रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 31 MB (Official) द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 31

अध्याय 31

अतिकाय राक्षसाचा वध

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

चौघा वानरांनी तिघा राजकुमारांना व दोन राक्षसांना मारिलेः

चौघे मिळोनि वानर । तिघे रावण राजकुमर ।
महापार्श्व आणि महोदर । पांचही महाशुर मारिले ॥ १ ॥
आम्ही म्हणों हे वानर । पालेखाईरे वनचर ।
परी हे निधडे महाशर । दुर्धर वीर मारिले ॥ २ ॥
सखे बंधु मारिले तिन्ही । पितृव्य निमाले दोन्ही ।
तें देखोनियां नयनीं । अतिकाय मनीं क्षोभला ॥ ३ ॥

अतिकायाचे क्रोधाने आगमन :

मारिले देखोनि स्वजन । अतिकाय कोपायमान ।
रविप्रभेंसीं समान । देदीप्यमान तेजस्वी ॥ ४ ॥
एवढिया तेजासीं कारण । ब्रह्मदत्त वरद संपूर्ण ।
प्राकृताचेनि हातें मरण । सर्वथा जाण न पावसी ॥ ५ ॥
ब्रह्मवरदें बळवंत । देवदानवदैत्यघात ।
स्वयें करी रणाआंत । निजपुरुषार्थ मिरवोनी ॥ ६ ॥
सारथ्यासी स्वयें सांगत । जेथें आहे रघुनाथ ।
वानरांसी न लावूं हात । रणीं रघुनाथ मारावया ॥ ७ ॥

अतिकायाचा विचार :

पाठीसीं असतां श्रीरघुनाथ । रणीं वानर नाटोपत ।
तेथवरी प्रेरिला रथ । त्यासी रणांत मारावया ॥ ८ ॥
वानरांचें बळकारण । मुख्य श्रीरामलक्ष्मण ।
ते मारिल्या दोघे जण । वानरगण निमाले ॥ ९ ॥
अखया मारुन जाळिलें नगर । देवांतक नरांतक त्रिशिर ।
महापार्श्व महोदर । सुहृद समग्र निर्दळिले ॥ १० ॥
ते व्हावया उत्तीर्ण । सुखी करावया रावण ।
रणीं मारीन रामलक्ष्मण । तरी मी जाण अतिकाय ॥ ११ ॥
रणीं मारिल्या श्रीरामचंद्र । मारणें न लागती वानर ।
तेंही विषयींचा विचार । ऐक साचार सांगेन ॥ १२ ॥
श्रीराम वृक्ष लक्ष्मण दंड । हनुमान एक मध्यबिंड ।
सुग्रीवादि शतशाखा प्रचंड । विस्तार उदंड कपिसेना ॥ १३ ॥
सीता सुंदर सुमनफळ । रावण भुलला तत्काळ ।
हित सांगतांही सकळ । तो अळुमाळ उमजेना ॥ १४ ॥
रणीं मारिल्या रघुवीर । निमालें हनुमान सौ‍मित्र ।
निमाले सुग्रीवादि वानर । सीता सुंदर स्ववश ॥ १५ ॥
ऐसी करावया ख्याती । अतिकाय मी रणार्थीं ।
घायें मारीन रघुपती । बाणावंर्ती वर्षोनी ॥ १६ ॥
रणीं मारावया रघुनाथ । मी अतिकाय आलों येथ ।
विस्फारोनि चापहस्त । रणीं गर्जत साटोपें ॥ १७ ॥
मुकुट कुंडलें वीरकंकणें । अतिकाय शोभला तेणें ।
बाहु अंगदें अंगत्राणें । जेंवी कां किरणें श्रीसूर्य ॥ १८ ॥

धनुष्याच्या टणत्काराने वानरसैन्य त्रस्त :

धनुष्यीं करितां टणत्कार । दुमदुमिले गिरिकंदर ।
भूकंपें उलथती सागर । भेणें वानर पळाले ॥ १९ ॥
अतिकाय देखोनि दुर्धर । भयें त्रासिले वानर ।
पळोन आले ते समग्र । श्रीरघुवीर ठाकोनी ॥ २० ॥
जो शरण्य शरणागता । टाकून आले त्या रघुनाथा ।
अभय देतांचि समस्तां । कपि स्वस्थता पावले ॥ २१ ॥
अतिकाय तो अति दुर्धर । रथीं बैसला दिसे अत्युग्र ।
त्यातें देखोनि रघुवीर । विस्मय थोर पावला ॥ २२ ॥

श्रीरामांना बिभीषण अतिकाय राक्षसाची माहिती सांगतो :

स्वयें श्रीरामें आपण । पाचारोनि बिभीषण ।
म्हणे पैल हा वीर येतो कोण । रणप्रवीण निःशंक ॥ २३ ॥
हाकाऊन बिभीषण । स्वयें पुसे रघुनंदन ।
पर्वतप्राय अति दारुण । येतो कोण तें सांग ॥ २४ ॥
धनुर्धारी पिंगाक्ष । रथीं बैसला अति दक्ष ।
येतो आमचें धरुन लक्ष । रणाध्यक्ष प्रतापी ॥ २५ ॥
रथीं जुंपिले अश्व सहस्र । दोन शतें वीस तूणीर ।
असि चाप गदा मुग्दर । त्रिशूळ तोमर रथस्थ ॥ २६ ॥
छत्र पताका युग्मचामरीं । ध्वजीं मुक्त माळाझल्लरी ।
राहूचें शिर ध्वजावरी । रणमहामारी ब्रिदाइत ॥ २७ ॥
बाहुअंगदें मुकुट शिरीं । कुंडलांचें तेज भारी ।
लखलखी मुखावरी । जेंवी भास्करीं निजकिरण ॥ २८ ॥
हेमसन्नद्ध चापबाण । रथीं बैसला निःशंक पूर्ण ।
मजसंमुख यावया जाण । आंगवण केंवी यासीं ॥ २९ ॥
तेच विषयींचें निरुपण । स्वयें सांगतो बिभीषण ।
अतिकायाची आंगवण । बळ संपूर्ण वरदोक्ती ॥ ३० ॥

भीमकर्मा महातेजा रावणो राक्षसाधिपः ।
तस्यैष वीर्यवान्पुत्रो रावणप्रतिमो बली ॥१॥
वृद्धसेवी श्रुतिधरः सर्वास्त्रविदुषां वरः ।
अश्वपृष्ठे नागपुष्ठे खड्गे धनुषि कर्षणे ॥२॥
भेदे सांत्वे च दाने च न्याये मंत्रे च संमतः ।
तनयं विद्धि मालिन्या अतिकायमिमं विदुः ॥३॥

अतिकायाची जन्म – कथा व गुणवर्णन :

रावण जाला लंकापती । म्हामालिनीगर्भसंभूती ।
याची जाली पैं उत्पत्ती । नामें निश्चितीं अतिकाय ॥ ३१ ॥
अतिकाय वीर विख्यात । रावणासमान बळवंत ।
परी हा साधुसेवी अति विनीत । आणि श्रवणवंत सच्छास्त्रीं ॥ ३२ ॥
जाणे रथपती चक्रभ्रमण । गजवाजीआरोहण ।
खड्ग पदाति करावया रण । आंगवण अतिकाया ॥ ३३ ॥
शूळ त्रिशूळ मुद्‌गर । फरश पट्टिश तोमर ।
अचुकसंधानी धनुर्धर । प्रवीण शस्त्री अतिकाय ॥ ३४ ॥
भेदाचें परिमार्जन । लोभदंभाचें सांत्वन ।
दान देवोनि उदार पूर्ण । विनीतपण सर्वांसीं ॥ ३५ ॥
निर्दळोनि अनीती । दृष्टीपुढें ओळंगे नीती ।
विचाराविषयीं हा बृहस्पती । सांगे सुखोत्किसंवाद ॥ ३६ ॥
ऐसा सर्वार्थीं निपुण । संग्रामीं जिंतले सुरगण ।
मशकप्राय करोनि जाण । इंद्र संपूर्ण गांगिला ॥ ३७ ॥
संग्रामी अति प्रखर । प्रतापतेजें जैसा रुद्र ।
सर्वार्थीं अति दुर्धर । रावणकुमर अतिकाय ॥ ३८ ॥

अनेनाराधितो ब्रह्मा तपसा भावितात्मना ।
अस्त्राणि चास्य दत्तानि रिपूणां च पराजये ॥४॥
सुरासुरैखध्यत्वं दत्तमस्य स्वयंभुवा ।
एतच्च कवचं दिव्यं रथश्च रविभासुरः ॥५॥
एतेन शतशो देवा दानवाश्च पराजितः ।
एषोतिकायो बलवान्‍राक्षसानामथर्षभः ॥६॥
तदस्मिन्क्रियतां यत्‍नः क्षिप्रं पुरुषपुंगव॥७॥

ब्रह्मयाचे वरदानाने अतिकायाला अभेद्यकवचाची प्राप्ती झाल्याचे कथन :

पूर्वीं अतिकाय निरन्न । करुनि ब्रह्मयाचें आराधन ।
ब्रह्मा करोनि सुप्रसन्न । ब्रह्मवरदान पावला ॥ ३९ ॥
पराभवून शत्रुसमुदाय । नित्य संग्रामीं निजविजय ।
ऐसा शस्त्र‍अस्त्रसमुदाव । ब्रह्मदेव स्वये अर्पी ॥ ४० ॥
सुरासुरांसी करितां रण । सर्वथा युद्धी न ये मरण ।
अवध्यत्वाचें वरदान । दिधले आपण ब्रह्मदेवें ॥ ४१ ॥
अभेद्य कवच अभेद्य रथ । ब्रह्मा देत हर्षयुक्त ।
तेणें देवदानव समस्त । रणीं गांजित अतिकाय ॥ ४२ ॥
वरदबळें बळोन्मत्त । अतिकाय येतो गर्जत ।
शिघ्र याच्या वधार्थ । यत्‍न निश्चित करावा ॥ ४३ ॥
अभेद्य कवच अनिवार्य बाण । येणें बळें अतिकाय जाण ।
येतो तुजसीं करावया रण । आंगवण वरदाची ॥ ४४ ॥
याचे न सुटतां बाण । प्रयत्‍न देखावा आपण ।
ऐसें बोलता बिभीषण । रघुनंदन हांसिला ॥ ४५ ॥

श्रीरामांची उक्ती व अतिकायाचा धनुष्याचा टणत्कार :

ब्रह्मवरद तें बापुडें । अतिकाय मशक घुंगुरडें ।
त्याचें भय वाडेंकाडें । काय मजपुढें सांगसी ॥ ४६ ॥
माझा सुटलिया बाण । कळिकाळाचा घेईल प्राण ।
अतिकाय तें बापुडें कोण । मरेल आपण निमेषार्धे ॥ ४७ ॥
अतिकाय प्रेरुन रथ । आला वानरसैन्याआंत ।
धनुष्य टणत्कारोनि तेथ । असे गर्जत रणरंगी ॥ ४८ ॥
रणरंगी वारंवार । सिंहनाद करितां थोर ।
तेणें क्षोभोनि वानरवीर । युद्धा सत्वर मिसळले ॥ ४९ ॥
अतिकाय अति भयंकर । देखोनि श्रेष्ठ वानर ।
युद्धा मिसळले दुर्धर । शिळाशिखरद्रुमपाणी ॥ ५० ॥
कपि हाणितां द्रुमपाषाण । अतिकाय त्यांसी न विंधी बाण ।
हीन दीन वानरें जाण । मारिल्या कोण पुरुषार्थ ॥ ५१ ॥
वानर वनचर ते किती । पालेखाईर यांची जाती ।
त्यांसी मारिल्या कोण कीर्ती । रणी रघुपती मारीन ॥ ५२ ॥

वानरांकडे दुर्लक्ष करुन अतिकायाची श्रीरामांवर चाल :

वानरांसी करणे रण । हेंचि मज उणेपण ।
मुख्य धूर मी मारीन । रघुनंदन संग्रामी ॥ ५३ ॥
वानरांचे द्रुमपाषाण । अतिकाय मानून तृण ।
श्रीरामासीं करावया रण । आला आपण साटोपें ॥ ५४ ॥
वानर बापुडे ते किती । त्यावरी धनुष्य न धरी हातीं ।
रणीं मारावया रघुपती । संग्रामशक्ती मज आहे ॥ ५५ ॥
निवारुन द्रुम पाषाण । उपेक्षून वानरगण ।
श्रीरामासीं करावया रण । आला गर्जोन अतिकाय ॥ ५६ ॥
घेवोनियां धनुष्य बाण । युद्धा आलों मी आपण ।
ज्यासी असेल आंगवण । तेणें मजसीं रण करावें ॥ ५७ ॥
तुम्हीं माजी कोणप्रती । जरी असेल संग्रामशक्ती ।
तरी तेणें येवोनि मजप्रती । रणव्युत्पत्तीं भिडावें ॥ ५८ ॥

ततस्य वाक्यं ब्रुवतो निशम्य चुकोप सौ‍मित्रिरमित्रहंता ।
अमृष्यमाणश्च समुत्पपात जग्राह बाणांश्च ततः प्रहस्य ॥८॥
पुरस्ताच्चातिकायस्य विचकर्ष महाधनुः ।
पूरयित्वा महीं शैलानाकाशं सागरं दिशः ॥९॥
ज्याशब्दो लक्ष्मणस्याग्रे त्रासयन्‍रजनीचरान् ।
विसिस्मिये महातेजा राक्षसेंद्रसुतो बली ॥१०॥
अथातिकायः कुपितो दृष्ट्वा लक्ष्मणमग्रतः ।
आदाय शिशितं बाणमिदं वचनमब्रवीत् ॥११॥

अतिकायाची दर्पोक्ती :

ज्यासीं असेल आंगवण । तेणें मजसीं करावें रण ।
ऐकोनि अतिकायाचें वचन । आलें स्फुरन लक्ष्मणा ॥ ५९ ॥
वंदून रामाचें चरण । सज्जोनियां धनुष्यबाण ।
करुन स्वानंदे उड्डाण । आला गर्जोन सौ‍मित्र ॥ ६० ॥
सबळ बळें अति गाढा । दृढ सज्जोनियां मेढा ।
आला अतिकायापुढां । रणीं निधडा सौ‍मित्र ॥ ६१ ॥
करितां धनुष्यीं टणत्कार । भूकंप सपर्वतसागर ।
नादें उठत अंबर । गिरिकंदर दुमदुमिलें ॥ ६२ ॥
टाळीं बैसलीं दिग्गजांसी । नाद कोंदला दशदिशीं ।
भय सुटलें राक्षसांसी । कासाविसी ज्या घोषें ॥ ६३ ॥
ऐकतां ज्याघोष दारुण । अतिकायाचा जाऊं पाहे प्राण ।
उतटलें अंतःकरण । निधडा पूर्ण सौ‍मित्र ॥ ६४ ॥
संमुख निधडा लक्ष्मण । देखतां अतिकाया कोप पूर्ण ।
धनुष्यीं सज्जोनियां बाण । रागें गर्जोन बोलत ॥ ६५ ॥
मागां सांडून रघुकुळटिळक । पुढें आलासी तूं बाळक ।
माझी वाजतांचि हाक । मरसी निःशेख घायेंवीण ॥ ६६ ॥
धरोनियां अभिमान । मजसी करु म्हणसी रण ।
माझे सहावया निर्वाणबाण । आंगवण तुज कैची ॥ ६७ ॥
सुटतां मुद्वाणशैली । तुज पळतां रणकल्लोळीं ।
लपतां भूतलीं कीं नभःस्थळीं । शोधून होळी करतील ॥ ६८ ॥
हेमपत्री सुतीक्ष्ण बाण । सुटल्या घेती तुझा प्राण ।
मजसीं करितां रणांगण । वृथा मरण पावसी ॥ ६९ ॥
सांदोनियां धनुष्यबाण । शीघ्र पळावें आपण ।
तुज म्यां दिधलें जीवदान । सर्वथा जाण मारींना ॥ ७० ॥
त्यजून संग्रामसंकट । सांडुन युद्धकडकडाट ।
तुज म्यां दिधली धर्मवाट । घडघडाट पळावें ॥ ७१ ॥

लक्ष्मणाचे अतिकायाला प्रत्युत्तर :

अतिकायाच्या निंद्य उत्तरीं । कोप न येचि सौ‍मित्रीं ।
अगाध शांतीची निजथोरी । शब्दचातुरी अवधारा ॥ ७२ ॥
स्वमुखें बोलतां निजकीर्तीं । ते तंव शूरासी अपकीर्ती ।
शब्दचातुर्यव्युत्पत्तीं । काय पुरुषार्थीं जालासी ॥ ७३ ॥
बोलतां शब्दाची आंगवण । त्वां काय जिंतिलें रणांगण ।
व्यर्थ बोलाचें दादुलपण । निर्लज्ज पूर्ण तूं एक ॥ ७४ ॥
जे बडबडती वितंड । त्यांतें म्हणती केवळ भांड ।
भंडपुराण तुझें तोंड । तूं रणनिर्लंड निर्लज्ज ॥ ७५ ॥
घेवोनियां धनुष्यबाण । संमुख उभा मी लक्ष्मण ।
बोलासारखी आंगवण । करुन आपण दावावी ॥ ७६ ॥

बालोऽयमिति विज्ञान न चावज्ञातुमर्हसि ।
बोलाऽवा यदि बा वृद्धो मृत्युं जानाति संयुगे ॥१२॥

बालत्व मानिलें कुमारासीं । तेणें मर्दिलें लवणासुरासी ।
तेंवी या बालत्वें राक्षसी । रणमर्देसी मर्दीन ॥ ७७ ॥
नवग्रहांचे बळ घटासीं । तरी युद्ध न करवे पाषाणासीं ।
तेंवी तूं शूर देवदैत्यांसीं । संग्राम मजसीं न करवे ॥ ७८ ॥
मज मानूनि बाळपण । सर्वथा न करावें हेळण ।
माझ्या बाळपणाचें लक्षण । सावधान अवधारीं ॥ ७९ ॥
धाकुटी दीपकळिका जैसी । स्वयें लावितां वळचणीसी ।
जाळीत उठे पुरनगरांसी । गिरिदुर्गांसीं भस्मात ॥ ८० ॥
तैसें माझें धाकुटपण । संग्रामी राक्षसां कुळकंदन ।
मारीन इंद्रजित रावण । तेथें तूं कोण क्षुद्र मशक ॥ ८१ ॥
माझे सुटल्या निर्वाणबाण । अतिकाय तुज राखेल कोण ।
क्षणार्धें घेईन तुझा प्राण । तुझी आंगवण दावीं पां ॥ ८२ ॥
ऐसें बोलतां लक्ष्मण । अतिकाय कोपला दारुण ।
काढोनि निर्वाणबाण । सौ‍मित्र संपूर्ण विंधिला ॥ ८३ ॥

लक्ष्मणस्य वचः श्रुत्वा हेतुमत्परमार्थवत् ।
अतिकायः प्रचुक्रोध बाणं चास्य समाददे ॥१३॥
तमापतंतं सौ‍मित्रिस्त्रिधा चिच्छेद लाघवात् ।
रावणिः परमामर्षीं शरैरेनमुपाद्रवत् ॥१४॥
ततः शरसहस्त्रेण संस्थाप्य रघुनंदनम् ।
बिभीषणं च सामात्यं शरवर्षैर्महाभुजः ॥१५॥
अर्धचंद्रेण चिच्छेद लक्ष्मणः परवीरहा ।
ततो विद्याधराः सर्वे देवा देवर्षयस्तथा ॥१६॥
गुह्यकाश्च महात्मानस्तद्युद्धं ददृशुस्तदा ॥१७॥

अतिकाय व लक्ष्मणाचे युद्ध :

आपली स्तुति करणें आपण । हें शूरासी निंद्य दूषण ।
ऐसें धर्म युक्तवचन । स्वयें लक्ष्मण बोलिला ॥ ८४ ॥
हृदयीं भेदला वाग्बाण । तेणें कोपें अतिकाय आपण ।
घेवोनियां निर्वाणबाण । रणीं लक्ष्मण विंधिला ॥ ८५ ॥
लक्ष्मणें लघुलाघवेंकरीं । बाण छेदोनि वरच्यावरी ।
त्रिधा भेदून अंबरी । धरेवरी पाडिला ॥ ८६ ॥
निर्वाणबाण रणाआंत । करावया लक्ष्मणाचा घात ।
तो बाण येणें केला व्यर्थ । धन्य पुरुषार्थ सौ‍मित्रा ॥ ८७ ॥
श्रीराम आणि लक्ष्मण । दोघांही निधडी आंगवण ।
दोघे योद्धे रणप्रवीण । संग्रामी जाण नाटोपती ॥ ८८ ॥
ठाकून मारिल्या बिभीषण । न लगे जुंझ न लगे भांडण ।
दोघे स्वयें सांडिती प्राण । तैसें विदान मांडिलें ॥ ८९ ॥
ब्रह्मदत्ताचे सहस्र बाण । अनिवार्य अति दारुण ।
विंधोनि गोंविला लक्ष्मण । मारुन बिभीषण शरवर्षे ॥ ९० ॥
शरणागता वज्रपंजर । सत्यशस्त्री लक्ष्मण वीर ।
सोडून बाण अर्धचंद्र । शरें शर छेदिला ॥ ९१ ॥
बाण येतांचि कडाडीं । अतिकाय अतिशयें हडबडी ।
डोळां चालली झांपडी । पडली मुर्कंडी घायेंवीण ॥ ९२ ॥
अतिकाय ब्रह्मवरदान । प्राकृतीहातीं न ये मरण ।
अवतारपुरुषाहातीं जाण । दिनांतीं प्राण जातील ॥ ९३ ॥
न होतां सूर्यास्तमान । अतिकायासी न मारीच बाण ।
पाळोनियां ब्रह्मवरदान । आला परतोन तूणीरीं ॥ ९४ ॥
लक्ष्मणाचें रण विचित्र । पाहूं आले सुरासुर ।
सिद्ध चारण विद्याधर । यक्ष किन्नर गुह्यक ॥ ९५ ॥
देवऋषि नारदमुनी । युद्ध पाहूं आला धांवोनी ।
हरिखें नाचे उपरमोनी । धन्य करणीं सौ‍मित्रा ॥ ९६ ॥
अनिवार ब्रह्मवरदबाण । घाय निवारोनि संपूर्ण ।
शरणागता संरक्षण । धन्य लक्ष्मण पैं योद्धा ॥ ९७ ॥
बाण निवारोनि समस्त । स्वस्थ राखो न शरणागत ।
न लावितां त्यासी आघात । पाडी मूर्च्छित अतिकाया ॥ ९८ ॥
युद्ध पहावया पडिपाडें । पाहूं लागला लंकेपुढें ।
नारद हरिखें नाचे उडे । वाडेंकोडें गर्जत ॥ ९९ ॥
स्वर्गीं गर्जती सुरवर । ऋषी करिती जयजयकार ।
नामें गर्जती वानर । धन्य सौ‍मित्र रणयोद्धा ॥ १०० ॥
अतिकाय उघडी नयन । तंव बाण गेला परतोन ।
दुर्धर होवोनि कोपायमान । निर्वाणरण मांडिलें ॥ १ ॥
लक्ष्मणाचे पंच प्राण । घ्यावया सोडिलें पांच बाण ।
निश्चियाचें निजनिर्वाण । परम दारुण संग्रामी ॥ २ ॥
अतिकायाचे पांचही बाण । छेदून सांडी लक्ष्मण ।
जेंवी सर्पातें गरुड जाण । छेदी आपण नखाग्रें ॥ ३ ॥
छेदून त्याचें शरसंधान । स्वयें लक्ष्मण आपण ।
तेजस्वी घेऊन बाण । वोढी काढून विंधिला ॥ ४ ॥
कडकडाटें येवोनि बाण । ललाटीं लागला दारुण ।
तेथेंचि जाला निमग्न । जेंवी सर्पागमन वारुळीं ॥ ५ ॥
अतिकायें करितां निवारण । त्याचे छेदोनियां बाण ।
जाला ललाटीं निमग्न । कंपायमान राक्षस ॥ ६ ॥
रुधिराचिया धारा । रक्तें न्हाणिलें निशाचरा ।
घायें दंडिले महावीरा । रणीं थरथरां कांपत ॥ ७ ॥
जेंवी त्रिपुराचें त्रिपुर । रुद बाणीं करी जर्जर ।
तैसाच येथें निशाचर । लक्ष्मणें दुर्धर गांगिला ॥ ८ ॥
बाणमात्रें महाबळी । लोळविला रथातळीं ।
घायें मेळविला धुळी । आतुर्बळी सौ‍मित्र ॥ ९ ॥

चिंतयामास चाश्वास्य विश्रम्य च महाबलाः ।
साधुमुक्तेन बाणेन श्लाघनीयोऽसि मे रिपुः ॥१८॥
स्यंदनोपस्थमादाय चापमादाय चोत्तमम् ।
एकत्रीन्पंचसप्तेति सायकान्‍राक्षसर्षभः ॥१९॥
ततस्तान्‍राक्षसोत्सृष्टाञ्शरौघान्‍राघवानुजः ।
असंभ्रांतः प्रविच्छेद निशितैर्बहुभिः शरैः ॥२०॥

लक्ष्मण व अतिकाय यांचे अस्त्रयुद्ध :

अतिकाय शरसमेळीं । लोळविला रथातळीं ।
मूर्च्छा भाजून ते काळीं । झाला महाबळी सावध ॥ ११० ॥
माझी निवारोनि शरसुटी । बाण भेदिला लल्लाटीं ।
धन्य धनुर्वाडा तूं श्रेष्ठीं । वीरजगजेठी मी मानीं ॥ ११ ॥
देव दानव दैत्य पन्नर । सदा संग्रामीं मजसी विमुख ।
त्याही मज त्वां लाविला धाक । योद्धा नेटक मी मानीं ॥ १२ ॥
ऐसा शत्रूचा घेतां गुण । अतिकाय कोपला दारुण ।
घेवोनियां निर्वाणबाण । विंधी आपण साटोपें ॥ १३ ॥
प्रथम विंविधला बाण एक । लक्ष्मणें तोडिला तो देख ।
सवेंचि विंधीं पांच आणिक । तेही निःशेख तोडिले ॥ १४ ॥
सवेंचि विंधिले बाण तीन । तेही सांडिले छेदून ।
आणीक विंधितां सात बाण । तेही तोडून सांडिले ॥ १५ ॥
एक तीन पांच सात । बाण छेदिले समस्त ।
अतिकाय तेणें कोपन्वित । दांत खात संग्रामीं ॥ १६ ॥

तान्शरान्युधि संप्रेक्ष्य निकृत्तान्‍रावणात्मजः ।
चुकोप त्रिदशेंद्रारिर्जग्राह च शितं शरम् ॥२१॥
तेन सौ‍मित्रिमायातमाजघान स्तनांतरे ।
सोऽतिविद्धो बलवता लक्ष्मणो लक्ष्मिवर्द्धनः ॥२२॥
सुस्राव रुधिरं भूरि मदमत्त इव द्विपः ।
स चकार तदात्मानं विशल्यं सहसा विभुः ॥२३॥

अतिकायाचे निर्वाणशर । लक्ष्मणें छेदिले समग्र ।
तेणें क्षोभोनि रावणकुमर । शर दुर्धर सज्जिला ॥ १७ ॥
तेणें बाणेंसीं गर्जोन । हृदयीं विंधिला लक्ष्मण ।
बाण भेदलियाही संपूर्ण । सौ‍मित्र जाण न डंडळी ॥ १८ ॥
सुटलिया रुधिरधारा । शोभे जैसा रणनोवरा ।
रणीं गर्जतां सौ‍मित्र । निशाचरा आकांत ॥ १९ ॥
जेंवी महागज मदच्युत । डुल्लत विचरे वनाआंत ।
तेंवी लक्ष्मण रुधिरोक्षित । स्वानंदे डुल्लत रणरंगी ॥ १२० ॥
हृदयीं रुपला जो बाण । तो स्वयें उपडोनि आपण ।
हृदय निःशल्य केलें जाण । रणप्रवीण सौ‍मित्र ॥ २१ ॥
जो हृदयींचे शल्य फेडी । त्याचे तोडरीं विघ्नकोडी ।
प्रपंचपरमार्थविजयगुढी । उभवी रोकडी तिहीं लोकीं ॥ २२ ॥
जो शल्य फेडी हृदयाआंत । त्यासी रणरंगी परमार्थ ।
तोचि विजयी संग्रामांत । जो करी घात अहंममतेचा ॥ २३ ॥
यापरी तो वीर धीर लक्ष्मण । हृदयींचें सर्व शल्य काढून ।
अतिकायाचा घ्यावया प्राण । अस्त्रसंधा संधारी ॥ २४ ॥
निधडा धनुर्वाडा वीर । रणव्युत्पत्तीं शूर सौ‍मित्र ।
अस्त्र मंत्र बीजाक्षर । सतेज शर सज्जिला ॥ २५ ॥

जग्राह च शरं तीक्ष्णं तमस्त्रेणाभिसंदधे ।
आग्नेयेन महाबाहुः सर्वा विद्योतयन्दिशः ॥२४॥
अतिकायाय चिक्षेप कालदंडमिवांतकः ।
दृष्ट्वा तु तं महबाहुः शरं जग्राह कोपनः ॥२५॥
उत्ससर्ज तदा बाणं दीप्तं सूर्यास्त्रसंयुतम् ।
तावुभावंबरे बाणावन्योन्यमभिजघ्नतुः ॥२६॥
तावन्योन्यं विनिर्भिद्य पेततुर्धरणीतले ॥२७॥

ब्रह्मवरदानामुळे लक्ष्मणाचे बाण व्यर्थ ठरतात :

सौ‍मित्र युद्धीं सावधान । घ्यावया अतिकायाचा प्राण ।
अग्निअस्त्र सज्जून बाण । विधी आपण साटोपें ॥ २६ ॥
बाण सुटतां तेजोराशी । प्रभा न माय आकाशीं ।
अतिकाय देखोनि त्यासी । सूर्यास्त्रासीं विंधिलें ॥ २७ ॥
अग्नि सूर्य तेजोराशी । बाण भिडतां आकाशीं ।
तेज मिळालें तेजासीं । अस्त्रें अस्त्रासी निवारण ॥ २८ ॥
पहातां पहातां वाडेंकोडें । तेजींतेज मिनलें गाढें ।
दोहींचीं निर्वीर्य कांडे । रणीं दुखंडे ती पडलीं ॥ २९ ॥
दोनी अस्त्रें झालीं निराकार । दोघे विसावले वीर ।
रणीं क्षोभोनि निशाचर । इषीकास्त्र सोडिलें ॥ १३० ॥
रणीं क्षोभोनि निशाचर । रागें सोडिलें इषीकास्त्र ।
लक्ष्मण निधडा धनुर्धर । छेदिलें सत्वर इंद्रास्त्रें ॥ ३१ ॥
छेदिलें देखोनि इषीकास्त्र । कोपोनियां रावणपुत्र ।
सोडिता जाला याम्यास्त्र । रणीं सौ‍मित्र लक्षोनी ॥ ३२ ॥
येता देखोनि याम्यास्त्र । अस्त्रविंदानी सौ‍मित्र ।
वाय्वस्त्रें तेंही अस्त्र । रणीं सत्वर छेदिलें ॥ ३३ ॥
रणीं खवळोनि सौ‍मित्र । पर्जन्यधारा वर्षे शर ।
पावोनि अतिकायशरीर । बाण समग्र भंगिले ॥ ३४ ॥
ब्रह्मदत्त कवच त्यासीं । बाण न रुपती अतिकायासीं ।
तेणें लक्ष्मणें अति आवेशीं । बाणायुतेंसीं विंधिला ॥ ३५ ॥
रणीं कोपोनि सौ‍मित्र । अयुतायुत विंधिता शर ।
ब्रह्मकवचें अतिकाय वीर । व्यथा अणुमात्र पावेना ॥ ३६ ॥

स वृष्यमाणो बाणौघैरतिकायो महाबलः ।
ब्रह्मदत्तवरो वीरो राक्षसेंद्रो न विव्यथे ॥२८॥
न शशाक रुजं कर्तुं यदा तस्य महाशरैः ।
अथैनमभ्युपागम्य वायुवाक्यमभाषत ॥२९॥
ब्रह्मदत्तवरो ह्येष ह्यभेद्यकवचावृतः ।
ब्राह्मेणास्त्रेण भगवञ्जहि दैवतकंटकम् ॥३०॥

वायूंच्या सूचनेप्रमाणे ब्रह्मास्त्रयोगाने अतिकायाचा वध :

लक्ष्मणाचे दुर्धर शर । भेदूं न शकती निशाचर ।
ब्रह्मदत्तकवचें वीर । व्यथा अणुमात्र पावेना ॥ ३७ ॥
ऐसे देखोनि लक्ष्मण । विचारीं पडला संपूर्ण ।
अतिकाया न भेदती बाण । काय आपण करावें ॥ ३८ ॥
तंव गुप्तत्वें येऊनी । वायु गुज सांगे कानीं ।
यासी न भेदवे बाणीं । ब्रह्मवरदानी कवचावृत ॥ ३९ ॥
यासीं ब्रह्मयाचें वरदान । ब्रह्मास्त्रें विंधोनि बाण ।
सवेग याचा घ्यावा प्राण । दुष्ट दारुण देवद्रोही ॥ १४० ॥
देवद्रोही देवकंटक । भूतद्रोही जीवघातक ।
धर्मंद्रोही दुःखदायक । यासी आवश्यक मारावें ॥ ४१ ॥
ऐकोनि वायूचें वचन । रणीं हर्षला लक्ष्मण ।
अतिकायाचा घ्यावया प्राण । ब्रह्मास्त्र पूर्ण सज्जिलें ॥ ४२ ॥
अचुकसंधानी सौ‍मित्र । हेमपत्री सित पीत शर ।
बाणीं सज्जिलें ब्रह्मास्त्र । निशाचर मारावया ॥ ४३ ॥
अस्त्रतेजाचा लखलखाट । बाणबळाचा कडकडाट ।
शरपिसारियाचा सुसाट । भंवत आट सुरासरां ॥ ४४ ॥
दैत्य दानव सुरगण । चंद्रसूर्यादि ग्रहगण ।
सुटतां लक्ष्मणाचा बाण । आंदोलायमान राक्षस ॥ ४५ ॥
क्षोभें उलथत सागर । कंपें कांपती धराधर ।
बाण सोडितां सौ‍मित्र । चराचर हडबडिलें ॥ ४६ ॥
ऐसा येतां देखोनि बाण । स्वयें अतिकाय आपण ।
दृढ साधूनि रणांगण । धनुष्या गण वाहिला ॥ ४७ ॥
अतिकाय महावीर । लघुलाघवें विंधी शर ।
ते बाण छेदूनि समग्र । ब्रह्मास्त्र लोटलें ॥ ४८ ॥
येतां देखोनि ब्रह्मास्त्रासी । अतिकाय विंधि बहु बाणांसी ।
त्या छेदूनि सर्वांसी । आले अंगासी ब्रह्मास्त्र ॥ ४९ ॥
जेंवी गरुड छेदी अजगर । तेंवी ब्रह्मास्त्रें छेदोनि शर ।
अतिकायाचें छेदावया शिर । आलें ब्रह्मास्त्र अंगासी ॥ १५० ॥
सरलें हाणितां शस्त्रास्त्र । मग हाणी पर्वतशिखर ।
तरी न धरवे ब्रह्मास्त्र । हाहाकार उठिला ॥ ५१ ॥
निर्वाणींचे विंधितां बाण । तेही ब्रह्मास्त्रें करोनि चूर्ण ।
अतिकायाचा घ्यावया प्राण । आलें जाण अंगासी ॥ ५२ ॥
शक्ति शूळ गदा तोमर । फरश पट्टिश खड्ग कुठार ।
हाणिताही परिघ मुद्‌गर । ब्रह्मास्त्र ढळेना ॥ ५३ ॥
समस्तही शस्त्रजाळ । ब्रह्मास्त्रें करोनि निष्फळ ।
अतिकायाचें कंठनाळ । रणीं तत्काळ छेदिलें ॥ ५४ ॥
मुकुट कुंडले सुशोभित । निजतेजें लखलखित ।
शिर छेदोनि रणांत । देदीप्यमान पाडित भूमींसीं ॥ ५५ ॥

तच्छिरः सशिरस्त्राणं लक्ष्मणेन प्रमर्दितम् ।
पपात सहसा भूमौ शृंगं हिमतो यथा ॥३१॥
तं भूमौ पतितं दृष्ट्वा विक्षिप्तं वीरभूषणम् ।
बभूवुर्व्यथि सर्वे हतशेषा निशाचराः ॥३२॥

अतिकायराक्षस महापराक्रमी व अतिरथी होता :

कुंभकर्णाची परम ख्याती । त्यातें महारथी म्हणती ।
अतिकाय तो अतिरथी । पाडिला क्षिती सौ‍मित्रें ॥ ५६ ॥
धन्य बळियाढा लक्ष्मण । मुकुत कुंडले सशिरस्त्राण ।
शिर पाडिलें छेदून । विराजमान भुतळीं ॥ ५७ ॥
जैसें हिमाद्रीचें शिखर । तैसें छेदोनि पाडिलें शिर ।
तें देखोनि निशाचर । पळती सत्वर लंकेसीं ॥ ५८ ॥
मारितां उरली राक्षससेना । पळोनि जावोनि लंकाभुवना ।
वृत्तांत सांगती दशानना । जे साही जणां मारिलें ॥ ५९ ॥
देवांतक नरांतक त्रिशिरा । महापार्श्व महोदरा ।
मारिलें अतिकाया दुर्धरा । सहाही महावीरां प्राणांत ॥ १६० ॥
रणीं लक्ष्मणाच्या हातीं । अतिकाय पावला ब्रह्मप्राप्ती ।
श्रीरामदृष्टीं युद्धस्थिती । परम मुक्ति राक्षसां ॥ ६१ ॥
एका जनार्दना शरण । कुमार मारिले साही जण ।
पुढील कथेचें अनुसंधान । सावधान अवधारा ॥ ६२ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
अतिकायवधो नाम एकत्रिंशशत्तमोऽध्यायः॥ ३१ ॥
ओव्या ॥ १६२ ॥ श्लोक ॥ ३२ ॥ एवं ॥ १९४ ॥