रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 42 MB (Official) द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 42

अध्याय 42

रावणाच्या रथाचा भंग

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

इंद्रजित वधाने रावणाचा क्रोध :

इंद्रजिताचा करोनि घात । सौ‍मित्र विजयान्वित ।
तें ऐकोनि लंकानाथ । दुःखाभिभूत अति दुःखी ॥ १ ॥
निकुंबळे विवराआंत । लक्ष्मणें जावोनि तेथ ।
केला इंद्रजिताचा घात । प्रधान सांगत लंकेशा ॥ २ ॥
लक्ष्मणा साह्य हनुमंत । प्रतापें रिघोनि विवरांत ।
बाहेर काढितां इंद्रजित । मेघपृष्ठपर्यत वाढला ॥ ३ ॥
इंद्रजित मेघपृष्ठीं गर्जत । लक्ष्मण नेवोनि स्वहस्तें तेथ ।
मेघनादाचा केला घात । साह्य हनुमंत सर्वार्थी ॥ ४ ॥
ऐकोनि इंद्रजिताचा घात । अरावण महामोहान्वित ।
सिंहासनातळीं मूर्च्छित । पडे अकस्मात विसंज्ञ ॥ ५ ॥
संज्ञा पावोनिया रावण । दहाही मुखीं करी शंखस्फुरण ।
दीर्घस्वरें करी रुदन । पुत्रनिधान अंतरलें ॥ ६ ॥
दुःखें गडबडां लोळे । केश सुटले मोकळे ।
अश्रुधारा स्रवती डोळे । लाळ गळे दशमुखी ॥ ७ ॥
पुत्रशोकें अति संतप्त । नेत्रद्वारा अश्रु स्रवत ।
क्रोधें गरगरां नेत्र भ्रमत । अवघे पळत अति धाकें ॥ ८ ॥
जिकडे जिकडे दृष्टि जाये । तिकडे आगी लागों पाहे ।
कोपें थरथरां कांपताहें । करावें काय स्मरेना ॥ ९ ॥
सवेंचि म्हणे इंद्रजिता । तुझ गेलिया रे आतां ।
मज नाहीं कोणी रक्षिता । दुःखावस्था विलपत ॥ १० ॥
शंखस्फुरणें फुटले ओंठ । रडतां सोकले दहाही कंठ ।
पुत्रशोकाचें यथेष्ट । दुःख अचाट रावणा ॥ ११ ॥
मग बोलिला गर्जोन । इंद्रजिताच सूड घेईन ।
रणीं मारीन रामलक्ष्मण । आंगवण पहा माझी ॥ १२ ॥
माझे मारिले थोर थोर । निधडे योद्धे महावीर ।
सखे बंधु लाडके कुमर । तेंचि दशशिर अनुवादे ॥ १३ ॥

महापार्श्वे विनिहते राक्षसे च महोचरे ।
निशाचरे महामात्ये विरुपाक्षे निपातिते ॥१॥
विश्रुतेषु च योथेषु कांदिग्भूतेषु सर्वशः ।
रावणः शोकसंतप्तः कार्यशेषमचिंतयत् ॥२॥
चिंतायित्वा नातिचिरं स्वसैन्यानि निवर्त्य च ।
सुतं संचोदयामास वाक्यं चेदमुवाच ह ॥३॥
निहतानाममात्यानां रुद्धस्य नगरस्य च ।
दुःखमेवापनेष्यामि हत्वा तौ रामलक्ष्मणौ ॥४॥

दुःखे वदे दशकंठ । माझे मारिले भट सुभट ।
बंधु मारिले अति बळिष्ठ । ज्येष्ठ कनिष्ठ निजकुमर ॥ १४ ॥
किती सोसूं दुःख दारुण । म्हणाल मारिले कोण कोण ।
ते मी सांगेन अवघे जाण । रणप्रवीण महायोद्धे ॥ १५ ॥
महापार्श्व महोदर जाण । निधडा मारिला कुंभकर्ण ।
प्रहस्त मारिला प्रधान । अकंपन महावीर ॥ १६ ॥
वज्रदंष्ट्र विरुपाक्ष । कुंभ निकुंभ धूम्राक्ष ।
अतिकाय त्रिशिरा मकराक्ष । वीर असंख्य मारिले ॥ १७ ॥
देवांतका नरांतका निःपात । ज्येष्ठ मारिला इंद्रजित ।
तेणें होऊं पाहे प्राणांत । लंकानाथ तळमळी ॥ १८ ॥
पुच्छ तुटल्या सापसुरळी । जळावेगळी मासोळी ।
तैसा रावण तळमळी । राक्षसकुळी निर्दाळितां ॥ १९ ॥
रणीं मारिले नेणों किती । उरली जे सैन्यसंपत्ती ।
धाकें पळाली दश दिशांप्रती । लंकापति अति दुःखी ॥ २० ॥
मिळोनियां रामलक्ष्मण । माझ्या सुहृदां केलें कंदन ।
त्या दोघांचा घेईन प्राण । गर्जें रावण आक्रोक्षे ॥ २१ ॥
सांडून सैन्याची आस । घालोनि संग्रामाची कांस ।
पाचारोनि सारथ्यास । सांगे लंकेश तें ऐका ॥ २२ ॥
मिळोनियां वानर नर । सुहृद मारिले समग्र ।
माझे रोधिलें असे नगर । निशाचर गांजोनी ॥ २३ ॥
त्या दोघांचा करावया अंत । स्वयें जातों संग्रामांत ।
शीघ्र सज्जोनि आणीं रथ । लंकानाथ अनुवादे ॥ २४ ॥

कर्मणोस्य हि तौ मूलं भ्रातरौ राघवावुभौ ।
ययोः प्रशाखाः सुग्रीवो हरयोऽन्ये च यूथपाः ॥५॥
फलपुष्पे जनकजा शिला धृष्टश्च मारुतिः ।
मूले हते हतं सर्वं तौ हनिष्यामि संयुगे ॥६॥

संग्रामवृक्षाचें मूळ जाण । मुख्य श्रीरामलक्ष्मण ।
सबळ दिंड तो सुग्रीव जाण । खांद्या संपूर्ण कपिमुख्य ॥ २५ ॥
योद्धे वानर शाखा सरळ । जनकजा ते पुष्पफळ ।
संग्राम वाढवी तें शीळ । जाण केवळ हनुमंता ॥ २६ ॥
लाहोनी हनुमंताचें बळ । संग्रामाचें बळशीळ ।
माझें निर्दळावया कुळ । द्वंद्वी केवळ हनुमंत ॥ २७ ॥
रामलक्ष्मणादि समस्त । उणें पडत जेथ जेथ ।
हनुमान साह्य होय तेथ । अटक कार्यार्थ साधुनी ॥ २८ ॥
आतां मी जावोनि आपण । रणीं मारीन रामलक्ष्मण ।
मूळ छेदिलिया जाण । अवघे जण निमतील ॥ २९ ॥
राम सौ‍मित्र निमाल्या पाठीं । हनुमान मरेल उठाउठीं ।
निमतील वानरांच्या कोटी । निर्वैर सृष्टी करीन ॥ ३० ॥
ऐसें बोलोनी रावण । रथीं बैसला आपण ।
अति क्रोधें क्रोधायमान । गडगर्जन करीतचि ॥ ३१ ॥

स दिशो दश घोषेण रथेन सहसा भृशम् ।
नादयन्‍राक्षसश्रेष्ठो राघवावभ्यवर्तत ॥७॥
स विस्फार्य महाचापं किरीटामृष्टकुंडलः ।
नाम संश्रावयामास जगर्ज च ननाद च ॥८॥
ते राक्षसेंद्र तं दृष्ट्वा वानरस्त्रस्तचेतस ।
शरणं शरणं जग्मुर्मनसा पुरुषोत्तम् ॥९॥
ततस्तं राघवो दृष्ट्वा रथस्थं पर्वतोपमम् ।
विधुन्वानं धनुर्घोरं व्यायतास्यमिवांतकम् ॥१०॥

रावणाचे रणांगणावर प्रयाण :

घडघडाट रथस्पंदें । दश दिशा कोंदल्या नादें ।
मी रावण येणें शब्दें । गर्जत ब्रीदें स्वयें आला ॥ ३२ ॥
मुकुट कुंडलें मेखळा । अंगदें कंकणें कंठमाळा ।
चाप सज्जोनि प्रबळाबळा । रथीं बैसला गडगर्जे ॥ ३३ ॥
ध्वज पताका छत्र चामर । कवची खड्गी धनुर्धर ।
संमुख लक्षोनि रामचंद्र । दशशिर् चालिला ॥ ३४ ॥
वानरसेनांचिया थाटी । बाणीं त्रासिल्या कोट्यनुकोटी ।
कपि पळोनि उठाउठी । रिघालें पाठीं श्रीरामाच्या ॥ ३५ ॥
वानर धाकत धापत । भेणें चळाचळां कांपत ।
अभय देवोनि रघुनाथ । पुढें लंकानाथ देखिला ॥ ३६ ॥
पाचारोनि बिभीषण । स्वयें पुसें रघुनंदन ।
माझे त्रासित वानरगण । येता कोण तो सांग ॥ ३७ ॥

आचक्षे महातेजा राघवाय बिभीषणः ।
दशग्रीवो महातेजा राजा वैश्रवणानुजः ॥११॥
भीमकर्मा महोत्साहो रावणो राक्षसाधिपः॥१२॥

माझे त्रासित वानर । कवची खड्गी धनुर्धर ।
कोण येतो निशाचर । सांग सत्वर बिभीषणा ॥ ३८ ॥
ऐसें पुसतां रघुनंदन । स्वयें सांगे बिभीषण ।
अति दुर्धर हा दशानन । राजा जाण लंकेचा ॥ ३९ ॥
इंद्रजिताचा झाला घात । पुत्रशोकें अति संतप्त ।
युद्धा आला लंकानाथ । करित प्राणांत वानरां ॥ ४० ॥
करावया निर्वाणरण । युद्धा आलासे रावण ।
त्यांचे करावया निर्दळण । सज्जीं बाण श्रीरामा ॥ ४१ ॥
ऐकोनि बिभीषणवचन । संतोषला रघुनंदन ।
निर्दळावया दशानन । धनुष्यबाण सज्जिलें ॥ ४२ ॥
संमुख लक्षोनि रावण । धनुष्यीं सज्जोनियां बाण ।
काय बोलिला रघुनंदन । सावधान अवधारा ॥ ४३ ॥
विंधोनियां दृढ बाण । घायें मारीन रावण ।
अभिषिंचीन बिभीषण । रणा संपूर्ण समाप्ती ॥ ४४ ॥
माझी दृष्टि पडलिया जाण । लंकेशाचे न वांचती प्राण ।
रणीं मारीन रावण । प्रतिज्ञा पूर्ण माझी ॥ ४५ ॥
आजचि रणसमाप्ती । रामराज्य त्रिजगतीं ।
करावया रघुपतीं । बाण शितीं सज्जिला ॥ ४६ ॥
बाण ओढोनि कानाडी । विंधित अति कडाडीं ।
रावण येत येतां तोडी । रणनिर्वडी साधूनी ॥ ४७ ॥

लक्ष्मण रावणाला सामोरा येतो :

बाण विंधितां रघुवीर । ती बाणीं छेदी दशशिर ।
तेणें क्षोभला सौ‍मित्र । चाप सत्वर सज्जिलें ॥ ४८ ॥
सौ‍मित्राचा चापशब्द । तेणें रावण झाला स्तब्ध ।
सैन्य सेनानी जाले मंद । भय सुबद्ध राक्षसां ॥ ४९ ॥
सौ‍मित्रे विंधितां शर । दणाणिला दशशिर ।
हदादले निशाचर । राक्षसभार खवळला ॥ ५० ॥
लागतां सौ‍मित्राचे बाण । रणीं क्षोभला रावण ।
संमुख देखोनि लक्ष्मण । काय आपण जल्पत ॥ ५१ ॥
घेतला इंद्रजिताचा प्राण । तूं तंव माझा द्वंद्वी पूर्ण ।
विंधोनियां निर्वाणबाण । तुज धाडीन यमलोका ॥ ५२ ॥
मारावया सौ‍मित्रा । रागें कांपत थरथरां ।
नेत्र भवंडी तो गरगरां । दांत करकरां खातसें ॥ ५३ ॥
त्यासी सौ‍मित्र म्हणत । बडबडसी कां खासी दांत ।
करुनि दाखवीं पुरुषार्थ । तूं लंकानाथ प्रतापी ॥ ५४ ॥
बडबड करावया जाण । बहु तोंडीं तोंडाळ दशानन ।
काहीं न दिसे आंगवण । रणीं रावण तूं नपुंसक ॥ ५५ ॥
माझे सुटलिया बाण । ससैन्य मारीन रावण ।
ऐसें बोलतां लक्ष्मण । दशानन खवळला ॥ ५६ ॥

संत्रस्यद्वानरानीकं शरवर्षैर्महाभुजः ।
रामोऽपि राक्षसश्रेष्ठं शरैरग्न्यर्कसन्निभैः ॥१३॥
ततः प्रवर्तते युद्धं रामरावणयोर्महत् ।
जीवितांतकरं घोरं परस्परवघौषिणोः ॥१४॥

रावण लक्ष्मण युद्ध :

संमुख लक्षूनि लक्ष्मण । रावणें विंधिले दुर्धर बाण ।
एक एक त्रिधा भेदून । सांडी लक्ष्मण लघुहस्तें ॥ ५७ ॥
त्रिधा छेदिले बाण संपूर्ण । तेणें क्षोभला दशानन ।
लक्ष्मणावरी आपण । कोटी कोटी बाण वर्षला ॥ ५८ ॥
लक्ष्मण निवारी जंव बाण । तंव विंधिला बिभीषण ।
सुग्रीव विंधोनियां जाण । वानरगण त्रासिले ॥ ५९ ॥
अग्न्यर्कतेजस्वी बाण । क्रोधें घेवोनि रावण ।
दशग्रीव गर्जोन । रघुनंदन विंधिला ॥ ६० ॥
येतां रावणाचे बाण । रामें सांडिले छेदून ।
ते काळीं अति निर्वाण । दोघांही रण मांडिलें ॥ ६१ ॥
दोघे वीर विचक्षण । येरयेरांचे घ्यावया प्राण ।
लघुलाघवें विंधिती बाण । हस्तविंदान दावूनी ॥ ६२ ॥

राघवो रावणं संख्ये रावणश्चापि राघवम् ।
अन्योन्यं विशिखैस्तीक्ष्णैः शरैरभिववर्षतुः ॥१५॥
चेरतुश्चरितं चित्रं मंडले सव्यदक्षिणे॥१६॥

राम रावणाचे युद्ध :

राम उठावला रावणावरी । रावण उठावला रामावरी ।
युद्ध मांडले जीवावरी । परस्परीं झगटले ॥ ६३ ॥
विचित्र मंडळें विचरत । लघुलाघवें बाण विंधित ।
येरयेरांचा करावया घात । रणीं उन्मत्त मातले ॥ ६४ ॥
रावण रणीं रणोन्मत्त । श्रीराम रणीं सावचित्त ।
दशशिराचा करावया घात । संधि पहात साटोपें ॥ ६५ ॥
श्रीरामाची निजगती । न पवे मनबुद्धि चित्तवृत्ती ।
रावण बापुडें तें किती । कैशा रीतीं पावेल ॥ ६६ ॥
पदाति राम रथी रावण । मंडळें करितां सव्यदक्षिण ।
रथेंसीं श्रमला दशानन । रघुनंदन नाटोपे ॥ ६७ ॥
रामरावणांचे शर । आच्छादिती दिनकर ।
रणीं पडिती अंधकार । येरां येर न देखती ॥ ६८ ॥
श्रीरामहस्तींची मुद्रिका । तिचेनि तेजें पैं देखा ।
श्रीरामा आणि दशमुखा । युद्धाचा आवांका संग्रामीं ॥ ६९ ॥
परस्परें घ्यावया प्राण । संधी पाहती दोघे जण ।
दोघे संग्रामी विचक्षण । रणप्रवीण धनुर्वाडे ॥ ७० ॥

उभौ च परमेष्वासावुभौ शस्त्रविशारदौ ।
उभौ शस्त्रभृतां श्रेष्ठावुभौ युद्धे न चेलतुः ॥१७॥
एकमेकेन बाणेन त्रिभिस्त्रीन्दशभिर्दश ।
व्यसृजच्छरवर्षाणि राघवो राक्षसेश्वरः ॥१८॥

दोघे धनुर्विद्यानिपुण । दोघे शस्त्रास्त्रप्रवीण।
शस्त्र प्रेरणनिवारण । दोघे जण जाणती ॥ ७१ ॥
एकें छेदिती एक बाण । तीन बाणीं तीन बाण ।
दाहीं छेदिती दहा बाण । दोघेजण लघुवेधी ॥ ७२ ॥
अदट दाटुगे वीर धीरें । चपळहस्तें बाणमारें ।
रणीं न सरती माघारें । दोघे गजरें गर्जोनी ॥ ७३ ॥
ऐसियामध्यें राजा रावण । दुर्धर सज्जोनियां बाण ।
लक्षोनियां रघुनंदन । विधी आपण साटोपें ॥ ७४ ॥
त्याचे निवारोनी बाण । रामें विंधिले शर दारुण ।
रथेंसहित रावण । नेला उडवोन आकाशा ॥ ७५ ॥
बाणपिसारियाचा वारा । रथ भोंवे गरगरां ।
रावणें निवारोनियां शरां । रहंवरा थांबविलें ॥ ७६ ॥
रामें विंधोनियां बाण । रणीं उडविला दसानन ।
तेणें खवळला रावण । अस्त्र निर्वाण सोडिलें ॥ ७७ ॥
रावण जपोनि संमत्र । अस्त्र प्रेरिलें आसुर ।
त्यापासून जीव क्रूर । अति दुर्धर चालिले ॥ ७८ ॥
वृक जंबुक सिंह व्याघ्र । काक कंक गीध घार ।
वडवा वरहा महाखर । सर्प विखार धुंधुवात ॥ ७९ ॥
नीळ नकुळ दंश कुक्कुट । क्रुर श्वापदांचें थाट ।
श्रीरामावरी अचाट । सोडी दशकंठ अस्त्रयोगें ॥ ८० ॥
मारावया रामाराणा । रावण क्रोधें काळियां जाणा ।
सर्पप्राय विंधी बाणां । आंगवण साटोपें ॥ ८१ ॥
असुरास्त्र महाघोर । येतां देखोनि अति क्रूर ।
अचुकसंधानी रामचंद्र । तेणें अग्निअस्त्र सज्जिलें ॥ ८२ ॥

आसुरेण समाविष्टः सोऽस्त्रेण युधि रावण ।
ससर्जास्त्रं महोत्साहः पावकं पावकोपमम् ॥१९॥
ते रावणशरा घोरा राघवास्त्रेण मोहिताः ।
विलयं जग्मुराकाशे विनिकृत्ताः सहस्रधा ॥२०॥

असुरास्त्र अति क्रूर । चालिले सिंह वृक व्याघ्र ।
रामें सोडून अग्निअस्त्र । केले समग्र भस्मांत ॥ ८३ ॥
अस्त्रें निवारोनि अस्त्र । निधडा योद्धा श्रीरामाचंद्र ।
तें देखोनि दशशिर । क्रोधे दुर्धर खवळला ॥ ८४ ॥

ततः संत्रस्तवक्त्रस्तु रावणो लोकरावणः ।
नाराचमालां रामस्य ललाटे प्रत्यमुंचत ॥२१॥
रौद्रचापप्रयुक्तां च नीलोत्पलमयीमिव ।
शिरसा धारयन्‍रामो न व्यथामध्यगच्छत ॥२२॥

माझें अस्त्र निजनिर्वाण । रामें सांडिलें छेदून ।
तेणें रावण अति दीन । म्लानवदन पैं झाला ॥ ८५ ॥
असुरास्त्र केलें वृथा । रणीं मारीन रघुनाथा ।
पांच बाण विंधिलें माथां । लघुलाघवता साटोपें ॥ ८६ ॥
येतां रावणाचे बाण । राम न करी निवारण ।
पाहूं पां याची आंगवण । दारुणपण बाणांचें ॥ ८७ ॥
कमळमाळा मनोहर । तैसे मस्तकीं शोभती शर ।
व्यथा न पवे श्रीरामचंद्र । निधडा वीर संग्रामा ॥ ८८ ॥
पुष्पप्राय लागले बाण । तेणें लाजला रावण ।
जळो माझी आंगवण । रघुनंदन ढळेना ॥ ८९ ॥
निर्वाणबाणाचा आघात । उघडा अंगी श्रीरामा साहत ।
माझा न चले पुरुषार्थ । चिंताक्रांत रावण ॥ ९० ॥
रावणाचे पांचही बाण । श्रीराममस्तकीं देखोन ।
सौ‍मित्र क्षोभला दारुण । धनुष्यबाण वाहिलें ॥ ९१ ॥

एतस्मिन्नंतरे क्रुद्धो राघवस्यानुजो बली ।
लक्ष्मणः सायकन्‍सप्त जग्राह परवीरहा ॥२३॥
तैः सायकैर्महायोगै रावणस्य महाद्युतेः ।
ध्वजं मनुष्यशीर्षं च तस्य चिच्छेद वीर्यवान् ॥२४॥
सारथेश्चैव बाणेन शिरो ज्वलितकुंडलम् ।
जहार लक्ष्मणः श्रीमान्नथादाशु पपात च ॥२५॥
कृष्यमाणं तु चिच्छेद धनुर्गजकरोपमम् ।
लक्ष्मणो राक्षसेंद्रस्य पंचभिः पंचपर्वभिः ॥२६॥
नीलमेघनिभांश्चास्य सदश्वान्पवनोपमान् ।
निजघान महावेगान्‍रावणस्य बिभीषणः ॥२७॥

लक्ष्मणाने रावणाचा रथ व सारथी मारिले :

धनुष्य वाहोनि लक्ष्मण । गुणीं लाविलें सात बाण ।
क्रोधें लक्षोनि रावण । विधी आपण साटोपें ॥ ९२ ॥
लक्ष्मणबाणांच्या कडाडीं । रावणा पडली झांपडी ।
काढों विसरला तो वेढी । चेतना वेडी होवोनि ठेली ॥ ९३ ॥
ध्वज नरशिरसमयुक्त । ब्रीद मिरवी लंकानाथ ।
तो छेदोनियां त्वरित । संग्रामांत पाडिला ॥ ९४ ॥
दुसरा येतांचि शर । मुकुट कुंडलें मनोहर ।
सारथ्याचें छेदोनि शिर । रणीं सत्वर पाडिले ॥ ९५ ॥
छत्र पताका झल्लरी । मुक्ताफळांच्या माळा थोरी ।
छेदोनि पाडिल्या धरेवरी । बाणाग्रीं सौ‍मित्रें ॥ ९६ ॥
लघुलाघवें लक्ष्मण । सव्यापसव्य विंधोनि बाण ।
रावणाचें धनुष्यबाण । रणीं छेदोन पाडिलें ॥ ९७ ॥
नीळमेघपडिपाडें । पवनवेगीं जोड्या जोडे ।
रावणरथाचे घोडे । मारिले रोकडे बिभीषणें ॥ ९८ ॥

बिभीषणाने रावणाचे घोडे मारिले :

बिभीषणें विंधोनि बाण । वारुवांचा घेतला प्राण ।
तेणें बंधुवरी रावण । काळरुपें पूर्ण क्षोभला ॥ ९९ ॥
जवळी असतां लक्ष्मण । करुं न शके आंगवण ।
कुसमुसूनि रावण । उगाच आपण राहिला ॥ १०० ॥
निधडा शूर लक्ष्मण । रणीं गांजोनियां रावण ।
विरथी करोनियां जाण । पायीं संपूर्ण पळविला ॥ १ ॥
विजयी झाला सौ‍मित्र । वानर करिती जयजयकार ।
रामनामाचा गज्र । नादें अंबर कोंदलें ॥ २ ॥
एका जनार्दना शरण । युद्ध झालें अति निर्वाण ।
रावनें मारितां बिभीषण । ते शक्ति लक्ष्मण साहेल ॥ ३ ॥
पुढील प्रसंगी स्वभावता । शक्तिभेदाची येईल कथा ।
एका जनार्दनीं सरता । अवधान श्रोतां मज द्यावें ॥ ४ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
रावणरथभंगापजयो नाम द्विचत्वारिंशोऽध्यायः ॥ ४२ ॥
ओव्या ॥ १०४ ॥ श्रोक ॥ २७ ॥ एवं १३१ ॥