Ramayan - Chapter 6 - Part 70 books and stories free download online pdf in Marathi

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 70

अध्याय 70

देवभक्तांची आनंदस्थिती

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

श्रीरामें विनवितां दशरथ । निश्चियें बाणला वचनार्थ ।
स्वयें मानोनि कृतार्थ । जाला विरक्त सर्वस्वा ॥ १ ॥
राज्यलोभ स्वर्गलोभ । पुत्रलोभ विषयलोभ ।
सांडूनि भुवनभोगलोभ । जाला निर्लोभ दशरथ ॥ २ ॥
अहंता आणि ममता । लोकलोकांतरवार्ता ।
गमनागमन पै तत्वता । राया दशरथा पैं नाठवे ॥ ३ ॥
नामरूपातीत । वर्णाश्रमधर्मातीत ।
जातिकुळगोत्रातीत । स्वयें रघुनाथ जाणितला ॥४ ॥
श्रुति शास्त्रातीत । पूर्ण ब्रह्म रघुनाथ ।
राये करितांचि इत्यर्थ । स्वयें तो अर्थ ठसावला ॥ ५ ॥
लक्षूं जातां गुणातीतता । स्वयें ठसावे ते अवस्था ।
लाभे आपुली निजमुक्तता । गुणातीतता गुणांमाजी ॥ ६ ॥
यालागीं मुमुक्षु सकळ । साधक जिज्ञासु प्रबळ ।
तेहीं सांडोनियां स्थूळ । मुक्त केवळ लक्षावा ॥ ७ ॥
सांडोनियां कपट । धूर्तवाद वटवट ।
संत सेवितां निर्दुष्ट । निजमुक्ति स्पष्ट लाहिजे ॥ ८ ॥
पुढील कथानुसंधान । मधुरवचनेंकरून ।
दशरथ ब्रह्मसंपन्न । केला आपण श्रीरामें ॥ ९ ॥

दशरथाने लक्ष्मणला परमार्थोपदेश केला :

होवोनियां ब्रह्मसंपन्न । पुत्रस्नेह सांडोनि पूर्ण ।
परमार्थ पैं लक्ष्मण । दशरथें आपण प्रबोधिला ॥ १० ॥
अविकळ रघुनंदन । सेवितां कीर्ति पावन ।
पावला कीं अनवच्छिन्न । सुमित्र जाण यथार्थ ॥ ११ ॥
श्रीरामेंसीं सुष्ठु मैत्री । करितां उद्धरली धरित्री ।
कीर्ति वानिजे सुरवरीं । भजनधात्री झालासी ॥ १२ ॥
सकळ झाला सिद्धार्थ । मानूं जातां कृतार्थ ।
ऐसा न मानावा इत्यर्थ । अभिमानग्रस्त पै होती ॥ १३ ॥
अंतरंग निजभक्त । भजनधर्में सावचित्त ।
मजहूनि आन नाहीं आप्त । ऐसे संचरत मानसीं ॥ १४ ॥
ऐसा भाव उपजे चित्तीं । तेणें भजनाची होय शांती ।
धरी अहंकार उत्पत्ती । अधःपाती तो पावे ॥ १५ ॥
यालागीं साधुसंती । भजनीं न मानावी तृप्ती ।
पुन : पुन: रघुपती । सेवावा निश्चिती सर्वभावें ॥ १६ ॥
तृप्ति न मानोनि भजनासी । अविचळ सेवितां रामपायांसी ।
जन्ममरणाची गोष्टी कायसी । ब्रह्मत्व अंगासी स्वयें ये ॥ १७ ॥
जेथे नाहीं मीतूंपण । तये स्वरूपीं ठेवोनि मन ।
सर्वकाळीं रघुनंदन । अनिमिष जाण सेवावा ॥ १८ ॥
ऐसें सांगोनि सौमित्रासीं । स्वयेंचि सांगें जानकीसी ।
क्षोभ न मानावा मानसीं । रामें दिव्यासी घेतलें ॥ १९ ॥

पुत्रि वैदेहि मन्युस्तु नैव कार्यस्त्वयानघे ।
विशुद्धिरेषा सततं सर्वलोकेषु दर्शिता ॥ १ ॥
सदुष्करमिदं पुत्रि तव चारित्र्यलक्ष्मणनम् ।
कृतं यत्तेन सुभगे यश: सत्यं भविष्यति ॥ २ ॥

जानकीला दशरथाचा उपदेश :

विदेहाचें हृदयरत्‍न । वैदेही तुज अभिमान ।
देहभावाचा अणुरेण । सर्वथा जाण तुज नाहीं ॥ २० ॥
तेणें विदेहभावेंकरून । सर्वकाळ अनवच्छिन्न ।
त्वां सेविला रघुनंदन । कीर्ति पावन जगद्वंद्य ॥ २१ ॥
देहीं नाहीं देहाभिमान । कर्मे नाहीं कर्माभिमान ।
विषयाच्या ठायीं ममताभिमान । सर्व जाण ज्यासी नाहीं ॥ २२ ॥
त्यासी करावया दहन । अग्नि बापुडें मशक कोण ।
हें करावया प्रकट चिन्ह । दिव्य संपूर्ण घेतलें ॥ २३ ॥
विदेहत्वें मज भेटतां । अग्नि जाळू न शके सर्वथा ।
ऐसें कळावया समस्तां । श्रीरामें तत्वता घेतलें दिव्य ॥ २४ ॥
तूं रामाची निजशक्ती । प्रकाशावया आपली स्वरूपस्थिती ।
दिव्य घेतलें तुज हातीं । कोप सर्वाथी न मानावा ॥ २५ ॥
पुढें याहूनि उत्तरोत्तर । श्रीरामें ख्यात तुझें चरित्र ।
महत्त्व पावसी थोर । जगदुद्धार तुझेनी ॥ २६ ॥
साधकीं साधावया निश्चिती । सौमित्र आणि सीता सती ।
अंगीकारितां याची स्थिती । साधक पावती श्रीरामा ॥ २७ ॥
असो आचरणस्थिती । तुमचे वर्णितां गुणकीर्ती ।
स्वयें उद्धरी रघुपती । ……………… ॥ २८ ॥
भक्तकीर्ती श्रवण करितां । भक्ता आधीं उद्धरी श्रोता ।
जो सादरता । कथा ऐके ॥ २९ ॥
त्याकारणें सर्वथैव । सर्वकाळ सर्वभाव ।
अनवच्छिन्न एकभाव । सर्वत्र राघव सेवावा ॥ ३० ॥
ऐसें सांगतां दशरथा । लोटांगण पै तत्वता ।
विनविती झाली दशरथा । जनकदुहिता स्वानंदें ॥ ३१ ॥

सीता व लक्ष्मण यांनी दशरथास लोटांगण घालून त्याचा आदेश शिरोधार्य मानला :

सौमित्रेंसहित सीता जाण । कर जोडोनि आपण ।
दशरथासी विज्ञापन । जनकनंदिनी करीतसे ॥ ३२ ॥
आज्ञापिलें स्वामिनाथा । त्या आचरणी सामर्थ्यता ।
आम्हां कांहीं नांहीं सर्वथा । कर्ता करविता श्रीराम ॥ ३३ ॥
पार्थिवाची शरीरकृती । इंद्रियांची क्रियाशक्ती ।
मानसाची कल्पनावृत्ती । स्वयें रघुपती वर्तवी ॥ ३४ ॥
बुद्धीचा निश्चयो पूर्ण । अहंकाराचें अहंपण ।
स्वयें होवोनि रघुनंदन । करवी चळण आपणासी ॥ ३५ ॥
आमच्याठायीं क्रियाशक्ती । अणुमात्र नाहीं भूपती ।
अंतर्यामित्वें रघुपती । वर्तवी निश्चिती आमुतें ॥ ३६ ॥
जेंवी दारुयंत्र खांबावरी । विविधा परी नृत्य करी ।
तें सामर्थ्य त्याच्या शरीरीं । तिळभरी असेना ॥ ३७ ॥
सूत्रधाराचेनि छंदें । सुखें नृत्य करी विनोदे ।
ताल संगती पदबंधें । अतिआनंदें कुसरी ॥ ३८ ॥
तेंवी आमुतें रघुपती । स्वतां चेतवी निजशक्ती ।
आमुच्याठायीं क्रियाशक्ती । अणुही चित्तीं असेना ॥ ३९ ॥
पुढेंही कर्ता करविता । श्रीरामचि तत्वता ।
तो ठेवील ज्या सत्ता । राहणें सर्वथा वृपवर्या ॥ ४० ॥
म्हणोनि घातलें लोटांगण । दोन्ही कर संपुट जोडून ।
तेणें दशरथ सुखायमान । रघुनंदन संतुष्ट ॥४ १ ॥

विमाजमारथाय महानुभाव: श्रिया व संहृष्टतनुर्णुपोत्तमः ।
आमंत्र्य पूर्वी सहसीतया च जगाम देवप्रवरस्य लोकम् ॥ ३ ॥

नंतर दशरथाचे विमानातून स्वर्गारोहण व इतर देवांकडून श्रीरामांना प्रार्थना :

रामसौमित्रजानकीसीं । संतोषें अनुमोदोन तिघांसीं ।
नाम स्मरत संतोषीं । निघे विमानेसी निजभुवना ॥ ४२ ॥
सूर्यप्रभेसम विमान । निजकांती देदीप्यमान ।
मोक्षश्रिया विराजमान । स्वयें आपण दशरथ ॥ ४३ ॥
स्वयें होवोनि ब्रह्मभूत । ब्रह्मानंदें डुल्लत ।
विमानी राजा दशरथ । निघे उपमत निजधामा ॥ ४४ ॥
दशरथ स्वर्गभुवन । करितां अमरादि देवगण ।
मस्तकांजली आपण । केलें नमन श्रीरामा ॥ ४५ ॥
अति विनीत तत्वता । विनविते जाले श्रीरघुनाथा ।
बहुत काय बोलूं आतां । बंदिमोचनता तुवां केली ॥ ४६ ॥
येवढिया उपकारा उत्तीर्ण । व्हावया आमुचें तोंड कोण ।
आम्हा योग्य आज्ञापन । कांही आपण करावें ॥४७ ॥

प्रतियाते तु काकुत्स्थे महेंद्र पाकशासनः ।
अब्रवीत्परमप्रीतो राघवं प्रांजलिं स्थितम् ॥ ४ ॥
एतस्मिन् तव कि कार्यं करोमि त्वत्प्रिये स्थितः ॥ ५ ॥

देवमंडळी श्रीरामांकडे त्यांच्या सेवेची अपेक्षा करतात :

स्वामी नरवीरपंचानना । कलापति कमलनयना ।
आम्हां होवोनियां प्रसन्ना । बंदिमोचना तुवां केलें ॥ १४८ ॥
ऐसियांसीं आम्ही प्रसन्न । जालों म्हणों हेंचि दूषण ।
तथापि ऐकोनि विज्ञापन । कांही आज्ञापन करावें ॥ 1४९ ॥
जेणे सुख तुज उपजे । आम्ही लागों भजनवोजे ।
ऐसें कार्य विचारिजे । जें रघुराजें कृपाळुवें ॥ ५० ॥
इंद्र वायु कुबेर चंद्र । अग्नि नैर्ऋत यमादि समग्र ।
लोटांगणीं अति तल्यर । श्रीरघुवीर विनविला ॥ ५१ ॥
कांहीं आज्ञापीं आम्हासी । म्हणोनि लागले चरणासीं ।
तेणें सुख श्रीरामासीं । अति आवेशीं उथळलें ॥ ५२ ॥

परंतु श्रीरामांनीच त्यांना चरणवंदन करून देवांच्या कृपेचा महिमा गायिला :

अमरां देवोनि सन्मान । लोटांगणीं रघुनंदन ।
विनविता जाला आपण । सावधान अवधारा ॥ ५३ ॥
स्वामी तुमचे कृपेस्तव । दुष्ट निर्दळिला दशग्रीव ।
तुमचे प्रसन्नतेचें वैभव । अति अपूर्व काय सांगूं ॥ ५४ ॥
तुमचेनि नामें स्वामिया । यम काळ लागती पायां ।
त्या तुम्हातें सोडवावया । कोण साह्या येवों शके ॥ ५५ ॥
स्वयें करोनि लाघव । मारविला दशग्रीव ।
अधिष्ठाते तुम्ही सर्व । व्यर्थ राघव रूढवितां ॥ ५६ ॥
तुमची करणी समस्त । तुम्हीच उपकार मानित ।
प्रसन्न होवोनियां समस्त । मागा म्हणत मज स्वामी ॥ ५७ ॥
इतर सकळ पदार्थ । तुमच्या कृपें पूर्ण भरित ।
जो आपुलें निजसामर्थ्य । मागा म्हणत मज स्वामी ॥ ५८ ॥
जो आपुलें निजसामर्थ्ये । अनंत कोटि रची ब्रह्मांडांतें ।
तेथें उठवावया वानरांतें । श्रीरामांतें अटक कोण ॥ ५९ ॥
महत्त्व द्यावया सुरवरां । श्रीरामासी कळवळा पुरा ।
म्हणोनि इंद्रदिकां सुरां । अत्यादरा प्रार्थित ॥ ६० ॥

मम हेतोः परक्रांता गता ये यमसादनम् ।
ते सर्वे जीवित प्राप्य समुतिष्ठांतु वानराः ॥ ६ ॥
विरुजाग्निर्व्रणांश्चैव संपबन्नबलपौरुषान् ।
गोलांगूलांस्तथा ऋक्षान्द्रष्टुकाम: सुरेश्वरः ॥ ७ ॥
अकाले चापि पुष्पाणि मूलानि च फलानि च ।
नद्यश्व विमलास्तत्र तिष्टेयुर्यपत्र वानराः ॥ ८ ॥
श्रुत्व तु वचनं तस्य राघवस्य महात्मन: ।
महेंद्र: प्रत्युवाचेदं वचनं प्रीतिसंयुतमू ॥ ९ ॥
महानयं वरस्तात यस्त्वयोक्तो रघूत्तम ।
तद्युक्तमनुरूपं च कौसल्यानंदवर्धजन ॥ १० ॥

श्रीरामांची इंद्रादिक देवांना मेलेल्या वानरांना जिवंत करून भेट करवून देण्याची एकच प्रार्थना :

मिळोनियां सुरगण । सकळ जालेति प्रसन्न ।
तरी ऐका विनगण । सावधान अति प्रीती ॥ ६१ ॥
रावणासीं युद्ध करितां । वानरीं वेंचिलें जीविता ।
ते उठवावे मागुती आतां । स्वस्थावस्था निजशक्ती ॥ ६२ ॥
युद्ध करिता समरांगणीं । जाली वानरांची भंगाणी ।
धडें मुंडे विखुरली रणीं । करचरणीं समवेत ॥ ६३ ॥
रीस वानर गोळांगुळ । रणीं पडियेले बहळ ।
ते उठवोनिया तत्काळ । मज सफळ भेटवावे ॥ ६४ ॥
हेचि तुमची प्रसन्नता । पडलिया वानरां समस्तां ।
वेगें उठवोनि तत्वता । मज मागुती भेटवावें ॥ ६५ ॥
माझी मज वानरें । भेटती जेणें प्रकारें ।
तेंचि करावें दातारें । सर्व प्रकारें मज तुम्हीं ॥ ६६ ॥
मज माझे वानरगण । तुम्हीं भेटविल्या आपण ।
पावली सकळ संभावन । कृतकल्याण मी झालों ॥ ६७ ॥
:ऐसें विनवितां रघुनंदन । विस्मित झाले सुरगण ।
पूर्णब्रह्म रघुनंदन । आच्छादोन राहिलासे ॥ ६८ ॥
त्याचा दास हनुमंत । चरित्र केलें अत्यद्‌भुत ।
आवरणभेदीं समस्त । वानर मृत उठविले ॥ ६९ ॥
करितां श्रीरामाचें ध्यान । दृष्टी अमृत स्रवोन ।
उठविले वानरगण । अर्धक्षण न लागतां ॥ ७० ॥
तो येथें श्रीराम आपण । उठवावया वानरगण ।
प्रार्थितसे सुरगण । भाग्य कोण आमुचें ॥ ७१ ॥

ती विनंती म्हणजे देवांना महद्‌भाग्य वाटलें :

म्हणोनियां सुरपंक्ती । सहित तेथें अमरपती ।
मस्तकांजलि रघुपती । झाले विनंती पै करिते ॥ ७२ ॥
सकळजनचाळका । सकळलोक प्रतिपाळका ।
सुरवर संस्थापका । रघुकुळटिळका परियेसीं ॥ ७३ ॥
अवचटें नाम पडतां कानीं । यम तयासीं न पाहे नयनीं ।
तें नाम जपतां अनुदिनीं । यमदंडणी केंवी साहिती ॥ ७४ ॥
नामापासीं मुक्ति मुक्ती । नामें जन्ममृस्तु नासती ।
तुझ्या नामी नित्य विश्रांती । प्राणी पावती श्रीराम ॥ ७५ ॥
ऐवढे तुझें नाममहिमान । तो तूं प्रत्यक्ष रघुनंदन ।
असतो बापुडें काळ कोण । हरिगण निवटाया ॥ ७६ ॥

तुझ्या नामाचे सामर्थ्य जरी अगाध असले तरी तुझी आज्ञा म्हणूनच आम्ही वानरांना जिवंत करू :

तथापि तुझें आज्ञापन । कोण करूं शके आन ।
सकळ उठती वानरगण । अर्ध क्षण न लागतां ॥ ७७ ॥
आज्ञेंप्रमाणें सकळ । सिद्धि पावेल अविकळ ।
सर्वकाळ फळ जळ । वानरदळ सुखमय ॥ ७८ ॥
अंगीं न दिसें घाववण । नाठवे तयां युद्धत्राण ।
सुषुप्ती उठे शयनींहून । तेंवी वानरगण उठतील ॥ ७९ ॥
म्हणोनि सरसावले सर्वही । निज अवयवांचें ठायी ।
प्रवेशोनि लवलाहीं । वानर पाहीं उठविले ॥ ८० ॥

ठार झालेल्या वानरांना देवांनी जिवंत केले. अवयवांवरून वानरांत भांडणे :

अवयव भिन्न भिन्न झाले । करचरण बिघडविले ।
ते आपेंआप विहिले । लागों लागले जेथींचे तेथे ॥ ८१ ॥
पुच्छ उसळोनि देखा । लागों पाहे जंव एका ।
तंव दुजा करी आवांका । कोठे जासी देखा म्हणवोनी ॥ ८२ ॥
एकीकडे ओढी एक । दुजेकडे ओढिती अनेक ।
तिजा म्हणे उजू ओळख । तें पुच्छ देख पै माझें ॥ ८३ ॥
एकाचे तुटले चरण । ते स्वयें उमगितां जाण ।
मध्यें:चि हिरोन ने आन । येर थोडआन पैं राहे ॥ ८४ ॥
आपुले घ्यावया पैं जाण । छिन्नपाद नाहीं आंगवण ।
श्वासोच्छवास घालोनि पूर्ण । थोटवोन पै राहे ॥ ८५ ॥
मस्तक उथळलें रणभूमी । निज कबंध जंव आक्रमी ।
तंव तें पडे अति दुर्गमी । अति विषमीं पाडिजे ॥ ८६ ॥
केश धरोनि ओढी एक । कान धरोनि ओढी आणिक ।
शिर मध्येंचि लोंबें देख । एक एका वानरें ॥ ८७ ॥
एक म्हणती माझें शिर । दुजा म्हणे परता सर ।
तिजा म्हणताहे मर मर । आपपर नोळखसी ॥ ८८ ॥
एक एकाचा ओढी कर । एक एकाचें ओढी शिर ।
येरयेरांचे अपार । चरण सत्वर ओढिती ॥ ८९ ॥

वानरांची लीला पाहून श्रीरामादिक सर्वांना हसू आले :

येरयरांचें पुच्छ आंसुडिती । आपुलाले हढुंगी कोंदिती ।
ते देखोनि रघुपती । स्वयें हांसती स्वानंदें ॥ ९० ॥
सौमित्र आणि सीता सती । सुग्रीव जांबवंत मारुती ।
अंगदादि सकळ जुत्पती । अवघे हांसती गदगदां ॥ ९१ ॥
अकळ श्रीरामाचें चरित्र । शरण येवोनि सुरवर ।
स्वयेंचि उठविती वानर । आपुलें अंतर कळों नेदी ॥ ९२ ॥
ऐसा करितां गदारोळ । गात्रे सांधिलीं सकळ ।
घायवण न दिसे अळूमाळ । सैन्य सकळ उठविलें ॥ ९३ ॥
अंगी घाव न दुखतां । वणही न दिसे सर्वथा ।
सांडोनियां सुषुप्तावस्था । उठती तत्वतां ऐसें जालें ॥ ९४ ॥

अव्यंग झालेल्या वानरांकडून श्रीरामांना प्रणिपात :

लाहोनि अविकळ शरीर । रामानामें अपार ।
देती किराणें वानर । येवोनि रघुवीर नमिताती ॥ ९५ ॥
श्रीराम देतां आलिंगन । वानरां आनंद गहन ।
नाठवे तेथें निज स्मरण । घाववण नाठवे ॥ ९६ ॥
नाठवे वानरां वानरपण । नाठवे श्रीरामा रामपण ।
श्रीराम वोळला चिद्धन । स्वानंदपूर्ण वानरा ॥ ९७ ॥
प्रयासें सुटली मिठी । परी दोघां दोपणाची गोष्टी ।
अल्पही स्फुरेना पोटीं । अकळ गोष्टी रामींची ॥ ९८ ॥
केव्हां मारिलें दशवक्त्रें । केंव्हां उठविलें रघुवीरें ।
दोन्ही नेणती वानरें । अकळ चरित्रें रामाची ॥ ९९ ॥
येरीकडे सुरगण । ब्रह्मादि त्रिनयन ।
सकळ लोकपाळ मिळोन । करिती विनवण श्रीरामाचें ॥ १०० ॥

देवांकडून श्रीरामांची स्तुती व अयोध्येला जाऊन
सर्वांना सुखी करण्याची रामांना कळककीची विनंती :

बंदीमोचन करोनि वहिले ! । रावणमुखींचें काढिलें ।
आम्हां स्वपदीं स्थापिलें । सुखी केलें श्रीरामा ॥ १ ॥
अहंरावणग्रस्त । देहदरिद्रें पीडित ।
होतों बहुसाल कष्टत । केलें निर्मुक्त तेथूनी ॥ २ ॥
सुखी केलें आम्हांसी । तैसेचि तुझ्या अंतरंगासी ।
वेगीं जावोनि अयोध्येसी । सुखी सकळांसी करीं स्वामी ॥ ३ ॥

मैथिलीं सांत्वयस्वैनामनुरक्तां यशस्विनीम् ।
भरतं भ्रातरं प्राज्ञं शत्रुघ्नं च महाबलम् ॥ ११ ॥
समेत्य पितृबब्दालं त्वं लालयितुमर्हसि ।
कृतकर्मा परिश्रान्तः सुखं प्रप्रोतु लकष्मणः ॥ १२ ॥
समाप्तवनवासस्त्वमामानमभिषेचय ।
एवमुक्त्वा समामंत्र्य रामं सौमित्रिणा सह ॥ १३ ॥
विमानैः सूर्यसंकाशैर्जग्मुर्हष्टा: सुरा दिवम् ।
अभिवाद्य काकुस्थ: सर्वांस्तान्त्रिदशेश्वरान् ॥ १४ ॥

हे तुझी निजशक्ती । साध्यी अनुरक्त महासती ।
केवळ तपाची तपोमूर्ती । तुझी ख्याती जिचेनि ॥ ४ ॥
समाधान दे सीतेसी । स्वयें सुख द्यावें तिसी ।
तैसेंचि बंधु सौमित्रासी । अति प्रीतीसीं सुख देईं ॥ ५ ॥
अति कष्टला वनांतरीं । अति प्रीतीं निराहारी ।
अनिमिष तुझी सेवा करी । ब्रह्मचारी नैष्ठिक ॥ ६ ॥
नेणे आहार सेजार । श्रीरामसेवेंसीं तत्पर ।
परी राक्षसांचा संहार । प्रताप साचार पैं तुझा ॥ ७ ॥
अति कष्ट करोनि जाण । अत्यंत कष्टला लक्ष्मण ।
त्यासी द्यावें समाधान । प्रीति करून श्रीरामा ॥ ८ ॥
तैसेंचि भरतशत्रुज । श्रीरामभजनीं प्रेमा पूर्ण ।
दृढव्रत तुजलागून । अनवच्छिन्न करिताती ॥ ९ ॥
तुझे वियोगें रघुनाथा । तुच्छ केली शरीरावस्था ।
सुखाची त्या शत्रुघ्नभरतां । श्रीरघुनाथा अत्यादरें ॥ ११० ॥
समस्ताही तुझ्या माता । प्रधाना सुमंता ।
अयोध्याजनां समस्तां । परमावस्था पैं तुझी ॥ ११ ॥
पितृवत् प्रजापालन । स्वामी करावें आपण ।
आपणा करोनि अभिषिंचन । व्रतविसर्जन वनवासा ॥ १२ ॥

देवगण स्वर्गाला निघाले :

ऐसें विनवोनि सुरगण । श्रीरामासी प्रदक्षिण ।
सकळीं घालोनि लोटांगण । निजधामा आपण निघाले ॥ १३ ॥
सूर्यप्रभेसमान । विमानीं बैसोनि देदीप्यमान ।
श्रीरामाचें गुणवर्णन । करीत आपण निघाले ॥ १४ ॥
वचनीं श्रीरामवर्णन । मनीं श्रीरामाचें ध्यान ।
सर्वां भूतीं रघुनंदन । देखतां सुरगण सुखमय ॥ १५ ॥
करितां रामकथाश्रवण । नित्य तृप्त सुरगण ।
श्रीरघुनाथें सुखसंपन्न । निजधामा आपण सुखें गेले ॥ १६ ॥
येरीकडे श्रीरामचंद्र । राक्षसादि महावीर ।
वैरी निरसोनि समग्र । सकळांसी सुखी केलें ! ॥ १७ ॥
शरत्काळींचा निशाकर । सवेग निरसोनि घनाकार ।
निर्मळत्वें जें अंबर । अति परिकर शोभवी ॥ १८ ॥
राक्षसमेघांचिया हारी । निरसोनि क्षणाभीतरीं ।
श्रीरामचंद्र सैन्यामाझारीं । अति कुसरीं शोभत ॥ १९ ॥

श्रीरामांकडून सीतेचे मृदु शब्दात सांत्वन :

जवळी बोलावोनि सीता गोरटी । हातीं धरोनि हनुवटी ।
शांतवनाच्या मधुर गोष्टी । राम जगजेठी संबोखी ॥ १२० ॥
विषाद न मानावा सुंदरी । तुझें चरित्र जगदुद्धारी ।
जे दाविली भजनपरी । ते उद्धरी जगातें ॥ २१ ॥
जिहीं देखिलें तुझें चरित्र । ते उद्धरिले साचार ।
पुढें ऐकती उत्तरोत्तर । ते संसारपार पावती ॥ २२ ॥
दिव्य घेतां तुजपासी । उभयतां निंद्य जगासी ।
ते चुकलें अनायासीं । कोप मानसीं न मानवा ॥ २३ ॥
जैंपासोनि वियोग तुझा । तैंपासोनि देह माझा ।
कांहीं केल्या नये काजा । एवढा तुझा वियोग ॥ २४ ॥

सीतेच्या विरहाने काय स्थिती झाली ते श्रीराम सीतेला सांगून तिला प्रेमालिंगन देतात :

उदकपान पै करितां । घोटामाजीं आठवे सीता ।
फळभोजन करूं जातां । जनकदुहिता ग्रासीं दिसे ॥ २५ ॥
जागृति स्वप्न सुषुप्तीं । सीतामय झाली वृत्ती ।
हें सांगितलें असेल मारुतीं । बहुत किती अनुवादों ॥ २६ ॥
म्हणोनियां अति प्रीतीं । आलिंगिली सीता सती ।
तंव सीतेमाजी रघुपती । निजस्थिती हारपला ॥ २७ ॥
श्रीरामा नाठवे रामपण । तंव येरीकडे झालें आन ।
सदेह जानकी आपण । श्रीरामीं जाण बुडाली ॥ २८ ॥

श्रीराम – सीता एकींएक होऊन गेले :

लवणजळा होतां भेटी । हरपती येरयेरां पोटीं ।
तेंवी श्रीराम जगजेठी – । माजी गोरटी हरपली ॥ २९ ॥
दोनी दीप एक होती । दोनीपण जावोनि एकदीप्ती ।
तेंवी सीता आणि रघुपती । एकचे शोभती देदीप्य ॥ १३० ॥
न होवोनियां दुजेपण । दोन्ही दोपणीं होती भिन्न ।
तेंवी सीता आणि रघुनंदन । आलिंगन सुटलें ॥ ३१ ॥
सुटोनियां आलिंगनीं । जानकीये श्रीरामचरणीं ।
मौनेंचि मस्तक ठेवोनी । मधुर वाणीं अनुवादे ॥ ३२ ॥

सीतेने लज्जित होऊन रामांना वंदन केले :

प्रीतींकरोनि लज्जान्वित । विनविती झाली रघुनाथ ।
अंतर्यामीं तूं निश्चित । कर्ता करविता तूंचि तूं ॥ ३३ ॥
सकल इंद्रिया चाळकता । तुझेनि स्वामी रघुनाथा ।
अंतर्बाह्य तुझी सत्ता । कर्ता करविता तूंचि तूं ॥ ३४ ॥
ऐसें बोलोनि सुंदरी । लोटांगण चरणावरी ।
घातलें अतिथोरी । नामें वानरीं गर्जिजे ॥ ३५ ॥

ते श्रीराम -सीतेचे प्रेममय मीलन पाहून सर्व सभेने
रामांचा जयजयकार करून नामसंकीर्तनानें आनंदोत्सव केला :

सुखमय सभा सकळ । बिभीषण सुग्रीव वानरदळ ।
रीस आणि गोळांगुळ । नामें प्रबळ गर्जती ॥ ३६ ॥
नामें कोंदला भूगोळ । नामें कोंदलें पाताळ ।
रामें संबोखिली जनकबाळ । आनंदकल्लोळ सकळांसी ॥ ३७ ॥
आनंदमय रघुपती । आनंदमय सीता सती ।
आनंदमय जुत्पती । सकळीं रात्र क्रमियेली ॥ ३८ ॥
तंव उजळलें उखामंडळ । प्राची झाली पैं निर्मळ ।
निजकर्मी लोक सकळ । अधिकारशीळ लागले ॥ ३९ ॥
दिशा चोखाळल्या समस्त । झाले पांथिक मार्गस्थ ।
सदाचारकर्मी प्रवर्तत । उद्धरण करित अग्निहोत्री ॥ १४० ॥
उपासक बैसले पूजनीं । योगी प्रवर्तले ध्यानीं ।
उठले वैष्णव गजरेंकरोनी । नामसंकीर्तनीं गीतवाद्यें ॥ ४१ ॥
वानर उठले समग्र । करीत नामाचा गजर ।
भुभुःकारें गर्जे अंबर । प्रभाकर उगवला ॥ ४२ ॥
राक्षसराजा बिभीषण । निजानंदें परिपूर्ण ।
पूजावया रघुनंदन । पूजोपचार घेऊन पै आला ॥ ४३ ॥

तां रात्रिमुषितं रामं तथैव व्रतमास्थितम् ।
अब्रवीत्प्रांजलिर्वाक्यं जयं दृष्ट्वा बिभीषण: ॥ १५ ॥

बिभीषण व त्याच्या स्त्रियांची वतसमाप्ती करण्याची रामांना विनंती :

वनवासाचें दृढवत । संपादावया सुरकार्यार्थ ।
धरिलें होतें अति नियत । तो कार्यार्थ साधिला ॥ ४४ ॥
मस्तकांजलि अति विनीत । लोटांगण घालोनि तेथ ।
बिभीषण शरणागत । श्रीरघुनाथ विनविला ॥ १४५ ॥
निवटोनियां लंकानाथ । बंदी सोडविले समस्त ।
आतां विसर्जावें व्रत । अत्यद्‌भुत धरिलें जें ॥ ४६ ॥
सौमित्र गांजला अन्नेंवीण । उपवासीं अति खिन्न ।
महासती जानकी जाण । अतिक्षीण पै झाली ॥ ४७ ॥
विसर्जावें वनवासव्रत । जटाबंधने करावीं मुक्त ।
लोटांगणीं श्रीरघुनाथ । निजखीसमवेत नमियेला ॥ १४८ ॥
बिभीषणाच्या स्त्रिया । पूजासामग्रीं घेवोनियां ।
पूजूं आलिया श्रीरघुराया । निजजायासमवेत ॥ १४९ ॥
तिहीं घालितां लोटांगण । उचलोनियां रघुनंदन ।
अति प्रीतींकरोनि पूर्ण । समाधान दीधलें ॥ १५० ॥
सकळ झालें निष्कंटक । लंकेचें राज्य अलौकिक ।
निजपतीसहित देख । तुम्हीं आवश्यक भोगावें ॥ ५१ ॥

रामांकडून बिभीषणाला वरदान :

म्हणोनि माथां ठेविला हात । जंववरी शशिभास्वत ।
गगनीं असे वर्तत । तंव लेकेआत राज्य करीं ॥ ५२ ॥
ऐसें देतां वरदान । येरी माथां वंदिले चरण ।
विनविताहे बिभीषण । तें विज्ञापन मानावें ॥ ५३ ॥
परिस स्वामी श्रीराम । बिभीषण शरण आला तुम्हां ।
तेव्हांचि अक्षयी राज्य आम्हां । श्रीरामधर्मा विनटल्या ॥ ५४ ॥
शरण जातो श्रीरामासी । अक्षयी राज्य बिभीषणासी ।
अक्षयी चुडेदान आम्हांसी । तुझें तुजपासीं काय सांगूं ॥ ५५ ॥
लोटांगण श्रीरघुनाथा । विनविताति लंकेशवनिता ।
बहुत कष्टली सती सीता । अभ्यंगार्था आज्ञापीं ॥ ५६ ॥
बिभीषणें त्याच रीतीं । विनविला श्रीरघुपती ।
स्वामी परिसावी विनंती । व्रतसमाप्री करावी ॥ ५७ ॥
ऐसें प्रार्थितां बिभीषण । संतोषला रघुनंदन ।
मृदु मंजुळ वचन । भक्तशांतवन करीतसे ॥ ५८ ॥
एकाएकी मधुरवाणी । धर्मशास्त्रार्थ नीतिवचनीं ।
श्रीरामें बिभीषणालागोनी । लंकाभुवनी पाठविला ॥ ५९ ॥
एकाएकी जनार्दनी । धन्य कथा रामायणी ।
धन्य भाग्याची मांडणी । ऐकतां श्रवणी रामथा ॥ १६० ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे । युद्धकांडे एकाकारटीकायां
देवभक्त आनंदयोगो नाम सप्ततितमोऽध्यायः ॥ ७० ॥
॥ ओव्या १६० ॥ श्लोक १५ ॥ एवं १७५ ॥

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED