रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 13 MB (Official) द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 13

अध्याय 13

रावणाचे अलकावतीस गमन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

तदनंतरें ब्रह्मलोकगुरू । रावणासि देवोन वरू ।
केला लंकेचा ईश्वरू । दोघां बंधूसमवेत ॥१॥
तिघांसि पाणिग्रहण झालें । रावणासी राज्य लाधलें ।
मेघनादाचें जनन सांगितलें । पुढील कथा अवधारा ॥२॥
राज्य करितां विबुधारिजनक । प्रजालोक स्वस्थ सकळिक ।
कोणी एके काळीं घटश्रोत्र देख । विनविता झाला बंधूसी ॥३॥
अहो जी नृपति अवधारीं । तुम्हीं ज्येष्ठ बंधू आहां शिरीं ।
मज निद्रा बाधी भारी । काळकूटासमान ॥४॥

मागणीप्रमाणे कुंभकर्णाला झोपण्यासठी रावणाने मंदिर बांधून दिले :

निद्रा बाधीतसे राजेंद्रा । आवडी नाहीं भोगापचारां ।
मजकारणें धाम करा । सुखशयन करावया ॥५॥
ऐकोनि अनुजाचें वचन । रावण हांसिला खदखदून ।
विश्वकर्मा मग पाचारोन । तया आज्ञा देता झाला ॥६॥
कुंभकर्णालागीं मंदिर । करावें उत्तम सपरिकर ।
तेणें आज्ञापिले शिल्पकार । तें मंदिर करिते झाले ॥७॥
लांब रूंद दीर्घ बहुत । अति रमणीय मन निवे तेथ ।
आगबाधा तस्कराघात । नाहीं तया मंदिरीं ॥८॥
स्फटिकांचे खंब विचित्र । सुवर्णकरोनि लिहिलें चित्र ।
वैडुर्यशोभा सुंदर । किंकिणीज्वाळा लाविल्या ॥९॥
मुक्ताफळांची तोरणें । लाविलीं असती गहनें ।
पहातां उंच गगन ठेंगणें । ऐशा मानें निर्मिलें ॥१०॥
देखतां सर्व सुख पाविजे जेथें । राक्षसाचें मन निवे तेथें ।
देखतां श्रमांपासून सुटिजे । निर्मिलें मेरूसमान गृहातें ॥११॥
देखोनि मनोहर स्वधाम । तेथें कुंभकर्ण करी विश्राम ।
बहुत वर्षे निद्रा परम । जागृती नोहे कदाकाळीं ॥१२॥
कुंभकर्ण निद्राभिभूत । देखोनि दशानन काय करित ।
तें अवधारिजे सावचित्त । श्रोतृजनीं सादर ॥१३॥
श्रोता उदास कथेसी । ते कथा होय विरसी ।
जीवनेंवीण धान्यें जैसीं । सुकोनि जाती आपसया ॥१४॥
श्रोता कथेसी सादर । तरी वक्तयासि उल्लास थोर ।
ते कथा नव्हे क्षीरसागर । स्वाद विचित्र तेथींचा ॥१५॥

रावणाने देवांदिकांना संत्रस्त केले :

देव ऋषि यत्र गंधर्व । सिद्ध चारण मानव ।
यांसि त्रासिता झाला दशग्रीव । वारिता नाहीं पैं कोणी ॥१६॥
आपुले स्व इच्छेसीं । क्रीडे उद्यानादि विचित्र वनांसीं ।
नंदनवनीं जळक्रीडेसी । करी बळेसीं रावण ॥१७॥
जेंवी नदीमध्ये गजपती । किंवा वायु झडपे वृक्षाप्रती ।
कीं व्रज झगटे पर्वतीं । तैसा राक्षस विध्वंसित ॥१८॥

कुबेराने रावणाकडे दूत पाठविला :

हें ऐकोनि कुबेर जाण । दूत पाचारिला अति सज्ञान ।
तयासि म्हणे तूं जाऊन । रावणालागून सांगावें ॥१९॥
स्वधर्म अनुकूळ रायासी । दूता सांगशील क्षात्रधर्मासी ।
जेणें पूर्वज होती संतोषी । त्या प्रकारासी सांगावें ॥२०॥
ऐकोनि वैश्रवणवचन । दूतें मस्तक खालावून ।
प्रवेशला लंकाभवन । प्रथम बिभीषण भेटला ॥२१॥
बिभीषण म्हणे दूतासी । तूं कोठींचा कोण कोणा कार्यासी ।
आलासि हें आम्हांसी । किंनिमित्त सांगिजे ॥२२॥
दूत म्हणे बिभीषणा । मज वैश्रवणें पाठविलें जाणा ।
बिभीषण म्हणे धर्मज्ञा । सकळ कुशळ आहेत कीं ॥२३॥
बिभीषण म्हणे दूतासी । पैल रावण पाहें सिंहासनासीं ।
येरें देखोनि जयजयशब्देंसीं । रावणासी स्तविलें हो ॥२४॥
राजाधिराज लंकापती । यशस्वी भुजा तुझ्या हाती ।
वैरी अपधाकें पळती । इतुकें बोलोनि लीन राहिला ॥२५॥
हेमपर्यंक रत्नजडित । वरी पासोडा क्षीरोदक शोभत ।
वरी दशग्रीव बैसला तेथे । दूत बोलता झाला ते वेळीं ॥२६॥

दूताकडून रावणाला स्वधर्माचरणाचा संदेश :

अहो जी ऐकें लंकेश्वरा । मी सांगतों सर्व समाचारा ।
तुमचा श्रेष्ठ बंधु निर्धारा । नांव कुबेर जयाचें ॥१७॥
तयानें मजला पाठविलें । मुखवचेनें निरूपलें ।
अवधारिजे भूपाळें । उभयकुळधर्मार्था ॥१८॥
रायें स्वधर्मातें पाळावें । दुष्टांतें दिगंतराबाहेरी घालावें ।
साधुसज्जनातें सेवावे । भावबळेंकरोनी ॥१९॥
पुण्याचा संग्रह कीजे । पातकातें न स्पर्शिजे ।
गाईग्राह्मणां प्रतिपाळिजे । क्षात्रधर्मा न टाळिजे प्राण गेलिया ॥३०॥
तुम्ही दोघे ऐश्वर्य समान । तुम्हां दोघां एक व्रत नेम ।
तुमचें कुळ पूज्य परम । तपोनुष्ठान अधिक तुमचें॥३१॥
कुबेरें जें ऐकिलें । ते मज हातीं सांगविलें ।
ते अवधारिजे भूपाळें । सावधान होऊनी ॥३२॥
नंदनवना करोनि भग्न । ऋषीश्वरातें मारून ।
देवांचे अधिकार हिरोन । राक्षसांलागून वांटिले त्वां ॥३३॥
सुहृद सोयरे लहानथोर । बंधु आणि महावीर ।
हे तों घालूनी बाहेर । बहु अपूर्व त्वां केलें ॥३४॥
परी एक असे नीती । बंधु ज्येष्ठ कनिष्ठ असती ।
तयांतें रक्षावें भूपती । सुहृदस्थिति या नांवे ॥३५॥

कुबेराची आत्मकथा दूत रावणाला सांगतो :

मी तुझे आज्ञेकरून । गेलों हिमाद्रिपर्वता जाण ।
तेथें नित्यनेम अनुष्ठान । इंद्रियनिग्रहण म्यां केलें ॥३६॥
सदाशिवासमीप संतत । आचरतां झालों तप व्रत।
करोनियां एकाग्र चित्त । कित्येक दिवस क्रमियेले ॥३७॥
पुढें कर्मानुसार बुद्धी । भ्रम झाला मज ते संधीं ।
पार्वती रूपें अनुपम नीधी । शिवसहित क्रीडत होती ॥३८॥
रुद्राणिच्या रूपाची सीमा । वर्णूं न शके स्वयें ब्रह्मा ।
जियेतें देखोनि सुरांगना व्योमा । लाजोनि ऊर्ध्व पंथें गेलिया ॥३९॥
जिच्या स्वरूपाचे प्रभावीं । चंद्र सूर्य झाले दिवी ।
उमेसि वर्णीं ऐका कवी । कोण कोठें असेल ॥४०॥
आपण सव्य नेत्रकरीं। तिये काळीं अवलोकीं गौरी ।
ते गौरीचे प्रभावेंकरीं । सव्य नेत्र पडला तळीं ॥४१॥
पार्वतीचें अवलोकन मात्र । माझा भस्म झाला सव्य नेत्र ।
वडस वाढला पिंगळाकार । काणा सत्वर मी झालों ॥४२॥
तया गिरीच्या पाठारीं । मग मी तप करीं ।
आठ शत वर्षे होता पुरीं । तंव महादेव गौरीसहित आला ॥४३॥
माझे देखोन तप दारूण । कृपाळु ते उमारमण ।
म्हणे झालों मी सुप्रसन्न । वैश्रवणा जाय ये समयीं ॥४४॥
तुझी देखोन तपःस्थिती । मी सुखावलों बहुत चित्तीं ।
तूं माझा सखा निश्चितीं । तुजवरी प्रीती मज बहु ॥४५॥
उमेचे क्रोधेंकरीं । तुझ्या नेत्राची झाली बोहरी ।
दृष्टी देतो तया नेत्रीं । चराचर देखावया॥४६॥
उमेसि देखिलें नेत्रेंकरीं । ते तुझें नाम एकाक्ष निर्धारीं ।
पिंगळेक्षण चराचरीं । दुसरे नाम पैं तुझें ॥४७॥
ऐसें शंकरासीं सख्यत्व । करोनि कुबेर नगरा येत ।
तंव मार्गी झालें श्रुत । रावण पाप आचरला ॥४८॥
नंदनवन करोनि भग्न । मारिले ऋषी तपोधन ।
ऋषीश्वरांते त्रास देवोन । बंधुजन दडविले ॥४९॥
तुझिया मरणाचा उपाय । चिंतिताति सुरसमुदाय ।
तुज येथोनि नाहीं जय । सत्य जाण शक्रजिज्जनका ॥५०॥

रावणाकडून दूताची अवहेलना व स्वसामर्थ्याबद्दल दर्पोक्ती :

दूताच्य मुखीचें वचन । ऐकोनि रावण क्रोधायमान ।
दांत खाय करकरून । काय आपण बोलिला ॥५१॥
क्रोधेकरून नयन । ओष्ठ चावोनि राअण ।
दूताप्रति कठिण वचन । काय आपण बोलिला ॥५२॥
दूतासि म्हणे रावण । तूं बोलिलासि जयाचें वचन ।
तया आणिक दूत न मिळे जाण । तुज नंपुसका पाठविलें ॥५३॥
तूं नपुंसकाहूनि हीन । तुज ज्यानें पाठ्विलें तो अज्ञान ।
तें तुम्ही माझें अहित लक्षोन । आनेंआन बडबडितां ॥५४॥
ज्येष्ठ बंधु वैश्रवण । तया मारितां नलगे क्षण ।
होईल शब्द कुळदूषण । सत्य जाण पैं दूता ॥५५॥
शिवासहित असुरारी । मी मारीन क्षणामाझारीं ।
स्वर्गमृत्युपाताळाभीतरीं । निर्वैर सृष्टी करीन मी ॥५६॥
हें करितां मज अर्ध क्षण । न लगे दूता सत्य जाण ।
तुज मी मारीन रावण । राक्षस भक्षण करिती तुझें ॥५७॥
आणि हे अष्तौ लोकपाळ । करीन किंकर मी सकळ ।
हें मज करितां न लगे वेळ । कोपें प्रबळ चालिला ॥५८॥

दूताला ठार करून अलकावतीला निघाला :

आठवोनि दूताचें वचन । रावण अत्यंत कोपायमान ।
करीं खड् ग घेवोनि जाण । घायें दूत मारिला ॥५९॥
राक्षसांसि म्हणे रावण । यांच्या अस्थि-मांस करी भक्षण ।
तदनंतरें काय आपण । करिता झाला अवधारा ॥६०॥
पाचारोनि सार्थियासी । रथ संजोगोनि वेगेंसीं ।
जाणें आहे अलकावति नगरीसी । जेथें वैश्रवण पैं असे ॥६१॥
मग सज्जोनियां रथ । वरी आरूढला लंकानाथ ।
शस्त्रसामग्री घेवोनि त्वरित। अलकावतीये चालिला ॥६२॥
एका विनवी जनार्दन । पुढे गोड निरूपण ।
वाल्मिकीचें वाग्रत्न । सावधान अवधार ॥६३॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
रावण अलकावतीगमनं नाम त्रयोगशोऽध्यायः ॥१३॥ ओंव्या ॥६३॥