रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 56 MB (Official) द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 56

अध्याय 56

लक्ष्मण व बिभीषण यांची श्रीरामांना विनंती

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

दूतांकडून अहिरावणवध ऐकून रावणाला चिंता :

दूतवचनें रामचरित । अहिरावणाचा निजघात ।
ऐकोनियां लंकानाथ । तळमळित अति दुःखी ॥ १ ॥
मंदोदरी सीतेजवळी । पाठविली अति कुशळी ।
अतियुक्तीं प्रबोधिली । कांही केलें तरी वश नव्हे ॥ २ ॥
जरी युद्ध करुं समरांगणीं । तरी राम नाटोपे रणीं ।
मस्तक पिटितां दशाननीं । कांही करणी चालेना ॥ ३ ॥
ऐसा झाला चिंतातुर । काय करुं मी विचार ।
तंव आठवला महामंत्र । झाला शंकर प्रसन्न ॥ ४ ॥
पूर्वी रावणांसीं वरद । शिवें दिधला प्रसिद्ध ।
तें आठवलें विशुद्ध । होम अगाध मांडिला ॥ ५ ॥
करोनि शुद्ध स्नान । शंकर करावया प्रसन्न ।
मांडिलें अत्युग्र स्तवन । सावधान अवधारा ॥ ६ ॥

अद्य रामाभिभूतो‍ऽहं स्तुत्वा विषमलोचनम् ।
सर्वलोकहरं देवं त्रिपुरघ्नं त्रिसामगम् ॥१॥

वरप्राप्तिसाठी रावणाची शिवाला प्रार्थना :

आसनीं भोजनीं शयनीं । श्रवणीं वदनीं नयनीं ।
श्रीरामें व्यापिलें अनुदिनीं । क्षणक्षणीं न विसंबे ॥ ७ ॥
धांव पाव गा शंकरा । त्रिपुरघ्ना त्रिनेत्रा ।
सामगायनगंभीरागिरा । गौरीहरा पाव वेगीं ॥ ८ ॥
ईशाना पंचानना वीरा । वरप्रभु वरखड्गधरा ।
नरनारीआदि चराचरा । विश्वंभरा व्यापका ॥ ९ ॥
वरशूळायुधधरा । वर सकलयोगीश्वरां ।
वर सुरां असुरां । अयुधप्रवरा धारका ॥ १० ॥
चरचरा निजनित्या । सकळलोकशाश्वता ।
यज्ञमूर्ति यशभोक्ता । वरदात्या यज्ञांगा ॥ ११ ॥
सुराध्यक्षा गणाध्यक्षा । देवाध्यक्षा ।
योगपते योगाध्यक्षा । सर्वाध्यक्षा शूळपाणे ॥ १२ ॥
शरणागता शरण्य । अभक्तासी करिसी दंडण ।
दक्षयज्ञविध्वंसन । स्वभक्तजनपाळका ॥ १३ ॥
पुष्पधनुष्यभंजना । भाळनेत्र भवविनाशना ।
रुद्रविश्वजित अभिधाना । आधारस्थान विश्वाचें ॥ १४ ॥
जय चिताभस्मोद्‍धूलना । जय पिनाकी वरासना ।
चंद्रचूडा विश्वभूषणा । शत्रुहनना शंकरा ॥ १५ ॥
त्रिशूळखट्वांगधरा । नागभूषणा विचित्रा ।
वरदात्या वरेण्यवरा । वरकार्मुकधारका ॥ १६ ॥
असतां स्त्रियेसमवेत । ब्रह्मचर्य नित्यव्रत ।
परम योग हा अद्‍भुत । नित्य शोभत वीरासनीं ॥ १७ ॥
गंगाधर वेगसौ‍म्य । भ्राजिष्णु अव्यय परम ।
अंधकांत उग्रकर्म। मातृमंडलमध्यग ॥ १८ ॥
श्मशाननिलयरत । रूंडमाळा कपाळहस्त ।
अनंगांतक शत्रुप्रमथ । कालकालांतक दुरासदा ॥ १९ ॥
नीळकंठा दुर्धर्पा । वृषभध्वजा वीरेशा ।
वृषस्कंधा वृषभाक्षा । श्रीमहेशा शाश्वता ॥ २० ॥
वृषपते सर्वजिजया । आनंद गिरिजाहृदया ।
कालचक्रप्रमेया । सुरवर्या सुरशा ॥ २१ ॥
स्वामि शंकरा ऐक विनंती । सकळ कुळाची झाली शांती ।
मजही साधावया निश्र्तितीं । लागले आहेती सौ‍मित्रराम ॥ २२ ॥
आसनीं भोजनीं शयनीं । गमनागमनीं कर्माचरणीं ।
राम लागला अनुदिनीं । क्षणक्षणीं सोडीना ॥ २३ ॥
श्रीरामबाणाचें भय पाहीं । मज लागलें सर्वां ठायीं ।
अहर्निशीं उसंत नाहीं । करुं कायी आतां मी ॥ २४ ॥
धांव पाव गा शंकरा । निजजनकरुणाकरा ।
मी पडिलों दुःखसागरा । धांव उदार शूळपाणे ॥ २५ ॥

रावणाला शंकराकडून वरप्राप्ती :

ऐकोनि रावणाची करुणा । कळवळला कैलासराणा ।
प्रत्यक्ष होवोनि जाणा । काय रावणा अनुवादे ॥ २६ ॥
शिव प्रत्यक्ष व्हावया जाण । अति खडतर रामानुसंधान ।
लागलेसे बहुसाल जाण । भेटी त्रिनयना तेणें झाली ॥ २७ ॥
आश्वासोनि दशशिर । बोलता झाला शंकर ।
पहिलें प्रसन्न होवोनि सत्वर । दिधला वर तो ऐका ॥ २८ ॥
पूर्वीं तुवां महावीरा । काढूनि सर्वांगाच्या शिरा ।
तुवां मस्तकाचा बरा । सज्जिलें यंत्रा अति युक्तीं ॥ २९ ॥

गांधर्वेण महाभाग कैलासे पर्वतोत्तमे ।
इदमाह महातेजाः शंकरो लोकपावनः ॥२॥

गंधर्वयुक्तीं सामगायन । अति मधुर तुवां जाण ।
करुन केलें मज प्रसन्न । वर संपूर्ण मागावया ॥ ३० ॥
युद्ध मांडिलिया समरांगणीं । वैरी जिणावया रणीं ।
प्रार्थिलें कैलासभुवनीं । विजयी त्रिभुवनीं व्हावया ॥ ३१ ॥
तेणें काळें वरदान । तुझ म्यां दिधलें आपण ।
तें स्मरोनियां जाण । करीं हवन अव्यग्र ॥ ३२ ॥
मज‍उद्देशें होम करितां । पावसी सकळ मनोरथा ।
झाली पाहिजे अविकळता । हेचि कठिणता मांडली ॥ ३३ ॥
सिद्धि पावलिया अविकळ । तरी कार्य साधे तत्काळ ।
रथ पावसील प्रबळ । दिव्यतुरंगांसमवेत ॥ ३४ ॥

तत्र यो दृश्यते दिव्यो रथस्तुरगसंयुतः ।
ज्वलनार्कप्रतीकाशं कवचं च महाप्रभम् ॥३॥
धनुर्माहेश्वरं चैव दिव्यं त्रिदशपूजितम् ।
मामकान्यपि चास्त्राणि ससंहाराणि सर्वशः ॥४॥
प्राप्यान्ति तव दुर्धर्षं शरं करिकरोपमम् ।
तमारुह्य रथं दीप्तं सर्वास्त्रपरिवारितम् ॥५॥
हनिष्यसि रणे शत्रून्यदि विघ्नो न ते भवेत् ॥६॥

अग्निकुंडामाझारी देख । साश्वरथ अलोलिक ।
देखसी गा तात्काळिक । ज्वलनार्कसमप्रभ ॥ ३५ ॥
अभेद्य कवच अति अपूर्व । शस्त्रास्त्रसामग्री सर्व ।
माहेश्वर चाप दिव्य । पावसी सर्व मदनग्रहें ॥ ३६ ॥
सुपूजितें माझीं निजास्त्रें । संहारकारकें विचित्रें ।
पावसी तूं परिकरें । शस्त्रास्त्रें दारुण ॥ ३७ ॥
त्या रथावरी बैसोनि वेगीं । शस्त्रास्त्रें संयोगीं ।
युद्ध करितां रणरंगी । वैरी भंगीं जातील ॥ ३८ ॥
प्रेरिलिया वैरियावरी जाये । उपसंहारिल्या हातासीं ये ।
ऐसीं शस्त्रास्त्रें पाहें । प्राप्त होती रथावरी ॥ ३९ ॥
होम निविघ्न सिद्धी जाय । तैं सिद्ध होय कार्य ।
कांही उठलिया अपाय । घात होय कर्त्याचा ॥ ४० ॥
ऐसें सांगोनि त्रिनयन । झाला अदृश्य आपण ।
येरें नमस्कारोनि जाण । मनीं रावण संतोषला ॥ ४१ ॥
आतां करोनियां याग । रथ पावेन अव्यंग ।
शस्त्रास्त्रें अनेग । सकळ सांग पावेन ॥ ४२ ॥
कोणा मनीं न धरवे सर्वथा । ऐसीं घोर कर्में आचरेन आतां ।
पराजय पावे रघुनाथा । तैशा अर्था साधीन ॥ ४३ ॥

एवमुक्त्वा महाबाहुः स्नात्वा जुहाव पावकम् ।
ब्राह्मणान्स्वस्तिवचनान्धनादिभिरतर्पयत् ॥७॥
मुक्त्वा शोकं च मानं मोहदर्पौ मदं तथा ।
आर्जवीं बुद्धिमास्थाय जपन्ब्रह्म सनातनम् ॥८॥
रत्कसंवीतवसनो रक्तमाल्यानुलेपनः ।
रक्तयज्ञोपवितश्च रक्तनेत्रकरस्तथा ॥९॥
रम्यं शिवालयं पुण्यं प्रविवेशाथ रावणः ।
शिवमभ्यर्च्य मंत्रैस्तु तत्र कर्म समारभत् ॥१०॥

रावणाची यज्ञासाठी तयारी :

ऐसें बोलोनि महाबाहो । विध्युक्त स्नान केलें पहाहो ।
पुजोनि ब्राह्मणसमुदावो । स्वस्तिवचनलाहो पैं केला ॥ ४४ ॥
देवोनि धनधान्यसंपत्ती । नाना रत्‍नांचिया जाती ।
विचित्र वसनें द्विजांप्रती । लंकापति अर्पित ॥ ४५ ॥
करोनियां स्वस्थांतः-करण । सांडोनियां मोह मान।
पुत्रादिशोक दारुण । तोही जाण सांडिला ॥ ४६ ॥
रावण श्रीरामाचा भक्त । रामीं प्रेमा अत्यंत ।
अंतरीं अनुराग अत्यद्‍भुत । तेणें आरक्त सबाह्य ॥ ४७ ॥
रक्तवस्त्रें परिकर । रक्तामाळा विचित्र ।
यज्ञोपवीत रक्तांबर । अत्युग्र । आवरणपूजा ॥ ४८ ॥
रक्तचंदनाची उटी परिकर । रम्य शिवालय मनोहर ।
तेथें बैसोनि दशशिर । होम एकाग्र आरंभी ॥ ४९ ॥
रक्तांबरनेत्र दारुण । करोनियां शिवार्चन ।
दृढ स्मरे शिवचरण । होमविधान आरंभी ॥ ५० ॥
अति उग्र आवरणपूजा । यज्ञ राखावया वोजा ।
करिता झाला रावणराजा । बळसमाजा परिसा पां ॥ ५१ ॥
स्वस्थ रहावया अंतःकरण । समीप आनंदाचें आवरण ।
त्यामाजी मन घालितां जाण । विक्षेप आपण रिघों न शके ॥ ५२ ॥
सवेंचि दुसरा परिघ पूर्ण । महामोहाचा दारुण ।
समीप पावतां पारिखे जन । मोहें निमग्र स्वयें होती ॥ ५३ ॥
जे आवरणीं प्रवेशतां । मार्ग भुलिजे स्वधर्मता ।
कार्याठव हरपे सर्वथा । मोहनिमग्रता स्वयें होय ॥ ५४ ॥
तिसरी संकल्पाची नदी । रावणें निर्मिली मंत्रसिद्धीं ।
जिज्या संकल्पाची अवधी । स्वयें विधि पावेना ॥ ५५ ॥
वैरिया रिगम कैचा तेथ । बुडती संकल्पविकल्पांत ।
गमनागमन न कळे तेथ । युद्धमात विसरती ॥ ५६ ॥
ऐसें कठिण तिसरें आवरण । चौथा झंझामारुत जाण ।
अंगी लागतांचि पूर्ण । अंगीं भग्न होय प्राणी ॥ ५७ ॥
लागतां तेथींचा वारा । पारख्या उडवी अंबरा ।
कोणा रिघों नेदी भीतरा । अद्‍भुत वारा आवरणीं ॥ ५८ ॥
पांचवे बाह्यावरण । त्याचें विपरीत चिन्ह ।
जो भेदू पाहे विदारुन । क्षुधा संपूर्ण व्यापिजे ॥ ५९ ॥
आवरणभेद धरितां पोटीं । अनिवार क्षुधा उठी ।
कांही विचार न पडे दृष्टी । पडे सृष्टी मूर्च्छित ॥ ६० ॥
यज्ञ राखावयाकारणें । अति उग्र पंचावरणें ।
पंचकोश ज्यांतें म्हणनें । रचिले रावने दुर्धर्षे ॥ ६१ ॥
हे पंचावरण जया भेदे । अहंरावण तया साधे ।
आणीक् आवरणें विविधें । परिस हग्दत सांगेन ॥ ६२ ॥
मंत्रावरण शस्त्रावरण । महाविखारांचें सर्पावरण ।
भूत प्रेत वेताळ जाण । गुप्तावरण तयांचें ॥ ६३ ॥
बाहिर परिधी राक्षसांची । शस्त्रास्त्रीं बाणले कवची ।
अहर्निशीं शस्त्रें हातीचीं । कैसीं झळकती अंतरिक्षीं ॥ ६४ ॥
ऐसा अंतर्बाह्य निश्चित । राम साधावया सावचित्त ।
रावण होम असे करित । समाहित मानसें ॥ ६५ ॥

वानरसैन्यामध्ये रामनामाचा गजर व श्रीरामांना युद्धाला चलण्याची प्रार्थना :

येरीकडे दळभारीं । सन्नद्धदळें कपिकेसरी ।
सन्नद्धबद्ध द्रुमकरी । रामनामगजरीं गर्जत ॥ ६६ ॥
विजयी झाला रघुराज । मारिला अहिरावण दुर्बीज ।
उभारिला लांगूलध्वज । कपिसमाज अति गजरें ॥ ६७ ॥
विजयी आमुचा कपिनाथ । मारोनियां पाताळनाथ ।
घेवोनि आला रघुनाथ । बळें अ‍दभुत हनुमंत ॥ ६८ ॥
करोनि कामाक्षी प्रसन्न । भेदोनि पाताळभुवन ।
मारोनियां राक्षसगण । श्रीरघुनंदन आणिला ॥ ६९ ॥
विजयी श्रीरामचंद्र । विजयी आमुचा हनुमान वीर ।
विजयी सकळ वानरभार । कपि समग्र नाचती ॥ ७० ॥
कायसा रावण महावीर । कायसें लंकादुर्ग दुस्तर ।
मारावया दशशिर । वानरभार उपरमती ॥ ७१ ॥
उठी चाल रघुनाथा । अद्यापि कायसी उदासता ।
क्षणें मारूं लंकानाथा । आळस परता सांडीं स्वामी ॥ ७२ ॥
म्हणोनि घालिती लोटांगणीं । लागती श्रीरामाच्या चरणीं ।
रावणकपटेंकरोनी । झाली भंगाणी वानरां ॥ ७३ ॥
कपटेंकरीं वानर पडत । तुझ्या चरणरजें स्वयेंचि उठत ।
ऐसें क्षणोक्षणां घडत । तेणें बहुत दुःखरुप ॥ ७४ ॥
ऐसी गजबज करिती । अत्यंत येती काकुळती ।
युद्ध करावया रघुपती । प्रार्थिताती वानरें ॥ ७५ ॥

लक्ष्मणाचा श्रीरामांना रावणाचा वध करण्याविषयी आग्रह :

तंव उठिला सुमित्रानंदन । अत्यंत विनीत होऊन ।
प्रार्थिता झाला रघुनंदन । मधुर वचन बोलोनी ॥ ७६ ॥
ऐक स्वामी राघवा । तूं रघुकुलाचा ओलावा ।
निजभक्तजनविसांवा । वचनगौरवा परिसावें ॥ ७७ ॥
भक्त पडतां जन्मावर्ती । निवारिता तूं रघुपती ।
तेथें कायसी युद्धख्याती । तूं त्रिजगती तारक ॥ ७८ ॥
तूं तारिसी नवल कोण । एकलें तुझें नाम जाण ।
उच्चारितां रघुनंदन । भवबंधन निवारे ॥ ७९ ॥
एवढा तुझा नाममहिमा । तो तूं जवळी असतां श्रीरामा ।
अत्यंत क्लेश प्लंवगमां । ते सर्वोत्तमा चुकवावे ॥ ८० ॥
नाम स्मरतां रघुनाथ । निवारे भवभ्रमाची मात ।
तो तूं जवळी रघुनाथ । वानरा आकांत युद्धाचा ॥ ८१ ॥
एक एक गोळांगूळ । गिळू शके ब्रह्मांडगोळ ।
तेथें कायसें रावणाचें बळ । युद्ध तुंबळ करावया ॥ ८२ ॥
तथापि कपतयोद्धा रावण । नाहीं युद्धधर्मीं आंगवण ।
छळ छद्म करोनि जाण । वानरगण त्रासित ॥ ८३ ॥
जारण मारण स्तंभन । मोहन उच्चाटन वशीकरण ।
दुश्चित वैरी असतां जाण । सिंतरुन मारावे ॥ ८४ ॥
ऐसा कपटयोद्धा दुरात्मा । संमुख येतां संग्रामा ।
रावण वधावया श्रीरामा । प्लंवगमां सोडवीं ॥ ८५ ॥
दुष्टदळणीं साचार । सत्य एक श्रीरामचंद्र ।
स्वयें धरिला अवतार । रावण किंकर तें किती ॥ ८६ ॥
तुझें ब्रीद पूर्वापर । करोनियां दुष्टसंहार ।
स्थापावे भक्त ऋषीश्वर । धर्म निरंतर रक्षावा ॥ ८७ ॥
सुख द्यावें जी दीजननां । प्रतिपाळावें गोब्राह्मणां ।
संरक्षावी भक्तसेना । रघुनंदना निजव्रता ॥ ८८ ॥

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥११॥
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥१२॥

श्रीरामांना लक्ष्मणाने प्रतिज्ञेचे स्मरण दिले
व रावणाच्या दुष्कृत्यांची हकिगत सांगितली :

तुझें निजव्रत श्रीरामा । दुष्ट प्रवर्तती अधर्मा ।
आच्छादिती स्वधर्मा । निंद्य कर्मा प्रवर्तत ॥ ८९ ॥
धर्मवाढी निःशेष मोडे । अधर्माची शीग चढे ।
सत्कर्माचा आवर्त पडे । सद्‌भक्ति बुडे सशेंडी ॥ ९० ॥
ठसा पडे विपरीत । तिळतुल्य सत्कर्म आचरत ।
तेणेंच फुगारा धरित । त्रिदोषीं पडत निजकर्मे ॥ ९१ ॥
अकर्माचा फुटे फांटा । अधर्माचा चढे ताठा ।
स्वैर करिती पापचेष्टा । गर्वाचा मोठा फुगारा ॥ ९२ ॥
तापलीं त्रिविध तापें । वोसणती विषयजल्पें ।
अहंममतेचे निजसंकल्पें । अति अमूपें पीडती ॥ ९३ ॥
विषयरसें ओलावती । स्वयेंचि वियोगें सोकती ।
क्षणक्षणें काकुलती येती । पाणी मागती विषयांचें ॥ ९४ ॥
ते काळीं वैद्यरावो । अवतरसी रामरावो ।
ब्रह्मरसमात्रा देवोनि पहा हो । रोग स्वयमेवो झाडिसी ॥ ९५ ॥
युगायुगाप्रती रामा । अवतरोनि मेघश्यामा ।
झाडा करिसी अधर्मा । पुरुषोत्तमा श्रीपते ॥ ९६ ॥
अत्यंत रोगें पीडिले देखसी । तेव्हां विधीचे डाग देसी ।
सत्कथेचें पथ्य लाविसी । अनुपान लाविसी सत्संग ॥ ९७ ॥
त्यासी दृढतेचें पथ्य । लाविसी सद्‌भक्तीसी नित्य ।
तेणें रोगाचें विगत । होय निश्चित क्षणें एकें ॥ ९८ ॥
ऐसे तुझे निजभक्त । अहंरावणरोगग्रस्त ।
त्यांसी करावया निर्मुक्त । सज्जीकृत करीं चाप ॥ ९९ ॥
देव घातले बांदवडीं । सुरासुर देशधडी ।
ऋषीश्वरें भ्यालीं बापुडीं । देवोनि बुडी लपलीं गिरिकंदरीं ॥ १०० ॥
नवग्रहांची केली पाउटी । अग्नि धूतसे मळकटीं ।
विघ्नहर घेवोनि काठी। रासभांपाठी रावणा ॥ १ ॥
मल्हारीदेव दावी दर्पण । मुख्य चंडिका तराळी जाण ।
कुंजें झाडी प्रभंजन । मेघ सडासंमार्जन करीतसे ॥ २ ॥
इंद्र फुलारी वरुण बारी । यम त्याचा नाटिकारी ।
चंद्र छत्रकार दाही शिरीं । दुर्दशा भारी देवांची ॥ ३ ॥
भोजन करावया रावण । पाक निपजवी हुताशन ।
किंचित आस्वाद चुकल्या जाण । करिती कंडण अग्नीसीं ॥ ४ ॥
एवढी दुर्दशा देवां । ऐकतां त्रास उपजे जीवां ।
शीघ्र कुढवावे देवां । भक्तां करावा उत्सावो ॥ ५ ॥
आमची सीता माऊली । गंफेमाजी एकली ।
आक्रंदत धरोनि नेली । गूढ राखिली अशोकवनीं ॥ ६ ॥
एकवस्त्रा मलिन पाहीं । मलिन केश नाहणें नाहीं ।
दीनवदन भूमिशायी । धरिली कांही चालेना ॥ ७ ॥
आला देखोनि हनुमंता । चरणावरी लोळे सीता ।
मज भेटवीं रगुनाथा । शरण आतां तुज आलें ॥ ८ ॥
ऐकतां तिचें करुणावचन । हृदयस्फोट होत जाण ।
मज द्यावें आज्ञापन । दशानन मारावया ॥ ९ ॥
दारुण शस्त्रें आम्हांपासीं । तेव्हांचि मारितो रावणासी ।
क्षणक्षणां तूं निवारिसी । बळ स्वामीसीं चालेना ॥ ११० ॥
आतां तरी धरुन पुरुषार्थ । निर्दळीं हा लंकाना ।
नाहीं तरी होईल अनर्थ । कपटें घात करील ॥ ११ ॥
युगायुगाच्या ठायीं । श्रीराम अवतरोनि लवलाहीं ।
दुष्ट मारोनि सर्वही । भक्त लवलाहीं स्थापावे ॥ १२ ॥
ऐसी प्रतिज्ञा पूर्ण । वेदतुल्य तुझें वचन ।
तो वधोनियां रावण । भक्तसोडवण करीं स्वामी ॥ १३ ॥
मारोनियां खरदुषण । मुक्त करोनि जनस्थान ।
ब्राह्मणां दिधलें दान । हर्षे ऋषिगण नांदती ॥ १४ ॥
वाळी मारिला दारुण । मुक्त केलें किष्किंधाभवन ।
सुग्रीवासी दिधलें दान । सुखें वानरग्ण नांदती ॥ १५ ॥
ताटका पापिणी आपण । मार्ग रोधितां अति दारुण ।
ते विंधोनि मारिली बाण । मुक्तगमन मार्गस्थां ॥ १६ ॥
विश्वामित्रयागा जाण । केलें राक्षसीं रोधन ।
तेणें हर करोनि प्रसन्न । वरदान मागीतलें ॥ १७ ॥
मानवी सूर्यवंशाप्रती । राम अवतरेल दाशरथी ।
तो राक्षसां करोनि शांती । याग निश्चितीं राखील ॥ १८ ॥
त्या शिववरदासाठीं । तुवां एकलेनि जगजेठी ।
मारोनि राक्षसकोटी । ऋषिइष्टी संपविली ॥ १९ ॥
जे जे तुज शरण आले । ते ते क्षणें कुढाविले ।
तैसें साह्य पाहिजे केलें । बिभीषणालागोनी ॥ १२० ॥
एक बिभीषण शरणागती । दुसरे शरण सुरपंक्ती ।
तिसरी माऊली सीता सती । अति काकुळती येतसे ॥ २१ ॥
वानरभारेंसीं जुत्पती । तुज येताती काकुळ्ती।
आपणही करितों विनंती । लंकापती मारावा ॥ २२ ॥
तुझी प्रतिज्ञा रघुपती । रावण मारावा निजहस्तीं ।
ते आपलीं वचनोक्तीं । साच निश्चितीं करावी ॥ २३ ॥
तुवां वाहिली असे आण । निजहस्तेंकरुनि रावण ।
स्वयें मारावा आपण । तें वचन आठवीं ॥ २४ ॥

तां प्रतिज्ञां पतिज्ञाय पुरा सत्यपराक्रमः ।
लघुः कश्चिदिवासत्वो नैव त्यत्कुं त्वमर्हसि ॥१३॥
न प्रतिज्ञां हि कुर्वन्ति वितथां सत्यवादिनः ।
लक्ष्मणं हि महत्वस्य प्रतिज्ञापरिपालनम् ॥१४॥
तदलं मास्तु ते वीर नैराश्यमुपगम्यते ।
वधेन रावणस्याद्य प्रतिज्ञामनुपालय ॥१५॥
न जीवन्यास्यते राम तव बाणपथं गमः ॥१६॥

लक्ष्मणाने सूर्यवंशामधील सत्यप्रतिज्ञ राजांची नावे व कृत्ये सांगितली :

सौ‍मित्र म्हणे रघुनाथा । पूर्वप्रतिज्ञा आठवीं आतां ।
सत्यप्रतिज्ञा शाश्वता । होई आतां सन्नद्ध ॥ २५ ॥
तुजसारिखे सत्वसंपन्न । अन्यथा न करिती प्रतिज्ञावचन ।
रावन बापुडें हीन दीन । त्यासी विलंबन कायसें ॥ २६ ॥
तुझ्या सूर्यवंशात । सत्यप्रतिज्ञ राजे बहुत ।
तयांमध्ये संकळित । नामें सुनिश्चित सांगेन ॥ २७ ॥
हरिश्चंद्र सूर्यवंशी । मिथ्या न करीच वचनासी ।
स्वप्रदान जागृतीसीं । देवोनि कैसी ख्याति केली ॥ २८ ॥
निजराज्या देवोनि लात । एकाकी स्त्रीपुत्रसमवेत ।
निघता झाला त्वरित । स्वप्नवचनार्थसत्यत्वा ॥ २९ ॥
स्वप्नदक्षिणेलागीं जाण । स्त्रीपुत्र दोघें विकून ।
डोंबाघरीं स्वयें आपन । जळवाहन करीतसे ॥ १३० ॥
एकादशीव्रतालागीं जाण । निजपुत्राचें शिर कापून ।
मोहनीलागीं देई आपण । सत्यप्रतिज्ञ रुक्मांगद ॥ ३१ ॥
धर्मांगद त्याचा सुत । सत्यप्रतिज्ञ विख्यात ।
जनकभाकेलागीं उद्युक्त । शिर छेदवित आपुलें ॥ ३२ ॥
स्वयें तुवांचि रघुनाथा । सत्यत्व यावया दशरथा ।
अंगीकारिलें महाव्रता । तीव्र आघाता साहोनी ॥ ३३ ॥
प्रार्थितां कौसल्या माता । उपेक्षोनि तिची कथा ।
वना निघालासी रघुनाथा । पितृवचनार्थालागूनी ॥ ३४ ॥
स्वहस्तें वसिष्ठ राज्य देतां । उपेक्षोनि गुरुवचनार्था ।
स्वराज्या हाणोनि लाता । वना तत्वतां आलासी ॥ ३५ ॥
अत्यंत करुणा भाकितां भरता । तुझें राज्य तुज देतां ।
उपेक्षोनि त्या प्रेमार्था । वना तत्वतां आलासी ॥ ३६ ॥
शिळी बुजोनि सागर । उतरोनि आणिला वानरभार ।
वेगीं वधोनि दशशिर । करीं राज्यधर बिभीषण ॥ ३७ ॥
तुझ्या बाणसंधानापुढें । रावण मशक बापुडें ।
सुटतां तुझें कुर्‍हाडें । मरे रोकडें क्षणार्धें ॥ ३८ ॥
सिंह प्रवेशतां वनीं । होय मदगजां भंगाणीं ।
तेंवी रिघोनि राक्षसगणीं । रावणा अवनीं पाडीं रामा ॥ ३९ ॥
उदया येतां दिवाकर । निशा हरपे सहित अंधार ।
त्रैलोक्य़ीं होय प्रकाशकर । स्वधर्माचार चालती ॥ १४० ॥
तेंवी रावणमोहनिशासुबद्ध । पडलें अधार्माचें गडद ।
त्याचा छेदोनियां कंद । स्वधर्म विशद प्रकाशीं ॥ ४१ ॥
आपुल्या निजबाणकिरणेंकरीं । निरसीं रावणमोह‍अंधारीं ।
भक्तां नित्योदय करीं । स्वधर्मा करीं उद्धार ॥ ४२ ॥
ऐकोनि सौ‍मित्रवचन । पोटांतिल्या हर्षे पूर्ण ।
बोलता झाला आपण । राजा बिभीषण रामासी ॥ ४३ ॥
राजा म्हणावया हेंचि कारण । सौ‍मित्रें प्रार्थिला रघुनंदन ।
तेंचि निवटूनियां रावण । लंके बिभीषण स्थापिला ॥ ४४ ॥

लक्ष्मणस्य तदा वाक्यं श्रुत्वा राजा बिभीषणः ।
उवाच हितमत्यंतं राघवं रघुनंदनम् ॥१७॥
एवमेतन्महाबाहो यथा वदति लक्ष्मणः ।
न प्रतिज्ञां हि कुर्वंति वितथां साधवो जनाः ॥१८॥

बिभीषणाने श्रीरामांना विनंती केली :

बिभीषणें घालोनि लिटांगण । विनविला रघुनंदन ।
जें बोलिला सुमित्रानंदन । यथार्थ वचन तें रामा ॥ ४५ ॥
जें बोलिला लक्ष्मण । श्रीरामा तें सत्यवचन ।
तुझें नाम सत्यप्रतिज्ञ । वेदवचन प्रसिद्ध ॥ ४६ ॥
श्रीराम सत्य वेदु । श्रीराम सत्य साधु ।
श्रीराम सत्य बोधु । भवबंधु जेथ नाहीं ॥ ४७ ॥
श्रीरामें सत्य शास्त्र । श्रीरामें सत्य मंत्र ।
श्रीरामें सत्य कर्मतंत्र । होय सर्वत्र अव्यंग ॥ ४८ ॥
श्रीरामें सत्य कीर्ती । श्रीरामें दृढ विरक्ती ।
श्रीरामें अढळ शांती । भक्त पावती भावार्थी ॥ ४९ ॥
श्रीरामें सत्य श्रुती । श्रीरामें सत्य स्मृती ।
श्रीरामें सत्य विश्रांती । भक्त पावती भावार्थी ॥ १५० ॥
तीर्थी व्रतीं क्षेत्रीं जाण । कामनापरत्वें देवतागण ।
त्यांच्या ठायीं जें सत्यपण । ते कृपा संपूर्ण रामाची ॥ ५१ ॥
जगतीतळीं जें जें सत्व । श्रीरामसत्वें तें सत्ववंत ।
ऐसा सत्यप्रतिज्ञ रघुनाथ । निजप्रतिज्ञा सत्य करीं स्वामी ॥ ५२ ॥
सज्ज करोनि चापीं गुण । गुणीं प्रयोजोनि बान ।
वधीं दुरात्मा रावण । धर्मरोधन करीतसे ॥ ५३ ॥

विध्वंसय शरैस्तीक्ष्णैर्दिवा च यदि वर्तते ।
प्रतिज्ञां रघुशार्दुल सफलां कुरु मानद ॥१९॥

अति तिखट बाणधारीं । रावणाचें देह विदारीं ।
जेंवी मदगजातें चिरी । क्रोधेंकरी पंचानन ॥ ५४ ॥
इंद्र वृत्रातें विदारीं । मुरुलागी सुरारी ।
तेंवी रावणातें विदारीं । क्रोधेंकरीं श्रीरामा ॥ ५५ ॥
मधूलागीं मधुसूदन । हिरण्यकशिपूतें सिंहवदन ।
तैसा वधीं दशानन । क्रोधेंकरुन श्रीरामा ॥ ५६ ॥
येच समयीं आजिंचे दिवसीं । वेगीं धनुष्यातें हातवशीं ।
मारोनियां रावणासी । करीं सकळांसीं उत्सावो ॥ ५७ ॥
ऐकोनि शरणागतवचन । आणि बंधूची विनवण ।
बोलता झाला रघुनंदन । निजजनकृपाळु ॥ ५८ ॥
एका जनार्दना शरण । सौ‍मित्रा बिभीषणा जाण ।
देवोनियां समाधान । यागविध्वंसन करील ॥ ५९ ॥
राम शरणागता वत्सळु । राम निजजनस्नेहाळु ।
आर्तत्राणप्रतिपाळु । रणकल्लोळु श्रीराम ॥ १६० ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
सौ‍मित्रबिभीषणविज्ञापनं नाम षट्पंचाशत्तमोऽध्यायः ॥ ५६ ॥
ओंव्या ॥ १६० ॥ श्लोक ॥ १९ ॥ एवं ॥ १७९ ॥