अध्याय 5
सुमाली, माल्यवंत व माली यांची जन्मकथा
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
रावणारि म्हणे अगस्ती । तुझेनि मुखें सुकेश उत्पत्ती ।
वर लाधला शैलजात्मजापती । महादेवें प्रीतीं पाळिला ॥१॥
तयाकारणें वस्तीसी । गंधर्व लोक यमपुरासीं ।
राज्यीं स्थापोनि तयासी । पुढें काय ऋषी वर्तलें ॥२॥
तें सांगावें आम्हांप्रती । तूं कृपाळु कृपामूर्ती ।
तुजसमान नाहीं त्रिजगतीं । तुझी कीर्तीं न वर्णवे ॥३॥
तुवां प्रशिला अपांपती । तुझेनि विंध्याद्रीसी निद्रास्थिती ।
तुझेनि सूर्यास मार्गप्राप्ती । तुवां इल्वकवातापी मारिला ॥४॥
ऐसा तुझा अगाध महिमा । वाचा वर्णूं व शके ब्रह्मा ।
परादि वाचा शिणल्या मज रामा । वर्णिले तुम्हां न वचे ॥५॥
राक्षसवंशासंबंधी रामांचा अगस्तींना प्रश्न :
यालगीं जी ऋषिवर्या । मजा झालें परमाश्चर्या ।
राक्षसवंश महाऔदार्या । शिववरद पावावया किंनिमित्त ॥६॥
मग तो सुकेश आपण । गिरिजापतीचा वर लाहोन ।
स्वकर्मस्वधर्मीं सावधान । पुढील निरूपण मज सांगा ॥७॥
अगस्ति म्हणे कमलोद्भवजनका । नीरपुरीनायकाच्या प्राणघातका ।
आम्हां पुससी हें अपूर्व देखा । वाटतसे दातारा ॥८॥
ग्रामणी नामक गंधर्वाने सुकेशाला आपली कन्या दिली :
सुकेश धार्मिक जाणोन । ग्रामणी नामें गंधर्व आपण ।
तपस्तेजें तो दारूण । दुसरा जाण विश्वावसु ॥९॥
तयाचे घरीं कन्या सुंदरी । जैसी कर्पूरगौराची गौरी ।
नातरी लक्ष्मी विष्णूचे घरीं । तैसी कुमरी तयाची ॥१०॥
देव वानती तियेचे गुण । तें ग्रामणी गंधर्वे आपण ।
सुकेशासी प्रीतीं दिधली दान । विधिविधान पैं केलें ॥११॥
मग तीं दोघे शिववरदेंकरीं । ऐश्वर्य भोगिती निरंतरीं ।
स्वर्ग अप्राप्त इतरां भारी । तें सुखा गजरीं भोगिती ॥१२॥
स्वर्गी दोघें क्रीडा करिती । गगनीं जेवीं निशापती ।
किंवा विमानीं शचीपती । तेंवी विचरती पैं दोघें ॥१३॥
त्या दोघांना तीन मुले झाली :
तदनंतरें देववतीसी । गर्भ संभवला तियेसीं ।
तीन पुत्र समान त्रिनेत्रेंसीं । तियेचे कुसीं जन्मले ॥१४॥
त्यांचे केलें जातक कर्मासी । तयांची नावें तूं परियेसीं ।
सुमाळी माल्यवंत माळी ऐसीं । तुजपासीं सांगितलीं ॥१५॥
दक्षिणाग्नि गार्हपत्य आहवनी । तैसे तेजें शोभती तीन्ही ।
दिवसेंदिवस थोर होवोनी । पितृभजनीं सादर ॥१६॥
पितृआज्ञें तिघे जण । मेरुशिखरीं तप आचरोन ।
तपें संतुष्ट चतुरानन । येवोनि आपण बोलत ॥१७॥
तिघांच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन त्यांना ब्रह्मदेवाचा वर :
तुम्हीं तप केलें निघोर । तेणें हर्ष मज झाला थोर ।
आतां काय मागाल तो वर । तुम्हां सत्वर देईन ॥१८॥
हात जोडोनि तयांप्रती । मग तिघे राक्षस विनविती ।
आम्हीं तिघीं वसावें एकत्रीं । अपार संपत्ती भोगित ॥१९॥
आयुष्य व्हावें आत्यंतिक । वैर व्हावे आमुचे रंक ।
आणि प्रताप अधिकाधिक । इतुकें आवश्यक दे आम्हां ॥२०॥
ऐकोनि तयांचें वचन । हांसोनि बोले चतिरानन ।
जे इच्छा तें दिधलें जाण । सत्य भाषण पैं माझें ॥२१॥
इतुकें बोलोनि प्रजापती । विमानारीढ सत्यलोकाप्रती ।
गेलियामागें अवनि जापती । काय करिती ते राक्षस ॥२२॥
शिल्पशास्त्रीं अति प्रवीण । ऐसा जो विश्वकर्मा जाण ।
तयाच्या भवनाप्रति जावोन । करिती स्तवन तयाचें ॥२३॥
त्या तिघांनी विश्वकर्म्याकडून लंकानगरी वसविली :
सुकेशपुत्र म्हणती विश्वकर्म्यासी । तुझा महिमा न बोलवे आम्हांसी ।
तूं केवळ सृष्टीकर्ता सत्यत्वेंशीं । निर्माण करिसी भवनातें ॥२४॥
तुवां सुरवरांकारणें । रचिलीं नानापरी भवनें ।
नाना मंदिरें नाना पट्टणें । गुह्यस्थानें निर्मिलीं ॥२५॥
तरी आम्हांकारणें समर्था । मंदिर पाहिजे सर्वथा ।
मेरू मांदार अथवा हिमपर्वता । यांच्या आश्रयानें करावें ॥२६॥
ऐकोनि तयांची वाणी । विश्वकर्मा विचरे मेदिनीं ।
दक्षिणसमुद्रामाजी दोनी । पर्वत नयनीं देखिले ॥२७॥
पर्वतेंसीं पर्वत समीप जाण । त्रिकूट ऐसें त्यां अभिधान ।
उंच तीस योजनें विस्तीर्ण । तोय परिपूर्ण सरोवरीं ॥२८॥
लंकानगरीचे वर्णन :
मग तो विश्वकर्मा तेथ । लंकानगरी निर्माण करित ।
भोवतें दुर्ग शोभिवंत । परिघ विचित्र समुद्राचा ॥२९॥
नगरी शोभे हाटकवर्ण । हाटवटिया शोभायमान ।
हुडे अटोळिया सप्तखण । माजी दुखणें बहुवस ॥३०॥
चहूं दिशासीं चार दारवंटे । आगडा सांखळ्या वज्रकपाटॆं ।
परवीरांचे हृदय फुटे । देखोनि नेटें ते काळीं ॥३१॥
तोरणें मखरें बहुवस । माजी शोभती मिक्तघोंस ।
द्राक्षामंडपछाया मार्गस्थांस । विश्रांतीस पैं देखा ॥३२॥
देखोनियां लंकेची थोरी । लाजे अमरावती हात चुरी ।
भोगवती दडाली पाताळविंवरीं । कैलासही सरी ते न पवे ॥३३॥
करावें लंकेचें वर्णन । कथा विस्तारेल अति गहन ।
त्याहिमाजी मी अपुरातें दीन । बुद्धिहीन पैं असें ॥३४॥
यालगीं जी करावी क्षमा । जैसें बालक नेणे शुभा-शुभ कर्मा ।
तयावरी जनकजननीचा प्रेमा । तया सुखासी सीमा पैं नाहीं ॥३५॥
मग तो विश्वकर्मा तयांप्रती । सांगता झाला श्रीरघुपती ।
तुम्हीं करावी तेथें वसती । लंका नाम नगरींसीं ॥३६॥
नर्मदानामक गंधर्वस्त्रीनें त्या तिघांना तीन कन्या दिल्या :
याउपरी रजनीचर तिघे जण । वसविते झाले लंकाभवन ।
नर्मदा नामें गंधर्वी जाण । तिघी कन्या तिये घरीं ॥३७॥
ह्री श्री कीर्ती तिघी बहिणी । नर्मदा गंधर्वी त्यांची जननी ।
देती झाली राक्षसांलागोनी । अनुक्रमेंकरोनी राघवा ॥३८॥
तिघे गृहस्थ होऊन । तिघी स्त्रियांसीं विराजमान ।
क्रीडती वनोपवन । जेंवी मघवा अप्सरांसीं ॥३९॥
तिघांचा वंशविस्तार :
आतां तयां तिघांची वंशोत्पत्ती । सांगेन तुज जानकीपती ।
माल्यवंताची स्त्री सुकृती । तिसी सहा पुत्र एक कन्या ॥४०॥
वज्रमुष्टि विरुपाक्ष दुर्मुख । चवथा सुप्तघ्न पांचवा यज्ञकोप देख ।
मधुमंत ऐसें षट् क । सातवी कन्या अनळा पैं ॥४१॥
आतां सुमाळिपासाव उत्पत्ती । ऐकें गा ये धरणिजापती ।
तयाची भार्या कुसुमावती । चंद्रासारिखें मुख जिचें ॥४२॥
सुमाळिवीर्ये जाणा । तियेचे उदरीं संताना ।
तेरा पुत्र तिघी कन्या । त्यांच्या नामाभिधाना अवधारीं ॥४३॥
प्रहस्त अंकपन विकट । कंकपत्र धूम्राक्ष कालिकामुख ।
सुपार्श्व महामती देख । घस प्रघस भासकर्ण ॥४४॥
पुण्योत्कट बळाहक । कैकसी शुचिस्मित एक ।
कुंभीनसी तिसरी देख । त्रयोदश पुत्र तिघी कन्या ॥४५॥
आतां माळीचे संताना । सांगतसें पद्मिनीरमणा ।
तयाची स्त्री वसुमती नाम्ना । देखोनि वदना शशी विटे ॥४६॥
माळीचेनि वीर्ये संभूत । सुमतीस झाले चवघे सुत ।
तयांचीं नामें विख्यात । अनळ अनिळ हंस व संपाती ॥४७॥
हे चवघे राक्षसपुत्र । बिभीषणाचे मंत्री पुण्यवंत ।
यांसही झाले बहुसाल पुत्र । एकैकशत एकैका ॥४८॥
यांचे भयेंकरीं जाण । काळ तोही कंपायमान ।
शचीपति तेथें बापुडें दीन । दुर्धर अंगवण पैं यांची ॥४९॥
माळिच्या पुत्रांच्या उन्मादानें देव व ऋषी त्रस्त :
हे अवलोकिती ऊर्ध्वदृष्टी । तंव हिमकर धाक धरी पोटीं ।
भेणें दिग्गज लंघिती द्वीपांच्या शेवटीं । यांशेवटीं वीर नाहीं ॥५०॥
ययांचे भयेकरून । मुनि ऋषी कंपायमान ।
विध्वंसिती महायज्ञ । जप ध्यान तेथें कैंचें ॥५१॥
ब्रह्मवरदे होवोनि उन्मत्त । सुरासुरां त्रास देत ।
यांचे दृष्टीस जो वीर पडत । तो पावत यमपुरा ॥५२॥
हे आपौले भुजबळेंसीं । स्व इच्छे हिंडती पृथ्वीसीं ।
ययांचिये अंगवणेंसीं । इंद्र तुळणेसी न पावे ॥५३॥
पुढिले अध्यायीं निरुपण । समस्त सुगरण मिळोन ।
प्रार्थितील शैलजारमण । दीनवदन हो उनी ॥५४॥
एका जनार्दना शरण । श्रीरामें रम्य रामयण ।
वदनीं वदविता श्रीजनर्दन । पुढील निरुपण अतिरम्य ॥५५॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
सुमालिमाल्यवंतमालिजन्मकथनं नाम पंचमोऽध्यायः ॥५॥ ओंव्या ॥५५॥