अध्याय 10
हनुमंत जन्मकथा
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
श्रीरामांचा प्रश्न :
अगस्तिमहामुनीप्रती । प्रश्न केला श्रीरघुपतीं ।
सुग्रीवा निजसखा मारूती । अद्भुतशक्ती असतां ॥१॥
तेणें साधावया मित्र कार्यार्था । कां न करीच वाळीच्या घाता ।
या हनुमंताच्या भावार्था । मजला साद्यंत सांगावें ॥२॥
राघवस्य वचः श्रुत्वा हेतुयुक्तमृषिस्तदा ।
हनूमतः समक्षं तमिदं वचनमब्रवीत् ॥१॥
अगस्ती मारुतीची जन्मकथा सांगतात :
ऐसें पुसता श्रीरघुनाथ । अगस्ति मुनि आनंदयुक्त ।
हनुमंताचें निजसामर्थ्य । असे सांगत स्वानंदे ॥३॥
आतां सांगेन श्रीरघुनाथा । हनुमंताची जन्मकथा ।
सकळमूळारंभवार्ता । होय सांगता अगस्ति ॥४॥
पुत्रेष्टियाग दशरथासी । ताटप्रसाद यज्ञपुरुषीं ।
वसिष्ठें करोनि विभागांसी । तिघी राणियांसी दीधलें ॥५॥
कैकेयीभाग हरिला घारीं । ते शापद्वारें जाली नारी ।
तेथें वर्तली नवलपरी । तेही अवधारीं श्रीराम ॥६॥
यज्ञभाग तिच्या उदरीं । व्हावया श्रीरामसहाकारी ।
ब्रह्मा तीतें करी वानरीनारी । अंजनी केसरीची ॥७॥
उदरीं यज्ञभाग संपूर्ण । त्याचें व्हावया प्ररोहण ।
यज्ञपुरुषाचा निजप्राण । तिसीं आपण विचरला ॥८॥
यज्ञभाग अति बळवंत । जन्म पावला हनुमंत ।
यालागीं म्हणती वायुसुत । अंजनीपुत वानरत्वें ॥९॥
दो भागांचे तुम्ही चवघे जण । सगळ्या भागाचा हनुमंत पूर्ण ।
यालागीं बळप्रतापी जाण । अति संपन्न बळत्वें ॥१०॥
राम लक्ष्मण शत्रुघ्न भरता । यज्ञभागी हनुमंता ।
तुम्हीं पांच एकात्मतां । भिन्न दिसतां अभिन्न ॥११॥
ऐकोनि अगस्तीची मात । संतोषला श्रीरघुनाथ ।
हर्षयुक्त स्वयें हनुमंत । अंनदभरित सौमित्र ॥१२॥
अगस्ति म्हणे श्रीरघुपती । बाळपणी याची ख्याती ।
ते मी सांगेन तुजप्रती । अत्यद्भुत शक्ती हनुमंता ॥१३॥
हनुमंताला गर्भातच जन्मजात कौपीन, त्यामुळे अंजनीमातेला नग्न पुत्रदर्शन नाही :
ब्रह्मचर्या अति गोमटी । हनुमंतासी गर्भकांसोटी ।
अंजनी माता देखे दृष्टीं । कीं राम जगजेठी देखेल ॥१४॥
हनुमंताचें लिंगदर्शन । मुख्य माता न देखे आपण ।
मग इतरा देखों शके कोण । ब्रह्मचारी पूर्ण कपिराज ॥१५॥
हनुमंत पुसे बाळभावे । मातें म्यां क्षुधेसी काय भक्षावें ।
आरक्त फळ जें देखावें । तेंचि खावें म्हणे माता ॥१६॥
पावाकार्कनिभं पुत्रं प्रसुय जननी गृहात् ।
फलान्याहर्तुकामा सा निष्कांता च वनं तदा ॥२॥
यशः कर्तुं स्ववीर्येण क्षुधया भृशमर्दितः ।
अर्धोदितं विवस्वंतं जपापुष्पसमप्रभम् ॥३॥
ददर्श फललाभाय चोत्पपात रविं प्रति ॥४॥
जन्मतांचि हनुमंत । अग्नितेजें दीप्तिमंत ।
बालार्कप्रभासम भासत । दीप्तिमंत मारुती ॥१७॥
मारुतीची बाळपणी क्षुधाशांतीसाठी सूर्यावर झेप :
सूर्योदय नव्हतां तेथ । सेजे निजवोनि हनुमंत ।
अंजनी गेली स्वयें वनांत । फळें त्वरित आणावया ॥१८॥
मातृविहीन हनुमंत । रुदन करी अति क्षुधित ।
देखोनि बालार्क आरक्त । फळभक्षार्थ उडाला ॥१९॥
क्षुधेनें पीडिला प्रबळ । बालार्क फळ अति वर्तुळ ।
भक्षावया स्वयें तत्काळ । उडे चपळस्वभावें ॥२०।
भक्षावया बालार्कासी । उर्ध्वगति हनुमंतासी ।
देखोनि विस्मयो सुरवरांसी । देवऋषी विस्मित ॥२२॥
धैर्य शौर्य महावीर्य । शीघ्रगतिगमनें गांभीर्य ।
हनुमंतांचें परम औदार्य । सुरवर शौर्य वानिती ॥२३॥
हनुमंताच्या समानशक्ती । कोणी नाहीं त्रिजगतीं ।
बाळभावें शीघ्रगतीं । सूर्यभक्षार्थीं धांवला ॥२४॥
सूर्यदाहभयं द्रक्ष्यन्वायुस्तुहिनशीतलः ।
यमेव दिवसं चासौ ग्रहीतुं भास्करं गतः ॥५॥
तमेव दिवसं राहुर्जिघृक्षति दिवाकरम् ॥६॥
वायूने त्याचे सूर्याच्या प्रखर तापापासून रक्षण केले :
मनोगति सांडोनि मागें । हनुमंत चालिला ऊर्ध्वमार्गे ।
सूर्यकिरणाचे निदाघयोगें । होईत सर्वांग भस्मित ॥२५॥
जाणोनि वायु पिता । निजपुत्रातें संरक्षिता ।
हिमांबुकणें निवविता । होय चालला शिशुमार्गें ॥२६॥
वायु धरूं पाहे हनुमंतासी । तंव तो नाटोपे तयासी ।
वेगीं आला सूर्यापासीं । फळभावेसीं भक्षावया ॥२७॥
तोच दिवस सुर्यग्रहणाचा; आलेल्या राहूला शेपटीचा भयंकर तडाखा :
हनुमंत आला बिंबापासीं । रविराहुग्रहण तेच दिवशीं ।
राहु ग्रासितां सूर्यासी । हनुमान मानसीं कोपला ॥२८॥
माझ्या गोड ग्रासाआड । येथें कोण आला मूढ ।
राहूचें फोडिलें जाभाड । पुच्छ सुदृढ हाणोनी ॥२९॥
पुच्छीं हाणितां वानरा । घायें राहु होय घाबरा ।
नाकीं मुखीं रुधिरधारा । थरथरां कांपत ॥३०॥
धाकें थरथरां कांपत । गगनीं गरगरां भोंवत ।
राहु पडतां अति मूर्च्छित । धावोनि केत धरी त्यासी ॥३१॥
राहू केतू अति आप्तता । दोघां देहीं एकात्मता ।
केतु येवोनि राहुसाह्यार्था । कोपें हनुमंताकडे पाहे ॥३२॥
सकेतु राहु देखोनि दृष्टीं । रागें हनुमंत हाणी मुष्टी ।
दोघां पळतां पायपोटीं । हाक उठी ग्रहचक्रीं ॥३३॥
ग्रहांच्या सांगण्यावरून राहूचे इंद्राकडे गार्हाणे :
ग्रह सांगती सिंहिकासुता । पुच्छकेतु आला तुम्हांभोवता ।
इंद्र अधिकारी नियंता । त्यासी तत्वतां तुम्ही सांगा ॥३४॥
स चेंद्रभवनं गत्वा सरोषः सिंहिकासुतः ।
क्षुधापानोदनं कृत्वा चंद्रार्कौ मम वासव ॥७॥
किमिदानीं त्वया दत्तो वरोऽन्यस्मै सुरेश्वर ।
अद्याहं पर्वकाले तु जिघृक्षुः सुर्यमागतः ॥८॥
आगत्यान्यः कोऽपि राहुर्जग्राह सहसा रविम् ॥९॥
राहु जो कां सिंहिकासुत । वानरघायें रुधिरोक्षित ।
इंद्रापासीं आला त्वरित । शंख करित सांगावया ॥३५॥
माझी जीविका जीवनवृत्ती । चंद्रसूर्यग्रहणस्थिती ।
आजिंचे ग्रहणकाळप्राप्ती । रविग्रहणार्थीं मी गेलों ॥३६॥
तंव मजहूनि बळवंत । पुच्छराहु येवोनि तेथ ।
घायें करोनि रुधिरांकित । धाडिलें येथें बोंबेसीं ॥३७॥
तूं नियंता देवाधिदेवो । माझा न देखतां अन्यावो ।
तूं कां धाडिला पुच्छराहो । तेणे मज पाहो गांजिलें ॥३८॥
शेखी मज न पुसतां । तुवां करविलें गुप्तघाता ।
म्यां काय करावें गा आतां । मज तत्वतां तूं सांगें ॥३९॥
पुच्छराहु येवोनि तेथ । सुर्य आकळिला समस्त ।
माझा करूं धांवे घात । आलों रडत सांगावया ॥४०॥
स राहोर्वचनं श्रुत्वा वासवः संभ्रमन्वितः ।
इंद्रः करींद्रमारुह्य राहुं कृत्वां पुरःसम् ॥१०॥
ततः सूर्यं समुत्सृज्य राहुं स्थूलमवेक्ष्य सः ।
उत्पपात पुनर्व्योम्नि ग्रहीतुं सिंहिकासुतम् ॥११॥
इंद्राची मारुतीवर स्वारी, राहूचा थरकाप :
ऐकोनि राहूचा वचनार्थ । इंद्रादि देव अति विस्मित ।
ग्रहचक्रातें विपरीत । कर्ता येथ तो कोण ॥४१॥
कोणें केला नवा राहो । त्यासी निर्दळावया पहाहों ।
घेवोनि सुरसेनासमुदावो । इंद्र स्वयमेव तेथ आला ॥४२॥
ऐरावत सालंकार । गजेंद्री बैसोनियां इंद्र ।
करीं घेवोनिया वज्र । सहपरिवार तेथें आला ॥४३॥
इंद्र राहू पुढें बैसवोनि । नवा राहु दाखवी म्हणोनि ।
जेणें तुज गांजिलें बळेंकरुनी । त्याचें निर्दळण मी करीन ॥४४॥
दाखवितां हनुमंतासी । थरथरा कंप सुटला राहूसी ।
दडोनी ऐरावतीचे पाठीसीं । दावी इंद्रासी दुरोनी ॥४५॥
येरीकडे हनुमंत । धाविन्नला रवि ग्रासावया क्षुधित ।
तेणें सूर्य चळीं कांपत । अति अनर्थ ओढवला ॥४६॥
दिनमान सांडोनि सविता । पळों न लाहे सर्वथा ।
निवारूं शकेना हनुमंता । अति आकांत पावला ॥४७॥
तेचि संधी इंद्रापासीं वानरें देखोनि राहूसी ।
रागें निघाला निर्दाळावयासी । अति वेगेंसी धांवला ॥४८॥
मज क्षुधिताच्या आहारासीं । राहु ओढवला विवसी ।
धरोनी इंद्राच्या बळासी । माझ्या ग्रासासी घेवों आला ॥४९॥
ऐसें बोलोनि हनुमंत । सूर्यग्रासाची सांडोनि मात ।
राहूचा करूं धावे घात । येरू बोभात इंद्रातें ॥५०॥
राहू पळे इंद्राकडे । तेथें तंव हनुमंताची उडी पडे ।
येरू अति आक्रोशे रडे । इंद्रापुढें सांगतां ॥५१॥
इंद्र इंद्रेति मां त्राहि मुहुर्मुहुरभाषत ।
श्रुत्वेंद्रः प्राह माभैषीरहमेन निषूदये ॥१२॥
बलान्नाहन्मि राजानमभिदुद्राव मारूतीः ।
मुहूर्तनभवाद्धोरं कालाग्निरिव मूर्च्छितः ॥१३॥
हनुमंत राहूतें मर्दूं पाहत । इंद्र इंद्र नामें आक्रंदत ।
वानरें पुरविला अंत । आरंबळत आक्रोशें ॥५२॥
ऐकोनि राहूचा आकांत । इंद्र नाभीकार देत ।
भिवों नको धरीं पुरुषार्थ । याचा घात मी करीन ॥५३॥
ऐसें बोलोनि अमरपती । वेगीं प्रेरिला ऐरावती ।
त्यावरी धांविन्नला मारुती । हस्तें हस्ती उपटावया ॥५४॥
वानरु ऐरावती आकळी । तेणें पुच्छें ठोकिला गंडस्थळीं ।
गज आक्रंदोनि देत किंकाळी । भयें चळीं कांपत ॥५५॥
पुच्छ नव्हे तो वज्रघात । घायें विमुख ऐरावत ।
इंद्र बळें आकळित । तरी युद्धात परतेंना ॥५६॥
पुच्छ हाणितां वानरें । गजें घेतलें घायवारें ।
शक्रा शक्ति तों नावरे । केलें घाबरें इंद्रासी ॥५७॥
इंद्र देवांमाजी बळी । तो करितां हनुमंतासी कळी ।
वानरें मुकुट पाडिला तळीं । झोटी मोकळी इंद्राची ॥५८॥
मुकुट घ्यावया आपणापासी । बाळभावें न कळे त्यासी ।
इंद्र केला कासाविसीं । मुरुद्गणांसी मर्दोनी ॥५९॥
इंद्र गांजिला कपींद्रें । यम धांवन्निला कैवारें ।
दंड हाणोनि सत्वरें । केलें वानरें विपरींत ॥६०॥
यम हाणी जंव दंडेसीं । हनुमान आदळला अंगासी ।
थापा हाणोनियां त्यासी । तोंडघसीं पाडिलें ॥६१॥
घाय हाणोनि प्रचंड । सांडोनियां बळबंड ।
यमाचेंच ठेंचिलें तोंड । बळ वितंड वानरा ॥६२॥
यमें गांजिलें जगासी । वानरें गांजिलें यमासी ।
घायें मिळविला धुळीसीं । बळराशिवानर ॥६३॥
यम गांजिला दारूण । भेणें पळाला वरुण ।
कुबेर घाली लोटांगण । चरणा शरण कपिराजा ॥६४॥
हनुमंतें अर्धक्षणीं । सुरसेना नेली भंगोनी ।
आवघ्या केली दाणादाणी । महापळणी देवांसी ॥६५॥
हनुमंताच्या वेगापुढे । आम्हीं पळावें कोणीकडे ।
एक एकामागें दडे । जीवसांकडे देवांसी ॥६६॥
सगज उपटावया इंद्रासी । धरोनि ऐरावतीपुच्छासी ।
वानरें भोवंडितां आकाशीं । सदेव ऋषी गजबजिले ॥६७॥
इंद्राच्या वज्रप्रहाराने हनुमंत मूर्च्छित, त्यामुळे वायूचा कोप :
हनुमंतबळ देखोनि दृष्टीं । इंद्र उपटिला सृष्टीं ।
जगीं एकचि बोंब उठी । महाहठी वानरु ॥६८॥
लघुलाघवें सुरपती । वज्रें हाणिला मारुती ।
घावो लागता हनुमंताप्रती । पहिला क्षितीं मूर्च्छित ॥६९॥
मेरुशिखरपाठारांत । हनुमान पडिला मुर्च्छित ।
वायु पिता येवोनि त्वरित । निजसुत उचलिला ॥७०॥
क्षुधिता माझिया तान्हियासी । इंद्र हाणोनि वज्रेंसीं ।
मूर्च्छित पाडिलें भूमीसीं । वायु मानसीं क्षोभला ॥७१॥
वायु क्षोभोनि संपूर्ण । आकर्षिले जगाचे प्राण ।
ब्रह्मांदिकां संकट पूर्ण । ऋषिभूतगण तळमळिती ॥७२॥
रुरोध सर्वभूतानि वायुः सर्वमिवान्तरम् ।
वायुप्रकोद्भूतानि निरुच्छवासानि सर्वशः ॥१४॥
ततोऽमराः सगंधर्वाः सयक्षासुरमानुषाः ।
प्रजाप्रतिं समाधावन्दुःखिताश्च सूखेच्छया ॥१५॥
वायूचा विलाप व क्षोभ, त्याचे गंभीर परिणाम :
वायु क्षोभोनि सक्रोध । अंतरीं केला प्राणरोध ।
प्राणापाना ठेले स्तब्ध । अति विरुद्ध भूतांसी ॥७३॥
प्राणानिरोधाची स्थिती । ठेली भूतांची नित्यगती ।
कोणा नाहीं सुखप्राप्ती । तळमळिती अति दूःखे ॥७४॥
यक्ष राक्षस देव गंधर्व । सिद्धचारणादि मानव ।
सत्यलोका येवोनि सर्व । पितामह वंदिला ॥७५॥
प्राणनिरोधाचे कष्ट । ऋषी सांगती श्रेष्ठ श्रेष्ठ ।
तंव ब्रह्मयाचें फुगलें पोट । अति संकट सर्वां ॥७६॥
ब्रह्मा सर्वांसांगे समस्तां । इद्रें हाणोनि वज्रघाता ।
मूर्च्छित पाडिलें हनुमंता । वायु पुत्रार्थ क्षोभला ॥७७॥
वायु निजपुत्रदुःखार्थी । भूतांचिया अंतर्गती ।
निरोधिल्या प्राणवृत्ती । पुत्रकार्यार्थीं क्षोभलो ॥७८॥
राहुकैवारें अमरनाथ । वज्रें हाणितला हनुमंत ।
पुत्र पडतांचि मूर्च्छित । वायु प्राणांत क्षोभला ॥७९॥
हनुमंत घेवोनि पुढे । वायु स्फुंदस्फुंदोनि रडे ।
तान्हें बाळ हें बापुडें । इंद्रे महामूढें मारिला ॥८०॥
माझा निमाल्या हनुमंत । इंद्रादि देवांचा मी घात ।
करीन एका निमेषांत । वायु प्राणांत क्षोभला ॥८१॥
प्राणवृत्ती चळतां वायु । तो तंव जगाचा जगदायु ।
पुत्रक्षोभें क्षोभोनि बहु । भूतां प्रळयु मांडिला ॥८२॥
प्राणवायूच्या निरोधामुळे जगताचा स्तंभ :
प्राणें प्राण्यां नित्य सुख । प्राणें प्राणयां नित्य हरिख ।
प्राण जातांच निःशेष । परम दुःख प्राणियांसी ॥८३॥
प्राण गेलिया निघोनी । काष्ठप्राय प्राणी जनीं ।
दृष्टीं पाहता सचैलस्नानीं । विटाळ मानी जग त्याचा ॥८४॥
यालागीं प्राणें पवित्रता । प्राणें प्रीति प्रीति प्रीतिवंता ।
प्राण गेलिया तत्वतां । प्रिया प्रियाकांता स्पर्शेना ॥८५॥
पत्नी प्रिया परम आप्त । नित्य एकांती भोगी जीवित ।
प्राण गेलिया प्राणि प्रेत । पतीसी भूत मानी पत्नी ॥८६॥
ऐसा प्राण प्रिय समस्तां । तो क्षोभोनि जाईल आतां ।
यालागीं वांचवावें हनुमंता । वैकुंठनाथा सांगोनी ॥८७॥
प्राणें पीडिला शूळापाणी । वायूची करावया बुझावणी ।
तोही आला तत्क्षणीं । वांचवा म्हणोनी हनुमंता ॥८८॥
शिव चक्र चतुरानन । तिहीं प्रार्थिला जनार्दन ।
हनुमंता द्यावया जीवदान । अवघे जण निघाले ॥८९॥
तद्यमस्तव यत्रास्ते मारुतो रुक्प्रदो हि नः ।
मा विनाशं गमिष्याम अप्रसाद्यादितेः सूतम ॥१६॥
ब्रह्महरिरान्हष्ट्वा वायुः पुत्रधार्दितः ।
शिशुकं तं समादाय उत्तस्थौ धातुरग्रतः ॥१७॥
ब्रह्मादिक देवांचे आगमन :
ब्रह्मा हरि हर तिघे जण । स्वयें इंद्राद्रि देवगण ।
ऋषि श्रेष्ठ श्रेष्ठ प्रजा पूर्ण । अवघे जण तेथ आले ॥९०॥
जेथें घेवोनी हनुमंत । वायु बैसलासे रडत ।
प्राणरोधें क्रोधयुक्त । आले समस्त ते ठाया ॥९१॥
देखोनि ब्रह्मा हरि हर । वायु उठोनि सत्वर ।
कडिये घेवोनियां कुमर । केला नमस्कार सद्भावें ॥९२॥
एकें पुत्रघाताकारणें । अवघें जगचि निर्दळणें ।
ऐसें न करावें अपणें । क्षमा करणे प्राणनाथा ॥९३॥
वायु बोले क्षोभकता । माझा हनुमंत न उठतां ।
करीन इंद्रादिकांच्या घाता । जाण तत्वतां प्रजापति ॥९४॥
वायूच्या शोकाला देवांचे उत्तर, मारुतीला जन्ममरणाचा संभवच नाही, देवांचे वरदान :
ऐकोनि वायूचें वचन । हांसिन्नला श्रीजनार्दन ।
हनुमंताचे भाग्य पूर्ण । जन्ममरण त्या नाहीं ॥९५॥
श्रीरामभाग्याच्या द्विगुणित । जन्म पावला हनुमंत ।
त्यासी स्वप्नीं नाहीं मृत्य । असे हनुमंत चिरंजीव ॥९६॥
वरद वदला श्रीजनार्दन । तें ऐकोनि त्रिनयन ।
वरद वदे संतोषोन । सावधान अवधारा ॥९७॥
माझिया तृतीय नयनींचा वन्ही । जाळूं न शके या लागूनी ।
त्रिशूळ न शके अंगभेदनीं । वरदवाणी शिवाची ॥९८॥
विष्णु वरद वदे तत्पर । गदादि बाण चक्र दुर्धर ।
तेणें न भेदे याचे शरीर । अजरामर हनुमंत ॥९९॥
ब्रह्मा वदे निजवरदेंसीं । ब्रह्मदंड ब्रह्मशापेंसीं ।
बांधूं न शकें हनुमंतासी । सकळ द्वंद्वांसी निर्मुक्त ॥१९०॥
इंद्राचा वर, कमळमाला अर्पण :
इंद्र वदे निजवरदासी । माझें वज्र लागल्या हनूसी ।
तेणें हनुमंत नाम यासी । होईल सर्वांसी विख्यात ॥१०१॥
माझें वज्र न बाधी पाहीं । हा होईल वज्रदेही ।
सुरसुरां नागवे पाहीं । याची ख्याती तिहीं लोकीं ।१०२॥
ऋषकौशिकि कमळमाळा । सुकों नेणे कदा काळा ।
इंद्रें उल्लासें त्या वेळा । घातली गळा हनुमंताचे ॥१०३॥
सूर्य, वरुण, यम, कुबेर आणि विश्वकर्मा यांचे वरदान :
निरवरद वदे सविता । मजहूनि शताधिकता ।
जों जों वृद्धि होईल हनुमंता । राक्षसघाता करावया ॥१०४॥
हा वांछीला सज्ञानता । तैं सकळ वेदशास्रार्था ।
मी देईन अति योग्यता । होईल विख्यात परमार्थीं ॥१०५॥
वरुण वदे वरदान । वर्षें शत जळीं निमग्न ।
होतां हनुमंता नये मरण । पाशबंधन कदा न बाधी ॥१०६॥
यम वरद वदे वितंड । सुख पावसी तूं प्रचंड ।
तुज बाधीना यमकाळदंड । आरोग्य अखंड अजरत्वें ॥१०७॥
धनेश वदे निजवरदासी । युद्ध करितां वर्षानुवर्षी ।
कदाकाळीं श्रम न पावसी । अस्रबाधेसीं बाधवेना ॥१०८॥
विश्वकर्मा वदे वरदान । म्या शस्रें केलीं निर्मान ।
तीं हनुमंतासीं युद्धी जाण । शस्रें संपूर्ण न बाधती ॥१०९॥
माझें शिल्पशास्रींचें ज्ञान । तें तूं पावसी संपूर्ण ।
ऐसें बाोलोनि आपण । दे आलिंगण हनुमंता ॥११०॥
चतुर्मुखस्तुष्टमना वायुमाह जगद्गुरुः ।
अमित्राणां भयंकारी मित्राणामभयंकरः ॥१८॥
अजेयो भविता पुत्रस्तव मारुत मारुतीः ।
रोमहर्षकराण्येव कर्ता कर्माणि संयुगे ॥१९॥
एवमुक्त्वा तमामंत्र्य मारुतं त्वमरैः सह ।
यथागतं ययुः सर्वे पितामहपुरोगमाः ॥२०॥
ब्रह्मदेवाचे वरदान व भविष्यकथन :
ब्रह्मा जगद्गुरु सर्वांसी । संतोषोनि सांगे वायूसी ।
हनुमंत भाग्याची राशी । सकळ देव त्यासीं तुष्टले ॥१११॥
धीर वीर महाशूर । अदट दाटुगा वज्रशरीर ।
बांधूं न शके शस्रसंभार । तुझा पुत्र सभाग्य ॥११२॥
सभाग्य भाग्यें हनुमंता । गांजोनियां लंकानाथा ।
शुद्धि आणोनियां सीता । सूखी रघुनाथा हा करील ॥११३।
तुझा पुत्र आतुर्बळी । घेईल इंद्रजितासवें फळी ।
करोनि राक्षसां खंदळी । लंकाहोळी हा करील ॥११४॥
परम भाग्य हनुमंता । भेटोनि सुखी करील सीता ।
तिची शुद्धि आणील तत्वतां । श्रीरघुनाथा सुखार्थ ॥११५॥
श्रीरामाच्या कटकांत । अदट दाटुगा वीर हनुमंत ।
सेवाबळें परम आप्त । श्रीरघुनाथा मानील ॥११६॥
भविष्य हनुमंताची ख्याती । स्वयें सांगत प्रजापती ।
उल्लास वायूच्या चित्तीं । पुत्रकीर्ती ऐकोनी ॥११७॥
वायूचा आनंद व हनुमंताला अंजनीकडे नेणे :
वरद लाहोनि हनुमंता । वायु अति उल्लसतां ।
मुक्त केली प्राणरोधता । तेणें समस्तां सुख जालें ॥११८॥
सुखी जाले सुरनर । सुखी जाले ऋषीश्वर ।
सुखी जालें चराचर । जयजयकार तिहीं लोकीं ॥११९॥
वर देवोनि हनुमंतासी । सुरवर गेले निजधामासी ।
वायूनें आणोनि हनुमंतासी । अंजनीपासीं दीधलें ॥१२०॥
हनुमंताची बाळकीर्तीं । विस्तारिलीं त्रिजगतीं ।
फळार्थ आकळितां गभस्तीं । लाविली ख्याती सुरवरां ॥१२१॥
हनुमंताचे सामर्थ्य सिद्ध । तेंचि देवीं दिधलें वरद ।
हनुमंतकीर्ती अति अगाध । तेणें सुख श्रीरामा ॥१२२॥
जें सामर्थ्य श्रीरामासी । तेचि शक्ती हनुमंतासी ।
एकात्मता अहर्निंशी । लोकक्रियेसीं देवभक्त ॥१२३॥
रामांचे व हनुमंताचें सामर्थ्य सारखेचः
लोकक्रियासंग्रहार्थ । श्रीराम देव हनुमान भक्त ।
तोचि रामायणीं ग्रंथ । भक्तसामर्थ्य वायुपुत्रीं ॥१२४॥
डोंगरीं दावाग्नीची ख्याती । घरींच्या दीपा तेचि निजदीप्ती ।
दोहींची एक दाहकशक्ती । तेंवी देवभक्तीं सामर्थ्य ॥१२५॥
त्याच्या बाललीलेंत ऋषींना त्रास, ब्रह्मदेवाकडे तक्रारपूर्वक गार्हाणे :
हनुमान असतां मातेप्रतीं । अंगीं होतां अद्भूतशक्ती ।
करितां बाळभावें उद्धती । ऋषी हितोक्ती शापिला ॥१२६॥
गंगातीरीं ऋषींची वस्ती । अवघे आश्रम उचलोनि हातीं ।
हनुमंत ठेवी दूर पर्वतीं । जळ न पवती स्नानपाना ॥१२७॥
ऋषी आपुल्या तपःसामर्थ्यी । पुढती गंगातीरा येती ।
हनुमान उचलोनी मागुती । घाली पर्वती अति दूर ॥१२८॥
पुष्पपर्वतीं ऋषी वसतीं । सकळ पर्वत उचलोनी हातीं ।
हनुमान घाली उखराप्रती । ऋषी तळमळती जळफळां ॥१२९॥
बाळभावाच्या परवडीं । ऋषींचीं यज्ञपात्रें फोडी ।
कुशासनें अजिनें फाडी । जानवीं तोडी भटांचीं ॥१३०॥
बटु ब्रह्मचारी कवळोनी पुच्छीं । हनुमान स्वयें उडे आकाशीं ।
लेंकरें होती कासाविसी । ऋषिपल्यासी तळमळ ॥१३१॥
मारोनि गज करवडें । ऋषिआश्रमीं टाकी मढें ।
काढितां शिष्यसमुदाव रडे । उपाव पुढें चालेना ॥१३२॥
ब्रह्मवरांचें वरदोक्तीं । शाप न चले हनुमंताप्रती ।
अवघे आले ब्रह्मयासी एकांतीं । बुद्धि पुसती प्रबुद्ध ॥१३३॥
ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरुन ऋषींचा फार सौम्य शाप :
ब्रह्मा सांगे ऋषींप्रती । शाप द्यावा अति हितोक्तीं ।
मारूति जाव भेटे रघुपतीं । तंववरी तुझी शक्ती लीन राहो ॥१३४॥
जेंवी यौवन सौभाग्यथोरी । अति गुप्तता राहे कुमारीं ।
तेंवी तुझी सामर्थ्यथोरी । तुजमाझारीं लीन राहो ॥१३५॥
जेंवी आलिया तारुण्यता । यौवनें मुसमुसी होय वनिता ।
तेंवी भेटल्या श्रीरघुनाथा । निजसामर्थ्या पावसी ॥१३६॥
शापामुळे शक्ती लीन झाली :
ऐसें ऋषीश्वर शापिती । जाली हनुमंताची लीन शक्ती ।
मग राहिला साधुवृत्तीं । ऋषींप्रति अति नम्र ॥१३७॥
मदाचा प्रभावः
द्रव्यमद तारुण्यमद । अंगी बळाचा शक्तिमद ।
तेणे पुरुष होय स्तब्ध । करी विरोध अभिमानें ॥१३८॥
व्यापार जालिया व्यापारी । नाना अनन्य कर्म करी ।
तोचि जालिया निराधारी । मग विचारी पापपुण्य ॥१३९॥
कैंची संध्या कैंचें स्नान । केंवी पाविजे निजज्ञान ।
आधिकारू जालिया क्षीण । विवेक पूर्ण प्राण्यासी ॥१४०॥
परमार्थाकडे आधिक लक्ष :
तैसें जालें हनुमंता । निजबळ लीन होतां ।
म्यां पावावें परमार्था । साधुसंतां भजावें ॥१४१॥
पूर्वीं सूर्याचें वरदान । जेव्हां हनुमान इच्छील ज्ञान ।
तेव्हांचि होवोनि सुप्रसन्न । ज्ञानसंपन्न मी कर्ता ॥१४२॥
तें ज्ञान मारुती वांच्छितां । अंतरीं उगवोनि चित्सविता ।
ज्ञान विज्ञान लीनता । देहीं विदेहता श्रीरामीं ॥१४३॥
ज्ञानविज्ञानसंतृप्ती । देहीं असोनि विदेहस्थिती ।
श्रीरामाची अनन्य भक्ती । जाला मारुती जगद्वंद्य ॥१४४॥
वाळिसुग्रीवकलहांत । शापें हनुमंती शक्ती गुप्त ।
यालागीं वाळीचा न करी घात । जाण निश्चित श्रीरामा ॥१४५॥
सुग्रीव हनुमंताचा आप्त । परी शापें शक्ती होती गुप्त ।
यालागीं वाळीचा न करीं पैं घात । जाण निश्चित श्रीरामा ॥१४६॥
श्रीरामांचा आनंद व अगस्तींचे गमन :
ऐसी हनुमंताची ख्याती । ऐकोनि सुखावला श्रीरघुपती ।
श्रीरामासी पुसोनि अगस्ती । आश्रमाप्रति स्वयें गेला ॥१४७॥
एकाजनार्दना शरण । हनुमंतजन्मनिरुपण ।
ऐकोनि श्रीरघुनंदन । सुखसंपन्न स्वयें जाला ॥१४८॥
सुखावोनि श्रीरघुपती । प्रीतीने आलिंगिला मारूती ।
हा मज साह्य सीताशुद्ध्यर्थी । रणकंदन करावया ॥१४९॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे किष्किंधाकांडे एकाकारटीकायां
हनुमतजन्मकथनं नाम दशमोऽध्यायः ॥ १० ॥
॥ ओंव्या १४९ ॥ श्लोक २० ॥ एवं १६९ ॥