Ramayan - Chapter 6 - Part 65 books and stories free download online pdf in Marathi

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 65

अध्याय 65

मंदोदरी सहगमन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

ऐसा रावणाच्या वनिता । अतिशोकाकुळिता ।
विलाप करिती समस्ता । दुःखाक्रांता रणरंगीं ॥ १ ॥
मंदोदरी आली तेथ । अति दुःखें दुःखार्दित ।
पडिला देखोनि निजकांत । विलाप करीत आक्रोशें ॥ २ ॥

तासां विलपमानानां तदा रावणयोषिताम् ।
ज्येष्ठपत्‍नी प्रिया दीना भर्तारं समुदैक्षत ॥१॥
दशग्रीवं हतं दृष्ट्वा रामेणाक्लिष्टकर्मणा ।
पतिं मंदोदरी तत्र कृपणं पर्यदेवयत् ॥२॥

मंदोदरीकृत रावणशची स्तुती व शोक – विलाप :

विष्णुसंभूत जे स्वयें । रचिली स्वहस्तें देवें ।
चराचर मोहातें पावे । रुप स्वभावें देखतां ॥ ३ ॥
जो त्रिकाळ आत्मज्ञानी । तो मोहला शूळपाणी ।
ओळखवेना निजपत्‍नी । शंकर मनीं वेडावला ॥ ४ ॥
अकळ भगवंताची माया । अनन्यरुपें रचिली तया ।
रावणातें भुलवावया । आणि जाया मंदोदरी ॥ ५ ॥
ते रावणाची ज्येष्ठ पत्‍नी । स्वयें सतीशिरोमणी ।
आली रणभूमि ठाकोनी । पति लक्षोनि मंदोदरी ॥ ६ ॥
निजपति रुधिरोक्षित । विसंज्ञ पडिला रणांत ।
देखोनियां विलाप करित । प्रताप सुचवि पतीचा ॥ ७ ॥
जो अनुज कुबेराचा । पढियंता गण शिवाचा ।
त्रैलोक्यीं प्रताप तयाचा । तो बाणीं रामाच्या पडियेला ॥ ८ ॥
जेणें आंदोळिला कैलास । प्रसन्न केला महेश ।
तो रणीं पडला क्षितीश । सांडूनि आस रणरंगी ॥ ९ ॥
आत्मलिंग मातेकारणें । निमेषगती आणिलें जेणें ।
तेणें शयन केलें रावणें । श्रीरामबाणें करोनियां ॥ १० ॥
करोनियां महाख्याती । बंदी घातला सुरपती ।
मंडळवर्ती नित्य खालती । तो लंकापती रणी पहुडला ॥ ११ ॥
नित्य ओळंगती सुरवर । चळीं कांपती ऋषीश्वर ।
भेणें सेविती गिरिकंदर । तो दशवक्त्र रणीं पहुडला ॥ १२ ॥
जिचेनि नांवें विश्व सुखी । जे विश्वमाता जानकी ।
ते हरिली एकाएकीं । झालासि लोकीं जगनिंद्य ॥ १३ ॥
या कारणें समग्रीं । प्रहस्तादि मंदोदरीं ।
सकळ प्रधान थोरथोरीं । नानापरी शिकविले ॥ १४ ॥
इंद्रजित तुझा ज्येष्ठ कुमर । बंधु कुंभकर्ण महावीर ।
मानिलें नाहीं त्यांचें उत्तर । बहुप्रकार शिकविती ॥ १५ ॥
धर्मात्मा बिभीषण । युवराजा बंधु जाण ।
हितोपदेश सांगतां पूर्ण । केलें ताडण लत्ताघातें ॥ १६ ॥
तेंचि हित झालें तयासीं । शरण गेला तो रामासी ।
रामें आश्वासिलें प्रीतीसीं । राज्यभिषेकासी करोनियां ॥ १७ ॥
बंधु रामा शरण गेला । तो स्वराज्यें सुख पावला ।
तूं नायकसीच बोला । तेणेंचि झाला घात तुझा ॥ १८ ॥
जेणें देहें दशशिरी । कैलासमंदरमेरुशिखरी ।
क्रीडत होता प्रीतीं थोरी । तो गीधघारीं उचलिला ॥ १९ ॥
चैतन्यवनीं नंदनवनीं । भोग भोगिले सुरभुवनीं ।
तें शरीर रणांगणीं । पक्षिश्रेणी लुंछिती ॥ २० ॥
नानापरी आक्रंदतां । न बोलसी तूं लंकानाथा ।
काय लागली सुषुप्ति अवस्था । कीं गेलासी तत्वतां शिवार्चना ॥ २१ ॥
श्रीरामाच्या निजबाणीं । करोनि देहाची भंगाणी ।
मोक्ष साधिला रणांगणीं । बळेंकरोनि लंकेशा ॥ २२ ॥
मी तुझी निजकांता । दुःखसागरीं तळमळतां ।
मज सांडोनि निजमोक्ष घेतां । तुज वंचकता लागेल ॥ २३ ॥
पुरुषार्थ चुतर्विध । त्यांत पहिले तीन प्रसिद्ध ।
स्त्रियेचा भाग विशुद्ध । असे सिद्ध शास्त्रामाजी ॥ २४ ॥
ऐसें न म्हणें लंकानाथा । अवंचक जे सर्वथा ।
त्यांसी उपेक्षोनियां जातां । परमार्थ तत्वतां हा नव्हे ॥ २५ ॥
तरी तूं आमुचा भ्रतारु । तूचि आमुचा सद्‍गुरु ।
तूंचि आमुचा ईश्वरु । तुझेनि संसारीं सुखरुप ॥ २६ ॥
तुझेनि आम्हां इहलोक । तुझेनि आम्हां परलोक ।
तुझेनि आम्हां मोक्षसुख । देहदुःख जेथें नाहीं ॥ २७ ॥

बिभीषणाला मंदोदरीचे सांत्वन करण्यास श्रीराम सांगतात :

ऐसा विलाप बहुतां रीतीं । मंदोदरी आक्रंदती ।
तें देखोनि रघुपती । निजचित्तीं कळवळला ॥ २८ ॥
पाचारोनि बिभीषण । सांगतसे रघुनंदन ।
भ्रातृभार्येचें शांतवन । तुवां आपण करावें ॥ २९ ॥
महासती प्रतिव्रता । मंदोदरी अति दुःखिता ।
तिसी शांतवोनि आतां । करीं तत्वतां संस्कार ॥ ३० ॥

एतस्मिन्नंतरे रामो बिभीषणमुवाच ह ।
संस्कार क्रियतां भ्रातुः स्त्रियश्चैता निवर्तय ॥३॥
तमुवाच ततो धीमान्बिभीषण इदं वचः ।
विमृश्य बुद्ध्या तत्वज्ञो धर्मार्थसहितं वचः ॥४॥

ऐसें श्रीरामाचें वचन । ऐकतांचि बिभीषण ।
भक्तांमाजी अग्रगणी जाण । तो तत्वज्ञ रामभजनें ॥ ३१ ॥
जो इहलोक परलोक । उभयसंस्था जाने देख ।
तत्वज्ञान अति सुटंक । ज्ञानटिळक ज्ञानियाचा ॥ ३२ ॥
लाहोनि रामआज्ञापन । मंदोदरीसी विचक्षण ।
बोलता झाला आपण । सावधान अवधारा ॥ ३३ ॥

बिभीषणाचा उपदेश :

तूं सती पतिव्रता । मंदोदरी विष्णुसंभूता ।
व्यर्थ खेद करणें चित्ता । उचित सर्वथा हें नव्हे ॥ ३४ ॥
असलियाचा संतोष जनीं । गेलियाची हानी मानी ।
हे हर्ष शोक जनीं दोनी । ते ज्ञाते मनीं न धरिती ॥ ३५ ॥
प्राप्तविषयें सुख भोगावें । अप्राप्तविषयें दुःख पावावे ।
तरी ते प्राकृत जाणावे । न संभवे सतीत्वा ॥ ३६ ॥
तुझे सतीत्वाची ख्याती । विस्तारली त्रिजगतीं ।
तें मढें घेवोनि हातीं । दुःखावर्ती निमगन ॥ ३७ ॥
जेव्हां आदरिला शोक । तेव्हांचि सतीत्व गेलें देख ।
आकल्पवरी करितां दुःख । दशमुख तरी नये ॥ ३८ ॥
रडत रडत शोक करीत । अपूर्ण कामें तळमळित ।
मढें धरोनि आगीं निघत । अधःपात दोघांसी ॥ ३९ ॥
प्रेत धरोनि आगीं रिघती । त्या प्रेतपिशाच होती ।
जे का भोगीं अवतरती । मान मागती बहुविध ॥ ४० ॥
ऐसी एक गती । एक आणिकचि स्थिती ।
पति निमाला मध्यरातीं । त्या नेणती देहभ्रमें ॥ ४१ ॥
मध्यरात्रीं निमाला पती । दिवसा मढें मिरवे सती ।
पति गेला हातोहातीं । मढ्याप्रती आगीं रिघे ॥ ४२ ॥
जरी देहचि पति होये । तरी तो तैसाचि पडिला आहे ।
गेला गेला म्हणती काये । नेणती सोये तयाचि ॥ ४३ ॥
एकी शुद्धसत्वात्मका । पति चैतन्य जाणोनि देखा ।
सांडून देहाचा आवांका । सायुज्य देखा साधिती ॥ ४४ ॥
त्या त्रैलोक्यासीं मंडण । येरांसी दुःख दारुण ।
स्वयें भोगिती अधःपतन । करिती भ्रमण पिशाचत्वें ॥ ४५ ॥
शुद्धस्वरुप नेणे सती । मढें धरोनि बहुसाल मरती ।
त्यांत तुझी कवण गती । न कळे निश्चितीं आम्हांसी ॥ ४६ ॥
श्रीरामहस्तें मरतां । अवघ्या त्रैलोक्या देखतां ।
सायुज्य झालें लंकानाथा । कुळासहित उद्धरिला ॥ ४७ ॥
त्याचा शोक करितां देख । अवघें विश्व म्हणेल मूर्ख ।
तूंही पाहें निजविवेक । दशमुख कवण तो ॥ ४८ ॥
जरी देह म्हणसी रावण । तरी तो तैसाचि आहे जाण ।
म्हणसी त्याहून विलक्षण । त्यांचें ज्ञान तुज नाहीं ॥ ४९ ॥
इंद्रियेंचि म्हणसी पती । स्वतः चैतन्य तीं नव्हेती ।
ज्याच्या ठायीं चाळकशक्ती । तो निश्चितीं वेगळाचि ॥ ५० ॥
ऐसें स्थूळ सूक्ष्म कारण । चौथा देह महाकारण ।
चाळक त्याहूनि भिन्न । न कळे चिन्ह तयाचें ॥ ५१ ॥
याचिलागीं योग करिती । याचिलागीं याग अनुष्ठिती ।
उग्र पुरश्चरणें करिती । मंत्र जपती यालागीं ॥ ५२ ॥
व्रत तप आणि दान । याचिलागीं तीर्थाटन ।
नौष्ठिक ब्रह्मचर्य पूर्ण । यालागीं जाण आचरती ॥ ५३ ॥
याचिलागीं क्षेत्रवास । याचिलागीं संन्यास ।
संसारावरी घालून कास । होती उदास यालागीं ॥ ५४ ॥

रामांच्या निजस्वरुपाची ओळख करुन घ्यावी :

म्हणोनि चाळक तो नेणतां । सकळ साधनें होती वृथा ।
याकारणें तुवां आतां । चाळक तत्वतां लक्षावा ॥ ५५ ॥
लक्षिलिया निजचाळक । निःशेष नासे द्वंद्वदुःख ।
स्वयें ब्रह्मत्व ठसावे देख । अगाध सुख पाविजे ॥ ५६ ॥
आतां असोत या गोष्टी । तुज रावणाची अवस्था मोठी ।
तरी आतां उठाउठीं । राम जगजेठी उडवील ॥ ५७ ॥
नेणसी रामाचें महिमान । वृथाचि करिसी विलपन ।
राम परमात्मा आपण । अलक्ष पूर्ण सुरसिद्धां ॥ ५८ ॥
राम स्रष्ट्यातें उपजविता । राम जीवातें जीवविता ।
राम काळाचा संहर्ता । राम सर्वथा अलक्ष ॥ ५९ ॥
राम इंद्रिया चेतविता । राम प्राणांतें चाळिता ।
राम मनातें कल्पिता । राम बोद्धव्यता बुद्धीची ॥ ६० ॥
राम चित्ताचें चेतव्य । रामे अहंकारा अहंभाव ।
अंतःकरणीं आवरणभाव । जाण स्वयमेव श्रीरामें ॥ ६१ ॥
सप्तधातु सत्पकोश । रामें वाढती सावकाश ।
रामेंवीण सकळ ओस । हें कोणास कळेना ॥ ६२ ॥
मृत्तिकेवेगळा नाहीं घटु । तंतूवेगळा नाहीं पटु ।
अक्षरावीण न घडे पाठु । जाण स्पष्ट महासतिये ॥ ६३ ॥
जो तो घट निपजे । गगन त्या सबाह्य सहजें ।
तेंवी प्रतिमा रघुराजें । निजांगें व्यापिजे निपजतां ॥ ६४ ॥
जेंवी सुवर्णी अलंकार । तेंवी श्रीरामीं चराचर ।
तो प्रत्यक्ष असतां रघुवीर । मोहें अपार आक्रंदसी ॥ ६५ ॥

मंदोदरीस बोध :

ऐसें बिभीषणें सर्वज्ञें । सांगतां हितवचनें ।
तेंचि बाणलें तत्क्षणें । निजज्ञानें अति चतुर ॥ ६६ ॥
जेंवी मेघमुखींचें उदक । पडतांचि एकाएक ।
वरीच्यावरी चातक । झेलून देख पैं नेत ॥ ६७ ॥
उगवतां रजनीकर । ताप निरसोनि समग्र ।
परमामृतें चकोर । तृप्ती साचार पावती ॥ ६८ ॥
बिभीषणवचनेंकरी । मदुर गिरा अति कुंसरीं ।
प्रबोधिली मंदोदरी । दुःखसागरीं पैं बुडतां ॥ ६९ ॥
येरी होवोनि सावधान । नमियेला बिभीषण ।
भली दिधली आठवण । होसी सर्वज्ञ रामभक्त ॥ ७० ॥
तुझेनि बोलें मज आतां । आठवली पूर्वकथा ।
याचि रीतीं जनकदुहिता । श्रीरामसंस्था सांगितली ॥ ७१ ॥
परी मोहाचें बळ दुर्धर । आठवों नेदी विचार ।
तुझा जो कां वचनभास्कर । किरणें खडतर तयाचीं ॥ ७२ ॥
त्यांचा पडतांचि प्रकाश । मोहतमाचा र्‍हास ।
झाला न लागतां निमेषं । हृदयकोश उजळला ॥ ७३ ॥

रमंते योगिनी यत्र सत्यानंदे चिदात्मनि ।
इति रामदेनासौ परब्रह्माभिधीयते ॥५॥

राम परमात्मा चिद्धन । ऐसें निश्चिया झालें पूर्ण ।
चरचरीं रघुनंदन । अनवच्छिन्न साक्षित्वें ॥ ७४ ॥
याच रीतीं रावण । सर्वगत सनातन ।
जाणोनियां रघुनंदन । निजशिरींकरुन पूजिला ॥ ७५ ॥
सायुज्याचा रघुराज । निजशिर छेदोनि वोजा ।
करितां प्रीतीं लक्षपूजा । वीस भुजां उल्लास ॥ ७६ ॥
दुर्जय कष्टेंकरोनि जाण । सायुज्य साधिलें आपण ।
तो उठवितां दशानन । लागेल संपूर्ण स्वामिद्रोह ॥ ७७ ॥
निजदेहो रावण । करोनियां रामार्पण ।
सायूज्य पावला परिपूर्ण । तेंचि आपण साधावें ॥ ७८ ॥

देह रामार्पण करुन पतीच्या मार्गाने जाण्याचा मंदोदरीचा निश्चिय :

जेणें मार्गे निजपतीं । साधियेली निजभक्ती ।
मीही साधीन त्याचि रीतीं । देह रघुपतीं अर्पीन ॥ ७९ ॥
आतां उठविलिया रावण । मरण न चुके जाण ।
तेणें काळें रघुनंदन । सर्वथा जाण भेटेना ॥ ८० ॥
श्रीरामदृष्टीपुढें मरण । त्यापुढें तुच्छ ब्रह्मसदन ।
स्वर्गादिकां पुसे कोण । तें आजि जाण सांपडलें ॥ ८१ ॥
श्रीरामदृष्टीपुढें देहपतन । ब्रह्मसायुज्य तेणें पूर्ण ।
तें सांडूनि वांछी आन । नरक दारुण तयासीं ॥ ८२ ॥
सांडोनियां श्रीरघुनाथा । देहलोभें विषय भोगितां ।
अनिवार नरकावस्था । भोगितां कल्पांतीं सरेना ॥ ८३ ॥
म्हणोनियां पतिव्रता । अनुसरोनियां तत्वतां ।
देह त्यागोनियां आतां । निजकांता विनटेन ॥ ८४ ॥
ऐसा करोनि निर्धार । पुढें चालिकी सुंदर ।
नमूनि साष्टांगीं रघुवीर । आनखाग्र पाहिला ॥ ८५ ॥
सांग अवलोकोनि रुपडें । पुनः पुनः वाडेंकोडें ।
मनीं धरिलें प्रेम गाढें । निजनिवाडें सुंदरी ॥ ८६ ॥
येथें क्षणें श्रोते कोपती । ज्यासी नाहीं वर्णव्यक्ती ।
तो अनिवार निश्चितीं । आनखाग्रस्थिती तेथें कैची ॥ ८७ ॥
ऐसे आक्षेपीं उत्तर । श्रोते परिसोत चतुर ।
राम रुपातीत पर । तोचि अवतार धरीतसे ॥ ८८ ॥
आबळा भोळे नेणती । केंवी अव्यक्तीं प्रवेशती ।
म्हणोनि राम आला व्यक्ती । चिदचिन्मूर्ती द्विबाहु ॥ ८९ ॥
त्यातें सांग अवलोकून । केलें प्रदक्षिणा नमन ।
तीर्थ घेतलें प्रार्थून । पुसे आज्ञापन सतीत्वा ॥ ९० ॥
तंव श्रीरामतेजें विलक्षण । क्षणैक परतवूनि प्राण ।
बोलतां झाला पैं रावण । स्वहितवचन निजकांतें ॥ ९१ ॥
दुकाळिया बुभूक्षितासी । ओगरिलें असतां षड्रसांसी ।
जेंवी न पुसे कोणासी । घेत कवळासी तांतडी ॥ ९२ ॥
तेंवी श्रीरामदृष्टीं चोखट । विस्तारिलें सायुज्यताट ।
तेथें आलीस अवचट । तरी यथेष्ट साधावें ॥ ९३ ॥
नश्वर देहाचियेसाठीं । कैवल्य येथें उठाउठीं ।
पडली स्वानंदमिठी । राम जगजेठी ओळला ॥ ९४ ॥
त्या आनंदातें अनुसरोन । श्रीरामातें धरुन ।
अविलंबें करोनि जाण । स्वहित आपण मागावें ॥ ९५ ॥
चित्तासीं अति चंचळता । बुद्धीसीं नाहीं स्वस्थता ।
तूं सती प्रतिव्रता । विलंब सर्वथा न करावा ॥ ९६ ॥
बंधु रामासी शरण गेला । सुवर्णाचे नगर पावला ।
विरोधोनि म्यां वहिला । रामसायुज्य लाधलों ॥ ९७ ॥
मज उद्धरोनि रघुनाथें । दिधलें स्वसुखसाम्राज्यातें ।
तिष्ठत राहिलोंससें येथें । प्रतीक्षा करीत पैं तुझी ॥ ९८ ॥
तूं तंव अवंचक पतिव्रता । भगवद्‍बुद्धीं निजकांता ।
भजिन्नलीस यथार्थता । कृपा रघुनाथा तेणें आली ॥ ९९ ॥
ते कृपेचें आयतन । देहीं देहभाव सांडून ।
विदेहत्केंरोनि जाण । सायुज्य आपण साधावें ॥ १०० ॥
इतकें बोलोनि रावण । निवांत राहिला आपण ।
आनंदमय त्रिभुवन । साक्षी दशानन वदतांचि ॥ १ ॥
मंदोदरीचें सतीत्व । श्रीरामाचें निजवैभव ।
ऐकोनियां अति अपूर्व । त्रैलोक्यीं सर्व विस्मित ॥ २ ॥
रामनामाच्या दीर्घ स्वरें । खेचरें भूचरें वनचरें ।
दानवें मानवें समग्रें । जयजयकारें गर्जती ॥ ३ ॥

मंदोदरी आनंदाने सहगमनाची तयारी करते :

येरीकडे महासती । सहगमनाची आइती ।
करिती झाली अति प्रीतीं । आनंद चित्तीं अनिवार ॥ ४ ॥
सहस्रसंख्या संभार । चंदनकाष्ठें बिल्वागर ।
तुळसीकाष्ठें अति पवित्र । वेगवत्तर आणिलीं ॥ ५ ॥
देवोनि सतीत्वाचीं वाणें । श्रीराम कवळी निजध्यानें ।
करावया निजधामा पेणें । प्रेमानुसंधानें डुल्लत ॥ ६ ॥
दहनरचन अति वोजा । शयन करविलें वीस भुजां ।
शिरांचा विखुरला जो पुंजा । दशकंठभाजा एकवटी ॥ ७ ॥
तंव अपूर्व वर्तलें तेथें । निजशिरीं श्रीरामातें ।
लक्षपूजा पूजिलें होतें । तीं समस्तें न दिसती ॥ ८ ॥
विस्मित झाली मंदोदरी । शिरें न दिसतां सुंदरी ।
हो‍उनि अत्यंत घाबरी । विचार करी शिरांचा ॥ ९ ॥

ते पाहून बिभीषण स्मित करुन मंदोदरीचे अज्ञान प्रकट करतो :

देखोनियां तिचें चिन्ह । हांसिन्नला बिभीषण ।
श्रीरामाचें महिमान । अद्यापि ज्ञान तुज नाहीं ॥ ११० ॥
जें अर्पिलें श्रीरामासी । तें केंवी परते जळावयासी ।
मंदोदरी ऐसी कैसी । श्रीराममहिमेसीं अनोळख ॥ ११ ॥
जें श्रीरामासी मिनलें । त्याचें नाम रुप तेव्हांचि गेलें ।
मग प्रयत्‍नीं शोधिलें । तरी परतलें दिसेना ॥ १२ ॥
अलंकार हरपे सुवर्णी । तेंवी पतिशिरें रघुनंदनीं ।
सर्वथा गेली हारपोनी । तीं कैसेनि दिशतील ॥ १३ ॥

ते ऐकून त्यांस नमस्कार करुन चितेवर देहार्पण :

ऐकोनियां तें वचन । केलें बिभीषणासी नमन ।
करोनियां रामस्मरण । केलें शयन पतिसेजे ॥ १४ ॥
विधियुक्त उपासन । दक्षिणहस्तेंकरुण ।
मंत्राग्नि चेतविला पूर्ण । देदीप्यमान तेजस्वी ॥ १५ ॥
चैतन्याग्नि अंतरीचा । बाह्य प्रदीप्त उपासनेचा ।
भडका उठिला अग्नीचा । प्रकाश दोहींचा एकचि ॥ १६ ॥
जेंवी अग्नीमाजी सुवर्ण । तद्रूपतेसीं देसीप्यमान ।
भासे अति सुलक्षण । मंदोदरी जाण तेंवी दिसे ॥ १७ ॥
पतिसंगें होतें शयन । ते वेंगीं बैसली उठोन ।
बोलती झाली आपण । श्रीराममहिमान तें ऐका ॥ १८ ॥

अग्नीत उठून बसून ती राममहिमा सांगते :

निजानंदेंकरोनि वहिली । जनकदुहिता अनुवादली ।
प्रयाणकाळीं बोलली । पतिव्रता वहिली सुलोचना ॥ १९ ॥
हेंचि वदला बिभीषण । राम मानवी नव्हे जाण ।
राम परमात्मा आपण । राम चिद्धन चिन्मूर्ति ॥ १२० ॥
राम चैतन्याची कळा । राम जीवाचा जिव्हाळा ।
राम प्रेमाचा पुतळा । पावली कळा मज आतां ॥ २१ ॥
तीर्थ घेवोनि प्रदक्षिणा । करोनि चरण अवलोकना ।
करिता सबाह्य ओतला जाणा । देहीं देहपणा । हरपली ॥ २२ ॥
मुसेचें सांडूनि मेण । रस ओतिजे परिपूर्ण ।
तेंवी मज सबाह्य जाण । श्रीरघुनंदन ओतिला ॥ २३ ॥
माझे अंगीचें रोमकूप । श्रीराम तेजें देदिप्य ।
अग्नीचा जो दाहक प्रताप । नाहीं अल्प बधित मज ॥ २४ ॥
हेंचि नवल सांगूं काये । श्रीरामें धरिली धरा राहे ।
श्रीराम जीवें जीवन पाहें । जीवविताहें सर्वांसी ॥ २५ ॥
श्रीरामतेजेंकरोनि जाण । स्वप्रकाशें देदीप्यमान ।
त्रिजगतीं हुताशन । करी पाचन नेमाचें ॥ २६ ॥
श्रीराम सामर्थ्ये वायू जाण । निजमर्यादा करी चळण ।
अंतरीं प्राणवृत्ती पूर्ण । बाह्य संचरण यथाकाळें ॥ २७ ॥
श्रीरामाचे कडवसा । शून्यत्वें ठावो आकाशा ।
जाणितलें राघवेशा । चिदाभासा चिद्धन ॥ २८ ॥
श्रीराम घ्राणाचें निजघ्रेय । तेंचि सुवासीं सौरभ्य होय ।
निजसौरभ्येंचि स्वयें पाहें । घेत आहे निजावडी ॥ २९ ॥
राम रसाचा अध्यक्षु । राम रसनेचा निजचक्षु ।
रसज्ञपणें अति दक्षु । अलौकिक रसभोक्ता ॥ १३० ॥
सकळ गोडियांचे जें गोड आहे । तें श्रीरामचि पैं स्वयें ।
जो सेवितां लवलाहें । रसना होये सर्वांग ॥ ३१ ॥
श्रीरामातें अवलोकितां । रुपचि हरपे वस्तुतां ।
सकळ स्वरुपें प्रकाशिता । पारखी स्वतां स्वरुपाचा ॥ ३२ ॥
स्पर्शेद्रियें । श्रीरामचळणें प्रसिद्ध ।
आनंदा निजानंद । स्पर्शनबोध श्रीराम ॥ ३३ ॥
प्रणवाचा आदिवेद । नादा भुलविता जो शब्द ।
निःशब्द जो निजानंद । श्रवणाबोध श्रीरामें ॥ ३४ ॥
त्रिविध जो कां अहंकार । पंचीकरणप्रकार ।
राम त्याचाही अंतर । तत्वविचार जेथें निमे ॥ ३५ ॥
गुणासाम्य ऐसी अवस्था । ती रामगुणेंचि वस्तुतां ।
महत्वाच्या निजसत्वा । राम तत्वतां प्रकाशक ॥ ३६ ॥
ज्याचें म्हणती हिरण्यगर्भ । हें चराचर ज्याचा गर्भ ।
तो श्रीरामाचा निजगर्भ । अनुपम शोभा जयाची ॥ ३७ ॥

असे मंदोदरीचे बोलणे ऐकून तिच्या मस्तकी स्वर्गस्थांची पुष्पवृष्टी :

ऐसे बोलतां सुंदरी । पुष्पवृष्टी सुरवरीं ।
केली मंदोदरीचे शिरीं । अति गजरीं अति प्रीतीं ॥ ३८ ॥
त्राहाटिल्या सुरदुंदुभी । जयजयकार झाला नभीं ।
देवांगना निरालंबी । आनंदगर्भी नाचती ॥ ३९ ॥
येरीकडे सती आपण । अग्नीमाजी लोटांगण ।
श्रीरामासी करोनि जाण । मागुतें स्तवन आदरिलें ॥ १४० ॥

मंदोदरीकृत रामस्तुती :

राम गतीची निजगती । राम चेतनेची चिच्छक्ती ।
राम विश्रांतीसीं विश्रांती । अतर्क्यगती रामाची ॥ ४१ ॥
राम नादाचा अनादिनाद । राम शब्दाचा निजशब्द ।
राम आनंदाचा निजानंद । राम महाबोध बोधाचा ॥ ४२ ॥
राम चेतनाचें चक्षु । राम इंद्रियांचा अध्यक्षु ।
विषयसुखाचा मूळवृक्षु । राम चक्षु चक्षुंचा ॥ ४३ ॥
राम स्वर्गाचा आदिस्वर्ग । राम अपवर्गाचा अपवर्ग ।
राम जीवशिवांचा योग । राम सुलभ सुलभत्वें ॥ ४४ ॥
राम सुखाचें सोलीव सुख । रामविस्मरणीं अगाध दुःख ।
ऐसें बोलतां एकाएक । निजदेह देख विसरली ॥ ४५ ॥

अग्नीत स्वतः देहसमर्पण :

मौनेचिकरीं महासती । लोटांगण रघुपती ।
घालोनियां अति प्रीतीं । सांडिलें निश्चितीं कलेवर ॥ ४६ ॥
आगीं कापुरा योग होतां । तद्रूप होय एकात्मता ।
तेंवी देहत्यागें रावणकांता । झाली तत्वतां श्रीराम ॥ ४७ ॥
लोकीं प्रथा ऐसी । सहगमन नाहीं मंदोदरीसीं ।
सतीत्वाची ख्याति जिसीं । ते वैधव्येंसीं केवी राहे ॥ ४८ ॥
अवघीं केला जयजयकार । वानरभारीं आल्हाद थोर ।
सती पतिव्रता पवित्र । केलें चरित्र जगद्वन्‍द्य ॥ ४९ ॥
राक्षसांच्या कांता । आणि रावणाच्या वनिता ।
येरी येरीतें वाणें देतां । झाल्या प्रवेशत्या अग्नीमाजी ॥ १५० ॥

बिभीषणाकडून सर्वांची विधियुक्त उत्तरक्रिया :

धर्मात्मा श्रीरामभक्त । बिभीषण अति विरक्त ।
उत्तरविधी साद्यंत । केली विधियुक्त बंधूसी ॥ ५१ ॥
सकलांचें मनोगत । सिद्धि पावलें समस्त ।
अवघे झाले आनंदभरित । नामें गर्जत अति गजरें ॥ ५२ ॥

रामोपि सह सैन्येन सुग्रीव सहलक्ष्मणः ।
हर्षं भेजे रिपुं हत्वा वृत्रं वज्रधरो यथा ॥६॥

राम लक्ष्मण सुग्रीव जाण । अंगद जांबुवंत वायुनंदन ।
मुख्य अग्रणी अहुमंत जाण । चाळक संपूर्ण रामाचा ॥ ५३ ॥
अवघे झाले आनंदभरित । सुरकार्य झालें समस्त ।
निवटिला लंकानाथ । साधुसंतविरोधी ॥ ५४ ॥
एका जनार्दना शरण । मंदोदरीचें सहगमन ।
झालें अति गजरें करुन । ख्याति दारुण सतीत्वाची ॥ ५५ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
मंदोदरीसहगमनं नाम पंचषष्टितमो‍ऽध्यायः ॥ ६५ ॥
ओंव्या ॥ १५५ ॥ श्लोक ॥ ६ ॥ एवं ॥ १६१ ॥

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED