रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 2 MB (Official) द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 2

अध्याय 2

सीतेचा शोध

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

नगरशोध केल्यानंतर राजवस्तीत हनुमंत जातो :

हनुमंत महावीरें । लंका शोधिली घरोघरें ।
हाट चोहाटें चौबारें । गुप्त ओवरें स्त्रियांचीं ॥ १ ॥
ऐसें शोधितां नगरांत । न लभेचि सीताशुद्धर्थ ।
राजवर्गाच्या गृहांत । सीता हनुमंत पाहों रिघे ॥ २ ॥

विचक्रमे गृहान् वेगात् प्रहस्तस्य निवेशनम् ।
ततो न देवीति गृहं महापार्श्वस्य वीर्यवान् ॥ १ ॥
महोदरस्य च तथा महाकायस्य चैव हि ।
विद्युज्जिव्हस्य भुवनं जंबुमालेस्तथैव च ॥ २ ॥
वज्रदंष्ट्रस्य तथा शुकसारणयोरपि ।
विद्युन्माले सुमालेश्च विकटस्याप्यतुर्बले ॥ ३ ॥
बहुशत्रोः सूर्यशत्रोः कुमित्रामित्रयोस्तथा ।
चित्रकस्य च विचित्रस्य अतिगर्विष्ठमित्रयोः ॥ ४ ॥
ताम्राक्षस्य च धूम्रस्य मकराक्षमृगाक्षयो ।
लंबजिव्ह विरूपाक्ष आदिनां च महाबलः ॥ ५ ॥

मारूती उड्डाण करून प्रहस्त प्रधानादिकांची घरे शोधितो :

करोनि उड्डाणाची थोरी । हनुमंत रिघे प्रहस्तमंदिरी ।
शोधिलीं घरें ओवरींओवरीं । स्त्रियांमाझारी जानकी नाहीं ॥ ३ ॥
तेथें न लभेचि जाण । मग करोनियां उड्डाण ।
प्रहस्त महाबळिया प्रधान । त्याचेंहि भुवन शोधिलें ॥ ४ ॥
तेथोनि उडोनि झडकरी । शोधावया सीता सुंदरी ।
रिघोनि महापार्श्वाचे घरीं । अंत : पुरी शोधित ॥ ५ ॥
तेथें न लभेचि सीताशुद्धर्थ । तेथूनि उडाला हनुमंत ।
महोदराच्या घराआंत । असे पाहत जानकी ॥ ६ ॥
अतिकाय महाकाय । यांची घरें शोधित जाय ।
अखया कुमराचें ठाय । शोधोनि पाहे वैदेही ॥ ७ ॥
वज्रदंष्ट्र आणि जंबुमाळी । तेथे शोधिली जनकबाळी ।
विद्धुज्जिव्ह महाबळी । तेथें घरधांडोळी घेतली ॥ ८ ॥
रावणाचा आप्त पूर्ण । शुक आणि तो सारण ।
त्या दोघांची घरें जाण । पाहे आपण हनुमंत ॥ ९ ॥
विद्धुन्माळी आणि सुमाळी । विकटशत्रु आतुर्बळी ।
यांचे घरीं जनकबाळी । घेतां धांडोळी न लभेचि ॥ १० ॥
बहुशत्र आणि सूर्यशत्र । अमित्र कुमित शठमित्र ।
अति गर्वी चित्रविचित्र । पवनपुत्र घरें शोधी ॥ ११ ॥
धूम्राक्ष आणि ताम्राक्ष । विरूपाक्ष आणि मकराक्ष ।
शोधावया मृगशावाक्ष । परम अतिदक्ष कपि शोधी ॥ १२ ॥
घस प्रघस महघस । शोधावया मृगशावाक्ष ।
परम सावकाश । ध्यावया घस रावणासी ॥ १३ ॥
शठ निशठ महाशठ । भट उद्‌भट महाभट ।
हीं हीं घरें शोधूनि स्पष्ट । निघें मर्कट पुढारां ॥ १४ ॥
युद्धोन्मत्त महोन्मत्त । वीर वाटीव अति उन्मत्त ।
घरें शोधोनि समस्त । निघे हनुमंत पुढारा ॥ १५ ॥
भीम महाभीम सभीम । तिघांची रूपें अतिदुर्गम ।
देखतां काळास पडे भ्रम । सुखे प्लवंग तेथही शोधी ॥ १६ ॥
वीरजिव्ह वीर उद्धट । जिव्हा व्रजपाय तिखट ।
जिव्हाघायें पर्वत पीठ । करी शतकूट गिरिवरां ॥ १७ ॥
जिव्हा लांब योजन एक । सुरवरपन्नगांसी धाक ।
तींही घरें एक एक । शोधी निःशंक मारूती ॥ १८ ॥
विद्धुज्जिव्ह नाम देख । जिव्हा विद्दुत्तेजें देख ।
विजू कडकडी तैसी हाक । लोकानुलोक कांपती ॥ १९ ॥
ऐसे हे वीर विख्यात । त्यांचे त्यांचे घराआंत ।
हनुमान घरधांडोळी घेत । सीताशुद्ध्यर्थ साधावया ॥ २० ॥
विकर्ण नामें वीर निधडा । कर्णस्थानीं विकट दाढा ।
वृक्षपर्वतां करी रगडा । मुखापुढा कोण राहे ॥ २१ ॥
याचे दाढेचे भयोपण । वारा वाजों न शके पूर्ण ।
हनुमान तेथें रिघोनि आपण । सीता शोधोन स्वयें पाहे ॥ २२ ॥
जैसीं शुकाचीं चुचुवाडें । तैसें तिखट नाक गाढें ।
शुकनासिक नांव पडें । नाकें रगडीं गिरिकूट ॥ २३ ॥
लागतां नाकाचा आघात । दैत्य दानव चळीं कांपत ।
हनुमंत रिघोनिया तेथ । असें पाहत जानकी ॥ २४ ॥
अश्वमुख गजमुख । तरसतगरव्याघ्रमुख ।
त्यांचे घरीं हनुमान देख । शोधी सम्यक जानकी ॥ २५ ॥
कराळाक्ष विकराळक्ष । शोणिताक्ष भीमाक्ष ।
हनुमान शोधोनि अति दक्ष । एकैक सुखें घरें शोधिलीं ॥ २६ ॥
सुर्यरथाचें जेवढें चाक । तेवढें एकैकाचें मुख ।
यालागीं त्यांतें चक्रमुख । नाम निर्दोख तयांसी ॥ २७ ॥
मुख पसरिल्या रणाआंत । तिहीं लोकीं अति आकांत ।
गिळों शकेल मेरू पर्वत । विरविख्यात चक्रमुख ॥ २८ ॥
वाफ निघतां वदनींहूनीं । सूर्यबिंब आच्छादूनी ।
धुई दाटती ह्या गगनीं । तैंपासोनि अद्यापि ॥ २९ ॥

ही सर्व घरे पाहात असता दृष्टीसमोर आलेले घरातील एकांत प्रसंग, त्यामुळे उद्विग्न :

ऐसी घरे समस्त । हनुमान साक्षेपें शोधित ।
स्त्रीपुरूषांचा एकांत सुरतरत स्वयें देखें ॥ ३० ॥
स्त्रीपुरूषांची एकांती । नानापरींची देखोनि रती ।
हनुमान उद्वेगला चित्तीं । ते श्लोकोक्ती स्वयें बोले ॥ ३१ ॥
हनुमंत म्हणे निजचित्तीं । श्रमतां सीतेचे शुद्ध्यर्थी ।
हे मुख्यत्वें ग्रहगती । आली उपहती ब्रह्मचर्या ॥ ३२ ॥
नाहीं परदारदर्शन । नाहीं परदारसंभाषण ।
त्या मज स्त्रीपुरूषमैथुन । योनिदर्शन ये काळीं ॥ ३३ ॥
घरोघरी सीता सती । पाहतां स्त्रीपुरूष एकांती ।
देखिल्या नानापरींच्या रती । आली उपहती ब्रह्मचर्या ॥ ३४ ॥
देखे जो स्त्रीपुरूषमैथुन । हें ब्रह्मचर्या मुख्य विघ्न ।
त्या स्त्रियांचे अति मैथुन । अन्योन्य देखिले ॥ ३५ ॥
श्रीरामसेवा अति प्रीतीं । लंघोनि आलो अपापंती ।
येथें शोधितां सीता सती । अधोगति मज आली ॥ ३६ ॥
नग्न स्त्रियांचे दर्शन । तेंचि ब्रह्मचर्या नागवण ।
तेथें देखोनि मैथुन । अधःपतन मज आलें ॥ ३७ ॥
सीता शोधितां संकटी । ब्रह्मचर्या होईल तुटी ।
न शोधितां उठा उठीं । श्रीराम जगजेंठी क्षोभेल ॥ ३८ ॥
क्षोभलिया रघूत्तम । वृथा जन्म वृथा कर्म ।
वृथा गेला भजनकर्म । अति दुर्गम मज आलें ॥ ३९ ॥
शुद्धिकरितां न फिरतां । अपेश येईल माझे माथा ।
काय करूं श्रीरघुनाथा । बुद्धिदाता मज होईं ॥ ४० ॥
बुद्धिर्बुद्धिमतामस्मि । हे प्रतिज्ञा तुझी आगमनिगमीं ।
माझे संकटसंभ्रमी । कृपानुधर्मी पावावें ॥ ४१ ॥
न मे भक्त : प्रणश्यति । ब्रीदें तुझी गा श्रीरघुपती ।
सीताशुद्धीचे आकांती । कृपामूर्ति पावावें ॥ ४२ ॥

ही रतिप्रसंगांची दृश्ये ब्रह्मचर्याविघातक म्हणून मारूतीचा उद्वेग :

हनुमंताची अति चिंता । कळों सरली श्रीरघुनाथा ।
प्रकटला ह्रदया आतौतां । भक्त साह्यार्थी श्रीरामा ॥ ४३ ॥
मुखीं श्रीरामनाममुद्रा । ह्रदयीं स्मरतां श्रीरामचंद्रा ।
उल्लास जाला त्या कपींद्रा । श्रीरामभार्या शोधावया ॥ ४४ ॥
करितां श्रीरामांचे स्मरण । ह्रदयीं आली आठवण ।
देखतां परदारमैथुन । बाधकपण मज नाहीं ॥ ४५ ॥
देखातां परदार नग्न । देखोनि परदारमैथुन ।
मज नाहीं कामकमान । श्रीरामचरणप्रसादें ॥ ४६ ॥
देखतां परदाररती । अल्पही कामाची स्फूर्ती ।
बाधीना ज्ञानियांचे चित्तीं । श्रीरघुपतिप्रसादें ॥ ४७ ॥
चित्तामाजी कामाची वस्ती । तेणेंचि ते करितां श्रीरामभक्ती ।
चित्त पावलिया चैतन्यस्थिती । कामानिवृत्ति सहजेंचिं ॥ ४८ ॥
जेंवी अंधारिया रातीं । खद्ध्योत नक्षत्रें लखलखिती ।
तेथें उगवल्या गभस्ती । अस्त पावती अवघींहीं ॥ ४९ ॥
तेंवी काम क्रोध लोभ चित्ती । तेणें चित्तें करितां भक्ती ।
राम प्रगटिलिया सर्वां भूतीं । अस्त पावती काम क्रोध ॥ ५० ॥
इंद्रियां प्रवर्तक मन । मनाचें पोटीं स्त्रीपुरूषभान ।
सकळ कामासी कारण । मनचि जाण बाधक ॥ ५१ ॥
जेंवी समुद्रजळीं लवणकण । विरोन समुद्र होय आपण ।
तेंवी करितां श्रीरामस्मरण । मनचि परिपूर्ण परब्रह्म ॥ ५२ ॥
मनाची मावळली मनोवृत्ती । स्त्रीपुरूषांचे एकांती ।
शोधितां सीता सती । बाध चित्तीं मज नाहीं ॥ ५३ ॥
मन मावळतांचि पाहीं । मी देहींच जालो विदेहीं ।
आतां नग्न स्त्रियांच्या ठायी । शोधीन वैदेही विदेहत्वें ॥ ५४ ॥
नग्न देखतां सूकर श्वान । पुरूषास नव्हे कामकामन ।
तेंवी देखतां स्त्रीपुरूषमैथुन । बाधकपण मज नाहीं ॥ ५५ ॥
शस्त्र घालितां दळाआंत । पुरूष नव्हे कामासक्त ।
तेंवी रिघतां योनींआंत । कामकामार्थ मज नाहीं ॥ ५६ ॥
माशीवरी बैसल्या माशी । काम नुपजे कोणासी ।
तेंवी देखतां मैथुनासी । शंका मानसीं मज नाहीं ॥ ५७ ॥
पाविजे सद्‌गुरूचा वचनार्थ । तैंच कामाचा समूळ घात ।
तो मज तुष्टला श्रीरघुनाथ । कामकार्यार्थ मज नाहीं ॥ ५८ ॥
स्त्री चुकली सीता सती । ते शोधावी स्त्रियांप्रती ।
त्या स्त्रियांची देखतां रती । कामस्फूर्ती मज नाहीं ॥ ५९ ॥
स्त्री चुकली सीता सुंदरी । ते शोधावी स्त्रियांमाझारी ।
वांचून शोधितां श्वानशूकरीं । श्रीरामनारी तेथें कैंची ॥ ६० ॥
सीता चुकलियासाठीं । वना धांवोनि उठाउठीं ।
शोधूं जातां मृगांची थाटी । मूर्खदृष्टी शोधक ॥ ६१ ॥
तें मज नाहीं मूर्खपण । सीताशुद्ध्यर्थ मी सज्ञान ।
शोधीन मी समस्त भुवन । गुह्यस्थानें स्त्रियांचीं ॥ ६२ ॥
जें कां अत्यंत विषम स्थान । तेथें रिघतां संकट गहन ।
तेथें तेथें मी प्रवेशोन । सीता शोधीन साक्षेप ॥ ६३ ॥
मागें शोधिलें भुवनोभुवन । आंता शोधीन दुर्गम स्थान ।
ऐसी धरोन आंगवण । उडे आपण हनुमंत ॥ ६४ ॥

इंद्रजिताच्या भुवनात, भुवनवर्णन :

हनुमान उडों पाहे आपण । तंव देखिलें इंद्रजितभुवन ।
अनर्घ्य रत्‍नीं विराजमान । तेजें गगन लखलखित ॥ ६५ ॥
घरावरी घरकुसरी । उपरीवरी उपरी ।
आटाळिका थोर थोरी । त्यांहीवरी चौबारें ॥ ६६ ॥
रावणाचे घराहूनी । शोभा इंद्रजिताचें भुवनीं ।
कनककळस जडितरत्‍नीं । लागले गगनीं लखलखित ॥ ६७ ॥
श्वेत पीत आरक्त भारीं । पताका झळकती अंबरी ।
जागेल घालिजे महा असुरीं । हारोहारीं दीपिका ॥ ६८ ॥
हाकोनियां उपराउपरी । घरटी घालिजे महावीरीं ।
वायूसी रीघ नाहीं भीतरीं । पाहे चौफेरीं हनुमंत ॥ ६९ ॥
तीन खणे चारी खण पांच खणें । सप्तखणें आणि नवखणें ।
त्यांमाजी आहे महादुखणें । नित्य कुंथणें वाटिवा ॥ ७० ॥
आंत दुखण्याचें छेदन । करील लक्ष्मणाचा बाण ।
युद्धचर्या सांडील पूर्ण । पाडील खण गर्वाचें ॥ ७१ ॥
देखोनि इंद्रजितभवन । हनुमान खवळला आपण ।
भीतरीं रिघावया जाण । अणुप्रमाण स्वयें जाला ॥ ७२ ॥
रिघोनियां गवाक्षद्वारीं । वेगें पाहिलीं घरें चारी ।
शोधोनियां ओवरीं ओवरीं । उपर्याउपरीं धांडोळी ॥७३ ॥

सुलोचनादर्शन :

अट्टालिकांहिमाझारी । हनुमान पाहे सीता सुंदरी ।
तंव देखिली नवलपरी । सहित अंतुरी इंद्रजित ॥ ७४ ॥
मरकतमंचक सुंदर । त्यावरी त्राहाटिले मयूर ।
शेज रचिली सुकुमार । सुमनें अरूवार सुगंधें ॥ ७५ ॥
मुक्तघोंसीं युक्त वितान । घवघवीत शोभायमान ।
कर्पूरवाती तेज गहन । पीकदानें रत्‍नाची ॥ ७६ ॥
अति सुगंधा सुवर्णभिंती । पाचुनिबद्ध अवघी क्षिती ।
सुलोचना महा सती । विडिया देत इंद्रजिता ॥ ७७ ॥

सीतेचा भास आणि संताप :

सुलोचना पतिव्रता । कदा नुल्लंघी पतिवचनार्था ।
तीसी देखोनि हनुमंत । म्हणें हे सीता निश्चित होय ॥ ७८ ॥
नागकन्या सुलोचना । ते तंव पद्मिनी पद्मनयना ।
देखोनि हनुमान म्हणे जाण । रामांगना हे होये ॥ ७९ ॥
पद्मिनी स्त्रियेचा विचार । पाउलीं पाउलीं भ्रमतीं भ्रमर ।
अंगसुवास मनोहर । सीता सुंदर हे होय ॥ ८० ॥
माझ्या स्वामीची हे कांता । अनुसरली रावणसुता ।
दोहींच्या करीन मी घाता । कोप हनुमंता पैं आला ॥ ८१ ॥
डोळें आरक्त क्रोधें कडाडी । वळिली पुच्छाची पैं वेटोळीं ।
दोघांची मुरडावया नरडी । शेंडी तडतडी हनुमंताची ॥ ८२ ॥
अधर्मी रतलीसे सीता । उभयवर्गा मारीन आतां ।
कोप आलिया श्रीरघुनाथा । दोघांचे प्रेतां दावीन ॥ ८३ ॥
अथवा निजपुच्छीं बांधोनी । जीत धरोनि नेईन दोनी ।
रागें घुलकावितो गगनीं । उडी घालोनी मारावया ॥ ८४ ॥

सुलोचना – इंद्रजित यांचा संवाद :

तंव सुलोचना ते पतिव्रता । पतीचे चरणीं ठेविला माथा ।
कांहींएक पुसेन मी आतां । प्राणनाथा क्षमा कीजे ॥ ८५ ॥
यावज्जन्म तुम्हांप्रती । नाहीं केली म्यां विनंती ।
हा घात देखोनि लंकापती । काकुलती पुसतसें ॥ ८६ ॥
राखों जातां अशोकवन । तुम्ही पावाल अति अपमान ।
अखया कुमरा आलें मरण । कुळनिर्दळण राक्षसां ॥ ८७ ॥
तंव इंद्रजित पुसे प्रियेप्रती । ऎंसे होय कैशा रीतीं ।
रावणें आणिली सीतासती । कुळसमाप्ती राक्षसां ॥ ८८ ॥
वनीं छळोनि जनकबाळीं । आणि छळला श्रीरामबळी ।
तेणें तो करील लंकेची होळी । राक्षसकुळीं आकांत ॥ ८९ ॥
तुम्हांवरी ओखटें चिन्ह । देखोनि धाके माझें मन ।
प्रार्थुनी दशानन । बुद्धि आपण सांगावी ॥ ९० ॥
तूं तंव त्याचा ज्येष्ठ कुमर । तुझा विश्वास त्यास थोर ।
सीता देवोनि सुंदर । श्रीरामचंद्र करीं सखा ॥ ९१ ॥
सखा केलिया श्रीरघुनाथ । राक्षसकुळ होईल स्वस्थ ।
तुम्ही अक्षयी समस्त । यशवंत तिहीं लोकीं ॥ ९२ ॥
इंद्रजित सांगे अति एकांत । रावणासीं सीतासन्निपात ।
जो जो सांगेल हितस्वार्थ । त्याचा घात करूं धांवे ॥ ९३ ॥
सख्य करोन श्रीरघुनाथा । सीता सोडीं मज म्हणता ।
माझ्याच करूं धांवेल घाता । बैसेल माथां पितृदोह ॥ ९४ ॥
ऐकें प्रिये सावधान । चुकविलिया न चुके मरण ।
होणार तें होईल जाण । बुद्धि आपण न सांगावी ॥ ९५ ॥

हनुमंताची खात्री :

ऐसी दोघांची एकांतकथा । ऐकोनि हनुमंता ।
सुलोचना नव्हे सीता । ऐसें तत्वतां मानलें ॥ ९६ ॥
इंद्रजित सुलोचना एकांती । कोणें ठायीं सीता सती ।
राखिली आहे लंकापती । तें मारूती नायकेचि ॥ ९७ ॥
लंकेमाजी आहे सीता । शुद्धी लागली हनुमंता ।
तिसी शोधावया तत्वतां । होय निघता तेथोनि ॥ ९८ ॥

कुंभकर्ण भुवन :

मेघाहूनि उंच शिखर । मेघवर्ण दीर्घ शिखर ।
तेथें शोधावया सीता सुंदर । उडे सत्वर मारूती ॥ ९९ ॥
सादरें शोधितां घर । हनुमान दचकला थोर ।
कुंभकर्ण महाथोर । निशाचर पहुडला ॥ १०० ॥
दीर्घ करितां महाघोर । नादें कोंदले अंबर ।
शंखा केलियाहि समोर । कानीं उत्तर पडेना ॥ १०१ ॥
श्वासोच्छ्वासाच्या आवर्तीं । शतानुशत पडले हस्ती ।
निर्गमू नाहीं तळमळती । म्हैसे आरडती त्यामाजीं ॥ १०२ ॥
दोन्ही नासापटरंध्री । सगळे कळप रिघती करी ।
त्यांचा निर्गमू नाहीं बाहेरी । प्राणी मारिती प्राण्यांतें ॥ १०३ ॥
गाई म्हैशी बैल घोडीं । श्वासोच्छ्वासीं घुंगरडीं ।
निदसुरीया नाक रगडी । मारती किडी प्राण्यांच्या ॥ १०४ ॥
हनुमान म्हणे आपुल्या चित्तीं । जैं रचिली याची मूर्तीं ।
तैं आळस नाहीं प्रजापती । अमूप माती रचियेली ॥ १०५ ॥
बाबरझोट्यां अति विशाळ । जैसे भाले अणियाळ ।
अंगींचीं रोमें जैसीं शूळ । दांत विक्राळ खतेले ॥ १०६ ॥
शेवाळले दिसती दशन । कदा न करी दांतवण ।
देखोनियां त्याचें वदन । आलें वमन हनुमंता ॥ १०७ ॥
येथें आलिया श्रीरघुनंदन । याची पहावी आंगवण ।
प्रथम यांसी माझें रण । केला पण हनुमंतें ॥ १०८ ॥
देखोनि त्याची देहस्थिती । कंटाळला स्वयें मारूती ।
येथें कैंची सीता सती । म्हणोनि चित्तीं त्रासला ॥ १०९ ॥
अति त्रासें उद्वेगला । अत्यंत खेदें खिन्न झाला ।
ब्राह्मणजन्म हा पावला । व्यर्थ गेला निद्रेनें ॥ ११० ॥

निद्रेचा प्रभाव :

अर्धे आयुष्य हातोहातीं । बळेंचि हिरोन नेलें रातीं ।
जागा जालिया स्त्रियेंसीं रती । कामासक्ति कामाची ॥ १११ ॥
कुटुंबचिंतां बैसली चित्तीं । ते तंव न सोडी कल्पांती ।
आयुष्य गेलें याचि रीतीं । द्रव्यासक्ती अति तृष्णा ॥ ११२ ॥
भोजनशयनद्रव्यासक्ती । जन नागवले याच रीतीं ।
कुंभकर्ण नागविला सुषुप्तीं । सीता सती येथ कैंची ॥ ११३ ॥

बिभीषणाचे घर :

तेथोनि करोनि उड्डाण । देखिलें बिभीषणाचें भुवन ।
टके पताका वृंदावन । हरिकीर्तन रामाचे ॥ ११४ ॥
टाळघोषमृदंगमेळीं । नैराश्यें निधडा वैष्णव बळी ।
नामासरसीं वाजवी टाळी । सुखसमेळीं डुल्लत ॥ ११५ ॥
कीर्तनसुखें सुखावले । आपाआपणिया विसरले ।
परमानंदे तृप्त जाले । गाऊं लागले रामगुण ॥ ११६ ॥
निरपेक्षी विचक्षण । श्रुती उपरमे सावधान ।
श्रीराम सगुणी निर्गुण । करिती कीर्तन तें ऐका ॥ ११७ ॥
श्रीरामें धरणी अति पावन । राम जीवन राम दहन ।
राम तपन राम गगन । राम परिपूर्ण परब्रह्म ॥ ११८ ॥
राम मनाचें उन्मन । राम चित्ताचें चैतन्य घन ।
राम बुद्धिचें सज्ञान । राम परिपूर्ण परब्रह्म ॥ ११९ ॥
राम जंगमीं स्थावरीं । राम सबाह्य अभ्यंतरीं ।
राम परमात्मा श्रीहरी । जगदुद्धारी श्रीराम ॥ १२० ॥
देखोनि कीर्तनाची गोडी । हनुमंता अत्यंत आवडी ।
रंगीं घालोनियां वेगें उडी । गुप्त गडबडीं नाचत ॥ १२१ ॥
रंगी नाचतां हनुमंत । रंगी ओसंडला परमार्थ ।
तेणें बिभीषण मूर्छित । परम भक्त परमार्थी ॥ १२२ ॥
हनुमंता स्वयें दर्शन । नाठवे देह विदेहभान ।
बिभीषण मूर्च्छापन्न । आपणा आपण विसरला ॥ १२३ ॥
दोघांसीं ओळखी नसतां । दोघां भेटी गोष्टी न होतां ।
दोघां झाली एकात्मता । श्रीरामकथाकीर्तनें ॥ १२४ ॥
हरिकीर्तन तें स्वकर्म । हरिकिर्तन तो स्वधर्म ।
हरिकीर्तन प्रेम परम । जें परब्रह्म प्रापक ॥ १२५ ॥
बिभीषणाचे भुजेप्रती । दिग्विजयी श्रीराममूर्ती ।
ते देखोनिया मारूती । परम प्रीतीं सुखावे ॥ १२६ ॥
बिभीषणा श्रीरामभक्त । हनुमान आनंदें नाचत ।
भावें भजतां श्रीरघुनाथ । नित्य मुक्त बिभीषण ॥ १२७ ॥
राक्षसा श्रीरामाची भक्ती । हरिखें उपरमें मारूती ।
रामें रावणाची केलिया शांती । राज्यप्राप्ति बिभीषणा ॥ १२८ ॥
माझ्या श्रीरामाची भक्ती । राज्य करितां नित्यमुक्तीं ।
असतां स्त्रीपुत्रसंतती । भुक्ति मुक्ति भंगेना ॥ १२९ ॥
हनुमंतें केला पण । रामें मर्दिलिया रावण ।
लंकापती बिभीषण । हें शुभ चिन्ह सत्य माझें ॥ १३० ॥
जेथें श्रीरामाची भक्ती । तेथें आहे श्रीरामशक्ती ।
रामराज्य लंकेप्रती । सीता सती येतांचि देख ॥ १३१ ॥
जेथें रिघाली रामशक्ती । तेथेंचि भुक्ति तेथेंचि मुक्ती ।
रामराज्याची ऐशी स्थिती । केला मारुती निश्चयों ॥ १३२ ॥
सीता आगमन लंकेप्रती । रावणासी मरणमुक्ती ।
बिभीषणा राज्यप्राप्ती । केला मारुती निश्चयों ॥ १३३ ॥
मागील श्रम खेद उपहती । येथें आलिया झाली शांती ।
धन्य वैष्णवाची संगती । महिमा किती मी वानूं ॥ १३४ ॥
संतसंगे निरसे भ्रांती । संतसंगे जड उद्धरती ।
संतसंगे ब्रह्मप्राप्ती । नित्य मुक्ति सत्संगें ॥ १३५ ॥
संतचरणींचे रज : कण । हनुमान वंदी पैं आपण ।
चरणरजीं घाली लोटांगण । परम पावन पदरज ॥ १३६ ॥
चरणरजस्नानापुढें । तीर्थमात्र तें बापुडें ।
चरणरजें मुक्ति जोडे । ब्रह्म आतुडे पदरजें ॥ १३७ ॥
बिभीषणाच्या भवनाप्रती । हनुमान पावला सुखविश्रांती ।
भगवद्‌भक्त जेथें भेटती । भ्रमनिवृत्ति आकल्प ॥ १३८ ॥
अर्थी स्वार्थी परमार्थी । गेलिया भक्तभवनाप्रती ।
त्याचेनि संगे सुखप्राप्ती । भ्रमनिवृत्ति आकल्प ॥ १३९ ॥
एकाजनार्दना शरण । दुरोनि देखिल्या भक्तभवन ।
हनुमान झाला सुखसंपन्न । समाधान जीवशीवा ॥ १४० ॥
प्रत्यक्ष झालिया भक्तभेटीं । त्यासी पुसतां गुह्य गोष्टीं ।
परमानंदी पडली मिठी । धन्य सृष्टीं हरिभक्त ॥ १४१ ॥
एकाजनार्दना विनंती । शोधूं जातां सीता सती ।
बिभीषणाच्या भवनाप्रती । सुखसंपत्ती मारूतीसी ॥ १४२ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडे एकाकारटीकायां
सीताशोधनं नाम द्वितीयोऽध्यायः ॥
॥ ओव्यां १४२ ॥ श्लोक ५ ॥ एवं संख्या १४७ ॥