युद्धकांड
अध्याय 1
वानरसैन्य मोजण्यासाठी रावण हेर पाठवितो
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
उदार गंभीर सुंद्रकांड । तें संपवूनि अतिशयें गोड ।
पुढां उठावलें युद्धकांड । अति प्रचंड प्रतापी ॥ १ ॥
रामायणाचे महत्व त्यातील परमार्थ :
वाखाणावया युद्धकांड । माझें केंवी सरतें तोंड ।
तरी जनार्दनकृपा अखंड । जे कांडे कांड अर्थवी ॥ २ ॥
रामायणींचा सखोल अर्थ । वक्ता जनार्दन समर्थ ।
सबाह्य परिपूर्ण रघुनाथ । ग्रंथ परमार्थ श्रीराम ॥ ३ ॥
रामायणींचें निजसार । क्षरीं कोंदलें अक्षर ।
पदापदार्थ चिदमिन्मात्र । परम पवित्र रामकथा ॥ ४ ॥
कथेजाजील कथार्थ । सबाह्य कोंदला रघुनाथ ।
हाचि ग्रंथींचा परमार्थ । निजात्मस्वार्थ साधका ॥ ५ ॥
एकनाथांचे आत्मनिवेदन – श्रीरामांच्या अनुमतीनेच मी लिहितो :
विषम जरी रामचरित्र । तरी ते कथा चिन्मात्र ।
जनार्दनकृपा अति उदार । कथा सुखसार स्वानंदें ॥ ६ ॥
माझें जें वदतें वदन । स्वयें जाला रघुनंदन ।
वचनावचनीं निर्वचन । कथा पावन श्रीरामें ॥ ७ ॥
श्रीरामकथेचा गुह्यार्थ । यथार्थ वदवी रघुनाथ ।
माझें हातीं लेखणी दऊत । कथा लिहिवीत श्रीराम ॥ ८ ॥
माझे दृष्टीचें देखणेपण । श्रीराम होवोनि आपण ।
दावई कथानिरुपण । जागृतिस्वप्नसुषुप्तीं ॥ ९ ॥
सर्व अवस्थांमध्ये श्रीरामांचाच ध्यास :
जागृतीं स्वयें कर्म करितां । तंव कर्मी प्रकटे श्रीरामकथा ।
स्वप्नीं प्रकटे निजगुजवार्ता । होय सांगता श्रीराम ॥ १० ॥
सुषुप्तीं करितां सुखें शयन । तेथें नाही जन्ममरण ।
नाही कर्मधर्माचरण । सुषुप्ति पूर्ण श्रीराम ॥ ११ ॥
करुं बैसतां भोजन । ग्रासोग्रासीं रामायण ।
जेवणीं गोड श्रीरामभजन । दावी आपण श्रीराम ॥ १२ ॥
चवी चाखतां रसाआंत । रसस्वाद श्रीरघुनाथ ।
करोनि भोजनाचा अंत । रामायणार्थ राम दावी ॥ १३ ॥
चाखूं जातां रसस्वादन । रस रसना रघुनंदन ।
श्रीरामें स्वानंदभोजन । रामायण अति गोड ॥ १४ ॥
चाखतां रामायणगोडी । रस रसना रसत्व सांडी ।
दृष्टि दृश्यातें ओसंडी । जोडितां जोडी रामकथा ॥ १५ ॥
करुं जातां सुखें शयन । विसरों नेदी रामायण ।
शेज बाज अंथरुण । होय आपण श्रीराम ॥ १६ ॥
रामायण लिहावयाअर्थी । जागृतीं स्वप्नीं आणि सुषुप्तीं ।
विसंबेना रघुपती । अहोरातीं रामकथा ॥ १७ ॥
अहोरात्र त्यांच्याकडूनच मला प्रेरणा होत आहे :
रामायण लिहावयासाठीं । रामें पुरविली माझी पाठी ।
मीपण हरोनि हटाहटीं । कथा मराठी स्वयें दावी ॥ १८ ॥
श्रीरामाची रामकथा । ते चहूं मुक्तींतें हाणी लाता ।
निर्भर्त्सून चहूं पुरुषार्था । कथार्थता परब्रह्म ॥ १९ ॥
एवढा साधकाचा स्वार्थ । सधावया श्रीरघुनाथ ।
रामायण स्वयें लिहिवीत । शुद्ध परमार्थ रामकथा ॥ २० ॥
हरिकथा निरुपणाचे फळ :
असो हरिकथानिरुपण । नित्य करितां नामस्मरण ।
स्वयें ब्रह्म ये ओरसोन । जेंवी कां धेनु वत्सासीं ॥ २१ ॥
रामनाम्स्मरणासाठीं । परब्रह्मींच पडे मिठी ।
तें नाम सांडून करटीं । करिती अटाटी कुशमृत्तिकां ॥ २२ ॥
न कर्मणा न प्रजया श्रुती । कर्मे नव्हे पदप्राप्ती ।
कर्में ते देहधर्मास्थिती । परब्रह्मप्राप्ती रामनामें ॥ २३ ॥
ऐसी रामनामाची ख्याती । तो श्रीराम लंकेप्रती ।
घेवोनि आला वानरपंक्ती । लंकापती दंडावया ॥ २४ ॥
ससैन्ये सागरे तीर्णे रामे दशरथात्मजे ।
अमात्यौ रावणः श्रीमानब्रवीच्छुकसारणौ ॥१॥
वानरीं तनुमास्थाय परिसंख्यातुमर्हथः ।
बलं यात्राविधानं च योधानां च विनिर्णयः ॥२॥
व्यवसायं च रामस्य वीर्यं प्रहरणानि च ।
लक्ष्मणस्य च सौमित्रेस्तत्वतो ज्ञातुमर्हथः ॥३॥
युद्धकांडाचा विषयप्रवेश :
समुद्रीं सेतु बांधोन । वानरसेना घेऊन ।
लंके आला रघुनंदन । भेरी निशाण लाऊनी ॥ २५ ॥
श्रीरामांचे लंकेत आगमन, त्याचा रावणावर
झालेला परिणाम शुकसारण या हेरांना पाठवितो :
आला देखोनि रघुनंदन । रावण जाला अति उद्विग्न ।
पाचारोनि शुकसारण । दुःख दारुण आलोची ॥ २६ ॥
माझे प्रधान उन्मत्त पूर्ण । नाहीं स्वहिताची आठवण ।
करितां वारुणीमाध्वीमद्यपान । तेथें पाठवी कोण हेर चार ॥ २७ ॥
असो माझ्या प्रधानांची कथा । माझी मजचि पडली चिंता ।
लंके आल्या श्रीरघुनाथा । काय म्यां आतां करावें ॥ २८ ॥
तुम्हीं जावोनि हेरवृत्तीं । श्रीरामसैन्य आहे किती ।
झुंझार आणि वीरवृत्ती । संख्या मजप्रती सांगावी ॥ २९ ॥
श्रीरामाचा उत्साह पूर्ण । शास्त्रास्त्रें दुर्धर बाण ।
सखा सौमित्र लक्ष्मण । त्याची आंगवण मज सांगा ॥ ३० ॥
श्रीरामाचें बळ दळ । वानरांचें शौर्य शीळ ।
लक्ष्मणाचा रणकल्लोळ । करोनि विवळ मज सांगा ॥ ३१ ॥
इति प्रतिसमादिष्टौ राक्षसौ शुकसारणौ ।
कपिरुपधरौ वीरौ प्रविष्टौ वानरं बलम् ॥४॥
तौगत्वा मायया च्छन्नौ राक्षसेंद्रस्य मंत्रिणौ ।
सारणश्च शुकश्चैव संख्यातुं नाधिजग्मतुः ॥५॥
वानरांची साद्यंत माहिती आणण्याचा त्यांना हुकूम :
जातां राक्षसवेषस्थिती । कपि तुमचा घात करिती ।
घेवोनि वानरवेषबुंथी । सैन्यसंपत्ती गणावी ॥ ३२ ॥
ऐकोनि रावणाचें वचन । शुक आणि सारण ।
वानरवेष धरोनि जाण । आलें आपण कपिसैन्यीं ॥ ३३ ॥
सैन्य पाहतां निवाडें । वानर दाटले चहुकडे ।
रिती पृथ्वी दृष्टी न पडे । मागें पुढें कोंदले ॥ ३४ ॥
वानर दाटले भुतळीं । वानर दाटले नभःस्थळीं ।
वानर दाटले जळी-स्थळीं । लंकामूळीं कलकलती ॥ ३५ ॥
तेथें करिता शंखस्फुरण । वानरसंख्या न करवे जाण ।
थोटावले शुकसारण । वानरगण न गणवती ॥ ३६ ॥
एक आदळले लंकेसीं । असंख्य वानर आकाशीं ।
कपि कोंदले पृथ्वीसीं । सिंधूपासीं अगणित ॥ ३७ ॥
मागून वानरांच्या परवडी । सवेग धांवतीं तांतडीं ।
नळ नीळ अंगद वीकोडी । अति कडाडीं पैं आले ॥ ३८ ॥
श्रीरामापाठीसीं वानर । अर्बुदें पद्मनिकर ।
त्यांमागें सुग्रीवाचा भार । अति अपार असंख्य ॥ ३९ ॥
त्याहिवेगळे पैं जुत्पती । वेगळे वेगळे भार नेणों किती ।
संख्या करितां शंखस्फूर्ती । सैन्यसंपत्ती न गणवे ॥ ४० ॥
शोधितां वानर पाळतिनें । तंव लोळखिले बिभिषणें ।
त्यांची लक्षून लक्षणें । धरलें तेणें साटोपें ॥ ४१ ॥
तौ ददर्श महामायौ प्रतिच्छन्नौ बिभिषणः ।
ग्राहयित्वा महातेजा वानरैर्वानरोपमौ ॥६॥
आचचक्षे स रामाय तावुभौ शुकसारणौ ।
तौ दृष्ट्वा व्यथितौ रामं निराशौ जीवितं प्रति ॥७॥
सुप्रसन्नोऽब्रवीद्रामः सर्वभुतहिते रतः ।
वधार्हौ वां प्रमुंचामि दृष्ट्वा सैन्य; समंततः ॥८॥
वक्तव्यं राक्षसं गत्वा यथोक्तं वचनं मम ।
श्वोभूते नगरीं लंका सप्राकारां सतोरणाम् ॥९॥
रक्षसां च बलं पश्य शरैर्विध्वंसितं मया ॥ १० ॥
बिभीषण त्या हेरांना ओळखतो व श्रीरामांकडे त्यांना नेतो,
श्रीराम त्यांना शिक्षा न करिता सोडून देतात :
दोहीं हेरांचें लक्षण । लक्षूं जाणें बिभीषण ।
त्याही लक्षणांचे लक्षण । अति विंदाण अवधारा ॥ ४२ ॥
उड्डाण विराण उलटें किरण । करुं नेणती शुक सारण ।
अवघे म्हणती कपटी पूर्ण । धरी धांवोन बिभीषण ॥ ४३ ॥
आणिकें त्यासी धरुं जातां । दोघे पळती लघुलाघवता ।
बिभीषण जाणे राक्षसां समस्तां । होय धरिता धांवोनी ॥ ४४ ॥
वानरीं बाधोनि वानरवेशी । शीघ्र आणिले रामापासीं ।
राम कृपाळु सर्व भूतांसी । काय त्यांसी बोलता ॥ ४५ ॥
रावण चोर तुम्ही त्याचे हेर । वधा योग्य बोले शास्त्र ।
तरी मी न मारीं साचार । वानरभार पहा माझा ॥ ४६ ॥
आणिकापासून हे पळती । म्हणोनि दिधले हनुम्याहातीं ।
राक्षस मावांची व्युत्पत्ती । पुच्छप्रती चालेना ॥ ४७ ॥
दोघे धरोनि पुच्छावतीं । स्तोमें स्तोमें ऋक्षजुत्पती ।
दाखविली सैन्यसंपत्ती । रावणाप्रती सांगावया ॥ ४८ ॥
तुम्ही दोघे मारलिया जाण । कोण आमुचें दादुलेपण ।
रावणापासी माझें वचन । स्वयें गर्जोन सांगावें ॥ ४९ ॥
प्रातःकाळीं कडकडाट । करीन राक्षसां सपाट ।
बाणीं भेदून त्रिकूट । दशकंठ छेदीन ॥ ५० ॥
माझे बाण सुटल्या देखा । झाडिती तोरणें पताका ।
बाणीं विध्वंसूनि लंका । दशमुखा छेदीन ॥ ५१ ॥
अपराधी निरपराधी । श्रीराम पाहे समानबुद्धी ।
दोघे सोडविले त्रिशुद्धी । कृपानिधि कृपाळुवें ॥ ५२ ॥
सांगोनि पराक्रम पुरुषार्थ । दोघां करविलें निर्मुक्त ।
स्वयें चळचळां कांपत । लंकेआंत ते आले ॥ ५३ ॥
इति प्रतिसमादिष्टौ राक्षसौ शुकसारणौ ।
आगम्य नगरीं लंकामब्रूतां राक्षसाधिपत् ॥११॥
बिभीषणगृहीतौ तौ वधार्थ राक्षसेश्वरः ।
दृष्ट्वा धर्मात्मना मुक्तौ रामेणमिततेजसा ॥१२॥
एकस्थानगता यत्र चत्वारः पुरुषर्षभाः ।
रामो दाशरथिःश्रीमान्लक्ष्मणश्च बिभीषणः ॥१३॥
सुग्रीवश्च महातेजा महेंद्रसमविक्रमः ।
एते शक्ताः पुरीं लंकां सप्राकारां सतोरणाम् ॥१४॥
उत्पाट्य संक्रामयितुं सर्वे तिष्ठंतु वानरः।
यादृशी श्रीहि रामस्य वीर्यं प्रहरणानि च ॥१५॥
हनिष्यति पुरीं लंकामेकस्तिष्ठंतु ते त्रयः ॥१६॥
हेरांची शोचनीय अवस्था :
चोर अपराधी वधयुक्त । ते श्रीरामें केले निर्मुक्त ।
धाकें चळचिळां कांपत । आले धांवत लंकेसीं ॥ ५४ ॥
रावण देखतांहि दृष्टीं । धांके धाप न सामये पोटीं ।
बोबडी वळलीसे होटीं । सांगतां गोष्टी चळकांप ॥ ५५ ॥
स्वस्थ होवोनि निवाडें । गोष्टी सांगती रावणापुढें ।
वानरसैन्य असंख्या गाढें । संख्या न घडे निश्चित ॥ ५६ ॥
आम्ही जातां दोघे जण । बिभीषणें धरिलें ओळखोन ।
नेतां रामापासीं बाधोन । अचूक मरण आम्ही मानूं ॥ ५७ ॥
माराणें म्हणे बिभीषण । मारा म्हणती वानरगण ।
राम धर्मात्मा आपण । दिधलें सोडून प्रतापदृष्टीं ॥ ५८ ॥
हे मारिल्या दोघे जण । आम्हीं काय जिंतिला रावण ।
त्यांसी दाखवा वानरसैन्य । पाळती गणा सर्वही ॥ ५९ ॥
त्यांना मिळालेला रामांचा आदेश ते रावणाला सांगतात :
देवोनि हनुमंताचे हातीं । आम्हां दाखविली सैन्यसंपत्ती ।
असंख्य वानरांचिया जाती । संख्या सर्वार्थी न करवे ॥ ६० ॥
एक एक मर्कट । वधू पाहे दशकंठ ।
लंका मानिती फोलकट । बळं उद्भट वानरां ॥ ६१ ॥
सप्राकार सतोरण । विध्वंसावया लंकाभुवन ।
चौघांपासीं प्रताप पूर्ण । कोण कोण ते ऐका ॥ ६२ ॥
श्रीराम आणि लक्ष्मण । घरचा भेदी बिभीषण ।
सुग्रीव राजा विजयी पूर्ण । म्हणती क्षणें रावन निर्दाळूं ॥ ६३ ॥
लंका उपडोनियां संमूळीं । निक्षेपावया समुद्रजळीं ।
हेचि चौघे आतुर्बळीं । करावया होळी राक्षसां ॥ ६४ ॥
असो या तिघांच्या ख्याती । एकाला एक रघुपती ।
रावण वधून बाणावर्ती । लंका भस्मांती नेऊं पाहे ॥ ६५ ॥
आडवे आलिया प्रधान । इंद्रजित मकराक्ष कुंभकर्ण ।
अतिकायादिपुत्रदळण । लंकाभुवन भस्मांत ॥ ६६ ॥
राक्षसांची जाती व्यक्ती । रणीं करील समाप्ती ।
एवढा प्रतापी श्रीरघुपती । एकला त्रिजगती दमूं शके ॥ ६७ ॥
प्रताप पुरुषार्थ गर्जोन । स्वयें बोलिला रघुनंदन ।
प्रभाते रणकंदण । करीन रावणवधार्थ ॥ ६८ ॥
ऐकोनी सारणाचें वचन । रावण जाला अति उद्विग्न ।
तें देखोनि त्याचें चिन्ह । सांगे सारण हितवाक्य ॥ ६९ ॥
युद्ध करितां दशशिर । रणीं नाटोपती वानर ।
निर्दाळोनि निशाचर । लंकापुर विभांडिती ॥ ७० ॥
वानरांपुढे नुरें दळ । वानरांसी न चले बळ ।
वानरांशी युद्धकल्लोळ । सर्वथा सकळ करुं नये ॥ ७१ ॥
प्रहृष्टयोधध्वजिनी वनौकसां ।
महात्मनां संप्रति युद्धमिच्छताम् ।
अलं विरोधेन शमो विधीयतां ।
प्रदीयतां दाशरथेर्हि मैथिली ॥१७॥
श्रीराम आणि लक्ष्मण । शस्त्रास्त्रीं अति प्रवीण ।
त्यांसीं सर्वथा न करवे रण । सुटल्या बाण प्राणांत ॥ ७२ ॥
हेचि चौघे रणकंदनार्थ । करावया हर्षेयुक्त ।
शस्त्रास्त्रीं अति उदित । राक्षसांत श्रीराम ॥ ७३ ॥
तैसेच वानर समस्त । युद्धीं थांबवोनि श्रीरघुनाथ ।
निर्दाळावया लंकानाथ । आज्ञा पुसत आल्हादें ॥ ७४ ॥
विजयध्वजी वानरसेना । सुग्रीवें पाळिली जाणा ।
निर्दाळावया रावणा । आंगवण पावती ॥ ७५ ॥
सुग्रीव राजा उठाउठीं । उडी घालोनि त्रिकूटीं ।
मारील राक्षसांच्या कोटी । आवघ्यांशेवटीं रावण ॥ ७६ ॥
असो ह्या म्हावीरांची मात । एकला एक हनुमंत ।
करुं पाहे तो लंकाघात । त्याचा पुरुषार्थ तुम्ही जाणा ॥ ७७ ॥
त्यांच्याकडून सूचना :
त्यासी न करावें रण । त्रिसत्य सत्य रावणा जाण ।
सीता देऊनि रिघतां शरण । कृतकल्याण पावसी ॥ ७८ ॥
सीता अर्पावी श्रीरघुनाथा । यालागीं चरणीं ठेवतों माथा ।
नको नको युद्धकथा । प्राणांतव्यथा पावसी ॥ ७९ ॥
सीता देउनि आवश्यक । सखा केलिया रघुकुळटिळक ।
सार्थक इहलोक परलोक । परम सुख पावसी ॥ ८० ॥
हित पथ्य सत्य पूर्ण । ऐकोनि सारणाचें वचन ।
रावण वदे दुरभिमान । दुष्टदुर्जन दुरुक्ती ॥ ८१ ॥
तद्वचः पथ्यमक्लिष्टं सारणेनाभिभाषितम् ।
निशम्य रावणो राजा प्रत्यभाषत सारणम् ॥१८॥
यदि मामभियुंजारन्देवगंधर्वदानवाः ।
नैव सीतां प्रदास्यामि सर्वलोकभयादपि ॥१९॥
त्वं तु सौम्य पैरित्रस्तस्तो दृष्ट्वा हरिवाहिनीम् ।
प्रतिपदानं सीताया अतत्स्वं साधु मन्यसे ॥२०॥
त्यावर रावणाची प्रतिक्रिया :
देव दानव गंधर्वयुक्त । सुरेंद्र आलिया पायां पडत ।
तरी सीता न करीं मी निर्मुक्त । जाण निश्चित सारणा ॥ ८२ ॥
शिव आलिया त्रिशूळयुक्त । ब्रह्मा आलिया शाप देत ।
ऐसाही मांडल्या प्राणांत । सीता निर्मुक्त मी न करी ॥ ८३ ॥
तूं तंव भेड हीन दीन । देखोनि वानरांचे सैन्य ।
भय घेतलें दारुण । कंपायमान बोलसी ॥ ८४ ॥
हेरांचा धिक्कार :
भेणें भयें म्हणसी आतां । सीता अर्पावी रघुनाथा ।
हे तंव तुझी सभय कथा । मी सर्वथा नायकें ॥ ८५ ॥
आतां कळलें मज तत्वतां । श्रीराम न करी तुमच्या घाता ।
दोघे सोडिले जीवें जीतां । यालागीं सीता तूं दे म्हणसई ॥ ८६ ॥
अनुसरलासी श्रीरामाकडे । त्याचें भय सांगसी गाढें ।
जें जें बोलसी तें कुडें । दोनी भ्याडें नपुसक ॥ ८७ ॥
जो ज्याचें राखी जीवित । तो त्याचा होय अति आप्त ।
यालागीं तूं म्हणसी येथ । सीता निर्मुक्त करावी ॥ ८८ ॥
आतां तुम्ही दोघे जण । श्रीरामाचे आप्त पूर्ण ।
मजसंमुख माझे अवगुण । अति कठिण अनुवादतीं ॥ ८९ ॥
राजदंडपरामृष्टास्तिष्ठंते नापराधिनः ।
हन्यामहं त्विमौ पापौ शत्रुपक्षप्रशंसकौ ॥२१॥
तेनैव मुक्तौ सुप्रीतावुभौ तौ शुकसारणौ ।
रावणं जयशब्देन प्रतिपूज्याभिनिःसृतौ ॥२२॥
यापुढे राजदोष सांगणारांना शासनः
राजदोष जे अनुवादती । ते अपराधी शास्त्रनीतीं ।
दंड पावलां माझे हातीं । पापमूर्तीं तुम्ही दोघे ॥ ९० ॥
वीर्य शौर्य बळ संपूर्ण । वैरियाचे अत्यंत वानां गुण ।
माझे अनुवादां अवगुण । वध्य संपूर्ण तुम्ही दोघे ॥ ९१ ॥
सत्यासत्यविवेक पूर्ण । न करितांचि रावण ।
वधावया शुक सारण । शस्त्र सज्जून उठिला ॥ ९२ ॥
रावणा वधिती वानरगण । ऐसें अनुवादां दोघे जण ।
तुमचा घेईन मी प्राण । पक्षपाती पूर्ण रामाचे ॥ ९३ ॥
हेर चार अवध्य पूर्ण । श्रीरामाने दिधले सोडून ।
त्यांचे मी केंवी करीं हनन । लज्जायमान रावण ॥ ९४ ॥
ऐसियापरी रावण । दवडोनि शुक सरण ।
कोपें म्हणे काळें वदन । मुख परतोन न दावावें ॥ ९५ ॥
जयशब्दें रावणस्तुती । करुनि शुक सारण पुढतीं ।
रावण पडला चिंतावर्ती सबळ रघुपती देखोनी ॥ ९६ ॥
रावण शार्दूलास पाठवितो :
गेलिया शुक सारण । चिंतावर्ती पडे रावण ।
शार्दूल चार विचक्षण । धाडी कपिसैन्य गणावया ॥ ९७ ॥
चारांमाजीं प्रबळबळ । लघुलाघवी अति कुशल ।
यालागी नांवे शार्दूळ । वानरदळ गणूं आला ॥ ९८ ॥
शार्दूळ जंव स्वयें पाहत । तंव वानरसैन्य असंख्यात ।
गणावया वाचा चित्त । जेथींचा तेथ पांगुळला ॥ ९९ ॥
बिभीषणेन तत्रस्था निगृहीतो यद्दच्छया ।
शार्दूलो ग्राहितस्त्वेकः पापोयमिति राक्षसाः ॥२३॥
वानरैर्दितास्ते तु विक्रांतैर्लघुविक्रमैः ।
पुनर्लंकामनुप्राप्तो विमुक्तो रामशासनात् ॥२४॥
शार्दूळ येतांच देखोन । बिभीषणें धरिला ओळखोन ।
नेला दृढपाशीं बांधोन । रघुनंदनसभेसीं ॥ १०० ॥
त्याला ओळखून रामापुढे आणल्यावर त्यालाही रामांनी सोडून दिले :
वानर हाणिती दृढ मुष्टी । लाता देती कटीं पृष्ठीं ।
श्रीराम कृपाळू जगजेठी । कृपादृष्टीं सोडिला ॥ १ ॥
धरुनि आणिला अति संकटीं । चार हेर मारिल्यासाठीं ।
काय ते वाढीव होय मोठी । बुद्धि करंटी अल्पक ॥ २ ॥
श्रीरामें शार्दूळ पाचारुन । दाखवून वानरसैन्य ।
त्यासी देवोनि सन्मान । दिधला सोडून साक्षेपें ॥ ३ ॥
श्रीरामें सोडितांचि देख । घेवोनि वानरांचा धाक ।
शार्दूळ लंकेसंमुख । गेला दशमुख ठाकोनि ॥ ४ ॥
सर्वांगीं रुधिरोक्षित । शार्दूळ देखोनियां येत ।
दचकला लंकानाथ । बळोद्धत वानर ॥ ५ ॥
शार्दूळाचा अति पुरुषार्थ । त्यासी वानरीं घातली लात ।
रडत पडत अति कुंथत । आला थकत सभेसीं ॥ ६ ॥
श्रीरामकटकीं चारपण । न चले बिभीषणाभेण ।
तो धरितां दृढ बांधोन । रघुनंदन सोडवित ॥ ७ ॥
एका जनार्दना शरण । रावणें पाहतां वानरसैन्य ।
श्रीराम करील छत्रभंजन । अनुसंधान बाणें एकें ॥ ८ ॥
ऐसें गोड निरुपण । श्रोतीं व्हावें सावधान ।
एका जनार्दना शरण । रामायण अति रम्य ॥ ९ ॥
रम्य रामायणी कथा । अति रमणीय वाल्मीक वक्ता ।
अनागत भाष्य वदला कथा । साधुसंतां सुखकारी ॥ ११० ॥
कथा सकामासी गोड । निष्कामाचें पुरवी कोड ।
सदाशिवासी सुखसुरवाड । गोडाही गोड रामकथा ॥ ११ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
चारप्रेरणं नाम प्रथमोऽध्यायः ॥ १ ॥
ओव्यां ॥ १११ ॥ श्लोक ॥ २४ ॥ एवं ॥ १३५ ॥ श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥