अध्याय 16
संपातीचा उद्धार
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
फळांनी व पाण्याने वानरांची तृप्ती :
वानरां मास उपोषण । तापसीं फळें आणूनि पूर्ण ।
दिधलें यावृत्तृप्ति भोजन । वानरगण उल्लासी ॥१॥
संतृप्तास्ते फलैर्मूलैः संजाताः शीतवारिणा ।
बलवीर्याश्च ते सर्वे तत्रासन्हरिपूगवाः ॥१॥
अपतन्सर्व एवैते दिशो वानरयूथपाः ॥२॥
भक्षितां पैं फळमूळ । सेविता निर्मळ जळ ।
वानर सुखी जाले सकळ । हर्ष प्रबळ तृप्तीचा ॥२॥
वानरांचे सकळ दळ । पूर्विल्यापरिस अति प्रबळ ।
शतगुणें वाढलें बळ । जनकबाळ शोधावया ॥३॥
यानंतर सर्व वानरांची परत जाण्याची इच्छा :
वानर म्हणती हनुमंतासी । येथें काय फळें खावया आलासी ।
किंवा सीता शोधावयासी । त्या रामकार्यासी साधावें ॥४॥
शोधितां या विवराआंत । सीता न लभेचि निश्चित ।
पुढील सांग कर्तव्यार्थ । दक्षिणपंथ शोधावया ॥५॥
रविशशिविरहित । नित्य प्रकाश विवरांत ।
वानर दशदिशा पाहात । दक्षिणपंथ दिसेना ॥६॥
पूर्व कोण पश्चिम कोण । न कळे उत्तर दक्षिण ।
न कळे दशदिशांचे ज्ञान । केउतें गमन करावें ॥७॥
अथ तानव्रवीत्सर्वान्विश्रांतान्हरिपुंगवान् ।
किं कार्यं कस्य वा हेतोः कान्ताराणि प्रपद्य च ॥३॥
इंद वचनमेकाग्रा तापसी धर्मचारिणी ।
यदि चैतन्मया श्राव्यं श्रोतुमिच्छामि तां कथम् ॥४॥
तापसीच्या प्रश्नावरुन कार्याविषयी निवेदन :
अत्यंत भार ज्याचे माथां । कां जो त्वरेनें धावतां ।
अतिशयेंसीं उन्मत्तता । कथा वार्ता नये पुसों ॥८॥
जो कां ज्ञानगर्वें पीडित । जो विषयमदें उद्धत ।
जो जो अतिशय क्षुधित । त्यासी वृत्तांत पुसों नये ॥९॥
तापसी म्हणे वानरनाथा । वार्ता पुसों नये क्षुधिता ।
फळभोजन सावधानता । सांगे वृत्तांता मनींच्या ॥१०॥
विवर गूढ अति कांतार । मिळोनि आले वानरभार ।
येथें कां आलेती सकळ वीर । तोही विचार मज सांगा ॥११॥
तुम्ही श्रीरामाचे भक्त । माझेनि भाग्यें आलेती येथ ।
विवरीं प्रवेशावया गुप्त । कोण कार्यार्थ मज सांगा ॥१२॥
मी तवं तुमची केवळ दासी । कार्या सांगों ये मजपासीं ।
ऐसें मानिलिया तुम्हांसी । तरी कार्यासी मज सांगा ॥१३॥
तस्यास्तद्वचनं श्रुत्वां हनूमान्मारुतात्मजः ।
आर्जवेन यथातत्वमाख्यातुमुपचक्रमे ॥५॥
ऐक तापसी पूर्ववृत्तांत । पूर्ण ब्रह्मा श्रीरघुनाथ ।
अवतरला सूर्यवंशाआंत । कौसल्यासुत दाशरथी ॥१४॥
पित्राज्ञेच्या निजनेटीं । बंधु सौमित्र सीता गोरटी ।
श्रीराम वनवासी पंचवटीं । गंगातटीं रहिवास ॥१५॥
रामलक्ष्मण गेले मृगापाठीं । मागें शून्य पंचवटी ।
भिक्षुरुपें रावण कपटी । सीता गोरटी चोरिली ॥१६॥
तिचें करावया शोधन । किष्किंधे आला रघुनंदन ।
वाळी भ्रातृभार्याहरण । विंधोनि बाण मारिला ॥१७॥
राज्य दिधलें सुग्रीवासीं । य़ौवराज्य अंगदासी ।
सुग्रीवें धाडिलें आम्हांसी । सीताशुद्धीसी दक्षिणे ॥१८॥
दक्षिण शोधिली शतावर्तीं । शुद्धि न लभेचि सीता सती ।
सीताशोधनशुद्ध्यर्थीं । विवराप्रती आम्हीं आलों ॥१९॥
सुग्रीवाज्ञा अति दारुण । मासा यावें शुद्धि करुन ।
न ये तया रासभरोहण । विटंबन अपमानें ॥२०॥
विवरीं करिंता प्रवेशन । मास एक लोटला संपूर्ण।
विवर दुर्गम गहन । निर्गमन दिसेना ॥२१॥
बिळीं करितां प्रवेशन । आम्ही जालों मूर्च्छापन्न ।
कैसेंनि येथें आगमन । हेंही ज्ञान आम्हां नाहीं ॥२२॥
विवरींचें अभिनव चिन्ह । न कळे उत्तर दक्षिण ।
न कळे पूर्वपश्चिमभान । केउतें गमन करावें ॥२३॥
आमची आगती निर्गती । आम्हांसी न कळे निश्चितीं ।
तुजअधीन आमची गती । कृपामूर्ति कृपा करीं ॥२४॥
विवराबाहेर जाण्याची उत्कंठा :
आमची विवराबाहेर गती । आम्हांसी भेटे सीता सती ।
ऐसी कृपा करीं शीघ्रगतीं । वानरपंक्ती उद्धरीं ॥२५॥
ऐसें ऐकतां वचन । तापसी जाली सुप्रसन्न ।
विवरीचें गमानागमन । नेणती सज्ञान द्विजदेव ॥२६॥
ब्रह्मयाची वरदोक्ती । विवरीं अलियांची नव्हे निर्गती ।
बाहेर या विवराप्रती । यावया युक्ती लक्षेना ॥२७॥
मज ब्रह्मा सुप्रसन्न । विवरींचे गमनागमन ।
करावया मी सज्ञान । हें वरदान ब्रह्मयाचें ॥२८॥
ज्यासी श्रीरामाची भक्ती । दुर्गमीं त्यासी निर्गती ।
रामनामप्रतापशक्ती । भवनिर्मुक्ति हरिभक्तलां ॥२९॥
श्रीरामनांचेनि कैवाडें । कळिकाळ पळती पुढें ।
विवर कायसें बापुडें । तुम्हां सांकडें बाधावया ॥३०॥
श्रीरामसेवा नित्यकर्म । हृदयीं श्रीरामाचें प्रेम ।
नित्य मुखीं श्रीरामनाम । सर्वत्र सुगम गति त्यांसी ॥३१॥
पैल हनुमंतादि वीर । भक्तिप्रतापें प्रताप थोर ।
श्रीरामनामाचे गुणगंभीर । येणें उद्धार वानरांसी ॥३२॥
आजि माझें सफळ अनुष्ठान । होतां हनुमंतदर्शन ।
मी जालें सुखसंपन्न । महिमा गहन सत्संगें ॥३३॥
जप तप ध्यानस्थिती । अवघी सार्थक सत्संगती ।
त्या सत्संगाची अगाध कीर्ती । भवनिर्मुक्ति सत्संगें ॥३४॥
त्या तापसीच्या सांगण्यावरुन सर्व वानरांनी डोळे झाकले :
श्रीरामभक्तांच्या पंक्ती । आलेती माझिया भाग्यगती ।
सेवा करीन यशाशक्ती । बिलनिर्मुक्ती वानरां ॥३५॥
सर्वानेव बिलादस्मात्तारयिष्यामि वानरान् ।
निमीलयत चक्षूंषि सर्वे वानरपुंगवाः ॥६॥
बिळाबाहेर निर्गती । व्हावया वानरां समस्तीं ।
डोळें झांकावे निजहस्ती । माझ्या वचनोक्तीं विश्वासा ॥३६॥
डोळे उघडें असतां । देव दानव ऋषिमहंतां ।
विवराबाहेर निर्गमता । कदा कल्पांता घडेना ॥३७॥
ऐकोनि तापसीचें वचन । वानरीं आपलाले आपण ।
निजकरीं झांकोनि नयन । सावधान निर्गमार्थी ॥३८॥
वानरीं झांकोनियां डोळे । मुहूर्त एक उभे ठेले ।
उघडा ऐसे कोणी न बोले । मग पाहूं लागले उघडोनि ॥३९।
निमेषोत्तरमात्रेण बिलादुत्तरितास्तया ।
ततस्ते दद्दशुर्घोरं समुद्रं वरणालयम् ॥७॥
अपारममिगर्जंतं घोरैरुर्मिभिराकुलम् ।
मयस्य मायाविहितं गिरिदुर्गं विचिन्वताम् ॥८॥
तेषां मासो व्यतोक्रांतो यो राज्ञा समयः कृतः ॥९॥
नेत्र उघडल्यावर समोर विशाल समुद्र :
वानरीं उघडोनिंया नेत्र । पाहती तंव पुढें समुद्र ।
अतिशयेंसी दुर्धर । गर्जें घोर गडगडां ॥४०॥
पुढें देखोनि समुद्र । विस्मयो करिती वानर ।
येथें कैसेनि आलों समग्र । केलें विचित्र तापसियें ॥४१॥
नाहीं चालविलें धरोनि करीं । नाहीं घेतलें कडेवरी ।
आम्हांसी विवराबाहेरी । कैसेपरी आणिलें ॥४२॥
पुच्छीं बांधोनि समस्त । हनुमंते नेलें विवरांत ।
तैसेंहि नाहीं केलें येथ । न हालत आणिलें ॥४३॥
शोध करतात तो तापसी व विवर अदृश्य :
येव्हढें लाघव जीपासीं । केउती आहे ती तापसी ।
पाहतां न दिसे चौपासीं । वानरांसी अति विस्मय ॥४४॥
अति आवेशें वानरवीर । वन शोधितां समग्र ।
ना तापसी ना तें विवर । विस्मय थोर वानरां ॥४५॥
निरसावया वानरभ्रांती । तापसी नव्हे ती श्रीरामशक्ती ।
कृपेनें आली विवराप्रती । वानरपंक्ती तारावया ॥४६॥
मयमायेच्या मायिकशक्तीं । विवरीं वानरां अति भ्रांती ।
रामानामाच्या आवर्तीं । विवरनिर्मुक्ति वानरां ॥४७॥
करितां श्रीरामाची भक्तीं । भक्तां बांधूं न शके भ्रांती ।
रामानामाचिये ख्यातीं । विवरोन्मुक्ति वानरां ॥४८॥
श्रीरामाच्या नामभेणे । माया पळे घेवोनि प्राणे ।
स्थिर बापुडे तें कोणे । भक्तजन भुलवावया ॥४९॥
क्षुधार्थे हनुमंताची भक्ती । तापसी पावली नित्यमुक्ती ।
यालागीं हरिभक्तसंगती । भवनिर्मुक्ती भाविकां ॥५०॥
तापसी तरली वानूं किती । रामानामाच्या आवर्तीं ।
वानरीं विवरीं केली ख्याती । सावधानवृत्तीं अवधारा ॥५१॥
नामें गर्जती वानरा । नामें कोंदलेसें विवर ।
तेणें जाला विवरोद्धार । जगदुद्धार रामानामें ॥५२॥
भक्त ज्या ठायासी जाती । तो ठाव नित्यमुक्ती ।
रामनामच्या आवर्तीं । उद्धरती जड जीव ॥५३॥
वनीं वानर पाहती । नामें विवरा नित्यमुक्ती ।
वानरां विवराची अप्राप्ती । जड उद्धरती रामानामें ॥५४॥
यापरी ते वानर । करोनि विवराचा उद्धार ।
स्वयें पावले समुद्रतीर । सीता सुंदर शोधावया ॥५५॥
मागें शोधिलें गिरीगव्हर । तेथें न लभेचि सीता सुंदर ।
पुढें ओढवला समुद्र । अति दुस्तर वानरां ॥५६॥
एक महिन्याचा अवधी संपला, परत जाऊन सुग्रीवाचा
अवमान होईल म्हणून तेथेच बसून प्रायोपवेशन :
सुग्रींवें केली मासावधी । ते लोटली विवरामधीं ।
तेथेंही न लभे सीताशुद्धी । कार्यविधि नव्हेचि ॥५७॥
सीताशुद्धि न होतां पूर्ण । आम्हांसी जातां परतोन ।
सुग्रीव करील अपमान । आज्ञाल्लंघन रायाचें ॥५८॥
नरेंद्रेणाभिषिक्तोस्मि रामेणाक्लिष्टकर्मणा ।
स पूर्वं बद्धवैरो मां राजा द्दष्टवा व्यतिक्रमम् ॥१०॥
घातयिष्यति दंडेन तीक्ष्णेन कृतनिश्चयः ।
इहैव प्रायमाशिष्ये रम्ये सागररोधसि ॥११॥
सीताशुद्धीलागीं जाण । शतधा शोधली दक्षिण ।
पुढें समुद्र अति दारुण । गतिगमन खुंटलें ॥५९॥
पुढें गति खुंटली उदधीं । आतां न लभे सीताशुद्धी ।
मागें जावों नये त्रिशुद्धी । प्राणावधि वानरां ॥६०॥
ऐसें वोलोनि अंगद । दुःखें दुर्धर करी खेद ।
अवश्य मज करील विरोध । तोही संबंध अवधारा ॥६१॥
युवराजा तूं त्रिशुद्धी । तुजअधिन वानरमांदी ।
म करितांचि सीताशुद्धी । मजचि आधीं दंडील ॥६२॥
थोर करील अवकळा । रासभारोहण मुख्य तो सोहळा ।
उपानहमाळा गळां । गोमयगोळा अभिषेक ॥६३॥
सोसितां अवकळा दारुण । लोकलज्जा येईल मरण ।
यापरीस येथें आपण । द्यावा प्राण तें श्रेष्ठ ॥६४॥
सीताशुद्धि न होतां दृढ । मुख्यत्वें माझी न राखे भीड ।
इतरांचा कोण पाड । दुःख दुर्वाड वानरां प्राण रणरंगीं ॥६६॥
ऐकोनि अंगदाची गोष्टी । वानरीं भया घेतलें पोटीं ।
प्राण त्यजावा सिंधुतटीं । अवकळा मोठी कोण सोसी ॥६७॥
देहलोभे वांचों जातां । अवकळा बैसेल माथां ।
रामस्मरणें प्राण जातां । परमार्था पावेन ॥६८॥
यालागीं आम्ही अवघे जणें । अश्वमेव प्राण देणें ।
घालोनियां कुशास्तरणें । मरणा धरणें बैसलें ॥६९॥
उपविष्टास्तु ते सर्वे यस्मिन्प्रायं गिरिस्थले ।
हस्यो गृध्रराजस्य तं देशमुपचक्रमुः ॥१२॥
समुद्रतीरावर बसले असता संपातीची भेट संपातीचा त्यांना प्रश्न :
तृण घालोनि मुष्टिमुष्टी । प्रायोपवेशें समुद्रतटीं ।
वानर पडतां कोट्यनुकोटीं । देखिले दृष्टी संपातीनें ॥७०॥
जे जे आले समुद्रतीरा । तो तो संपातीचा चारा ।
वेगीं भक्षावया वानरां । संपाटी त्वरा तेथें आला ॥७१॥
तो बहुतां दिवसांचा उपवासी । देवें कृपा केली कैसी ।
मज भक्षावया वानरांसी । या ठायासी आणिलें ॥७२॥
संपाती पुसे स्वयें आपण । या ठाया जे आले जाण ।
माझें भक्ष्य त्यांसी मरण । तुम्ही येथें कोण कोणाचे ॥७३॥
तृणास्तरणीं समुद्रतटीं । वानरांच्या कोट्यनुकोटी ।
पडोनि करिती श्रीरामाच्या गोष्टी । नाहीं पोटीं मरणभय ॥७४॥
माझेनि अति उग्र दर्शनें । प्राणियांते प्राणांत पळलें ।
तुम्ही गजबजाना मनें । मरणा धरणें कां बैसलेती ॥७५॥
तुम्ही काय मरों टेंकलेती । जे या ठाया आणिलेती ।
ते माझे भोजनप्रयुक्तीं । वानरपंक्ती मराल ॥७६॥
करितां रामनामचावटी । सांगा श्रीराम कोण तो सृष्टीं ।
तुम्हांसी कोठे जाली भेटी । समूळ गोष्टी मज सांगा ॥७७॥
अंगदाकडून उत्तर, वृत्तांन्तकथन व स्वयंदानः
ऐकोनि संपातींचे वचन । अंगद म्हणे आम्ही धन्य ।
अनायासें आलें मरण । गृध्रभक्षण वानर ॥७८॥
अन्नोदकें त्यजून प्राण । चरफडोनी द्यावा जाण ।
श्रीरामें कृपा केली पूर्ण । आलें मरण अनायासें ॥७९॥
अंगद म्हणे संपातीसी श्रीरामकथा कां पुससी ।
तूं आजि अतिथ आम्हांसी । वानरांसी सुखें भक्षीं ॥८०॥
क्षुधितांसी द्यावे अन्नदान । हें तंव शास्र सनातन ।
आम्हीं तुज दिधले देहदान । करीं भक्षण वानरां ॥८१॥
वृत्तान्त ऐकून संपातीचे हृदयपरिवर्तन, रामनामाचा महिमा,
रामांचा व वानरांचा संबंध संपाती विचारतो :
संपाती बोले आपण । तुम्ही करितां रामस्मरण ।
माझेनि न करावे भक्षण । नाम रक्षण भक्तांसी ॥८२॥
जेथें रामनामस्मरण । तेथें रिघों न शके मरण ।
माझेनि न करवे भक्षण । नाम रक्षण निजभक्तां ॥८३॥
रामनामाचिया स्मरणीं । जन्ममरणां महापळणी ।
श्रीरामभक्त तुम्हीं निर्वाणीं । भाग्यें माझ्या आलेती ॥८४॥
मुखीं रामानामावृत्ती । हृदयी श्रीरामाची प्रीती ।
देह विकिलें श्रीरामभक्ती । भाग्य किती मी वानूं ॥८५॥
अतिथीचे निजभोजनीं । तुम्हीं समस्त देहदानी ।
श्रीरामभाग्यें सभाग्य जनीं । धन्य त्रिभुवनीं तुम्ही एक ॥८६॥
कोण कार्याचिये विधीं । तुम्ही आलेती सभाग्यनिधी ।
तें मज सांगावें त्रिशुद्धीं । कार्यसिद्धी मी करीन ॥८७॥
अत्यंत आवडी माझें पोटीं । ते मी पुसेन गुह्यगोष्टी ।
तुम्हीं श्रीराम देखिला दृष्टी । कैसेनि भेटी श्रीरामीं ॥८८॥
श्रीराम राजा ईश्वरेश्वर । तुम्ही वनचरें वानर ।
कैसेनि रामभजनीं तत्पर । सविस्तर मज सांगा ॥८९॥
वानरांना आश्चर्य, हनुमंताचा प्रश्न :
ऐकोनि संपातींचे वचन । वानर जाले विस्मयापन्न ।
करितां रामनामस्मरण । गीध भक्षण करूं न शके ॥९०॥
जे आले या समुद्रतीरा । तो तो संपातीचा चारा ।
त्यासी भक्षवेना वानरां । श्रीरामचंद्राचेनि नामें ॥९१॥
करितां रामनामस्मरण । स्मरत्या मारुं न शके मरण ।
आम्ही अभागी संपूर्ण । रामस्मरण न करवे ॥९२॥
करितां नित्य नामस्मरण । मृत्यु त्याचे वंदी चरण ।
आम्हांसी प्रत्यक्ष प्रमाण । गिधा भक्षण न करवे ॥९३॥
मरण न ये रामनामोक्तीं । समुद्र बापुडें तें किती ।
नामस्मरणाची निजशक्ती । अपांपती आम्हीं लंघूं ॥९४॥
धरोनि नामाचा निर्धार । आम्ही तरूं भवसागर ।
तेथें कायसा समुद्र । भाग्यें हा गृध्र भेटला ॥९५॥
ऐकतां नामाची निजख्याती । उल्लास हनुमंताचे चित्तीं ।
लंघावया अपापती । पुसे संपातीस नाममहिमा ॥९६॥
तूं अंडज पक्षी पूर्ण । रामनामीं नाहीं मरण ।
हें तुज कैसेनि गुह्य ज्ञान । मूळकथन मज सांगें ॥९७॥
श्रीरामभक्तांचे संगतीं । संपतीची गेली भ्रांती ।
पूर्वस्मरणाच्या अनुवर्ती । मारुतीप्रति सांगत ॥९८॥
संपाती हा जटायूचा बंधू, तारुण्यातील पराक्रम :
कश्यपाच्या निजकुळीं । अरुणवीर्याच्या समेळीं ।
जटायु संपाती बंधु जावळी । आतुर्बळी जन्मलों ॥९९॥
दैत्य दानव मानव प्रौढीं । सहित देव तेहतीस कोडी ।
आमचे दृष्टीस घुंगरडीं । बळाची गाढी अति मस्त ॥१००॥
आदित्यमनुधावतौ ज्वलंतं रश्मिमालिनम् ।
आवामाकाशमार्गेण जवेनोपगतौ भृशम् ॥१३॥
मध्यं प्राप्ते तु सूर्ये वै जटायुरवसीदति ॥१४॥
अंगीं बळाची आंगवण । त्यावरी आलें तरुणपण ।
पैज घालोनि दोघे जण । सूर्यचरणवंदनार्थ ॥१०१॥
पक्षबळाचेनि झडाडें । एक धावें एकापुढें ।
एक एकावरी चढे । सभानु पुढें लक्षोनि ॥१०२॥
वेगें येतां सूर्यापासीं । तंव तो मध्यान्हासीं ।
जटायु जाला कासाविसी । रविकिरणेंसी पोळोनि ॥१०३॥
तो रिघाला मजतळीं । मी श्र्लाघलों तये वेळीं ।
तंव पंखांची जाली होळी । गर्वमेळीं श्र्लाघ्यता ॥१०४॥
जटायूचे वांचले पंख । माझ्या पंखाची जाली राख ।
बाप गर्वाचें कौतुक । परम दुःख पावलों ॥१०५॥
संपातीचे पंख जळून त्याची असहायता :
माझ्या पंखाची होतां होळी । थोर दिधली म्या आरोळि ।
अरुणें देखतां तये वेळीं । थोर कळवळी पुत्रस्नेहें ॥१०६॥
सूर्याप्रति सांगे अरुण । माझे पुत्र दोघे जण ।
स्वामीचें वंदूं येतां चरण । पक्षदहण केलें तेजें ॥१०७॥
अरूणास सूर्याचे वरदान :
भूतळीं जन करिती नमन । ते मी देखेन स्वयें सुभान ।
मज दावितां अंगवण । गर्वे दहन दोहीं पक्षां ॥१०८॥
माझे तेजाचे निजदीप्तीं । गर्वीं तितुके भस्म होती ।
अरुणा तुझी हे संतती । म्हणोनि संपाती वांचला ॥१०९॥
अरुणा तुझें राखावया मन । पुत्ररक्षार्थ देतों वरदान ।
तें तूं ऐक सावधान । पुत्रसंतान उद्धारा ॥११०॥
तूं तंव माजा निजसारथी । मज तुज नित्य एक गती ।
तुझी उद्धरावया संतती । शुद्ध वरदोक्ती अवधारीं ॥१११॥
श्रीरामभक्तांचे संगीतीं । ऐकतां रामनामवचनोक्ती ।
निरभिभानें पक्षप्राप्ती । स्वयें संपाती पावेल ॥११२॥
होतां रामनामश्रवण । उभयपक्षीं निरभिमान ।
पक्ष पावोनि पूर्ण । अगम्य गमन करील ॥११३॥
निरभिमान पक्षप्राप्ती । आगमनिगम्यगती ।
येथें पावेल संपाती । सुखानुभूति श्रीरामें ॥११४॥
रामनामें दुःख निवृत्ती । रामनामें सुखसंपत्ती ।
रामनामें अगम्यगती । जाण निश्चितीं सारथिया ॥११५॥
जेथें श्रीरामआगमन । जटायु पावेल जनस्थान ।
करितां सीतासंरक्षण । रामें उद्धरण जटायू ॥११६॥
दशरथकौसल्येच्या कुशीं । श्रीराम अवतरेल सूर्यवंशीं ।
यालागीं मैत्री दशरथासीं । करि विश्वासीं जटायु ॥११७॥
जनस्थानामाझारी । जटायु गेला पक्षेंकरीं ।
दक्षिणसमुद्राचे तीरीं । मी विंध्यांद्रि तेथें पडलों ॥११८॥
दग्धपक्ष देहव्यथा । काय खावें हें नित्य चिंता ।
राम नाठवेचि सर्वथा । वरदवार्ता विसरलों ॥११९॥
नेणें मी जटायु गेला केउता । तोही नेणे माझी वार्ता ।
जटायु धन्य तुम्ही बोलतां । आजि म्यां आतां आयकिलें ॥१२०॥
संपातीने विचारल्यावरुन हनुमंत जटायूचा वृत्तांत सांगतात :
कृपा करावी हनुमंता । म्हणोनि चरणीं ठेविला माथा ।
जटायूची समूळ कथा । मज तत्वतां सांगावी ॥२१॥
ऐकोनि जटायूचें नाम । संपातीसी आलें प्रेम ।
धन्य धन्य जटायूचा धर्म । तेणें श्रीराम सेविला ॥१२२॥
मी करंटा पक्षहीन । राम नाठवे पापी पूर्ण ।
धन्य धन्य वानरांचे दर्शन । श्रीरामश्रवण मज जालें ॥१२३॥
श्रीरामाची कवण स्थिती । जटायूची कवण गती ।
तुम्ही अवघे प्राणत्यागार्थी । येथे कां आलेती तें सांगा ॥१२४॥
नामधेयमिदं भ्रातुः श्रीरामोऽपि मया श्रुतः ।
तत्त्वमिच्छाम्यहं श्रोतुं विनाशं बांधवस्य च ॥१५॥
सात शतां वर्षांपाठीं । तुम्हां वानरांच्या वाक्पुटीं ।
ऐकिली जटायूची गोष्टी । ज्याची चिंता वाहतां चित्तीं ॥१२५॥
जटायु पडला कवणे स्थितीं । जटायूची कवण गती ।
ऐसी चिंता वाहतां चित्तीं । शुद्धि निश्चितीं आज जाली ॥१२६॥
रावणें करितां सीताहरण । जटायुरावणांसी रण ।
कैसेनि जटायु पावला मरण । श्रीरामें उद्धरण कैसें केलें ॥२७॥
जटायूसी बळ संपूर्ण । मारूं न शके त्यासी रावण ।
कैसेनि जटायु पावला मरण । समूळ कथन मज सांगता स्वानंदें ॥१२९॥
दाशरथि श्रीरघुनंदन । पितृवाक्यें वनाभिगमन ।
सीता समवेत लक्ष्मण । आला ठाकून जनस्थाना ॥१३०॥
जाली जटायूसी भेटी । स्वामिसेवकां पडिली मिठी ।
आश्रम केला गंगातटीं । पंचवटीं अति रम्य ॥१३१॥
रामाश्रमीं अहोरात्र । जटायु जाला घरतीकार ।
जानकी जननी अति सुंदर । अष्टौप्रहर संरक्षी ॥१३२॥
जटायु गेला वनभ्रमणा । मृगें छळिलें रामलक्ष्मणां ।
भिक्षामिषें पैं रावण । सीताहरण तेणें केलें ॥१३३॥
ददर्श सीतां वैदेही ह्रियमाणां विहायसा ।
रावणं विरथं कृत्वा मोचयित्वा च जानकीम् ॥१६॥
छलेन युद्धधर्मेण रावणेन हतो रणे ॥१७॥
सीता आक्रंदतां जाण । जटायु आला पैं धांवोन ।
रावणेंसी केलें रण । अति निर्वाण तें ऐका ॥१३४॥
भंगिलें चाप छेदिले शर । मारिले पिशाचवदन खर ।
झडपा हाणोनि रहंवर । अति सत्वर भंगिला ॥१३५॥
शिरींचा पाडोनियां मुकुट । दहाही झांबाडिले कंठ ।
रावणा भुलवोनि वाट । प्राणसंकट मांडिलें ॥१३६॥
नखक्षतीं वाहे रुधिर । वीस भुजा केल्या चूर ।
सोडवोनि सीता सुंदर । दशशिर गांजिला ॥१३७॥
जटायु पुरे पुरे रण । माझा निघों पाहे प्राण ।
रावण दांती धरोनि तृण । जीवदान मागतसे ॥१३८॥
रावण स्वयें आला शरण । जटायु त्याचा न घे प्राण ।
रक्षिला शरणागत म्हणोन । सीता घेऊन सोडिला ॥१३९॥
पक्षें गांजिलें निश्चिंतीं । धुळीं मिळाली यशःकीर्तिं ।
रावण परतला पुढतीं । छळणार्थीं पणयुद्धें ॥१४०॥
घालोनि श्रीरामाची आण । जटायूस मृत्यु पुसे रावण ।
वामचरणांगुंष्ठीं माझें मरण । सांगे आपण छळणोक्तीं ॥१४१॥
ऐकतां निजबंधूची ख्याती । उल्लास संपातीचे चित्तीं ।
तंव तंव निजपक्ष वाढती । जेंवी वंसतीं वृक्षांगें ॥१४२॥
श्रीरामाची निर्वाण आण । जटायु मानोनि प्रमाण ।
उभयपक्षीं सांगे मरण । युद्धा रावण पेटला ॥१४३॥
जटायूनें एकाएक । अंगुष्ठ छेदिला सनख ।
रावणें उपडिले दोनी पंख । पावला दुःख जटायु ॥१४४॥
पक्षोत्पाटीं यावें मरण । घ्यावया श्रीरामाचे दर्शन ।
करितां श्रीरामनामस्मरण । कंठी प्राण राखिला ॥१४५॥
श्रीराम कृपाळु पैं पूर्ण । राखता जटायूचा प्राण ।
तेणें धरोनियां चरण । युक्तवचनीं विनविलें ॥१४६॥
तुजपुढें त्यजितां प्राण । मी होईन ब्रह्म पूर्ण ।
पुढें वांचल्याला भाग्य कोण । ऐसें मरण मग कैंचें ॥१४७॥
ऐकता जटायूचें वचन । श्रीराम जाला सुप्रसन्न ।
देहीं विदेही ब्रह्मपूर्ण । जाला आपण जटायु ॥१४८॥
ऐशापरी श्रीरघुनाथें । उद्धरोनि जटायुतें ।
पुढें सीतेच्या शुद्धीतें । आले निश्चितें किष्किंधें ॥१४९॥
तेथें वधोनि वाळीसी । राज्य दिधलें सुग्रीवासी ।
यौवराज्य अंगदासी । वाळिसुतासी दिधलें ॥१५०॥
तो अंगद दक्षिणेप्रती । सवें देवोनि जुत्पती ।
रामें धाडिले सीताशुद्ध्यर्थी । यावें मासांती मर्यादा ॥१५१॥
दक्षिण शोधितां समस्त । सीताशुद्धि न लभे येथ ।
मर्यादा लोटली विवरांत । तेणें धाकत अवघेही ॥१५२॥
अवकळा करोनि थोर । सुग्रीव दंडील महाक्रूर ।
तेणें भयें हे वानर । आले समग्र प्राणत्यागासी ॥१५३॥
शुद्धि न लभेचि सीता । काय सांगावें श्रीरघुनाथा ।
थोर बैसली लज्जा माथां । प्राणत्यागार्था येथे आलों ॥१५४॥
एकोनि हनुमंताचें वचन । संपाती घाली लोटांगण ।
तुम्ही त्यजूं नका प्राण । सीता सांगेन मी तुम्हां ॥१५५॥
तुम्ही श्रीरामसेवक । माझे भवपाशमोचक ।
मी तंव चरणरजरंक । शुद्धि निर्दोष अवधारा ॥१५६॥
शतयोजनें समुद्रपारीं । लंकागडदुर्गामाझारीं ।
अशोकवनाभीतरीं । सीता सुंदरी दिसताहे ॥१५७॥
रामनाम नित्य वाक्पुटीं । रामस्मरणाच्या निजदृष्टीं ।
पैला पाहें सीता गोरटी । मज निजदृष्टीं दिसताहे ॥१५८॥
मज जैं पंख असते येथ । मर्दोनियां लंकानाथ ।
सीता आणितों मी त्वरित । श्रीरघुनाथ सुखार्थ ॥१५९॥
ऐसें बोलतां वचन । संपातीसी निरभिमान ।
पक्ष निघालें संपूर्ण । वरदान सुर्याचें ॥१६०॥
स्वयें देखतां वानरगण । पक्ष निघाले निरभिमान ।
निरभिमानाचें निजचिन्ह । सावधान अवधारा ॥१६१॥
मर्दोनियां लंकापती । म्यां आणावी सीता सती ।
जगीं होईल अति ख्याती । हेही अहंकृती त्या नाहीं ॥१६२॥
सोडवोनि सती सीता । सुख द्यावें श्रीरघुनाथा ।
मी एक सेवक पढियंता । हेही अहंता त्या नाहीं ॥१६३॥
निरभिमानाची निजकळा । मीतूंपण न दिसे डोळां ।
श्रीराम मजहूनि वेगळा । कदाकाळ स्मरेना॥१६४॥
श्रीरामभक्तांचे संगतीं । संपातीसी येवढी प्राप्ती ।
ऐकतां ती श्रीरामकीर्ती । निजविश्रांती पावला ॥१६५॥
निरभिमानचें गमन । लंघोनियां त्रिभुवन ।
भूगोल भेदोनियां जाण । जाला परिपूर्ण परब्रह्म ॥१६६॥
ऐकोनि श्रीरामाची कीर्ती । पशु पक्षी उद्धरती ।
वनाभिगमन श्रीरघुपती । त्रिजगतीं उद्धार ॥१६७॥
एकाजनार्दना शरण । श्रीरामनामें ब्रह्म पूर्ण ।
कथा ऐकतां रामायण । उद्धरण जड जीवां ॥१६८॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणें किष्किंधाकांडे एकाकारटीकायां
संपातिउद्धरणं नाम षोडशोऽध्यायः ॥ १६ ॥
॥ ओंव्या १६८ ॥ श्लोक १७ ॥ एवं १८५ ॥