रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 13 MB (Official) द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 13

अध्याय 13

हनुमंताकडून वनविध्वंस

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

मणी पाहून श्रीरामांना पूर्वींच्या गोष्टींचे स्मरण होईल ते सीता सांगते :

मणि देवोनि वानराहातीं । स्वयें बोले सीता सती ।
मणि देखोनि रघुपती । स्मरेल चित्तीं तिघांतें ॥ १ ॥
कौसल्या माता आणि सीता । आठवेल दशरथ पिता ।
तिघे आठवती श्रीरघुनाथा । कोण्या अर्था तें ऐका ॥ २ ॥
पूर्वी समुद्रमंथनीं । तेथें निघाला कौस्तुभमणी ।
तो घेतां श्रीविष्णूंनीं । इंद्र ते क्षणीं तळमळी ॥ ३ ॥
ब्रह्मशापाच्या शापोक्तीं । सिंधुनिमग्न सर्व संपत्ती ।
त्यांतील कौस्तुभ श्रीपती । माझा मजप्रती देइजे ॥ ४ ॥
इंद्र मणि मागे करोनि ग्लानी । विष्णु त्यास दे फणिमणि बदलोनी ।
इंद्रें देखतांचि नयनीं । केला कंठमणि आल्हादें ॥ ५ ॥
इंद्रे नमुचीचिया युद्धासीं । साह्य नेलें दशरथासी ।
रायें निर्दाळोनियां दैत्यासी । युद्धीं इंद्रासी जयो दिधला ॥ ६ ॥
युद्धीं इंद्र संतोषोनी । दिधला दशरथासी कंठमणी ।
रायें निजनगरासी आणोनी । दिधला प्रियपत्‍नी कौसल्ये ॥ ७ ॥
कौसल्येनें अति प्रीतीसीं । तो मणि दिधला जानकीसी ।
तिणें घालोनी वेणीसीं । वनवासासीं आणियेला ॥ ८ ॥
तोचि मणि हनुमंताहातीं । खूण पाठवितां श्रीरघुपती ।
राजा माता सीता सती । तिघें आठावती श्रीरामा ॥ ९ ॥
ही खूण देवोनि तत्वतां । आणावें गा श्रीरघुनाथा ।
हेंचि कार्य प्रमाणतां । तुझे माथां कपिराया ॥ १० ॥
हनुमान म्हणे न करीं चिंता । शीघ्र आणीन श्रीरघुनाथा ।
साष्टांगें सीता नमिली माथां । येरी हनुमंता कुरवाळी ॥ ११ ॥

खूण स्वीकारल्यावर कुरापत काढावी म्हणून मारूती सीतेची आज्ञा मागतात :

खूण पुसोनि सीतेपासीं । हनुमान विचारी मानसीं ।
युद्ध न करितां राक्षसांसी । श्रीरामापासीं नवजावें ॥ १२ ॥
येथें कलहासी कारण । रावणाचें अशोकवन ।
नंदनवनासीं समान । तें विध्वंसीन निजबळें ॥ १३ ॥
ऐकोनि वनविध्वंसनकथा । कोप येईल लंकानाथा ।
धाडील असंख्य गजरथां । दृढ युद्धार्था महावीर ॥ १४ ॥
युद्ध करावया सैन्यासीं । निर्दाळोनि त्या राक्षसांसी ।
इंद्रजिता करोनि कासाविसी । श्रीरामापासीं मग जावें ॥ १५ ॥
मारोनि राक्षसांच्या कोडी । लंका करोनि कडाफोडी ।
मग श्रीरामापासीं जातां गोडी । ऐसी आवडी हनुमंता ॥ १६ ॥
इतकें करोनि जातां । सुख कपिकुळा समस्ता ।
सुख होईल श्रीरघुनाथा । सुख हनुमंता युद्धाचें ॥ १७ ॥
सीतेचें न घेतां आज्ञापन । मज विध्वंसितां नये वन ।
सीतेसी पुसावया जाण । करी विंदान हनुमंत ॥ १८ ॥
पुढती सीतेस लोटांगण । येरी म्हणे बा शीघ्र करीं गमन ।
हनुमंत खालती घाली मान । लज्जायमान बोलेना ॥ १९ ॥
सीताशुद्धि सांगावया जाण । उल्लास न देखें संपूर्ण ।
दिसतोसी अति उद्विग्न । काय कारण मज सांगे ॥ २० ॥
बोले तुझें करितां शोधन । नाहीं अन्न ना जीवन ।
क्षुधेनें जावूं पाहे प्राण । सिंधूल्लंघन न करवे ॥ २१ ॥
ऐकोनि हनुमंताचें वचन । सीतेसी आलें पै रूदन ।
यासी न देतां समाधान । केंवी गमन मी करवीं ॥ २२ ॥
याचें न पुसता स्वागत । नाहीं केलें अभ्यागत ।
महा पापिणी मी येथ । धाडितें श्रीरामभक्त भुकेला ॥ २३ ॥
ऐकें सखया हनुमंता । शिणलासी मज शोधितां ।
जीवें ओवाळीन तत्वतां । सांगेन आता तें करीं ॥ २४ ॥
हें घोवोनि करकंकण । लंकेमाजी जावोनि आपण ।
घेवोन चतुर्विध अन्न । करीं भोजन यथेष्ट ॥ २५ ॥
हनुमान पुसे सीतेपासीं । अन्नाची चवी आहे कैसी ।
सीता विस्मित मानसीं । तरी तुम्हांसी काय भक्ष्य ॥ २६ ॥
जे खाताती लवण । त्यांसी शीघ्र ये म्हातारपण ।
चुना लावोनि तांबूलभक्षण । दंत भग्न तेणें त्यांसीं ॥ २७ ॥
आम्ही रामदूत वानर । वनवासी निरंतर ।
नित्य वनफळांचा आहार । सत्य साचार जानकी ॥ २८ ॥
माझें मोडोनि कांकण । लंकेमाजी फळें पूर्ण ।
आवडतील तीं घेवोनि जाण । फळभोजन करीं बापा ॥ २९ ॥
सीते ऐकें माझें शीळ । मी तंव स्वयंपाकी केवळ ।
ज्यासी मनुष्याचा विटाळ । तें फळ अपवित्र वानरा ॥ ३० ॥

पुढील परिणामांचे गंभीर स्वरूप ओळखून सीतेचा अनिश्चय :

स्वहस्तें तोडोनि फळसंभार । स्वयें भक्षूं आम्ही वानर ।
आतळल्या सुरनर । तें फळ वानरें भक्षूं नये ॥ ३१ ॥
सीता म्हणे या वनाआंत । मधुर सुंदर फळें अद्‌भुत ।
तुवां लावितांचि हात । करील घात रावण ॥ ३२ ॥
तूं निमालिया हनुमंत । तोचि मजला प्राणांत ।
दुःखे निमेल श्रीरघुनाथ । समवेत सौमित्रा । ३३ ॥
श्रीराम निमाल्यापाठीं । निमती सुग्रीव कपींच्या कोटी ।
भरत शत्रुघ्न जगजेठी । उठाउठीं निमती ॥ ३४ ॥
या फळांसी लावितां हात । येवढा होईल अनर्थ ।
हनुमान म्हणे असो वृत्तांत । जातों येथोनि भुकेला ॥ ३५ ॥

मारूतीच्या उद्वेगाचा आविष्कार :

वन दिसताहे सफळ । माझेंचि कपाळ निष्फळ ।
निरोप नेदी जनकबाळ । काळवेळ मज आली ॥ ३६ ॥
मार्गी क्षुधेनें जातील प्राण । श्रीरामांपांसी सांगेल कोण ।
तुझी न होईल सोडवण । विघ्न दारूण ओढवलें ॥ ३७ ॥
क्षुधा नव्हे हा कल्पांत । माझा होईल प्राणांत ।
ऐसें बोलता हनुमंत । सीता ह्रदयांत कळवळली ॥ ३८ ॥

सीतेचा कळवळा व भूक निवारण्याची आज्ञा :

जंव होय क्षुधाहरण । पडलीं फळें खाईं संपूर्ण ।
घालितें श्रीरामाची आण । फळें तोडोन न खावीं ॥ ३९ ॥

मारूतीचा आनंद :

ऐकोनि सीतेचा आणेसी । हनुमान खाजवी दोन्ही कुशी ।
हें मानलें मज मानसीं । आला वृक्षांसी पैं अंत ॥ ४० ॥

पुढील कार्याचा विचार व प्रारंभ :

सांडोनि सीता वनपैसार । दूरी जावोनि बैसला वानर ।
करावया फळाहार । करी विचार मारूती ॥ ४१ ॥
मेळवी प्रळयकाळाग्नी । अभिमंत्री जठराग्नी ।
मग बैसला फळभोजनीं । सावधान हनुमंत ॥ ४२ ॥
भोजनसमयीचें अतीत । मुख्य द्विज मुखाआंत ।
आधीं यांसी करोनि तृप्त । धर्मयुक्त भोजन ॥ ४३ ॥
द्विजीं न घेतां अवदान । स्वयें घेवों नये अन्न ।
प्रथम द्विजांचें भोजन । करी सर्वज्ञ मारूती ॥ ४४ ॥
द्विज दोन्ही पंक्तीं सादर । पुच्छा आज्ञा देवोनि वानर ।
वेगीं अर्पी फळसंभार । रूचिकर स्वादिष्ठ ॥ ४५ ॥
देखोनि साकरेचे टेक । निंबरसेंसी आवश्यक ।
आधीं सेवूं पित्तशामक । मग अनेक फळें भक्षूं ॥ ४६ ॥
उपडोनियां निंबोणी नारंगी । साकरनिंबोणी मातुलिंगी ।
मेळवोनि साकरेच्या भागीं । मग आरोगी गटगटां ॥ ४७ ॥
श्रीरामाची आण पाळित । वृक्ष उपडोनियां सांडित ।
पडलीं फळें खाय हनुमंत । आज्ञा नेमस्त सीतेची ॥ ४८ ॥
आंबे जांबळें फणस जंबेरी । कर्दळीफळांचा गटका करी ।
पिंपळ्या मिरें घोस माझारी । लोणच्यावरी भक्षित ॥ ४९ ॥
द्विजांसीं सांगे हनुमंत । भोक्ता म्हणा श्रीरघुनाथ ।
द्विज कांहीं न बोलत । अतित लोलुप रसस्वादा ॥ ५० ॥
द्वीपद्राक्षांचे घड । खर्जुरीफळें अति गोड ।
पुच्छें पुरविलें कोड । करोनि उपाड झाडांचा ॥ ५१ ॥
हनुमान आपोशन न मोडी । बैसली बैसका न सोडी ।
पुच्छ करी वाढावाढी । फळें झोडित आहेचि ॥ ५२ ॥
चोरें बोरें मोहें भोकरें । आवलें उंबरें टेंबरें ।
भोक्ता श्रीराम येणें उत्तरें । फळें वानरें भक्षिलीं ॥ ५३ ॥

विशेष वर्णन :

धामणें येरमणें तोरणें । झेपे जेथ पाण्यावळें गोंदणें ।
पिकल्या करवंदांचे खाणें । श्रीरामर्पणें गटकावी ॥ ५४ ॥
पिकलीं खाय गटगटां । हिरवीं खाय तोंडपालटा ।
जारसें खाय मटमटां । सुरां श्रेष्ठां विटावित ॥ ५५ ॥
ऊसरसें भरली मांदणी । जेंवी तान्हेला प्राशी पाणी ।
तेंवी तें नेलें प्राशूनी । ढेकर देवोनी पाहत ॥ ५६ ॥
डोळे मिचकावी देवांकडे । आंगठा दावी दैत्यांकडे ।
वांकुल्या दावी दानवांकडे । मानवाकडे घुलकावी ॥ ५७ ॥
हनुमंताचे अंगवातें । सुगंधसुमनें पारिजातें ।
चंदनागुरू तरू समस्तें । उन्मूळती समूळीं ॥ ५८ ॥
भोंवता पुच्छाचा आवर्त । पक्षी किलकिलती गगनाआंत ।
वृक्ष कडकडां मोडित । होत आवर्त वृक्षांसी ॥ ५९ ॥
उपडोनियां पोफळी । मुखशुद्धीच्या पैं मेळीं ।
पोफळी घाली दाढेतळीं । वनरांगोळी मांडिली ॥ ६० ॥
शाल ताल तमाल नारिकेळी । उपडोनियां केली वरवाळी ।
घेतां राक्षसांसवें फळी । हातातळीं हाणाया ॥ ६१ ॥
ऐसी युद्धाची सामग्री । रचोनियां देवद्वारीं ।
हनुमंत बैसलासें शिखरीं । त्याहून दूरी वृक्ष टाकी ॥ ६२ ॥

रक्षकांची गडबड व त्यांना समुद्रात बुडविले :

ऐकोनि वनभंग आघाता । बनकर भयें चकित ।
राक्षसिणी उठल्या समस्त । ज्या कां विरूप विक्राळा ॥ ६३ ॥
स्वयंभू वृक्षांचे उत्पाट । मोडल्या सारणी रहाट पाट ।
विचित्र गृहें केली पीठ । केलीं सपाट लतागृहें ॥ ६४ ॥
न लावी देवालयां हात । माडिया गोपुरे समस्त ।
अंतरगृहें विध्वंसित । तेरें विस्मित बनकर ॥ ६५ ॥
राक्षस वृक्षातळीं निद्रित । जे कां सबळ राखणाईत ।
ते वृक्ष उपडोनि समस्त । केले दूरस्थ हनुमंत ॥ ६६ ॥
तंव बनकर जागृत होत । तों वृक्षमात्र न दिसती तेथ ।
तेणें ते जाहले अति विस्मित । केलें विपरीत महेशें ॥ ६७ ॥
मागोनि आणिले महेशापासीं । ते वृक्ष नेले कैलासासीं ।
किंवा उडाले आकाशीं । बनकरांसी लक्षेना ॥ ६८ ॥
दुर्धर रावणाचें शासन । मिथ्या वनविध्वंसन ।
आम्ही देखतों हें स्वप्न । म्हणोनि नयन लाविले ॥ ६९ ॥
तंव त्या राक्षसीं कळवळित । वानर नव्हे हा काळ वृत्तांत ।
संचरोनि वनांआंत । राक्षसा घात करूं आला ॥ ७० ॥
ऐकोनि बनकर धांवती । कोठें कोठें तो मारूती ।
धरा धरा तो बहुतां हातीं । रावणाप्रति नेऊं आम्ही ॥ ७१ ॥
बनकर अति दुर्धर । एकवटले चवदा सहस्त्र ।
स्वयें धरावया वानर । अति सत्वर धांवले ॥ ७२ ॥
एक विंधिती बहुतकांडे । एक हाणिती गोफणगुंडे ।
एक सवेग हाणिती धोंडे । हनुमान पुढें लक्षोनी ॥ ७३ ॥
बनकर आले अति गर्जत । हनुमान बैसला सावचित्त ।
करावया बनकरांचा घात । पुच्छ प्रेरित साटोपें ॥ ७४ ॥
पुच्छघात अति उद्‌भट । धरितां ओढोनि करी पीठ ।
शस्त्रें करोनियां सपाट । वीर उद्‌भट गांजिले ॥ ७५ ॥
वाजतां पुच्छाचा पैं साट । बनकरां भोंवलासे आट ।
पुच्छे कवळिले सगट । ह्र्दयस्फोट राक्षसां ॥ ७६ ॥
जो जो पळोनि जाय जिकडे । पुच्छ आडवें तिकडें तिकडे ।
राक्षसां ओढवलें सांकडें । मागें पुढें रिघवेना ॥ ७७ ॥
ऐसें गोवोनि बनकरांसी । हनुमंते बांधोनि पुच्छासीं ।
निक्षेपिलें समुद्रासीं । मत्स्य मगरांसी आहारार्थ ॥ ७८ ॥
भूतें जाहलीं दीनवदन । बनकर चवदा सहस्त्र जाण ।
दिधलें सागरीं मीनां भोजन । आम्हांसी लंघन चुकेना ॥ ७९ ॥
तंव बोलली महाकाळी । हनुमान मारील राक्षस बळी ।
मेदमांससरूधिरांजुळी । भूतां सकळ अति तृप्ति ॥ ८० ॥
दिधलें मीनां मीनभोजन । देईल भूतांसी भूतभोजन ।
वृक जंबूक घारी गीध जाण । तृप्तिभोजन काळासी ॥ ८१ ॥
भूतें पुसती जगदंबेसी । ऐसें होईल कवणे दिवसीं ।
येच क्षणीं येच दिवसीं । तृप्ति सर्वांसी हनुमंतें ॥ ८२ ॥
चवदा सहस्त्र वनकरांसी । हनुमान निर्दाळी पुच्छेंसी ।
तेणें भयभीत राक्षसी । सीतेपासीं पुसताती ॥ ८३ ॥

राक्षसी याबद्दल सीतेजवळ चौकशी करितात :

कोण कोणाचा कैंचा थोर । येथें आला हा वानर ।
तुज करोनि नमस्कार । कोण विचार दृढ केला ॥ ८४ ॥
तुझ्या घेवोनि आज्ञेसी । येणें मारिलें बनकरांसी ।
तुझेनि बोलें वन विध्वंसी । तुवां द्वद्वासीं पेटविलें ॥ ८५ ॥
सीतेभोंवत्या राक्षसी । कलकल करिती चौपासीं ।
धरा मारा बांधा केशीं । इणें वानरासीं चेतविलें ॥ ८६ ॥

सीतेचे उत्तर :

सीता निःशंक मानसीं । भय न मानी राक्षसींसीं ।
यथोचित बोले त्यांसी । राक्षसांपासीं बहु मावा ॥ ८७ ॥
मारीच होवोनि मृगवेषी । प्रतारिता श्रीरामासी ।
स्वयें मुकला निजदेहासी । राक्षसांपासीं बहु मावा ॥ ८८ ॥
शूर्पणखा सुंदरतेसीं । छळों आली लक्ष्मणासी ।
कपटें नाडिलें नासिकासी । राक्षसांपासीं बहु मावा ॥ ८९ ॥
छळोनि हरावया सीतेसी । रावण जाहला संन्यासी ।
मूळींच भीक लागली त्यासी । राक्षसांपासीं बहु मावा ॥ ९० ॥
अमित मावा राक्षसांपासीं । कोण कोणाचा वानरवेषी ।
हें काय पुसतां मजपासीं । निजमावा तुम्ही जाणा ॥ ९१ ॥

हनुमंताची डरकाळी ऐकून राक्षसींची तारांबळ :

राक्षसी देखानि सीतेपासीं । हनुमान गुरूकावी तयांसीं ।
वेगीं पळती विव्हळतेंसी । अति भयासीं भयभीत ॥ ९२ ॥
एकी चळाचळां कांपती । एकी फळफळा मूतती ।
एकी भयें भुली भूलती । एकी पडती मूर्च्छिंत ॥ ९३ ॥
बोंब न करवे गाढी । जिव्हेसी वळली बोबडी ।
एकी अंधारीं देती दडी । आंत तों तोडी पैं एकी ॥ ९४ ॥
एक भयचकित भीती । नेसणीं गळालीं नेणती ।
नागवीं रावणापासीं जाती । मग सांगती वनबोंब ॥ ९५ ॥
एकी त्या भयाचें निर्भरें । राक्षसां म्हणती पळा रे त्वरें ।
पुच्छें मारिलीं बनकरें । घायवारें घेतलें ॥ ९६ ॥
एकी दडती सीतेपाशीं । एकी पळती चौंपासीं ।
आपपर नसे राक्षसींसी । हनुमंतासी देखोनि ॥ ९७ ॥
करितां हनुमंतें गर्जन । सीता जाहली निर्बंधन ।
श्रीरामभक्तांचें वचन । बंधमोचन तत्काळ ॥ ९८ ॥

रावणाकडे वृत्तांत निवेदन त्यामुळे रावणाचा
क्षोभ व प्रतिकारासाठी सैन्याची योजना :

राक्षसी सांगती रावणापासीं । वानरवीर प्रतापराशी ।
विध्वंसोनियां वनासी । बनकरांसी मारिले ॥ ९९ ॥
नेणों कैचा वीर वानर । बळें जैसा काळाग्निरूद्र ।
सीतेसवी करोनि नमस्कार । केला मार बनकरांसी ॥ १०० ॥
जे प्रदेशीं जनकबाळीं । तें वन राखिलें पुष्पीं फळीं ।
येरां वनांची केली रवंदळी । वृक्षां समूळीं उपडोनी ॥ १०१ ॥
सीतेसीं करोनि एकांत । मग मांडिला वनविघात ।
ऐसा ऐकोनि वृत्तांत । लंकानाथ क्षोभला ॥ १०२ ॥
पाचारोनि घरटीकार । त्यांसी सांगे दशशिर ।
धरोनि आणावा तो वानर । वन विचित्रा विध्वंसी ॥ १०३ ॥
रावणासी राक्षसी सांगती । घरटीकार बापुडे किती ।
त्याच्या पुच्छाची दुर्धर शक्ती । लाविली ख्याती बनकरां ॥ १०४ ॥
चवदा सहस्त्र वनकरांसीं । भारा बांधोनियां पुच्छेसीं ।
निक्षेपिलें समुद्रांसीं । जळचरांसी आहारार्थ ॥ १०५ ॥
रणीं मर्दोनि राक्षसांसी । मेदमांसें तृप्ति भूतांसी ।
द्ध्यावया आवंतिलें महाकाळीसी । आजिचे दिवसीं हनुमंतें ॥ १०६ ॥
धरोनि आणावया वानर । तेथें कायसें घरटीकार ।
मूळ करोनि विचार । दुर्धर भार प्रेरावा ॥ १०७ ॥
ऐसें राक्षसीं सांगती । सवेंचि चळचळां कांपती ।
बहुतां नाटोपे तो मारुती । दुर्धर शक्ती पुच्छाची ॥ १०८ ॥
सीतेपासील वन सकळ । नाहीं मोडिलें देउळ ।
वानर दिसे स्वधर्मशीळ । त्यावरी प्रबळ प्रतापी ॥ १०९ ॥
ऐकोनि राक्षसींचे वचन । दचकला तो दशानन ।
सभा जाहली कंपायमान । बलसंपन्न वानर ॥ ११० ॥
ऐकोन वनविध्वंसन । रावण जाहला कंपायमान ।
आपुलिया बलासमान । योद्धे दारूण अनिवर्तीं ॥ १११ ॥
युद्ध देखिलिया दृष्टीं । नाहीं परतायाची गोष्टी ।
रणपाडे कोट्यनुकोटी । महाहठी रणगाढे ॥ ११२ ॥
किंकर नांवें अति दुर्धर । नांवाजिले महावीर ।
पाचारोनि ऐशीं सहस्त्र । धरावया वानर धाडिले ॥ ११३ ॥
रावण जाणे आमुची ख्याती । शेखीं धाडी वानराप्रतीं ।
वानर बापुडें तें किती । इतुक्यांहातीं केंवी उरे ॥ ११४ ॥
ऐसें करोनि गर्जन । शस्त्रास्त्रीं सनद्ध पूर्णं ।
धावोनि आले अवघे जण । अशोकवना ठाकिले ॥ ११५ ॥

मारूतीने सर्व सैन्याचा विध्वंस करून रावणाकडे निरोप धाडला :

अशोकवनाच्या प्रासादांत । पुढिल्या दुर्धर तोरणांत ।
नेटका बैसला हनुमंत । काळवृत्तांत प्रळयाग्नि ॥ ११६ ॥
वानरा देखतांचि दृष्टीं । शस्त्रें कवळोनियां मुष्टीं ।
किंकर धांविन्नले उठाउठीं । शस्त्रवृष्टी समकाळें ॥ ११७ ॥
शूल मुद्गल गदा फरश । त्रिशूल तोमर पट्टिश ।
चेंडुचक्रें लहुडी परश । केली बहुवश शस्त्रवृष्टी ॥ ११८ ॥
खंगला भंगला तुटला । शस्त्रास्त्रीं निवटला ।
घायीं तिळप्राय जाला । म्हणती निमाला वानर ॥ ११९ ॥
किंकरी पिटिली टाळी । म्हणती वानर आतुर्बळी ।
आम्हांसीं न करितां रणफळी । रणरांगोळी होऊनि गेला ॥ १२० ॥
ऎंशी सहस्त्र महावीर । बळें हाणिती निशाचर ।
जैसी पर्वतीं पर्जन्यधार । तैसा वानरीं शस्त्रपात ॥ १२१ ॥
किंकरी पिटतां टाळी । आम्ही यशस्वी रणकल्लोंळी ।
तें देखोनि हनुमान बळीं । क्रोधानळीं खवळला ॥ १२२ ॥
स्वये पुच्छाची पाठी थापटी । पुच्छासीं सांगे गुह्य गोष्टी ।
मारावया राक्षसांच्या कोटी । निजबुद्धिप्रतापें ॥ १२३ ॥
ऐसीं सांगितली गुह्य गोष्टी । लांगूल त्राहाटिलें उठाउठीं ।
निधा ठिला गिरिकूटीं । लंकात्रिकूटीं आकांत ॥ १२४ ॥
राक्षसांचा प्राणहर । दुर्धर केला भुभुःकार ।
तेणें किंकरांचा संभार । जाहला भूमिभार दचकोनी ॥ १२५ ॥
धाकें टवकारिल्या दृष्टी । शस्त्रें गळालीं निजमुष्टीं ।
राक्षसीं धाक घेतला पोटीं । पुच्छें पाठी पुरविली ॥ १२६ ॥
धाकें राक्षस पळोनि जाती । पुच्छें बांधोनि मारी मारूती ।
एक मारिले शिळाघातीं । पर्वतपातीं समस्त ॥ १२७ ॥
मारोनि राक्षस समस्त । वानर स्वानंदें गर्जत ।
श्रीरामाचा निजदूत । नामें हनुमंत मारुती ॥ १२८ ॥
येथें मारोनि दशकंधर । विजयी स्वामी रामचंन्द्र ।
विजयी लक्ष्मण महावीर । विजयी वानरेन्द्र सुग्रीव ॥ १२९ ॥
मी आलों असे सीताशुद्धीसी । म्यां विध्वंसिलें या वनासी ।
जावोनि सांगा रावणापासीं । म्यां राक्षसांसी मारिलें ॥ १३० ॥
एकाजनार्दना शरण । आलें हनुमंतासी स्फुरण ।
करीन थोरथोरां निर्दळण । रणकंदन अवधारा ॥ १३१ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडे एकाकारटीकायां
हनुमद्वन विध्वंसो नाम त्रयोदशोऽध्यायः ॥ १३ ॥
॥ ओव्यां १३१ ॥ श्लोक २४ ॥ एवं संख्या १७४ ॥