रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 30 MB (Official) द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 30

अध्याय 30

देवांतक व त्रिशिर यांचा वध

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

नरांतकाच्या वधामुळे त्याचे पाचही पुत्रांचे रणांगणावर आगमन :

अंगदें मारिला नरांतक । राक्षसदळी परम धाक ।
पळोनियां वीरनायक । लंकेसंमुख निघाले ॥ १ ॥
पळतां देखोनि राक्षसभार । कोपा चढला राजकुमर ।
अवघे होऊन एकत्र । निशाचर परतले ॥ २ ॥

नरांतकं हतं दृष्ट्वा चुक्रुशुनैर्ऋतर्षभाः ।
देवांतकजस्त्रिमूर्धा च पौलस्त्यश्च महोदरः ॥१॥
आरुढो मेरुसंकाशं वानरेंद्रं महोदरः ।
वालिपुत्रं महाविर्यमभिदुद्राव वीर्यवान् ॥२॥
भ्रातृव्यसनसंतप्तस्तदा देवांतको बली ।
आदाय परीघं घोरमंगदं समभ्यद्रवत् ॥३॥
रथमादित्यसंकाशं युक्तं परमवाजिभिः ।
अस्थाय त्रिशिराश्चापि वालिपुत्रमुपाद्रवत् ॥४॥
स त्रिभिर्मेघसंकाशैनैर्ऋतैस्तैरभिद्रुतः ।
वृक्षमुत्पाटयामास महाविटपमंगदः ॥५॥

अंगद वीरशिरोमणी । नरांतक पाडिला रणीं ।
तें देखोनि पांचही जणीं । आलें गर्जोनी संग्रामा ॥ ३ ॥
त्यांहीमाजी तिघे वीर । त्रिशिरा देवांतक महोदर ।
रणीं मारावया अंगद वीर । अति सत्वर धांवले ॥ ४ ॥
रणीं मर्दावया अंगद वीर । गजारुढ महोदर ।
धांविन्नला अति दुर्धर । घायें वानर मारावया ॥ ५ ॥
बंधुस्नेहें आत्यंतिक । खवळोनियां देवांतक ।
परिघ हाणावया संमुख । देवोनि हाक पैं आला ॥ ६ ॥
अनर्ध्य रथ अनर्घ्य वारु । त्यावरी बैसोनि त्रिशिरा वीरु ।
रणीं मारावया वानरु । अति सत्वर धांविन्नला ॥ ७ ॥
रणीं मारावया जुत्पती । एक गजी दोघे रथी ।
धांवतां संग्रामव्युत्पत्तीं । अंगदें ख्याती लाविली ॥ ८ ॥
रावणकुमर रणप्रवीण । एकावरी तिघे जण ।
येतां देखोनियां जाण । आलें स्फुरण अंगदा ॥ ९ ॥
अतिरथी तिघे जण । करित आले गडगर्जन ।
करावया तिघांसींही रण । आलें स्फुरण अंगदा ॥ १० ॥
जैसा शनैश्वर जाण । तीन राशी भोगी आपण ।
तैसाच अंगद रणप्रवीण । तिघे जण मर्दावया ॥ ११ ॥
मेघगर्जनें गर्जती वीर । रामनामें गर्जे वानर ।
युद्ध मांडिलें घोरांदर । शस्त्र संभार सुटले ॥१२ ॥

महोदरं समासाद्य शालमुत्पाट्य वीर्यवान् ।
देवांतकाय तं वीरश्चिक्षेप सहसांगदः ॥६॥
महावृक्षे महाशैलं शक्रो दीप्तमिवाशनिम् ।
त्रिशिरास्तं तु चिच्छेद शैरराशीविषौपमैः ॥७॥
वृक्षं निकृत्तमालोक्य समुत्पत्य ततोंऽगदः ।
स ववर्ष ततो वृक्षाञ्शिलाश्च कपिकुंजरः ॥८॥
तांश्चिच्छेद सुसंक्रुद्धस्त्रिशिरा निशितैः शरैः ।
परिघाग्रेण तान्वृक्षाञ्शिलाश्च निजधान सः ॥९॥

रावणाचे तिघे पुत्र एकट्या अंगदावर चालून येतात :

दोघे रावणराजकुमर । महाबळ महोदर ।
क्षोभला अंगद वाळिकुमर । तिघे वीर मारावया ॥ १३ ॥
पर्वतभारेंसी संभार । उपडोनि शालवृक्ष थोर ।
देवांतकावरी वानर । रागे सत्वर लोडित ॥ १४ ॥
वाजतां अंगदाचीं हाक । येतां देखोनि संमुख ।
अवो भुलला देवांतक । उपाव एक सुचेना ॥ १५ ॥
येणें मारिला नरांतक । तैसाच मारील देवांतक ।
त्रिशिरा धांवोनियां देख । शालवृक्ष छेदिला ॥ १६ ॥
वृक्ष छेदितां शतधारीं । अंगदें लोठोनी पुच्छेंकरीं ।
पाडितां राक्षसांचे भारी । शतसहर्स्त्रीं प्राणांत ॥ १७ ॥
राक्षसदळीं हाहाकार । अंगदें केला महामार ।
विस्मित त्रिशिरा महोदर । धन्य वानर प्रतापी ॥ १८ ॥
तिघांसीं युद्ध करी समोर । पुच्छें मारी राक्षसभार ।
अंगद प्रतापी वानर । सुरासुर वानिती ॥ १९ ॥
माझ्या वृक्षाचा आघात । तिघीं मिळोनि केला व्यर्थ ।
अंगद क्षोभला अत्यंत । रणकंदनार्थ करावया ॥ २० ॥
मारावया निशाचर । पाचारोनि निजवानर ।
म्हणे शिळा पर्वत शिखर । रणीं सत्वर पुरवावे ॥ २१ ॥

अंगदाचा रावणाच्या तिन्ही पुत्रांवर हल्ला :

ऐंसें सांगोनि वानरांसी । अंगद उसळला आकाशीं ।
मग माडिलें संग्रामासी । अति आवेशीं क्षोभोनी ॥ २२ ॥
शिळा शिखरें अत्यद्‍भुत । वृक्ष पाषाण पर्वत ।
अंगद गर्जगर्जोनि वर्षत । रणीं प्राणांत राक्षसां ॥ २३ ॥
शिळाशिखरीं अत्यद्‍भुतीं । रणीं लावोनियां ख्याती ।
करीन तिघांची समाप्ती । रणव्युत्पती पहा माझी ॥ २४ ॥
उपमर्दून तिन्ही गुण । सुख पावती योगिजन ।
तुम्हीं मारिल्या तिघें जण । रणकल्याण मज तेव्हां ॥ २५ ॥
ऐसें गर्जोनि समर्थ । शिळाशिखरें द्रुम पर्वत ।
लागवेगें पैं वर्षत । रणकंदनार्थ राक्षसां ॥ २६ ॥
द्रुमादिपर्वतशिखरें थोर । चेंपला राक्षसांचा भार ।
रणीं उठला हाहाकार । राजकुमर विस्मित ॥ २७ ॥
आम्हांसी युद्ध करितां संमुख । मागें राक्षस गांजिले निःशेख ।
अंगद वीर अति अचुक । पाडिलें टक तिघांसीं ॥ २८ ॥
बाणीं पर्वत निवारित । तंव येती असंख्यात ।
तेही साटोपें जंव तोडित । येती आघात वृक्षांचें ॥ २९ ॥
वृक्ष निवारितां जाण । मस्तकीं वाजती पाषाण ।
घाबरे केले तिघे जण । रणप्रवीण अंगदे ॥ ३० ॥
बाण तोमर परिघाग्र । तिघीं निवारितां गिरिवर ।
अंगद वर्षे सत्वर । शिळाशिखरें पर्वती ॥ ३१ ॥
जैशा पर्जन्याच्या धारा । तैसा वर्षे गिरितरुवरां ।
उसंत नाहीं तिघां वीरा । राजकुमारां गाजिलें ॥ ३२ ॥
पुरुषार्थाची परम कीर्ती । तिघे वीर ते अतिरथी ।
अंगदें लावोनियां ख्याती । रणव्युत्पत्ती गांजिले ॥ ३३ ॥
त्रिशिरा वीर रणप्रवीण । वज्रास्त्रें विंधोनि बाण ।
पर्वत तरुवर छेदून । केले शतचूर्ण रणरंगी ॥ ३४ ॥
पर्वत पुरविल्या वानरांसीं । त्रिशिरा विंधी अति आवेशीं ।
तिहीं घेवोनि त्रासासी । सुग्रीवापासीं पळाले ॥ ३५ ॥
देवांतकाचा परिघ थोर । महोदराचा तोमर ।
त्रिशिरा विंधी तीव्र शर । अंगद वीर मूर्च्छित ॥ ३६ ॥
अंगद वानरी युवराजा । सांपडला आमच्या समाजा ।
त्यासी बांधोनिया वोजा । नेऊं विजयध्वजा लंकेसी ॥ ३७ ॥
त्यासी बांधवेना संपूर्ण । त्याच्या अंगी आंगवण ।
मंडप घेवोनि उडाला जाण । त्यासी कोण बांधील ॥ ३८ ॥
सांपडला आहे हाताआंत । तंव त्याचा करु घात ।
ऐसें विचारितां समस्त केले विपरीत अंगदें ॥ ३९ ॥
अंगद पडतां मूर्च्छित आपण । स्मरे श्रीरामनामस्मरण ।
मूर्च्छा जावोनि संपूर्ण । आलें स्फुरण अंगदा ॥ ४० ॥
महोदरा देवोनि लात । गजीं पाडिला मूर्च्छित ।
देवांतकासी चपेटघात । तोही रथस्थ पाडिला ॥ ४१ ॥
त्रिशिर्‍याचे धनुष्याचें शित । पुच्छें छेदोनियां तेथ ।
त्याचे बाण करोनियां व्यर्थ । रणीं गर्जत अंगद ॥ ४२ ॥
तिघे महावीर दारुण । अंगदासीं करितां रण ।
धन्य अंगदाची आंगवण । तिघांही जणां नातोपे ॥ ४३ ॥

त्रिशिराश्चांगदं वीरंअभिदुद्राव सायकैः ।
गजेन समभिद्रुत्य वालिपुत्रं महोदरः ॥१०॥
स त्रिभिनैर्ऋतश्रेष्ठैर्युगपत्समभिदुतः ।
न विव्यथे महातेजा वालिपुत्रः प्रतापवान् ॥११॥

अंगद नाटोपे रणप्रवीण । त्रिशिरा क्षोभला अति दारुण ।
काढोनियां निर्वाणबाण । आला गर्जोन संग्रामा ॥ ४४ ॥
गजावरुन अति तांतडी । महोदरें घातली उडी ।
तोमरेंसीं लवडसवडी । अंगद कडाडी ठोकिला ॥ ४५ ॥
देवांतक तेच अवसरीं । परिघ घेवोनियां करीं ।
अंगद ताडिला हृदयावरी । गडगर्जें गर्जोनी ॥ ४६ ॥
परिघ तुळोनि साटोपता । बळें रणरंगी तळपतां ।
घाव मागुता मागुता । होय हाणिता वारंवार ॥ ४७ ॥
तिघे वीर अति विख्यात । सबळ बळें घाव हाणित ।
अंगद नव्हे व्यथाभूत । घाय मानीत तृणप्राय ॥ ४८ ॥
अंगदें उडोनि कडाडीं । गजासी देतां पैं थापडी ।
डोळे फाडोनियां बडीं । रणपडिपांडीं मारिलें ॥ ४९ ॥

तलेन भृशमुत्पत्य जघान गजमंगदः ।
पेततुर्नयने तस्य विननाश स वारणः ॥१२॥
विषाणं चास्य निष्कृष्य वालिपुत्रो महाबलः ।
देवांतकमभिदुत्य स जघान तदोरसि ॥१३॥
स विव्हलित सर्वांगो वातोद्‍भूत इव दुमः ।
लाक्षारससवर्णं च सुस्त्राव रुधिरं मुखात् ॥१४॥
अथाश्वस्य महातेजाःकृच्छ्राद्देवांतको बली ।
आविघ्य परिघं वेगादाजघान तदांगदम् ॥१५॥

देवांतकाचा अंगदाकडून वध :

महोदराचा महाहस्ती । थापा हाणोनि पाडिला क्षितीं ।
गजदंत उपडोनिया हातीं । देवांतकाप्रती धांविन्नला ॥ ५० ॥
अंगदें पूर्वरागेंकरीं । देवांतकाचे उरावरी ।
गजदंत हाणोनि निजगजरीं । धरेवरी पाडिला ॥ ५१ ॥
नाकीं तोंडी सुटलें रक्त । लक्षारंगासम आरक्त ।
मुखीं रुधिरातें वमित । रणीं मूर्च्छित पडियेला ॥ ५२ ॥
तोंडी सुटलें रक्त तडफडी । हात पाय स्वयें वोढी ।
अति कष्टाच्या पडिपाडीं । मूर्च्छा गाढी भांजिली ॥ ५३ ॥
मूर्च्छा भांजोनि संपूर्ण । देवांतक स्वयें आपण ।
परिघ घेवोनि दारुण । अंगद जाण ठोकिला ॥ ५४ ॥
परीघ लागतांचि निजनेटीं । रणरंगी मेटीकुटी ।
घालोनि बैसला जगजेठी । मूर्च्छा पोटीं सांवरुनी ॥ ५५ ॥
अंगदें करितां उड्डाण । त्रिशिरा विंधी दारुण बाण ।
महोदर स्वयें आपण । हाणी निर्वाण तोमरें ॥ ५६ ॥
सर्पप्राय त्रिशिराबाण । ललाटीं भेदला दारुण ।
धन्य अंगदाची आंगवण । अणुप्रमाण न ढळेचि ॥ ५७ ॥
दोहीं कटकीं वाजली हाक । अंगद बळिया चोख ।
तेणें हनुमंता हरिख । आला तवक नीळासीं ॥ ५८ ॥

ततोंऽगदं परिक्षिप्तं त्रिभिनैर्ऋतपुंगवैः ।
हनूमानथ विज्ञान नीलश्चापि प्रतस्थतुः ॥१६॥
ततश्चिक्षेप शैलग्रं नीलस्त्रिशिरसे तदा ।
तद्रावणसुतः शूरो निर्बिभेद शितैः शरैः ॥१७॥
ततश्चूर्णितमालोक्य हर्षाद्देवांतकस्तदा ।
परिघेणाभिदुद्राव मारुतात्मजमाहवे ॥१८॥
तमापतंतमुत्पत्य हनूमान्कपिकुंजरः ।
आजघान तदा मूर्घ्नि वज्रकल्पेन मुष्टिना ॥१९॥
स मुष्टिनिष्पिष्टविभिन्नमूर्धा विशीर्णदंताक्षिप्रलंबजिव्हः ।
देवान्तको राक्षसराजसूनुर्गतासुरुर्व्यां सहसा पपात ॥२०॥

अंगदाच्या साहाय्यार्थ हनुमंताचें आगमन व त्रिशिर-हनुमंत युद्ध :

तिघां जणांसी भिडतां । अंगद श्रमला युद्ध करितां ।
हनुमंत त्यासीं साह्य जातां । नीळही तत्वतां स्वयें आला ॥ ५९ ॥
त्रिशिरा अंगदां विंधी बाण । त्यासी नीळें पाचारुन ।
दीर्घ पर्वत अति सघन । घाली गर्जोन मस्तकीं ॥ ६० ॥
त्रिशिरा धनुर्वाडा चोख । लक्ष साधून शरसन्निष्ठ ।
घायें पर्वत केला पिष्ट । पाडिला सकूट पृथ्वीसीं ॥ ६१ ॥
पर्वत छेदिला त्रिशिरेंनीं । तेणें देवांतक हरिखेजोनी ।
निजपरिघेंसी गार्जोनी । हाणी धांवोनी हनुमंता ॥ ६२ ॥
हनुमान रणीं धीट नीट । त्याचा परिघ करोनि पीठ ।
टोला देतां चतुस्फोट । पाडिला स्पष्ट पृथ्वींसीं ॥ ६३ ॥
कैसा टोल्याचा आघात । भग्न मस्तक रुधिरांकित ।
पृथ्वीतळीं सनेत्र दांत । जिव्हा लोळत सलंब ॥ ६४ ॥
देवांतक रावणसुत । टोल्यासाठीं करोनि घात ।
रणीं पाडिला निश्चेष्टित । केला प्राणांत हनुमंतें ॥ ६५ ॥

ततस्तु नीलः प्रतिलब्धसंज्ञः सशैलमुत्पाट्य सवृक्षखंडम् ।
सदूरमुत्पत्य खमुग्रवेगो।महोदरं तेन जघान मूर्घ्नि ॥२१॥
स तेन शैलेन समाहतस्तु रक्षोधिपो भूपितले पपात ।
महोदरो जीवितमुत्ससर्ज यथा गजः सिंहबलाभिभूतः ॥२२॥

नीळ – महोदर यांचा संग्राम, महोदराचा वध :

येरीकडे नीळ महोदर । युद्धा पेटले दुर्धर ।
नीळ क्षोभोनि सेनाधर । केला संहार तो ऐका ॥ ६६ ॥
महोदराचा तोमर । नीळ उड्डोणें हरी सत्वर ।
रागें उपडिला गिरिवर । त्यावरी थोर द्रुमशिखरें ॥ ६७ ॥
नीळें देवोनियां हाक । पर्वत टाकिता संमुख ।
महोदरासी टकमक । आली भुली देख रणमारें ॥ ६८ ॥
देखतां नीळाचि आंगवण । महोदर धाके संपूर्ण ।
धाकेंचि त्याचा गेला प्राण । गिरिनिवारण कोण करी ॥ ६९ ॥
नीळें पर्वत घालितां पैं शिरीं । महोदर पडिला धरेवरी ।
जाहली हाडांची चकचुरी । प्राणांत करि वानर ॥ ७० ॥
देवांतकानें हनुमान मारी । नीळ महोदरातें संहारी ।
रावणा जाली पोरमारी । अपांपरी राक्षसां ॥ ७१ ॥

पितृव्यं निहतं दृष्ट्वा त्रिशिरा क्रोधमूर्च्छितः ।
हनुमंतं सुसंक्रुद्धो विव्याध निशितैः शरै ॥२३॥
ततो हनुमानुत्पत्य हयांस्त्रिशिरसस्तदा ।
ददार करजैस्तीक्ष्णैर्गजेंद्रं मृगराडिव ॥२४॥
अथ शक्तिं समादाय कालरात्रिमिवांतकः ।
हनूमंतं प्रचिक्षेप त्रिशिर रावणात्मजः ॥२५॥
दिवि क्षिप्तां महोल्काभां शक्तिं तां तु महाप्रभाम् ।
बभंज हनुमांस्तस्य हर्षाच्च विननाद ह ॥२६॥

त्रिशिराची हनुमंतावर क्रोधाने चढाई :

अंगदे नरांतकसंहार । देवांतका हनुमान वीर ।
नीळें मारिला महोदर । त्रिशिरा दुर्धर क्षोभला ॥ ७२ ॥
त्रिशिरा कोपोन दारुण । हनुमंतासी विंधिले बाण ।
पुच्छाग्रें करोनि चूर्ण । केलें उड्डाण हनुमंतें ॥ ७३ ॥
हनुमान तळपोनि अंबरी । त्रिशिरारथाचे वारु चारी ।
विदारिले नखाग्रीं । जेंवी केसरी गजातें ॥ ७४ ॥
विदारुनि वारु चारी । रथ करोनि चकाचुरी ।
हनुमान गर्जे गिरागजरीं । जो महामारी राक्षसां ॥ ७५ ॥
बांधावया हनुमान वीर । त्रिशिरा कोपला अत्युग्र ।
शक्ति काढिली दुर्धर । रणीं वानर मारावया ॥ ७६ ॥
उल्का जैसी कडाडित । कीं काळरात्री धडधडित ।
करावया हनुमंताचा घात । त्रिशिरा सोडित महशक्ती ॥ ७७ ॥
शक्ति अतिशयें दुर्धर भारी । तेज न समाय अंबरीं ।
कडकडोनि प्रळयगजरीं । हनुम्यावरी लोटली ॥ ७८ ॥
धन्य बळिया हनुमंत । पुच्छें शक्तीचा केला घात ।
मोडून सांडिला रणाआंत । कपि गर्जत स्वानंदें ॥ ७९ ॥
शरचाप रणीं केलें व्यर्थ । दुर्धर शक्तीचा केला घात ।
त्रिशिरा स्वयें कोपान्वित । खड्ग काढित साटोपें ॥ ८० ॥

ततः खड्गं समुत्पाद्य त्रिशिरा राक्षसोत्तमः ।
निचखान तदा शूरो वानरेंद्रस्य वक्षासि ॥२७॥
खड्गप्रहाराभिहतो हनूमान्प्लवगोत्तमः ।
आजघान त्रिशिरसं तलेनोरसि वीर्यवान् ॥२८॥
स तलाभिहतस्तेन स्रस्तकेशांबरो भुवि ।
निपपात महातेजा विसंज्ञस्त्रिशिरास्तदा ॥२९॥
यत्‍नतस्तस्य खड्गं तु समाक्षिप्य महाकपि ।
ननाद गिरिसंकाशस्त्रासयन्सर्वराक्षसान् ॥३०॥

त्रिशिरा – हनुमंत यांचे तुंबळ युद्ध व त्रिशिराचा वध :

रणीं खवळोनि त्रिशिरा भारी । खड्ग काढोनि कोशाबाहेरी ।
हनुमान हाणिला उरावरी । खड्गधारीं साटोपें ॥ ८१ ॥
रणप्रवीण हनुमंतें । त्रिशिरा हाणोनि तळघातें ।
हिरोन घेऊन खड्गातें । पाडिला तेथें मूर्च्छित ॥ ८२ ॥
खड्गहस्ती हनुमान वीर । रणीं गर्जती वानर ।
चळीं कांपती निशाचर । अति दुर्धर हनुमंत ॥ ८३ ॥
चेतना लाहोनि त्रिशिरा । देखोनि खड्गहस्त वानरां ।
दांत खावोनि करकरां । हाणी कपींद्र मुष्टिघात ॥ ८४ ॥
माझें खड्ग वानराहातीं । देखोनि प्रज्वळला चित्तीं ।
हनुमान हाणी मुष्टिघातीं । सर्वशक्तीं साटोपें ॥ ८५ ॥
हनुमंतासीं मुष्टिघात । हाणितां झणणिला हात ।
त्रिशिरा चांचरी जात । स्वयें सांवरीत विव्हळ ॥ ८६ ॥
लागतां त्याचा मुष्टिघात । डळमळीना हनुमंत ।
खड्गहस्तें क्षणाआंत । केला निःपात तिहीं शिरां ॥ ८७ ॥

स तेन खडगेन महाशिरांसि कपिःसमस्तानि सकुंडलानि ।
क्रुद्धः प्रचिच्छेद तदा हनूमास्त्वष्टुःसुतस्येव शिरांसि शक्रः ॥३१॥
तस्मिन्हते देवरिपौ त्रिशीर्षे हनूमता शक्रपराक्रमेण ।
नेदुः प्लवंगाः प्रचचाल भूमी रक्षांसि सर्वाणि विदुद्रुवुश्च ॥३२॥
हतं त्रिशिरसं दृष्ट्वा तथैव च महोदरम् ।
हतो प्रेक्ष्य दुराधर्षै देवांतकनरांतकौ ॥३३॥
चुकोप परमामर्षी मत्तो राक्षसपुंगवः ।
जग्राहार्चिष्मतीं चापि गदां सर्वायसीं तदा ॥३४॥

खड्ग घेवोनि हनुमंतें । छेदिलें त्रिशिर्‍याचे तिहीं शिरांतें ।
समुकुट सकुंडलांतें । लखलखीत पाडिली ॥ ८८ ॥
विरुपाचीं महाशिरें । जैसीं कां छेदिलीं इंद्रे ।
तैसीं त्रिशिर्‍याचीं शिरें । रणीं कपींद्रें पाडिलीं ॥ ८९ ॥
गिरिशृंगे उद्‌भट । शिरें शोभती लखलखाट ।
वटारिले नेत्रवाट । पाडिले स्पष्ट रणरंगीं ॥ ९० ॥
त्रिशिरा सुरवरांचा वैरी । हनुमंतें रणमारीं ।
शिरें छेदून शस्त्रधारीं । धरेवरी पाडिला ॥ ९१ ॥
सुरवर करिती जयजयकार । नामें गर्जती वानर ।
धाकें पळती निशाचर । रणीं महाशूर मारिले ॥ ९२ ॥

त्रिशिराचा बंधू महापार्श्व यांचे आगमन :

त्रिशिरा मारिला महाशूर । मारिला बंधु महोदर ।
देवांतक राजकुमर । मारिला वीर नरांतक ॥ ९३ ॥
देखोनि सुहृदांचा मार । महापार्श्व महावीर ।
दुःखशोकें अति जर्जर । चढला पूर मोहाचा ॥ ९४ ॥
महापार्श्व मोहन्वित । स्वयें होवोनि सावचित्त ।
रणीं राहोनि ध्यानस्थ । कर्तव्यार्थ विचारी ॥ ९५ ॥
पळोनि जातां लंकेआंत । पुत्रशोकें लंकानाथ ।
अवश्य करील माझा घात कीं अपमानांत गांजील ॥ ९६ ॥
मुखीं लावील मसीचा टिळा । रासभारोहणीं गोमयगोळा ।
उपानहांच्या माळा गळां । होईल सोहळा शिमग्याचा ॥ ९७ ॥
ऐसें अपमानें जिणें । त्याहून श्रेष्ठ रणीं मरणें ।
निमाल्या निजमोक्ष पावणें । जिंतल्या जिणें जगद्वंद्व ॥ ९८ ॥
ऐसें विचारोनि जाण । महापार्श्व विचक्षण ।
वानरीं करावया रण । स्वयें आपण परतला ॥ ९९ ॥

चुकोप सुमहातेजा महापार्श्वो महाबल ।
जग्राह महतीं घोरां गदां सर्वायसीं तदा ॥३५॥
हेमपट्टपरिक्षिप्तां मांसशोणितफेनिलाम् ।
विरोचमानां विपुलां शत्रुशोणिततर्पिताम् ॥३६॥
गदामादाय संक्रुद्धो महापार्श्वो महायशाः ।
हरिन्समभिदुद्राव युगांताग्निरिव ज्वलन् ॥३७॥

महापर्श्व-ऋषभ यांचा संग्राम :

निमाले देखोनि स्वजन । वानरेंसी करावया रण ।
महापार्श्व स्वयें आपण । गदा घेऊन धांविन्नला ॥ १०० ॥
अवघी तिख्याची लखलखित । अग्निप्राय धगधगित ।
सुवर्णबंदी रत्‍नांकित । गदा शोभत अति शोभा ॥ १ ॥
शत्रुशोणितें न्हाणिली । अरिशिरःकमळें पैं पूजिली ।
रिपुमांसें तृप्त केली । गदा घेतली साटोपें ॥ २ ॥
करावया भूतांची बोहरी । प्रळयाग्नि जैशापरी ।
तैसी गदा घेवोनि करीं । वानरांवरी धाविन्नला ॥ ३ ॥
येतां देखोनि वानरांत । ऋषभ वीर वरुणसुत ।
उडोनियां संमुख येत । करावया घात महापार्श्वा ॥ ४ ॥

ऋषभस्तु समुत्पत्य वानरो वरुणात्मजः ।
महापार्श्व समासाद्य तस्थौ तस्याग्रतो बली ॥३८॥
तं पुरस्तात्स्थितं दृष्ट्वा वानरं पर्वतोपमम् ।
आजघानोरसि क्रुद्धो गदया वज्रकल्पया ॥३९॥
स तथाभिहतस्तेन गद्या वानरर्षभः ।
भिन्नवक्षाः समाधूतः सुस्राव रुधिरं बहु ॥४०॥

महापार्श्वाचा वध :

येतां देखोन महापार्श्वासी । ऋषभवीर अति वेगेंसीं ।
उडोनि आला तयापासीं । संग्रामासीं साटोपें ॥ ५ ॥
जैसा पर्वताचा कडा । तैसा वानर आला पुढां ।
महापार्श्व कोपला गाढा । उठावला गाढा गदेसीं ॥ ६ ॥
गदा घेवोनि कोपेंकरीं । ऋषभ हाणितला उरावरी ।
घायें पडिला धरेवरी । उभाची रुधिरीं न्हाणिला ॥ ७ ॥
घायासरसा विसंज्ञ । ऋषभ पडला अचेतन ।
चिरकाळें स्वयें आपण । संज्ञा संपूर्ण पावला ॥ ८ ॥

स संप्राप्य चिरात्संज्ञामृषभो वानरर्षभः ।
क्रुद्धो विस्फुरमाणौष्ठो महापार्श्वमवेक्षत ॥४१॥
गृहीत्वा तां गदां वीरो व्याविध्य च पुनः पुनः ।
मत्तानीकं महापार्श्वं जघान रणमूर्धनि ॥४२॥
स तया गदया भिन्नो विशीर्णदशनेक्षणः ।
निपपात महापार्श्वो वज्राहत इवाचलः ॥४३॥
तस्मिन्हते भ्नातरि रावणस्य तन्नैर्ऋतानां बलमर्णवाभम् ।
मुक्तायुधं केवलजीवितार्थी दुद्राव भिन्नार्णवसन्निकाशम् ॥४४॥

संज्ञा लाहोनि वानर । करावया रणप्रत्युपकार ।
दृढ करोनियां विचार । केला चमत्कार तो ऐका ॥ ९ ॥
ऋषभ वीर रणमर्गळा । पुच्छें कंठी लावोनि कळा ।
गदा हिरोनियां तत्काळा । गेला निराळा उडोनी ॥ ११० ॥
वानर गदा हिरोनि नेतां । विस्मयो महापार्श्वचित्ता ।
आणिक शस्त्र घ्यावें हाता । तंव गदाघाता ठोकिलें ॥ ११ ॥
कोपें कपि कांपे थरथरां । दांत खावोनि करकरां ।
गदा भोवंडोनि गरगरां । निशाचरा ठोकिलें ॥ १२ ॥
गदाघात वाजतां शिरीं । दांत खावोनि चकचूरी ।
नेत्र पडिले बाहेरी । धरेवरी पडियेला ॥ १३ ॥
महापार्श्वे रणव्युत्पत्तीं । गदा पडताळिली हातीं ।
त्याची भोंवली त्याभोंवती । पडिला क्षितीं घायें एकें ॥ १४ ॥
शंबराचें शिर छेदून । जैसें कां करी प्रद्युम्न ।
तैसेंचि महापार्श्वा जाण । रणमर्दन केले ऋषभें ॥ १५ ॥
रावणाचा बंधु जाण । महापार्श्व प्रिय प्रधान ।
त्याचा रणीं घेतला प्राण । पलायमान राक्षस ॥ १६ ॥
प्रळयीं खवळल्या सागर । त्याचें जेंवी नावरे नीर ।
तेंवी निमाल्या पांचही वीर । राक्षसभार भंगला ॥ १७ ॥
देवांतक महोदर । नरांतक त्रिशिरा वीर ।
महापार्श्व मारिला शूर । राक्षस समग्र पळाले ॥ १८ ॥
चौघीं मारिले पांचही जण । अतिकाय करील निर्वाण ।
एका जनार्दना शरण । तेंही निरुपण अवधारा ॥ १९ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
देवांतकत्रिशिरादिवधो नाम त्रिंशत्तमोऽध्यायः ॥ ३० ॥
ओंव्या ॥ ११९ ॥ श्लोक ॥ ४४ ॥ एवं ॥ १६३ ॥