अध्याय 9
रावण – कुंभकर्णादिंची उत्पत्ती
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
श्रीराम म्हणे मुनिवरा । माल्यवंत सुमाळी पाताळविवरा ।
प्रवेशले तयावरी चतुरा । कथा पुढारां सांगावी ॥१॥
अगस्ति विनवी श्रीरामा । तूं अंतर्यामी साक्षी आम्हां ।
ऐसें असोनि हा महिमा । आमचा थोर वाढविसी ॥२॥
पुढें ते रजनीचर । पाताळीं प्रवेशले सहपरिवार ।
लपोनि राहिले धाक थोर । भय दुस्तर देवांचें ॥३॥
कोणे एके समयीं । राक्षस विचरती महीं ।
रसातळमृत्यु लोकीं पाहीं । स्व इच्छेनें हिंडती ॥४॥
अंगकांति अति सुंदर । शोभा शोभे शशिचक्र ।
सुवर्णकुंडलें मकराकार । विशाल नेत्र आकर्ण ॥५॥
ऐसा सुमाळी राक्षस । मही विचरत सावकाश ।
तंव एके समयीं कुबेरास । देखता झाला दुरोनी ॥६॥
कुबेर पुष्पकविमानीं । बैसोनि जातां गगनीं ।
राक्षसीं देखिला नयनीं । भय मनीं धरियेलें ॥७॥
पाताळा गेला पुनरपि जाण । स्वगृहीं असतां सावधान ।
तंव कन्या देखिली रुपयौवन । राक्षसांचे मन कळवळिलें ॥८॥
माल्यवंताने आपली कन्या कैकसी हिला पौलस्तीला वरण्यास सांगितले :
माल्यवंत म्हणे कन्येप्रती । ऐक वो एक माझी विनंती ।
तूं रुपयौवनें गुणवती । वर निश्चितीं तुज पाहिजे ॥९॥
जयाचे घरीं कन्यारत्न । तया चिंता अति दारुण ।
कोणे काळीं सुस्थिर मन । तया प्राणियाचें पैं नाहीं ॥१०॥
कन्येची होता उत्पत्ती । माता पिता चिंता वाहती ।
तैसी तूं नव्हेसी गुणवंती । लक्ष्मीची स्थिती तुजपाशीं ॥११॥
माता पिता काय करिती । कन्येसी योग्य वर पाहती ।
विधिपूर्वक लग्न लाविती । तयांच्या पुण्या मिती नाहीं ॥१२॥
तिन्ही कुळांचे विचारण । शोध करिती ज्ञाते जन ।
घटित गोत्र नसतां ज्ञान । लग्न तेथें न लाविती ॥१३॥
तरी कन्ये तूं अवधारीं । प्रजापतीचे उदरीं ।
पुलस्त्यानामा श्रेष्ठ भारी । पुत्र तयाचा पौलस्ति ॥१४॥
पुलस्यांचा नंदन । पौलस्तिनामा प्रसिद्ध जाण ।
तयासि त्वां वरावें आपण । पुत्र संतान तुज होईल ॥१५॥
त्या पुत्राचें महिमान । तेजें जैसा शोभे भान ।
अथवा अग्निसमान । प्रतापें पूर्ण बळवंत ॥१६॥
कैकसीचे पौलस्तीच्या आश्रमांत आगमन :
पितृआज्ञा वंदोनि शिसीं । आनंदे निघाली कैकसी ।
पौलस्ति जेथें तपोराशी । त्या आश्रमासी पैं आली ॥१७॥
जोडोनियां दोनी कर । उभी ठेली तयासमोर ।
तंव तो तपस्वी द्विजवर । काय उत्तर बोलिला ॥१८॥
भयभीत होवोनि मानसीं । उभी ठेली अधोदृष्टीसीं ।
तंव तियेसी देखोनी ऋषी । बहुत मानसीं संतोषला ॥१९॥
तो विश्रवा ब्राह्मण । तेजें तपें ज्ञानें पूर्ण ।
मृदु मंजुळ वचन । संतोषोनि बोलिला ॥२०॥
अवो भद्रे तूं कोणाची कोण । कोण पिता काय अभिधान ।
तुज येथें यावया काय कारण । समूळ कथन मज सांगें ॥२१॥
तिने आपले मनोगत सांगितले :
ऐसें ऐकोनि ऋषिवचन । कैकसी दोनी कर जोडून ।
म्हणे स्वामी तूं सर्वज्ञ । आत्मप्रभावें गुण जाणसी ॥२२॥
वचन ऐकोनि पितयाचें । मज येणें झालें सांचें ।
कैकसी नाम या देहाचें । तुम्ही सर्वज्ञ जीवींचें जाणतसां ॥२३॥
ऐकोनि तियेचा शब्द । मुनि ध्यानस्त झाला स्तब्ध ।
जाणोनि तियेचा भाव शुद्ध । काय आपण बोलतसे ॥२४॥
तुला राक्षसपुत्र होतील असे ऋषींचे सांगणे :
अवो चंद्राने अवधारीं । तुज पुत्र पाहिजे तरी ।
तूं आलीस हे वेळा आसुरी । राक्षस पुत्र तुज होती ॥२५॥
ते बळियाढे दुर्वृत्ती । देवां अत्यंत त्रास देती ।
क्रूररुपें उन्मत्त होती । जाण निश्चितीं कैकसी ॥२६॥
आपल्यासारखा धर्मनिष्ठ , तपस्वी पुत्र व्हावा म्हणून कैकसीची प्रार्थना :
ऐकोनि द्विजाचें वचन । हात जोडोन करी विनवण ।
स्वामी तुम्हांसारिखे नंदन । माझे उदरीं जन्मावे ॥२७॥
तुम्ही शांत दांत संपूर्ण । तपें तेजें अति दारुण ।
सर्व भूतीं दया संपूर्ण । ऐसें संतान मज देईं ॥२८॥
दुराचारी पुत्र होती । तेणें पितृगण नरकीं बुडती ।
तयांचें जे पुत्र म्हणती । ते निश्चितीं मंदबुद्धि ॥२९॥
ऐकोनि तियेचें वचन । संतोषला तपोधन ।
मजसारिखें धर्मिष्ठ जाण । पुत्रनिधान पावसी ॥३०॥
ऋषिवचन वंदोनि शिरीं । तेथेंचि राहिली सुंदरी ।
कायावाचामनेंकरीं । सेवा तिळभरी न सांडी ॥३१॥
तिच्या पोटी रावणाचा जन्म :
सेवा देखोनि दारुण । पुत्र जन्मविता झाला आपण ।
तये काळीं झालें जनन । सावधान अवधारा ॥३२॥
दशशीर्ष विंशति भुजा जाण । दाढा विक्राळ विशाळ वदन ।
ओष्ठ वीस आरक्तवर्ण । काया जैसी काजळगिरि ॥३३॥
स्कंधावरी दिसती शिरें । जैसीं पर्वतांची शिखरें ।
तीहीं अत्यंत भयासुरें । अति उग्र तेज पैं ॥३४॥
ऐस जन्मतां ते क्षणीं । माता देखती झाली त्यालागोनी ।
भयानक गजबजोनी । सावधान हो उनी पहातसे ॥३५॥
जातमात्रे ततस्तस्मिन्जज्वाल कठिनः शिवः ।
क्रव्यागाश्चापसव्यानि मंडलानि प्रचक्रिरे ॥१॥
ववर्षू रुधिरं मेघा रटंतो भैरवान्स्वनान् ।
न प्रकाशति खे सूर्यो महोल्काश्चापि खेऽपतन् ॥२॥
अथ नामाकरोत्तस्य पितामहसमः पिता ॥३॥
रावण जन्मताच भयानक अपशकुन :
कैकसी ते प्रसूत झाली । भयानक पुत्र प्रवसली ।
पुढें काय कथा वर्तली । सावधान अवधारा ॥३६॥
जन्म पावतांच राक्षस । तेथे उत्पात झाले बहुवस ।
भालुवा भुंकती अरण्य उद्वस । तैसें नगर दिसतें झालें ॥३७॥
दश दिशा ज्वाळाकुळित । गीधमंडळी अपसव्य फिरत ।
पर्जन्य रुधिरें वर्षत । मेघ गर्जत भयानक ॥३८॥
खमंडळीं अद्भुत ध्वनी । सूर्य न प्रकाशे गगनीं ।
नक्षत्रें पडती च्यवोनी । कंप मेदिनीं होतसे ॥३९॥
यानंतरें चतुरानन । पहावया तेथें आला जाण ।
देखतां दशशीर्ष वीस नयन । जातक आपण वर्तविता झाला ॥४०॥
पेंचद्वय शीर्श दशद्वय नयन । विंशति भुजा तेजस्वी जाण ।
तयाचें दशग्रीव अभिधान । आतां कुंभकर्णजनन अवधारा ॥४१॥
कुंभकर्ण , शूर्पणखा व बिभीषण यांच जन्म :
तदनंतरे जन्मला कुंभकर्ण । जयाच्या बळा न करवे वर्णन ।
आणिक दृष्टांत नाहीं जाण । पुढे ऐसा न होईल पैं ॥४२॥
तयाउपरी एक कुमारी । जन्मली शूर्पणखा विक्राळ भारी ।
जियेच्या मुखाची वर्णूं थोरी । तरी तें प्रथमचि भयानक ॥४३॥
तदनंतरे एक पुत्र । धर्मपरायण अति पवित्र ।
सर्वां भूतीं हितरत । नाम तयाचें बिभीषण ॥४४॥
तयाउपरी ते कैकसी । तिघे पुत्र एक कन्येसी ।
बसवोनियां वनवासीं । वाढविती झाली पुत्रांप्रति ॥४५॥
ज्येष्ठ पुत्र रावण । अत्यंत क्रूर कपटी जाण ।
दुसरा तो कुंभकर्ण । त्रैलोक्यी पीडन करिता झाला ॥४६॥
याचेनि भये ऋषी । लपताति दशदिशीं ।
मारुनि तो ब्राह्मणांसी । भक्षि विचरे वनामध्यें ॥४७॥
बिभीषण धर्मात्मा जाण । करिता झाला वेदपठण ।
इंद्रियनेमस्त सज्ञान । पुण्यपावन तो झाला ॥४८॥
कोणें एके काळीं धनेश । विचरत आला सावकाश ।
पितया पहावया उद्देश । तया काळीं तो आला ॥४९॥
आरुढोनि पुष्पकावरी । कुबेर येत तया अवसरीं ।
चालिला जैसा वज्रधारी । चित्रवनीं क्रीडेतें ॥५०॥
कुबेराच्या ऐश्वर्याचे वर्णन कैकसी रावणाजवळ करिते :
तया देखोनि कैकसी । झाली अत्यंत उल्लासी ।
मग म्हणे रावणाशी । हा बंधु कुबेर तुझा ॥५१॥
ऐक गा ये दशग्रीवा । काय सांगूं याच्या वैभवा ।
वंशीं पुत्र ऐसा व्हावा । भाग्यें ऐश्वर्यकरोनी ॥५२॥
एक वंशी पुत्र होती । ते पूर्वजांतें तारिती ।
ऐक लेंक म्हणविती । अधःपाता नेती पूर्वजां ॥५३॥
तसे ऐश्वर्य संपादण्याची रावणाची प्रतिज्ञा :
ऐकोनि मातेचें वचन । हृदयीं खोचला रावण ।
म्हणे माते मी आपण । कीर्ति करीन अगणित ॥५४॥
वैश्रवणाहूनि विशेषेंसीं । ऐश्वर्य भोगीन स्वबळेंसीं ।
तरीच जन्मलों तुझियें कुसीं । संशय धरूं नको ॥५५॥
आपुलेनि जाण वैभवें । स्वर्गींचे देव लावीन सेवे ।
यदर्थी सत्य मानावें । मनीं न म्हणावे हे मिथ्या ॥५६॥
कुबेरासारिखें तत्काळ । भोगीन संपत्तीचें फळ ।
हें माझे वाक्य अचळ । अढळ जाण केवळ जननीये ॥५७॥
रावण कुंभकर्ण यांचे गोकर्ण आश्रमास आगमन :
ऐसें वदोनि मातेप्रती । दोघे निघाले शीघ्रगती ।
गोकर्णनाम आश्रमस्थिती । तया स्थळाप्रती पैं आले ॥५८॥
गोकर्णनामें आश्रम । परम पवित्र विश्राम ।
जेथें सिद्ध योगीश्वर मनोरम । चारण जेथें वसती ॥५९॥
दोघे बंधु समवेत । तेथें स्वस्थ करोनि चित्त ।
करिते झाले तो कार्यार्थ । सावचित्त अवधारा ॥६०॥
इति श्रीवाल्मीककृत । रामायण उत्तम ग्रंथ ।
तें हे उत्तरकांडकथामृत । सज्जन संत रिझोत ॥६१॥
श्रीरामकथेचा महिमा । जाणे ज्याची स्त्री उमा ।
एका जनार्दना एकनामा । भिन्न भाव मुळींच नाहीं ॥६२॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
रावणकुंभकर्णशूर्पणखाबिभीषण उत्पत्तिर्नाम नवमोऽध्यायः ॥९॥
ओंव्या ॥६२॥ श्लोक ॥३॥ एवं ॥६५॥