रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 5 MB (Official) द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 5

अध्याय 5

मारूतीला अशोकवनात सीतेचे दर्शन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

रावणाचा शांतिहोम :

विघ्नदेखिलें सभेआंत । रावण होम क्री शांत्यर्थ ।
मंदोदरी सेजे गुप्त । देखे हनुमंत एकाकी ॥ १ ॥

मंदोदरीलाच सीता समजून हनुमंताचे विचार व मनोविकार :

ही निश्चयें होय सीता । ऐसें मानलें हनुमंता ।
तेचि अवधारा पैं कथा । श्लोकीं श्लोकार्थ अवधारिजे ॥ २ ॥
विमानीं उपराउपरीं । शोधितां एकांत ओवरी ।
रावणाचे सेजेवरी । मंदोदरी देखिली ॥ ३ ॥
ठाण माण गुणलक्षण । रूपरेखा स्थान यौवन ।
सीतेसारखी समसमान । दोघी अनुपम्य स्वरूपें ॥ ४ ॥
हेचि श्रीरामाची कांता । हेचि माझी स्वामिनी सीता ।
ऐसे मानिलें हनुमंता । उल्लासतां नाचत ॥ ५ ॥
हर्षे निजबाहु आफळी । पुच्छा चुंबी सुखमेळी ।
परमानंदें पिटी टाळी । जनकबाळी भेटली ॥ ६ ॥
मज जोडली सीताशुद्धी । जाहली श्रीरामकार्यसिद्धी ।
ही जानकी होय त्रिशुद्धीं । हर्षानंदी नाचत ॥ ७ ॥
आतां फिटेल सांकडे । कैसें रावण बापुडें ।
वांकुल्या दावी देवाकडे । वेगें उडे स्वानंदें ॥ ८ ॥
हनुमान आनंदें डुल्लत । माझा जाहला निजस्वार्थ ।
मज तुष्टला श्रीरघुनाथ । चुकल अनर्थ वानरा ॥ ९ ॥
ऐकतां सीताशुद्धाची गोष्टी । श्रीरामासी आनंदकोटी ।
हर्षे माझी पाठी थापटी । सुखसंतुष्टी वानरा ॥ १० ॥
हर्षे जातां हनुमंत । करोनि रावणें होम समाप्त ।
सेजे आला लंकानाथ । चिंतायुक्त उद्वेगी ॥ ११ ॥
देखोनि विघ्नांची पैं थोरी । रावणासी भय भारी ।
न उठवितां मंदोदरीं सेजेवरी पहुडला ॥ १२ ॥

होम समाप्तीनंतर मंदोदरी रावणाची पूजा करिते :

रावणाचे सांचलेवरी । जागी जाहली मंदोदरी ।
वेगें उठोनि चरण धरी । नमस्कारीं सद्‌भावें ॥ १३ ॥
घेवोनि जांबुनदतस्त । पतिचरण प्रक्षाळित ।
तें देखोनि हनुमंत । अत्यद्‌भुत कोपला ॥ १४ ॥

हे दृष्य पाहून मारूतीचा क्षोभ :

माझिया स्वामीची हे कांता । अनुसरली लंकानाथा ।
मी काय उगाचि पाहूं आतां । करीन घात दोघांच्या ॥ १५ ॥
दाही शिरें लंकानाथा । अकरावा सीतेचा माथा ।
नखे खुडूनियां आतां । नेईन रघुनाथा भेटीसीं ॥ १६ ॥
सीता रतली लंकानाथा । त्या दोहींच्या केलिया घाता ।
कोपलिया श्रीरघुनाथा । चरणीं माथा ठेवीन ॥ १७ ॥
किंवा जीत पुच्छीं बांधोनी । श्रीरामापासीं नेईन दोन्हीं ।
मग तो दंडील निजबाणीं । ऐसेंही मनीं विचारीं ॥ १८ ॥
अथवा करूं आणीक एक । पुच्छी बांधोनि मंचक ।
दोघे किष्किंधे नेलिया देख । दोष निर्दोख राम जाणे ॥ १९ ॥
ऐसें करितां जाण । श्रीरामें सांगितली खूण ।
आधी पाहों पां आपण । नाममहिमान सीतेचें ॥ २० ॥
सीतेचें स्तंभभिंती लाविता कर्ण । तेथें नुठी रामस्मरण ।
कानीं लावितां पाषाण । नामोच्चारण तेथें नाहीं ॥ २१ ॥
पतिव्रता त्यागितां पती । तेथोनि पळे नामशक्ती ।
सीता सती ते असती । नामकीर्ति मावळली ॥ २२ ॥
सीता रतली अनाचारीं । नाम नुठी चराचरीं ।
इसी मी आता जीवें मारीं । आला वानरीं अति कोप ॥ २३ ॥
रागें कांपत थरथरां । दात खातसे करकरां ।
डोळे भोवंडी गरगरां । रोम थरथरा थरकती ॥ २४ ॥
दोघां मारावया कडाडीं । वळिली पुच्छाची पैं विडी ।
रागें पिंजारिली दाढी । शेंडी तडतडी हनुमंताची ॥ २५ ॥

अविचार करण्यापूर्वी खरे काय आहे ते ठरविण्याचा निश्चय :

कोपामाजी हनुमंत । अतिशयेंसी बुद्धिवंत ।
ऐकतां सुलोचनावृत्तांत । इंद्रजित वांचला ॥ २६ ॥
आतांही कोप करू शांत । या दोहींची ऐकों मात ।
विचारोनि शब्दार्थ । निजकार्यार्थ साधावा ॥ २७ ॥

क्रोधाचे परिणाम :

कोप आलिया दुर्धर । जयाचा लोपेना विचार ।
तोचि मोक्षगामी नर । परम धीर तो एक ॥ २८ ॥
कोपामाजी सावधान । अवतारपुरूषाचें हें चिन्ह ।
तें तें चालतें ब्रह्मज्ञान । जग पावन त्याचेनि ॥ २९ ॥
लोभ क्रोधांचे कारण । तो हनुमंता नाहीं जाण ।
यालागी क्रोधी सावधान । रघुनंदनगुरूकृपा ॥ ३० ॥

दोघांचा संवाद. मंदोदरीला पडलेले वाईट स्वप्न :

कपीनें कोप शांत करूनी । दोहींच्या कथा ऐकाव्या कानीं ।
राहिलासे गुप्त होऊनी । सावधानीं सादर ॥ ३१ ॥
मंदोदरी म्हणे लंकानाथा । दुष्ट स्वप्न म्या देखिलें आतां ।
तेणें पावलें अति आकांता । तें सादरता अवधारीं ॥ ३२ ॥
ऐसें स्वप्न देखिलें नयनीं । पडलंके क्रौंचा निर्दाळोनी ।
तो पुरूष निघोन अशोकवनीं । श्रीरामपत्‍नी शोधित ॥ ३३ ॥
तो रिघतां अशोकवनीं । त्रिविध शोक लंकाभुवनीं ।
पुत्रशोक पतिअपमानीं । पुरदहनीं आकांत ॥ ३४ ॥
अशोकवनीं अति आप्त । केला सीतेंसी एकांत ।
करोनि वनकरांचा घात । समुद्रांत निक्षेपी ॥ ३५ ॥
अशोकवनाची खंदळी । तो मारिला जंबुमाळी ।
राक्षसकुमरां करोनि होळी । उपटिली पौळी अखयातें ॥ ३६ ॥
सैन्यासी करोनि निःपात । इंद्रजित गेला युद्धाआंत ।
करितां राक्षसांचा घात । भयें पडत मेघनाद ॥ ३७ ॥
तो ब्रह्मयानें आणिला बांधोनी । रागें पुच्छातें पेटवोनी ।
तुमच्या दाढ्या मिशा जाळोनी । प्रथम कंदन हें केले ॥ ३८ ॥
लंका जाळीत भडभडां । पुच्छें नगरा लाविला वेढा ।
रिघों नेदी मागापुढां । चहूंकडा आकांत ॥ ३९ ॥
ऐसें दुष्ट स्वप्न देखोनि । वेगें उठलें गजबजोनी ।
थोर धाक लागला मनीं । निद्रा नयनीं लागेना ॥ ४० ॥
मग चरणक्षाळण करोनी । शुद्धाचमनातें सेवूनी ।
सदाशिवाला स्मरोनी । डावे कानीं निजेलें ॥ ४१ ॥
तंव स्वप्न देखिलें दुर्धर । शिळीं बांधोनि सागर ।
लंके आले नरवानर । निशाचरनिर्दळणीं ॥ ४२ ॥
इंद्रजित कुंभकर्ण दोनी । दोघे मारिले दोघें जणीं ।
तुमचीं शिरें रामबाणी । गिधाचे चरणीं लोळती ॥ ४३ ॥
रणीं निमाला दशानन । माझ्या चुडियां पडलें खान ।
ऐशी करितसे रूदन । आक्रंदन उठियेली ॥ ४४ ॥
ऐसें सांगता एकाएक । मंदोदरी भुलली देख ।
बैसोनि रावणाचे संमुख । करी शंख अति दुःखें ॥ ४५ ॥
बोंब पडली लंकेआंत । रणीं निमाला लंकानाथ ।
म्हणोनि महाशब्द करित । तेणें हडबडित रावण ॥ ४६ ॥

रावणाकडून मंदोदरीचे सांत्वन :

मग धांवोनि लंकानाथ । तिचे धरिले दोन्ही हात ।
मी तंव आहें जीवें जीत । तूं कां वृथा तळमळसी ॥ ४७ ॥

मंदोदरीची प्रार्थना :

सावध म्हणे लंकानाथा । माझें स्वप्न नव्हे मिथ्या ।
अशोकवनीं राहिली सीता । तुमचे घात ते करील ॥ ४८ ॥
सख्य करोनि श्रीरघुनाथा । त्यासी संतोषे देइजें सीता ।
तेणें तुज कल्याण लंकानाथा । आणि समस्ता राक्षसां ॥ ४९ ॥
मीं तंव होतें तुमची दासी । म्हणोनि लागलें पायांसी ।
भुक्ति मुक्ति होय आम्हासी । सीता रामासी अर्पिलिया ॥ ५० ॥

त्या संवादात सीतेचा पत्ता लागल्याने मारुतीला आनंद व पुढिल बेत :

सीता ऐकतां अशोकवनी । हनुमान उल्लासला मनीं ।
हर्ष न माया त्रिभुवनीं । श्रीरामपत्‍नी चोजवली ॥ ५१ ॥
सीता आहे अशोकवनीं । अशोकवनिका कोण स्थानीं ।
तें समूळ ऐकावया कानीं । सावधानी हनुमंत ॥ ५२ ॥
रावणमंदोदरी एकांत । समूळ परिसा वृत्तांत ।
गुप्त राहोनि हनुमंत । चित्तीं सावचित वचनार्थी ॥ ५३ ॥

सीतेच्या नामोच्चारामुळे रावणाचा चित्तक्षोभ :

जानकी आठविता चित्ता । काम खवळला लंकानाथा ।
अशोकवना जाऊनियां आतां । बळेंचि सीता भोगिन ॥ ५४ ॥
नांठवे सभेचें अति विघ्न । नाठवे मंदोदरीचें स्वप्न ।
सीतासंभोगीं दशानन । अति उद्विग्न कामार्थी ॥ ५५ ॥
सहा महिने अशोकवनीं । म्या ठेविली जनकनंदिनी ।
आतां निजबळेंकरूनी । रामपत्‍नी भोगीन ॥ ५६ ॥
सीताकामें सकामता । सन्निपात लंकानाथा ।
विसरला हितहितार्था । नाठवे चित्ता निजस्वार्थ ॥ ५७ ॥
सीताचिंता नित्यचिंतनी । सीता नाम नित्य वदनीं ।
सीता नाम स्मरे अनुदिनीं । ध्यानीं मनीं जानकी ॥ ५८ ॥
सकाम स्मरता पैं सीता । पापधुणी लंकानाथा ।
हें सामर्थ्य श्रीरामभक्तां । भेटी रघुनाथा तिचेनी ॥ ५९ ॥
रावणासी सकामता । कळली मंदोदरीची चिंता ।
सीता अर्पावी श्रीरघुनाथा । लंकानाथा नमनेंसीं ॥ ६० ॥
सीता करावी रामार्पण । कदा न मानी दशानन ।
मंदोदरीस कळलें चिन्ह । स्वहितवचन अनुवादें ॥ ६१ ॥
मीच जावोनि आपण । इंद्रजित आणि कुंभकर्ण ।
प्रधानांसी पाचारून । रामार्पण करीन सीता ॥ ६२ ॥
सीताकामें रावण वेडें । सांगों नये तयापुढें ।
अर्पितां सीता मज राम जोडे । फिटे साकडें भवाचें ॥ ६३ ॥
सखा जोडोनि रघुनंदन । विघ्न तें होय निर्विघ्न ।
चित्त होय चैतन्यघन । दुःख संपूर्ण सुख होय ॥ ६४ ॥
श्रेष्ठ सुख तेंचि मरण । मरता स्मरल्या श्रीरामचरण ।
मरण होय ब्रह्म पूर्ण । सुखैकघन श्रीराम ॥ ६५ ॥
ऐसेंच मी करीन आतां । शरण रिघेन श्रीरघुनाथा ।
स्वयें अर्पितांचि सीता । लंकानाथा कल्याण ॥ ६६ ॥

रावणानें योजलेली युक्ती :

ऐकतां मंदोदरीचें वचन । रावण जाहला अति उद्विग्न ।
प्रिया नव्हे महाविघ्न । सीता हरोन नेऊं पाहे ॥ ६७ ॥
मंदोदरीचें वचन । इंद्रजित आणि कुंभकर्ण ।
नुल्लंघिती अणुप्रमाण । प्रधानजनही अवघे ॥ ६८ ॥
मंदोदरीचे वचनार्था । करिती मजही न पुसता ।
इणें हिरोनि नेली सीता । दुःखावस्था रावणा ॥ ६९ ॥
अत्यंत खळबळला रावण । करावया मंदोदरीछळण ।
युक्ति करी दशानन । सावधान अवधारा ॥ ७० ॥
विघ्न निरसावया समस्त । अनुसरावया श्रीरघुनाथ ।
आधीं पूजूं उमाकांत । कुळदैवत तो आम्हां ॥ ७१ ॥
सदाशिवाचे आज्ञेवरी । श्रीरामा अर्पू सीता सुंदरी ।
यापरी छळोनि निजनारी । कार्यांतरीं गोंविली ॥ ७२ ॥
रावणें पूजिला श्रीशंकर । मंदोदरीसी हर्ष थोर ।
येरीकडे दशशिर । करी विचार तो ऐका ॥ ७३ ॥

आपल्या दासीला पाठविले :

दूतिका पाचारोनि विश्वासी । वेगे जाय अशोकवनासी ।
शरमा आणि त्रिजटेसी । गुप्त त्यांपासीं सांगावें ॥ ७४ ॥
अति सन्मान इंद्रजिता । जरी तो माझा पढियंता ।
तेणेंही सोडा म्हणतां सीता । तुम्हीं सर्वथा न सोडावी ॥ ७५ ॥
कुंभकर्ण माझा भ्राता । तोही सोडा म्हणतां सीता ।
तुम्हीं न सोडावी सर्वथा । सोडिल्या घाता करीन मी ॥ ७६ ॥
मंदोदरी माझी कांता । आवडती आणि पतिव्रता ।
तिणेंही सोडा म्हणतां सीता । तुम्ही सर्वथा न सोडावी ॥ ७७ ॥
अति महिमेचा सन्मान । सोडा म्हणतां श्रेष्ठ प्रधान ।
तरी न सोडावी आपण । सोडिल्या प्राण घेईन मी ॥ ७८ ॥
भट जोशी विद्वांस जन । मज पूज्यत्वें अति सन्मान्य ।
त्यांचेनिही सोडिल्या जाण । तुमचा प्राण घेईन मी ॥ ७९ ॥
आलिया स्वर्गींचे देवगण । स्वयें आलिया चतुरानन ।
सीता न सोडावी आपण । आज्ञा प्रमाण हे माझी ॥ ८० ॥
ऐसें रावणाचें वचन । ऐकोनिया गुह्य ज्ञान ।
अशोकवना शीघ्र गमन । करी सावधान दूतिका ॥ ८१ ॥

त्या दूतिकेच्या मागून मारूती गेला :

दूतिका चालतां लगबगे । हनुमान लागला मागेंमागें ।
कृपा केली श्रीरामरंगें । अनुद्वेगें सीताशुद्धि ॥ ८२ ॥
दूतिका सवेग चालतां । अति उल्लास हनुमंता ।
कृपा केली श्रीरघुनाथा । भेटली सीता अनायासें ॥ ८३ ॥
दूतिका चालतां पुढें पुढें । हनुमान मागें नाचे उडे ।
हर्षे लोळत गडबडे । कृपा चंद्रचूडें मज केली ॥ ८४ ॥
आपआपल्या दावी वांकुली । आपआपणा करी गुदगुली ।
सीता माझी निजमाऊली । ती भेटली अनायासें ॥ ८५ ॥
मंदोदरी रावणें छळिली । तैं रघुनाथें मज कृपा केली ।
सीता माझी निजमाऊली । मज भेटविली अनायासें ॥ ८६ ॥
रावणाचा उपकार । आजी मज घडला थोर ।
न शोधितां अति दुस्तर । सीता सुंदर भेटली ॥ ८७ ॥
ऐशा हर्षाचेनि पूरे । हनुमान चालिला अति गजरें ।
पुढें अशोकवन अति साजिरें । स्वयें वानरें देखिलें ॥ ८८ ॥
श्रीरामाची निजपत्‍नी । सीता नाहीं शोकस्थानीं ।
नित्य वसे अशोकवनीं । हें सत्य मानी हनुमंत ॥ ८९ ॥

सीता व अशोकवन :

सोडोनि अशोकवनाची गती । सीता शोधितां शोकाप्रती ।
अशोकवनीं सीतेची वस्ती । नित्य मारूती स्वयें मानी ॥ ९० ॥
अशोक सीतेचे चरणीं । अशोक सीतेचे दर्शनीं ।
अशोक सीतेचे नयनीं । सत्य मानीं मारूती ॥ ९१ ॥
अशोक सीतेचे वचनीं । अशोक सीतेचे स्मरणीं ।
सीता वसे अशोकवनीं । सत्य मानी मारूती ॥ ९२ ॥
अशोक सीतेच्या अंगुष्ठीं । अशोक सीतेच्या पोटीं ।
अशोकीं वसे सीता गोरटी । मानी जगजेठी हनुमंत ॥ ९३ ॥
अशोकवस्ती सीतेच्या पोटी । अशोकीं वसे सीता गोरटी ।
अशोक सीतेचे निजपृष्ठीं । अशोक सृष्टीं सीतेनें ॥ ९४ ॥
रावणें आणिलें हिरोनी । शोक न देखे तिचेनी ।
तेणें ठेविली अशोकवनीं । श्रीरामपत्‍नी अशोक ॥ ९५ ॥
होतां अशोकाची वस्ती । सकळ शोका जाहली शांती ।
अशोकवन त्यालागीं म्हणती । मानी मारूती निश्चयें ॥ ९६ ॥

सीतेच्या दर्शनाने मारुतीला झालेला हर्ष :

परम आल्हादा हनुमंता । आला अशोकवनाआंतौता ।
सीता देखोनि हर्षयुक्ता । उल्लासत स्वानंदे ॥ ९७ ॥
सीता देखतांचि जाण । हनुमान घाली लोटांगण ।
रामनाम स्मरती पाषाण । अणु रेणु तृण राम जपती ॥ ९८ ॥
वृक्षांची पानें वातगती । रामनामें दुमदुमती ।
धरा रामस्मरणीं गर्जती । सीता सती ही होय ॥ ९९ ॥
तेथें करितांचि आचमन । श्रीरामें स्वादिष्ठ जीवन ।
मंद सुगंध लागता पवन । होते संपूर्ण रामनामें ॥ १०० ॥
सावध पाहतां साचार । रामनामें गर्जे अंबर ।
सीता सती ही सुंदर । सत्य वानर स्वयें मानी ॥ १०१ ॥
जेथे हरिभक्तांची वस्ती । नाम कोंदे पंचभूती ।
नामें ओसंडता क्षिती । सीता सती ही होय ॥ १०२ ॥
रामें सांगितली खूण । ती तेथे बाणली संपूर्ण ।
नामें गर्जताहे तृण । वृक्ष पाषाण नामेंसी ॥ १०३ ॥
एकाजनार्दना शरण । नामें जीवन नामें दहन ।
नाम पावन नाम गहन । नामें त्रिभुवन कोंदले ॥ १०४ ॥
॥ स्वस्ति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडे एकाकारटीकायां
हनुमदशोकवनप्रवेशजानकीदर्शनं नाम पंचमोऽध्यायः ॥
॥ ओव्यां १०४ ॥ श्लोक – ॥ एवं संख्या १०४ ॥