अध्याय 88
सर्वांना नैवेद्य-प्रसादाचा लाभ –
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
हनुमंताची प्रार्थना :
पूर्वप्रसंगी हनुमंतें । विनविलें श्रीरामातें ।
सारोनि पारणाविधीतें । प्रसाद आमुतें द्यावा स्वामी ॥ १ ॥
सौमित्र आणि भरत । जानकीमातेसमवेत ।
पारणे सारोनि निश्चित । करावें तृप्त सकळांसी ॥ २ ॥
ब्रह्मादि सुरपंक्ती । प्रसादाची वाट पाहती ।
निजसेनेचे सेनापती । आकांक्षिती सुमंतादिक ॥ ३ ॥
बिभीषणसुग्रीवादि जाण । अंगद युवराजा आपण ।
नळनीळादि कपिगण । प्रसाद पूर्ण वांछिती ॥ ४ ॥
जांबवंत सुषेण दधिमुख । श्रीरामप्रसादा सकळिक ।
अवघे असती साकांक्ष । त्यांसी आवश्यक सुखावीं ॥ ५ ॥
म्हणोनि घातलें लोटांगण । तें देखोनि सकळ जन ।
स्वयें झाले सुखैकघन । हनुमंतें विंदान साधिलें ॥ ६ ॥
सर्वाकडून हनुमंताला धन्यवाद :
आम्ही म्हणों श्रीरामचंद्र । वस्त्रें भूषणें अलंकार ।
देवोनि बोळविले सत्वर । निजशेष सादर न देचि ॥ ७ ॥
ते आमची सकळ चिंता । भली निरसिली हनुमंता ।
प्रसन्न करोनि रघुनाथा । शेष तत्वतां मागितलें ॥ ८ ॥
म्हणोनि हरिखेले समग्र । आनंदें करोनि जयजयकार ।
नामें गर्जिन्नलें अपार । चराचर दुमदुमिलें ॥ ९ ॥
देखोनि सकळांचा उत्सावो । संतोषला रामरावो ।
सकळां शेषीं आदर पहा हो । सुरसमुदावो ब्रह्मादि ॥ १० ॥
सर्व भक्तांना भोजनप्रसाद देण्याचा रामांचा निश्चय :
वानरें तरी आळुंकी । लुलु करित प्रसादाविखीं ।
त्यांसी न करितां पै सुखी । अत्यंत दुःखी होतील ॥ ११ ॥
लौकिक अपवाद गहन । श्रीरामकार्यालागीं जाण ।
जीवित्व तुच्छ करोनि पूर्ण । निजप्राण वेंचिलें ॥ १२ ॥
त्यांसी मुकें तळमळित । प्रसाद नेदी रघुनाथ ।
बोळविले निजभक्त । हीनवृत्त धरोनियां ॥ १३ ॥
ऐसें लोकांचे अपवाद । माथां बैसती अगाध ।
विचार करोनियां शुद्ध । भक्तवृंद सुखावूं ॥ १४ ॥
ऐसे करोनि निश्चित । माता कौसल्या त्वरित ।
बोलावोनि रघुनाथ । विचार करित तियेसीं ॥ १५ ॥
मिनले सुरवरांचे भार । लोकपाळादि समग्र ।
ब्रह्मा आणि पै शंकर । सिद्ध चारण गंधर्व ॥ १६ ॥
चित्तें वित्तें जीवितें । अनुसरोनि निश्चितें ।
वानरीं आम्हां केलें सरते । निजविजयातें देउनी ॥ १७ ॥
कौसल्या मातेला स्वयंपाक तयार करण्यास रामांनी सांगितले :
त्रैलोक्यांत माझी ख्याती । व्हावया कारण मुख्य जुत्पती ।
त्यांसी द्यावया निजतृप्ती । पाकनिष्पत्ती करावी ॥ १८ ॥
ऐसें सांगतां रघुपती । माता सुखावली निश्चितीं ।
जें म्यां धरिलें होतें चित्तीं । तेचि रघुपतीं योजिलें ॥ १९ ॥
ब्रह्मा शिव सुरगणां । लोकपाळेसीं पाकशासना ।
पाहुणेर रघुनंदना । निजानंदें जाण करावा ॥ २० ॥
श्रीरामाचे आवडते । वानर जीवाहून पढियंते ।
साह्य झाले श्रीरामातें । आवडीं त्यातें वाढीन ॥ २१ ॥
भोंवत्या सुरवरांच्या पंक्ती । मुनि सिद्ध ऋषि निश्चितीं ।
मध्ये माझा रघुपती । जेंवी उडुगणपति आकाशीं ॥ २२ ॥
वृत्रवधीं इंद्रपूजा । सुरवर करिती जैशा वोजा ।
तेंवी भोजनीं रघुराजा । निजवोजा पूजीन ॥ २३ ॥
हेंचि माझें निजपूजन । षड्रस निपजवीन सदन्न ।
ऐक तयांचे लक्षण । निजविंवचन सांगेन ॥ २४ ॥
षड्रसयुक्त अन्नाचे लक्षण :
लेह्य पेय चोष्य खाद्य । याचें नांव चतुर्विध ।
भक्ष्य भोज्य जें विविध । जाण षड्विध येणेंसीं ॥ २५ ॥
चाटूनि घेइजे पूर्ण । तया नांव लेह्य जाण ।
प्राशन कीजे घटघडून । पेय संपूर्ण त्या नांव ॥ २६ ॥
चोखून घेइजे रस । थुंकून सांडिजे बाकस ।
तया नांव बोलिजे चोष्य । खाद्यविलास तो ऐका ॥ २७ ॥
कंडनपेषणादि समस्त । पाक न करितां निश्चित ।
जें खावयास उपयुक्त । खाद्य बोलत तयासी ॥ २८ ॥
विचित्र कोरकियांची परी । रोटी पोळी आदि उखरी ।
यातें बोलिजे चतुरीं । निजनिर्धारीं पै भक्ष्य ॥ २९ ॥
क्षिप्रा आणि ओदन । भोज्य म्हणती विचक्षण ।
एव षड्रसाचे चिन्ह । निजविंवचन सांगितलें ॥ ३० ॥
त्या रसांचे पाकविधान । करिती राममाता सर्वज्ञ ।
ऐक तयाचें लक्षण । निजविवंचन अवधारीं ॥ ३१ ॥
भोजनप्रसाद स्वीकारण्यासाठी पंगतीला कोण कोण होते त्यांची नामावली :
पैकी बैसल्या भूचर । जळचर यक्ष किन्नर ।
सिद्ध चारण मुनीश्वर । सुरवर आदिकरोनी ॥ ३२ ॥
खेचर भूचर जळचर । दानव मानव विखार ३ ।
राहिले होते समग्र । श्री रामचंद्रशेषासी ॥ ३३ ॥
ब्रह्माआदि ईशान । लोकपाळ सकळ जन ।
श्रीरामषेशालागून । प्रीति करोन राहिले ॥ ३४ ॥
निजप्रधानासी बिभीषण । सुग्रीवासहित वानरगण ।
पंक्ती बैसविल्या सावधान । मध्ये रघुनंदन शोभत ॥ ३५ ॥
नभीं तारांगणांची पंक्ती । मध्ये शोभे निशापती ।
तेंवी सुरखेचरपंक्ती । मध्ये रघुपति शोभत ॥ ३६ ॥
मध्ये श्रीराम केवळ । आवरणपंक्ती लोकपाळ ।
प्रकाशे दीप प्रबळ । राम घननीळ चिज्ज्योति ॥ ३७ ॥
कौसल्येचे भाग्य गहन । जिचा पुत्र रघुनंदन ।
जेणें त्रैलोक्य पावन । निजजीवन विश्राचें ॥ ३८ ॥
खाद्यपदार्थाचे बहुविध प्रकार :
ऐका कौसल्येची परी । पारणाविधी श्रीरामचंद्रीं ।
वाढीत कौसल्या सुंदरी । निजनिर्धारीं परिसेयीं ॥ ३९ ॥
चैतन्यतेजें अति चोखटें । समभावें सुवर्णताटें ।
आनंदरसें पूर्ण वाटे । अपूर्ण कोठे असेना ॥ ४० ॥
प्रथम शाखांचिया परीं । वाढी कौसल्या सुंदरी ।
पंक्ती बैसल्या एकसरी । निजनिर्धारीं निजयुक्त ॥ ४१ ॥
एकी शाखा त्या खंडिवा । एकी केवळ खुडिवा ।
एकी सदेठी तोडिवा । एकी सोलिंवा सुवास ॥ ४२ ॥
एका कहुवटा खणुवाळी । एकी अति तिखट तोंडाळी ।
एक सलंब पै सरळी । एक वाटोळी गडबडती ॥ ४३ ॥
एक हिरवी करकरित । एकीं जारसी कचकचित ।
एकी बहुवीज बुचबुचित । एकी हसहसित कोरडी ॥ ४४ ॥
एकी अत्यंत आंबट । एकी सबाह्य तिखट ।
एकी सर्वांगी कडुवट । एक तुरट समसमित ॥ ४५ ॥
एक वाढोनि जारठलीं । एक मुरडी खुरटली ।
एक सुपुष्पें सारठली । एकी तुटली अनुवायें ॥ ४६ ॥
ऐशा फळवल्लीफळभारें । केलें समरस सांबारे ।
अवघ्या वाघारु वाघारें । निजथारें श्रीरामें ॥ ४७ ॥
ऐशा नानापरींच्या शाकदि । परवडी केल्या रघुकुळटिळका ।
एकेचि स्वादें जेवित देखा । अति नेटका जेवणारा ॥ ४८ ॥
एकें परपाकें उतटलीं । एक स्नेहदेंठीहून सुटलीं ।
वनिताहातींहूनि निसटलीं । स्वादा आली शिखरणी ॥ १४६ ॥
झाडीं पिकलें देंठकेणें । तरी आंबे आम्लपणें ।
शेजे मुराल्या एकांतपणे । न चाखतां घाणे चवी फांके ॥५ ० ॥
रूप दृष्टीतें बुझावी । वासें घाणातें समजावी ।
वाचा श्रवणें बाप म्हणवी । स्पर्शे निववी त्वचेतें ॥ ५१ ॥
रसना सेविता रसमात्र । गोडिया विनवी अंतर ।
सेवितां श्रीरामचरित्र । सबाह्याभ्यंतर सुखरूप ॥ ५२ ॥
एकलें एक च्यूतफळ । निववी इंद्रियें सकळ ।
श्रीरामपंक्ती अच्युतफळ । जग जें सकळ सुखरूप ॥ ५३ ॥
वैराग्यतापें तापलिया । त्याचि संतापकाचरिया ।
अनुतापतैलें तळिलिया । चवी आलिया श्रीरामें ॥ ५४ ॥
एक भोजनीं अविचारितें । सेविती निंदेचे रायतें ।
चवी चाखतां कुसमुसितें । कपाळ हातें पीटित ॥ ५५ ॥
नकि तोंडी धूर उठी । तळमळोनि कपाळ पिटी ।
श्रीराम त्यातें न पाहे दृष्टीं । परवडी खोटी भोजनाची ॥ ५६ ॥
लोणची वाढिन्नलीं अनेगें । रंगली भक्तिप्रेमरंगें ।
एक सलवण सर्वांगें । स्वाद श्रीरंगें सेवावा ॥ ५७ ॥
अहं कहुवट कुहिरी । सोहंलोणचीं रंगलीं खारीं ।
वैराग्यभोकरें खारली खारी । त्याहीमाझारीं मुरले मिरघोंस ॥ ५८ ॥
स्वबोधभोकरीवेलेसीं आंवळा । जेवितां चवीनें अति आगळा ।
मुळीच्या मूळीं गोडिया आला । स्वयें सेविला श्रीरामे ॥ ५९ ॥
त्रिगुणगुणांचे निजत्रिकूट । निजनिर्गुणें भरिलें बोट ।
मघमघीत अति उद्भट । अति स्वादिष्ट श्रीरामें ॥ ६० ॥
ऐसी लोणचीं नेणों किती । मुख्य स्मरण आलें नेणती ।
तो स्वाद जाणे रघुपती । बैसले पंक्ती ते धन्य ॥ ६१ ॥
सूक्ष्म सेवेच्या शेवया । मोडू नेदितां सगळिया ।
क्षीरसाकरेशीं आळलिया । स्वयें सेविल्या श्रीरामें ॥ ६२ ॥
पोकळे वळवेटी सरळीं । एक वाटोळी लांबोळीं ।
सेवेमाजी अवघी आलीं । ठायी पावलीं श्रीरामा ॥ ६३ ॥
परम स्वादाची साखर । पंचरस पंचधार ।
मृत वाढिलें सर्वसार । स्वादें श्रीरामचंद्र डुल्लत ॥ ६४ ॥
अनुतापें सद्यस्तप्त । निजसाराचें सारांश घृत ।
अखंड थारा स्वयें वाढित । श्रीरघुनाथ निजभोक्ता ॥ ६५ ॥
शास्त्रपडिपाडें पापड । नानायुक्ती अति तडफड ।
जळजळेचे आले फोड । तेणें कडकड मोडती ॥ ६६ ॥
यालागीं होते मागें । ते ओढोनि भजनमार्गे ।
निरवोनियां सर्वांगें । श्रीरामभोगें स्वादिष्ट ॥ ६७ ॥
मीतूंपण सांडणें ठायीं । तेचि शुद्ध सांडयी ।
श्रीराम ठायां येतां पाहीं । सांडीं मांडी नाहीं सर्वथा ॥ ६८ ॥
स्वयें तप्ततैलीं कुरवडी । स्वयें नुगवेचि बापुडी ।
शांतिदांतीं केली कुडकुडी । आली रोकडी राममुखा ॥ ६९ ॥
विषयलालसेचे लाडू । विवेकें वाढिले फोडफोडूं ।
तेणें पडिपाडें तिळव्या जाडु । स्वाद गोडू श्रीरामें ॥ ७० ॥
वैराग्यकढें कढली कढी । तीमाजी माया मुगवडी ।
विरोनि आली स्वादा गाढी । तिची गोडी राम जाणे ॥ ७१ ॥
त्यामाजी जिरे मिरे कापुरा । तेणें सुवास चढे अंबरा ।
रस सेविती फरफरां । श्रीराम चंद्राचेनि धर्मे ॥ ७२ ॥
भजनभावाच्या इडुरिया । क्षीरसागरींच्या क्षीरघारिया ।
सबाह्य गोड गुळवरिया । पूर्ण पुरिया परिपूर्ण ॥ ७३ ॥
भजनभेदें सफेत केणी । प्रेमशर्करा भरली भरणी ।
अमृतफळातें लाजवोनी । वाढिलें आयणी आंबवडे ॥ ७४ ॥
नुसधी गोडियेची घडली । तैसी खांडवी वाढली ।
चंद्रबिंबीची काढिली । घडी मांडिली मांडियांची ॥ ७५ ॥
मांडियांची नवलपरी । चतुर्वेद घडिया चारी ।
कर्मकानवटी उत्तरी । श्रीरामचंद्रीं निजस्वाद ॥ ७६ ॥
विवेकसांडणी अति सोज्ज्वळ । उभयभागीं निजतेजाळ ।
तांदुळ वेळिले भावबळ । अति सोज्ज्वळे अरुवार ॥ ७७ ॥
सोहं ओगराळे सनाथ । अलिप्तपणें भरिला भात ।
ठायीं वाढिला न फुटत । श्रीरघुनाथ निजभोक्ता ॥ ७८ ॥
अन्नीं वरान्नश्रेष्ठता । सबाह्य कोंडा झाडिला परता ।
चढला मध्यनायकाच्या माथा । प्रिय रघुनाथा यालागीं ॥ ७९ ॥
सर्व स्वादांचें कारण । स्वयें श्रीराम आपण ।
यालागीं वरी वाढिलें कवण । अपूर्ण तें पूर्ण श्रीराम करी ॥ ८० ॥
श्रीरामपंक्ती रसपीयूख । ज्यासी श्रद्धेची असे भूक ।
ग्रासोग्रासीं चढतें सुख । हे परवडी देख त्यालागीं ॥ ८१ ॥
न्यूनन नाही श्रीरामपंक्ती । जेवितां जेविते चवी जाणती ।
रुचलेपणें जाण वाढिती । अति सुमति कौसल्या ॥ ८२ ॥
राममाता सावधान । जाणे तृषिताचे लक्षण ।
सबाह्य निववीत संपूर्ण । जीवा जीवन देतसे ॥ ८३ ॥
कौसल्या स्वये खुणाविती । चारी मुक्ती तेथे राबती ।
जें जें ज्याचे मनोगतीं । तें तें देती त्या ठायीं ॥ ८४ ॥
पहिलें नवजणी वाढत्या । चौघीजणी पूर्ण कर्त्या ।
जें पंक्ती श्रीराम भोक्ता । अतृप्तता तेथें कैंची ॥ ८५ ॥
जेवणारांनी तृप्तीची ढेकर दिला :
एवं तृप्तीचा ढेंकर । देती स्वानंदें उद्गार ।
स्वादें कोंदलें जेवणार । श्रीरामचंद्र निजपंक्ती ॥ ८६ ॥
कौसल्या सावधान वाढी । सुरवर खेचर परवडी ।
ब्राह्मणतृप्ति झाली गाढी । धोत्रे बुडीं ढिलावती ॥ ८७ ॥
ऐसी सकळां आनंदतृप्ती । झाली असे श्रीरामपंक्ती ।
ज्यालागीं योजिलें रघुपती । अभिनव कीर्ति सांगणें असे ॥ ८८ ॥
अति प्रेमाचिये प्रीती । हनुमान आवडता रघुपतीं ।
त्याकारणें कौसल्यैहातीं । पाकनिष्पत्ती करविली ॥ ८९ ॥
ताट विस्तारोनि परिकरें । हनुमंतासी अति आदरें ।
बोलोवोनि रघुवीरें । मधुर उत्तरें अनुवादे ॥ ९० ॥
श्रीरामांची हनुमंताला पंक्तीला भोजनास बसण्याची विनंती :
हनुमंत सर्वज्ञा । तुवां पूर्वी केली आज्ञा ।
सारूनि विधिपारणा । अपेक्षा मना शेषाची ॥ ९१ ॥
तेणें अन्वये कौसल्या जननी । षड्रसपाकांची मांडणी ।
संपादिली तुजलागूनी । ताटे विस्तारोनी तिष्ठत ॥ ९२ ॥
तुम्ही आम्ही झडकरी । सवें जनकजा सुंदरी ।
भरत शत्रुघ्न आदरी । प्रीति थोरी सौमित्रा ॥ ९३ ॥
सकळ बैसोनि सांगातें । संपादू पारणाविधीतें ।
आज्ञापितां श्रीरघुनाथे । येरु निश्चितें अति कुशल ॥ ९४ ॥
आज्ञापितां रघुनाथ । माथां वंदोनि वचनार्थ ।
युक्तायुक्त न विचारीत । बैसे त्वरित सांगातें ॥ ९५ ॥
राम सुरवरां वर । नीच आपण वनचर ।
ऐसा करितां विचार । शेष सत्वर न ये हाता ॥ ९६ ॥
सवें बैसावया सम्यक । आणिक उपाय असे एक ।
होतो अंगस्थ बाळक । श्रीरामशेख तै लाभे ॥ ९७ ॥
श्रीराम कृपाळू जननी । भक्तीं प्रीति बाळाहूनी ।
भक्तापरी रघुनंदनी । नाहीं त्रिभुवनीं आवडतें ॥ ९८ ॥
रामाज्ञेप्रमाणे हनुमंत पंक्तीला येऊन बसल्यावर
सर्वांनी रामनामाच्या जयघोषात आपोशने घेतली :
ऐसे जाणोनि निश्चित । सवें बैसला हनुमंत ।
श्रीराम सकळां वेगें म्हणत । घ्याव्या निश्चित प्राणाहुति ॥ ९९ ॥
सुरनरादि खेचर । सिद्ध चारण मुनीश्वर ।
नाग यक्ष पैं किन्नर । घ्या हो समग्र प्राणाहुति ॥ १०० ॥
दानव मानव समग्र । वसिष्ठादि ऋषीश्वर ।
सुग्रीवादि वानरभार । राक्षसभार बिभीषणादि ॥ १०१ ॥
आज्ञापितां रघुनंदन । रामनामें गडगर्जन ।
सकळीं जयजयकार करोन । आपोशनें घेतलीं ॥ १०२ ॥
श्रीराम प्रेमाने मारुतीच्या मुखात घास घालू लागले.
परंतु मारुतीचा सर्वांआधी घास घेण्यास नकार :
अति प्रीतीं रामराणा । कवळ उचलोनि जाणा ।
देता आला वायुनंदना । येरु चरणां लागला ॥ १०३ ॥
स्वामी कृपाळु रघुपती । भक्तप्रीति तुझ्या चित्तीं ।
ग्रास घालिसी मुखाप्रती । निजस्फूर्ती विसरोनी ॥ १०४ ॥
परंतु एक विज्ञापन । कृपापूर्वक रघुनंदन ।
स्वामी परिसावें आपण । तरी मी वचन बोलेन ॥ १०५ ॥
म्हणोनि चरणीं ठेविला माथा । तेणें संतोष रघुनाथा ।
स्वयें आज्ञापी हनुमंता । आवडे चित्ता तें सांग ॥ १०६ ॥
ऐकोनियां तें वचन । हनुमान जाला सुखैकघन ।
विनविला रघुनंदन । आधीं आपण ग्रास घेणें ॥ १०७ ॥
सवेंचि घेईल लक्ष्मण । पाठी भरत शत्रुघ्न ।
जनकनंदिनी ग्रास घेऊन । अधिकार पूर्ण मग माझा ॥ १०८ ॥
ऐसें विनवितां हनुमंता । झालें आश्चर्य रघुनाथा ।
हनुमान नाटोपे सर्वथा । विचार आतां काय करूं ॥ १०९ ॥
ग्रास न घेतां आपण । हनुमान सर्वथा न घे जाण ।
शेष दुसरिया ग्रासेंकरून । घेऊं छळून हनुम्याचें ॥ ११० ॥
श्रीराम-सीता, भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न यांनी घास घेतल्यावर मारुतीला घास घेण्याची विनंती :
ऐसा करोनि निर्धार । ग्रास घेत रघुवीर ।
विनविलां सीता सौमित्र । घेई सत्वर कवळातें ॥ १११ ॥
श्रीरामाचे अनुमते । सीतेनें घेतलें कवळातें ।
सौमित्रही प्रेमें बहुतें । घेत कवळाते मर्यादा ॥ ११२ ॥
भरत शत्रुघ्न दोघे जण । तिहीं कवळ घेतां पूर्ण ।
हनुमान विनवी रघुनंदन । ग्रास आपण सवें ध्यावा ॥ ११३ ॥
ऐसें सांगतां रामासी । हनुमान लागोनि चरणांसी ।
श्रीरामासहित सकळांसी । पुसे भोजनासी पैं आज्ञा ॥ ११४ ॥
निरोप आहे जी आम्हांसी । क्षोभ न यावा कोणासी ।
कृपा असेल मानसीं । तरी वेगेंसीं आज्ञापिजे ॥ ११५ ॥
ऐकोनि हनुम्याचें वचन । हांसिन्नले सकळ जन ।
रामें देतो आज्ञापन । विषाद कोण मानील ॥ ११६ ॥
श्रीरामआज्ञा उल्लंघन । करी ऐसा पापी आहे कोण ।
त्यासी जाण पां अधःपतन । नरक दारुण पै होती ॥ ११७ ॥
सवें सांगे रघुनंदन । म्यां देतो आज्ञापन ।
विषाद मानूं शके कोण । ग्रास आपण सवें घ्यावा ॥ ११८ ॥
सकळ तुजलागीं तटस्थ । बैसले असती वाट पाहत ।
विलंब न करावा निश्चित । घ्यावे त्वरित कवळातें ॥ ११९ ॥
परंतु मारुतीने घास न घेता श्रीरामांच्या प्रसादाचे ताट उचलून उड्डाण केले :
आज्ञापिता रघुनंदन । येरें घालोनि लोटांगण ।
ताट उचलोनि जाण । केलें उडाण आकार्शी ॥ १२० ॥
देखोनि तयाचें लाधव । स्वयें हांसतसे राघव ।
कैसा साधिला अभिप्राव । अन्य गौरव हनुम्याचें ॥ १२१ ॥
आम्ही ठकवोनि घेवों पाहों शेष । तंव येणेंचि ठकविलें आम्हांस ।
ऐसें विचारोनि राघवेश । हनुमंतास पूसत ॥ १२२ ॥
काय केलें वायुनंदना । तीक्ष्णबुद्धि विचक्षणा ।
तुझ्या शेषालागी जाणा । आम्ही संगातें बैसलों ॥ १२३ ॥
तंव त्वां विंदान साधिलें । सकळ आसावले सांडिलें ।
अवघें ताट उचलोनिया नेलें । वेडाविलें आम्हांसी ॥ १२४ ॥
ऐसें पुसतां रामरावो । येरु हांसोनि लवलाहो ।
लोटांगण घालोनि पहाहो । स्वयमेवो विनवित ॥ १२५ ॥
भक्ताचे उच्छिष्ट देवाने भक्षू नये म्हणून मी ताटासह उड्डाण केले असे मारुतीचे स्पष्टीकरण :
ऐक स्वामी रघुनंदना । तूं कृपाळू दीनजनां ।
तुझ्या शेषालागीं जाणा । भक्तजनां अति प्रीति ॥ १२६ ॥
नाना व्रतें यज्ञ दान । पुनश्चरणें अतिकठिण ।
तुझ्या प्रसादालागून । भक्तजन करिताती ॥ १२७ ॥
योग योग पै दारुण । पर्वतपात करितां पूर्ण ।
तुझा प्रसाद न ये जाण । तो मजलागून पावला ॥ १२८ ॥
ऐसें उफराटें घडे केंवी । जें भक्तशेष श्रीरामसेवी ।
ऐसे न मानावें गोसावी । मिठी सुटावी कीं भक्ताची ॥ १२९ ॥
निजभक्ताचें निजशेख । स्वयें सेवी रघुकुळटिळक ।
ते विपरीत झाले देख । ऐसें निःशेखघडेना ॥ १३० ॥
चंद्र निजकळा विसरोन । चंद्रामृतालागीं पूर्ण ।
चकोराचे परी जाण । साकांक्षण अमृता ॥ १३१ ॥
सूर्य निजतेजा भुलला । प्रकाशातें शोधूं गेला ।
दरांदरकुटीं रिघाला । कोठडिया लपाला अंधारी ॥ १३२ ॥
महासिंधू तृषित जाहला । क्षुद्र नदिये मागों गेला ।
तेंवी भक्त शेषालागी वहिला । राम भुकेला काय सांगों ॥ १३३ ॥
मस्तीची आनंदातिरेकाने मर्कट लीला :
म्हणोनि मांडिल्या मर्कटचेष्टा । घांस घेतसे घटघटां ।
मिटक्या देतसे मटमटां । सुरश्रेष्ठां विटावोनी ॥ १३४ ॥
वांकुल्या दावी सौमित्रासी । भरता देखोनि खाजवी कुसी ।
डोळे घुलकावी सीतेसी । शत्रुघ्नासी दावी अंगुष्ठ ॥ १३५ ॥
देखोनियां बिभीषणा । काखा खाजवीत जाणा ।
अंगद सुग्रीवा दोघांजणा । पृच्छेकरोनि जाणा हेळसी ॥ १३६ ॥
शेषें मातला वानर । दृष्टि नाणी सुरासुर ।
दावित मर्कटविचार । अपपर नाठवे ॥ १३७ ॥
प्रेम न सरे माकडा । लोळतसे गडबडां ।
पृच्छ नाचवी रामापुढां । वसिष्ठापुढां कोल्हाटे ॥ १३८ ॥!
मारुतीची लीला पाहून सर्वजण हंसतात :
देखोनि हनुम्याचे विकार । वसिष्ठादि ऋषीश्वर ।
ब्रह्मादिक पैं सुरवर । श्रीरघुवीर हांसत ॥ १३९ ॥
सौमित्र भरत शत्रुघ्न । हांसतसे सीता तें देखोन ।
वसिष्ठादि ऋषिगण । सिद्धचारण हांसती ॥ १४० ॥
ब्रह्मादि सुरपंक्ती । बिभीषण लंकापती ।
सुग्रीवादि सकळ जुत्पती । हांसताती विस्मयें ॥ १४१ ॥
ऐसा करितां गदारोळ । श्रीरामपंक्ती सकळ ।
तृप्ति पावले बहळ । आनंदकल्लोळ श्रीरामें ॥ १४२ ॥
सकळिकांसी झाली तृप्ती । श्रीरामपंक्ती विश्रांती ।
हनुम्याचे प्रत्युपकारार्थीं । कांही युक्ती स्फुरेना ॥ १४३ ॥
आतां एक विचार । प्रार्धून हनुमान वीर ।
काय अपेक्षिततुझे अंतर । तो वर मागावा ॥ १४४ ॥!
त्रैलोक्या दुर्धर पाहीं । मागतां अटक जे कांहीं ।
तें तें देईन सर्वही । माग लवलाही मारुती ॥ १४५ ॥
हनुम्याचे भजनें भुलला । राम वरा उदित झाला ।
कृपेचा मेघ वोळला । भाग्ये आथिला हनुमत ॥ १४६ ॥
चातकाचें आळवणासाठीं । जगतीतळीं पहा होय वृष्टी ।
स्वसुकाळें कोंदे सृष्टी । क्षुधा उठउठी पै निरसे ॥ १४७ ॥
तेंवी मारुतीचेनि भजनें । कृपा वोळोनि रघुनंदने ।
जग निववी वरदाने । हीन जनें उद्धरती ॥ १४८ ॥
देखोनि वत्साचे क्षुधेतें । धेनु दुभे घरापुरते ।
तेवी हनुम्याचे वरदार्थे । निववी जगातें श्रीराम ॥ १४९ ॥
ऐसा अपूर्व प्रस्तावो । कृपा वोळोनि रामरावो ।
पुढिले प्रसंगी वदेल पहा हो । अभिनव भावो तेथींचा ॥ १५० ॥
एका जनार्दना शरण । कृपा वोळला रघुनंदन ।
हनुमंतासी वरदान । स्वयें आपण देतसे ॥ १५१ ॥
ते वदावया वरदान । श्रोते साधु संत सज्जन ।
कृपापूर्वक पसायदान । प्रीति करोन मज द्यावें ॥ १५२ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
श्रीरामशेषहनुमत्प्राप्तिनिरूपणं नाम अष्टाशीतितमोऽध्यायः ॥ ८८ ॥
ओंव्या ॥ १५२ ॥