अध्याय 45
अप्सरेचा उद्धार
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
ऐसें बोलतां हनुमंत । संतोषला श्रीरघुनाथ ।
स्वानंदसुखें डुल्लत । पाठी थापटित कपीची ॥ १ ॥
राघवः पुनरेवेदमुवाच पवनात्मजम् ।
त्वरं वीर त्वयावश्यमानेतव्या महौषधि ॥१॥
स्वस्ति तेऽस्तु महासत्व गच्छ यात्रां प्रसादतः ।
एवमुक्तस्तु रामेण सुग्रीवेणांगदेन च ॥२॥
सुवेलमभिसंरुह्य संपीड्याप्लुत्य वानरः ।
जगाम सत्वरं श्रीमानुपर्युपरि सागरे ॥३॥
श्रीरामांचा हनुमंताला आशीर्वाद व आज्ञा :
सवेंचि बोले रघुराजा । सवेग उठीं पवनात्मजा ।
शीघ्र करोनि यावें काजा । बंधुराजा उठवावें ॥ २ ॥
स्वस्थ असो तुझें चित्त । स्वस्थ असो जीवित ।
अंग प्रत्यंग समस्त । कपिनाथ निजविजयी ॥ ३ ॥
स्वस्ति असो तुजलागीं । कल्याण असो सर्वांगीं ।
सर्वदा विजयी जगीं । तनु सर्वांगीं सदृढ ॥ ४ ॥
हनुमंता होईं चिरजीवी । तेंही जीवित्व ज्ञानानुभवी ।
ज्ञानविज्ञानपदवी । तुझेनि व्हावी जगासी ॥ ५ ॥
आतां मी तुज देवों आशीर्वाद । तंव पूर्वीच तुझे बळ अगाध ।
प्रताप कीर्ति अति प्रसिद्ध । ऐक सावध सांगेन ॥ ६ ॥
बाळपणीं आकळिला भानु । तंव वज्रें इंद्रें हाणितला हनु ।
हनुमंत हे नामभिधानु । तैंपासुन तुज जालें ॥ ७ ॥
त्या रवीच्या धांवण्यासीं । आले लोकपाळ वेगेंसीं ।
ख्याति लाविली तयांसी । ऐक सावकाशीं ॥ ८ ॥
कुंठित जालें इंद्रवज्र । शिवाचा शूळ जाला चूर ।
वरुणाचे पाश समग्र चकचूर पैं जालें ॥ ९ ॥
तुज बाधी वरुणपाश । दुसरा आश्रमीं आश्रमपाश ।
तिसरा कर्माचा कर्मपाश । तुज वीरेशा बाधीना ॥ १० ॥
धर्मपाश ज्ञानपाश । अहंकाराचा अहंपाश ।
परब्रह्मींचा ब्रह्मपाश । तुज सहसा बाधीना ॥ ११ ॥
तेणें वरुणपाश ते किती । तुज बांधावया मारुती ।
यमाची तेथें कोण शक्ती । तुज निश्चितीं दंडावया ॥ १२ ॥
यम निंयता सकळ जगा । पदाभिमानें लगबगा ।
दंड घेवोनियां वेगा । तुज सवेगा दंडूं आला ॥ १३ ॥
त्या यमाचा यमदंड पाहीं । मोडून गेला तुझे देहीं ।
इतर बापुडीं कोण कायी । हनुमान पाहीं दंडावया ॥ १४ ॥
अग्नि वायु कुबेर चंद्र । सर्वही झाले किंकर ।
एवढा अदट साचार । हनुमान वीर तिहीं लोकीं ॥ १५ ॥
आपुलियाहो प्रतापशक्ती । लाहोनि सकळांची वरदोक्ती ।
वज्रदेही ऐसी ख्याती । त्रिजगतीं मिरविजे ॥ १६ ॥
कायसें माझें वरदान । आतुर्बळी वायुनंदन ।
वेगें करोनि उड्डाण । बंधुरत्न मज देई ॥ १७ ॥
हनुमंताचे उड्डाण व त्याचा परिणाम :
ऐसें बोलतां श्रीरामचंद्र । सकळ वानरांचे भार ।
ऐकोनी पिंजारिला कपीद्र । अति भ्यासुर भासत ॥ १८ ॥
पिंजारिल्या रोमावळी । दिसे विक्राळ दांताळी ।
मस्तक गेला नभोमंडळी । गोळांगुळीं आवेश ॥ १९ ॥
दोन्ही दिसती नेत्रगोळ । जैसे धगधगीत इंगळ ।
त्राहाटितां भूमीसीं लांगूळ । लोक सकळ भयभीत ॥ २० ॥
वळिला पुच्छाचा आंकोडा । लंघोनि सुवेळेचा कडा ।
राम स्मरोनि वेगाढा । केला गाढा भुभुःकार ॥ २१ ॥
ऐकोनि त्याचा भुभुःकार । दचके कैलासीं शंकर ।
ब्रह्मांड हडबडिलें थोर । घोरांदर मांडिलें ॥ २२ ॥
अकाळीं प्रळयो कायसा सृष्टीं । प्रळयरुद्र निमती दृष्टी ।
इंद्रादिक पडिले संकटीं । प्राण कंठीं दाटलें ॥ २३ ॥
कडे खचले सागरी । वृक्ष भ्रमती गगनांतरी ।
उड्डाण करितां कपिकेसरी । सुरांसुरीं आकांत ॥ २४ ॥
सप्त सागारां खळबळा । धरा जावूं पाहे रसातळा ।
आकांत जीवमात्रा सकळा । गोळांगुळाचेनि धाकें ॥ २५ ॥
करोनियां रामनामस्मरण । सवेग केलें उड्डाण ।
न लागतां अर्धक्षण । सागर संपूर्ण क्रमियेला ॥ २६ ॥
उपर्युपरी गगनांतरी । सत्यलोकपर्यत वरी ।
गेली उड्डाणाची थोरी । विक्रम भारी कपीचा ॥ २७ ॥
दिशा दुमदुमिल्या संपूर्ण । प्राणांतिक सकळ राक्षसगण ।
तें ऐकोनियां रावण । अति चिंता मन उपजवी ॥ २८ ॥
म्हणे गेलिया कपींद्र । आणील ओषधी समग्र ।
उठविल्या सौमित्र । श्रीरामचंद्र नाटोपे ॥ २९ ॥
हे तंव एकमेकांपरीस । वीर रणयोद्धे कर्कश ।
अवघे मिळाल्या युद्धास । मग आम्हांस प्राणांत ॥ ३० ॥
आतां काय करुं विचार । प्रधान मारिले समग्र ।
इंद्रजितादि अखया पुत्र । कुमरें कुमर मारिले ॥ ३१ ॥
रावणाला चिंता व कालनेमी राक्षसाला विनंती :
ऐसें चिंतितां रावणा । करुं विसरला भोजना ।
विसरला उदकपाना । अति चिंता मना पीडित ॥ ३२ ॥
निद्रा न लागे शेजेसीं । करीत असे उठीबैसी ।
तंव देखिलें काळनेमीसी । मग चरणासी लागला ॥ ३३ ॥
चारी मुखें सरती लाळा । दाढा विकट विकराळा ।
धगधगीत नेत्रगोळा । जैसे इंगळ खदिराचे ॥ ३४ ॥
जिव्हा मुखीं समसमित । अति दीर्घ चारी हात ।
केश नीळ कठिण तेथ । उभे दिसत शूळ जैसे ॥ ३५ ॥
अति तिखट दाढा चारी । मुख समान पर्वतदरी ।
खापराऐसा काळा शरीरीं । मुखें चारी समसमित ॥ ३६ ॥
वृक्ष रोंविले जैसे असती । तैसे हात पाय दिसती ।
भिंगुळवाणी शरीरकृती । देखतां भीती यम काळ ॥ ३७ ॥
अति भयानक शरीर । त्या प्रार्थीं दशशिर ।
तुवां जावोनि सत्वर । पर्वतेंद्र ठाकावा ॥ ३८ ॥
लवणादि सकळ समुद्र । कुशद्वीप समग्र ।
लांघोनियां क्षीरसमुद्र । पर्वतेंद्र ठाकावा ॥ ३९ ॥
तुज नभोवेगें गमन । म्हणोनि आलों तुज शरण ।
तेथें गेला कपिनंदन । त्यासीं विघ्न करावें ॥ ४० ॥
काळ्नेमी एक विनंती । लक्ष्मणा भेदलीसे शक्ती ।
उदया येतां गभस्ती । सौमित्र निश्चितीं मरेल ॥ ४१ ॥
यालगी वायुनंदन । करोनि सवेग उड्डाण ।
दिव्योषधी आणोन । स्वयें लक्ष्मण उठवील ॥ ४२ ॥
उदया न येतां गभस्ती । आणोनि ओषधी समस्ती ।
वांचवावया निश्चितीं । प्रतिज्ञा मारुति करुन गेला ॥ ४३ ॥
तत्काळ ओषधी आणोन । आतांचि उठेल लक्ष्मण ।
मग त्यासीं जुंझेल कोण । रामलक्ष्मण आतुर्बळी ॥ ४४ ॥
अति बळिया हा वायुनंदन । कळिकाळा नाटोपे जाण ।
बलिष्ठ सकळ वानरगण । त्यांसीं कोण जुंझेल ॥ ४५ ॥
कपटेंकरुन ब्रह्मशक्ती । आकळिलाहे ऊर्मिलापती ।
तंव कार्य साधावें हातोहातीं । उदया गभस्ती न येतां ॥ ४६ ॥
चंद्रामृतें सदा पूर्ण । चंद्राचल म्हणती म्हणोन ।
एरवीं तो द्रोणाद्री जाण । नामभिधान विख्यात ॥ ४७ ॥
रुपा आले चंद्रामृत । अमृतसंजीवनी त्यांसी म्हणत ।
ओषधी ऐशा अनंत । पर्वती ॥ ४८ ॥
तेथें गेला कपिनंदन । बहु माया करोनि आपण ।
त्यासीं करावें विघ्न । सूर्योदयो जंव न होय ॥ ४९ ॥
तेंही मायेचें लक्षण । जटाधारी वल्कलाभरण ।
सर्वांगी भस्मोधद्धूळण । असाधारण ऋषिवेष ॥ ५० ॥
तापसवेष धरोन पूर्ण । करावा आश्रम निर्माण ।
गोंवावया कपिनंदन । माया आपण करावी ॥ ५१ ॥
सुपक्व फळें सुशीतळ जळ । सुंदर वृक्ष सुपरिमळ ।
आपण धरावें अति सुशीळ । गोळांगूळ विगुंतवावया ॥ ५२ ॥
निष्ठा दावावी ब्रह्मज्ञान । कथेंसीं वर्णावा रघुनंदन ।
तेणें त्यासीं सुख गहन । कपिनंदन विगुंते ॥ ५३ ॥
अतिथ्य करावें हनुमंता । सुरस सांगावी रामकथा ।
जेणें गुंती पडे कपिनाथा । तें तें सर्वथा करावें ॥ ५४ ॥
तेथें महाशूर राक्षसी । प्राणीमात्रा सगळें ग्रासी ।
आपण युक्ति साधावी ऐसी । जे कपींद्रासी ते गिळी ॥ ५५ ॥
ओषधी समीप सविस्तर । जळें संपूर्ण सरोवर ।
सुंदर कमळीं मनोहर । तेथें कपीद्र गोंवावा ॥ ५६ ॥
तत्र त्वया प्रहंतव्य उपायेन प्लवंगमः ।
हनूमति विनष्टे तु लक्ष्मणो न भविष्यति ॥४॥
लक्ष्मणस्य विनाशेन रोमो वै नभविष्यति ।
रामस्य च विनाशेन सुग्रीवो नभविष्यति ॥५॥
सुग्रीवस्य विनाशेन ह्यंगदो नभविष्यति ।
अंगदस्य विनाशेन क्षयं यास्यंति वानरांः ॥६॥
ध्रुवमस्य जयो वीर गच्छ शीघ्रं महाबल ।
अर्धराज्यं प्रदास्यामि कृते कर्मणि राक्षस ॥७॥
गमन करोनि शीघ्रगती । सर्व प्रकारें असे शक्ती ।
तेणें मरण पावे मारुती । ते ते युक्ती साधावी ॥ ५७ ॥
मी तुज सांगो कपटगती । तंव तूं केवळ कपटमूर्तीं ।
तेथें माझी काय युक्ती । सर्वथा । दोघां मृत्य त्याचेनि ॥ ५९ ॥
मरण पावल्या रघुनंदन । कैसेनि वांचेल बिभीषण ।
सुग्रीवही सांडील प्राण । अर्ध क्षण न लागतां ॥ ६० ॥
नळ नीळ जांबवंत । जुत्पती मरतील समस्त ।
एवढा साधेल कार्याअर्थ । जरी हनुमंत मारिला ॥ ६१ ॥
म्हणोनि धरिले दोनी चरण । देईन अर्ध राज्य जाण ।
चिंतासागरीं बुडतां पूर्ण । तारूं आपण स्वयें व्हावें ॥ ६२ ॥
मग ग्लानि भाकी बहुता । पडे चरणांवरी मागुता ।
मज होतसे प्रांणात अवस्था । जीवदाता तूं होई ॥ ६३ ॥
कालनेमीचे अनिच्छेने प्रयाण :
ऐसें ऐकतांचि उत्तर । दचकला राक्षसवीर ।
हृदयीं खोचिला दुर्धर । कपटप्रकार भला नव्हे ॥ ६४ ॥
कपट करितां हिरण्यकशिपु । खंडविखंड केली वपु ।
तेथें आमचा कोण प्रतापु । रुद्ररुप जिंकावया ॥ ६५ ॥
कपत साधिलें अमरेंद्रें । भगीं व्यापिलें शरीरें ।
कपट साधिलें चंद्रें । क्षयरोगें थोर व्यापिला ॥ ६६ ॥
खाऊन जेवून घर घेणें । ऐसें मांडिलें सहस्रार्जुनें ।
सांडून हस्तपाद छेदणें । शेखीं प्राणें निमाला ॥ ६७ ॥
येणें रावणें जाण । सांडोनिया राजचिन्ह ।
भीक मागों गेला आपण । सीते कोरान्न देयीं माते ॥ ६८ ॥
माता म्हणे जियेसी । भोगूं पाहे तियेसी ।
कपटें मेळविलें धुळीसी । सपुत्रसैन्येंसीं मारविलें ॥ ६९ ॥
इतरांची गति कायसी । कपटें नाडिलें देवांसीं ।
ईश्वरत्व सांडोनि मानसीं । स्वयें भिकेसी लागला ॥ ७० ॥
आपण होवोनियां रंक । बळीसी मागों लागला भीक ।
तेणें द्वारपाळ केला देख । पुराणें असंख्य बोलती ॥ ७१ ॥
यालागीं कपटाची वार्ता । भली नव्हे गा सर्वथा ।
कपट करितां कपिनाथा । स्वघातासी करावें ॥ ७२ ॥
श्रीरामाचे निजभक्त । त्यांसीं कोणी कपत करित ।
ते स्वयेंचि मरण पावत । नरक भोगित अनिवार ॥ ७३ ॥
हनुमान श्रीरामाचा किंकर । श्रीरामभजनीं अति तत्पर ।
त्यासीं कपट करी जो नर । त्याचें शरीर वांचेना ॥ ७४ ॥
ऐसें जाणतों मी आपण । स्वयें सांगतसें रावण ।
कपीसी जें विघ्नकरण । तें मजचि मरण ओढवलें ॥ ७५ ॥
पायां पडोनि रावणें । अर्ध राज्य देईन म्हणे ।
मज निमालिया प्राणें । राज्य कोणें भोगावें ॥ ७६ ॥
आतां न वचतां राहों येथें । तरी रावणचि करील घाते ।
तयापरिस हनुमंतें । होय आम्हांते हित कांही ॥ ७७ ॥
हनुमान सबाह्य श्रीरघुनाथ । श्रीरामप्रेमें सदा डुल्लत ।
होतां त्याचेनि हातें घात । कृतकृतार्थ मी जालों ॥ ७८ ॥
ऐसें विचारोनि मनीं । मान देत रावणवचनीं ।
तुझी आज्ञा उल्लंघोनी । सामर्थ्य जनीं असेना ॥ ७९ ॥
ऐसा कोण आहे थोर । जो उल्लंघूं शके तुझें उत्तर ।
वेगें करोनि नमस्कार । निशाचर उसळला ॥ ८० ॥
पर्वता पावे जंव मारुती । तंव आपण गेला शीघ्रगती ।
माया केली अति निगुतीं । तेही निश्चितीं परिसावी ॥ ८१ ॥
एवमुक्तं तु तद्रक्षः प्रणिपत्य दशाननम् ।
मनोजवेन वेगेन संप्राप्तश्चंद्रपर्वतम् ॥८॥
तस्पिन्पर्वतपार्श्वे तु सोऽकार्षीन्माययाश्रमम् ।
अग्निहोत्रेण दिव्येन सोपवासकृशोदरः ॥९॥
जटामुकुतभारेण चीरवल्कसंवृतः ।
दीर्घमश्रुधरो भूत्वा तस्थौ जपपरायणः ॥१०॥
गृह्याक्षमालां हस्तेन तस्यागमनकांक्षया ॥११॥
कालनेमीची माया निर्मिती व हनुमंताची मार्गप्रतिक्षा :
तेथे जावोनी रक्षोगण । केला आश्रम निर्माण ।
फळें जळें संपूर्ण । वृक्षारोपण अति रम्य ॥ ८२ ॥
आपण घेवोनि अग्निहोत्र । तापसवेषें निशाचर ।
दिसे उपवासी निरंतर । गेलें उदर खपाटीं ॥ ८३ ॥
माथां जटांचा संभार । परिधान त्यासी वल्कलांबर ।
वक्त्रईं वाढले श्मश्रु फार । अदि विचित्र भासती ॥ ८४ ॥
काखबळ हात । लिंग बुडालें केशांआंत ।
वानप्रस्थरुप तेथ । जप करीत एकाग्र ॥ ८५ ॥
हातीं घेवोनि जपमाळी । बुबुळें नेलीं भंवयातळीं ।
जैसी खेचरी मुद्रा लाविली । तैसी शैली दिसताहे ॥ ८६ ॥
घालोनियां वज्रासन । करोनियां एकाग्रमन ।
बकवत्धरोनि ध्यान । पाहे आगमन कपीचें ॥ ८७ ॥
उदकामाजी असे बक । जैसा कोणी सात्विक ।
जळवासी पुण्यश्लोक । ऐसा देख दिसतसे ॥ ८८ ॥
मत्स्य आलिया दृष्टीतळीं । गटकावोनि सगळा गिळी ।
तेंवी राक्षस कपटमेळीं । कपिआगमन शैली पाहतसे ॥ ८९ ॥
हनुमंताचे आगमन व दिशाभूल :
तंव दक्षिणदिशेच्या भागीं । जैसी मूस ओतिली आगी ।
कीं नक्षत्रांचा पुंज स्वर्गी । दिसे वेगीं धांवत ॥ ९० ॥
कीं बाळसूर्य उदया आला । तैसा येतसे दादुला ।
नातरी शेषफणाहूनि निष्टला । मणि निघाला चरावया ॥ ९१ ॥
ऐसें उड्डाण कपिनाथा । आलें पर्वताचे माथां ।
देखतां आकांत राक्षसचित्ता । धीर सर्वथा न धरवे ॥ ९२ ॥
डोळां पडली झांपडी । हातां वळली वेंगडी ।
पडली मनाची मुरकुंडी । नावेक भवंडी त्यासी आली ॥ ९३ ॥
मग सावध होवोनि पाही । विचारोनि आपलेच देहीं ।
म्हणे मज आलें कायी । आठव नाहीं कार्याची ॥ ९४ ॥
सकळ जन्माचें निजसार । मज जोडों आलें साचार ।
आणि मी दुश्चिंत पामर । स्वहितविचार नाठवे ॥ ९५ ॥
म्यां स्वामिकार्य साधावें येथें । कीं मुक्त व्हावें कपिहस्तें ।
तें विसरोनि निजकार्यातें । मूर्च्छितचित्तें पडिलों असें ॥ ९६ ॥
ऐसे विचारोनि मनीं । स्वस्थ बैसला आसनीं ।
कपीनें देखिला दुरोनी । मग धांवोनी तेथ आला ॥ ९७ ॥
दुरोनी देखिला तापस । हर्षित कपीचें मानस ।
भरला सर्वांगीं उल्लास । ऋषिनमनास तेथ आला ॥ ९८ ॥
हनुमान श्रीरामकिंकर । रामरुप चराचर ।
देखे सर्वदा साचार । प्रेमा थोर श्रीरामी ॥ ९९ ॥
ज्यासी जैसी अंतर्वत्ती । ते जगातें तैसेचि देखती ।
तेही विषयींची उपपत्ती । श्लोकसंपत्ती परिसावी ॥ १०० ॥
सज्जनाचें मुख्य लक्षण । ब्रह्मस्वरुप स्वयें आपण ।
जग देखणें ब्रह्मपूर्ण । कपटचिन्ह तो नेणे ॥ १ ॥
नारायणमयं धीराः पश्यंति परमार्थिनः ।
जगद्धनमयं लुब्धाः कामुका कामिनीमयम् ॥१२॥
जिणोनियां काम क्रोध । दमूनि इंद्रियाचें द्वंद्व ।
खणोनि विषयाचा कंद । परमानंद पावले ॥ २ ॥
त्यासी दृश्य द्रष्टा दर्शन । ध्येय ध्याता आणि ध्यान ।
ज्ञेय ज्ञाता आणि ज्ञान । अवघें चिद्धन भासत ॥ ३ ॥
हें सज्जनाचें लक्षण । लुब्ध जे कां वित्तेषण ।
सांगो त्यांचेही चिन्ह । सावधान अवधारा ॥ ४ ॥
द्रव्यलाभ देखे ज्यापासीं । सदा ओळखे तयासी ।
अणुमात्रा नुल्लंघी वचनासी । म्हणे सर्वस्वेंसीं मी दास तुझा ॥ ५ ॥
देखे धनवंत वेव्हारें । सौजन्य त्यासीं अत्यादरे ।
विरक्त देखोनि एकसरें । स्वयें दातारें बैसवी ॥ ६ ॥
म्हणे भगवंताची कोण सत्ता । सिद्ध ईश्वरदत्तभोग असतां ।
सांडून धरली तपासता । अभाग्यता केवढी पां ॥ ७ ॥
वितैषणाचा जो नर । त्याचा ऐसा विचार ।
आतां कामातुर जो नर । संक्षेपाकार सांगेन ॥ ८ ॥
स्त्रीकाम ज्यांचे चित्तीं । मायबहिणींतें नोळखती ।
स्त्रीरुप झाली वृत्ती । जग देखती स्त्रीरुप ॥ ९ ॥
बापां भावासी सांगतां गोष्टी । मायबहिणींचा विकल्प पोटीं ।
इतरांची कायसी गोष्टी । सकळ सृष्टीमाझारी ॥ ११० ॥
हनुमान साधुरत्न अगाध । साधुरत्ने अद्वैतबोध ।
नेणे राक्षसाचें कपट भेद । साधुत्वें शुद्ध नमूं आला ॥ ११ ॥
दिव्याश्रम मनोरम । देखोनियां महोत्तम ।
नमन करितां प्लवंगम । अति सप्रेम हरिरंगें ॥ १२ ॥
येरु स्वकार्या अति कुशळ । आला देखोनि गोळांगुळ ।
घातलें लोटांगण प्रबळ । चरणकमळवंदना ॥ १३ ॥
हनुमंताचे स्वागत :
बैसों घातलें वरासन । आणिलें चरणक्षाळणा जीवन ।
अर्घ्यपाद्यादि संपादन । पूजाविधान मांडिलें ॥ १४ ॥
नम्र होवोनि अत्यंत । चरण चुरावया धांवत ।
आणिलीं फळमूळें समस्त । कपीसीं आतिथ्य मांडिलें ॥ १५ ॥
स्वामी अंगीकारावें फळमूळ । प्राशन करावें शीतळ जळ ।
मार्गीं शिणलेती बहुळ। स्वेदकल्लोळ सर्वांगीं ॥ १६ ॥
दिसतोसी जैसा रामदूत । वानरतनुगृहीत ।
कोण कार्या त्वरित । तुम्हीं येथ येणें केलें ॥ १७ ॥
म्हणाल तूं काय जाणसी । मज भेटी झाली बहुत ऋषींसीं ।
त्याहीं सांगितलें वार्तेसी । ऐक तुजपासीं सांगेन ॥ १८ ॥
रामलक्ष्मण बंधु दोघे । पितृवचनेंसीं निघती वेगें ।
क्रमोनियां मही स्वांगें । वना वेगें पैं आले ॥ १९ ॥
त्यांचा पुरुषार्थ अत्यद्भुत । परिसंता तो कपिनाथ ।
आवडी उठली बहुत । अनुच्चारित परिसावया ॥ १२० ॥
स्वयंवरीं भांगिलें हरकोंदंड । रावणाचें काळें तोंड ।
झाडिलें भार्गवाचें बळबंड । यश प्रचंड घेतलें ॥ २१ ॥
सीतेसमवेत दोगे जण । वना निघाले आपण ।
मारोनि राक्षस दारुण । वाळीही जाण मारिला ॥ २२ ॥
राज्य सुग्रीवा दिधलें । वानरसैन्य आपैसें केलें ।
तें वानरतनुज देखिलें । म्हणोनि पुसिलें उत्तर ॥ २३ ॥
स्वागत असो गा तुज । सनाथ करावें मज ।
जरी देखसी अधिकार ओज । जीवीचें गुज तुज सांगों ॥ २४ ॥
स्वागतेनार्थयित्वा च सोऽब्रवीत्वं क्व चागतः ।
विश्रमस्व कपिश्रेष्ठ भुक्त्वा पीत्वा च गम्यताम् ॥१३॥
तस्य तद्वचनं श्रुत्वा हनूमान्वाक्यमब्रवीत् ।
श्रुता चेद्यपि किष्किंधा वानराणां महापुरी ॥१४॥
सुग्रीवो यत्र वसति वानरेंद्रो महाबलः ।
तस्य मित्रं महाराजो रामो दशरथात्मजः ॥१५॥
तस्य भार्या जनस्थाने हृता सीतेति विश्रूता ।
मायाविना राक्षसेन रावणेन दुरात्मना ॥१६॥
तन्निमितं च लंकायां युद्धमासत्सिदारुणम् ।
तस्य भ्राता राघवस्य लक्ष्मणो नाम वीर्यवान् ॥१७॥
शक्त्यासौ ताडितो विप्र विसंज्ञो मेदिनीं गतः ।
तस्यर्थमिह संप्राप्त ओषधिं प्रति तापस ॥१८॥
रामचरित्र – श्रवणाने हनुमंताला विश्वास वाटला :
श्रीरामाची निजकथा । तापसमुखें ऐकतां ।
उल्लास झाला कपिनाथा । देखोनि सादरता वानरीं ॥ २५ ॥
श्रीराम असतां जनस्थानी । रावण कपटरुपें येवोनी ।
शून्याश्रम देखोनी । श्रीरामपत्नी चोरिली ॥ २६ ॥
ते सीतेच्या धांवण्यासीं । श्रीराम निघे वेगेंसीं ।
मार्गी आडवे होतां राक्षसांसी । श्रीरामें त्यांसी मारिलें ॥ २७ ॥
वाळीनें पीडून सुग्रीवासी । हरिलें स्त्री आणि राज्यासी ।
रामें मारोनि त्यासी । सुग्रीवासी स्थापिलें ॥ २८ ॥
सुग्रीवराजा महावीर । सकळ वानरांचे भार ।
झाले श्रीरामाचे किंकर । बुद्धोपकार होऊनी ॥ २९ ॥
दोघां पडिलें अति सख्य । समुद्रीं शिळा बांधिल्या देख ।
न लागतां निमिष एक । लंकासंमुख येते झाले ॥ १३० ॥
युद्ध झालें घोरांदर । रावणप्रधानादि कुमर ।
मारिलें सैन्य जुंझार । मारिले समग्र एक एक ॥ ३१ ॥
दुःखें खवळला रावण । घेवोनि ब्रह्मशक्ति आपण ।
हृदय सौमित्राचें लक्षून । शक्ति दारुण हाणितली ॥ ३२ ॥
शक्ति भेदून हृदयासीं । निघोनि गेली भूमीसीं ।
अति विकळता सौमित्रासी । पडिला क्षितीं निचेष्टित ॥ ३४ ॥
वांचवावया सौमित्रासी । नेवों आलों ओषधींसी ।
सूर्य न ये पां उदयासीं । मज त्वरेसीं जाणे असे ॥ ३५ ॥
सांगितलें सकळ वृत्त । तूं तपस्तेजें अति विख्यात ।
जाणोनी माझे मनोगत । शीग्र कार्यार्थ साधावा ॥ ३५ ॥
विलंब न करावा सर्वथा । ओषधी सांगाव्या समस्ता ।
भास्कार उदया न येतां । मज तत्वतां जाणें असे ॥ ३६ ॥
पानीयं पातुमिच्छामि शीघ्र भावय तस्य मे ।
येन तृप्तिं गमिष्यामि तत्कुरुष्व महातप ॥१९॥
तव दर्शनें मुनिवरा । सुखानुकोटी मज कपींद्रा ।
करुं पाहसी पाहुणेरा । निरोप सत्वरा मज द्यावा ॥ ३७ ॥
सेवितां सज्जनगृहींचे उदक । अंतर पुनीत होय देख ।
प्राप्त होय जरी अन्नादिक । ब्रह्मसुख देख तो पावे ॥ ३८ ॥
याचयेच्छ्रोत्रियस्यान्नं तदभावे पिबेज्जलम् ॥२०॥
सज्जनाचे घरचे अन्न । घ्यावें बळेंचि मागोन ।
नाहीं तरी आपण । जीवन तरी मागावें ॥ ३९ ॥
आलियाही ब्रह्मादिक । सज्जनान्न न पवती देख ।
हें घडलें गा प्रत्यक्ष । गोपाळ सकळ काला करिती ॥ १४० ॥
म्हणोनि घ्यावें फळमूळांसी । तरी मी आलों रामकार्यासी ।
न जातां स्वामिकार्य सिद्धीसीं । सर्वधा आहारासी न सेवूं ॥ ४१ ॥
सांडून स्वामिकार्यार्था । जो पुढें घालील उदरचिंता ।
तो महापापी तत्वतां । अधःपाता जाय वेगीं ॥ ४२ ॥
यालागीं स्वामिकार्य न होतां पूर्ण । न करीं फळमूळभोजन ।
तुझिया आदरालागीं जाण । उदकपान करीन ॥ ४३ ॥
तस्य तद्वचनं श्रुत्वा रक्षो वचनमब्रवीत् ।
श्रुयतां वचनं सत्यं त्वया मे वानराधिप ॥२१॥
इदं महत्सरो दिव्यं पानीयं पातुमर्हसि॥२२॥
हनुमंताला सरोवराकाठी पाण्यासाठी पाठविले :
ऐकोनि कपीच्या वचनासी । राक्षस सुखावला मानसीं ।
अनायासें पावेल मृत्यूसी । सरोवर उदकासी प्राशितां ॥ ४४ ॥
ऐसा निश्चय मानूनि पूर्ण । बोले कपीसी वचन ।
स्वामिकार्य न होतां जाण । आग्रह आपण करुं नये ॥ ४५ ॥
आश्रमासमीप सरोवर । अत्यंत पवित्र तेथींचें नीर ।
पान करितां अल्पमात्र । ओषधी समग्र देखसी ॥ ४६ ॥
हनुमान अत्यंत विश्वासी । कपट सर्वथा नाही मानसीं ।
मानिलें त्याचिया वचनासी । निजमानसीं कपिनाथें ॥ ४७ ॥
साधुवचनीं विकल्प करीं । तो नर महादुराचारी ।
यश न पावे तो संसारीं । चराचरीं अति निद्य ॥ ४८ ॥
ऐसा निश्चय पूर्ण । मानोनि ऋषीचें वचन ।
मग दृष्टीं सरोवर लक्षून । उदकपान करुं आला ॥ ४९ ॥
पिबतस्तस्य पानीयं पद्मपत्रपुटेन तु ।
उदकाभ्यंतरे ग्राही पादं जग्राह दक्षिणम् ॥२३॥
ततस्तां स महाबाहुर्हनुमान्मारुतात्मजः ।
जले नयंतीं दृष्ट्वा तु नखैस्तीक्ष्णैर्व्यदारयत् ॥२४॥
निहता तत्क्षणे दिव्या आकाशेधिष्ठिताब्रवीत् ॥२५॥
हनुमंताच्या लत्ताप्रहाराने मगरीचा वध :
उदकपान हनुमंत । करावया उदकाआंत ।
रिघतांचि पाहीं तेथ । पायीं त्वरित धरियेला ॥ १५० ॥
ब्रह्मशापें सबळ ग्राही । हनुमान धरिला दक्षिण पायीं ।
येरु निधडा वीर पाहीं । भय नाहीं कोणाचें ॥ ५१ ॥
स्वभावें निधडा वीर । त्यावरी श्रीरामाचा किंकर ।
दमूं शके काळचक्र । ग्रह किंकर काय त्यापुढें ॥ ५२ ॥
करोनि श्रीरामनामें भुभुःकार । पाय आंसुडितां सत्वर ।
कडे पडली वेगवत्तर । दिव्य शरीर लाधली ॥ ५३ ॥
कपटें करोनि सर्वथा । श्रीरामभक्ताचे पाय धरितां ।
कळिकाळातें हाणोनि लाता । शापनिर्मुक्तता सत्संगें ॥ ५४ ॥
दंडकसुत उद्धत झाला । शापें राक्षसत्व पावला ।
तो अंगदथापा हाणितला । तत्काळ केला निर्मुक्त ॥ ५५ ॥
दक्षशाप नारदासी । दोन मुहूर्त स्थिर न राहसी ।
तो द्वारके राहे वर्षानुवर्षीं । सत्संगासीं शाप न बाधे ॥ ५६ ॥
जळचर ग्राही शापदग्ध । लागतां हनुमंताचें पद ।
नखाग्रें झाली शुद्ध । सुख अगाध संतचरणीं ॥ ५७ ॥
लागतां कपीचें नखाग्र । सांडिलें शापजन्य शरीर ।
लाहोनि अवयव सुंदर । गगना सत्वर उसळली ॥ ५८ ॥
अंतरिक्ष गगनांतरीं । राहूनि बोलत सुंदरी ।
विजयी होईं कपिकेसरी । निरंतरीं रामप्रेमें ॥ ५९ ॥
मां विजानीह्यप्सरसं विद्युन्मालेति विश्रुताम् ।
गच्छंत्याकाशमार्गेण स्वर्भानोर्दीप्तविग्रहा ॥२६॥
इह मे वसतिर्भद्र वर्षाणामयुतं शतम् ।
उक्ता च तेन ऋषिणा दीप्तक्रोधेन मानद ॥२७॥
अवज्ञातो मया शक्रस्तेनाहं पतिता भुवि ।
गच्छ ग्राही भवस्वेति शप्ताहं तेन वानर ॥२८॥
यदा वीरं हनूमंतं गृहीष्यसि जलेचरा ।
तदा शापाद्विमोक्षस्ते भविष्यति न संशयः ॥२९॥
दिष्ट्या त्वमिह संप्राप्तः शापाच्चैव विमोक्षिता ॥३०॥
अप्सरेचे शापमुक्ती कथन व हनुमंताचे अभिनंदन :
कर जोडोनियां वंदन । करोनी विनवी हनुमान ।
मी विद्युन्मालिनी अप्सरा जाण । स्वर्गभूषण स्वर्गींचें ॥ १६० ॥
सूर्यप्रभेसम विमान । करोनी विचरतां गगन ।
भास्करें क्षोभोनियां जाण । ऋषिआश्रमीं विमान पाडिलें ॥ ६१ ॥
तेणें क्षोभले मुनीश्वर । क्रोधा चढले दुर्धर ।
न विचारिसी पात्रापात्र । कामाचार विचरसी ॥ ६२ ॥
महाग्राह जैसा कोणी । येवोनि झोंबे दाटुनी ।
तैसी आलीसी धांवोनी । आश्रम लक्षोनी पापिणी ॥ ६३ ॥
ग्राहाऐसी धांवसी । ते तूं महाग्राही होसी ।
ऐसें शापिलें वेगेंसी । तेणें ग्राहत्वासी पावलें ॥ ६४ ॥
त्यासी होवोनि शरणागत । म्यां प्रार्थिले ते महंत ।
रवीसीं म्यां केलें उद्धत । दंड तदर्थ मज झाला ॥ ६५ ॥
साधूसीं जो करी छळण । अथवा करी उद्धतपण ।
किंवा करी जो हेळण । तत्काळ पतन तो पावे ॥ ६६ ॥
नव्हती पुराणींच्या कथा । माझा अनुभव प्रत्यक्ष आतां ।
जे उपेक्षिती साधुसंतां । त्यासीं खस्ता रोकडी ॥ ६७ ॥
ऐसें विनवितां ऋषिजन । तिंही होवोनी प्रसन्न ।
मज दिधलें वरदान । तुझें उद्धरण हनुमंतें ॥ ६८ ॥
तूं राहोनि जळवासी । धरिसी कपीच्या पायांसी ।
स्पर्श होतां सज्जनासीं । तेणें उद्धरसी सत्संगें ॥ ६९ ॥
न ह्यम्मयानि तीर्थानि न देवा मृच्छिलामयाः ।
ते पुनंत्युरुकालेन दर्शनादेव साधवः ॥३१॥
सत्संगास्तव पाहीं । संसार तरती ते देही ।
इतर शाप बापुडे कायी । मुक्त होईजे सत्संगें ॥ १७० ॥
तैपासून मी येथ । वर्षें अयुत अयुत ।
होतें मी तुझी वाट पाहत । झालें निर्मुक्त तुझेनि आजि ॥ ७१ ॥
जन्ममरणावस्था । मज नाहीं गा सर्वथा ।
म्हणोनि कळिकाळा हाणोनि लाता । स्वरुपता पावलें ॥ ७२ ॥
आपुले निजसुख पाहीं । निरोपावें सद्गुरुपायीं ।
तें मी लाधलें सर्वही । झालें उतराई भवश्रमा ॥ ७३ ॥
सद्दुरुची स्थिती ऐसी । स्वयें अनुभवणें ज्या सुखासी ।
तेंचि पावे शिष्यासीं । न्यूनाधिकासी न करोनि ॥ ७४ ॥
पित्याचें समस्त वित्त । पत्र स्वामित्वें अंगीकारित ।
तैसें सद्गुरुसुख समस्त । शिष्य आक्रमित भावार्थे ॥ ७५ ॥
अजातपक्ष्याची जाति पाहीं । नेणे माउलीवांचून कांही ।
मुख पसरोनी सर्वही । ग्रास अवघाही झेलित ॥ ७६ ॥
तेही तैसेंचि प्रेमें तेणें । विसरोनि आपुलें खाणें ।
सगळा घांस बाळका देणें । बाळकाकारणें अवंचक ॥ ७७ ॥
तूंचि माझा ईश्वरु । तूंचि माझा सद्गुरु ।
मज दीना उद्धारु । केला साचार तुवां एकें ॥ ७८ ॥
संसारसागरीं बुडतां । सद्गुरुवांचूनि तत्वतां ।
आन नाहीं सोडविता । सत्य वार्ता हे माझी ॥ ७९ ॥
तुवां एकलेनि एकें । उद्धरली ब्रह्मांडें अनेकें ।
तेथें मजसारिखीं रंकें । कोणे लेखें लेखावीं ॥ १८० ॥
भवसागरीं तारक । जगीं तूं एकला एक ।
तुजवांचूनि आणिक । न दिसे देख त्रिजगतीं ॥ ८१ ॥
एका जनार्दनाचें रंकें । अंध पंगु दीन मुकें ।
देखोनियां एकाएकें । सत्वर देख आलिंगी ॥ ८२ ॥
नाम एक रुप एक । वर्णाश्रमधर्म एक ।
जगीं जनार्दन एक । नाम तारक त्रिजगतीं ॥ ८३ ॥
एका जनार्दना शरण । करोनि अप्सरा स्तव ।
सांगों पाहे पुढील चिन्ह । सावाधान परिसावें ॥ ८४ ॥
सज्जनांचा स्वभाव पूर्ण । दीनदयाळु चातकघन ।
अनाथासी देखतां जाण । घेती धांवोन उचलोनि ॥ ८५ ॥
गोड लागे निजमानसीं । तें वंचोनि स्वगोत्रासी ।
नेदोनि स्त्रीपुत्रासी । अनाथासी अर्पित ॥ ८६ ॥
यापरी मी अनाथ । भवदरिद्रें होतों पीडित ।
एका जनार्दनीं येथ । केला सनाथ त्रिजगतीं ॥ ८७ ॥
जालें अप्सराउद्धरण । पुढें काळनेमीचें मर्दन ।
एका जनार्दना शरण । गोड निरुपण उरलें असे ॥ १८८ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
अप्सराउद्धरणं नाम पंचचत्वारिंशोऽध्यायः ॥ ४५ ॥
ओंव्या ॥ १८८ ॥ श्लोक ॥ ३१ ॥ एवं ॥ २१९ ॥