॥४५॥
ऐसे शब्द जंव ऐकत । तंव बिळाआंतून रक्त ।
निघालें अति प्रवाहित । सफेन उतत बिलद्वारीं ॥४६॥
बिलद्वारीं देखोनि रक्त । वाळी मारिला युद्धांत ।
तेणें मी जालों दुःखाभिभूत । पडिलों मूर्च्छित आक्रंदें ॥४७॥
वाली ठार झाला असावा असे वाटून त्याच्या सूडासाठी निघणार होतो :
वाळीऐसे बंधुनिधान । रणीं पडिलें आक्रंदोन ।
त्याचा सूड घ्यावया जाण । बिळीं आपण रिघो पाहें ॥४८॥
पाहोनि निजभुजांची वास । दृढ घालोनियां कास ।
बिळीं करितांचि प्रवेश । ऋषि लोमश मज वारी ॥४९॥
तोच लोमशऋषींनी येऊन नगरीवर गंधर्वानी आक्रमण केल्याचे सांगितले :
किष्किंधा राहिली बहु दुरी । दुंदुभिपुत्र बिलप्रदेशांतरी ।
आम्ही दोघे गुंतलो विवरीं । राजा नगरीं कोणी नाहीं ॥५०॥
ऐसें जाणोनि किष्किंधापुर । राज्य घ्यावया सत्वर ।
वेगीं आले विद्याधर । तिहीं नगर वेढिलें ॥५१॥
हाहाभूत देखोनि नगरी । मजपासीं प्रधान चारी ।
आले अति त्वरेंकरी । रिघता विवरीं तिहीं वारलें ॥५२॥
त्या गुहेतून राक्षस बाहेर येऊ नयेत म्हणून मी शिळेने तोंड बंद केले :
विवरीं वाळीचा जाला अंत । तुझाही येथें करील घात ।
हातींचे राज्य जाईल व्यर्थ । ऐसा अनर्थ नको करूं ॥५३॥
वाळी मारिला निश्चित । सफेन रुधिर वाहे येथ ।
तुवां रिघों नये तेथ । ऋषी समस्त वारिती ॥५४॥
वैरी निर्दाळोनि समस्त । नगर राखोनि पैं स्वस्थ ।
मग वाळी बंधूच्या शुद्ध्यर्थ। रिघों विवरांत समस्तही ॥५५॥
अहं त्ववगतो बुद्ध्या चिन्हैस्तैर्भ्रातरं हतम् ।
दुःखार्तश्चोदकं दत्वा किष्किंधामागतस्ततः ॥१२॥
गूहमानस्य मे तत्वं यत्नतो मंत्रिभिः श्रुतम् ।
संमैतेर्मुनिभिः सर्वैस्ततोऽहमभिषेचितः ॥१३॥
वालीला अखेर तिलांजलीही दिली :
बिलद्वारी वाहतां रक्त । असुरीं वाळी मारिला तेथ ।
म्यांही मानोनि निश्चित । अति दुःखावर्ते ऊठिलों ॥५६॥
स्नान करोनियां जळीं । बंधु उद्धारावया वाळी ।
म्यां दिधली तिळांजळी । मंतमेळीं ऋषिउक्त ॥५७॥
नंतर किष्किंधेला येऊन आक्रमक शत्रूंचा पाडाव केला :
ऐकोनि निजपुराचा बाध । स्त्रीबाळकां अति निर्बंध ।
तेणें मज आला क्रोध । नगररोध छेदावया ॥५८॥
नगर वेढिलें विद्याधरीं । असुर आलिया विवरद्वारीं ।
युद्ध करितां दोहींपरी । संकट भारी मांडेल ॥५९॥
ऐसें सांगतां ऋषीश्वरीं । म्यां उचलोनि प्रचंड गिरी ।
दृढ ठेविला विवरद्वारीं । वैरी बाहेरी न निघावया ॥६०॥
मग करोनि उड्डाण । किष्किंधेसी येवोनि जाण ।
केलें विद्याधरांचें कंदन । चौघे प्रधान न येतांचि ॥६१॥
माझ्या उड्डानाच्यानि वेगें । प्रधान राहिले पैं मागें ।
म्यां येवोनि लागवेगें । वैरी निजांगें निर्दाळिले ॥६२॥
माझें ऐकता गर्जन । वीरीं उभ्यां सांडिले प्राण ।
अवघे झाले कंपायमान । जीव घेवोन पळाले ॥६३॥
स्रिया बाळें केलीं निर्मुक्त । नगर सुखी करोनि समस्त ।
माझा देखोनि पुरुषार्थ । संतोषत ऋषिवर्य ॥६४॥
येवोनि जंव पाहती प्रधान । तंव म्यां केलें अरिमर्दन ।
तेणें हर्षें चौघे जण । संतोषोन सुखी जाले ॥६५॥
राज्यं प्रशासतस्तस्य न्यायतो मम राघव ।
आगजाम रिपुं हत्वा वाली तमसुरोत्तमम् ॥१४॥
वालीचा वध झाला असे समजून सुग्रीवाला राज्याभिषेकही झाला :
माझा पुरुषार्थ देखोन । चौघे प्रधान ऋषी सज्ञान ।
किष्किंधेचें राज्य संपूर्ण । अभिषेचन मज केलें ॥६६॥
पूर्ण षण्मासपर्यंत । प्रजा सुखी केली समस्त ।
राज्य करोनि धर्मयुक्त । तंव शक्रसुत वाळी आला ॥६७॥
नंतर मयासुराला ठार करुन वाली किष्किंधेत हजर झाला :
मर्दोनियां मयासुर । त्यांचे घेवोनियां शिर ।
उघडोनियां विवरद्वार । केला भुभुःकार वाळीनें ॥६८॥
ऐकोनि वाळीचें गर्जन । मज उल्लास झाला पूर्ण ।
जेंवी प्रेताचा परते प्राण । तेंवी आगमन वाळीचें ॥७०॥
पतिव्रतें प्रियदर्शन । साधक पावे ब्रह्यज्ञान ।
तेंवी वाळीचें आगमन । सुखसंपन्न मज सुग्रीवा ॥७१॥
ऐकोनि वाळीचें आगमन । सुखी जाले ऋषी प्रधान ।
सुखी नगर नागरिक जन । सुखसंपन्न स्रिया बाळें ॥७२॥
उभवोनियां गुडिया मखरें । ढोल निशाण वाद्यगजरें ।
अवघे आले पैं सामोरे । जयजयकारें गर्जती ॥७३॥
म्यां सुग्रीवें येवोनि आपण । दीर्घ घालोनि लोटांगण ।
मस्तकीं वंदोनियां चरण । आलिंगन देऊं गेलों ॥७४॥
मज देखोनि सन्मुख । वाळी रागें जाला विमुख ।
माझें न पाहेचि मुख । परम दुःख मानसीं ॥७५॥
अभिषिक्तं तुं मां द्दष्ट्वा क्रोधसंरक्तलोचनः ।
मदीयान्मंत्रीणो परुषं वाक्यमुक्तवान् ॥१५॥
सर्वांना संतोष व माझ्यावर वालीचा क्रोध :
मज केलें राज्याभिषिच्त्रन । तेणें वाळी क्रोधायमान ।
अभिषेक करवित जे प्रधान । त्यांतेंही आपण निग्रहूं पाहे ॥७६॥
मग हात जोडोनि म्यां पुढतीं । वाळीप्रती केली विनती ।
माझा अपराध कोणे अर्थी । त्वां कां चित्तीं कोप धरिला ॥७७॥
आम्ही तुजवीण अनाथ । तूं तंव आमचा जेष्ठ भ्रात ।
तुझेनि आम्ही सदा सनाथ । आम्ही कृतार्थ तुझेनि ॥७८॥
भाग्यें जिंतोनि शत्रूसि । सभाग्य भाग्यें येथें आलासी ।
परम भाग्यें भेटलासी । ऐसें वाळीसी विनविलें ॥७९॥
माझ्यावरील आरोप :
ऐकोनियां माझें वचन । वाळी क्रोधें आरक्तनयन ।
कठिण बोलिला दारूण । सुहृदपण सांडोनी ॥८०॥
तूं बंधु नव्हेस माजा वैरी । वैर केलें बहुता परी ।
तुझ्या वैराची पैं थोरी । परोपरी छळवादी ॥८१॥
मी रिघालों विवरांत । त्वां द्वारीं रहावें सावचित ।
तेथें तुवां केलें विपरीत । द्वारीं पर्वत स्थापिला ॥८२॥
सुग्रीवा तुझें मनोगत । अदुरीं माझा करावा घात ।
स्वयें भोगावें राज्य समस्त । बिळ तदर्थ बूजिलें ॥८३॥
बिळीं रिघावे मज शुद्ध्यर्थ । तें त्वां सांडोनियां समस्त ।
तुम्ही धरिला राज्यभोगस्वार्थ । सुहृदत्व तुजमागीं कैंचें ॥८४॥
स्वयें राज्य भोगावें समस्त । म्यां मरावें हें तुझ्या पोटांत ।
बिल बुजिलें तदर्थ । ? ? ? ? ? ? ॥ ८५ ॥
म्यां रिघोनि बिळांत । दानव मारिले समस्त ।
सैन्या करितां घात । रक्त विवरीं प्रवाहे ॥८६॥
वीरीं करितां महामारी । अशुद्ध उलथलें विवरीं ।
तो प्रवाहो बिलद्वारीं । दानवां बोहरी पैं करितां ॥८७॥
वरद मायावी असुरांसी । निराहारी निरुदकासीं ।
युद्ध करितां एकवीस मासीं । मयावीरासी तैं अंत ॥८८॥
सूदयित्वा तु तं शत्रुं मायाविनमहं तदा ।
निष्कामन्नैव पश्यामि बिलस्य पिहितं मुखम ॥१६॥
मम विक्रोशतश्चैव सुग्रीवेति पुनः पुनः ।
यदा प्रतिवचो नास्ति तदाहं भृशदुःखितः ॥१७॥
गुहेच्या तोडांवर शिळा ठेवल्याबद्दल राग :
मारोनियां मयासुरासी । आणि मज बाहेरी यावयासी ।
मार्ग न दिसे कासाविसी । तुवां बिळेंसीं बूजिलें ॥८९॥
भोंवता भोंवें विवरांत । मार्ग मज नोहे प्राप्त ।
गुप्त दानव करिती घात । अंधारांत अति धाकें ॥९०॥
मग विचार केला मानसीं । सुग्रीव आहे दारापासीं ।
आपण बोलावितां त्यासी । येवोनि वेगेंसीं काढील ॥९१॥
सुग्रीव मेला असें समजून वालीचा शोक :
सुग्रीव सुग्रीव स्वयें बोलतां । पुनः पुनः हाका देतां ।
प्रतिवचन नायकतां । दुःखावस्था मज जाली ॥९२॥
एकला द्वारीं बैसला होता । दानवीं ठकोनि केलें घाता ।
तो कळिकाळातें नाटोंपता । छळतां छळतां मारिला ॥९३॥
सुग्रीव मारिला तत्वतां । बंधुस्नेहें परम व्यथा ।
रडत रडत चडफडितां । दुःखावस्था मज जाली ॥९४॥
आम्हा दोघां सख्यसंबंधु । अणुमात्र नाहीं विरोधु ।
सुग्रीव अंतरला बंधु । दुःखसिंधु मज जाला ॥९५॥
केउता गेलासि रे सुग्रीवा । तूं तंव माझा निजविसांवा ।
दैत्य मारोनि आलों दे खेवा । बंधुगौरवा विसरलासी ॥९६॥
उल्लंघोनि मम आज्ञेसी । सुग्रीव नवचे लघुशंकेसी ।
दानवी निर्दाळिलें त्यासी । उकसाबुकसी स्फुंदत ॥९७॥
सुग्रीव वानर युवराजा । जीव प्राण आत्मा माझा ।
दैत्यीं मारिला युद्धी समजा । कोणे काजा मी उरलों ॥९८॥
जरी मजसवें आला असता । तरी सुग्रीव माझा वांचता ।
विवरद्वारीं म्यां ठेवितां । स्वयें बंधुघाता म्यां केलें ॥९९॥
तुझा बाहेर केला घात । मज कोंडिलें विवरांत ।
माझा करावया उद्धरणार्थ । येई धांवत बंधुराया ॥१००॥
आम्ही तुम्ही वेगळे नव्हो कधीं । मज कां आठवली कुबुद्धी ।
तुज ठेवोनि द्वार विंधी । मी कां युद्धीं रिघालों ॥१०१॥
मज लागला बहुत काळ । मजविण न घेसी जळफळ ।
तेणें तुज भरोनि तरळ । प्राण तत्काळ सांडिला ॥१०२॥
ऐसा सुग्रीवालागीं विलपत । अंधारीं भोंवों विवरांत ।
दाटिला विवरद्वारीं पर्वत । देखिले तेथ रविच्छिद्र ॥१०३॥
उपलेनास्मिसंरुद्धो राज्यं मृगयतात्मनः ।
सुग्रीवेण नृशंसेन विस्मृत्य भ्रातृसौहृदम् ॥१८॥
एवमुक्वा तु मां तत्र वाससैकेन वानरः ।
तदा निर्वासायामास वाली विगतसाध्वसंः ॥१९॥
वालीचा सुग्रीवावर दोषारोप :
सुग्रीवाचे निजहृद्गत । मज कोंडोनि मारावें विवरांता ।
बिलद्वारीं घातला पर्वत । राज्य समस्त भोगावया ॥१०४॥
पर्वत असतां बिलद्वारीं । रवि देखिला छिद्रांतरीं ।
घायें पर्वत करुनि दुरी । बिळाबाहेरी मी आलों ॥१०५॥
सुग्रीव बैसविलासे एथ । त्याचा काय झाला वृत्तांत ।
ऐसें जंव मी विचारित । तंव विपरित देखिलें ॥१०६॥
सुग्रीवें किष्किंधेचा राजा । होवोनि भोगी माझ्या भाजा ।
शत्रुत्व जोडिलें अोजा । वैरी माजा हा एक ॥१०७॥
सुग्रीवालागीं मी तळमळित । सुग्रीव माझाचि करी घात ।
ऐसें केलें पैं विपरीत । राज्यभोगार्थ सुग्रीव ॥१०८॥
विवरीं माझी सांडोनि शुद्धि । सांडोनियां सुहृदबुद्धी ।
सुग्रीव बैसला राज्यपदीं । दुष्ट दुर्बुद्धि दुरात्मा ॥१०९॥
वालीची पत्नी तारा ही वस्तुस्थिती सांगून सुग्रीव निर्दोषी आहे असे आवर्जून सांगते :
तारा सांगे वाळीपासीं । बुडतां किष्किंधेच्या राज्यासी ।
सुग्रीवें राखिलें प्रतापेंसी । सत्य तुम्हांपांसी सांगतें ॥११०॥
बिळीं गुंतलेती दोघे वीर । मागें शुन्य राज्य नगर ।
तें राज्य घ्यावया सत्वर । वेढिलें पुर विद्याधरीं ॥१११॥
विरोधोनि नगरनागरां । निरोधिलें स्रियां कुमरां ।
आकांत देखोनि समग्रा । ऋषीश्वरां परम चिंता ॥ ११२॥
सेनापति वानरसैन्य । त्यांसी सर्वथा नाहीं ज्ञान ।
पूर्वीचे चौघे प्रधान । आले धावोंन तुम्हांपांसी ॥११३॥
तुम्हा दोघां जणा आणावयार्थ । विवरा आले ऋषी समस्त ।
तंव विवरीं रुधिर देखिलें वाहत । सुग्रीव रडत देखिला ॥११४॥
रुधिर देखोनि सफेन । सुग्रीव स्वयें कांस घालून ।
अवघ्यांस द्वारीं बैसवून । शुद्धीलागोनी निघाला ॥११५॥
सुग्रीव ऋषीषासीं सांगत । वाळी मारिला प्रवाहे रक्त ।
मीही जातों त्याचे शुद्धर्थ । मंत्री हो समस्त पुरी राखा ॥११६॥
ऐसेपरी सांगोनि ऋषि समस्तां । सुग्रीव बिळीं प्रवेशतां ।
ऋषीश्वरीं धरिला त्वरिता । पूर्ववृत्तांता अवधारीं ॥११७॥
तुम्हांसि शोधावयालागोनि । प्रधान गेले वनोपवनीं ।
शून्य देखोनि राजधानी । आले धांवोनि गंधर्व ॥११८॥
तिहीं निरोधिलें नगर । आक्रंदती स्रिया कुमर ।
राज्य गेलें गेलें समग्र । ऋषी सत्वर सांगों आले ॥११९॥
वाळी निमाला रुधिरप्रवाहें । मेलियामागें मरों नये ।
ब्रह्मदत्त स्वराज्य आहे । तें आधीं संरक्षीं ॥१२०॥
स्वराज्य राखोनियां स्वस्थ । मग निघावें वालिशुद्ध्यर्थ ।
तोंवरी बिलद्वारीं घालीं पर्वत । ऋषि सांगत पूर्वसूचने ॥१२१॥
युद्ध करितां विद्याधरीं । विवरद्वारें येतील वैरी ।
संकट पडेल दोहींपरी । घाली बिलद्वारीं पर्वत ॥१२२॥
ऋषींचीं आज्ञा अति समर्थ । सुग्रीवें मानोनि निश्चित ।
घालोनि बिलद्वारीं पर्वत । आला युद्धार्थ महावीर ॥१२३॥
सुग्रीव वीर धीर जुंझार । विभांडोनियां विद्याधर ।
विजयी जाला एकांगवीर । जयजयकार ऋषी करिती ॥१२४॥
शून्या असों नये राजधानी । विचारोनि ऋषिप्रधानीं ।
सुग्रीवातें राहवूनी । अभिषिंचोनी बैसविला ॥१२५॥
स्वयें सुग्रीव राज्य न घेता । बलात्कारें बैसविलें माथां ।
यासीं कोपों नको आतां । क्षमा सर्वथा करा स्वामी ॥१२६॥
तारेचे सांगणे न ऐकता सुग्रीवाच्या घाताला प्रवृत्त होतो :
ऐकोनियां तारेचें वचन । वाळी बोले कोपायमान ।
यांचें तुज न कळे विंदान । वैरी संपूर्ण हा माझा ॥१२७॥
विभांडूनि वैरियासी । राज्यीं बैसविलें आपणासीं ।
माझा आठवूं का नव्हे यासी । पूर्ण द्वेषी हा माझा ॥१२८॥
माजा सांडोनि परामर्ष । सुखें राज्य करी षण्मास ।
माझे मरणीं यासी हर्ष । म्हणोनी विवरास बुजविलें ॥१२९॥
राज्य राखोनि स्वस्थता । बिळींचा पर्वत जरी काढिता ।
तरी मानितों अतिसख्यता । वैरी सर्वथा हा माझा ॥१३०॥
ऐसें बोलोनि सक्रोधता । करितां सुग्रीवाच्या घाता ।
तारेनें धांवोनि धरिलें हाता । स्वबंधुघाता करूं नये ॥१३१॥
तारेची मध्यस्थी व सुग्रीवाचा राजधानीचा त्याग व प्रयाण :
सुषेणाची निजदुहिता । तारा वाळीची पतिव्रता ।
रुमा सुग्रीवाचा कांता । हिरोन घेता होय वाळी ॥१३२॥
तारेचेनि बोलें जाण । राखिला सुग्रीवाचा प्राण ।
हिरोन दारा वस्र भूषण । नगरनिर्याण निवस्र केलें ॥१३३॥
लावोनियां पैं लंगोटीं । सुग्रीव दवडिला गिरिकपाटी ।
सक्रोध प्रधानां पाहतां दृष्टीं । तेही उठाउठीं पळाले ॥१३४॥
प्रधानीं त्यासी केले अभिषिंचन । कोपें दंडूं पाहे जाण ।
तेणें भयें पलायमान । आले पळोन मजपासीं ॥३५॥
सख्या बंधूं दोघां आम्हां । विरोध पडावयाची सीमा ।
सांगीतली श्रीरामा । उभय धर्मा यथार्थ ॥१३६॥
सुग्रीवाचे ते वृत्त ऐकून श्रीरामास अनुकंपा :
हृतयौवराज्य हृतयुवदारा । तेणें अति दुःखी मी श्रीरघुवीरा ।
अहोरात्र न लागे निद्रा । श्रीरामचंद्रा तुझी आण ॥३७॥
ऐसें सुग्रीवें सांगतां । कृपा आली श्रीरघुनाथा ।
वाळी वधीन मी आतां । ठेविला माथां पद्महस्त ॥३८॥
वालिसुग्रीवां विरोध । त्याचा जाला अनुवाद ।
एकाजनार्दनीं परम बोध । वालिवध निजमो ॥१३९॥
स्वस्ति श्रीभावार्थ रामायणे किष्किंधाकांडे एकाकारटीकायां
वालिसुग्रीवविरोघकथनं नाम चतुरोऽध्यायः ॥ ४ ॥
॥ ओंव्या १३९ ॥ श्लोक १९ ॥ एवं १५८ ॥