अध्याय 37
बिभीषणाचे श्रीरामांकडे आगमन
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
त्यानंतर काही न बोलतां शांतपणे बिभीषण प्रधानांसह तेथून परतला :
बिभीषणासी अपमान । जालिया नव्हे क्रोधायमान ।
स्वयें श्रीराम स्मरोन । सावधान बैसला ॥ १ ॥
कांही न बोलोनि उपपत्ती । विचारोनि विवेकयुक्ती ।
शरण जावें श्रीरघुपती । निश्चयो चित्तीं दृढ केला ॥ २ ॥
बिभीषणाचे विचार :
चौघे घेवोनि प्रधान । स्वयें निघाला बिभीषण ।
रावणासी मधुर वचन । काय आपण बोलत ॥ ३ ॥
आम्ही तुम्ही सखे बंधु । अणुमात्र नाहीं विरोधु ।
सांगतां तुजला हितानुवादु । वृथा क्रोधूं तुवां केला ॥ ४ ॥
निंदोनियां लंकानाथा । श्रीरामा वाणिलें स्वपक्षार्था ।
तरी मी जाईन अधःपाता । जाण तत्वतां लंकेशा ॥ ५ ॥
हनुमंतापुढें तुझें दळ । तुजदेखतां पळालें सकळ ।
तेंचि म्यां करोनि विकळ । तुज प्रांजळ सांगितलें ॥ ६ ॥
तेणें राग प्रधानचित्ता । तेणें राग सैन्या समस्ता ।
तूंही कोपलासी लंकानाथा । निजस्वार्था नेणोनी ॥ ७ ॥
चोरी मारी आणि परव्दारी । हा धर्म तुझें घरीं ।
अनुताप रिघावया तुजमाझारीं । निजगजरीं बोलिलों ॥ ८ ॥
राक्षसांची सभा खोटी । म्यां सांगितली स्वहितगोष्टी ।
तेच करोनि उफराटी । धरिला पोटीं महाक्रोध ॥ ९ ॥
जेंवी ज्वरिताचें मुख । दुग्धा मानी कडु विख ।
तैसें रावणा जालें देख । मानिसी असुख स्वहिताचें ॥ १० ॥
क्रोधाचा प्रभाव व त्याचे दुष्परिणाम :
अति कोपें लंकानाथा । तुवां मजला हाणितल्या लाथा ।
तरी काय जिंकिलें रघुनाथा । किंवा स्वस्थता तुज जाली ॥ ११ ॥
कोप जगामाजी अपकारी । त्याची वस्ती तुजमाझारी ।
तेणें विवेकाची केली बोहरी । स्वहित दुरी दुराविलें ॥ १२ ॥
भलताही क्रोधानुकारी । कोपे अल्प अन्यायमात्रीं ।
कोप परम अपकारी । कोणी त्यावरी कापेना ॥ १३ ॥
उन्मत्त गज जिवें मारीं । त्यासी सिंह पाडी धरेवरी ।
परी कोपावरी कोप करी । ऐसा संसारीं वीर नाहीं ॥ १४ ॥
क्रोध एकला एक । चहूं पुरूषार्थीं घातक ।
ऐक त्याचाही विवेक । दुष्ट परिपाक क्रोधाचा ॥ १५ ॥
क्रोध येतांच मानसीं । स्वधर्मकर्मा क्रोध त्रासी ।
क्रोध अर्थ स्वार्थ विध्वंसी । मोक्ष क्रोधापासीं कदा न घडे ॥ १६ ॥
क्रोध आलिया एकांती । स्त्रीपुरूषां कलहउत्पत्तीं ।
धक्काबुक्कीमध्यें रात्री । कामविघाती समूल क्रोध ॥ १७ ॥
क्रोध आलिया धर्मसंधीं । मुख्य ब्राह्मणातें स्वयें निंदी ।
परापवादाच्या अनुवादीं । क्रोधें धर्मसिद्धी कदा न घडे ॥ १८ ॥
क्रोध धर्मातें उच्छेदी । क्रोध कर्मातें निंदी ।
क्रोध पापी हा दुर्बुद्धी । निंदानुवादीं जल्पोनीं ॥ १९ ॥
क्रोध पित्यातें निर्भर्त्सी । क्रोध मातेतें म्हणे दासी ।
क्रोध स्वधर्मातें नासी । क्रोधापासीं अधर्म ॥ २० ॥
बंधु बंधु अति आप्त । अर्थस्वार्थें क्रोधाभिभूत ।
स्वबंधूसी हाणवी लाथ । अति अनर्थ तो क्रोध ॥ २१ ॥
उत्तम अर्थाचिये प्राप्ती । क्रोध मुख्य विश्वासघाती ।
अर्थापासीं क्रोध अनर्थीं । जाण निश्चितीं लंकेशा ॥ २२ ॥
अंधारीं जरी सूर्य बुडे । तरी क्रोधापासीं मोक्ष जोडें ।
काम क्रोध लोभ जैं झडे । तैंच आतुडे निजमोक्ष ॥ २३ ॥
धर्म अर्थ काम मोक्षता । चहूं पुरूषार्था क्रोध नागविता ।
तो तुजमाजी वसें लंकानाथा । जेणें मज लाता हाणविल्या ॥ २४ ॥
बिभीषणाचे रावणाला शेवटचे सांगणे :
मज हाणितलिया लाथा । पावलासि कोणा निजस्वार्था ।
किंवा पावलासि परमार्था । जासी अधःपाता श्रीरामद्रोहें ॥ २५ ॥
परम कृपा रघुनाथा । तुवां हाणितल्या लाथा ।
अल्पहीं क्रोध नयें चित्ता । निजशांतता श्रीरामें ॥ २६ ॥
तुवां हाणितांचि लाथा । पावलों परम वैराग्यता ।
सांडोनि स्वराज्यसुह्रदता । शरण रघुनाथा मी जातों ॥ २७ ॥
सापत्नभावें ध्रुवा हाणिल्या लाथा । तेणें तो पावला परम स्वार्था ।
तैशाच तुझ्या रावणा लाथा । श्रीरघुनाथ प्राप्तिकर ॥ २८ ॥
श्रीराम कृपाळु दयाळ । श्रीराम भक्तवत्सळ ।
तूं तें नेणसीच बरळ । क्रोधें विव्हळ केलासी ॥ २९ ॥
गर्व सांडोनि लंकानाथा । श्रीरामा अर्पिलिया सीता ।
तूं पावशील गा निजस्वार्था । येर्हवीं वृथा मरशील ॥ ३० ॥
सुटल्या श्रीरामाचे बाण । तुज येथें राखेल कोण ।
पळतेचि हनुभ्यांभेण । कैंची आंगवण राक्षसां ॥ ३१ ॥
त्याचा रावणावर परिणाम :
ऐसें बोलोनि बिभीषण । वचनीं खोचिला रावण ।
क्रोधे अंतरला बंधु पूर्ण । कंपायमान स्वयें जाला ॥ ३२ ॥
माझी अपक्व बुद्धि पूर्ण । लाथा हाणितांचि जाण ।
सखा अंतरला बिभीषण । गेला शरण श्रीरामा ॥ ३३ ॥
आईला वंदन करून श्रीरामांकडे जाण्याचा बिभीषणाचा विचार :
आठवलें बिभीषणाच्या चित्ता । आधी अभिवंदोनि माता ।
तीस सांगोनि निजवृत्तांता । शरण रघुनाथा जाईन ॥ ३४ ॥
कुळक्षयो देखोनि जाणा । सुबुद्धि सांगावया रावणा ।
मातेनें धाडिलें बिभीषणा । हितोपसंज्ञा सांगावया ॥ ३५ ॥
रावणासी हित सांगतां । कोप आला लंकानाथा ।
बिभीषणा हाणितल्या लाथा । ऐकोनि माता अति दुःखी ॥ ३६ ॥
बिभीषणा भाग्यवंता । तूं पावलासी बा रघुनाथा ।
कंदन आलें लंकानाथा । कुळा समस्ता समवेत ॥ ३७ ॥
मातेची प्रतिक्रिया व त्याला शुभाशीर्वाद :
माता तुष्टली बिभीषणासीं । तुझेनि धन्य माझीं कुशी ।
श्रीरामीं तूं विनटलासीं । सकळ कुळासी तूं भूषण ॥ ३८ ॥
तुझेनी सकळ कुळ पुनीत । तुझेनि वंश हा सनाथ ।
तुझेनि मी नित्यमुक्त । श्रीरघुनाथ निजसेवा ॥ ३९ ॥
बिभीषणाचे प्रयाण :
ऐकोनि मातेचें वचन । बिभीषण घाली लोटांगण ।
पुढती वंदोनि तिचे चरण । निघाला शरण श्रीरामा ॥ ४० ॥
बिभीषण उडोनि आकाशीं । निराळीं राहोनि सावकासीं ।
पुढती बोले रावणासी । सत्य तूं होसी सखा माझा ॥ ४१ ॥
लाथा मारून श्रीरामाकडे पाठवल्याबद्दल बिभीषण रावणास धन्यवाद देतो :
मोहममतेचें सखेपण । हीन दीन अति गौण ।
कोपामाजी कृपाळु पूर्ण । सखा रावण सत्यत्वें ॥ ४२ ॥
हाणोनियां निजलाथा । शरण धाडिलें रघुनाथा ।
ऐसा सखा तुजपरता । नाहीं तत्वतां तिहीं लोकीं ॥ ४३ ॥
जन्ममरणांचिया कोडी । लाथा हाणोनि तोडिली बेडी ।
रावणकोपकृपापरवडी । जोडिला जोडी श्रीराम ॥ ४४ ॥
ते ऐकून रावणास पश्चात्ताप :
ऐसी रावणाची स्तुती । बिभीषण वदे निजशांती ।
तें ऐकोनि लंकापती । आश्चर्यें चित्तीं वचकला ॥ ४५ ॥
जाला अनुतापी रावण । माझी अपक्व बुद्धि पूर्ण ।
सखा अंतरला बिभीषण । गेला शरण रघुनाथा ॥ ४६ ॥
सर्व लोकांकडून बिभीषणाची स्तुती :
सैन्य सेनानी प्रधान । अवघे वानिती बिभीषण ।
अणुमात्र कोप न येच जाण । व्यर्थ रावण क्षोभला ॥ ४७ ॥
धन्य बिभीषणाची शांती । धन्य बिभीषणाची किर्तीं ।
धन्य बिभीषणाची स्थिती । शरण रघुपती तो गेला ॥ ४८ ॥
राक्षसांच्या घातका युक्तीं । हा सांगेल श्रीरामाप्रती ।
आली राक्षसां समाप्ती । केला समस्तीं निश्चयों ॥ ४९ ॥
बिभीषणाची रावणाला शेवटची विनंती :
बिभीषण म्हणे रावणासी । जे जे इच्छा तुझे मानसीं ।
तें तें सांग मजपासीं । सिद्धी सर्वांशी श्रीराम ॥ ५० ॥
कृपेनें हाणोनियां लाथा । शरण धाडिलें श्रीरघुनाथा ।
ऐक माझी प्रत्युपकारिता । तुज मी आतां सांगेन ॥ ५१ ॥
सावध ऐकें दशशिरा । मी अंतकाळींचा सोयरा ।
तुवां व्देषितां श्रीरामचंद्रा । नरकव्दारा जावों नेदी ॥ ५२ ॥
अंतीं होय परम मुक्ती । ऐसी श्रीरामनामकीर्ति ।
केलिया श्रीरामाची भक्ती । उद्धारगती वंशस्था ॥ ५३ ॥
ऐसें बोलोनि बिभीषण । करोनि रावणासी नमन ।
घेवोनियां चौघे प्रधान । निघाला शरण श्रीरामा ॥ ५४ ॥
चार प्रधानांसह बिभीषण रामाकडे जातो :
जैसे चारी पुरूषार्थ । जीवास करिती नित्य मुक्त ।
तैसे चारी प्रधान तेथ । साह्य सतत बिभीषणा ॥ ५५ ॥
नातरी चारी वेद । उपनिषदीं करिती बोध ।
जीवासी पावे परमानंद । तैसे प्रबुद्ध प्रधान ॥ ५६ ॥
हो कां जैशा चारी मुक्ती । जीवासी देती ब्रह्मप्राप्ती ।
तैसें प्रधान परमार्थी । नित्यानुवर्ती बिभीषणा ॥ ५७ ॥
नातरी जैशा वाचा चारी । नित्यानित्यविवेककरी ।
जीवासी नेती साक्षात्कारीं । तैसें चारी प्रधान ॥ ५८ ॥
ऐसे घेवोनि चारी प्रधान । मेरूमांदारांसमान ।
येतां देखोनि बिभीषण । वानरगण खवळले ॥ ५९ ॥
त्याला पाहून वानरसैन्यात गडबड :
बिभीषण राक्षसेश्वर । गगनीं मेरूशिखराकार ।
त्यातें भूमिस्थ वानर । देखोनि सत्वर उठिले ॥ ६० ॥
बिभीषण शांत दांत । विवेकवैराग्यें विरक्त ।
श्रीरामदर्शनीं अनुरक्त । तेणें आरक्त तो भासे ॥ ६१ ॥
रजतमधूम्र जाय निघोनी । लखलखित भासे चैतन्याग्नी ।
तैसा तेजस्वी बिभीषण गगनीं । वानरगणीं देखिला ॥ ६२ ॥
पुढील वीर धीर विराजमान । मागील ते चारी प्रधान ।
आमचें करावया हनन । आले धांवोनि सायुध ॥ ६३ ॥
वोडण खांड गदापाणी । धनुष्यबाण पाठीस तूणी ।
आम्हांसी मारावयालागोनि । आले धांवोनि राक्षस ॥ ६४ ॥
आमचा करावया घात । पांच जण आले नेमस्त ।
पांचही निर्दळिलिया येथ । रामकार्यार्थ साधेल ॥ ६५ ॥
जो यांचा करील घात । तोच पुरूषार्थी समर्थ ।
तोच श्रीरामाचा परम आप्त । युद्धकंदनार्थ मग कैंचा ॥ ६६ ॥
पुढिल्या पांचांची मोहर । मारोनि केलिया चकचूर ।
मग मेल्या न येती निशाचर । वानरीं विचार दृढ केला ॥ ६७ ॥
देखोनि राक्षसांची जाती । वेगें उठिले जुत्पती ।
शाळ ताळ शिळा हातीं । हाणावया पर्वतीं पेटले ॥ ६८ ॥
मिळोनियां वानरवीर । अवघीं केला भुभुःकार ।
तेणें खळबळिला सेनासागर । नादें अंबर कोंदलें ॥ ६९ ॥
पाडीं पाडीं म्हणतां जाण । एकापुढें एक उड्डाण ।
करीत आले वानरगण । तेणें बिभीषण दचकला ॥ ७० ॥
शरण जाता श्रीरघुपती । मध्येंच वानर मज मारिती ।
तेव्हां हे गति ना ते गतीं । आली ग्रहगति मुख्यत्वें ॥ ७१ ॥
मुख्य विरोधाचा संबंधु । मी रावणाचा कनिष्ठ बंधु ।
वानरीं माझा करिता वधु । रामें विमर्द चुकवावा ॥ ७२ ॥
करिता श्रीरामनामस्मरण । दीनाचें चुके जन्ममरण ।
मी तंव श्रीरामीं अनन्य शरण । वानरविघ्न कां आलें ॥ ७३ ॥
येथें भेटतां कीं हनुमंत । तो तंव माझा परम आप्त ।
मज भेटविता श्रीरघुनाथ । कपिकंदनार्थ चुकवोनी ॥ ७४ ॥
आतां असोत बहुत युक्तीं । लोटांगण वानरांप्रती ।
मी अनन्य शरण रघुपती । तुम्हीं कां युद्धार्थीं धांवतां ॥ ७५ ॥
ऐसें बोलोनियां देख । बिभीषणें दिधली हाक ।
तोचि बिभीषणाचा श्लोक । अर्थविशेषें अवधारा ॥ ७६ ॥
उवाच स महाप्राज्ञः त्वरेण महता महान् ।
सुग्रीवं वानरान्प्रेक्ष्य खस्थ एव बिभीषणः ॥ ११ ॥
भो भो शाखामृगाः सर्वे वचनं मे निबोधत ।
रामायाख्यातुमिच्छामि कोसलेंद्राय धीमते ॥ १२ ॥
रावणास्यानुजो भ्राता बिभीषण इति श्रुतः ।
चतुर्भीं सचिवैः सार्धं शरणार्थी न संशयः ॥ १३ ॥
प्राप्तोहं राघवं द्रष्टुमिति मां वेत्थ वानराः ॥ १४ ॥
ती गडबड पाहून आकाशातूनच बिभीषणाचे भाषण व सुग्रीवाला विनंती :
देखोनि वानरांचा तवक । गगनीहूनि बिभीषण देख ।
दीर्घ देतांचि पैं हाक । कपिकटक वचकलें ॥ ७७ ॥
काय गर्जतो निशाचर । ऐकों ठेले वानरवीर ।
म्हणे मी शरणागत साचार । श्रीरामचंद्राचे चरणीं ॥ ७८ ॥
तो म्हणे सुग्रीवा कपिपती । वानरस्वामित्व तुझें हातीं ।
शरणागतासीं मारूं येती । यांतें निश्चितीं निवारीं ॥ ७९ ॥
रावणाचा अनुज बंधु । बिभीषण नामें मी प्रसिद्धु ।
म्हणोनि माझा कराल वधु । मी तंव शुद्ध शरणार्थी ॥ ८० ॥
येथें असता हनुमंत । तो सांगता माझा वृत्तांत ।
मज भेटविता श्रीरघुनाथ । शरणागत म्हणोनि ॥ ८१ ॥
श्रीरामाचें सत्य व्रत । मारूं नये शरणागत ।
कपि मज मारावया उदित । ते तूं समस्त निवारीं ॥ ८२ ॥
सुग्रीवा तुझें चरणीं माथा । वृत्तांत सांगें श्रीरघुनाथा ।
रावणाचा कनिष्ठ भ्राता । शरण तत्त्वतां आला असे ॥ ८३ ॥
चौघे प्रधानांसमवेत । बिभीषण शरणागत ।
ऐकोनि सांगेल रघुनाथ । तोचि कार्यार्था करावा ॥ ८४ ॥
कौशल्येचा निजसुत । कौसलेंद्र श्रीरघुनाथ ।
त्याचा अनन्य शरणागत । बिभीषण नाम पैं माझें ॥ ८५ ॥
बिभीषण अनन्य शरणागत । सुग्रीवा मानली हे मात ।
तोचि श्रीरामासी वृत्तांत । वानरनाथ स्वयें सांगे ॥ ८६ ॥
सुग्रीवाचे श्रीरामांना निवेदन :
ऐकोनि बिभीषणाचें वचन । सुग्रीव येवोनि आपण ।
रामलक्ष्मणां करोनि नमन । सांगे आगमन बिभीषणांचें ॥ ८७ ॥
श्रीरामासी अर्पावी सीता । हें हित सांगतां लंकानाथा ।
तयासी हाणोनि लाथा । अनाथता दवडिला ॥ ८८ ॥
नगरीं धेंडे पिटोनि पूर्ण । नगरत्यागें बिभीषण ।
दवडितां बोलला रावण । जाय तूं शरण श्रीरामा ॥ ८९ ॥
श्रीराम जालिया पक्षपाती । कैसा येईल लंकेप्रती ।
केंवी राक्षस करील ख्याती । ते ही प्रतीति अवधारा ॥ ९० ॥
जो बिभीषण सद्भावतां । शरण आला श्रीरघुनाथा ।
काय करावें त्यासी आतां । सांग समर्था श्रीरामा ॥ ९१ ॥
घेवोनियां चौघे प्रधान । बिभीषण अनन्य शरण ।
काया वाचा उदित मन । तुझें श्रीचरण देखोनि ॥ ९२ ॥
ते श्रवण करून श्रीरामांना आनंद :
बिभीषण आला भेटी । तेणें श्रीरामास आनंदकोटी ।
हरिखें सुग्रीवाची पाठ थापटी । आल्हाद पोटीं प्रेमाचा ॥ ९३ ॥
बिभीषणाचें मनोगत । अनन्य भावें शरणागत ।
जाणें अंतर्यामीं श्रीरघुनाथ । ह्रदयस्थ निवासी ॥ ९४ ॥
बिभीषण शरणागत परम । स्वये जाणें आत्माराम ।
सुग्रीवाप्रती राजधर्म । अनुक्रमें अनुवादे ॥ ९५ ॥
सर्व प्रमुख वानरवीरांचे मत श्रीराम विचारतात :
हनुमंतादि मुख्य प्रधान । पाचारिले वानरगण ।
बिभीषण येतो शरण । त्याचे लक्षण लक्षावया ॥ ९६ ॥
बिभीषणाचें मनोगत । सत्य किंवा असत्य ।
निर्धारावया इत्थंभूत । कपी समस्त पाचारिले ॥ ९७ ॥
एकोनि श्रीरामाचें वचन । उल्लसले वानरगण ।
बिभीषणाचें लक्षण । अनुवादन तें करिती ॥ ९८ ॥
मुख्य सुग्रीवसंवादु । हा रावणाचा बंधु ।
अवश्य याचा करावा वधु । म्हणे कुमुदु मारावा ॥ ९९ ॥
नळ नीळ सांगती गोष्टी । तेचि तरळ तरळाचे पोटीं ।
रावणानुज हा तंव कपटी । उठाउठीं मारावा ॥ १०० ॥
गज गवय सांगाती जाण । शत्रुबंधु हा कपटी शरण ।
यासी न वरावें आपण । द्द्यावा दवडोन लंकेंसीं ॥ १०१ ॥
कपटी रावणाचा बंधु । हा मारावा म्हणे मैंदु ।
तैसाचि अनुवादें व्दिविदु । करावा वधु पैं याचा ॥ १०२ ॥
सुषेण पनस दधिमुख । तिघे होवोनि एकमुख ।
यासी राखितां परम दुःख । अवश्यमेव मारावा ॥ १०३ ॥
जांबुवंताच्या मते त्याची अंतर्बाह्य स्थिती पाहून काय ते करावे :
मग बोलिला जांबुवंत । बिभीषणा पाचारा येथ ।
त्याचें लक्षितां चेष्टित । मनोगत कळेल ॥ १०४ ॥
स्थिति गति गमनागमन । नेत्र वक्त्र संभाषण ।
येणें पराचें लक्षण । विचक्षण लक्षिती ॥ १०५ ॥
शरणागताला मरण देऊ नये असे अंगदाचे मत :
अंगद बोले कौतुक । एकला एक बिभीषण रंक ।
त्यासाठीं हरलें कटक । कपि नेटक निजयुद्धें ॥ १०६ ॥
धन्य धन्य या वानरां । शरण आलिया निशाचरा ।
जो तो म्हणे मारा मारा । हा काय खरा पुरूषार्थ ॥ १०७ ॥
हनुमंताला लंकेची सर्व माहिती आहे तेव्हा त्यास विचारणे योग्य :
नेणोनि श्रीरामाची स्थिती । वृथा वानरें जल्पती ।
पैल बैसलासे मारूती । त्याची युक्ती अवधारा ॥ १०८ ॥
सकळ लंकेचें शोधन । हनुमंतें केले आपण ।
साधु कीं दुर्जन बिभीषण । त्याचें लक्षण तो जाणें ॥ १०९ ॥
हनुमंतासी अविदित । नाहीं उरला लंकेचा अर्थ ।
तो सांगेल इत्थंभूत । तें समस्त आयका ॥ ११० ॥
श्रीराम म्हणे गा हनुमंता । बिभीषणा शरणागता ।
काय करावें त्या आतां । तें तत्वतां मज सांगें ॥ १११ ॥
ऐकोनि स्वामींचें वचन । हनुमान घाली लोटांगण ।
वंदोनि श्रीरामाचे चरण । युक्त वचन अनुवादे ॥ ११२ ॥
मारूती बिभीषणाच्या सत्प्रवृत्तीबद्दल खात्री देतो :
हनुमंत सर्वांगें सज्ञान । सर्वेंद्रियीं पक्व विज्ञान ।
जे बोलें तें युक्त वचन । श्रीरघुनंदन सुखकारी ॥ ११३ ॥
हनुमान श्रीरामाचें लळिवाड । त्याचा बोल अमृतापरीस गोड ।
पुरतें वेदशास्त्रांचें कोड । श्रवणीं चाड श्रीरामा ॥ ११४ ॥
हनुमान बोलतां आपण । टवकारले वानरगण ।
पाहत ठेले त्याचें वदन । अवघे जण टकमका ॥ ११५ ॥
बृहस्पति करितां निरूपण । अति एकाग्र अमरगण ।
तैसें ऐकती हनुमंताचें वचन । अवघे जण टकमकां ॥ ११६ ॥
हनुमव्दाक्याची घडमोडी । वानरां टकमक लक्षकोडी ।
वचनीं सत्यत्वाचीं प्रौढी । तेणें अति गोडी श्रीरामा ॥ ११७ ॥
खिरी तुपावरी साखर । तैसें वचन अति मधुर ।
सत्यवादी रामानुचर । श्रीरामचंद्रसुखकारी ॥ ११८ ॥
सावधान ऐकें श्रीरघुनाथा । नेणेनि बिभीषणा ह्रदयस्था ।
कपि प्रधान बोलती वृथा । अनुमानता मिथ्यात्व ॥ ११९ ॥
न कळोनि बिभीषणाचा बोधु । शरण रिघोनि शत्रुबंधु ।
म्हणती आमचा करील वधु । वानरानुवादु अति मिथ्या ॥ १२० ॥
बिभीषणाच्या चारित्र्याविषयी :
लंका शोधितां त्रिकूटीं । म्यां देखिलें आपुलें दृष्टीं ।
बिभीषण हा नव्हे कपटीं । सत्य गोष्टी हे माझी ॥ १२१ ॥
बिभीषण नव्हे हा शठ । बिभीषण नव्हे हा नष्ट ।
बिभीषण नव्हे कपट । वाक्य निर्दुष्ट हें माझें ॥ १२२ ॥
लंका शोधितां समस्त । राक्षसांचें ह्रद्गत ।
जाणोनि वदे हनुमंत । अति समर्थ सत्यत्वें ॥ १२३ ॥
श्रीराम सेवातपोबळें । सर्वां ह्रदयीं हनुमान खेळें ।
तेणें सत्यासत्य आकळे । बोले प्रांजळें सत्य मधुर ॥ १२४ ॥
कपी प्रधान जे बोलती । कपटी बिभीषणाची स्थिती ।
त्यांची मिथ्या हे वदंती । शुद्धभावार्थी बिभीषण ॥ १२५ ॥
बिभीषणाची धर्मस्थिती । बिभीषणाची अगाध किर्ती ।
बिभीषणाची भगवद्भक्ती । शुद्ध भावार्थी बिभीषण ॥ १२६ ॥
बिभीषणा नाहीं अकर्म । बिभीषणा नाहीं विकर्म ।
बिभीषणीं नाहीं अधर्म । सत्यत्वें वचन हें माझें ॥ १२७ ॥
बिभीषणां नित्य निवृत्तीं । बिभीषण धर्ममूर्तीं ।
बिभीषणीं नित्य शांतीं । शुद्ध भावार्थी बिभीषण ॥ १२८ ॥
सांडोनि यौवराज्य संपूर्ण । त्यजोनियां बंधु रावण ।
युद्धसमयीं आला शरण । त्यासी आपण नये मारूं ॥ १२९ ॥
पहिलेंचि श्रीरामीं प्रेमता । त्यावरी रावणें हाणिल्या लाता ।
शरण आला श्रीरघुनाथा । भावार्थता स्वानंदें ॥ १३० ॥
भावार्थी अथवा कपटीं पूर्ण । जो कां म्हणें मी आलों शरण ।
त्यासी मारितां आपण । लागेल दूषण सूर्यवंशा ॥ १३१ ॥
शिबिहरिश्चंद्र रूक्मांगद । वंशीचें क्षोभती धर्मविद ।
शरणागताचा पैं वध । अति विरूद्ध तिहीं लोकीं ॥ १३२ ॥
त्याच्यापासून काही नुकसान न होता, झाला तर फायदाच होईल :
स्वर्गीं क्षोभेल दशरथ । अधर्मीं जाला श्रीरघुनाथ ।
मारूं नये शरणागत । हा निश्चितार्थ श्रीरामा ॥ १३३ ॥
एकला एक बिभीषण । त्याचें आम्हांसी भय कोण ।
वधावा म्हणती वानरगण । त्यांची आंगवण अति तुच्छ ॥ १३४ ॥
तुटोन पडतां गगन । गजबजीना रघुनंदन ।
तेथें बापुडें बिभीषण । त्याचें भय कोण आम्हांसी ॥ १३५ ॥
ऐसें बोलतां मारूती । संतोषला श्रीरघुपती ।
सवेंच कपि बोले पुढती । ते उपपत्ती अवधारा ॥ १३६ ॥
बिभीषणाचिये संगती । राक्षसांच्या दुर्गम गती ।
वश्य होतील श्रीरघुपती । विजयप्राप्ति बिभीषणें ॥ १३७ ॥
आभिचारिक विघ्नानुवर्ती । स्वयें रामा वश्य होतीं ।
बिभीषणाचें संगतीं । विजयप्राप्ती श्रीरामा ॥ १३८ ॥
रात्रीं अपरात्रीं निकटवर्तीं । घाला घालोनियां मारिती ।
तेथें हे बिभीषणसंगतीं । विजयप्राप्ती श्रीरामा ॥ १३९ ॥
अलक्ष अगम्य अतर्क्य गती । पृथ्वी करोनि धूर चोरिती ।
तेथें ही बिभीषणसंगती । विजयप्राप्ती श्रीरामा ॥ १४० ॥
संकट विकट अति दुर्घट । जेथें रिघता परम कष्ट ।
बिभीषणा संगतीं होती सपाट । विजयपट श्रीरामा ॥ १४१ ॥
बिभीषणाची शुद्ध मती । बिभीषण केवळ परमार्थीं ।
विकल्प न धरावा चित्तीं । शुद्ध शरणार्थीं बिभीषण ॥ १४२ ॥
लंका शोधितां संकटीं । म्यां देखिलें आपुले दृष्टीं ।
त्रिसत्य सत्य माझी गोष्टी । नव्हे कपटी बिभीषण ॥ १४३ ॥
वाहतों श्रीरामा तुझी आण । भावें शिवतों तुझे चरण ।
कपटी नव्हे हा बिभीषण । सत्य भाषण हें माझें ॥ १४४ ॥
श्रीरामांच्या मनोगताप्रमाणेच मारूतीचें मत पडले :
ऐकतां हनुमंताची गोष्टी । श्रीरामासी आनंद पोटीं ।
हरिखें खेंवा पडली मिठी । आल्हाद सृष्टीं न समाये ॥ १४५ ॥
जैसें श्रीरामाचें मनोगत । तैसेंचि बोलिला हनुमंत ।
तेणें उल्लासें श्रीरघुनाथ । असे गर्जत स्वानंदें ॥ १४६ ॥
मज मारावया जाण । कपटी रावण आलिया शरण ।
त्यासी माझें अभयदान । मग बिभीषण केंवी त्याज्य ॥ १४७ ॥
श्रीरामांना आनंद व बिभीषणाचे स्वागत करून त्याला लंकेचे राज्यदान :
बिभीषण माझा आत्मा जाण । बिभीषण माझा जीवप्राण ।
माझेनि चिरंजीवी बिभीषण । जन्ममरण त्या नाहीं ॥ १४८ ॥
बिभीषणा शरणागता । वेगीं पाचारीं पैं आतां ।
लंका दिधली तत्वतां । निजराज्यतासंकल्पें ॥ १४९ ॥
जा रे म्यां मारिला रावण । लंकेसीं स्थापिला बिभीषण ।
शरणागतीं प्रेम पूर्ण । आपणा आपण विसरला ॥ १५० ॥
ऐसिया श्रीराम उत्तरीं । हनुमान लोळे पायांवरी ।
जें म्यां नेमिलें जिव्हारीं । तेंचि निर्धारीं श्रीरामवाणीं ॥ १५१ ॥
भेटावया निजभक्ता । बाहु थरकती श्रीरघुनाथा ।
वेगीं बोलावी गां हनुमंता । शरणागता बिभीषणा ॥ १५२ ॥
ऐकोनि बिभीषणाचें महिमान । सुग्रीवें खालती घाली मान ।
वानर जाले लज्जायमान । श्रीरघुनंदन उल्लासे ॥ १५३ ॥
बिभीषणाचें भाग्य पूर्ण । श्रीराम तुष्टला संपूर्ण ।
एकाजनार्दना शरण । भेटीचें लक्षण अवधारा ॥ १५४ ॥
कैसी दोघांची दृष्टादृष्टी । कैसी दोघांची होईल भेटी ।
कैसे दोघें करितील गोष्टी । ते कथाकसवटी अनुपम्य ॥ १५५ ॥
देवाभक्तांचें दर्शन । ते कथा तंव अति पावन ।
एक जनार्दना शरण । रामायण अति रम्य ॥ १५६ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडें एकाकारटीकायां
बिभीषणागमनं नाम सप्तत्रिंशत्तमोऽध्यायः ॥ ३७ ॥
॥ ओव्यां १५६ ॥ श्लोक २४ ॥ एवं संख्या १८० ॥