अध्याय 37
इंद्रजिताचा निकुंबिला प्रवेश
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
इंद्रजिताने भीतीने निकुंभिलेत गमन केले :
हनुमंताचा पर्वतघात । चुकवावया इंद्रजित ।
स्वयें पळाला बिळा आंत । धुकधुकित अति धाकें ॥ १ ॥
मायिकसीतेचा पैं घात । जाणोनियां हनुमंत ।
माझा करील प्राणांत । भेणें धाकत इंद्रजित ॥ २ ॥
सांगावया रणवृत्तांत । श्रीरामापासीं गेला हनुमंत ।
तेव्हा इंद्रजित भयभीत । गेला पळत निकुंबळे ॥ ३ ॥
निकुंभिलामथासाद्य जुहुबेग्निमथेंद्रजित् ।
यज्ञभूभौ तु विधिना पावकस्तेन रक्षसा ॥१॥
हूयमानः प्रजज्वाल जपहोमपरिष्कृतः ।
सार्चिः पिनद्धो ददृशे पूयशोणिततर्पितः ॥२॥
सन्ध्यागत इवादित्यः परिवेषसमन्वितः ।
जुहोति यत्र विधिवद्रक्तोष्णीषं वरस्त्रियः ॥३॥
शस्त्राण्यलाबुपत्राणि समिधश्च बिभीतकः ।
अस्थि कृष्णमृगस्याथ रक्तं जग्राह जीवतः ॥४॥
लोहितानि च वासांसि स्रुंव कार्ष्णायसं तथा ।
सर्वतोग्निं समास्तीर्य शनैः पात्रैः सतोमरैः ॥५॥
इंद्रजिताचा अभिचारयागाचा आरंभ :
जीवें मारील हनुमंत । येणे धाकें इंद्रजित ।
पळाला निकुंबळेआंत । अभिचारार्थ साधावया ॥ ४ ॥
माराव्या रामसौमित्र । वधावया हनुमान वीर ।
निर्वाणींचें अभिचार । करी साचार इंद्रजित ॥ ५ ॥
मारावया रामलक्ष्मण । सुग्रीवादि वानरगण ।
मारितां न लगे अर्ध क्षण । यालागीं निर्वाणहोम मांडी ॥ ६ ॥
यक्षिणीवटातळीं । होमकुंडे दीर्घ बिळीं ।
तेथें रिघोनि महाबळी । होम तत्काळीं आरंभी ॥ ७ ॥
कुंड मंडप विधिविधान । विधियुक्तं अग्निस्थापन ।
शस्त्रांचे परिस्तरण । परिसमूहन मद्याचें ॥ ८ ॥
नरकपाळें नरशिर तेंचि प्रणीताघृतपात्र ।
कृष्णच्छागाचें रुधिर । भरिलें सत्वर त्यामाजी ॥ ९ ॥
जीतकृष्णच्छाग धरुनि पुरा । सर्वांगी घेवोनि शिरा ।
धरोनियां त्याच्या रुधिरा । त्या त्या पात्रामाजी भरी ॥ १० ॥
शरचाप खड्गादि तोमर । होमाभोंवते शस्त्रसंभार ।
अभिषिंचूनि समंत्र । मांडी तें तंत्र इंद्रजित जाणे ॥ ११ ॥
अभिचाराचिये अभिव्यक्ती । शस्त्रांसीं यावया पूर्ण शक्ती ।
इंद्रजित मंत्रव्युत्पत्तीं । मांड विध्युक्त विभागें ॥ १२ ॥
शस्त्रशक्तीं अवघिया । मंत्रसामर्थ्य आकळोनियां ।
आरक्तओष्ठी क्रूर स्त्रिया । आणिलिया यज्ञवाटा ॥ १३ ॥
लोहसाराचा स्रुकस्रुवा । तेणें पात्रें होम करावा ।
होम द्रव्यांचा यावा । विधिगौरवा तो ऐका ॥ १४ ॥
लवण सर्षप भिल्लातक । कालवोनि मातंगीचें रक्त ।
मद्य मेळवोनि त्याआंत । होम मंत्रोक्त विधिवादें ॥ १५ ॥
जेंवी मिरवे बाळादित्य । तेंवी अग्नि धगधगित ।
परिस्तरणीं सुशोभित । होम करीत इंद्रजित ॥ १६ ॥
काळीचिडी कांकणघारी । उलूक खिळोनि त्यामाझारी ।
कृष्णसर्प अर्धशिरीं । होमावरी बांधिला ॥ १७ ॥
त्या सर्पाचें स्रवे गरळ । तेचि वसोर्धारा प्रबळ ।
मानी इंद्रजित अमंगळ । पापी केवळ अभिचारी ॥ १८ ॥
प्राणियासी करोनि घात । पूर्ण रुधिर धरोनि बदबदित ।
मेळवोनि ब्राह्मणाचें रक्त । होम करीत इंद्रजित ॥ १९ ॥
बेहडा अपवित्र जगांत । त्याच्या समिधा होम करित ।
कडू भोपळ्याच्या पात्राआंत । मद्य भरित होमार्थ॥ २० ॥
आरक्त वस्त्र आरक्त विराजित । रक्ताचा टिळा मस्तकांत ।
आरक्त माळा कंठी शोभत । अभिचारयुक्त इंद्रजित ॥ २१ ॥
जपहोम मंत्रयुक्त । विकळ उच्चार हो नेदित ।
इंद्रजित स्वयें होम करित । अभिचारार्थ साटोपें ॥ २२ ॥
सरड बेडूक मत्स्य मगर । पिंगळा बोलका गीध घार ।
होमीं जाळिती अपार । निशाचर महापापी ॥ २३ ॥
यापरी इंद्रजित । निकुंबळे होम करित ।
जाणोनि त्याचा वृत्तांत । बिभीषण सांगत श्रीरामा ॥ २४ ॥
निकुंभिलायां काकुत्स्थ जुहोति हि न संशयः ।
सबलास्तत्र गच्छामो यावत्तन्न समाप्यते ॥६॥
लक्ष्मणं प्रेषयास्माभिः सह सैन्यानुकर्षिभिः ।
एष तं नरशार्दूल रावणिं निशितैः शरैः ॥७॥
त्याजयिष्यति तत्कर्म प्राणनिषठां च संयुगे ।
तपसा तेन वीरेण वरदानात्स्वयंभुवः ॥८॥
अस्त्रं ब्रह्माशिरः प्राप्तं कामगाश्च हयोत्तमाः ।
स एवं विदधे चास्य धीमतः पुण्यकर्मणः ॥९॥
निकुंभिलामसंप्राप्तमकृताग्निं च यो रिपुः ।
त्वामाव्हयिष्टते युद्धे इंद्रशत्रो स ते वधः ॥१०॥
इत्येवं तस्य विहितो वधोपायो दुरात्मनः ॥११॥
बिभीषणाची श्रीरामांना अभिचारायागाच्या प्रतिकाराची विनंती :
बिभीषण सांगे श्रीरामाप्रती । इंद्रजित अभिचारहोमस्थितीं ।
निकुंबळे गेलासे दुर्मती । कपटानुवृत्ति दुरात्मा ॥ २५ ॥
ब्रह्मवरदी शिववरदी । अभिचारहोमविधीं ।
तत्काळ त्यासी व्हावी सिद्धी । वरद त्रिशुद्धीं तयासी ॥ २६ ॥
होमन होतां संपूर्ण । मध्येंचि विध्वंसिल्या जाण ।
तेंचि इंद्रजितासी मरण । शिववरदान सत्यत्वें ॥ २७ ॥
होम न होतां समप्ती । मध्येचि जाल्या विघ्नप्राप्ती ।
तेणे मरण रणावर्ती । हे वचनोक्ती ब्रह्मयाची ॥ २८ ॥
वरदास्तव इंद्रजिता तेथ । ब्रह्मशिरोस्त्र जाल्या प्राप्त ।
कामग हय् कामग रथ । तेणें तो विख्यात तिहीं लोकीं ॥ २९ ॥
तेणें बळें रणकडाडीं । देव जे कां तेहतीस कोडी ।
इंद्रजित घाली बांधवडीं । वरदप्रौढीप्रतापें ॥ ३० ॥
येणेंचि बळें युद्धाआंत । इंद्र धरिला जीवें जीत ।
नांव पावला इंद्रजित । शिववरदार्थप्रतापें ॥ ३१ ॥
ते घोडे आणि तोचि रथ । रणीं ने जिंकवे रघुनाथ ।
दोहीं शरबंधां केला घात । प्रतापवंत श्रीराम ॥ अ३२ ॥
दों शरबंधी इंद्रजित । युद्धी परम प्रतापवंत ।
त्याचा श्रीरामें केला घात । इंद्रजित तळमळी ॥ ३३ ॥
तेणें रागें इंद्रजित आपण । मारावया श्रीरामलक्ष्मण ।
अभिचार करितो निर्वाण । अति दारुण विधिभागें ॥ ३४ ॥
पुढेंमागुता युद्धाआंत । न चले शरबंध पुरुषार्थ ।
श्रीरामें छेदिला वरदार्थ । तळमळित इंद्रजित ॥ ३५ ॥
त्याच्या कर्मा करावया विघ्न । बिभीषण निघाला आपण ।
मजसवें द्यावा लक्ष्मण । वीर दारुण प्रतापी ॥ ३६ ॥
लक्ष्मण वीर धीर । लक्ष्मण परम शूर ।
करील इंद्रजिताचा संहार । सखा सौमित्र प्रतापी ॥ ३७ ॥
होमस्थान अति गुप्त । आणिकासी नव्हे प्राप्त ।
तें मी दाखवीन साद्यंत । करावया घात इंद्रजिताचा ॥ ३८ ॥
होम झालीया समाप्त । इंद्रजित तीन्ही लोकां अजित ।
करील समस्तांचा घात । हा वरदार्थ शिवाचा ॥ ३९ ॥
या लागीं अति शीघ्रगतीसीं । श्रीरामा आज्ञा देई आम्हासीं ।
सवें द्यावें सौमित्रासी । विघ्न होमासीं करावया ॥ ४० ॥
सुटल्या सौमित्राचा बाण । विध्वंसील होमस्थान ।
इंद्रजित उठतांचि जाण । घेईल प्राण रणमारें ॥ ४१ ॥
त्याच्या होमासीं होतांचि विघ्न । रणीं इंद्रजित मरेल जाण ।
ऐसें शिवाचें वरदान । यालागीं आपण धाडावें शीघ्र ॥ ४२ ॥
बिभीषणवचः श्रुत्वा रामो लक्ष्मणमब्रवीत् ।
जानामि तस्य रौद्रस्य मायामेतां दुरात्मनः ॥१२॥
तस्यांतरिक्षे चरतः सरथस्य परंतप ।
न गतिर्वेदितुं शक्या सूर्यस्येवाभ्रसंप्लवे ॥१३॥
तं मायागमसंप्राप्तं महावीर्यमरिंदमम् ।
जहि बाणैरिदं कर्म कुरु सत्यपराक्रमम् ॥१४॥
यदृक्षराजस्य बलं तेन सर्वेण संवृतः ।
युवराजोंsगदः सार्धमनेन च हनूमता ॥१५॥
गच्छ तं राक्षसेंद्रस्य तनूजं जहि लक्ष्मण ॥१६॥
श्रीरामांचा उपदेश व लक्ष्मणाला आज्ञा :
ऐकोनि बिभीषणवचन । संतोषला रघुनंदन ।
पाचारोनियां लक्ष्मण । काय आपण सांगत ॥ ४३ ॥
तूं निधडा विरपंचानन । रणरंगी रणप्रविण ।
इंद्रजित महामायावी जाण । कपटी संपूर्ण वंचक ॥ ४४ ॥
उभा न राहे युद्धा क्षितीं । सवेग जाणें नभस्थिती ।
रथ वारु सारथी । गुप्तगतीं खेचर ॥ ४५ ॥
जेंवी कां गगनी गभस्ती । अभ्रांमाजी न ये व्यक्ती ।
तेंवी इंद्रजित गुप्तगती । रणानुवृत्ती लक्षेना ॥ ४६ ॥
कवडा राहोनियां गगनीं । अलक्ष मीन लक्षी जीवनीं ।
तेंवी इंद्रजित गुप्तगतीं रणीं । सूक्ष्मदर्शनीं लक्षवा ॥ ४७ ॥
नांव रुप गुण लक्षण । स्वयें सांडावें विवंचून ।
लक्षावें कारणाकारण । सूक्ष्मदृष्टि जाण या नांव ॥ ४८ ॥
लक्षिल्या कारणाकारण । न करितांही रणांगण ।
इंद्रजित मरेल हा पण । मात्रार्ध बाण विंधितां ॥ ४९ ॥
यापरी रणरंगीं । शत्रु मारावा अंगोअंगी ।
पंगिस्त न व्हावें दुजियालागीं । हें रणभागीं लक्षूनी ॥ ५० ॥
यापरी सौमित्रासी । संग्रामां धाडी इंद्रजितासीं ।
सवें धाडिले वानरांसी । निधड्या वीरांसी तें ऐका ॥ ५१ ॥
बळवंत बुद्धिवंत । अंगद युवराज विख्यात ।
विख्यात । ससैन्य निघे जांबवंत । सैनासमवेत चालिला ॥ ५२ ॥
भरंवशाचा वीर विख्यात । सवें दिधला हनुमंत ।
ज्याचेनि बळें श्रीरघुनाथ । स्वयें निश्चित सर्वार्थीं ॥ ५३ ॥
अतिशयें बळें प्रबळ । सवें दिधले नळनीळ ।
देखोनि वानरांचा मेळ । हर्ष प्रबळ सौमित्रा ॥ ५४ ॥
जावोनियां निकुंभिलेसीं । युद्ध करावया इंद्रजितासीं ।
अति उल्लास लक्ष्मणासी । आलें बाहूंसी स्फुरण ॥ ५५ ॥
अयंत्वां सचिवैः सार्द्धं महात्मा रावणानुजः ।
अभिज्ञस्तस्य देशस्य पृष्ठतोsनुगमिष्यति ॥१७॥
स रामस्य वचः श्रुत्वा लक्ष्मणः परवीरहा ।
जग्राह कार्मुकं श्रेष्ठं भीमं भीमपराक्रमः ॥१८॥
सन्नद्धः सशरः खड्गी कवची वामचापभृत् ।
रामपादावुपस्पृश्य हृष्टः सौमित्रिरब्रवीत् ॥१९॥
अद्य मत्कार्मुकोत्सृष्टाःशरा निर्मिद्य रावणिम् ।
लंकामभिपतिष्यंति हंसाः पुष्करणीमिव ॥२०॥
श्रीराम लक्ष्मणाबरोबर बिभीषण व हनुंमंत यांना पाठवितात :
श्रीराम म्हणे सौमित्रासी । तुम्ही गेलिया निकुंभिलेसीं ।
यज्ञवाट न कळे तुम्हांसी । अति गुप्तेसीं महागुढ ॥ ५६ ॥
त्या यज्ञवाटाचें लक्षण । अति गूढ गुप्त गहन ।
रिगिनिगी स्थानमान । तें बिभीषण सांगेल ॥ ५७ ॥
यालागीं तुम्हांसागातें । मी देतों बिभीषणातें ।
तुम्हीं संरक्षावें यातें । जेंवी जीवातें निजात्मा ॥ ५८ ॥
माझा जीव आत्मा प्राण । तो हा मूर्तिमंत बिभीषण ।
यासी रक्षावें आपण । अवघे जण मिळोनी ॥ ५९ ॥
महाकपटी इंद्रजित । सितरोनि करील घात ।
मारिलिया शरणागत । तोचि कल्पांत आम्हांसी ॥ ६० ॥
सांगतां त्यांचें वर्म कर्म । इंद्रजितासीं द्वेष परम ।
ठकून करील घातक धर्म । पापकर्मा पापात्मा ॥ ६१ ॥
राम सांगे हनुमंतासी । संरक्षावें बिभीषणासी ।
साह्य व्हावें सौमित्रासी । दोघे तुजपासीं दिधले ॥ ६२ ॥
ऐकतां श्रीरामवचन । हनुमंतासीं उल्लास पूर्ण ।
तुझें नाम संरक्षण । सर्वाथीं जाण सर्वदा ॥ ६३ ॥
रामा तुझिया नामाचें । आम्हांसी वज्रकवच साचें ।
भय नाहीं कळिकाळाचें । इंद्रजिताचें तोंड कोण ॥ ६४ ॥
ऐसें ऐकतां वचन । लक्ष्मणासी आलें स्फुरण ।
सज्जोनियां धनुष्यबाण । जाला आपण सन्नद्धबद्ध ॥ ६५ ॥
कवची खड्गी हेममाळ । लक्ष्मणें घालोनि गळां ।
येवोनि श्रीरामाजवळां । चरणकमळा वंदित ॥ ६६ ॥
लक्ष्मणाचे प्रयाण :
वंदूनि श्रीरामचरण । करोनि त्रिवार प्रदक्षिण ।
लक्ष्मण बोले आंगवण । सावधान अवधारा ॥ ६७ ॥
आजि माझे सुटल्या बाण । घेतील इंद्रजिताचा प्राण ।
सव्यबाहु तोडून जाण । पाठवीन लंकेसीं ॥ ६८ ॥
हंस बुडी देती पुष्करणीसीं । तेंवी बाण भेदती राक्षसांसीं ।
ऐसें बोलोनि श्रीरामासी । संग्रामासी निघाला ॥ ६९ ॥
निकुंभिलामभिययौ हंतुं रावणिमाहवे ।
बिभीषणेन सहितो राजपुत्रः प्रतापवान् ॥२१॥
कृतस्वस्त्यनो भ्रात्रा लक्ष्मणो निर्ययौ तदा ।
वानराणां सहस्रेश्च हनुमान्बहुभिर्वृतः ॥२२॥
बिभीषणश्च सहसा रामभ्रातरमन्वगात् ।
महाकपिबलौघैस्तु संपतन्निव सर्वतः ॥२३॥
ऋक्षराजबलं चैव महाभ्रमिव नादयन् ।
स गत्वा दूरमध्वानं सौमित्रिर्मित्रनंदनः ॥२४॥
वधूं जातां वृत्रासुरासी । जें स्वस्त्ययन केलें इंद्रासीं ।
तें स्वस्त्ययन सौमित्रासीं । करी आदरेंसीं श्रीराम ॥ ७० ॥
बाणें छेदावया त्रिपुरासी । जें स्वस्त्ययन शंकरासीं ।
तें स्वस्त्ययन सौमित्रासीं । करी साक्षेपेंसीं श्रीराम ॥ ७१ ॥
मर्दू जातां मुर दैत्यासी । जें स्वस्त्ययन केलें भगवंतासीं ।
तें स्वस्त्ययन सौमित्रासीं । करी साक्षेपेंसीं श्रीराम ॥ ७२ ॥
ऐसें करोनि स्वस्त्ययन । स्वयें हनुमंत बिभीषण ।
देवोनियां वानरसैन्य । धाडी लक्ष्मण निकंभिलेसीं ॥ ७३ ॥
काळें अभ्र अति गहन । तैसें जांबवंताचें सैन्य ।
करितां रामनामगुणगुण । निकुंभिले जाण निघालें ॥ ७४ ॥
नळ नीळ अंगद जांबवंत । आतुर्बळी हनुमंत ।
बिभीषण विचारवंत । सवें चालत सौमित्र ॥ ७५६ ॥
बिभीषणाचे प्रधान चारी । मार्गद्रष्टे चतुर भारी ।
चालती अवघियांच्या पुढारीं । अंतरावरी साटोपें ॥ ७६ ॥
किराणें करिती वानरवीर । चढले निकुंभिलापाठार ।
पुढें देखिलें दुर्धर । घोरांदर महावन ॥ ७७ ॥
निबिड वनाचे छेदन :
वनवृक्ष वनस्थळीं । कंटक निबद्ध समूळीं ।
उडों जातां गोळांगुळी । होती चिरफळी अंगाची ॥ ७८ ॥
कंटकीवन घोरांदर । रिघों न शकती वानर ।
तेथें केंवी रिघती राजकुमर । अटक थोर ओढवली ॥ ७९ ॥
मार्ग पाहतां चौपासीं । जागले रोधिले दशदिशीं ।
वाट न फुटे वारियासी । पुढें कोणासी न चालवे ॥ ८० ॥
पुसतां बिभीषणा पुढां । मार्ग न कळे चहूंकडां ।
तोही लागतांचि वेडा । वहिला मेढा सौमित्रें ॥ ८१॥
वर्षोनियां बाणजाळी । विपिन छेदितां समूळीं ।
वनदेवता सकळी । देती आरोळी अति दुःखें ॥ ८२ ॥
वनदेवतांची शरणागती व हनुमंताला सत्यकथन :
वनदेवता समस्ता । त्या वांचवावया निजजीविता ।
शरण आल्या हनुमंता । सांगावया घाला इंद्रजिताच्या ॥ ८३ ॥
आम्हांस केलीसे खिळणी । बोलावया नुखळे वाणी ।
ऐसें हनुमंतें ऐकोनी । गर्जला वाणी रामनामें ॥ ८४ ॥
तुम्ही वनदेवता समस्ता । श्रीरामनाम स्मरा आतां ।
ऐसें हनुमंतें सांगतां । जाल्या निर्मुक्ता वनदेवता ॥ ८५ ॥
स्मरतां रामनामवाणी । पळाल्या खिळणीपिळणी ।
अभिचारा समूळ धुणी । नामस्मरणीं बडिवारें ॥ ८६ ॥
वनदेवी उल्लासतां । चरणीं लागती हनुमंता ।
तूं तंव आमुचा प्राणदाता । खिळणी समस्ता सोडविल्या ॥ ८७ ॥
खिळणीपिळणी समस्ता । तुवां उपडिल्या हनुंमंता ।
करावया इंद्रजिताचिया घाता । सांगतो आतां तें शीघ्र करीं ॥ ८८ ॥
जो हे छेदील कंटकवन । त्याचेनि हातें इंद्रजित आपण ।
तत्काळ पावेल मरण । हें भाषण शिवाचें ॥ ८९ ॥
प्रथम बंध कंटकविपिन । दुजा बंध महापर्जन्य ।
तिजा झंझावात दारुण । चौथें आवरण महासर्प ॥ ९० ॥
पांचवें पिशाच जाण क्रूर । सहावें गुप्त हतियेर ।
सातवा तो राक्षससंभार । निशाचर महायोद्धें ॥ ९१ ॥
यक्षिणीवटातळीं प्रबळ । अति गुप्तत्वें महबिळ ।
त्यामाजी आहे होमशाळ । अलक्ष तें स्थळ लक्षेना ॥ ९२ ॥
येणें अभिचारें इंद्रजित । जाला तिहीं लोकीं अजित ।
इंद्र धरिला जीवें जीत । येथील अर्थ साधूनी ॥ ९३ ॥
ऐसें वनदेवी सांगतां । वृत्तांत कळला हनुमंता ।
नमस्कारोनि वनदेवता । सन्मानता आश्वासी ॥ ९४ ॥
लक्ष्मणाच्या बाणाने पर्जन्यबंधाचे निवारण :
यापरी जिणोनि कंटकवन । पुढें उल्लासें करी गमन ।
लागला दुस्तर पर्जन्य । अति दारुण अनिवार्य ॥ ९५ ॥
उतटों पाहती गिरिकूट । ऐसा विजुवांचा कडकडाट ।
धारा येती अति अचाट । प्रळयो स्पष्ट ओढवला ॥ ९६ ॥
मेघ जिणोनि हरिला शब्द । नांव पावला मेघनाद ।
तेणें मार्गें करावया रोध । घन सुबद्ध वर्षवी ॥ ९७ ॥
लागतां पर्जन्याच्या धारा । अति हुडहुडी वानरां ।
कोप चढिला सौमित्रा । धनुष्यीं शरा सज्जिलें ॥ ९८ ॥
मेघ गर्जतां कडकडाटा । लक्ष्मणें विंधोनि खिळिल्या वाटा ।
पर्जन्य राहिला थेंबटा । कोरड्या वाटा चालिले ॥ ९९ ॥
देखोनि सौमित्राचें बळ । मेघीं सांडिले निरोधस्थळ ।
अंगी खडतरतां बाणजाळ । मेघ सकळ निवारिले ॥ १०० ॥
हनुमंताकडून झंझावाताचे निवारण :
पुढें चालता समस्त । वायु सुटला झंझावात ।
वानर उडविले गगनांत । जेंवी तृणातें वाहुटळी ॥ १ ॥
लक्ष्मण शेष तत्वतां । सहस्रमुखीं वायु भक्षितां ।
निवारोनि झंझामारुता । होय सज्जिता महाशस्त्र ॥ २ ॥
वायु जो कां निजपिता । त्यासी हनुमान होय पुसता ।
मार्ग रोधणें रामदूता । कवण्या अर्था त्वां केलें ॥ ३ ॥
हा इंद्रजितमंत्रवात । खिळोनि रोखिला मार्ग रोधित ।
तोही तुझा अंशभूत । म्हणे हनुमंत निवारीं ॥ ४ ॥
ऐकोनि हनुमंतवचन । मोकळें केलें मार्गरोधन ।
वायु वायूचें करी प्राशन । वानरगण उल्लासती ॥ ५ ॥
पुढें चालतां हर्षयुक्त । कालियनाग अपरिमित ।
सर्प उठिले अत्यद्भुत । स्वयें वमित महागरळा ॥ ६ ॥
हनुमान म्हणे सौमित्रा । गरुडास्त्रा नकुळास्त्रा ।
घालोनि पिपीलिकास्त्रा । सर्पा समग्रा निर्दळीं ॥ ७ ॥
लक्ष्मण शेष इत्थंभूत । सर्पसंहारा कळवळित ।
मज गमन करितां येथ । मार्गरोधार्थ कां केला ॥ ८ ॥
वंदून लक्ष्मणाचे चरण । सर्प सांगती आपण ।
आम्हांसी महामंत्री खिळून । मार्गरोधन करविले ॥ ९ ॥
ऐकोनि सर्पांचा वचनार्थ । श्रीरामनामाच्या गजरांत ।
खिळणीं पळाली चळीं कांपत । केलें निर्मुक्त महासर्प ॥ ११० ॥
कंकाळ वेताळ यांचे हनुमंताकडून निर्दाळन :
पुढें चालतां कपिपुंगव । कंकाळ वेताळ नग्न भैरव ।
झोटिंग पिशाच प्रेत सर्व । घेवोनि धांव छळों येती ॥ ११ ॥
शुकी मैळी महाकंकाळी । प्रेतउच्छिष्टचांडाळी ।
देवोनियां आरोळी । त्याही सकळी धांविन्नल्या ॥ १२ ॥
खाखाते खिखाते । कातिया त्रिशूळ घेवोनि हातें ।
अवघीं घागातें घुंघातें । आलीं समस्तें छळावया ॥ १३ ॥
येतां देखोनियां भूतें । उड्डाण केले हनुमंतें ।
कवळोनि मारितां समस्तें । शरणागतें तीं आलीं ॥ १४ ॥
सांगती इंद्रजित कपटराशी । कोणी न यावया यज्ञवाटासीं ।
मंत्रीं खिळोनि आम्हांसी । मार्गरोधासीं राखिलें ॥१५ ॥
ऐसी ऐकोनि त्यांची मात । त्यांसी तुष्टला हनुमंत ।
गर्जोनि श्रीरामनामावर्त । केला निर्मुक्त भूतसमूह ॥ १६ ॥
भूतें म्हणती हनुमंता । आम्हांसी आज्ञा देईं आतां ।
मारोनी राक्षसां समस्तां । विजयी सर्वथा होशील ॥ १७ ॥
हनुमंत म्हणे भूतांसी । सुखे राहवें स्वेच्छेसीं ।
आम्ही मारुं राक्षसांसी । तुम्ही प्रेतांसी भक्षावें ॥ १८ ॥
भूतें सांगती हनुमंतासी । गुप्त शस्त्रें भंवती आकाशीं ।
पुढारें जातां तुम्हांसी । ती सर्वांसी वधितील ॥ १९ ॥
ऐसें हनुमंतें ऐकतों । ज्या का शस्त्रास्त्रदेवता ।
ज्यांचेनि शस्त्रे करिती घाता । त्य समस्ता आकळिल्या ॥ १२० ॥
पुच्छें कवळोनि देवता । हनुंमतें करिता घाता ।
मारुं नको गा कपिनाथा । येती समस्ता काकुळती ॥ २१ ॥
इंद्रजित महाकपटमूर्ती । आम्हां खिलोनि मंत्रोक्तीं ।
आम्हांसी स्थापी मार्गरोधनार्थीं । दुःखभिभूत महादुःखी ॥ २२ ॥
ऐसें हनुमंतें ऐकतां । रामनामस्मरणावस्था ।
शस्त्रदेवता समस्ता । केल्या निर्मुक्त रामनामें ॥ २३ ॥
शस्त्रदेवता समस्ता । नमस्कारोनि हनुमंता ।
करोनि इंद्रजिताच्या घाता । यश सर्वथा पावाल ॥ २४ ॥
घेवोनियां वानरवीर । सवेग चालतां सौमित्र ।
पुढें निशाचारभार । अति दुर्धर देखिला ॥ २५ ॥
राक्षसेंद्रबलं दूरादपश्यन्व्यूह्य संस्थितम् ।
अथ तं समवस्थाप्य लक्ष्मणं रावणानुजः ॥२५॥
परेषामहितं वाक्यं स्वार्थसाधनमब्रवीत् ।
अस्यानीकस्य महतो भेदने यत लक्ष्मण ॥२६॥
राक्षसेंद्रसुतो ह्यत्र भिन्नदेहो भविष्यति ।
बिभीषणवचः श्रुत्वा संप्रहृष्टः स लक्ष्मणः ॥२७॥
राक्षसेषु महाभीमं शरबर्षमवर्षत ॥२८॥
नंतर राक्षससैन्याचे निर्दालन :
देखोनि राक्षसांचा भार । उल्लासला सौमित्र ।
बिभीषण येवोनि सत्वर । सांगे विचार संग्रामा ॥ २६ ॥
राक्षसभार दिसतो येथ । त्यामाजी इंद्रजित अति गुप्त ।
बिळामाजी होम करित । कर्म समाप्त करावया ॥ २७ ॥
त्याच्या कर्मा करावया घात । राक्षस निर्दळतां येथ ।
प्रगट होईल इंद्रजित । जाण निश्चित सौमित्रा ॥ २८ ॥
ऐकोनि बिभीषणउत्तर । उल्लासला वीर सौमित्र ।
सज्जोनियां चाप शर । राक्षसभार निर्दळित ॥ २९ ॥
रणीं खिळोनि वानर । मारिती राक्षसांचे भार ।
घोळसोनियां वानर । निशाचर भिडताती ॥ १३० ॥
ऋक्षाः शाखामृगाश्चैव वृक्षशैलशिलायुधाः ।
अभ्यधावन्त संहृष्टास्तदनीकं बिभित्सवः ॥२९॥
राक्षसाश्च शितैः शूलैरसिभिः पट्टिशैः शरैः ।
उद्यतैस्त्वरिताः सर्वे कपीनभिजिघांसवः ॥३०॥
ऋक्षवानरमुख्यैश्च महाकायैर्महाबलैः ।
राक्षसां युद्ध्यमानानां महद्भयमजायत ॥३१॥
रीस आणि वानरभार । शैला शिला साल तरुवर ।
करोनि राक्षसांसी मार । देती भुभुःकार रामनामें ॥ ३१ ॥
शूळ त्रिशूळ चाक शर । असि पट्टिश परिघ तोमर ।
शास्त्रास्त्रीं निशाचर । करिती मार वानरां ॥ ३२ ॥
गगनीं उसळोनि मर्कट । शस्त्रघात केले सुनाट ।
वानरीं वर्षोनि गिरिकूट । केलें सपाट राक्षसां ॥ ३३ ॥
लागतां पर्वताआघात । राक्षस पळाले समस्त ।
यक्षिणीवट केला निर्मुक्त । आले समस्त त्या ठायां ॥ ३४ ॥
यक्षिणीवट अति दुर्धर । देखतांचि भयंकर ।
सेंदुरें धगधगीत क्रूर । नरवानर भयभीत ॥ ३५ ॥
सहस्रयोजन शाखा थोर । ऐसिया शाखा अति अपार ।
घुघुशब्दें गर्जे घोर । वटविस्तार भयानक ॥ ३६ ॥
वटवृक्ष भयंकर । त्यातळीं गुप्त होमविवर ।
त्याहीमाजी इंद्रजित वीर । करी अभिचारहोमातें ॥ ३७ ॥
तेथें हिंडतां गोळांगूळ । लक्षेना तें होमबीळ ।
अति गुप्त वटंमूळ । वेडा सकळ लाविले ॥ ३८ ॥
येवोनियां बिभीषण । स्वयें पाहत आपण ।
लक्षेना तें होमस्थान । अवघे जण सचिंत ॥ ३९ ॥
होम न होतां समाप्त । आम्हीं प्रवेशावें तेथ ।
विवरद्वार नव्हे प्राप्त । वेडा समस्त लाविले ॥ १४० ॥
तेव्हां खवळला हनुमंत । वड उपडोनियां तेथ ।
शोधीन विवरद्वार गुप्त । तरी मी दूत रामाचा ॥ ४१ ॥
वनदेवतांचे हनुमंताला गुह्य कथन :
वनदेवता शस्त्रदेवता । ज्या हनुमंतें केल्या मुक्ता ।
त्याही येऊनि समस्ता । गुह्य हनुमंता सांगती ॥ ४२ ॥
यक्षवटींची यक्षिणी । मुख्य आमुची स्वामिनी ।
इंद्रजितानें करोनि खिळणी । विवररक्षणीं राखिलीसे ॥ ४३ ॥
तिसीं केलिया निर्मुक्त । विवरद्वार होईल प्राप्त ।
ऐसें ऐकतां हनुमंत । उल्लासित उसळला ॥ ४४ ॥
वटग्रीं खिळिली यक्षिणी । हनुमान तेथें गेला उडोनी ।
रामनामाच्या स्मरणीं । अर्धक्षणीं केली मुक्त ॥ ४५ ॥
मुक्ता होतांचि यक्षिणी । लागली हनुमंताच्या चरणीं ।
वटमूळासीं आणोनी । बीळ उघडोनी दाविलें ॥ ४६ ॥
उघडितां बिळद्वारा । रामनामाचा गजर ।
वानर करिती जयजयकार । हर्षें निर्भर अवघेही ॥ ४७ ॥
द्वार उघडितां यक्षिणींसीं । कपाट नुघडे तियेंसीं ।
शिणतां नाना युक्तींसीं । अलक्ष्य तिसीं लक्षेना ॥ ४८ ॥
इंद्रजितकपाटाच्या अर्गळा । वज्रार्गळा भुवार्गळा ।
देवोनि दुबंद्या सांखळा । अढळ शिळा लाविल्या ॥ ४९ ॥
कोणी न ये होमाप्रती । ऐसी करोनि निश्चिती ।
इंद्रजित बैसला होमाप्रती । जाण मारुती कपिराजा ॥ १५० ॥
कपाट उघडावया येथ । तुम्ही विचारा समस्त ।
ऐसे यक्षिणी सांगत । तंव हनुमंत क्षोभला ॥ ५१ ॥
कपाट उघडावया जाण । चिंताग्रस्त बिभीषण ।
चिंतावर्ती वानरगण । तंव लक्ष्मण खवळला ॥ ५२ ॥
विंधोनियां वज्रबाण । कपाट करीन शतचूर्ण ।
याचा संदेह तो कोण । चाप संपूर्ण सज्जिलें ॥ ५३ ॥
बाण लावितांचि शितीं । हनुमंतें धरिला हातीं ।
कपाट बापुडें तें किती । तुवां तें अर्थी न शिणावें ॥ ५४ ॥
हनुमंताच्या वज्रमुष्टीने कपाटाचे चूर्ण :
मी तंव घरगुती सेवक । पाहें माझें कवतुक ।
म्हणोनि दिधली हाक । लोकालोक दुमदुमिले ॥ ५५ ॥
दिग्गजांसीं बैसली टाळी । नक्षत्रें पडती भूतळीं ।
इंद्रजित दचके होमसमेंळीं । कपिआरोळी ऐकोनि ॥ ५६ ॥
कैसेनि आला रे मारुती । इंद्रजित पडला चिंतावर्ती ।
जपहोम न रुचे चित्तीं । पूर्णाहुती विसरला ॥ ५७ ॥
न होतां दुजियाचें आगमन । माझें दुश्चित झालें मन ।
होमसिद्धीसीं पडिलें विघ्न । विधिविधान नाठवे ॥ ५८ ॥
बहुत आवरणें बाहेरी । हनुमान येईल कैशापरी ।
म्हणोनि बैसें होमावरी । ध्यान निर्धारीं धरोनी ॥ ५९ ॥
येरीकडे हनुमंत । कपाट भेदून समर्थ ।
काळ खवळला कृतांत । करावया घात होमाचा ॥ १६० ॥
कपाटीं रोहोकोनियां दृष्टीं । वळोनियां वज्रमुष्टी ।
कपाट हाणितां जगजेठी । कडकडाटीं वट गर्जे ॥ ६१ ॥
इंद्रजित व अभिचार यज्ञाचे दर्शन :
घायें कपाटें केलीं पिष्ट । वज्रार्गळा शतकूट ।
शिळा सांखळ्या करोनि पीठ । यज्ञवाट देखिलें ॥ ६२ ॥
तया यज्ञवाटाआंत । होमधर्मीं व्यवस्थित ।
बैसला देखोनि इंद्रजित । ध्यानान्वित अभिचारें ॥ ६३ ॥
मनुष्यरक्तें अति विराजित । वस्त्रें नेसला आरक्त ।
रक्तचंदन मस्तकांत । माळा आरक्त सुमनांच्या ॥ ६४ ॥
प्रेतावरी विकटासन । मनुष्यरक्ताचें हवन ।
धूपदीप हुताशन । यजमानविघ्नसूचक ॥ ६५ ॥
मोकळें पडतां यज्ञद्वार । आला वानरांचा भार ।
रामनामाचा गजर । जयजयकार करीतचि ॥ ६६ ॥
बिभीषण आणि सौमित्र । वानरा वीरांचा भार ।
इंद्रजित देखिला महाक्रूर । होमतत्पर ध्यानस्थ ॥ ६७ ॥
सटवलीं तान्हीं बाळकें । होम करीं तेणें सिसाळें ।
काढोनियां अंत्रमाळें । पूजी कंकाळें कराळीं ॥ ६८ ॥
तान्ही बाळें आकळोनी । खिळुनीं आणिल्या बाळंतिणी ।
रजस्वला मातंगिणी । न्हाणिली परटिणी सवंदणीजळें ॥ ६९ ॥
कृष्णमेषाच्या दावणी । आणीक जीवांचियां श्रेणी ।
आणिल्या असती खिळोनी । अभिचारहवनीं होमावया ॥ १७० ॥
गर्जतां रामनामवाणी । पळालिया खिळणीपीळणी ।
सोडिल्या जिवश्रेणी । कृपा करोनी हनुमंतें ॥ ७१ ॥
बैसोनियां अति ध्यानस्थ । इंद्रजित एकाग्र होम करित ।
त्यासी उठवील हनुमंत । होम समाप्त न होतांचि ॥ ७२ ॥
उठवितां इंद्रजितवीर । त्यासीं भिडेल पैं सौमित्र ।
युद्ध होईल घोरांदर । अति दुर्धर संग्राम ॥ ७३ ॥
दोघे वीर विचक्षण । दोघे जण रणप्रवीण ।
एका जनार्दना शरण । रणविंदान अवधारा ॥ ७४ ॥
वदनीं वदतां श्रीरघुनाथ । श्रीराम चालवी कार्यार्थ ।
एका जनार्दनीं वचनार्थ । निजपरमार्थ श्रीरामें ॥ १७५ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
निकुंभिलाबिलप्रवेशनं नाम सप्तत्रिंशत्तमोsध्यायः ॥ ३७ ॥
ओव्या ॥ १७५ ॥ श्लोक ॥ ३१ ॥ एवं ॥ २०६ ॥