अध्याय 59
रावणाचे युद्धार्थ आगमन
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
रावण सावध होऊन मंदोदरीला धीर देतो, सांत्वन करितो :
निजमूर्च्छा सांवरुन । सावध झाला रावण ।
तंव पुढें विझालें हवन । रावणें आपण देखिलें ॥ १ ॥
सखळ यज्ञसामग्री । वानरीं केली बोहरी ।
तें देखोनि दशशिरीं । क्रोध शरीरीं चढिन्निला ॥ २ ॥
मंदोदरी स्वयें रडत । देखोनियां लंकानाथ ।
स्वयें तीस शांतवीत । निजपुरुषार्थ बोलोन ॥ ३ ॥
साभिमानैर्वचोभिस्तां सांत्वयन्निदमब्रवीत् ।
कींरोदिषि शुभे दीनं मायि जीवति मानिनि ॥१॥
न मे किश्चित्समो युद्धे त्रिषु लोकेषु भामिनि ।
सेंद्राः सुरगणाःसर्वे तिष्ठंति हि वशे मम ॥२॥
किमल्पसारैः शक्योऽहं जेतुं वानरमानुषै ॥३॥
निजाभिमानें दशानन । मंदोदरीप्रति वचन ।
करोनि तिचें शांतवन । स्वयें आपण बोलत ॥ ४ ॥
सुमंगले मंदोदरी । व्यर्थ रुदनातें न करीं ।
तुज खस्ता केली वानरीं । त्यांची बोहरी करीन मी ॥ ५ ॥
शुभानने परियेसीं । संग्रामीं संमुख मजसीं ।
रणा न येववे कोणासी । दैत्यदानवांसी कोण गणी ॥ ६ ॥
इंद्रादि सुर समस्त । बंदिगृहीं सेवा करित ।
ब्रह्मा माझा नित्यांकित । नित्य पढत शांतिपाठ ॥ ७ ॥
तेथें अल्पशक्ति किंकर । मानव आणि वनचर ।
रणा येती मजसमोर । हें उत्तर घडेना ॥ ८ ॥
तुजदेखतां भामिनी । वानरमानवांच्या श्रेणी ।
क्षणें पाडीत मी रणीं । न्हाणीन धरणी अशुद्धें ॥ ९ ॥
माझे क्रोधदृष्टीपुढें । केंवी राहती माकडें ।
आतां रणीं पाडीन लोंढे । निजनिवाडें पाहें तूं ॥ १० ॥
वानरमानवांच्या भूतळीं । शिरांची खेळेन चेंडूफळी ।
अशुद्धाचा टिळा तत्काळीं । लावीन निढलीं पैं तुझ्या ॥ ११ ॥
जिहीं हातीं निश्चित । तुज केलें खस्ताव्यस्त ।
ते उपडीन समस्त । तुज देखत भामिनी ॥ १२ ॥
हातांपायांची कांडोरीं । शिरांच्या वढवाळी थोरी ।
तुजदेखतां करीन जरी । तरीच निर्धारीं मी रावण ॥ १३ ॥
निवटोनियां वानरगण । रामसौमित्रांच्या रुधिरें जाण ।
तुझ्या दुःखाचें क्षाळण । करीन आपण सुंदरी ॥ १४ ॥
इति तां शोकसंतप्तां सांत्वयित्वा तु रावणः ।
रथमारुह्य वेगेन निर्जगाम रणं प्रति ॥४॥
स क्रुद्धः कवची खड्गी शरी धन्वी तथैव च ।
तस्य निष्कममाणस्य दग्धुकामस्य रोदसी ॥५॥
रावणाने केलेली घोर प्रतिज्ञा :
आजि पृथ्वी अरावण । कीं अराम देखसी जण ।
म्हणोनि गर्जतां आपण । करी सांत्वन मंदोदरीचें ॥ १५ ॥
ऐसी दुःखसंतप्त मंदोदरी । तिसीं रावणें बहुतांपरी ।
शांतवोनि अति कुसरीं । गिरागजरीं गर्जिन्नला ॥ १६ ॥
आजि श्रीरामातें रणीं । बाणेंकरीं भंगाणी ।
झणें भय धराल कोणी । पहा करणी करीन ते ॥ १७ ॥
रावणाकडून सैन्य सिद्ध करण्याची आज्ञा :
कुचा भवंडिला सैन्यासीं । सिद्ध व्हावें वेगेंसीं ।
उठा चला रणभूमीसीं । रामसौमित्रासी वधावया ॥ १८ ॥
घावो घातला निशाणा । वेगें पालाणा पालाणा ।
आवेश आलासे रावणा । रणांगणा जावया ॥ १९ ॥
दीपा अस्त होतां पाहें । प्रकाश अधिकाधिक होये ।
तैसें रावणा झालें आहे । गर्जताहे अति गर्वे ॥ २० ॥
पुष्पाचें जें विकासणें । तेंचि त्याचें सुकणें ।
तेंवी रावणाचे गर्जणें । जीवें मरणें तत्काळ ॥ २१ ॥
विजु प्रकाशातें पावणें । तोचि तिसीं अस्त होणें ।
तैसें मांडिले रावणे । निजमरणें गर्जत ॥ २२ ॥
काठीकार सैरां धांवती । सैन्य सन्नद्धबद्ध करिती ।
रणा निघाला लंकापती । शीघ्रगती चालिला ॥ २३ ॥
म्हणोनियां त्वरित । सोटेमार करी दूत ।
तेणें नगरीं अति आकांत । कळकळित नरनारी ॥ २४ ॥
नगरीं होत रणवळसा । पिया झोंबती प्राणेशा ।
मागुती देखावया ऐसा । धीर सहसा उपजेना ॥ २५ ॥
प्रजाजनांचे आक्रंदन :
आम्ही काय करुं आतां । आम्हासी कोण निरुपिता ।
मरण आलें लंकानाथा । सांगाती तत्वता करीतसे ॥ २६ ॥
आतां आम्हीं करणें कायी । तुम्हासी पाहों कोणे ठायीं ।
म्हणोनि कंठीं झोंबती पाहीं । लोळणी तिही घातली ॥ २७ ॥
कांतेप्रति कांत सांगत । देह पोशिला दिवस बहुत ।
रावणाचे वेतन खात । त्यासीं रणांत सोडू नये ॥ २८ ॥
जळो तयाचें वेतन । पोत भरुं भिक्षा करुन ।
रणा नवजावें आपण । म्हणोनि चरण वंदिती ॥ २९ ॥
तंव दूत हाणिती पाठीवरी । ओढून काढिती बाहेरी ।
शंखस्फुरण घरोगरीं । नरनारीं कळकळिती ॥ ३० ॥
वानरसैन्याला आनंद व त्यांचा युद्धाचा आवेश :
काळें तोंड लंकानाथा । चोरुन आणिली सती सीता ।
आतां मरावया जातां । सवें समस्तां नेतसे ॥ ३१ ॥
तें ऐकूनि हरिगण । देती रामनामें किराण ।
श्रीरामासंमुख दशानन । युद्धालागून निगाला ॥ ३२ ॥
आता कायसी खटपट । कासया पडखळूं दशकंठ ।
म्हणोनि हरिखले मर्कट । देती उद्भट किराण ॥ ३३ ॥
रावणसैन्याची सिद्धता :
तंव रावणदळ समस्त । सन्नद्धबद्ध झालें तेथ ।
वाद्यें लागलीं अद्भुत । नादें गर्जत भूगोळ ॥ ३४ ॥
तुरें लागलीं विविध । अनुहताचा निजनाद ।
ध्वनि उठल्या बहुविध । भाग्य विविध रावणाचें ॥ ३५ ॥
भेरी मृदंग निशाण । गुजबुजी गिडिबिडी जाण ।
काहळा चिनकाहळा दारुण । भोंगळा सत्राण त्राहाटिल्या ॥ ३६ ॥
वीणा वेणु झल्लरी । नाद उठिला अति गजरीं ।
विराणीं वाजती एकसरीं । नादाभीतरीं मन निवे ॥ ३७ ॥
रणनोवरा दशशिरी । पर्णावया मोक्षनारी ।
निगालासे झडकरी । अनुहतगजरी लावोनियां ॥ ३८ ॥
सन्नद्ध चतुरंगसेना । सवें सकळ युद्धरचना ।
शस्त्रास्त्रांची विवंचना । खडतर जाणा सांगातें ॥ ३९ ॥
विचित्र कवचांचे भार । खड्ग तोमर लहडीचक्र ।
गदा मुद्गल अपार । सर्वे गाढे भार चालिले ॥ ४० ॥
विचित्र शस्त्रांचिया जाती । त्रिशूळ चेंडु झेलिती किती ।
एव वीर परिघहाती । पागोरे पिटिती भिंडिमाळा ॥ ४१ ॥
गाडे भरोनि अपार शर । सुवर्णबंदी कोदंडभार ।
ज्यांचा ऐकतां टणत्कार । कांपे थरथर त्रिलोक ॥ ४२ ॥
अस्त्रदेवता समस्ती । भेणेंचि सवें चालती ।
विपायें वांचला लंकापती । करील शांति सकळांची ॥ ४३ ॥
येणें भयेंकरोनि जाण । संमत्र अस्त्रदेवतागण ।
स्वयें चालवी दशानन । विचित्र विंदाण सेनेचें ॥ ४४ ॥
ध्वजा पताका अंबरी । भाले झळकती चवरी ।
दिव्य छत्रें सैन्यावरी । राक्षसभारीं अति शोभा ॥ ४५ ॥
महामदें दाटले गजघट । वारुंचा वाजिन्नला साट ।
रथचक्रातळीं सपाट । होती पीठ पर्वत ॥ ४६ ॥
पुत्रप्रधानाचें दुःख । स्त्रियेची खस्ता अलोलिक ।
आठवोनि दशमुख । क्रोधें देख कांपत ॥ ४७ ॥
साधावया श्रीरामासी । रथीं बैसतां रावणासीं ।
रुप वाढिन्नलें आकाशीं । देखतां लोकांसी पळ सुटे ॥ ४८ ॥
सैन्य चालिलें अति गजरीं । यावा दाविला स्वारीं ।
हो हो मा मा जीजीकारीं । वारु कुसरीं नाचती ॥ ४९ ॥
सैन्य चालिलें घनदाट । अश्वगजांचे पैं थाट ।
सैन्यरथांचे घडघडाट । रजें अंबर कोंदलें ॥ ५० ॥
दुश्चिन्हांचा आविष्कार :
दिवि भुवि अंतराळ । दिशांच्या पोकळ्या सकळ ।
रजें कोंदलें जगतीतळ । रविमंडळ झांकलें ॥ ५१ ॥
दिवसाच पडिला अंधार । रजें बुडाले पैं नेत्र ।
दुर्निमित्तें थोर थोर । तेथें सत्वर ऊठिलीं ॥ ५२ ॥
निमित्तानि च तत्रासन्भयशंसीनि सर्वतः ।
प्रतिलोमो ववौ वायुर्मंदरश्मिर्दिवाकरः ॥६॥
सागरश्चुक्षुभुश्चैव चकंपे च वसुंधरा ।
जानुभिः पेतुरश्वाश्च बाप्पबिंदूनथामुचन् ॥७॥
तानुत्पानचिंत्यैव रावणः क्रोधमूर्च्छितः ।
सशरं धनुरादाय रणभूमिं विवेश ह ॥८॥
शिखाकेत अग्निकेत । गगनीं उठिले धूमकेत ।
तयांमाजी उल्कापात । अकस्मात ऊठिले ॥ ५३ ॥
नक्षत्रें पडती टळटळां । भूकंप होतसे वेळोवेळां ।
भालू भुंकती समकाळा । अग्निज्वाळा वमूनियां ॥ ५४ ॥
हनुमंते पूर्वी प्रबोधिला । तो आठव धरोनि वहिला ।
प्रतिकूळ वायु सुटला । उडवूं लागला राक्षसां ॥ ५५ ॥
वस्त्रें उडती आकाशा । वायु भरला राक्षसघसां ।
प्राण परतेना सहसा । थोर दुर्दशा रावणा ॥ ५६ ॥
धुळीं भरले डोळे । स्वसैन्य परसैन्य न कळे ।
पुढें पाऊलही न उचले । भुलविलें सकळांसी ॥ ५७ ॥
रवि मंदरश्मि झाला पाहीं । दिशा धुंदल्या सर्वही ।
सागरींचे जळ तेंही । लवलाही उचंबळलें ॥ ५८ ॥
ऐंसी दुश्चिन्हे जितुकीं । सकळही रावणकटकीं ।
प्रवेशलीं एकाएकीं । तेणें दशमुखी सचिंत ॥ ५९ ॥
रावण उद्विग्न होतो :
म्हणे शंकराचें वचन । मिथ्या करुं शके कोण ।
यज्ञा उठिलिया विघ्न । घात संपूर्ण कर्त्याचा ॥ ६० ॥
तें आजि दिसते फळ । दुर्निमित्तें जी प्रबळ ।
येथें दिसताती सकळ । समग्र दळ व्यापिलें ॥ ६१ ॥
ऐसा झाला सचिंअत । दुर्निमितें भ्रमिभूत ।
क्षण एक झाला लंकानाथ । अति आकांत वर्तला ॥ ६२ ॥
रावण स्वतःला सावरुन सैन्याला धीर देतो :
सवेंचि सावध होवोनि पाहीं । विचारीं आपुल्याच ठायीं ।
म्हणे दुश्चिन्हीं भय कायी । युद्धाच्या ठायीं शूरासी ॥ ६३ ॥
सुचिन्हामाजी शंकर । तो दुश्चिन्हीं काय गेला दूर ।
व्यर्थ पामराचा विचार । मी चिंतातुर लटकाचि ॥ ६४ ॥
रांडवे बायलेच्यापरी । चिंतातुर मी शरीरीं ।
जळो माझी सामर्थ्यथोरी । काय संसारी जीतसें ॥ ६५ ॥
म्हणोनि झाला सावध । निजसैन्या करीत बोध ।
मिथ्या उठिलें हें द्वंद्व । त्याचा विषाद न मानवा ॥ ६६ ॥
शिवें पाहो आदरिलें व्रत । युद्धीं लागलिया आघात ।
रणीं दुश्चित कीं सावचित्त । निश्चितार्थ पहावया ॥ ६७ ॥
तें शंकरकृपा आम्हांसीं । आपेंआप फळली कैसई ।
आम्हासंमुख विघ्नांसी । रहावयासी तोंड कैंचे ॥ ६८ ॥
बाप कृपाळु शंकर । विघ्न निरसिलें समग्र ।
भिवो नका चला शिघ्र । नरवानर निवटावया ॥ ६९ ॥
ऐसें सांगोनि सैन्यासी । आश्वासोनि तयासी ।
संमुख जातां रणभूमीसीं । रथ तोंडघसीं आदळला ॥ ७० ॥
पुनः विघ्नांचा उत्पात व रावणाचा आवेश :
विषमस्थळ नसतां जाण । भूमि असतां समान ।
वारू चालतां स्यंदन । आडखळोन पडियेला ॥ ७१ ॥
आवरितां सारथ्यासी । वारु पडले तोंडघसीं ।
तेणें चिंता रावणासी । निजमानसीं वर्तली ॥ ७२ ॥
तथापि वीरवृत्ती करून । साटोप धरोनि रावण ।
वारू उठविले जाण । उदकसिंचन करोनियां ॥ ७३ ॥
अश्वांचिया नेत्रद्वारा । अश्रुबिंदु स्रवती सैरा ।
ते पुसोनि वेगवत्तरा । रहंवर संजोगिले ॥ ७४ ॥
वीर रावण जगजेठी । विघ्नें घालोनियां पोटीं ।
धनुष्यबाण धरोनि मुष्टीं । क्रोधें कडकडाटीं चालिला ॥ ७५ ॥
आठवोनि पुत्रांचें निधन । धाकुटा बंधु कुंभकर्ण ।
प्रहस्तादि प्रधान । सकळ सैन्य निमलें ॥ ७६ ॥
करोनि तयांची आठवणी । क्रोधें झाला काळाग्नी ।
प्रवेशला रणांगणीं । देवोनि पाणी सर्वस्वा ॥ ७७ ॥
राज्याशा आणि जीविताशा । सांडूनि भोगाची भोगाशा ।
सांडून ऐश्वर्याची आशा । विरक्त सर्वस्वा रावण ॥ ७८ ॥
केवळ क्रोधाचें निजशरीर । तेणें रुपा आला दशशिर ।
जेंवी मध्यान्हीं अति उग्र । दिसे खडतर भास्वत ॥ ७९ ॥
माध्यान्हकाळींचा रवी । सहसा होय दुर्निरीक्ष्य जेंवी ।
तैसा अति क्रोधाविर्भावी । दशग्रीव भासे ॥ ८० ॥
अंतरींचें निजसामर्थ्य । तेणें करोनि प्रदिप्त ।
रणीं गर्जोनि लंकानाथ । काय बोलत रामासी ॥ ८१ ॥
राम त्वं तु समाश्वस्तः समाश्वस्तस्तथाप्यहम् ।
कुर्वे त्वया समं युद्धं तिष्ठेदानीं स्थिरो भव ॥९॥
वीरश्चास्मि सुसंवृत्तस्त्वत्सकाशादरिंदम ।
क्रमेण परिनष्टो ह्यस्तेनाहमपयातवान् ॥१०॥
नाहं बिभ्ये सुराणां हि समस्तानामपि प्रभो ।
किं पुनर्वानराणां तु येशामाश्रयिता भवान् ॥११॥
श्रीरामांवर बाग्बाणांचा वर्षाव आणि रावणाची आत्मप्रौढी :
रामा तुझे पोटीं । युद्ध करणें कडकडाटीं ।
ते आजि साधिली गोष्टी । झणीं पाठी देवोनी पळसी ॥ ८२ ॥
बहुतां दिवसांची माझी । असोसी फळली आजी ।
राम सांपडला झुंजी । पुण्यपुंजी फळा आली ॥ ८३ ॥
सावध ऐकें रघुनंदन । होऊं नको पलायमान ।
जितकी असे आंगवण । तैसें रण करीन आजि ॥ ८४ ॥
पूर्वी मजपासून पळाला । तो मागुतेनि रणा आला ।
आतांही पळवीन वहिला । झणें या बोला भ्रमसील ॥ ८५ ॥
तरी एक वेळ ऐसें जाहलें । रथसारथि वारु मेले ।
म्हणोनि पलायन घडलें । तें सर्वथा पहिलें विसरावें ॥ ८६ ॥
मी न भियें देवांसी । दृष्टी नाणीं दानवांसी ।
तेथें कोण गुणी तुम्हासी । जिहीं वानरांसी आश्रयिलें ॥ ८७ ॥
पालेखाइरीं मर्कटें । रणा आलासी त्यांच्या नेटें ।
घाव घालतां अवचटें । अति संकटें मराल ॥ ८८ ॥
वीरवृत्तीचा गर्व बहुत । तुजमाजी असे नांद ।
तेणें रणवीरां न गणित । तो पुरुषार्थ आजि दावीं ॥ ८९ ॥
लक्ष्मणाने रावणाची केलेली नालस्ती :
ऐसें बोलतां दशानन । उत्तर नेदी रघुनंदन ।
जेंवी वायसाचें वचन । सांडी उपेक्षोन राजहंस ॥ ९० ॥
सिंह देखोनि वाडेंकोडें । श्वान भुंके पुढें पुढें ।
तेंवी श्रीराम रावणाकडे । न पाहे कोडें हांसोनी ॥ ९१ ॥
काकुत्सथोपि महातेजाः श्रुत्वा रावणभाषितम् ।
न किंचिदुक्त्वा धर्मात्मा तस्थौ संग्राममूर्धनि ॥१२॥
लक्ष्मणःक्षोभयामास धिक्कृत्य तु दशाननम् ।
लक्ष्मणस्य वचः श्रुत्वा संपीडितमनास्तदा ॥१३॥
रावणाच्या तिखट उत्तरीं । राम न भीच रणकेसरी ।
जेंवी सिंहापुढें कोल्हाळ करी । निजगजरीं शूकर ॥ ९२ ॥
तें देखोनि लक्ष्मण । क्रोधें झाला देदीप्यमान ।
निर्भर्त्सिला रावण । काळें वदन पैं तुझें ॥ ९३ ॥
निर्लज्जा न लाजसी दशकंठा । हीन दीन संग्रामनष्टा ।
वृथा वाढलासी मांसें मोठा । धर्मनष्टा दुरादारा ॥ ९४ ॥
वृथा बोल बोलसी किती । करोनि दावीं रणख्याती ।
जाणवेल तुझी शक्ती । शस्त्रप्रयुक्तिपर्यावो ॥ ९५ ॥
महाशूरांचें लक्षण । करोनि दाविती रणकंदन ।
वृथा वल्गोनि काय कारण । भुंके श्वान तैसा तूं ॥ ९६ ॥
त्यामुळे रावणाचा क्रोधावेश :
ऐकोनि सौमित्रवचन । क्रोधें खवळला रावण ।
घृतें खवळे हुताशन । तेंवी दशानन क्षोभला ॥ ९७ ॥
नेत्र भवंडी गरगरां । दांत खात करकरां ।
मस्तक पिटी सैरां । या रघुवीरा काय करुं ॥ ९८ ॥
आतां काय करुं विंदान । माजवीन रणांगण ।
तृप्त करीन भूतगण । तैं रावण मी सत्य ॥ ९९ ॥
ऐसें बोलतां लंकानाथ । भूतें शकुन मानित ।
रावणें भूतगण तृप्त । भाष्य वदत वाग्देवी ॥ १०० ॥
क्रोधें खवळोनि रावण । धनुष्यमुष्टि सज्जन ।
वेगीं चढवोनियां गुण । सीतीं बाण लाविला ॥ १ ॥
बाण ओढोनियां कानाडी । गर्जोनियां हाक फोडी ।
श्रीरामा साहें माझी वोढी । रणनिर्वडी पुरुषार्थ ॥ २ ॥
राक्षस व वानरांचें भयंकर युद्ध :
तंव उठावलें सकळ दळ । रणीं उठला हलकल्लोळ ।
भिडती राक्षस गोळांगूळ । युद्ध तुंबळ मांडलें ॥ ३ ॥
राक्षस बळें हाणिती काती । वानर हाते झेलिती ।
फिरवोनि तेचि ओपिती । लोळवित राक्षसां ॥ ४ ॥
राक्षस ओपिती भाले । फुटती वानरांचीं कपाळें ।
अशुद्धें दिसती बंबाळें । सर्वांग निथळ वानरांचें ॥ ५ ॥
गैरिकादिक धात । ओहळतां शोभे पर्वत ।
तेंवी वानरसैन्याआंत । शोभा अद्भुत वानरां ॥ ६ ॥
तुतती वानरकपाळें । पुच्छें कमळोनि बळें ।
सवेंचि भिडती गोळांगुळें । श्रीराम बळें अनिवार ॥ ७ ॥
घावो लागे जेथ जेथ । श्रीरामचरणरज लाविती तेथ ।
तेणें कानपोनियां खत । नामें गर्जत मारिती ॥ ८ ॥
भाले त्रिशूळ मुद्गर काती । राक्षस निजबळें हाणिती ।
तें देखोनि जुत्पती । स्वयें विटाविती राक्षसां ॥ ९ ॥
वांकुल्या दावोनि तयांकडे । सवेंचि हाणिती पर्वतखडे ।
नामें गर्जती माकडें । भिडती निवाडें रणमारा ॥ ११० ॥
भिंडिमाळांचे पांगोरे । राक्षस हाणिती तोमरें ।
धोंडे गुंडे पर्वतशिखरें । घेवोनि वानरें ठोकिती ॥ ११ ॥
वीर खवळले अति क्रोधें । रणीं मातले रणमदें ।
एक नाचती युद्धछंदें । रणछंदे तळपती ॥ १२ ॥
थरक सरक उड्डाण । ओढणें धडकती तळपोन ।
वानर देवोनि किराण । नेती हिसडोन हातियेरें ॥ १३ ॥
घायीं पडती वानरगण । ते श्रीरामपदरजेंकरुन ।
तत्काळ होती सावधान । करिती गर्जन रामनामें ॥ १४ ॥
राक्षस पडती घायीं । त्यांसी उठविता कोणी नाहीं ।
राक्षसांचें सैन्य सर्वही । वानरीं पाहीं निवटिलें ॥ १५ ॥
रामांच्या हस्ते निधन होणारे भाग्यवंत राक्षस :
श्रीरामाच्या दृष्टीपुढें । महावीर रणीं निधडे ।
घायिं पडलें वाडेंकोडें । भाग्य केवढें सांगो मी ॥ १६ ॥
श्रीरामासंमुख रणांत । युद्धीं वीर ते पडत ।
त्यांच्या युद्धाचा निश्चितार्थ । सावचित्त परिसावा ॥ १७ ॥
घायीं शिर एक तुटलें । चढोनि इंद्रपदा गेलें ।
तेथील सुख नश्वर देखिलें । मग परतलें रामाकडे ॥ १८ ॥
श्रीरामदृष्टीपुढें । स्वर्गसुख तें बापुडें ।
श्रीरामचरणीं सुख गाढें । जन्ममरण पुढें असेना ॥ १९ ॥
एक शिर हो उसळलें । सत्यलोकापर्यंत गेलें ।
भोगक्षयें पतन देखिलें । मग परतलें रामाकडे ॥ २० ॥
आब्रह्मभुवनलोक । भोग तितुका कामनात्मक ।
ऐसें गीतावचन देख । म्हणोनि शिर परतलें ॥ २१ ॥
शिर उसळलें तुटोन । वैकुंठपर्यंत गेले उडोन ।
नावडे एकदेशी स्थान । धिक्कारुन परतलें ॥ २२ ॥
सलोकसमीपस्वरुपता । वोसंडोनि सायुज्यता ।
श्रीरामचरणीं जीव अर्पितां । निजमुक्तता सहजचि ॥ २३ ॥
शिरें तुटोनि झडकरी । उडोनि जाती लोकांतरीं ।
तेथून परतती माघारीं । रामचरणांवरी स्वयें पडती ॥ २४ ॥
श्रीरामाचरणांपुढें । वैकुंठ कैलास नावडे ।
म्हणोनि हरिखे शिर मुरडे । चरणांवरी पडे श्रीरामाच्या ॥ २५ ॥
श्रीराम दृष्टी देखतां । भलत्याचेनि हातें मरतां ।
चहूं देहां देवोनि लाता । निजमुक्तता पावती ॥ २६ ॥
स्थूळ लिंग आणि कारण । चवथा देह महाकारण ।
निरसून तयांचें भान । श्रीरामचरण सेविती ॥ २७ ॥
शिरें परतोनि मागुती । श्रीरामातें ओंवाळिती ।
येवोनि चरणावरी पडती । उत्तीर्ण होती चहूं देहां ॥ २८ ॥
मागिले जन्माचें उसणें । वीर काढिती श्रीरामचरणें ।
उसण्याघायीं संकुख मरणें । नन्ममरणधरणें उठविती ॥ २९ ॥
तें देखोनि समस्तां । वीरां आवेश बहुतां ।
युद्ध् करितां साटोपता । फाडावया खता जन्माच्या ॥ १३० ॥
युद्ध करितां महावीरीं । सरली शस्त्रास्त्रांची सामग्री ।
मग मल्लयुद्धकुसरी । वीरीं वानरीं मांडिली ॥ ३१ ॥
सडका घालिती परस्प्रीं । थडका हाणिती येरयेरीं ।
उरीं शिरीं खांदी कोपरीं । जानूंवरी ताडिती ॥ ३२ ॥
एक ते मागें सरती । छागयुद्धें सवेंचि भिडती ।
अंगीच्या रोमा पिंजारिती । मग मिसळती कुक्कुट जैसे ॥ ३३ ॥
युद्ध करिती विविध । घारयुद्ध श्येनयद्ध ।
मार विविध पैं त्यांचा ॥ ३४ ॥
मागें फिरती वाडेंकोडें । परतोनि हाणिती लाताडें ।
त्यांसी पायीं धरिती माकडें । भवंडोनि कोडें त्राहाटिती ॥ ३५ ॥
मरतां राक्षस बोलती । श्रीरामें थोर युद्धख्याती ।
युद्धीं परमानंद प्राप्ती । सायुज्य मुक्ती पावलों ॥ ३६ ॥
युद्ध नव्हे हा परमानंद । रण नव्हे आनंदकंद ।
राम ओळला सच्चिदानंद । अगाध बोण रणरंगीं ॥ ३७ ॥
राम परमामृत पुतळा । राम मुक्तीचा जिव्हाळा ।
राम आनंदाची कळा । पाळी लळा सकळांचा ॥ ३८ ॥
द्वेषबुद्धीं युद्ध करितां । वैरिया दे सायुज्यता ।
अगाध बोध रघुनाथा । परमानंदता अरिमित्रीं ॥ ३९ ॥
रावण रामाचा नव्हे वैरी । तारक् आमुचा निर्धारीं ।
ज्याच्या द्वेषबद्धिकरीं । राम तारी राक्षसां ॥ १४० ॥
वीरां वानरां रणीं । थोर झाली झोंटधरणी ।
राक्षस निमाले रणीं । रथचक्रश्रेणींसमवेत ॥ ४१ ॥
सैन्य निमालें अपरिमित । अश्वगजरथसमवेत ।
रणकर्दम झाला तेथ । पूर् वाहत रुधिराचा ॥ ४२ ॥
मज पाहतां निश्चितार्थ । रुधिर नव्हे तें परमामृत ।
तयामाजी जे लोटत । ते नित्यमुक्त स्वयें होती ॥ ४३ ॥
मोक्षाचिया आशा जाण । वीर बळेंचि देती प्राण ।
रणीं वोळला रघुनंदन । निशाचरगण उद्धरिले ॥ ४४ ॥
बहुसाल सैन्य मरतां । क्रोध आला लंकानाथा ।
रणीं जिंकावया रघुनाथा । साटोपता चालिला ॥ ४५ ॥
जेंवी पतंग दीपावरी । गज जेंवी केसरीवरी ।
तेंवी आवेशें दशशिरी । श्रीरामावरी चालिला ॥ ४६ ॥
कुचभाराचें उभारणें । तयाचि नांव पडणें ।
तेंवी मरावया रावणें । मांडिलें येणें समरंगणीं ॥ ४७ ॥
इंद्र श्रीरामांना रथ पाठवितो :
अति गर्वे गर्वोन्मत्ती । घेवोनि शस्त्रास्त्रसंपत्ती ।
रावण चालिला रामाप्रती । भेणें कापती सुरवर ॥ ४८ ॥
सबळ बळें लंकापती । रावणाचा रथ लीलागती ।
रामा एकला पदाती । युद्धख्याती केंवी होय ॥ ४९ ॥
एकाकी भिडतां रावणाप्रती । साह्य न पाहे सांगती ।
एकांगवीर रघुपती । करील शांती रावणाची ॥ १५० ॥
संदेह नाहीं ये अर्थी । राम धर्माची धर्ममूर्ती ।
सौमित्रा न सांगे सर्वांर्थीं । करील ख्याती निजांगें ॥ ५१ ॥
राम कार्य साधील न चुके । रावण निवटील बाणें एकें ।
सुर सोडवील कौतुकें । भरेल हरिखें त्रैलोक्य ॥ ५२ ॥
कांही स्वहितालागीं जाणा । साह्य व्हावें रघुनंदना ।
म्हणोनियां सहस्त्रनयना । अवस्था दुणी लागली ॥ ५३ ॥
आजवरी श्रीरामसेवा । अंश घडली नाहीं केव्हा ।
तेणें आतुडलों दशग्रीवा । घेत सेवा निजबळें ॥ ५४ ॥
तो सूड घ्यावयासी । साह्य होणें श्रीराघवासी ।
पाचारोनि सारथ्यासी । करवी रथासी सन्नद्ध ॥ ५५ ॥
संजोगोनियां स्यंदन । ठाकून जाय रघुनंदन ।
रथीं करोनि आरोहण । राम रावण निवटील ॥ ५६ ॥
एका जनार्दना शरण । श्रोतीं व्हावें सावधान ।
पुढील रामरावणांचें रण । अति दारुण परिसावें ॥ ५७ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
रावणयद्धागमनं नाम नवपंचाशत्तमोऽध्यायः ॥ ५९ ॥
ओंव्या ॥ १५७ ॥ श्लोक ॥ १३ ॥ एवं ॥ १७० ॥