अध्याय 58
रावणाच्या यज्ञाचा विध्वंस
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
वानरांनी संकल्प मोडला ; पण ते महामोहाच्या आवरणामध्ये अडकून पडले :
अति दुस्तर संकल्पावरण । जेणें व्यापिलें त्रिभुवन ।
तें निरसोनि हरिगण । करीत किराण चालिले ॥ १ ॥
सद्गुरुचे कृपेपुढें । संकल्प कायसें बापुडें ।
जेंवी रवीपुढें मेहुढें । तेंवी उडे अभावत्वें ॥ २ ॥
निरसून दुस्तर आवरण । करीत रामनामगर्जन ।
अति बळियाढे वानगण । देत किराण चालिले ॥ ३ ॥
केउता आहे लंकापती । काळमुखा त्रिजगतीं ।
चोरोनि आणिली सीता सती । तेणेंचि शांती झाली त्याची ॥ ४ ॥
भस्म झालिया आवरणें । आतां काय करावें रावणें ।
जीव घेवोन पळोन जाणें । अन्यथा जिणें दिसेना ॥ ५ ॥
वृक्ष झेलिती वानर । एक पर्वतशिखर ।
करीत रामनामाचा गजर । वीर वानर चालिले ॥ ६ ॥
तंव अति दारुण । महामोहाचें आवरण ।
त्यांत पडिले वानरगण । मोहनिमग्न होवोनि ठेले ॥ ७ ॥
पडली गडधूप अंधारी । न देखती परस्परीं ।
वृत्ति झाली पैं घाबिरी । अपांपरी वानरां ॥ ८ ॥
न दिसे स्वसैन्य परसैन्य । मोडलें सन्मार्गदर्शन ।
भ्रांत होवोनि ठेले मौन । गमनागमन स्वरेना ॥ ९ ॥
निजदेहो नाठवे सर्वथा । तेथें कोण जाणे सन्मार्गता ।
आचरावया कर्माची सामर्थ्यता । स्वधर्मता तेथें कैची ॥ १० ॥
बुद्धि होवोनि ठेली अंध । चित्त झालें पैं स्तब्ध ।
निजाभिमानें पडलें गडद । कर्मानुवाद नाठवे ॥ ११ ॥
आम्ही एक रामभक्त । आज्ञा घेवोनियां येथ ।
आलों मिळोनियां समस्त । तो कार्यार्थ विसरलो ॥ १२ ॥
होम विध्वंसोनि तत्वतां । बाहेर काढोन लंकानाथा ।
भेटवावें रघुनाथा । हेंही सर्वथा विसरलों ॥ १३ ॥
आळसें व्यापिलें शरीर । देती जांभया करकरां ।
चांचरी जाताती सैरा । मोहें वानरां व्यापिलें ॥ १४ ॥
विसरले कारण । विसरले धर्माचरण ।
विसरले रघुनंदन । वानरगण आपणा विसरले ॥ १५ ॥
उभे उभ्या खाती झोंके । उभेचि घोरती एकें ।
निद्रा व्यापिलीं सकळिकें । वानरें असंखयें पाडिलीं ॥ १६ ॥
मोहाचें बळ बहुवस । निजों न दे सावकाश ।
पडिल्याचि स्वप्नविलास । असम साहस देखती ॥ १७ ॥
द्रव्यदाराममता फार । माझी स्त्री माझे पुत्र ।
स्वप्नीं माडिती घराचरा । पुत्रपौत्रविवाह ॥ १८ ॥
माझे व्याही माझे भाई । सोयरे धायरे जांवई ।
ममता बहु लेंकीचे ठायीं । उचितें पाहीं दाटत ॥ १९ ॥
मी स्वगृहीं नांदत । उदीम व्यवसाय करीत ।
सोयरियांसीं उदासभूत । ते गृहस्थ पैं काय ॥ २० ॥
ऐसी उचितांची सांकडी । स्वप्नीं पडे अरडीदरडी ।
जागृतीं कैंची उसंत घडी । मोह कडाडीं आदळला ॥ २१ ॥
चिंतासागरीं बुडाले । उचिताचे सांकडीं पडिले ।
सवेंचि निद्रा व्यापिले । घोरों लागले घरघरां ॥ २२ ॥
एक उठोन वोसणती । एक तयांसी दडपिती ।
तंव तेही मोहें व्यापिजेती । स्वयें बरळती मी माझें ॥ २३ ॥
मोहामधून वानरांची हनुमंताकडून सुटका :
त्या मोहाचा निवर्तक । वैराग्ययुक्त विवेक ।
तेणें हनुमान सबळ देख । मोह निःशेष उडविला ॥ २४ ॥
विवेकवैराग्यसमेळीं । देतां नामाची आरोळी ।
महामोहाची झाली होळी । वानर तत्काळीं सोडविले ॥ २५ ॥
गुरुकृपावलोकनें देख । वैराग्य झालें सत्वात्मक ।
विवेक उपजला निष्टंक । तेणें सकळिक सावधान ॥ २६ ॥
महामोहाचें मूळ तत्वतां । अहंता आणि ममता ।
तिच्या करावया घाता । सविवेकता वैराग्य ॥ २७ ॥
गुरुसंप्रदायें जाण । स्वस्थ बैसले हरिगण ।
स्वस्थ बैसले हरिगण । स्वस्थ करोनि अंतःकरण ।
निजविवंचन स्वये करिती ॥ २८ ॥
गुर्वाज्ञा पूर्ण ऐसी । जे देहातीत आपणासी ।
देखोनियां यथार्थेसीं । निजस्वहितासी विनटावें ॥ २९ ॥
तैं विसरोनि गुरुवचन । वृथा पडिले असावधान ।
पुढें ओढवल्या पतन । सोडवी कोण आम्हासी ॥ ३० ॥
जो गुरुवचनासी विसरे । कामातुरें अति भरे ।
कां आळसे कांही न स्मरे । निद्राभरें अति भ्रांत ॥ ३१ ॥
गुरुसी न स्मरोनि जाण । विषयी लुब्धजा पूर्ण ।
तो तंव नागवला । नाहीं स्मरण गुरुचें ॥ ३२ ॥
कामातुरा नरक दारुण । निद्रिता उभय लोक शून्य ।
आळसी तो वृथा जाण । करी पोषण देहाचें ॥ ३३ ॥
आहारनिद्राभयमैथुनं च समानमेतत्पशुभिर्नराणाम् ।
ज्ञानं नराणामधिको विशेषो ज्ञानेन हीनाः पशुभिः समानाः ॥१॥
नेणें कर्माची वेळ । न म्हणे सकाळ सांजकाळ ।
निद्रा घोरले प्रबळ । अळूमाळ स्मरेना ॥ ३४ ॥
आहार निद्रा भय मैथुन । पशूंच्या ठायीं समसमान ।
तैसेचि देही पशु जाण । पुच्छेंवीण दाढीचें ॥ ३५ ॥
पशु भेडवितां परता पळे । विषयी नरकभयें न कंटाळे ।
घोर नरक अंगी आदळे । तरी खवळे अधिकचि ॥ ३६ ॥
भोगिलिया विषयापाठी । पशुसी अल्पही ममता नुठी ।
विषयिजनांची नवलगोष्टी । घाली मिठी अधिकाधिक ॥ ३७ ॥
सकृद्विषयभोगेंकरुण । पशु न पाहे परतोन ।
विषयिजनांचे नवल कोण । सगर्व जाण सोडीना ॥ ३८ ॥
पशु विषय भोगूं जाये । मागुता परतोनि न पाहे ।
विषयिजनांचें अपूर्व आहे । नवल काय सांगूं मी ॥ ३९ ॥
प्रीतीं जंव जंव भोग घडे । तंव तंव ममता अधिक वाढे ।
मोथडबुथडभरी चुडे । अलंकारकोडें घडवित ॥ ४० ॥
विषयीं संतति झाली । तरी अधिकेंचि गुंती पडली ।
ममता अधिक खवळली । सुदृढ जडली जन्मवेढी ॥ ४१ ॥
चित्ता सांकडी पडे । तेणे अधिकाधिक डांव चढे ।
ऋणा माजी सफाई बुडे । नरक पुढें अनिवार ॥ ४२ ॥
एका विषयाची ऐसी गती । अहंममता नागविती ।
आळसी निद्रिस्थाची स्थिती । तेही संकळितीं सांगेन ॥ ४३ ॥
आयुषः क्षण एकोपि न लभ्यो हेमकोतिभीः ।
स चेद्विफलतां याति का हानिस्तु ततोधिका ॥२॥
नरदेहाची बहुमोलता :
कोटि वेंचितां सुवर्ण । नरदेहीचें आयुष्य जाण ।
न मिळे न मिळे अर्धक्षण । नाना साधनें करितांही ॥ ४४ ॥
शिणतां नाना साधनीं । सहसा नरदेह या जनीं ।
न मिळें पै त्रिभुवनीं । त्याची हानी होतसे ॥ ४५ ॥
स्वेच्छा वेंचे विषयसेवनीं । उसंत नाहीं क्षणोक्षणीं ।
विपायें उरे शेष म्हणोनी । तें ने हिरोनी सुषुप्ती ॥ ४६ ॥
नेणे कर्माची वेळ । न म्हणे सकाळ संध्याकाळ ।
निद्रा घोरले प्रबळ । कांही अळुमाळ स्मरेना ॥ ४७ ॥
नाठवी गेल्या आयुष्या । नाथवी स्वधर्म सहसा ।
फुंपत पडे सर्प जैसा । नाठवे सहसा हृदयस्थ ॥ ४८ ॥
विपायें चुकल्या सुषुप्ती । तरी आनाडी भरे वृत्ती ।
स्वेच्छा सारिपाट खेळती । नातरी मांडिती बुद्धिबळें ॥ ४९ ॥
स्वर्गींचे चिंतिती सुरवर । कर्मभूमी नरशरीर ।
पावतां चुके येरझार । ऐसा थोर नरदेहो ॥ ५० ॥
ऐसी नरदेहाची योग्यता । दुर्लभ ब्रह्मादिकां समस्तां ।
तें देह पाहोनि तत्वतां । विषयी सर्वथा नाडेले ॥ ५१ ॥
आम्ही श्रीरामाचे गण । सद्गुरु हनुमंताचे कृपेंकरुन ।
पावलों आतां रघुनंदन । ते मोहनिमग्न केंवी झालो ॥ ५२ ॥
अतर्क्य भगवंताची माया । विश्व संपूर्ण भुलविलें तया ।
बाप रावणाची कपटचर्या । सेना वानरांचिया मोहित ॥ ५३ ॥
तथापि भगवंताचें वरद । हरिभक्तां न बाधी द्वंद्व ।
निरसोनि मायेचा बाध । स्वरुप शुद्ध भोगिती ॥ ५४ ॥
मामेव ये प्रपद्यंते मायामेतां तरंति ते ॥३॥
माझ्या निजभक्तांकडे । न पडे मायेचें सांकडें ।
मी आपुल्यातें आपुल्याकडे । नेईं निवाडें निजपदा ॥ ५५ ॥
सूर्यासी उगवतां तम । अल्पहि न पडे दुर्गम ।
तेंवी अभक्तां माया दुर्गम । अति सुगम हरिभक्तां ॥ ५६ ॥
सुगम म्हणतां साच दिसे । परि सत्यत्वें निःशेष नसे ।
निजभ्रमें तेथे आभासे । निद्रावशें स्वप्न जेंवी ॥ ५७ ॥
सूर्यकिरण न पडे दृष्टीं । तैं मृगजळाचा पूर दाटी ।
स्वस्वरुपीं विन्मुख होतां शेवटीं । भरत दाटी तमाची ॥ ५८ ॥
तेंवी रावणाचे कपटतमें जाण । क्षण एक मोहिले हरिगण ।
पडतां विवेकरविकिरण । उडालें पूर्ण अभावतम ॥ ५९ ॥
उदया येतां बोधार्क । अज्ञानतम निःशेख ।
उडोनि गेलें एकएक । ज्ञानउखा देख उजळली ॥ ६० ॥
रामभक्ती आणि तिचे नाममाहात्म्य :
बोधार्काच्या किरणें देख । भ्रम उडाला निःशेख ।
सावध झाले सविवेक । अपूर्व आणीक पुढें झालें ॥ ६१ ॥
विज्ञानमय कोश जाण । केवळ तमाचें आवरण ।
भेदितांचि हरिगण । पुढीलहि जाण भेदिलें ॥ ६२ ॥
नामबळें असमसाहस । करितां विवेक सावकाश ।
झाला तमाचाही र्हास । स्वप्रकाश त्रिजगतीं ॥ ६३ ॥
विवेकाच्या निजनेटीं । निजकारणेंसीं त्रिपुटीं ।
उडोनि गेला उठाउठीं । जेंवी रविदृष्टीं मृगजळ ॥ ६४ ॥
द्रष्टा दृश्य दर्शन । ज्ञाना ज्ञेय निजज्ञान ।
कर्ता कार्य आणि कारण । यांचे भान उडालें ॥ ६५ ॥
भोग्य भोग भोक्ता । वाच्य वचन वदता ।
ध्येय ध्यान आणि ध्याता । अभावो सर्वथा त्रिपुटीचा ॥ ६६ ॥
बोधार्काचा उदय जाण । स्वप्रकाशी त्रिभुवन ।
सबाह्य झालें आनंदघन । वानरगण सुखरुप ॥ ६७ ॥
आनंदमय झाली वृत्ती । विसरले ते बाह्यस्फुर्ती ।
निगाले होते रावणघातीं । तेही स्थिती विसरले ॥ ६८ ॥
विसरले कार्यकारण । विसरले वैरी रावण ।
विसरले रघुनंदन । वानरपण विसरले ॥ ६९ ॥
निजकार्यालागीं जाण । रावण अति विचक्षण ।
रचिलें आनंदावरण । होम निर्विघ्न साधावया ॥ ७० ॥
परी तें नव्हे अखंड । भेद्रें केलें खंडविखंड ।
विषयाकारणें उदंड । अति प्रचंड विस्तार ॥ ७१ ॥
जे जे रसीं जो जो भरे । तेथोनि मागें न सरे ।
रावणें मोहिलीं वानरें । सुखोद्गारें डुल्लती ॥ ७२ ॥
सकळ रसाचें निजसार । ब्रह्मरस परिकर ।
विवेक पावले वानर । गुरुकृपासारनिजबळें ॥ ७३ ॥
त्याहिमाजीं अतर्क्य जाण । बैसला असे अहंरावण ।
तेणें साधोनि विंदान । करी हवन अति यत्नें ॥ ७४ ॥
त्यासी देखतांचि दृष्टीं । सारसावल्या वानरकोटी ।
निरसितां आवरणकोटी । रावण दृष्टीं देखिला ॥ ७५ ॥
जेंवी गळामाजी दगड । दिसे गुळाचिसारिखा गोड ।
तोंडी घालितां अवघड । करीत उपाड दातांचा ॥ ७६ ॥
अथवा आंब्याच्या पोटीं । असती रसाची कोटी ।
त्याहिमाजीं अति संकटीं । असे गांठी अति निवर ॥ ७७ ॥
तेंवी कर्म रावणाचें । बाह्यावरण आनंदाचें ।
अंतरीं भाव कपताचे । घोर त्याचें आवरण ॥ ७८ ॥
अहंमुखी आनंदघन । ऐसें जेथें स्फुरे स्फुरण ।
तें जाणावें अभिमानजन्य । तेणें हरिगण मोहिजेती ॥ ७९ ॥
तंव ते निजनिष्ठा सावध । छेदोनी अहंसोहं यांचे बांध ।
पावले ते अगाध बोध । अहंरावणकंद छेदावया ॥ ८० ॥
दृष्टी देखताचि रावण । सरसावले वानरगण ।
घृतीं खवळे हुताशन । तेंवी वानरगण खवळले ॥ ८१ ॥
माथां वाहोनि पुच्छाटी । प्रवेशले यज्ञवाटीं ।
रावण देखोनियां दृष्टीं । दोनी मुष्टीं वळियेल्या ॥ ८२ ॥
तथान्ये चोदकं हव्यं दर्भान्पात्राणि चापरे ।
बलिंच निर्विकीर्याणाः खमुत्पत्य प्लवंगमाः ॥४॥
खवळले वानरकटक । कुंड विझविती एक ।
प्रणीतापात्रीं भरिले उदक । तें कुंडी निःशेष रिचविलें ॥ ८३ ॥
इध्माबर्हि परिस्तरण । तें विखुरती वानरगण ।
होमद्रव्यें भरिलें भाण । घेवोनि गगनि उपरमती ॥ ८४ ॥
रावण निजकार्यार्थी । सावधान अहोरातीं ।
आवरोनी बाह्यवृत्ती । श्रीरामघातीं मंत्र जपे ॥ ८५ ॥
वधावया रामसौमित्र । मंत्र जपतां अव्यग्र ।
मंत्रदेवता भयातुर । स्वयें विचार करीतसे ॥ ८६ ॥
मंत्राधीन माझी शक्ती । जायकाची कार्यस्थिती ।
साधावया शीघ्र गती । जप करिती सावध ॥ ८७ ॥
भाग्यानुसार जाण । मंत्रदेवता प्रसन्न ।
रावणाचें विचित्र चिन्ह । श्रीरघुनंदनवधार्थ ॥ ८८ ॥
श्रीरामें जगाची उत्पत्ती । श्रीरामें जगाची स्थितिगती ।
जगाची निजविश्रांती । जाण निश्चितीं श्रीरामें ॥ ८९ ॥
मंत्रदेवता समस्ता । रामसामर्थ्ये सामर्थ्यवंता ।
कैसेनि होय त्याच्या घाता । मूर्ख तत्वता रावण ॥ ९० ॥
राम जगाचें जीवन । त्याचें करितां हनन ।
भाग्य विमुख झालें जाण । स्वयें रावण मरेल ॥ ९१ ॥
आणिकाची असो गती । राम आमची जीवनस्थिती ।
केंवी प्रवर्तो त्याचे घातीं । लंकापति भ्रमलासे ॥ ९२ ॥
निजमूळातें छेदून । वृक्ष केंवी राहे आपण ।
तुटल्या तळ्याचें जीवन । वांचे मीन हें न घडे ॥ ९३ ॥
श्रीराम जगाचा पिता । त्या पवर्तला पितृघाता ।
यासीं द्यावया प्रायश्चित्ता । याच्या घाता प्रवर्तावें ॥ ९४ ॥
रावणाची शोचनीय अवस्था :
पितृघातका प्रायश्चित्त । वेद बोलला देहांत ।
तोचि साधावया कार्यार्थ । करुं घात रावणाचा ॥ ९५ ॥
म्हणोनि खुंटली वचनावळी । नुच्चारे मंत्रशैली ।
स्वयेंचि बैसली दांतखिळी । दुःखें तळमळी रावण ॥ ९६ ॥
प्राप्तकाळ आला समीप । तंव विझोनि गेला वाग्दीप ।
वर्ण उच्चारेना स्वल्प । कोण पाप ओढवलें ॥ ९७ ॥
शंकरें प्रसन्न । मज दिधलें वरदान ।
शेंखीं उच्चारिना वर्ण । दारुण विघ्न ओढवलें ॥ ९८ ॥
वानरांच्या आक्रमणाने यज्ञात विघ्न :
होमपात्रें फोडिलीं समस्त । त्रिसधानें तोडिली तेथ ।
स्रुवां हातींचा आंसुडत । नामें गर्जत वानर ॥ ९९ ॥
पंचकोश पंचावरण । भेदोनियां अति दारुण ।
अंगीं आदळलें हरिगण । तरी रावण ढळेनां ॥ १०० ॥
अंतरी निग्रहिलीं वृत्ती । येवों नेदी ब्राह्यस्थिती ।
वानर इतस्ततां ओढिती । तरी स्थिति ढळेना ॥ १ ॥
अंगीं आदळतां वानरांसी । रावण विचारी मानसीं ।
विघ्न उठिलें होमासीं । सर्वथा त्यासी मी न मानीं ॥ २ ॥
आटक दुर्ग त्रिकूटाचे । उग्रावरण पंचकोशांचें ।
भोंवतें राखण महावीरांचें । भय तयांचें यमकाळा ॥ ३ ॥
त्याहिमाजी अतर्क्य स्थिती । शस्त्रे गुप्त नभोगती ।
सर्वथा कोणी न लक्षती । पारख्या निवटिती क्षणमात्रें ॥ ४ ॥
येथें यावया वानरगण । सर्वथा नाहीं आंगवण ।
निमेषमात्रें सांडिती प्राण । अर्ध क्षण न लागतां ॥ ५ ॥
दिसतांही वानरकोटी । विघ्न उठलें यज्ञवाटीं ।
यासीं सर्वथा मी नाणीं दृष्टी । म्हणोनि निमटी निजनयन ॥ ६ ॥
गर्वाचा ताठा अंतरीं । तेणें नेत्रासीं अंधारी ।
नेण हरिगणाची थोरी । केली बोहरी निजगर्वे ॥ ७ ॥
सालस्यो गर्वितो निद्रः परहस्तेन लेखकः ।
अल्पविद्यो विवादी च पडेते चात्मघातकाः ॥५॥
कष्टीं तपश्चर्या करितां । प्राप्तकाळ समीप येतां ।
आळस उपजला चित्ता । तरी निजघाता स्वयें केलें ॥ ८ ॥
गर्वाचा ताठा चढला । तेणें विवेक बुडविला ।
त्रिमदें अति मातला । घात केला स्वयेंचि ॥ ९ ॥
धनमद पानपाद । अति मान्यतेचा राजमद ।
तेणें प्राणी होय अंध । कार्यानुवाद नाठवे ॥ ११० ॥
निद्रातुराच्या ठायीं । कार्य स्मरेना पाहीं ।
सकळ सांजवेळ नेणे काहीं । नाडला पाहीं निजहिता ॥ ११ ॥
उपजली मंत्राची आर्ती । लेहूं जातां आणिका हातीं ।
व्यंग लिहिल्या वर्ण व्यक्ती । विघ्नप्राप्ती होय सद्य ॥ १२ ॥
विद्येचें न साधतां ज्ञान । करुं जातां आराधन ।
मंत्रदेवता क्षोभून । सद्य विघ्न पैं करिती ॥ १३ ॥
ज्ञान नाहीं निश्चयात्मक । वाद करुं बैसती एक ।
निजघात तेणेंचि देख । विचार आणिक असेना ॥ १४ ॥
तैसा निजगर्वे भुलला । हरिगणातें न गणी वहिला ।
निजगर्वे नागविला । होमाचा केला निःपात ॥ १५ ॥
इतस्ततां वानर । ओढिताती सैर ।
नेत्र उघडी दशशिर । म्हणे थोर विघ्न उठलें ॥ १६ ॥
तरीही रावण अगदी निश्चळ :
होमकुंडाची झाली शांती । पात्रें नेलीं भस्मांतीं ।
यज्ञोपचार विध्वंसिती । परी लंकापति डंडळीना ॥ १७ ॥
घोरकर्मीं रावण । सर्वथा डंडळीना मन ।
सुखावला तारानंदन । निधडी आंगवण लंकेशा ॥ १८ ॥
युद्धीं श्रीरामासंमुख । केवीं जाय दशमुख ।
म्हणोनियां युवराजा देख । मंत्र अलोलिक योजिला ॥ १९ ॥
मंदोदरीला पीडा देण्याची अंगदाची युक्ती :
जवळी देखिली मंदोदरी । तीस पीडितां झडकरी ।
ध्यान सांडोनि दशशिरीं । महामारीं उठेल ॥ १२० ॥
काढोनि नेऊं रामापासीं । राम निवटील रावणासी ।
कार्य साधेल अनायासीं । म्हणोनि केशीं धरियेली ॥ २१ ॥
दृष्ट्वाथ रावणं सर्वमिदमाहांगदो वचः ।
इमां मंदोदरीं पार्श्वे नयामि तव पश्यतः ॥६॥
या ते शक्तिर्बलं वीर्यं तेन तिष्ठ त्वमग्रतः ।
कृत्वा शिरसि पादं ते नयाम्येनां स्त्रियं तव ॥७॥
वानर करतां आकर्षण । डंडळीना तो रावण ।
तेणें अंगद क्षोभून । केलें विंदान तें ऐका ॥ २२ ॥
हाका मारोनि वेगेंसीं । बोलता झाला रावणासी ।
मंदोदरी धरानि केशीं । श्रीरामापासीं पैं नेतों ॥ २३ ॥
रावणा ऐकें तत्वतां । तुझ देखतां तुझी कांता ।
धरोनि नेईन मी आतां । करीं साटोपता युद्धासी ॥ २४ ॥
श्यामवदन लंकापती । लांछन लागलें तुझे शक्ती ।
चोरोनि आणिली सीता सती । वीरवृत्ती न करवेचि ॥ २५ ॥
तैसें मी करीं जाणां । तुज देखतां तुझी अंगना ।
नेईन करीन विटंबना । श्रीरघुनंदनासमीप ॥ २६ ॥
मी रामाचा दूत । निंद्य कर्म न करीं निश्चित ।
तुझा माथां देवोनि लाथ । नेईन ओढित पैं आतां ॥ २७ ॥
सामर्थ्य असेल शरीरीं । तरी सोडीवीं मंदोदरी ।
नाककानां करोनि बोहरी । नेतों अंतुरी मी तुझी ॥ २८ ॥
म्हणोनि केलें खस्ताव्यस्त । झोंटीं धरोनि ओढित ।
तेणें ते झाली दुःखित । आक्रंदत अति थोर ॥ २९ ॥
ततो मंदोदरी दीना रावणं वाक्यब्रवित् ।
किं न पश्यसि मां राजन्ननाथां त्वयि जीवति ॥८॥
मंदोदरीच्या आक्रोशाने रावणाचा संताप :
वानर करितां खस्ताव्यस्त । मंदोदरी आक्रंदत ।
रावणाप्रति सांगत । कासया भ्रांत झालासी ॥ १३० ॥
जेंवी जळामाजील लता । गज रिघोनि मदीं समस्ता ।
वानरें तेंवी करितां खस्ता । प्राण तत्वतां जाईल माझा ॥ ३१ ॥
जळो तुझी शौर्यशक्ती । जळो तुझी निजकीर्ती ।
जळो तुझी यज्ञस्थिती । झांकिसी किती निजनयनां ॥ ३२ ॥
वानरीं घेतलें घर । दुर्गी विचरती अति सैर ।
विध्वंसिले यज्ञोपचार । पात्रें समग्र फोडिलीं ॥ ३३ ॥
तुज करितां खस्ताव्यस्त । सावध नव्हे तुझें चित्त ।
रामविरोधें केलें भ्रांत । कांही स्वहित स्फुरेना ॥ ३४ ॥
चोरोनियां सीता सती । व्यर्थ द्वेषिला रघुपती ।
जीवित्वाची खुंटली गती । केली शांती निजकर्मे ॥ ३५ ॥
पुत्र प्रधान मारविले । सैन्य सेनानी जीवें गेले ।
वंधूंसीं विटंबन केलें । जीवें घेतलें कुंभकर्णा ॥ ३६ ॥
दुर्धर बाणींकरुन । तुज निवटितां रघुनंदन ।
न लगे रे अर्ध क्षण । आतां हवन तें काय ॥ ३७ ॥
असो तुम्ही मरणगोष्टी । मज वानरीं घातली मिठी ।
कोणाप्रति सांगो गोष्टी । कोण संकटीं सोडवील ॥ ३८ ॥
तूं जीत असतां शिरावरी । मज दीन केलें वानरीं ।
ओढिती धरोनि केशग्रीं । पीडा भारी करिताती ॥ ३९ ॥
शिरावरी असतां कांत । ज्याची अंगना अनाथ ।
जळो त्या पतीचें जीवित । अति निंदित लौकिकीं ॥ १४० ॥
जीत असतां इंद्रजित । रणकंदन करिता येथ ।
दावोन निजपुरुषार्थ । मज त्वरित सोडविता ॥ ४१ ॥
जीवें निमाला रावण । म्हणोनि मजलागी जाण ।
पीडिताती वानरगण । अति गर्जोन आक्रंदे ॥ ४२ ॥
जरी असतां जीवें जीत । तरी करोनि पुरुषार्थ ।
मज सोडविता येथ । रावण निश्चित निमाला ॥ ४३ ॥
म्हणोनि आक्रंदे गोरटी । वानरीं बांधिली शकुनगांठी ।
पतिव्रतेच्या वाक्पुटीं । निगाली गोष्टी ते सत्य ॥ ४४ ॥
म्हणोनि देती आरोळी । गर्जती नामाच्या कल्लोळीं ।
तेणें रावणाची दांतखिळी । उखळली तत्काळ ॥ ४५ ॥
स्त्रीमोहाचे दुष्परिणाम :
स्त्रियांचे मोहक बोली । कोण कोणा न पडे भुली ।
सिद्ध मिळविले धुळी । विकल्पबोलीं स्त्रियेच्या ॥ ४६ ॥
भस्मासुरासी मोहिनी । भेटोनियां तत्क्षणीं ।
क्षणें मारिला मोहोनी । न मागतां पाणी निमाला ॥ ४७ ॥
श्रीशुकाची अगाध स्थिती । वचनमात्रें निश्चितीं ।
क्षणें नेलीं भस्मांती । निमेषगती न लगतां ॥ ४८ ॥
तेथें रावण बापुडें तें किती । क्षणें आणिलें बाह्यवृत्ती ।
मोकळी झाली वचनोक्ती । तेही स्थिती अवधारा ॥ ४९ ॥
रामनामाच्या कल्लोळीं । मंत्रदेवता मुक्त झाली ।
तिणें झोडिली वचनावळी । बोलावया बोली पैस झाला ॥ १५० ॥
मग उठिला सत्वर । दांत खातसे करकर ।
नेत्र दिसती रक्तांबर । अति भ्यासुर भासती ॥ ५१ ॥
क्रोधें बोलें अंगदासी । स्त्रियेसी धरोनियां केशीं ।
व्यर्थ कारे ओढितोसी । अधम होसी वीरांत ॥ ५२ ॥
जेणें स्त्रियेसी दंडणें । त्यासी वीर कोण म्हणे ।
धिक् धिक् त्याचें जिणें । वृथा पीडणें स्त्रियेसी ॥ ५३ ॥
अंगदाचें प्रत्युत्तर :
ऐकोनि त्याचिये गोष्टीसी । अंगद निर्भत्सीं तयासी ।
मुख दाखवितां न लाजसी । उंच बोलसी नाकाडें ॥ ५४ ॥
भिकेचेनि मिषें तत्वतां । चोरोनि नेतां पैं सीता ।
मार्गी घोळसिलासि पैं येतां । लाज सर्वथा तुज नाहीं ॥ ५५ ॥
माता म्हणसी जियेसी । तिसी भोगूं पहासी ।
पापें मेळविलें धुळीसी । पुत्रसैन्यासी मारविलें ॥ ५६ ॥
ऐशा अंगदाच्या उत्तरीं । रावण पोळला अंतरीं ।
धरिली देखतां मंदोदरी । क्रोध शरीरीं चढिन्निला ॥ ५७ ॥
तच्छ्रत्वा रावणः कुद्धो दृष्ट्वा रुद्धां प्रियां तदा ।
अंगदं मुष्टिना जघ्ने मूर्ध्नि सद्यः पपात ह ॥९॥
मुष्टी वळोनि आवेशी । धांव घेवोनि वेगेंसीं ।
माथां हाणितां अंगदासीं । मूर्च्छा तयासीं पैं आली ॥ ५८ ॥
तें देखोनि मारुती । अंतरिक्षनभोगती ।
तो येवोनियां लंकापती । भुजांतराप्रती ठोकिला ॥ ५९ ॥
रावणाच्या यज्ञाचा विध्वंस व रावणाला मूर्च्छा :
तेणें गेला चांचरी । डोळियां आली अंधारी ।
आंग जातसे भंबेरी । रावण धरेवरी पडों पाहे ॥ १६० ॥
मूर्च्छा भांजोनि अंगद । तत्काळ झाला सावध ।
हृदयीं दाटला आनंद । कार्य सिद्ध पैं झालें ॥ ६१ ॥
विध्वंसिलें यागासी । उठविलें रावणासी ।
आतां नेल्या रामापासीं । क्षणार्धेसीं निवटील ॥ ६२ ॥
श्रीरामनामें गर्जत । अति बळियाढे रामभक्त ।
रावण केला सावचित्त । याग समस्त नासोनी ॥ ६३ ॥
एका जनार्दना शरण । विध्वंसिला रावणयज्ञ ।
करोनि मंदोदरीशांतवन । युद्धा रावण निघाला ॥ ६४ ॥
रसाळ कथानिरुपण । अति रम्य रामायण ।
एका विनवी जनार्दन । श्रोतीं अवधान मज द्यावें ॥ १६५ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
रावण यज्ञविध्वंसनं नाम अष्टपंचाशत्तमोऽध्यायः ॥ ५८ ॥
ओंव्या ॥ १६५ ॥ श्लोक ॥ ९ ॥ एवं ॥ १७४ ॥