रामायण - अध्याय 4 - किष्किंधाकांड - 7 MB (Official) द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रामायण - अध्याय 4 - किष्किंधाकांड - 7

अध्याय 7

सुग्रीवराज्याभिषेक

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

वालीच्या निधनाने वानरांचा घबराट :

श्रीरामाच्या दृढबाणीं । घायें वाळी पडिला रणीं ।
लोळतां देखोनि धरणीं । वानरां पळणी मांडली ॥१॥

निहते वालिनि रणे रामेण परमात्मना ।
जग्मुस्ते वानराः सर्वे किष्किंधां भयविंह्वलाः ॥१॥
तारामूचुर्महाभागे हतो वाली रणाजिरे ।
अंगदं परिगृह्यार्थ मंत्रिणं परिनोदय ॥२॥
चतुर्द्वारकपाटादीन्बद्धा रक्षामहे पुरीम् ।
वानराणां तु राजानमंगदं कुरु भामिनि ॥३॥

श्रीरामाच्या बाणनेटीं । वाळी पडिला देखोनि दृष्टीं ।
वानरसेना भयसंकटीं । उठाउठीं पळाली ॥२॥
वाळी मारिला विंधोनि पूर्ण । सैन्यावरी सोडील बाण ।
अवघियांचा घेईल प्राण । पलायमान तेणें धाकें ॥३॥
श्रीरामबाण अति दुर्धर । घायें निवटिले त्रिशिरा खर ।
चवदा सहस्र निशाचर । बाणीं सत्वर निर्दळिलें ॥४॥
श्रीराम जीवें उरों नेदी । जो देखे तो समूळ वधी ।
तेणें भयें वानरमांदी । किष्किंधेमधीं पळाली ॥५॥
वानर चळचळां कांपत । अवघे आले किष्किंधेआंत ।
सांगती श्रीरामें केला वालिघात । तेणें आकांत नगरीं होय ॥६॥

तारेचा सहगमनाचा निश्चय :

तारेसी सांगती सुभट । दुर्धर दुर्ग करीं बळकट ।
चहूं द्वारीं देवोनि कपाट । देईं राज्यपट अंगदासी ॥७॥
ऐकोनि वाळीचें मरण । अंगदातें हातीं धरोन ।
तारा निघाली आपण । आक्रंदन करीताचि ॥८॥
वाळी निमालियापाठीं । कायसी अंगदाची गोष्टी ।
कैचें राज्य कैचीं सृष्टी । देह उठाउठी त्यागीन ॥९॥
कैचें घर कैचें दार । कैंचे दुर्ग कैचें नगर ।
कैचें प्रधान कैंचा परिवार । मरणतत्पर आजि मी ॥१०॥
हृदयी भेदिला श्रीरामबाण । वाळी निमाला निजप्राण ।
त्यातें तारा देखोन । मूर्च्छापन्न ते पडिली ॥११॥
सवेंचि आक्रंदोनि उठी । दुःखें मस्तक भूमीं आपटीं ।
गडबडत लोळे सृष्टीं । हृदय पिटी आक्रोशें ॥१२॥
केश सुटले मोकळे । अश्रुधारा स्रवती डोळे ।
दुःखें पुनः पुन्हा लोळे । आरंबळे अति दुःखें ॥१३॥
गेलें माझे वैभव पूर्ण । गेलें माझें भोगभुवन ।
सुखसौभाग्या पडिलें खान । निजनिधान अंतरलें ॥१४॥
अंतरलिया निजपती । प्रिया पावे उपहती ।
उपयोगा न ये ते धर्मार्थीं । शुभकार्यार्थीं अशुभ ॥१५॥
त्यजिलीं अलंकार आभरणें । त्यजिलीं सर्वांगभूषणें ।
गळसरी राखिली तिणें । पतीसीं करणें सहगमन ॥१६॥
सांगती वृद्ध वृद्ध वनिता । अंगदासारिखा पुत्र असतां ।
सकळ राज्य येतां हाता । देह कां व्यर्थ त्यागिसी ॥१७॥
भ्रताराच्या सुखासमान । पिता भ्राता सुत स्वजन ।
सर्वथा नव्हेति वो जाण । तेंही लक्षण अवधारीं ॥१८॥

मितं ददाति हि पिता मितं भ्राता मितंसुतः ।
अभितस्य हि दातारं भर्तारं का न पूजयेत् ॥४॥
शोणे उरसि लग्नेन जीवितप्राभहारिणा ।
परिप्वक्तं न शक्वोमि भुजाभ्यां त्वां हरीश्वर ॥५॥

वैधव्य आल्यानंतर सहगमन करणे हाच उत्तम मार्ग असे तारेचे उत्तर :

पिता जालिया समर्थ । कन्येसी देणें परिमित ।
बंधूसी जालिया राज्य प्राप्त । नियत अर्थ भगिनीसी ॥१९॥
पुत्र जालिया राज्यधर । मातेसी दे परिमित उपचार ।
सर्वसत्ता दे भ्रतार । त्यासीं मी शरीर केंवी वंचूं ॥२०॥
गजांत लक्ष्मी पतीलागूनी । त्याची स्री म्हणवी स्वामिनी ।
हें नव्हे पित्यापुत्रापासूनी । भ्रतारावांचूनी निंद्य जिंणें ॥२१॥
पतीसवें सहगमन । न करितां मागें येईल मरण ।
तें मरणाचि निंद्य जाण । अधःपतन रांडवा ॥२२॥
धर्मकर्मार्थविहिन । विधवा नारी प्रेतासमान ।
हें तंव श्रुतिशास्रवचन । सुख कोण वैधव्याचें ॥२३॥
पतीसवें होतां सती । इहलोकीं पुण्य परत्रीं मुक्तीं ।
एवढी सांडोनिया प्राप्ती । पुत्रराज्यार्थी सुख काय ॥२४॥
पतीसीं देतां आलिंगन । हृदयीं श्रीरामाचा बाण ।
भेदला देखोनि संपूर्ण । तारा उद्विग्न अति दुःखी ॥२५॥
सेजेचा निर्दाळिला पती । खेंव न प्रेताप्रती ।
ऐसें वैर केलें श्रीरघुपती । तारा शापोक्ती क्षोभली ॥२६॥

न सीता मम शापेन त्वां रंतुं प्रतिवत्स्यति ।
याच्यमाना त्वया सीता पुनर्यास्याति नेदिनीम् ॥६॥

पतिदुःखाच्या दुःखावर्ती । तारा क्षोभोनियां चिंत्तीं ।
शाप देत श्रीरघुपतीप्रती । तेही अति युक्तीं अवधारा ॥२७॥
विभांडूनियां लंकापती । तूं तंव पावसी सीता सती ।
परि ते नांदेना तुजप्रती । जाईल मागुती वनवासा ॥२८॥
दोघां नांदतां अयोध्येसीं । श्रीराम तूं बलात्कारेंसीं ।
वना धाडिसील सीतेसी । मजऐसा होसी अति दुःखित ॥२९॥
सीता वनवासी वनाआंत । लहु कुश जन्मती सुत ।
बारा वर्षे अयोध्येंत । अति दुःखित श्रीरामा ॥३०॥
लंकेसीं दिव्य घेईल पाहीं । सीता सती लोकीं तिहीं ।
येथें दवडावया कारण कायी ।जग अन्यायी तुज म्हणेल ॥३१॥
वाळी मारिला त्वां वृथा । हें अपेश बैसलें तुझिया माथां ।
दुजें अपेश श्रीरघुनाथा । वना सीता दवडोनी ॥३२॥
पुत्रांचिया युद्ध ख्याती । अयोध्ये आणिसील सीता सती ।
तरी नांदेना तुजप्रती । जाईल मागुती धरणीमाजी ॥३३॥

तारेच्या शापावर वालीची प्रतिक्रिया :

श्रीरामासी शापवचन । ऐकोनि तारेचें भाषण ।
वाळी होवोनि सावधान । काय आपण बोलत ॥३४॥
तारेसी म्हणे मूढमती । पतिव्रतें तूं महासती ।
शाप देऊं नको श्रीरघुपती। तो परब्रह्ममूर्ति परमात्मा ॥३५॥
अंगी जंव होती विषयासक्ती । तंव राम नोळखवे ब्रह्ममूर्ती ।
बाणे छेदिली विषयासक्ती । मग स्फूर्ति मज आली ॥३६॥
हृदयीं भेटलां श्रीरामबाण । जगाचा न देखें दोषगुण ।
श्रीराम देखें ब्रह्म पूर्ण । जग संपूर्ण श्रीराम ॥३७॥
बाण नव्हे तो निजात्मबोध । समूळ माझा छेदिला भेद ।
तेणें पावलों परमानंद । आनंदकंद श्रीराम ॥३८॥
तुज जैं लागता श्रीरामबाण । तैं तूं पावतीस कल्याण ।
न देखसी दोषगुण । श्रीराम पूर्ण परात्मा ॥३९॥

तारेला उपदेश :

मजसवें नको होऊं सती । जीवित्व अर्पावें रघुपती ।
तेंचि सतीत्व सत्य त्रिजगतीं । प्रेताप्रति नको मरूं ॥४०॥
प्रेतप्रीतीं रिघावें अग्नीप्रतीं । त्या सतिया प्रेमभूत होती ।
डांकाभोगी अवतरती । भोग मागती विषयांचे ॥४१॥
तैसें न करावें आपण । जीवित्व करावें रामार्पण ।
श्रीरामाचें निजवचन । अणुप्रमाण नुल्लंघीं ॥४२॥
अंगदा धरोनि आपण । तोही करावा रामार्पण ।
श्रीरामकृपेस्तव जाण । सुख संपूर्ण पावाल ॥४३॥
ऐसी तारेसी सांगोनि युक्ती । स्वानंदे बोले सुग्रीवाप्रती।
तूं तंवजिवलग सांगाती । रामप्राप्ती तुझेनि ॥४४॥

भ्राता सहोदरो मे त्वं सखा चेष्टकरस्तथा ।
इंद हि प्रतिपद्यस्व राज्यमेतद्वनौकरसाम् ॥७॥
सुषेणदुहिता चेयमर्थसूक्ष्मविनिश्चये ।
यदेषा साध्विति ब्रूयात्कार्यं तन्मुक्तसंशयम ॥८॥
एष तारात्मजः श्रीमांस्त्वया तुल्यपराक्रमः ।
यौवराज्येऽभिषेक्तव्यस्तेजस्वी तरुणोंऽगडः ॥९॥

सुग्रीवाला आदेश :

सुग्रीवा म्यां केलें दृढ वैर । परी तूं सखा सहोदर ।
भेटवोनि श्रीरामचंद्र । यमप्रहार चुकविला ॥४५॥
चुकविला माझा भयशोक । चुकविलें जन्ममरणदुःख ।
श्रीरामप्राप्तिपरमसुख । अलौलिक मज दिधलें ॥४६॥
तुझा मी काय होऊं उत्तीर्ण । अगाध सुख तुझेनि पूर्ण ।
कांही एक देईन अणुप्रमाण । कृपा करोन अंगीकारीं ॥४७॥
मज व्हावया उत्तीर्ण । किष्किंधेचें राज्य पूर्णं ।
अंगीकारावें आपण । सखा परिपूर्ण तूं माजा ॥४८॥
सुषेणाची कन्या तारा । सारासारविवेकषतुरा ।
इच्या मानोनि विचारा । राज्यभारा चालवावें ॥४९॥
अंगदा यौवराज्य देवोनी । प्रतिपाळावा लळा पाळूनी ।
तूंचि पिता तूंचि जननी । श्रीराम भजनीं लावीं यांसी ॥५०॥
प्रथम निर्दाळावया उद्‌भट । अंगद तुजपुढें सुभट ।
रणीं राक्षसां करील पीठ । घेईल त्रिकूट लंकेचें ॥५१॥
आम्हांसी श्रीरामे बळ । आम्ही श्रीरामबळें सबळ ।
श्रीरामाचे भजा तुम्हीं सकळ । राम केवळ परब्रह्म ॥५२॥
श्रीराम सद्‌गुरु निश्चित । श्रीराम आम्हां गणगोत ।
आमचें सर्वस्व श्रीरघुनाथ । कुळदैवत श्रीराम ॥५३॥
तारा अंगद आणि सुग्रीव । भावें भजा श्रीरघुराव ।
हेंचि तिहीं लोकीं गौरव । अति अपूर्व आम्हांसी ॥५४॥

सुग्रीवाचे प्रतिवचन व आश्वासन :

ऐकोनि वाळीचें वचन । सुग्रीवें घातलें लोटांगण ।
मस्तकीं धरिले वालिचरण । काय आपण बोलत ॥५५॥
तुझिया वेराचे विभक्तीं । स्वामी जोडला श्रीरघुपती ।
जाली वैराची निजशांती । वानूं मी किती उपकार ॥५६॥
मीतूंपणेंसीं तुटलें वैर । सुखेंचि उतरलों भवसागर ।
जाला वंशाचा उद्धार । हाही उपकार वाळी तुझा ॥५७॥
नुल्लंघितसां तारेच्या वचनासी । यौवराज्य देईन अंगदासी ।
सर्वस्वें भजेन श्रीरामासी । भाक तुजपासीं हे माझी ॥५८॥
आम्ही वनचरें वानर । विषयोन्मत्त पालेखाइर ।
त्या आम्हां जोडला श्रीरामचंद्र । हाही उपकार वाळी तुझा ॥५९॥
ऐकोनि सुग्रीवाचें वचन । वाळी जाला सुखसंपन्न ।
विजयमाळा द्यावया आपण । उल्लास पूर्ण वाळीसी ॥६०॥

इमां माला गृहाण त्वं दत्तां सुग्रीव कांचनीम् ।
उदारा श्रीःस्थिता यस्यां त्वामेष्यति मृते मयि ॥१०॥
इत्युक्त्वा स च सुग्रीवं रामं प्रांजलिख्रवीत् ।
प्रणम्य शिरसा पादौ त्यक्त्वासुं परमां गतिम् ॥११॥

वालीचे समाधान, सुग्रीवाला माला अर्पण व देहत्याग :

कश्यपदत्त वरदमाळा । वृत्रवधाचिये काळा ।
घातली इंद्राचिये गळां । जे देखलिया डोळां । वैरी विमुख ॥६१॥
माळा देखलिया संमुख । धाकें वैरी होती विमुख ।
विजयश्रीचें निजसुख । तिन्ही लोक वानिती ॥६२॥
इंद्रे दिधली मजलागोनी । विजयमाळा हे कांचनी ।
सुग्रीवासी आलिंगोनी । वाळी आल्हादोनी देता जाला ॥६३॥
सुग्रीवा ही विजयमाळा । म्यां घातलीसे तुझ्या गळां ।
तूं नावेरसी कळिकाळा । भोगीं सोहळा कपिराज्याचा ॥६४॥
विजयमाळेचिया प्राप्तीं । श्रीरामाचीं सेवावृत्ती ।
तुझीं त्रैलोक्यीं विस्तरेल कीर्ती । नित्यानुवर्ती श्रीरामाचा ॥६५॥
ऐसें सांगोनि सुग्रीवासी । नमस्कारोनि श्रीरामासी ।
रामस्मरणें त्यजोनि देहासी । परम गतीसी पावला ॥६६॥

तारेचे दुःख व विलाप :

वाळीनें सांडलिया प्राण । तारा अति दुःखीं निमग्न ।
श्रीरामापासीं येवोनि जाण । काय आपण स्वयें बोले ॥६७॥
वैधव्याचें दुःख शोक । न साहवे क्षणार्ध देख ।
मी मागेन कांहींएक । तें आवश्यक मज द्यावें ॥६८॥
माझें निर्वाण मागणें । ना न म्हणावे कृपणपणें ।
मजलागूनी उदार होणें । कृपा करणें श्रीरामा ॥६९॥

राम मां जहि बाणा येन वाली हतस्त्वया ।
च्छामि पतिसालोक्यं पतिर्माभिकांक्षति ॥१२॥
पत्‍नीवियोगजं दुःखमनुभूतं त्वयानघ ।
वालिने मां प्रयच्छ त्वं पत्‍नीदानफलं लभेः ॥१३॥

वाळी विंधिला जेणें बाणें । मज वधावें बाणें तेणें ।
सवें जाऊं दोघें जणे । वियोग झणें होऊं देसी ॥७०॥
पत्‍नीवियोगाचें दुःख । तुवां भोगिलें असे देख ।
मज बाणें विंधोनियां देख । धाडीं आवश्यक पतीपासीं ॥७१॥
माझी वाट तो पाहत । वाळी राहिलासे तिष्ठत ।
मजही पाठवावें जी तेथ । पुण्य अद्‌भुत होय रामा ॥७२॥
मज धाडिल्या वाळीपासीं । पत्‍नीदानफल लाहसी ।
जोडती पुण्याचिया राशी । पत्‍नी पतीसीं भेटविल्या ॥७३॥
ऐकोनि तारेचे बोल । प्रवृत्तिशास्र अति सखोल ।
तें अवघें करावया फोल । राम निश्चळ पूसत ॥७४॥

किं भीरु शोचसे व्यर्थं शोकस्याविषयः पतिः ।
पतिस्तवास्ति देहो वा जीवो वा वद तत्वतः ॥१४॥

श्रीराम तारेचे सांत्वन करितात :

तारे एक सावधानेंसी । तूं काय देहासी पति मानसी ।
अथवा जीवा पति म्हणसी । तें मजपासीं शुद्ध सांगें ॥७५॥
देहासी सत्य पति मानिसी । तरी तो तुजचिपासीं ।
सिद्ध असतां शोक कां करिसी । अति उल्लासीं भोगावा ॥७६॥
पति मानिसी जरी जीवासी । तरी त्वां देखिलें नाहीं त्यासी ।
गेला गेला केंवी म्हणसी । व्यर्थ रांडवलीसी मूर्खत्वें ॥७७॥
जीवासी नाहीं मरणें जिणें । जीवासी नाहीं खाणें भोगणें ।
जीवासी नाही येणें जाणें । गेला म्हणणें अति मिथ्या ॥७८॥
जीव चिदानंद चैतन्यघन । सर्वी सर्वत्र परिपूर्ण ।
त्यासी नाहीं गमनागमन । वृथा रुदन कां करिसी ॥७९॥
घटासी घडीमोडी बहुवस । घडमोड नेणे घटाकाश ।
तेंवी देंहासी होतां नाश । जीव अविनाश नित्यत्वें ॥८०॥
घटीं भरिल्या घृतमद्यांसी । तो लेपून लगे घटाकाशीं ।
तेंवी देहींच्या पापपुण्यासी । आत्माप्रकाशीं रिघू नाहीं ॥८१॥
आत्मा परिपूर्ण सदोदित । कर्मंधर्माविरहित ।
सुखदुःखांसी अलिप्त । तूं का व्यर्थ विलपसी ॥८२॥

देहो हि काष्ठवद्राम जीवो नित्यश्चिदात्मकः ।
सुखदुःखादिसंबंधः कस्य स्यात् राम मे वद ॥१५॥

श्रीरामांचा हितोपदेश :

देह तंव जड काष्ठप्राय । त्यासी सुखदुःख संबंध न होय ।
आत्मा चैतन्यघन सबाह्य । तेथें न समाय सुखदुःक ॥८३॥
सुखदुःखांचा हा मारा । कोणासी बाधी श्रीरामचंद्रा ।
याचा उकलू सांगावा खरा । दुःकपरपारा पावावया ॥८४॥
ऐकोनि तारेचा प्रश्न । स्वयें सांगे श्रीरघुनंदन ।
जंव देहीं देहाभिमान । दुःखबंधन अविवेकिया ॥८५॥
देंही सबाह्य चैतन्य घन । तेथें मिथ्या भासे देहाभिमान ।
जेंवी दोराअंगी सर्पपण । तेंवी संपूर्ण देह मिथ्या ॥८६॥
जन्ममरण देहसंभ्रम । क्षुधा तृषा प्राणधर्म ।
विषयांचे भोग परम । तें इंद्रियकर्म इंद्रियांचे ॥८७॥
सुख दुःख भय शोक । मनोधर्म हे आवश्यक ।
हरि हर ब्रह्मा त्रिगुणात्मक । काल्पिनिक संसार ॥८८॥
आत्मा गुणी गुणातीत । देहीं देहबाधा अलिप्त ।
तेही विषयींचा दृष्टांत । सुनिश्चित अवधारीं ॥८९॥
स्फटिक कृष्णवर्णे दिसे काळा । पीतवर्णे दिसे पिंवळा ।
आरक्तें दिसे आरक्तकिळा । तरी तो वेगळा तिही रंगीं ॥९०॥
तेंवी आत्मासंसारांत । त्रिगुणीगुणी गुणातीत ।
ऐसा जोडला ज्या परमार्थ । त्या नव्हे प्राप्त सुखदुःख ॥९१॥
ऐसी व्हावया निजप्राप्ती । अवश्य पाहिजे सत्संगतीं ।
त्याचेनि संगे विषयविरक्ती । तैं परमार्थीं अधिकार ॥९२॥
शब्दें छेदी विकल्प समस्त । परमानंदें नित्य तृप्त ।
तैसिया गुरुपासीं परमार्थ । सुनिश्चितार्थ साधावा ॥९३॥
वेदानुवादें सप्रमाण । ऐकोनि सद्‌गुरुवचन ।
देहीं मिथ्या देहपण ।नित्य चैतन्य अनुलक्षी ॥९४॥
अनुलक्षितां चैतन्य घन । परमानंदी मूर्च्छापन्न ।
श्रीरामकृपा पावली पूर्ण । देहाभिमान विसरली ॥९५॥

श्रीरामेणोदितं सर्वं श्रुत्वा तारातिविस्मिता ।
देहाभिमानजं शोकं त्यक्त्वा नत्वा रघूत्तमम् ॥१६॥
सुग्रीवोऽपि महावाहुः श्रुत्वा रामस्य भाषितम् ।
विज्ञाय ज्ञानमखिलं स्वस्थचित्तोऽभवत्तदा ॥१७॥

रामांच्या उपदेशाचा तारा व सुग्रीवावर परिणाम :

ऐकोनि श्रीरामांचे वचन । तारा विसरली देहाभिमान ।
हर्षे घालोनि लोटांगण । श्रीरामाचरण वंदिले ॥९६॥
वाळीनें सांगितलें आपण । ब्रह्मीं ब्रह्मभूत श्रीरामवचन ।
ते मज पावली निजखूण । ब्रह्म परिपूर्ण श्रीराम ॥९७॥
ताराप्रबोधें श्रीरामवचन । सुग्रीवें ऐकतां आपण ।
विसरला देंहाभिमान । सुखसंपन्न श्रीरामें ॥९८॥
ऐकोनि श्रीरामवचनोक्ती । तारासुग्रीवां सुखसंविती ।
दोघां जाली अति प्रीती । विकल्प चित्तीं त्यां नाहीं ॥९९॥

रामाज्ञेने वालीचे दहन व उत्तरक्रिया :

दोघां जालें परम समाधान । तंव बोलिला श्रीरघुनंदन ।
वाळीचें करोनि देहदहन । करावे पिंडदान तिलोदकें ॥१००॥
अंगद सुग्रीव आणि प्रधान । वाळीस पुष्पकीं घालोन ।
पंपातीरीं केलें दहन । बिल्वचंदनकाष्ठादिकीं ॥१०१॥
वाळीचें उत्तरविधान । तिलोदकें पिंडदान ।
करोनि सुग्रीवादि प्रधान । अंगदा घेवोन येते झाले ॥१०२॥
येवोनियां अवघे जण । वंदोनि श्रीरामचरण ।
सुग्रीव हात जोडोनि आपण । अंगदा घेवोन उभा ठेला ॥१०३॥
श्रीराम म्हणे हनुमंता । सुग्रीवासी अति शीघ्रता ।
करावी राज्याभिषेकता । यौवराजता अंगदासी ॥१०४॥

हनुमंताची विनंती :

ऐकोनि श्रीरामाची वचनोक्ती । हनुमंतें केली विनंती ।
स्वामींनीं येवोनि किष्किंधेप्रती । सुग्रीव राज्यार्थीं अभिषेकावा ॥१०५॥
आपुनेिन हातें श्रीराघवा । सुग्रीव राज्यीं स्थापावा ।
हें आवडे आमुच्या जीवा । कृपाळुवा श्रीरामा ॥१०६॥

रामाचे उत्तर व लक्ष्मणाकडून सुग्रीवास राज्याभिषेक :

ऐकोनि हनुमंताचें वचन । संतोषला श्रीरघुनंदन ।
आपलें नेमाचें लक्षण । स्वयें आपण सांगत ॥१०७॥

चतुर्दशसमाः सौम्य ग्रामं वा यदि वा पुरम् ।
न प्रवेक्षाम्यहं वीर पितुनिर्दिशकारणात् ॥१८॥

श्रीदशराज्ञा शिरीं । चवदा वर्षें निजनिर्धारीं ।
ग्रामी अथवा नगरीं पुरीं । प्रवेश न करीं नेमस्थ ॥१०८॥
ऐकोनि नेमाचें वचन । हनुमंते धरिले श्रीरामचरण ।
सवें धाडावा लक्ष्मण । राज्याभिषिंचन सुग्रीवा ॥१०९॥
राज्याभिषेचन सुग्रीवासी । रामाज्ञा लक्ष्मणासी ।
येंरे वंदोनिया शिरसीं । सहपरिवारेंसी चालिला ॥११०॥
राज्यीं स्थापावा सुग्रीव वीर । किष्किंधे चालिला सौमित्र ।
प्रधानवानरपरिवार जयजयकार प्रवर्तला ॥१११॥
श्रीरामें तारा पाचारोनी । किष्किंधाराज्यीं तूं राजपत्‍नी ।
सुग्रीवातें अंगीकारुनी । माझे आज्ञेनें राज्य करीं ॥११२॥
सर्वां भूती भगवद्‌भावो । त्यामाजी मानीं सुग्रीवा नाहो ।
माझे आज्ञेचा भोगीं अनुभवो । देहसंदेहो तेथें नाहीं ॥११३॥
देवराच्च सुतोत्पत्ती । बोलिलें आहे धर्मशास्रार्थी ।
माझिया आज्ञेच्या अनुभूतीं । सुग्रीवाप्रती भजावें ॥११४॥
स्रीपुरुष उभय देहीं । आत्म्यांवांचून आत्मी नाहीं ।
दृष्टी ठेवितां तिये ठायी । देही विदेही सहजत्वें ॥११५॥
हे चुकलिया निजात्मदृष्टी । स्वपत्‍नी भोगितां नरककोटी ।
निजात्मदृष्टीच्या संतुष्टीं । द्वंद्व सहज लोटीं ममाज्ञा ॥११६॥
श्रीरामाचे अनुवादन । ऐकतां साच विस्मयापन्न ।
तारासुग्रीवां समाधान । श्रीरामवचन अनुल्लंघ्य ॥११७॥
सुग्रीव किष्किंधेचा राजा । तारा त्याची निजभाजा ।
यौवराज्य तारात्मजा । श्रीरघुराजाची हेचि आज्ञा ॥११८॥
ऐसें बोलतां श्रीरामचंद्र । अवघीं केला जयजयकार ।
संतोषले वानरभार । आणि सुरवर समस्त ॥११९॥
हा महोत्सव किष्किंधेत । वानर मिळवोनियां समस्त ।
ऋषी आणिले असंख्यात । अभिषेकार्थ सुग्रीवा ॥१२०॥
सनख व्याघ्रचर्म समग्र । वराहदंष्ट्रा कूर्मचक्र ।
सप्तसमुद्रींचें नीर । आणिलें क्षीर सुरभीचें ॥१२१॥
सप्तमृत्तिका तीर्थोदकें । स्थळजें जळजें कमळें अनेकें ।
सुमनें चंदनें अति चोखें । क्षीरोदकें मणिरत्‍नें ॥१२२॥
चूतपल्लव पद्मपल्लव । अशोकपल्लवांची लवलव ।
नगर शृंगारिलें सर्व । अति अपूर्व हनुमंतें ॥१२३॥
मुकुट कुंडलें अलंकार । श्वेत छत्र युग्मचामर ।
सदाफळी औंदुबर । पीठ पवित्र अभिषेका ॥१२४॥
शातकुंभ । रजतकुंभ । सालंकारी श्वेतवृषभ ।
रत्‍नीं पूर्ण रत्‍नकुंभ । हरिवल्लभ अभिषेक ॥१२५॥
होम करोनि प्रधान । सवेंचि केलें द्विजपूजन ।
तिलाज्यधेनुविविधदान । अभिषिंचन सुग्रीवा ॥१२६॥
जैसी उमा आणि रमा । तैसी शोभे तारा रुमा ।
अंगदाची कांता क्षमा । महा महिमा अभिषेकीं ॥१२७॥
सुवासिक शीतळ गंधोदक । सुमनोदक कुशोदक ।
श्रीरामांचे चरणोदक । ऋषिअभिषेक वेदघोषीं ॥१२८॥
वस्रें अलंकार धनधान्य । द्विजां दिधले भोजन ।
अंगदा यौवराज्य देउन । सुखसंपन्न सुग्रीव ॥१२९॥
विधियुक्त वेदमंत्र । अभिषेकिती ऋषीश्वर ।
अभिषेकावया आले वानर । थोर थोर तें ऐका ॥१३०॥

गजो गवाक्षो गवयः शरभो गंधमादनः ।
मैंदद्विविदनीलाश्च सुषेणो जांबवान्नलः ।
अभ्यषिंचंत सुग्रीवमंगदं चापि पूजयन् ॥१९॥

गज गवाक्ष गवय । शरभ गंधमादन उभय ।
मैंद द्विविद नीळ पाहें । आलें लवलाहें अभिषेका ॥१३१॥
नळ सुषेण जांबवंत सबळ । आणिक वानर बहुत प्रबळ ।
सुग्रीव अभिषेकावया सकळ । आले तत्काळ वानर ॥१३२॥
अभिषेकिती सुग्रीवासी । यौवराज्य अंगदासी ।
पूजा करोनि दोघांसी । अति उल्लासीं स्थापिलें ॥१३३॥
अंगदा यौवराज्य दिधलें । वानरींहीं सुग्रीवा संमानिलें ।
अवघे म्हणती भलें केलें । संस्थापिलें सुग्रीवा श्रीरामें ॥१३४॥

एतस्मिन्नंतरे छत्रं गृहीत्वा पनसो मुदा ।
यूथपौ नलतारौ च वालस्यजनधारिणौ ॥२०॥

श्रीरामांना सर्वांचे वंदन :

पहिलें बसैवोनि सौमित्र । मग रथीं बैसें सुग्रीव वीर ।
पुढें घेवोनि अंगद कुमर । निघे सत्वर रामनमना ॥१३५॥
ते समयी पनस वीर । सुग्रीवावरी धरी छत्र ।
कनकदंडीयुग्मचामर । नळ तार वीर वीजिति ॥१३६॥
यावरी सुग्रीव राज्यधर । घेवोनि वानरांचा संभार ।
करीत आले जयजयकार । तेणें रघुवीर सुखी जाला ॥१३७॥
हैकार थैकार जयजयकार । करीत आले वानरवीर ।
तें देखोनि श्रीरामचंद्र । सुखनिर्भर स्वानंदे ॥१३८॥
रथ सांडोनि सत्वर । अंगद सुग्रीव सौमित्र ।
लोटांगणीं श्रीरामचंद्र । नमस्कारें वंदिला ॥१३९॥

निवेद्य रामाय महात्मने तदा |
महाभिषेकं कपिवाहिनीपतिः ।
रुमां स्वभार्यामुलभ्य वीर्यवान् ।
अवाप राज्यं त्रिदशाधिपो यथा ॥२१॥

हनुमंत सांगे श्रीरामापासी । राज्याभिषेक सुग्रीवासी ।
यौवराज्य देवोनि अंगदासी । पायांपासीं आणिलें ॥१४०॥
येथोनियां श्रीरघुनाथा । पुढील कार्यकर्तव्यता ।
विचारोनि सांगे आतां । आम्हां समस्तां दासांसी ॥१४१॥
पर्जन्यकाळचार्तुर्मासीं । करितां न ये सीताशुद्धीसी ।
सुग्रीवा धाडीजे किष्किंधेसी । हनुमंतासी राम सांगे ॥१४२॥
प्रस्रवणगिरिगुहेसीं । मी राहीन सौमित्रासीं ।
लोटलिया पर्जन्यकाळासी । सीताशुद्धीसी शीघ्र यावें ॥१४३॥
सुग्रीव म्हणे श्रीरामासी । लोटलिया चातुर्मास्यासी ।
आणोनि वानरसैन्यासी । सीताशुद्धीसी मी करीन ॥१४४॥
ऐसें बोलोनि आपण । वंदोनियां श्रीरामचरण ।
उल्लासोनि अवघे जण । किष्किंधावर पावले ॥१४५॥
श्रीरामें उद्धरिला वाळी । राज्यीं स्थापिला सुग्रीव बळी ।
कीर्ती जाली भूमंडळी । पिटिली टाळी तिहीं लोकीं ॥१४६॥
आतां पुढें कथेसी । कमोनियां चातुर्मास्यासी ।
सुग्रीव घेवोनि येईल वानरांसी । सीताशुद्धीसी करावया ॥१४७॥
एकाजनार्दना शरण । जालें वाळीचें उद्धरण ।
वानरा सखा श्रीरघुनंदन । पशुपावन श्रीराम ॥१४८॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणें किष्किंधाकांडे एकाकारटीकायां
सुग्रीवराज्याभिषेको नाम सप्तोमोऽध्यायः ॥७॥
॥ ओंव्या १४८ ॥ श्लोक २१ ॥ एवं १६९ ॥