रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 25 MB (Official) द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 25

अध्याय 25

श्रीराम – अंगद संवाद

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

दक्षिण दिशेला गेलेले वानर कालमर्यादा संपल्यावरही परतले नाहीत
म्हणून श्रीरामास चिंता वाटेल तेव्हा हनुमंत आधीच येऊन श्रीरामांना भेटला

वानर गेले दक्षिणेसी । मर्यादा लोटली तयांसी ।
कोणी नाणिती सीताशुद्धीसी । श्रीरामासीं अति चिंता ॥ १ ॥
मजसीं करूनि एकांत । मुद्रा घेवोनि गेला हनुमंत ।
तो कां नयेचि पां त्वरित । अति संचित श्रीराम ॥ २ ॥
हनुमंत कार्यकर्ता । मजही हा भरंवसा होता ।
तोहि न येचि वाट पाहातां । परम चिंता लागली ॥ ३ ॥
ऐसी श्रीरामाची चिंता । कळों सरली त्या हनुमंता ।
शुद्धि सांगावया सीता । होय निघता अति शीघ्र ॥ ४ ॥
श्रीरामाची परम चिंता । सांगतां अंगदा जांबवंता ।
घांसा आड येऊं नये हनुमंता । घेवो दे आतां धणी आम्हां ॥ ५ ॥
वानरें पीडलीं अति दीन । भाग्यें मिळाले मधुपान ।
त्यासीं तुवों न करावें विघ्न । तूं सज्ञान दीनदयाळ ॥ ६ ॥
विषयरसभोगापुढें । परमार्थ समूळ उडे ।
वानर मद्यपानें जाले वेडे । श्रीरामाकडे न चलती ॥ ७ ॥
वानर गुंतले मद्यपानांत । मद्यपानें बोधेना परमार्थ ।
ऐसें जाणोनियां हनुमंत । निघे त्वरित एकाकी ॥ ८ ॥
वानरीं सेविलें मधुपानासीं । सीताशुद्धि साधली त्यांसी ।
निश्चयो मानला सुग्रीवासी । सौमित्रासी सांगत ॥ ९ ॥
सौमित्रि सुग्रीव अति हर्षेसीं । सीताशुद्धि सांगती रामासी ।
श्रीरामें देखिले हनुमंतासी । येतां आकाशीं अति शीघ्र ॥ १० ॥
येतां देखोनि हनुमंता । अति उल्लास श्रीरघुनाथा ।
धांवोनि आकाशहीपरता । सीताशुद्यर्थ पुसों पाहे ॥ ११ ॥
ऐसें जाणवले हनुमंता । उठों नेदितां श्रीरघुनाथा ।
दुरोनि सीताशुद्ध्यीची कथा । होय सांगता तें ऐका ॥ १२ ॥

दूरूनच श्रीरामचंद्रास सीता-शुद्धि व तिच्या स्थितीचे कथन

उठों नेदिता रघुनाथा । दुरोनि सांगणें हनुमंता ।
तुझिये कृपे म्यां तत्वतां । देखिली सीता जनकात्मजा ॥ १३ ॥
समुद्रामध्यें महागिरी । त्यावरी वसे लंकापुरी ।
रावणाच्या निजमंदिरीं । सीता सुंदरी रक्षिलीसे ॥ १४ ॥
केवळ नाही रावणाघरीं । अशोकवाटिकेमाझारी ।
रक्षण विक्राळ खेचरी । त्यांमाझारी जानकी ॥ १५ ॥
एकवस्त्रा भूमियाशी । मलिनांबरा मलिनदेही ।
मंगलस्नान करणें नाही । मस्तकीं पाहीं दृढ जटा ॥ १६ ॥
जैसा तूं श्रीराम जटाधारीं । तें व्रत चालवी सीता सुंदरी ।
स्नेह दृष्टीचा हातीं न धरी । जटाधारी जानकी ॥ १७ ॥
नेघे अंजनादि चंदन । न करी भोजन रसपान ।
केवळ तिसी उपोषण । जळप्राशन तीस नाहीं ॥ १८ ॥
नित्यतृप्तीचें अवदान । ब्राह्मणां नेदितां ब्रह्मौदन ।
सीता न पाहे सर्वज्ञ । निंद्य म्हणोन नातळे ॥ १९ ॥
परपुरूषाचें घ्यावें अन्न । ते परदारा जाली जाण ।
सीतेनें सांडिलें थुंकोन । जैसे वमन श्वानाचें ॥ २० ॥
रामवियोगाचें अन्न । तें श्वानविष्ठेसमानं ।
रजस्वलेचें रूधिरपान । तत्समान रसभोग ॥ २१ ॥
तुजवांचोनि श्रीरघुपती । जळ स्पर्शेना ते हातीं ।
किती सांगो उपपत्ती । सीता सती पतिव्रता ॥ २२ ॥
चंद्रग्रहणीं हीनकळा । तैसी हीन दीन जनकबाळा ।
स्वयें देखिली म्यां डोळां । वीरवेताळा श्रीरामा ॥ २३ ॥
नेघे अन्न ना जीवन । कैसेनि तिचे वांचले प्राण ।
श्रीराम पुसे कळवळोन । दीनजनकृपाळु ॥ २४ ॥
निजसखया हनुमंता । कैसेनि वांचली माझी कांता ।
हें मज सांगावें तत्वतां । होत पुसतां श्रीरामा ॥ २५ ॥
हनुमान अति विचक्षण । सीतासतीनिजजीवन ।
कैसें सांगेल आपण । सावधान अवधारा ॥ २६ ॥
ह्रदयीं श्रीराम चिन्मूर्ति । मुखीं रामनाम अहोरात्री ।
राम न्याहाळी सर्वां भूतीं । श्रीराम चित्तीं अहर्निशीं ॥ २७ ॥
राम धराधारक पूर्ण । श्रीराम जीवना जीवन ।
रविचंद्रा दीप्ति गहन । विराजमान श्रीराम ॥ २८ ॥
श्रीराम वायूचा निजप्राण । श्रीराम गगनाचें चिद्गमन ।
श्रीराम बुद्धिचें समाधिधन । प्राणपोषण श्रीराम ॥ २९ ॥
श्रीराम अहंसोहंनिमग्न । श्रीराम मनाचें उन्मन ।
श्रीराम चित्तचैतन्य । जीवा जीवन श्रीरामा ॥ ३० ॥
ऐसऐसिया निजस्थिती । मीतूंपणाहोनि परती ।
सीताजीवन श्रीराममूर्तीं । सत्य रघुपति बुद्धि माझी ॥ ३१ ॥
निर्विकल्प भजनविधी । कायावाचामनोबुद्धी ।
म्यां आणिली सीताशुद्धी । सत्य त्रिशुद्धि श्रीरामा ॥ ३२ ॥
श्रीरामनाम परमामृत । अमृतपानें अमर मरत ।
रामनाम ज्यासी प्राप्त । मरण मरत त्याचेनि ॥ ३३ ॥
रामनामीं श्रद्धा अढळ । त्यासी बाधेना हळाहळ ।
पोळू न शके प्रळयानळ । द्वद्वें सकळ निर्द्वंद्व ॥ ३४ ॥
ऐसें श्रीरामनामामृत । तेंचि सीतेचें जीवन नित्य ।
श्रीराम जाणे सत्य सत्य । श्रीरघुनाथ सर्वज्ञ ॥ ३५ ॥

श्रीरामांचा आनंद व हनुमंताचे अभिनंदन व हार्दिक कौतुक

ऐकोनि हनुमंताचें वचन । श्रीरामचंद्र संतोषोन ।
परमानंदें बाहु पसरोन । दिधलें आलिंगन निजऐक्यें ॥ ३६ ॥
स्वामित्व विसरे रघुनाथ । दासत्व विसरे हनुमंत ।
परमानंदें सदोदित । जगाआंत कोंदले ॥ ३७ ॥
अहंकोहंसोहंज्ञान । तें समरस गेलें विसरोन ।
हारपलें मीतूंपण । सुखसंपन्न स्वानंदें ॥ ३८ ॥
दोघें होतां सुखसंपन्न । विरोन गेले ज्ञानाज्ञान ।
खुंटला बोल तुटलें मौन । चैतन्य घन कांदले ॥ ३९ ॥
दृश्य द्रष्टा आणि दर्शन । ज्ञेय ज्ञाता आणि ज्ञान ।
ध्येय ध्याता आणि ध्यान । गेलें विरोन स्वानंदीं ॥ ४० ॥
देव देवपणें दाटला । भक्त भावार्थे आटला ।
परमानंद प्रगटला । तटका तुटला आशेचा ॥ ४१ ॥
भजनआवडीं भावार्थ । भक्तें गिळिला रघुनाथ ।
नामें गिळिले देवभक्त । मुख्य परमार्थ या नांव ॥ ४२ ॥
ऐसा पावोन परमार्थ । श्रीरामीं भजें हनुमंत ।
भजनें सदा यशवंत । द्वंद्वनिर्मुक्त हरिभजनें ॥ ४३ ॥
पावोनियां स्वरूपप्राप्ती । ज्यासी अखंड सद्‌गुरूभक्ती ।
देव वानिती त्याची कीर्ती । त्यासी वंदिती शिवादि ॥ ४४ ॥
ऐसी दाटुगी भगवद्‌भक्ती । भक्तीच्या दासी चारी मुक्ती ।
भगवद्‌भजन सर्वांभूतीं । ब्रह्मप्राप्तीं हरिनामें ॥ ४५ ॥
ऐसी हनुमंताची स्थिती । भक्ति कीर्ति विनयवृत्ती ।
तिहीं कीं विजयख्याती । सूक्ष्मशांति श्रीरामें ॥ ४६ ॥
सूक्ष्मशांतीचे लक्षण । मारितां कोट्यनुकोटि रण ।
शांति न मोडे अणुप्रमाण । दुजेनविणें संग्राम ॥ ४७ ॥
बुद्धिबळाचे खेळाकडे । तेथें मारितां हस्ती घोडें ।
मारित्यासी हिंसा न घडें । तेणें पाडे संग्राम ॥ ४८ ॥
ऐसी हनुमंताची गती । साधुजन अनुलक्षिती ।
येरां भासे वानरवृत्ती । दुर्धरशक्ती श्रीरामें ॥ ४९ ॥
हनुमान आणि रघुनंदन । अनन्य भावें पडलें आलिंगन ।
पूर्ण पावोनि समाधान । जाले अभिन्न देवभक्त ॥ ५० ॥
सीतामस्तकींचा मणी । ठेवोनियां श्रीरामचरणीं ।
हनुमंत घालोनि लोटांगणीं । कर जोडोनि राहिला ॥ ५१ ॥
वानरसमूह मदोन्मत्त । पुढे गेला हनुमंत ।
अंगद नळ नीळ जांबवंत । हा वृत्तांत नेणती ॥ ५२ ॥
हनुमंतें वंदोनि रघुनाथ । सांगोनि सीतेचा वृत्तांत ।
सवेंचि मधुवनांत । पूर्वस्थित तैसाचि ॥ ५३ ॥
जावोनि आला हनुमंत । हें नेणें अंगद जांबवंत ।
इतरांची काय मात । कपिवृत्तांत जाणावया ॥ ५४ ॥
सुग्रीव सौमित्रास सांगत । आम्हां देखतां आला हनुमंत ।
सांगतां सीतेचा वृत्तांत । श्रीरघुनाथ आलिंगी ॥ ५५ ॥
दोघे देतां आलिंगन । परस्परें जाले लीन ।
नाहीं देखिले होतां भिन्न । धन्य महिमान हनुमंता ॥ ५६ ॥
हनुमान नांदे श्रीरामांत । श्रीराम नांदे हनुमंतांत ।
ऐसी ऐकतांचि मात । पडे मूर्च्छित सौमित्री ॥ ५७ ॥
जैसी रामभक्ति हनुमंतासी । तैसें भजनलक्षण लक्ष्मणासी ।
एकात्मता त्या तिघांसी । येरयेरांसी अभिन्न ॥ ५८ ॥
ऐसें देखोनि अनन्य भजन । सुग्रीव घाली लोटांगण ।
श्रीरामें दिधलें आलिंगन । समाधान सुग्रीवा ॥ ५९ ॥
अनन्यभक्तीचा वृत्तांत । सुखकारी श्रीरघुनाथ ।
भजनभावें भाविक मुक्त । नामें निर्दोष महादोषी ॥ ६० ॥
एक एक श्रीरामनाम । ब्रह्मप्राप्ति सुगम ।
चहूं मुक्तींचा उडवोनि भ्रम । नामेंचि परम परमार्थ ॥ ६१ ॥
सुग्रीव सौमित्री तये वेळीं । निवोनियां सुखकल्लोळीं ।
परमानंदे पिटोनि टाळी । श्रीरामाजवळी राहीले ॥ ६२ ॥
येरीकडे सीताशुद्ध्यर्थ । सव्यें साधोनि इत्यर्थ ।
मुख्य करोनि हनुमंत । अंगद समवेत युवराजा ॥ ६३ ॥
दधिमुख येवोनि जाण । घालोनियां लोटांगण ।
कथा सांगे सुखसंपन्न । सावधान अवधारा ॥ ६४ ॥
सीताशुद्धिपुढें जाण । मधुवन तृणासमान ।
सुग्रीव बोलिला आपण । जीवें निंबलोण करूं पाहे ॥ ६५ ॥
शरीर चर्माचे मोचे । केलिया उत्तीर्ण नव्हे तुमचें ।
परम भाग्या अंगदाचें । कपिवंशाचे उद्धरण ॥ ६६ ॥
अंगद कपिवंशमंडण । अंगद कपिवंशभूषण ।
अंगद कपिवंशतारण । वदला आपण सुग्रीव ॥ ६७ ॥
ऐकतां दधिमुखवचनार्थ । वानरीं स्मरिला श्रीरघुनाथ ।
श्रीरामनामें गर्जत । उल्लासयुक्त निघाले ॥ ६८ ॥

सर्व वानरांचे आगमन व श्रीरामास वंदन

नमस्कारावया रघुवीर । गगनीं उसळलें वानर ।
रामनामाचा गजर । केला भुभुःकार महावीरीं ॥ ६९ ॥
हनुमंताची विजयवृत्ती । उल्लासले उपरमले जुत्पत्ती ।
नामे गर्जती त्रिजगतीं । किष्किंधेप्रती पातले ॥ ७० ॥
वानरांचा गिरागजर । नादें कोंदलें अंबर ।
दणाणिलें गिरिकंदर । शैलशिखरें दुमदुमिलीं ॥ ७१ ॥
कपिकुळांची नादोक्ती । नादामाजी सीता सती ।
भेटों आलीसे आइती । ऐसां रघुपति सुखावे ॥ ७२ ॥
ऐकतां अंगदादिकांचा गजर । सुखावें सुग्रीव कपींद्र ।
पुच्छ थरकोनि समग्र । केला भुभुःकार वानरीं ॥ ७३ ॥
ऐकोनि सुग्रीवभुभुःकार । किष्किंधाभूतळी वानर ।
उतरले पैं समग्र । हर्षनिर्भर उल्लासें ॥ ७४ ॥
श्वेत सुनीळ पीत आरक्त । सुवाससुमनीं सुफळित ।
अंगदसेनासंभारांत । टके शोभत वृक्षांचे ॥ ७५ ॥
किंशुक फुलले मनोहर । शाल ताल तमाल थोर ।
विचित्र पताका अनुकार । तेंवी वानर झेलिती ॥ ७६ ॥
असों वनवृक्षप्रकार । वानरां पुच्छीं शाखा विचित्र ।
गुढिया उभविल्या समग्र । तेणें अंबर शोभत ॥ ७७ ॥

सुग्रीवाकडून अंगदाचे कौतुक :

अंगद युवराज वीर विख्यात । नळ नीळ जांबुवंत ।
मुख्य मुखरणी हनुमंत । यशवंत त्याचेनि ॥ ७८ ॥
ऐसा अंगदसंभार । शोभा शोभे मनोहर ।
हर्षें नाचती वानर । करीत गजर नामाचा ॥ ७९ ॥
देखोनि अंगदाचा यावा । सुखसंतोष सुग्रीवा ।
परम सुख श्रीराघवा । सुख सर्वां अंगदें ॥ ८० ॥
अंगद देखोनियां दृष्टीं । लक्ष्मणासी आनंदकोटी ।
अति उल्लासें टाळी पिटी । सीता गोरटी साधिली ॥ ८१ ॥
भेटावया श्रीरामचंद्रा । अंगदहनुमंतादि धुरा ।
उल्लास समस्तां कपींद्रा । बहु वानरां आल्हाद ॥ ८२ ॥
प्रस्त्रवणनामें महागिरी । तेथें वस्ती श्रीरामचंद्रीं ।
वनें काननें साजिरीं । यावा वानरीं तेथें केला ॥ ८३ ॥
संमुख देखोनि रघुनंदन । स्त्रवती अश्रुधारा लोचन ।
अंगदें हनुमंतें संपूर्ण । लोटांगण घातलें ॥ ८४ ॥
मस्तकीं धरिले दृढ चरण । श्रीरामें दिधलें आलिंगन ।
कोटिजन्मांचें श्रमहरण । दोघे जण पावले ॥ ८५ ॥
सवेंच वंदिला लक्ष्मण । मस्तकीं धरिले त्याचे चरण ।
सौमित्रीनें दिधलें आलिंगन । कुमित्रपण निमालें ॥ ८६ ॥
सुमित्र जालें निजमन । सुमित्र चित्त चैतन्यघन ।
सुमित्र जाला अभिमान । मति चिद्धन सुमित्र ॥ ८७ ॥
श्रीरामभजनीं तत्पर । इंद्रियें जालीं सुमित्र ।
जिव्हा रामनामीं एकाग्र । वाचा सुमित्र स्वयें जाली ॥ ८८ ॥
हरिदासाचें आलिंगन । ऐसें सबाह्य करी पावन ।
अभागी देखती दोषगुण । सभाग्य पूर्ण सद्‌भावें ॥ ८९ ॥
साधूंचें जें दर्शन । तेंचि परम अनुष्ठान ।
साधूंचें जें भाषण । तपश्चर्या पूर्ण पूर्णत्वें ॥ ९० ॥
साधूंचें चरणस्पर्शन । कैवल्य त्यापुढें तृण ।
अगाध साधूचे चरण । जेणें पावन महादोषी ॥ ९१ ॥
सज्जनासी आलिंगन । तेणें सर्वांग पावन ।
देहचि होय चैतन्यघन । कृपा सज्जन जैं करिती ॥ ९२ ॥
साधुसज्जनसंगती । सभाग्य भाग्यातें पावती ।
सत्संगें भवनिर्मुक्ती । वेदशास्त्रांसी संमत ॥ ९३ ॥
सज्जनांचे पादस्पर्शे । तेणें कर्माकर्म निरसे ।
जन्ममरण सकळ नासे । त्या रहिवास परी ब्रह्मीं ॥ ९४ ॥
सौमित्र साधु श्रीरामभक्त । त्यास आलिंगन पैं देत ।
अंगद आणि हनुमंत । आनंदभरित स्वयें जाले ॥ ९५ ॥
हातीं धरोनि अंगदासी । हनुमान आला सुग्रीवापासीं ।
सप्रेम वंदितां तयासी । तोही उल्लासीं आलिंगी ॥ ९६ ॥
सुग्रीव म्हणे हनुमंता । तुझेनि अंगदासी श्लाघ्यता ।
तूं समस्तांसी जीवदाता । संरक्षिता आम्हांसी ॥ ९७ ॥
जांबुवंतादि वानरवीर । तिहीं वंदोनि श्रीरामचंद्र ।
करोनि सुग्रीवासी जोहार । सभा सादर बैसली ॥ ९८ ॥

श्रीरामांच्या सूचनेवरून अम्गद वृत्तांत सांगतो

सीताशुद्धीचा इत्यर्थ । स्वयें पुसे श्रीरघुनाथ ।
येथोनि कैसा क्रमिला पंथ । समूळ वृत्तांत मज सांगें ॥ ९९ ॥
ऐसें पुसतां रघुनंदन । हनुमंतें धरिले मौन ।
तेव्हां अंगद आपण । सांगे गौण सीताशुद्धि ॥ १०० ॥
घेवोनि स्वामीचें आज्ञापन । शतधा शोधिली दक्षिण ।
सीताशुद्धीचें लक्षण । अणुप्रमाण न लभेची ॥ १०१ ॥
पुढती करावया शोधन । वानरीं केली आंगवण ।
ब्रह्मशापें उपहत वन । तेथें उड्डाण पडियेल ॥ १०२ ॥
नाहीं पाला नाहीं फळपान । शोधितां न मिळे जीवन ।
वृक्ष ठेले खरकडोन । पडिलें लंघन वानरां ॥ १०३ ॥
दंडी नामा ऋषी समर्थ । वेदशास्त्रसंपन्न त्याचा सुत ।
विद्ध्यागर्वें अति उन्मत्त । त्याचा केला घात वनदेवतीं ॥ १०४ ॥
तो विद्ध्यागर्वें अति उन्मत्त । वादीं ब्राह्मणांसीं निर्भर्त्सित ।
तो ब्रह्मराक्षस जीवें जींत । यालागीं घात भूमीं केला ॥ १०५ ॥
जाणोनि पुत्राचें निधन । ऋषीनें शापिलें तें वन ।
तेथें ज्याचें आगमन । नव्हे निर्गमन प्राणांतीं ॥ १०६ ॥
आम्हांसी पडतांचि ते वनीं । प्राण जाते तत्क्षणीं ।
वांचलों रामनामस्मरणीं । संकटीं रक्षी श्रीराम ॥ १०७ ॥
वनीं नाहीं मुंगी मासी । ठाव नाहीं श्वापदांसी ।
तृणशलाका नाहीं भूमींसीं । पडे वानरांसीं लंघन ॥ १०८ ॥
तें त्यजावया दुष्ट वन सबळ । बळें करोनि किराण ।
करी तेथेंचि ये उड्डाण । नव्हे निर्गमन ब्रह्मशापें ॥ १०९ ॥
त्या ऋषीचा ऋषिसुत । ब्रह्मराक्षस त्या वनाआंत ।
भक्षूं आला वानरांतें । त्याचा निःपात आम्हीं केला ॥ ११० ॥
हनुमंतादेखतां मरण । ब्रह्मराक्षसा उद्धरण ।
रामनामाचा प्रताप पूर्ण । जडतारण श्रीरामें ॥ १११ ॥
जालें पुत्राचें उद्धरण । तेव्हां दंडी ऋषि संतोषोन ।
शापोन्मुक्त केलें वन । हे महिमान हरिभक्तांचें ॥ ११२ ॥
जेथें जाती श्रीरामभक्त । तें वन पुण्याश्रम म्हणत ।
ऐसें अंगद सांगत । सुखें डुल्लत श्रीराम ॥ ११३ ॥
ऐकोनि कृपाळु रघुनाथ । सौमित्री स्वानंदें स्फुंदत ।
वानरसभा पैं तटस्थ । जाला विस्मित सुग्रीव ॥ ११४ ॥
वन मुक्त केलें द्विजवरीं । वानरां लंघनें पडलीं भारी ।
निघवेना वनाबाहेरी । येती लहरी क्षुधातृषेच्या ॥ ११५ ॥
हनुमंतें तिये काळीं । वनबिल्ववृक्षातंळीं ।
विवर देखिलें सफळ जळीं । आम्ही ते बिळीं प्रवेशलो ॥ ११६ ॥
पुढें करोनि हनुमंत । विवरीं रिघतां समस्त ।
तेथें मांडला प्राणावर्त । रक्षी हनुमंत श्रीरामतेजें ॥ ११७ ॥
विवरीं गुडुप अंधार । स्वयें स्मरेना स्वशरीर ।
उबेनें निर्बुजलें वानर । पडले समग्र अचेतन ॥ ११८ ॥
मज अंगदासमवेत । नळ नीळ जांबुवंत ।
विवरीं अचेतन समस्त । सावधान हनुमंत श्रीरामें ॥ ११९ ॥
क्षुधेनें आमचा क्षीण प्राण । तेणें विसरलों रामस्मरण ।
हनुमंत असे सावधान । सबाह्य पूर्ण श्रीराम ॥ १२० ॥
श्रीराम हनुमंताचा प्राण । सर्वेंद्रियें श्रीराम आपण ।
श्रीरामतेजें देखणें नयन । अंधारी पूर्ण देखणा रामें ॥ १२१ ॥
निधडा वीर हनुमंत । पुच्छें बांधोनि कपी समस्त ।
शतयोजनें विवरांआंत । नेले मूर्च्छित निजांगें ॥ १२२ ॥
पाचारोनि पिता पवन । हनुमान गुज सांगें संपूर्ण ।
वांचवीं वानरांचे प्राण । रघुनंदन सुखार्थ ॥ १२३ ॥
ऐसें सांगतांचि जाण । वानरांसी आला प्राण ।
अवघे जाले सावधान । वीर देखोन विस्मित ॥ १२४ ॥
ते महेमविवरभुवनीं । भेटली सुरसा तपस्विनीं ।
तिनें हनुमंता देखोनी । जाली मनीं विस्मित ॥ १२५ ॥
सुरसा पुसे तूं कोण येथ । हनुमान सांगे रामभक्त ।
विवरीं आलो सीताशुद्ध्यर्थ । समवेत वानरांसीं ॥ १२६ ॥
सुरसा म्हणे तुम्ही श्रीरामभक्त । तरीच तुम्हां येववलें येथ ।
येरांसी हें स्थळ न प्राप्त । मी सनाथ तुमचेनि ॥ १२७ ॥
ब्रह्मवरद मज येथ । तुज भेटतील श्रीरामभक्त ।
तेणें तूं होसील निर्मुक्त । तें भाग्य प्राप्त मज आजी ॥ १२८ ॥
विकळ देखोनि वानरांसी । सुरसा ते सज्ञान कैसी ।
जेणें विश्रांति होय आम्हांसीं । त्या उपायासी आदरिलें ॥ १२९ ॥
दिधलें विश्रांतिरसपान । जीवन दिधलें स्वानंदघन ।
सुखस्वादिष्ठ फळें संपूर्ण । रामस्मरणेंसीं सेविती ॥ १३० ॥
ग्रासोग्रासीं रामस्मरण । रसपान हरिचिंतन ।
वानरीं सेवितां जीवन । गडगर्जन नामाचें ॥ १३१ ॥
क्षुधा निमाली नित्यतृप्ती । निद्रा निमाली सुखसंवित्ती ।
सुखस्वानंदें हेलावती । परम विश्रांति वानरां ॥ १३२ ॥
रामनामें तृप्त वानर । नामें कोंदलें विवर ।
नामें व्यापिलें चराचर । नामें कपींद्र गर्जती ॥ १३३ ॥
नामें कोंदलें वैकुंठपीठ । नामें डुल्लत श्रीनीलकंठ ।
सुरसेचें भाग्य वरिष्ठ । हनुमंत श्रेष्ठ सभाग्य ॥ १३४ ॥
हरिभक्तांचिया संगतीं । जढ मूढ उद्धरती ।
सुरसा सभाग्य वानूं किती । हनुमंतीं विश्वास ॥ १३५ ॥
हनुमंतनिष्ठारामस्मरण । कळिकाळाची बोळवण ।
नामें जन्ममरणा मरण । नाम परिपूर्ण परब्रह्म ॥ १३६ ॥
वानरां जाली नित्यतृप्ती । सुरसा पावली अति विश्रांती ।
हनुमंताचिये संगतीं । अवघे डुल्लती स्वानंदें ॥ १३७ ॥
ऐकता अंगदाच्या गोष्टी । श्रीरामा सुखानुकोटी ।
हरिखें त्याची पाठी थापटी । स्वानंदपुष्टी डुल्लत ॥ १३८ ॥
ऐकतां भक्तांची निजकथा । परम सुख श्रीरघुनाथा ।
त्यांमाजी हनुमंत पढियंता । त्याची कथा अतो गोड ॥ १३९ ॥
अंगदासी म्हणे रघुवीर । पुढील सांगें समाचार ।
आवडे हनुमंताचा पुरूषार्थ थोर । रामा निरंतर ऐकावया ॥ १४० ॥
अंगद म्हणे श्रीरघुपती । वानरां जाली विश्रांती ।
शोधावया सीता सती । स्वयें पुसती हनुमंता ॥ १४१ ॥
नाहीं रविचंद्रविलासा । विवरीं स्वयंप्रकाशीं ठसा ।
तेथें लक्षेना दक्षिणदिशा । शुद्धीस धिंवसा काय करूं ॥ १४२ ॥
सुरसा सांगे हनुमंताप्रती । ब्रह्मवरदें गतिनिर्गती ।
मीच जाणें विवरस्थिती । तुमच्या शक्ती न निघवे ॥ १४३ ॥
सुरसा विनवी हनुमंताप्रती । शुद्धि पावेल सीता सती ।
यश पावाल परम कीर्ती । सत्य वचनोक्ती हे माझी ॥ १४४ ॥
हनुमान सांगें सुरसेसी । वेगीं काढीं वानरांसी ।
येरी लागली पायांसी । सांगेल तैसी स्थिती कीजे ॥ १४५ ॥
डोळे उघडें असतां । बाहेरी न काढवे सर्वथा ।
डोळें झाकिलिया समस्तां । निमेषार्धात काढीन ॥ १४६ ॥
डोळे झांकितां वानर । पुढें गडगर्जे समुद्र ।
मागें न दिसे विवर । विस्मयो थोर वानरां ॥ १४७ ॥

संपातीची भेट व हनुमंताचे लंकेकडे उड्डाण

डोळे झांकितां वानरीं । ना कदिये ना धरिलें करीं ।
अवघे विवराबाहेरी । समुद्रतीरीं स्वयें उभे ॥ १४८ ॥
रामनामाचे आवर्ती । सुरसेसहित विवरोन्मुक्ती ।
वानर विवरातें पाहती । तंव तेथें व्यक्ती लक्षेना ॥ १४९ ॥
असो हे नव्हेचि सीताशुद्धी । पुढें अडविलें उदधी ।
मागें जावें तरी लोटला अवधी । वानरमांदी संचिंत ॥ १५० ॥
मागें जातां अपमान । सुग्रीव दंडील दारूण ।
पुढें समुद्र नव्हे गमन । द्ध्यावया प्राण सिद्ध जालों ॥ १५१ ॥
लक्षोनियां समुद्रतीर । पडतां प्रायोपवेशीं वानर ।
संपाती पक्षी महाथोर । आला समग्र भक्षावया ॥ १५२ ॥
करोनि बहुकाळ लंघन । मग वानरी त्यजावा प्राण ।
श्रीरामें कृपा केली संपूर्ण । सद्ध्य:मरण पक्षिभक्षा ॥ १५३ ॥
व्यर्थ देहो द्ध्यावा समुद्रतीरीं । अति उल्लास वानरीं ।
देह लागला परोपकारीं । स्मरतीं गजरीं श्रीरामा ॥ १५४ ॥
होतां श्रीरामनामस्मरण । फिटलें संपातीचें मूढपण ।
त्यासीं उपजलें परम ज्ञान । सावधान अवधारा ॥ १५५ ॥
जेथें श्रीरामनामस्मरण । तेथें कल्पांतीं न रिघे मरण ।
संपाती घाली लोटांगण । तुम्ही धन्य कोण कोणाचे ॥ १५६ ॥
ज्याचे स्मरणीं श्रीरामनाम । सफळ जन्म सफळ कर्म ।
सफळ त्याचा देहधर्म । भाग्यें परम भेटलेति ॥ १५७ ॥
श्रीरामनाम स्मरतां येथ । अवघे आलेति किमर्थ ।
देह त्यागावया उदित । तुम्ही किमर्थ तें सांगा ॥ १५८ ॥
ऐकोनि संपातीचें वचन । अंगद म्हणे करीं भक्षण ।
संपाती म्हणे सत्य संपूर्ण । न रिघे मरण रामस्मरणें ॥ १५९ ॥
ऐकोनि संपातीचा वृत्तांत । बोलता जाल हनुमंत ।
आम्ही श्रीरामाचे भक्त । सीता शुद्ध्यर्थ येथें आलों ॥ १६० ॥
शोधितां दक्षिण समुद्र समग्र । कोठें न भेटे सीता सुंदर ।
लोटली श्रीरामर्यादामेर । मरणीं तत्पर यालागीं ॥ १६१ ॥
ऐकोनि हनुमंताचें वचन । संपाती जाला हास्यवदन ।
मज आहे सीतेचें ज्ञान । सावधान अवधारा ॥ १६२ ॥
सिंधुमर्यादा शतयोजन । तेथें आहे लंकाभुवन ।
त्यामाजी आहे अशोकवन । सीता चिद्रत्‍न तेथें वसे ॥ १६३ ॥
मज असती पक्षगती । तरी आणितों सीता सती ।
ऐसें बोलतां संपातीसीं । पक्षप्राप्ती पावला ॥ १६४ ॥
सूर्यवरद संपातीसी । भेटलिया श्रीरामभक्तांसी ।
निर्विकल्प पक्ष पावसी । सीताशुद्धीसी सांगतां ॥ १६५ ॥
निर्विकल्प पक्षप्राप्ती । सांडोनि त्रिगुण गुणवृत्ती ।
संपाती पावला गुणातींतीं । पुनरावृत्ती खंडली ॥ १६६ ॥
श्रीरामभक्तांसीं संगती । उद्धरले नेणों किती ।
आतांचि उद्धरला संपाती । धन्य संगती संतांची ॥ १६७ ॥
सिंधुमर्यादा शतयोजन । वानरां न करवे उल्लंघन ।
एकें उड्डाणें पैं जाण । गेला आपण हनुमंत ॥ १६८ ॥
स्वयें उडतां बळेचिकरीं । गिरि कडे खचलें सागरीं ।
शिखरें उडविली अंबरीं । आपांपरी पशुपक्षियां ॥ १६९ ॥
आम्ही वानर बलवंत । दक्षिणे राहतां होईल अनर्थ ।
उत्तरभागीं ठेवी हनुमंत । धरोनि पर्वत राहिलों ॥ १७० ॥
हनुमंत उडतां बळेंकरीं । कडे खचले सागरीं ।
जळ उसळलें अंबरीं । आपांपरीं विमानां ॥ १७१ ॥
श्रीरामबाणाचिया गती । सवेग गेला पैं मारूती ।
जे जे लंकेसीं केली ख्याती । तें तें रघुपति पुसावें ॥ १७२ ॥
ऐसें अंगद सांगत । सुखावला श्रीरघुनाथ ।
त्यासी धरोनि ह्रदयांत । स्वयें हनुमंत पाचारी ॥ १७३ ॥
एकाजनार्दना शरण । हनुमंतप्रताप संपूर्ण ।
ब्रह्मलिखित अनुसंधान । गोड गहन श्रोत्यांसी ॥ १७४ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडे एकाकारटीकायां
अंगद श्रीरामसंवादो नाम पंचविंशतितमोऽध्यायः ॥ २५ ॥
॥ ओव्यां १७४ ॥ श्लोक ८ ॥ एवं संख्या १८२ ॥